रविवार, ३१ मे, २००९

गणितासाठीचा डोंबिवली पॅटर्न

आनंदकुमार बाळकृष्ण गोरे यांच्या संकल्पना आणि लेखनातून साकार झालेल्या गणित या विषयावरील डोंबिवली पॅटर्न या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना गणित हा विषय खूप अवघड जातो. हा विषय सोपा वाटावा आणि मुलांना या विषयात गोडी निर्माण व्हावी, असे लेखकाला अनेक वर्षांपासून वाटत होते. त्यांची ही धडपड त्यांच्या या पुस्तकातून साकार झाली आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती २९ जुलै २००७ मध्ये आणि आता दुसरी आवृ्त्ती ४ जानेवारी २००८ मध्ये प्रकाशित झाली आहे. डोंबिवलीच्याच अंजली प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पालक आणि मोठ्या माणसांसाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त व संग्राह्य आहे. पुस्तकाचे मूल्यही अवघे शंभर रुपये इतके आहे.


पुस्तकाची पहिली आवृत्ती चार महिन्यात डोंबिवलीतच संपली. या पुस्तकाची लवकरच इंग्रजी आवृत्तीही प्रकाशित करण्यात येणार आहे. मुलांसाठी लिहिणे हे मुळातच आव्हानात्मक काम असून त्यातून गणितासारखा न आवडणारा विषय सोपा करून मुलांना गोडी लावायची हे कठीणच, असे लेखकांने दुसऱया आवृत्तीच्या आपल्या मनोगतात म्हटले आहे. हे पुस्तक लिहिताना लहानपणचे दिवस आठवतात. माझे वडील १ ली ते ४ थी पर्यंत रोज सकाळी पाढे, पावकी, निमकी, पाऊणकी, सवायकी, दिडकी, अडीचकी आणि औटकी लिहून घेत असत. व संध्याकाळी परवचा म्हणण्यापूर्वी म्हणायला लावत असत. त्यानंतर दहा मिनिटे अधले मधले पाढे ते औटकी यातील काहीही विचारत असत. अगदी रोज. त्यानंतर तोंडी गणित विचारत अशत. व त्याची उत्तरेही झटपट दिलीच पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असे. पुढे शाळेतील माझे शिक्षक प्रभाकर गद्रे यांनी माझ्याकडून तयारी करून घेतली. हे पुस्तक लिहिताना त्यांच्याशीही चर्चा झाल्याचे गोरे यांनी आपल्या ऋणनिर्देशात म्हटले आहे.


पुस्तकाची प्रस्तावना र. म. भागवत यांची आहे. आपल्या प्रस्तावनेत भागवत यांनी म्हटले आहे की, गणिताच्या अभ्यासाचे अंकगणित, बीजगणित आणि भूमिती असे तीन विभाग आहेत. अंकगणित आणि बीजगणित यासाठी आकडेमोड करण्याचे कौशल्य आवश्यक असते. भूमितीमध्येही ते आवश्यक आहे्. म्हणूनच आकडेमोडीचे कौशल्य अवगत केले की गणिताच्या सर्व विभागांचा अभ्यास सुधारतो. एकदा हे कौशल्य प्राप्त केले की ते कायमचे टिकते आणि पुढील आयुष्यातही ते उपयोगी पडते. भारतामध्ये तोंडी गणिताची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आली आहे. मध्यंतरी आधुनिक शिक्षण पद्धतीच्या नावाखाली पाठांतराची पद्धत नाहीशी झाली किंबहुना ती केली गेली. त्याचे दुष्पपरिणाम आजचे विद्यार्थी भोगत आहेत. गोरे यांनी गणिताच्या अभ्यासातील ही त्रुटी ओळखली आहे. म्हणून त्यांनी पाढे, सूत्रे आणि प्रमेयाची विधाने तोंडपाठ करण्यावर या पुस्तकात भर दिला आहे्. तसेच तोंडी बेरीज व वजाबाकी कशी करायची याचेही मार्गदर्शन केले आहे. त्यांनी ठरवलेल्या रीतीने या पुस्तकाचा उपयोग केला तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना गणितामध्ये चांगले गुण मिळतील व त्यांची गणिताबद्दलची भीती कायमची नाहीशी होईल, यात शंका नाही.


या पुस्तकात वर्ग व घन चालीत कसे म्हणायचे, तिरका/तिरकस गुणाकार म्हणजे काय, त्रैराशिक व त्याचा उपयोग, वर्ग त्रिपदीचे अवयव कसे पाडायचे, वर्ग पाठ असण्याचे फायदे, अवयव पाडण्याचे नाविन्यपूर्ण सूत्र, भूमितीची गणिते सोडवताना कोणते त्रिकोण समरुप दाखवायचे याचे स्पष्टीकरण/पद्धत आदी वेगळी माहिती या पुस्तकात आहेच. त्याचबरोबर पाठांतराचे फायदे, २ ते ३० पाढे, पावकी, निमकी, वर्ग व त्याचे उच्चार, घन, विभाज्यतेच्या कसोट्या,अपूर्णांक, दशांश अपूर्णांकाच्या क्रिया, घातांकाचे नियम, करणी, गुणोत्तर प्रमाण, वर्गसमीकरणे, त्रिकोणमिती, अपूर्णांक बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काही महत्वाच्या व्याख्या व माहिती, व्याख्या, गुणधर्म, व प्रकार, चौकोनांचे प्रकार, भूमिती-काही गृहीतके, व्याख्या, एकरुपता, प्रमेय यांचीही माहिती आहे. विद्यार्थ्यांना सरावासाठी १६ सराव संग्रह दिले आहेत.



अधिक माहिती व पुस्तकासाठी संपर्क

आनंदकुमार गोरे, ए-१, देवांग सागर, प्रांजली बंगल्यामागे, नांदिवली पथ, डोंबिवली-पूर्व

दूरध्वनी-०२५१-२८८३५८३

शनिवार, ३० मे, २००९

क्रूर कसाब आणि मऊ न्यायसंस्था

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब हा एकमात्र आरोपी जीवंत पक़ण्यात आला. सध्या त्याच्या विरुद्ध विशेष न्यायालयात खटला सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मनात कसाबविषयी प्रचंड संताप आणि चीड आहे. मुळात कसाबविरुद्ध खटलाच न चालवता त्याला फाशी द्यावे अशी सार्वत्रिक भावना सर्वसामान्यांच्या मनात आहे. परंतु भारतीय न्यायप्रक्रिया आणि दंडविधानानुसार कसाबला वकील देऊन हा खटला चालवणे आवश्यक आहे. कारण तसे केले नाही तर त्याला शिक्षा सुनावता येणार नाही. कसाबचे हे कृत्य देशविघातक, देशाची युद्ध पुकारणे अशा प्रकारचे आहे, तर मग त्याला सर्वसाधारणपणे एखाद्या आरोपीबाबत जे निकष लावण्यात येतात, ते का लावले जातात, अपवाद म्हणून यात प्रक्रियेत काही बदल करता येणार नाही का, असे प्रश्नही आपल्याला पडत असतात. सकाळ (मुंबई)च्या २९ मे २००९ च्या अंकात पान क्रमांक ७ वर निवृत्त न्यायाधीस राजन कोचर यांचा एक चांगला लेख प्रसिद्ध झाला आहे. जाणकार आणि सर्वानी तो मुद्दामहून वाचावा. आज त्या लेखातील काही महत्वाचे मुद्दे आणि विचार यांची जुजबी माहिती देत आहे.


क्रूर कसाब आणि मऊ न्यायसंस्था असे या लेखाचे शीर्षक आहे. निरपराध व्यक्तींचे जीव क्रूरपणे घेणाऱया कसाबला इथल्या न्यायव्यवस्थेचे भय वाटत नाही. या वास्तवाची गंभीर दखल घेऊन कायद्यात आणि खटला चालविण्याच्या पद्धतीत कालानुरुप बदल केले पाहिजेत, असे सडेतोड मत कोचर यांनी आपल्या या लेखात व्यक्त केले आहे. अगोदर वयाचा मुद्दा उपस्थित, तांत्रीक मुद्दे काढून त्याचा खटला या न्यायालयाला चालविण्याचा अधिकार नाही, असा मुद्दा कसाबचे वकील काझमी यांनी उपस्थित करून वेळ काढण्याचा प्रयत्न केला. १६६ लोकांचे प्राण घेतलेला खुनी बाळ कसा असू शकेल, पण असले मुद्दे आपल्या मऊ मातीत रुजलेल्या न्यायसंस्थेच लगेच ग्राह्य धरले जाऊ शकतात, या विश्वासानेच उपस्थित केले जातात. अफजल गुरुला फासावर लटकावले तर खबरदार, अशी धमकी देणारी वक्तव्ये भारतातच केली जाऊ शकतात, असे कोचर यांनी या लेखात म्हटले आहे.


निदान अशा अपवादात्मक खटल्यात तरी आरोपीच्या तोंड न उघडण्याच्या अधिकाराला मुरड का घालण्यात येऊ नये, माझ्या मत आरोपीचा हा अधिकारच पूर्णपणे काढून घेण्यात यावा. आरोपीने सर्व माहिती न्यायालयात सांगावी. जरुर भासल्यास घटनेच्या कलम २० (३) व क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये योग्य तो बदल करावा. कारण आता दहशतवादाचे गुन्हे भारतात यापुढेही घडू शकतात. न्यायसंस्था हे गुन्हेगारांना सहज सुटण्याचे हमखास द्वार वाटता कामा नये. एवढी खबरदारी आपण घ्यायला हवी. अणेरिकेच्या परराष्ट्र खात्याने आपल्या कायदा व्यवस्थापनाचे वर्णन अकार्यक्षम, कालबाह्य आणि प्रमाणाबाहेर ओझे लादलेली , असे केले आहे. त्यांनी त्यांच्याकडे ९/११ चे गुन्हेगार ज्याप्रमाणे निकाली काढले ते वाखाणण्याजोगे असून आपणसुद्धा ती पद्धत का अनुसरु नये, ९/११ नंतर त्या देशात दहशतवादी फिरकलेसुद्धा नाहीत, असे कोचर आपल्या लेखात म्हणतात.


क्रूरकर्मा सद्दाम हुसेनला अवघ्या सहा महिन्यात फासावर लटकवून ते मोकळे झाले. जगभर कोणी काही बोलले नाही व जे काही तथाकथित मानवाधिकारवादी ओरडत होते, त्याची अमेरिकेने पर्वा केली नाही. आपल्याकडे अफजल गुरुचे समर्थन करणाऱयांची वाण नाही. कसाबला येथील न्यायालयाचे भय नाही. न्यायालयात तो हसत असतो. आपल्या व्यवस्थेची चेष्टा करत असतो. आसुरी आनंदच त्याच्या वागण्यातून व्यक्त होतो. कसाबचा कबुलीजबाब ग्राह्य मानून त्याची भारतातील उपस्थिती बेकायदा ठरविण्यात यावी. त्याच्याकडील शस्त्रास्त्रे व झालेले हत्याकांड या गोष्टींना नेहमीच्या फौजदारी खटल्याप्रमाणे न चालवता समरी ट्रायल पद्धतीने चालवून तातडीने निकाल देण्यात यावा. त्यासाठी योग्य तो वटहुकूम काढून न्यायालयाला तसा आदेश देण्यात यावा.


झालेल्या हत्याकांडाला वेगळा असा कुठलाच पुरावा नको आहे. सर्वप्रथम कसाबला तोंड उघडण्यास भाग पाडावे व सर्व माहिती पुरावा म्हणून विचारात घ्यावी. लॉर्ड मॅकॉलेने केलेले कायदे आता बदललेच पाहिजेत. खुद्द इंग्लंडमध्ये फौजदारी खटले आपल्या पद्धतीप्रमाणे न चालवता त्यांनी १९९४ मध्ये आणलेल्या नवीन कायद्याप्रमाणे चालतात. याप्रमाणे सर्वसाधारणता दिवाणी पद्धतीनुसार फिर्यादी पक्षाची कैफियत व आरोपीने त्यास उत्तर देणे अत्यावश्यक ठरवले आहे. आरोपीने स्वताची कैफियत मांडलीच पाहिजे. जर इग्लंडमध्ये हा महत्वाचा बदल झाला असेल तर आपल्याकडे त्याचे योग्य अनुकरण का होऊ नये, न्या. मल्लीपठ समितीने तशी शिफारस केलीच असल्याचेही कोचर यांनी या लेखात सांगितले आहे.


एकंदरीत माजी न्यायमूर्ती राजन कोचर यांनी एका आवश्यक आणि महत्वाच्या अशा विषयाला या लेखाद्वारे वाचा फोडली आहे. सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी यांनी तसेच सर्व वकील, त्यांच्या संघटना, निवृत्त न्यायमूर्ती यांनीही त्यावर आपले मत जाहीरपणे मांडावे. या विषयावर देशपातळीवर चर्चा घडवून आणली जावी, असे वाटते.


हा संपूर्ण लेख सकाळमध्ये वाचावा.

शुक्रवार, २९ मे, २००९

वाद शिवस्मारकाचा की ब्राह्मण द्वेषाचा

मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकावरून आणि या स्मारकाच्या अध्यक्षपदी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची नियुक्ती केल्याच्या प्रश्नावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारने जेव्हा असे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही विविध स्तरातून त्याविषयी तीव्र नाराजी प्रकट झाली होती. आता तर मराठा अभिमानाने पछाडलेल्या काही तथाकथीत नेत्यांनी स्मारकाच्या समिती अध्यक्षपदावरुन बाबासाहेब पुरंदरे यांना हटवावे, त्यांनी शिवचरित्राचे ब्राह्मणीकरण केले, शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदास स्वामी यांनी उगाच मोठे केले, असे अकलेचे तारे तोडत बाबासाहेबांचा अपमान केला आहे. पुरंदरे यांच्या सारख्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्वावर घाणेरड्या शब्दांत चिखलफेक करणाऱया या नेत्यांना त्यांच्या समाजानेच जागा दाखवून दिली पाहिजे. हा वाद शिवस्मारकाचा की ब्राह्मण द्वेषाचा आहे, हे बेताल बडबड करणाऱया नेत्यांनी आणि राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनीही स्पष्ट करावे.


शिवाजी महाराज यांचे चरित्र पाहिले तर असे दिसते की शिवाजी महाराज यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांच्या बरोबर प्राणांची बाजी लावून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात मराठ्यांबरोबरच ब्राह्मण, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अशा उच्च जातींबरोबरच सर्व जातीतील लोक सहभागी झाले होते. शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातही ब्राह्मण मंडळी होती. शिवाजी महाराज यांनी आजच्या भ्रष्ट आणि नालायक राज्यकर्त्यांसारखे केवळ जात पाहून किंवा केवळ आपली हुजरेगिरी करणाऱया मंडळींना पदे दिलेली नव्हती. तर प्रत्येक व्यक्तीची योग्य ती पारख करून, त्याचे कर्तृत्व आणि बुद्धीमत्ता पाहूनच त्यांना पदे, व जबाबदाऱया दिल्या होत्या. या देशाशी व राजाशी निष्ठा असलेले मुसलमान मावळे व सरदारही महाराजांच्या पदरी होते. शिवाजी महाराज यांनी प्रसंगी आपल्या सग्यासोयऱयांचीही गय न करता, त्यांना दयामाया न दाखवता, त्यांच्या अपराधाला कठोर शासन केले असल्याचे दाखले इतिहासात आहेत.


असे असतानाही हा सर्व इतिहास विसरुन केवळ जातीपातीचे राजकारण करून मराठा समाजाची मते मिळविण्यासाठी करण्यात येणारे हे राजकारण पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बशिंग बांधून बसलेल्यांच्या अंगाशी येणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला दोन आकडी खासदारांची संख्याही गाठता आली नाही. खरे तर बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात अशी वक्तव्ये केल्याप्रकरणी या साहेबांनी बेताल वक्तव्य करणाऱया नेत्यांचे कान धरायला हवे होते, पण त्यांनी तोंडातून एक चकार शब्द काढलेला नाही. कॉंग्रेसचे नेते, मुख्यमंत्री, भाजप, शिवसेना यांचे नेतेही तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. एकट्या राज ठाकरे यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. सर्वसामान्य शिवप्रेमी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या चाहत्यांच्या मनात जी भावना होती, त्यालाच राज ठाकरे यांनी मोकळी वाट करून दिली आहे.


गेली अनेक वर्षे बाबासाहेब पुरंदरे हे निष्ठेने आणि एखादे व्रत घेतल्याप्रमाणे शिवचरित्राचे कथन संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. सर्वसामान्यांपर्यंत शिवचरित्र पोहोचविण्यात बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा वाटा आहे. आजवर शिवचरित्रावर त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत. शिवाजी महाराज यांच्या जीवनावर जाणता राजा सारखे भव्य महानाट्य सादर केले आहे. पुरंदरे यांच्या शिवप्रेमाविषयी, त्यांच्या निष्ठेविषयी कोणालाही शंकाही घेता येणार नाही, असे त्यांचे कार्य आहे. मात्र असे असताना तथाकथीत काही नेते जातीच्या नावावर पुरंदरे यांच्या नावाला विरोध करतात, हे आपले दुर्दैव म्हणयाचे.


पुरंदरे यांनी कधीही पेशवाई व ब्राह्मण गौरवाचा उदोउदो केलेला नाही. ते पेशवाईवर व्याख्याने देत नाहीत. तसेच शिवचरित्राचा इतिहास जुन्या बखरी, कागदपत्रे यांचाच आधार घेऊन सांगतात. आपल्या मनाचे ते काही घुसडत नाहीत. शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची भेट व अन्य प्रसंग हे ही एेतिहासिक कागदपत्रे, नोंदी व पुराव्यांच्या आधारे बोलत असतात. त्यांचे म्हणणे कोणाला पटत नसेल तर त्यांनी ते चर्चा करून खोडून काढावे, ते खोटे आहे, असे म्हणणाऱी काददपत्रे सादर करावीत. पण हे काहीही न करता केवळ पुरंदरे हे ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांचा द्वेष करणे आणि त्यांच्याविषयी वाटेल तसे बोलणे हे कोणत्या संस्कृतीत बसते. आता जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी या अशा भंपक व जातीच्या नावावर राजकारण करणाऱया या तथाकथीत नेत्यांना भर चौकात चाबकाने फोडले असते किंवा त्यांच्या वळवळणाऱया जीभा छाटून टाकल्या असत्या.


सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून समुद्रात हे स्मारक उभारण्याची खरोखरच गरज आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. महाराजांचे जीवंत स्मारक असलेले अनेक गड व किल्ले आज दुर्लक्षीत अवस्थेत आहेत. अनेक गडांची पडझड होत आहे, त्यामुळे खरे तर या पैशातून सर्व गडांची देखभाल व दुरुस्ती करता येऊ शकेल. प्रत्येक गड व किल्ल्यावर त्या गडाचा इतिहास, लाईट अॅण्ड साऊंड सारखे शो, छायाचित्रे किंवा गडावर घडलेल्या प्रसंगांची चित्रे यांचे भव्य प्रदर्शन, गडावर घडलेले प्रसंग दर्शवणारी म्युरल्स/ पुतळे करता येतील, गडावर जाण्यासाठी चांगला रस्ता, गडावर विविध ठिकाणी त्या त्या वास्तूची ओळख सांगणारे फलक लावणे आदी कामेही करता येऊ शकतील. किंवा या पैशातून महाराष्ट्रातील अनेक खेड्यांना पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, प्राथमिक शाळा, दवाखाने, आरोग्यकेंद्रे सुरु करता येतील. पण हे सगळे करण्याची मनापासून आच व इच्छा हवी. प्रखर राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकते.


पुरंदरे यांना घेण्यावरून जर असा नाहक वाद उत्पन्न होत असेल तर राज्य शासनाने स्मारकाचा हा प्रकल्पच रद्द करून टाकावा. पुरंदरे यांच्या विरोधात बोलणाऱयांना सुतासारखे सरळ करावे. अन्यथा पुन्हा जातीपातीच्या राजकारणावरून महाराष्ट्रात नवा संघर्ष निर्माण होईल. शिवाजी महाराज यांना एका जातीपुरते मर्यादित करून नका, तो लोकोत्तर महापुरुष होते. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतवासीयांना त्यांचा अभिमान आहे. सर्व ज्ञातीच्या ब्राह्मणांनाही ते आदरणीय आहेत...

गुरुवार, २८ मे, २००९

संख्या संकेत कोश

व्याकरण विपुलता आणि कोशसंपन्नता हे भाषेच्या प्रतिष्ठेचे आधारस्तंभ आणि तिच्या भावी प्रगतीचे मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत, असे मत लोकनायक माधव श्रीहरी ऊर्फ बापूजी अणे यांनी संख्या संकेत कोशाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत व्यक्त केले होते. या ग्रंथाची पहिली आवृत्ती १९५८ मध्ये प्रकाशित झाली होती. प्रसाद प्रकाशन-पुणे यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. ग्रंथाची द्वितीय आणि तृतीय आवृत्ती अनुक्रमे १९६४ व १९८० मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर काही वर्षे हा ग्रंथ दुर्मिळ होता. २००४ मध्ये प्रसाद प्रकाशनानेच ग्रंथाची चौथी आवृत्ती प्रकाशित केली. त्यामुळे या विषयाचा अभ्यास करणारे अभ्यासक, संशोधक व जाणकारांची मोठी सोय झाली आहे. श्रीधर शामराव हणमंते यांनी हा कोश संपादित व संकलित केला आहे.


मराठी भाषेतही विविध विषयांवरील कोश प्रसिद्ध झाले आहेत. मात्र त्यात संख्या संकेत कोश हा वेगळा प्रकार आहे. संख्या किंवा विविध संकेत हे भाषेच्या व ज्ञानाच्या अभिव्यक्तीत किती महत्वाचे आहेत, याची माहिती आपल्याला असते, मात्र नेमकी एखादी संख्या घेतली आणि तिचे महत्व काय असा प्रश्न विचारला तर पटकन काही सांगता येत नाही. या कोशात दिलेल्या संख्येतून या आकड्यांचा भारतीय संस्कृतीशी असलेला संबंधही आपल्या लक्षात येतो. या कोशात शून्य ते १०८ या संख्यांचे विशेष संदर्भ, त्याच्याशी निगडीत सर्व माहिती देण्यात आली आहे. काही ठिकाणी संख्याचे विशेष संदर्भ/माहिती आढळून आली नसल्याने त्याविषयी काही सांगण्यात आलेले नाही.


सुमारे ५६६ पानाच्या या ग्रंथात एकसहस्त्र, पंचसहस्त्र, दशसहस्त्र या बरोबरच परिशिष्ट एक ते तीन देण्यात आली आहेत.पंचप्राण कोणते, सप्तधातू कशाला म्हणतात, नाटकाची सहा अंगे कोणती, १४ विद्या व ६४ कला कोणकोणत्या आहेत, नवविधा भक्तीचे प्रकार, अष्टसिद्धी कोणत्या, काळ्या बाजाराचे ४० प्रकार कोणते, ब्याण्णव मुलतत्वे कोणती अशी शून्य ते १०८ पर्यतच्या सर्व संख्यांविषयीची माहिती यात वाचायला मिळते. हणमंते यांनी विविध विषयांवरील ग्रंथांचे संदर्भ घेऊन पाच हजारांहून अधिक संकेतांची माहिती या कोशात संकलित केली आहे. वेद, उपनिषदे, धर्मशास्त्र, भक्तीशास्त्र, पुराणे, योगशास्त्र, वैद्यक शास्त्र, विविध कोश अशा विविध ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील संख्यांशी निगडीत काही भाग यात देण्यात आला आहे.


ही सर्व माहिती मनोरंजक आणि माहितीपूर्ण आहे. प्रत्येक आकड्याशी कोणत्या आणि किती गोष्टी निगडीत आहेत, याची समग्र माहिती या कोशामुळे आपल्याला सहज मिळते.


अधिक माहितीसाठी संपर्क
प्रसाद प्रकाशन-पुणे (मनोहर जोशी)०२०-२४४७१४३७


अशाच प्रकारचा संख्या वाचक कोश अनमोल प्रकाशन-पुणे यांनी गेल्या महिन्यात प्रकाशित केला आहे. या पॉकेट साईज आकारातील कोशाचे संपादन रखमाजी देवाजी यांनी केले आहे. यातही शून्य ते ११० पर्यतच्या अंकांची माहिती व त्याच्याशी संबंधित विशेष बाबी सांगण्यात आल्या आहेत.

संपर्क-अनमोल प्रकाशन, पुणे (मोरेश्वर नांदुरकर), ६८३, बुधवार पेठ, पुणे-४११००२

अशा वेगवेगळ्या विषयांवर जास्तीत जास्त प्रमाणात कोश प्रकाशित झाले पाहिजेत, त्यामुळे अभ्यासक, रसिक वाचक यांना ते उपयुक्त ठरतीलच परंतु, मराठी भाषेसाठीही ते महत्वाचे ठरेल, असे वाटते.

बुधवार, २७ मे, २००९

ग्राहक हक्काचा विजय

ग्राहक म्हणून आपल्याला काही हक्क मिळाले आहेत. आपण आपल्याला मिळालेल्या या हक्कांचा योग्य वापर केला, ग्राहक म्हणून आपले कर्तव्य बजावले आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा चिकाटीने पाठपुरावा केला तर ग्राहकांना गृहीत धरणाऱया बड्या उद्योजकांना आणि व्यापाऱयांनाही दणका देता येऊ शकतो. मात्र त्यासाठी आपली नकारात्मक वृत्ती सोडून दिली पाहिजे. माझ्या एकट्याने काय होणार आहे, जाऊ दे, त्यात काय, असे न म्हणता आपल्यावर अन्याय झाला असे आपल्याला मनापासून वाटत असेल तर त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा दिला पाहिजे. तसे जर केले तर अंतिम विजय सत्याचाच होतो, हे नुकत्याच एका निकालाने दाखवून दिले आहे.


लोकसत्ताच्या २७ मे २००९ च्या अंकात पहिल्या पानावर जयंत धुळुप यांनी दिलेली, १५ रुपयांची पाण्याची बाटली २५ रुपयांना, कामत हॉटेल व धारीवाल इंडस्ट्रीला ग्राहक मंचाचा दणका ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. ग्राहक चळवळीत काम करणाऱयांसाठी आणि ग्राहकांनी योग्य मार्गाने लढा दिला तर त्याला त्याचा हक्क मिळू शकतो, असे या बातमीने दाखवून दिले आहे. सर्व ग्राहकांसाठी ही बातमी प्रेरणादायी आहे.


आजकाल पाण्याची बाटली विकत घेणे सर्रास झाले आहे. बंद बाटलीतील हे पाणी वेगवेगळ्या किंमतीला विकले जाते, असा आपला नेहमीचा अनुभव. असाच अनुभव प्रल्हाद पाडळीकर या ग्राहकाला आला. सर्व ठिकाणी १५ रुपयांना विकली जाणारी धारीवाल इंडस्ट्रीजची अॅक्सरीच हा पाण्याची बाटली विठ्ठल कामत हॉटेलमध्ये २५ रुपयांना विकली जात होती. पाडळीकर यांनी या प्रकरणी रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली. आणि ग्राहक मंचाने हॉटेलचे संचालक विठ्ठल कामत व धारीवाल इंडस्ट्रीजचे संचालक रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांना या प्रकरणी दोषी ठरवले आहे. शारिरीक व मानसिक त्रासापोटी आणि न्यायालयाच्या खर्चापोटी या दोघांनी पाच हजार रुपये ४५ दिवसांच्या आत तक्रारदार पाडळीकर यांना द्यावेत. व स्वताचा खर्च स्वतच सोसावा. या आदेशाचे पालन केले नाही तर ही रक्कम द.सा. द. शे. ८ टक्के व्याज दराने वसूल करण्याचा अधिकार पाडळीकर यांना राहील, असा अंतिम निकाल मंचाचे अध्यक्ष आर. डी. म्हेत्रस व सदस्य बी. ए. कानिटकर यांनी दिला आहे. बाजारात उपलब्ध किंमतीपेक्षा जादा किंमत लावून ती बाटली विकू नये, असेही या आदेशात म्हटले आहे.


२३ जानेवारी रोजी पाडळीकर आपल्या दोन सहकाऱयांसह विठ्ठल कामत हॉटेलमध्ये थांबले होते. न्ह्याहरीचे पदार्थ आणि ही पाण्याची बाटली असे १४५ रुपये काउंटरवर भरून त्यांनी कुपन्स घेतली. खाताना त्यांचे लक्ष पाण्याच्या बाटलीकडे गेले. त्यावर त्याची किंमत २५ रुपये आणि स्पेशली पॅक्ड फॉर कामत हॉटेल, असे छापलेले त्यांना दिसले. प्रत्यक्षात या पाण्याच्या बाटलीची किंमत पंधरा रुपयांच्या आसपास असताना येथे २५ रुपये का, असा प्रश्न पाडळीकर यांच्या मनात आला. त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाकडे विचारण केली. त्याने दिलेल्या उत्तराने पाडळीकर यांचे समाधान झाले नाही. त्यांनी धारीवाल इंडस्ट्रीजच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे चौकशी केली. मात्र त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. कामत व धारीवाल हे दोघेही संगमनत करून सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरत आहेत आणि बेकायदेशीरपणे बेहिशोबी आर्थिक फायदा करून घेत आहेत, असे पाडळीकर यांचे म्हणणे होते. त्यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली. पाडळीकर यांच्यातर्फे अॅड. संजीव जोशी व अॅड. सचिन जोशी यांनी काम पाहिले. ग्राहक मंचाने पाडळीकर यांचे म्हणणे मान्य करून उपरोक्त निकाल दिला.


आपल्यालाही असे अनुभव अनेकदा येत असतात. मात्र आपण कामाच्या गडबडीत असतो म्हणून किंवा जाऊ दे, नसता वाद हवाय कशाला, मागितलेत तेवढे पैसे देऊन टाकू, असे म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. यामुळेच व्यापारी, दुकानदार आणि उद्योजकांचे फावते. पाडळीकर यांच्या सारखा एखादा जागरुक ग्राहक अशा मंडळींना भेटतो आणि ग्राहक मंचाचा दणका त्यांना मिळतो. या अशा बातम्या ग्राहकांसाठी नक्कीच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतात. आता ग्राहक मंचाने दिलेल्या आदेशाचे पालन विठ्ठल कामत व धारीवाल यांनी केले आहे की नाही, त्याचीही बातमी धुळुप यांनी द्यावी.


ग्राहक म्हणून आपल्याला जसे काही हक्क आणि अधिकार आहेत, तशीच आपली काही कर्तव्येही आहेत. हक्क आणि अधिकारांबरोबरच आपण सगळ्यानीच आपल्या कर्तव्याची जाणीव विसरता कामा नये. अशा प्रकारे जर व्यापारी, दुकानदार यांच्याकडून अव्वाच्या सव्वा किंमत लावून किंवा अन्य प्रकारे लुबाडणूक होत असेल तर आपण त्याविषयी आवाज उठवला पाहिजे. इथे पाडळीकर यांनी एकट्याने हे केले. आपल्यापैकी कोणाला एकट्याने करणे शक्य नसेल तर सामूहिकपणे असे पाऊल उचलायला पाहिजे. ग्राहक एकजुटीचा आणि शक्तीचा असा विधायक कामासाठी उपयोग केला पाहिजे.

मंगळवार, २६ मे, २००९

पुन्हा लिहाया आमुचे भारत, व्यास-वाल्मिकी येतील धावत...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात व परदेशातही शिवाजी महाराज यांचे चरित्र व कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे खूप मोठे काम केले आहे. त्यासाठी त्यांनी आजवर हजारो व्याख्याने दिली आहेत. आज या वयातही त्यांचा उत्साह शिवशाहीरांनी लिहिलेले शिवाजी महाराज यांच्यावरील महाराज हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या चरित्रग्रंथासाठी चित्रकार दीनानाथ दलाल यांच्याकडून त्यांनी अनेक रेखाचित्रे तयार करवून घेतली होती. या सर्व चित्रांचा संग्रह महाराज या नावाने प्रकाशित करण्यात आला आहे.


हे पुस्तक मासिकाच्या आकारात असून अर्ध्या भागात शिवचरित्रातील प्रसंगाचे चित्र आणि त्याखाली तो प्रसंग अशी मांडणी केलेली आहे. हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राचा, शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास आहे. शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, याचे फार सुंदर वर्णन बाबासाहेब पुरंदरे यांनी या पुस्तकात केले आहे. या प्रत्येक पानावर शिवचरित्रातील प्रसंग आणि त्याला अनुरुप असे दलाल यांचे चित्र तर आहेच, परंतु प्रत्येक प्रसंगाला समर्पक असे एका वाक्यात शिर्षक दिले आहे. या शीर्षकात जणू त्या प्रसंगाचे सर्व सार एकवटलेले आहे.


महाराष्ट्राची भूमी म्हणजे देवदेवतांची भूमी. आपल्या दोन्ही किंवा अनंत हातात विविध शस्त्रास्त्रे पाजळीत असुरी शक्तींचा विध्वंस करणाऱया या देवदेवता मराठ्यांच्या घरीदारी अन देवळांराऊळात शतकानुशतके नांदत होत्या. या दैवतांचे भक्त जागे होते. आक्रमकांचे निर्दालन या असंख्य हातानी घडत होते. म्हणजेच ही दैवते आपल्या भक्तांच्या तनमनात जागृत होती. हातात शस्त्र नाही, अशी एकही देवता महाराष्ट्रात नांदत नव्हती. स्वातंत्र्यासाठी, स्वधर्मासाठी, संतसज्जनांच्या परित्राणासाठी अन दुर्जनांच्या निर्दालनासाठी हौसेने जगा आणि हसतहसत थाटाने मरा, असेच ही दैवते मराठ्यांना सांगत होती., शिकवत होती...
अशी सुरुवात पुस्तकाच्या पहिल्या पानावर असून देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असे शीर्षक या प्रसंगाला दिले आहे.


पुढच्या एका प्रकरणात बाबासाहेब म्हणतात, वाऱयालाही चाहुल लागू न देता देवगिरीवर दुश्मन चालून आला. राजधानी बेसावध होती. राजा रामदेवराव यादव गाफील होता. स्वराज्याची उत्तर सीमा दुभंगली. पठाणी फौज घेऊन अल्लाउद्दीन खीलजी आक्रंदत आक्रोशत देवगिरीवर येऊन धडकला... याच प्रकरणात बाबासाहेब यांनी सांगितलेली वाक्ये आजच्या राजकर्त्यानाही अगदी चपखल लागू पडतात. सद्यस्थितीतही ही वाक्ये आपल्याला विसरून चालणार नाहीत.


बाबासाहेब सांगतात, राजकरणात आणि रणांगणात अत्यंत दक्ष असावे लागते. पतिव्रतेइतके. जरा जरी बेसावध पाऊल पडले तरी परिणाम भोगावे लागतात पुढे पिढ्यानपिढ्यांना. मनुष्यबळ, शस्त्रबळ, द्रव्यबळ, बुद्धीबळ आणि बलाढ्य सह्याद्री पाठीशी असनुही महाराष्ट्र हरला. गुलागगिरीत पडला. कमी पडला स्वाभिमान आणि कर्तव्यतत्परता. पठाणांचा आणि अशाच परक्यांचा प्रचंड हैदोस सतत पाचशे वर्ष उत्तर भारतात सुरु होता. तरीही महाराष्ट्राचे यादवराजे गाफील होते. त्याचा परिणाम हा असा, इतका भयंकर...


हे पुस्तक पुरंदरे प्रकाशन यांनी प्रकाशित केले असून फेब्रुवारी २००४ मध्ये या पुस्तकाची नववी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यात आता आणखी काही आवृत्यांची भर पडली असेल. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच मोठ्यानाही हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे. पुस्तकातील दलाल यांची चित्रे खूप सुंदर आणि समर्पक अशी आहेत.
पुस्तकाच्या अखेरीस समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराज यांचे केलेले वर्णन देण्यात आले आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
तसेच आणखी काही ओळी खूप छान आहेत. त्या अशा...


तव शौर्याचा एक अंश दे

तव धैर्याचा जरा स्पर्श दे

तव तेजातील एक किरण दे

जीवनातला एकच क्षण दे

त्या दिप्तीतुनी दाही दीशा द्रुत

उजळूनी टाकू, पुसू पानिपत

पुन्हा लिहाया आमुचे भारत

व्यास-वाल्मिकी येतील धावत...

सोमवार, २५ मे, २००९

जोशीपुराण- पाच हजार वाचकांचा टप्पा पार

आपल्या आयुष्यात विशिष्ट संख्येला-आकड्यांना खूप महत्व असते. एक वर्षाच्या वाढदिवसापासून ते पन्नाशी,साठी, पंचाहत्तरी असे जे काही टप्पे आपल्या आयुष्यात येतात, ते आपण साजरे करत असतो. शालेय जीवनातही आपण असे वेगवेगळे टप्पे पार करत महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करतो. हे महत्व फक्त वाढदिवस किंवा त्या अनुषंगिक गोष्टीनाच असते असे नाही, तर अन्यही काही गोष्टी यात येत असतात. आज हे सांगायचे कारण म्हणजे माझ्या जोशीपुराण या ब्लॉगने २२ फेब्रुवारी २००९ रोजी पाच हजार वाचकांचा टप्पा पार केला. मी हा ब्लॉग २७ फेब्रुवारी २००९ रोजी सुरू केला. तेव्हापासून ते आजच्या तारखेपर्यंत जोशीपुराणला भेट देणाऱया वाचकांची संख्या आता (हे लिहित असताना) ५ हजार १८९ इतकी झाली आहे. तीन महिने पूर्ण होण्याच्या आतच पाच हजारांचा हा टप्पा पार झाला आहे.

अर्थात यात खरा वाटा आहे, सर्व श्रेय आहे ते जोशीपुराणला भेट देणाऱया जगभरातील वाचकांचे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश आणि परदेशातूनही अनेक वाचक दररोज माझ्या ब्लॉगला आवर्जून भेट देऊन ब्लॉगवरील लेख वाचत आहेत, त्यापैकी काही जण सूचना, प्रतिक्रियाही आवर्जून व्यक्त करत आहेत, त्या सर्वांचे मनापासून आभार. आपण वेळोवेळी केलेल्या सूचना, व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमुळे माझाही लिहिण्याचा हुरुप आणि उत्साह वाढत आहे. या पाच हजारांच्या वाचक संख्येतील अनेक मंडळी ही आता प्रतिक्रयांच्या माध्यमातून परिचित झाली आहेत. अजून प्रत्यक्ष भेट व्हायचा योग आला नाही. येथे मी मुद्दामहूनच कोणाची नावे घेत नाही, कारण जर चुकून कोणाचे नाव लिहायचे राहून गेले तर कोणाला राग यायला नको किंवा कोणी नाराज व्हायला नको. पण जोशीपुराणला भेट देणाऱया सर्व वाचकांचे, वेळोवेळी आपुलकीने सूचना व प्रतिक्रिया व्यक्त करून माझा उत्साह वाढविणाऱया या सर्वांचे मनापासून आभार. आपले प्रेम व लोभ आहेच, तो असाच ठेवावा आणि वाढवावा, ही विनंती.

जोशीपुराण या ब्लॉगची नोंदणी मी मराठी ब्लॉग विश्व आणि ब्लॉगवाणीवरही केलेली आहे. नवा ब्लॉग लिहून तो पब्लिश केला की लगेच तो या दोन ठिकाणीही दिसू लागतो. या दोन ठिकाणी भेट देणारे वाचकही खूप आहेत. मराठी ब्लॉग विश्व आणि ब्लॉगवाणीचे सर्व संचालक व समन्वयक यांचेही आभार. मराठी वृत्तपत्रसृष्टीतील घडामोडींचा आढावा घेणारी बातमीदार नावाचा एक ब्लॉग आहे. त्या ब्लॉगवरही माझ्या जोशीपुराणची लिंक देण्यात आली आहे. बातमीदारलाहा भेट देणारी अनेक मंडळी आहेत. त्यामुळे बातमीदारचे संचालक व समन्वयक तसेच कार्यालयातील माझे सहकारीही ब्लॉग वाचून वेळोवेळी सूचना व प्रतिक्रिया व्यक्त करत असतात त्यांचे तसेच ब्लॉगला वेळोवेळी भेट देऊन तो वाचणाऱया ज्ञात-अज्ञात अशा हजारो वाचकांचे मनापासून आभार.

हा ब्लॉग सुरू करण्यासाठी कार्यालयातील माझा सहकारी तुषार खरात याचेही मला खूप सहकार्य मिळाले. त्याने अगोदरच ब्लॉग सुरू केला होता. तो मलाही तुम्ही ब्लॉग सुरु करा, म्हणून सांगायचा. ब्लॉग सुरू करण्यापूर्वी तो कसा सुरू करायचा, त्यासाठी काय करावे लागते, तो पोस्ट कसा करायचा, याची मला काहीच माहिती नव्हती. म्हणजे माझे गुगलवर खाते होते. पण मी अद्याप या वाटेला गेलो नव्हतो. अखेरीस सायबर कॅफेमध्ये जाऊन मी जोशीपुराण हा ब्लॉग तयार केला. पण मध्ये काही दिवस तसेच गेले. कारण सायबरमध्ये जाऊन मराठी टाईप करता येत नव्हते. घरी संगणक होता, पण नेट कनेक्शन नव्हते. नेट कनेक्शनसाठी अर्ज केला होता. सहा महिन्यात नेट कनेक्शन मिळेल, असे सांगण्यात येत होते. अखेर २२ फेब्रुवारी २००९ या दिवशी घरी नेट सुरु झाले. मग मात्र मी आता ब्लॉगवर नियमित लेखन करायचे, असे मनाशी ठरवून अखेर २७ फेब्रुवारी २००९ या दिवशी पहिला लेख जोशीपुराणवर पब्लिश केला. भेट देणाऱया ब्लॉग वाचकांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी काय करायचे, मराठी ब्लॉगविश्ववर जाऊन नोंदणी कशी करायची, मराठी ब्लॉग विश्वचा लोगो आपल्या ब्लॉगवर कसा घ्यायचा अशा काही प्रश्नांसंदर्भात मी वेळोवेळी तुषारची मदत घेतली. नंतर हळूहळू प्रयत्न करत, कधी चुकत तर कधी बरोबर करत हे जोशीपुराण सजवले. जोशीपुराणचे आज जे स्वरुप दिसत आहे, ते अशा प्रयत्नातून साकार झाले आहे.

लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीसाठी मी अभिनेते-दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल यांची मुलाखत घेतली होती. लोकप्रिय इंग्रजी कथाकार अॅगाथा ख्रीस्ती यांच्या चाळीस कादंबऱयांचा अनुवाद तोरडमल करत आहेत. त्याविषयासंदर्भात मी त्यांची घेतलेली मुलाखत लोकरंगमध्ये प्रसिद्ध झाली होती. तीच मुलाखत जोशीपुराणवर टाकली. तो जोशीपूराणवरचा पहिला लेख. ब्लॉग सुरु करतानाच मी ठरवले होते, की दररोज शक्यतो नवीन काहीतरी लिहिण्याचा व नवे देण्याचा प्रयत्न करायचा. मला प्रामाणिकपणे असे वाटते की मी आत्तापर्यंत तो संकेत पाळला आहे. लोकसत्तामध्ये मी ज्या बातम्या दिल्या होत्या, त्यात काही रुटीन तर काही स्पेशल (माझ्या नावाने प्रसिद्ध झालेल्या) त्या बातम्याही कधी मी या ब्लॉगवर दिल्या. उद्देश एवढाच की एखादा विषय किंवा मी केलेली ती बातमी लोकसत्ताच्या वाचकांबरोबरच जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी, त्यांनी ती वाचावी. काही वेळेस लिहिणे शक्य झाले नाही, तेवढा खंड पडला आहे. मात्र शक्यतो खंड पडू न देता मी दररोजच जोशीपुराणवर काहीतरी नवे लिहित असतो. २७ व २८ फेब्रुवारीचे दोन लेख, त्यानंतर मार्चमध्ये २२, एप्रिलमध्ये २९ आणि मे महिन्यातील २३ असे आजवरचे लेखन झाले आहे.

आजवरच्या लेखनात मी अनेक विषय हाताळले असून त्यावर वाचकांनी आपल्या प्रतिक्रियाही आवर्जून व्यक्त केल्या आहेत. अशा प्रतिक्रिया लेखनाचा उत्साह वाढवायला मदत करत असतात. ब्लॉगला भेट देणाऱया वाचकांच्या आकड्याबद्दल माझी मुलगी मानसी हिलाही खूप उत्सकुता असते, नवीन पोस्ट लिहायला सुरुवात केली, किंवा कधी सहज जोशीपुराण ओपन केले की, बाबा, आकडा किती झाला, हा तिचा ठरलेला प्रश्न असतो. पाच हजार वाचक पूर्ण झालेत हे तिंला सांगितल्यावर तीने वॉव, असे म्हणून आनंद व्यक्त केला. माझी पत्नी मृणाल हीनेही वेळोवेळी ब्लॉगवाचून काही सूचना केल्या, कधी काही विषय सुचवले.

पण खरे सांगतो, एखाद्या विषयावरील आपले विचार, मते आपल्या मातृभाषेतून व्यक्त केल्यानंतर आणि आपण जे काही लिहिले आहे, ते जगात वाचले जातेय, हजारो लोक आपल्या ब्लॉगला भेच देतात, जे लिहिले आहे, त्यावर प्रतिक्रीया व्यक्त करतात, याचा आनंद काही वेगळाच आहे. आजवर अशा हजारो वाचकांनी मला हा आनंद दिला. अगोदर सांगितल्याप्रमाणे जोशीपुराणवर नेहमीच मी नवे देण्याचा प्रयत्न करणार आहे, आपला लोभ आहेच, तो वृद्धींगत व्हावा हीच इच्छा...

रविवार, २४ मे, २००९

दिवस आकाशवाणीचे... (४)

आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात काम करत असताना पुढे आकाशवाणीवरील अन्य कार्यक्रमातही सहभागी होण्याची संधी मला मिळाली. या सर्व अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले. नवीन ओळखी झाल्या. अशीच ओळख आजचा प्रसिद्ध दिग्दर्शक राजेश देशपांडे याच्याशी आकाशवाणीवरच झाली. एका ऑडिशनसाठी आम्ही आकाशवाणीवरच भेटलो. ओळख झाली. मी तेव्हा मुंबई सकाळमध्ये होतो. आमच्याकडे तेव्हा सर्क्युलेशन/ जाहिरात विभागात एक्झिक्युटीव्हच्या काही जागा भरायच्या होत्या. शिवाजी धुरी हे प्रमुख होते. आकाशवाणीच्या भेटीत राजेशशी गप्पा मारताना तो नोकरीच्या शोधात असल्याचे कळले होते. मी त्याला सकाळाला अर्ज करायला सांगितला. योगायोग किंवा काही म्हणा, राजेशला मुंबई सकाळमध्ये नोकरी मिळाली. अर्थात त्याचे मन फार काळ नोकरीत रमले नाही. आठ-दहा महिन्यांत/वर्षभरात त्याने नोकरी सोडली. पुढे नाटक, सिरियलचे दिग्दर्शन, अभिनय यात त्याने वाहून घेतले. उमेदवारी करत आज त्याने या क्षेत्रात स्वताचे स्वतंत्र अस्तीत्व आणि नाव निर्माण केले. आजचा हा आघाडीचा दिग्दर्शक मित्र मला आकाशवाणीमुळे मिळाला. असेच आणखी एक नाव गीतकार, संवादलेखक गुरु ठाकूर. आकाशवाणीवरील युववाणी कार्यक्रमातील कॉफीहाऊसमध्ये सहभागी होण्याची संधीही मला खूप वेळा मिळाली. या कॉफीहाऊसचे लेखन गुरु ठाकूरचे असायचे. माझी आठवण बरोबर असेल तर एक-दोन कार्यक्रमात तो सहभागीही झाला होता. अर्थात नंतर त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट राहिले नाही.

युववाणीमधील कॉफीहाऊस, कामगार सभेमध्ये एकदा भाषण, युववाणीमध्येच दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागात पहिल्या आलेल्या (नेमके वर्ष आता आठवत नाही) प्रीती आपटे व प्राजक्ता जोशी यांची घेतलेली मुलाखत असे इतरही कार्यक्रम केले. याच वेळी मला आंबटगोड या कार्यक्रमाच्या पाच भागात सहभागी होण्याची संधी मिळाली. अर्थात हे काम मी ऑनररी (मानद सेवा) म्हणून केले होते. पण त्यामुळे मला खूप चांगला अनुभव मिळाला. आकाशवाणीच्या हजारो-लाखो श्रोत्यांपर्यंत शेखर जोशी हे नाव पोहोचले. हे काम मला योगायोगानेच मिळाले.

प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणून काम करत असताना एका ड्युटीच्या वेळी आंबटगोड कार्यक्रमाच्या निर्मात्या तनुजा कानडे वृत्तविभागात वृत्तसंपादक हरीश कांबळे यांना भेटायला आल्या होत्या. बोलता बोलता त्या सहज कांबळे यांना म्हणाल्या की, अहो आंबटगोड कार्यक्रमासाठी आम्हाला एक नवा व चांगला मेल व्हॉईस हवा आहे. कोणी आहे का, योगायोगाने मी त्यावेळी ड्युटीवर होतो. कांबळे यांनी मला बोलावले व कानडे बाईंना म्हणाले, अहो हे आमचे शेखर जोशी, कॅज्युअल न्यूज रिडर आहेत. यांना घ्या, त्यांचा आवाज चांगला आहे. तनुजा कानडे यांनी मला एकदा भेटायला यायला सांगितले. माझ्याकडून संहितेतील काही संवाद वाचून घेतले. ओके आहे म्हणाल्या. आता एका भागासाठी तुम्ही सहभागी व्हा, चांगले वाटले तर पुढेही तुम्हालाच घेईन. तसेच याचे कोणतेही मानधन तुम्हाला मिळणार नाही, चालेल ना, असे त्यांनी मला विचारले. माझ्यासाठी ती एक संधी होती, मी हो म्हटले.

आंबटगोड कार्यक्रम म्हणजे आकाशवाणीवरील पुन्हा प्रपंच या गाजलेल्या कार्यक्रमाचे रूप. पुन्हा प्रपंचमध्ये टेकाडे भाऊजी असे पात्र होते. प्रचलित घडामोडींवर संवाद, टीकाटीपणी, चर्चा असे या कार्यक्रमाचे स्वरुप असायचे. विविध मान्यवर लेखक किंवा अन्य मंडळींकडून याची संहिता लिहून घेतली जायची. पंधरा ते वीस मिनिटांचा हा कार्यक्रम असायचा. आंबटगोडमध्ये नवा मेल व्हॉईस घेतल्यानंतर त्या जागी जुन्या भूमिकेतील पात्राचे (भाऊजी) नाव देणे योग्य ठरले नसते. कारण कलावंतच बदलला होता. मग माझे नाव भास्कर भाऊजी असे करण्यात आले. आकाशवाणीवरील ज्येष्ठ निवेदक किशोर सोमण, स्वत तनुजा कानडे आणि नवा मी असे तिघेजण या श्रुतीकेत असायचो. मला आठवताय, पहिल्या भागाच्या रेकॉर्डिंगच्यावेळी मी थोडासा दडपणाखाली होतो. माझ्या बोलण्यात किशोर सोमण व तनुजा कानडे यांच्या सारखी सहजता, उत्स्फुर्तता नव्हती. माझे वाक्य आले की मी म्हणायचो. अंतिम रेकॉर्डिंग करण्यापूर्वी आम्ही तिघानीही एकदा संहिता वाचून घेतली होती. पहिलचे रेकॉर्डिंग चांगले झाले. नंतरच्या एका भागातही मी दडपणाखाली होतो. माझा आवाज कानडे यांना पसंत पडला असावा, आणखी काही भागात मीच भास्कर भाऊजी असणार होतो.

आंबटगोडचे नंतर मी आणखी तीन भाग केले. नंतरच्या सर्व भागांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी मात्र मी एकदम टेन्शन फ्री होतो. माझे संवाद सहज झाले, काही वेळा मी अॅडिशन्सही घेतल्या. त्या श्रुतिकेमध्येही चपखल बसल्या. हा कार्यक्रम आठवड्यातून एकदा रात्री प्रसारित व्हायचा आणि दुसऱया दिवशी त्याचे पुर्नप्रक्षेपण असायचे.( आता नेमका वार आठवत नाही) कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी सहभागी कलावंत यात माझे नाव सांगितले जायचे. मला वाटते पाच भागानंतर आकाशवाणीवरीलच अन्य स्टाफ निवेदक त्या कार्यक्रमात सहभागी व्हायला लागला, त्यामुळे पाच भागानंतर मी त्यात नव्हतो. मात्र नंतर अनेक दिवस भास्कर भाऊजी हे नाव मात्र कायम होते. पाच भागांपुरते का होईना पण मला सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे मला खूप काही शिकायला मिळाले, माझ्यासाठी तो अनुभव लाखमोलाचा होता...

असो, आता तूर्तास तरी आकाशवाणीवरील माझे अनुभवाचे हे पुराण आता मी पुरे करतो. पुन्हा कधीतरी आकाशवाणीच्या दिवसांविषयी सांगेन.

शनिवार, २३ मे, २००९

दिवस आकाशवाणीचे... (३)

आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात काम करत असताना खूप अनुभव मिळाला. अनेक महत्वाच्या बातम्या सांगण्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळाले. दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आणि अन्य काही महत्वाच्या बातम्या. परंतू या सगळ्यांमध्ये माझ्या कायम आठवणीत राहील आणि मी त्या बातम्या कधीच विसरु शकणार नाही, ती दुर्दैवी घटना म्हणजे १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या बातम्यांची...

मी त्यावेळी आकाशवाणीवर ड्युटीला होतो. माझ्या बरोबर जयंत माईणकर होता. नेहमीप्रमाणे दुपारी एकच्या सुमारास मी आकाशवाणीवरल गेलो. जयंतही आला. त्याचवेळी मुंबईत एक-दोन ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या वृत्तविभागात आल्या होत्या. वसंत ऊर्फ दादा देशपांडे यांनी त्यांच्या सूत्रांकडून खातरजमा करून घेतली होती. त्यावेळी वृत्तविभागात नाव बरोबर आठवत असेल तर रसुल खान नावाचे एक ज्येष्ठ अधिकारी होते. त्यांनीही दोन-चार ठिकाणी चौकशी करून बातमी खऱी असल्याचे सांगितले होते. दुपारच्या पावणेतीनच्या बातम्या जयंत माईणकर वाचणार होता. युएनआय-पीटीआय, दादा देशपांडे व रसूल खान यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुपारच्या बातम्यांसाठी बातम्या तयार केल्या. दरम्यान मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट होत असल्याच्या बातम्या येतच होत्या. दुपारच्या बातम्यांसाठी बुलेटीन तयार झाले होते. वृत्तसंपादक हरीश कांबळे यांनी त्यावरून नजर फिरवली. साधारण दोन-चाळीसच्या सुमारास जयंत खाली स्टुडिओत गेला. आम्ही वरती न्यूजरुम मध्येच होतो. पावणेतीन वाजले, बातम्या सुरु झाल्या. वृत्तविभागात आम्हीही बातम्या ऐकत होतो. तशी ती पद्धतच आहे.

आणि तेवढ्यात आकाशवाणीच्या जवळपासच कुठेतरी जोरदार धडामधून असा आवाज झाला. क्षणभर आकाशवाणीची संपूर्ण इमारतही हादरली. नेमके काय झाले कोणाला कळलेच नाही. पहिल्यांदा वाटले आपल्या आकाशवाणीच्या इमारतीमध्येच हा आवाज झाला का, मग हा आवाज आपल्या येथे नाही हे कळल्यावर सगळेच भानावर आले. मग खिडक्यातून बाहेर पाहिले तर नरिमन पॉइंट भागातून धुराचे व आगीचे प्रचंड लोट आकाशात दिसले. त्याचक्षणी हा आणखी एक बॉम्बस्फोट असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले. हातात वेळ खूप थोडा होता. त्यावेळीही जास्तीत जास्त ताजी बातमी श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची आम्हा सर्वांचीच धडपड असायची. हरीश कांबळे यांनी मला लगोलग कागद हातात घेऊन दोन ओळींची बातमी लिहायला सांगितली. मी कागद घेऊन, आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार मुंबईत नरिमन पॉइंट परिसरात एक भीषण बॉम्बस्फोट झाला असून तो नेमका कुठे व कसा झाला, त्यात कितीजण जखमी झाले त्याचा सविस्तर तपशील अद्याप हाती आलेला नाही. मात्र या स्फोटामुळे मुंबईतील बॉम्बस्फोटांची संख्या इतकी झाली आहे...

कांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे तो कागद घेऊन मी खाली स्टुडिओत गेलो. आत जाऊन जयंतकडे तो कागद दिला. त्याने ती बातमी लगेच वाचली. त्याचे बुलेटीन झाल्यावंर तो वर आला. त्यानंतर मुंबईतील ठिकठिकाणांहून बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या येत होत्या. दादा देशपांडे मंत्रालयात गेले होते. तेथून ते जी नवी माहिती मिळेल ती कळवत होते. ठिकठिकाणांहून येणाऱया बातम्यांवरून जे काही झाले ते अत्यंत भीषण, भयानक आणि दुर्देवी असल्याचे लक्षात येत होते. मी आमच्या ऑफिसलाही फोन करून काही माहिती घेत होतो. आमचे सर्व रिपोर्टर वेगवेगळ्या स्पॉटवर रवाना झाले होते. बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी आम्ही दुपारच्या बुलेटीननंतर खाली उतरलो. तो खाली लोकांची प्रचंड गर्दी होती. रस्त्यावरून लोकांचे लोंढेच्या लोंढे घरी जायला निघाले होते. काही मंडळी नरिमन पॉइंट भागाकडे जात होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये दुपारीच सोडून दिली होती. वातावरणात एक प्रकारचा तणाव, सन्नाटा पसरला होता. थोड्या वेळाने आम्ही पुन्हा वरती आलो.

आता संध्याकाळच्या बातम्यांची तयारी सुरू केली होती. युएनआय-पीटीआयवर आलेल्या बॉम्बस्फोटांच्या बातम्या, दादा देशपांडे यांनी मंत्रालय, पोलीस आणि अन्य ठिकाणी जाऊन आणलेल्या बातम्या आणि अन्य ठिकाणांहून अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या सहाय्याने बुलेटीन तयार होत होते. संध्याकाळच्या बातम्या मी वाचणार होतो. संध्याकाळच्या या बातम्या राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रे सहक्षेपीत करतात. बरे त्या वेळी आजच्या सारखे न्यूज चॅनेल्सचेही प्रस्थ वाढलेले नव्हते. फक्त दूरदर्शनचे आणि एखाद-दुसरे खासगी चॅनेल असले तर. त्यावेळी दूरदर्शनच्या बातम्या साडेसात वाजता असायच्या. ही बातमी तर संपूर्ण मुंबईत, राज्यात, देशातच नव्हे तर जगात वाऱयाच्या वेगाने पसरलेली. कधी नव्हे ते रेडिओ न ऐकणारी मंडळीही आज आकाशवाणीच्या बातम्या ऐकणार, कारण त्या दूरदर्शनच्या अर्धातास अगोदर होत्या. त्यामुळे नाही म्हटले तरी मनावर थोडे दडपण आले... त्यात बॉम्बस्फोटासारखी भीषण घटना घडलेली. अनेक जण जखमी अनेक जण या दुद्रैवी घटनेत मरण पावलेले... या सगळ्याचे नाही म्हटले तर दडपण आले. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. ६-५० ला मी खाली स्टुडिओत गेलो.

आत जाऊन बसलो, अगोदरचा कार्यक्रम सुरु होता. निवेदक कोण होता ते आठवत नाही. तो ही गंभीर होता. सातला दोन-तीन मिनिटे कमी होती. त्याने, आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या अशी घोषणा केली आणि जागा सोडली. त्याच्या जागेवर मी जाऊन बसलो. कामगार सभा हा कार्यक्रम बातम्याच्या अगोदर सुरू असायचा. कामगार सभा हा कार्यक्रम संपण्याची सिग्नेचर ट्यून सुरू झाली. घड्याळाकडे मी बघतच होता. स्टुडिओतील लाल दिवा लागला आणि
आकाशवाणी मुंबई, शेखर जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे...
ठळक बातम्या...


बातम्या सुरु झाल्यानंतरही काही क्षण मी दडपणाखाली होता. केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून लाखो श्रोते आज या बातम्या ऐकत आहेत, ही सर्वात भीषण व महत्वाची बातमी आपण सांगत आहोत आणि ते सर्व ऐकत आहेत, पण हे दडपण काही क्षणापुरतेच होते. बातम्या झाल्या. मी वर आलो. आता मला ऑफिसला जायचे होते. चर्चगेटहून प्रभादेवी येथे यायला निघालो. रस्त्यावर, लोकल ट्रेनमध्ये काहीच गर्दी नव्हती. जणू काही अघोषित संचारबंदी, जी काही मंडळी होती त्यांच्यातही याच विषयाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. ऑफिसला पोहोचलो. फोटोग्राफरने काढून आणलेले फोटो पाहिले आणि काय भयानक घडले आहे, त्याची कल्पना आली. आमच्या ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर सेंच्युरी बाजार येथे एका बेस्टबस मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. मी त्या ठिकाणी गेलो होते. आजूबाजूच्या इमारती, हॉटेल, एका मॅटर्निटी हॉस्पीटलचा काही भाग
उध्वस्त झाला होता. सुदैवाने रुग्णालयातील तान्ह्या बाळांना काहीह गंभीर इजा किंवा दुखापत झाली नव्हती. त्या परिसरातील वातावरणच सारे अंगावर शहारा आणणारे होते. काही वेळे तिथे थांबलो आणि सुन्न होऊन ऑफिसात आलो...

शुक्रवार, २२ मे, २००९

दिवस आकाशवाणीचे... (२)

मुंबई सकाळमधील नोकरी सांभाळून आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात माझे काम सुरु होतेच. आकाशवाणीच्या वृत्तविभागात तेथे काम करणाऱया कॅज्युअल न्युजरिडरला बातम्या करणे व वाचणे अशी दोन्ही कामे करावी लागतात. बातम्या करणे म्हणजे आकाशवाणीने गावोगावी नेमलेले जे वार्ताहर असतात, ते तेथील घडामोडींचे वृत्तांकन तारेद्वारा पाठवत असत. युएनआय आणि पीटीआय या वृत्तससंस्थांच्या बातम्या मशिनद्वारे येत असत. वार्ताहरांनी तारेने पाठवलेल्या बातम्या एकत्र करणे, त्यातील महत्वाच्या बातम्या निवडून ठेवणे, युएनआय-पीटीआयचे टेक शिपाई फाडून आणून देत असे. त्यातून मुंबई किंवा महाराष्ट्राशी संबंधित ज्या काही बातम्या असतील त्या बाजूला काढणे, असे काम असायचे. मग शरद चव्हाण, कुसुम रानडे, ललिता नेने किंवा वृत्तसंपादक हरीश कांबळे आले की त्यांना ते सर्व दाखवत असू. मग ते त्यातील काही महत्वाच्या बातम्या करायला सांगत असत. मग त्या वार्ताहरांनी पाठवलेल्या तारेच्या किंवा युएनआय/पीटीआयच्या असायच्या.


आकाशवाणी किंवा दूरदर्शनसाठी बातम्या या मोजक्या शब्दांत लिहणे आवश्यक असते. उगाचच फाफटपसारा तेथे चालत नाही. वाक्ये लहान, छोटी आणि सुटसुटीत असावी लागतात. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे लिहिताना ते केलं, झालं, सांगितलं, अशा बोली भाषेत लिहायचे असते. सुरुवातीला असे लिहायची सवय नव्हती. मग हळूहळू ती झाली. मी मुंबई सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून नोकरी करत असल्याने मला तेथे वृत्तपत्रीय भाषेत लिहिण्याची सवय होती. आकाशवाणीवर काम करताना ती बदलावी लागली. पण दोन्हीकडे काम करताना नेमके भान कसे ठेवायचे, हे सरावाने जमत गेले. पुढे पुढे पाच मिनिटे आणि दहा मिनिटांच्या बातम्यांसाठी किती बातम्या तयार कराव्या लागतात, त्याचे गणितही कळले व जमायला लागले. सुरुवातीला तिघे ज्येष्ठ वृत्तनिवदेक असल्याने बातम्या तयार केल्यानंतर त्या त्यांना दाखवणे, त्यांनी तपासून देणे, बातम्यांचा क्रम लावून देणे आणि संध्याकाळच्या प्रादेशिक बातम्यांसाठी संपूर्ण बुलेटीन लावून देणे (यात पहिले पान ठळक बातम्यांचे, नंतर पहिल्या पाच मिनिटांच्या बातम्या, त्यानंतर या बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देण्यात येत आहेत, असे वाचायचा कागद, त्यानंतर उर्वरित पाच मिनिटांच्या बातम्या व शेवटी ठळक बातम्यांचा कागद) असे सर्व तयार करून देत असत.


पुढे माझ्या त्या दीड-दोन वर्षांच्या काळातच हे तिघेही ज्येष्ठ वृत्तनिवेदक निवृत्त झाले. त्यामुळे त्यानंतर दोन कॅज्युअल न्यूजरिडरवरच सर्व भार होता. या ज्येष्ठ मंडळींनी अगोदर केलेल्या मार्गदर्शनामुळे ते नसतानाही आम्हाला बुलेटीन तयार करणे जणू लागले. जयंत माईणकर, रत्नाकर तारदाळकर, धनश्री लेले, मनाली दीक्षित, अंजली आमडेकर, दीपक वेलणकर (काही जणांची नावे राहिली असल्यास क्षमस्व),अशी आम्ही नवी-जुनी कॅज्युअल मंडळी त्यावेळी होतो. आकाशवाणीचा माईक हा खूप शक्तीशाली असल्याने कागदाची साधी सळसळ झाली तरी ती श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे बातम्यांच्या कागदाचा गठ्ठा हातात घेऊन एकेक बातमी वाचून झाल्यावर तो कागद अलगद बाजूला कसा सरकावायचा किंवा अलगद बसल्या जागेवरून खाली कसा टाकून द्यायचा, हे धडे नेने बाईंकडून मिळाले. सुरुवातीला तर त्या बातम्या देत असताना कशा देतात, हे पाहण्यासाठी खाली स्टुडिओत मी गेलो असल्याचेही मला आठवताय.


आकाशवाणीच्या दिवसांची ही सुरुवात कशी झाली ते सांगितले पाहिजे. मुंबई सकाळमध्येच नोकरी करत असताना (१९९०)च्या सुमारास मुंबई आकाशवाणीसाठी स्टाफ अनाऊन्सर पाहिजे, अशी जाहिरात वृत्तपत्रातून आली होती. मला या क्षेत्राची आवड असल्यामुळे मी अर्ज केला. चर्चगेटच्या के. सी. महाविद्यालयात त्याची लेखी परीक्षा झाली. काही हजारात उमेदवार परीक्षेला बसले होते. त्यातून काही जणांची आवाजाच्या परीक्षेसाठी माझी निवड झाली. आवाजाच्या चाचणीतूनही उत्तीर्ण होऊन अंतिम निवडीसाठी सात जण निवडले गेले होते, त्यात मी होतो. पण त्यावेळी माझी निवड झाली नाही. तेव्हा रजनीकांत राणे व दिनेश अडावदकर याची निवड झाली. माझी तेव्हा आकाशवाणीवर निवड झाली असती तर मुंबई सकाळ सोडून अनाऊन्सर म्हणून जायची मी तयारी ठेवली होती. पण नाही निवड झाली. मात्र त्यावेळी आकाशवाणीवर कॅज्युअल अनाऊन्सर म्हणून काम करणाऱया श्रीराम केळकर, विजय कदम, दीपक वेलणकर आदींशी ओळख/मैत्री झालेली होती. त्यामुमळे कधी रिपोर्टींगच्या निमित्ताने चर्चगेट, नरिमन पॉइंट या भागात मी गेलो की आवर्जून या मित्रांना भेटायला जात असे. पुढे प्रादेशिक वृत्त विभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मी आकाशवाणीशी पूर्णपणे जोडला गेलो.


मगाशी सांगितले की स्टाफ अनाउन्सरच्या जागेसाठी माझी निवड झाली नाही. पण नंतर काही महिन्यांत प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणून निवड झाल्यामुळे आकाशवाणी जवळून पाहता आली. काम करण्याचा खूप अनुभव मिळाला. मला या क्षेत्रात कायमचे काम करायला नक्कीच आवडले असते. त्याच काळात कोल्हापूर, सांगली, पुणे आदी आकाशवाणी केंद्रांसाठी निवेदक/वृत्तनिवेदक पाहिजे, अशा जाहिराती वृत्तपत्रातून आल्या होत्या. मी त्या त्या ठिकाणी जाऊन लेखी परीक्षा, आवाजाची चाचणीही देऊन आलो. अगदी तिकडे माझी निवड झाली असती तर मी जायची तयारी ठेवली होती. परंतू लेखी परीक्षा, आवाजाची चाचणी उत्तीर्ण होऊनही अंतिम निवडीत मी नव्हतो. कदाचित तेव्हा त्यांनी स्थानिकानाच प्राधान्य दिले असेल. पण माझे प्रयत्न सुरुच होते. अशातूनच एकदा आकाशवाणीच्या नभोनाट्य विभागाच्या आवाजाची परीक्षा मी दिली. पण पहिल्या प्रयत्नात फेल झालो. आकाशवाणीच्या नभोनाट्यातून काम करायचे असेल तर आकाशवाणीची स्वराभीनय चाचणी उत्तीर्ण असणे गरजेचे असते. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नसले तरी पुन्हा काही महिन्यांनंतर जी स्वऱाभीनय चाचणी झाली त्यात मी यशस्वी झालो. मला बी ग्रेड मिळाली होती. त्यानंतर गिरिजा कीर यांच्या याला जबाबदार कोण या नभोनाट्यात मला भूमिका करायची संधीही मिळाली. तनुजा कानडे या तेव्हा मराठी नभोनाट्य विभागाच्या निर्मात्या होत्या. पण मला तेवढे ते एकच नभोनाट्य करायला मिळाले.


एकंदरीत आकाशवाणीचे हे दिवस खूप मजेचे व नवीन नवीन शिकण्याचे होते. खूप चांगला अनुभव त्यातून मला मिळत होता. अजूनही अशाच काही आठवणी आहेत, त्या उद्या तिसऱया भागात...

गुरुवार, २१ मे, २००९

दिवस आकाशवाणीचे... (१)

मुंबई सकाळमध्ये नोकरी करत असताना तेव्हाचे मुंबई सकाळचे संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांच्या परवानगीमुळे मला आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर म्हणून सुमारे दीड ते दोन वर्षे काम करता आले. प्रादेशिक वृत्तविभागात दुपारी १ ते ७ अशी ड्युटी असायची. दोन/तीन महिन्यातून एकदा हे कॉन्ट्रक्ट मिळायचे. मग त्यावेळी मुंबईसकाळ मध्ये मी रात्री ८ ते १२ अशी ड्युटी करायचो. मी मुंबई सकाळमध्ये रिपोर्टिंगला होतो. प्रत्येक रिपोर्टर्सला दोन/तीन महिन्यातून एकदा नाईट ड्युटी यायची. ही ड्युटी संध्याकाळी ६ ते १२ अशी असायची. शक्यतो मी माझ्या याच ड्युटीच्या काळात आकाशवाणीवर माझे कॉन्ट्रक्ट घेत असे. नार्वेकर साहेब यांच्यामुळे मला दोन तासांची सवलत मिळत असे. संध्याकाळी सातच्या प्रादेशिक बातम्या झाल्या की मी चर्चगेटहून प्रभादेवीला आमच्या मुंबई सकाळच्या ऑफिसमध्ये येत असे. साधारण १९९१-९२ व ९३ असा सुमारे दीड-दोन वर्षे मी आकाशवाणीवर होतो. अर्थात हे सर्व नार्वेकर यांनी दिलेल्या परवानगीमुळेच मला करता आले हे विसरून चालणार नाही.

आकाशवाणीचे ते दिवस खूप मस्त होते. वृत्तपत्रात/ आकाशवाणीवरुनच आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात कॅज्युअल न्यूजरिडर हवे असल्याची जाहिरात आली होती. मी अर्ज केला. लेखी व आवाजाची परीक्षा आणि इंटरव्हयू यातून पार झालो व माझी कॅज्युअल न्यूजरिडरच्या पॅनेलवर निवड झाली. आता नेमक्या पहिल्या बातम्या मी कधी वाचल्या ते आठवत नाही. आकाशवाणीवर जे काही दी़ड-दोन वर्षे काम केले त्यात खूप मजा आली. लहानपणी मी ज्यांचे आवाज केवळ ऐकले होते त्या मंडळींबरोबर मला प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. यात ज्येष्ठ वृत्तनिवेदक कुसुम रानडे, शरद चव्हाण आणि ललिता नेने यांचा समावेश होता. शरद चव्हाण आणि नेने व रानडे बाई यांचा आवाज अगदी थेट परिचयाचा होता. जसा पुणे आकाशवाणीच्या सुधा नरवणे यांचा आवाज. सकाळी ७-०५ च्या बातम्या वाचायला बहुतेक त्या असायच्या.

तसेच या तीघांचे आवाज कानात बसलेले होते. मला आठवताय पहिल्या दिवशी मला दुपारी पावणेतीनचे बातमीपत्र वाचायला मिळाले होते. (आता ते दुपारी १-४५ ला असते) माझा पहिलाच दिवस होता. त्यावेळी दोन ज्येष्ठ वृत्तनिवेदक व एक कॅज्युअल असे लोक ड्युटीला असायचे. शरद चव्हाण, कुसुम रानडे, ललिता नेने हे तीघेही आकाशवाणीचे स्टाफ वृत्तनिवेदक होते. वसंत ऊर्फ दादा देशपांडे हे आकाशवाणीचे स्टाफ रिपोर्टर होते. ते मंत्रालय, विधानमंडळ, राजकीय आणि अन्य महत्वाच्या बातम्यांचे वृत्तांकन करायचे. असो. तर मी सांगत होतो, माझ्या आकाशवाणीवरील पहिल्या दिवसाबद्दल.

तर सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या. वृत्तसंपादक म्हणून हरिश कांबळे त्यावेळी काम पाहात होते. माझा पहिलाच दिवस. त्यामुळे मला दुपारी दीडच्या बातम्या वाचायला दिल्या होत्या. या बातम्या पाच मिनिटांच्या असतात. मी स्टुडिओत गेलो. स्टुडिओत जाण्यापूर्वी मला सगळ्या सूचना देऊन ठेवलेल्या होत्या. स्टुडिओत लाल दिवा लागला की वाचायला सुरुवात करायची.वगैरे, वगैरे. लाल दिवा लागला, आणि मी वाचायला सुरुवात केली, आकाशवाणी मुंबई, शेखर जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे...

काही क्षण थोडेसे दडपण माझ्यावर होते. पण नंतर ते संपले. बातम्या वाचून मी वर आलो. हरीश कांबळे आणि अन्य सर्वानी बातम्या चांगल्या झाल्या असल्याचे सागून मला प्रोत्साहित केले. त्यानंतर अगोदर म्हटल्याप्रमाणे दोनत-ीन महिन्यातून एकदा मला कॉन्ट्रक्ट मिळत जाचये. अशाच एका कॉन्ट्रक्टमध्ये मला एकदा संध्याकाळच्या सातच्या प्रादेशिक बातम्या वाचण्याची संधी मिळाली. त्या बातम्या दहा मिनिटांच्या असतात व त्या राज्यातील सर्व केंद्रे सहक्षेपित करतात. त्याला श्रोतेही दुपारच्या तुलनेत जास्त असतात. या बातम्यांच्या वेळी पाच मिनिटांनतर या बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देण्यात येत आहेत, असे वाक्य म्हणायचे असते. माझी पहिलीच वेळ असल्याने गडबडीत ते लक्षात राहील की नाही, म्हणून माझ्याबरोबर नेने बाई स्टुडिओत आल्या होत्या. माझ्या समोर त्या उभ्या राहिल्या. पाच मिनिटे झाल्यावर त्यांनी एक कागद हळूच माझ्यासमोर धरला. त्यावर ते वाक्य लिहिलेले होते. बातम्या संपायला काही सेकंद बाकी असताना, नेनेबाईंनी ठळक बातम्या, असा कागद मला दाखवला. कारण बातम्या संपताना दहा-पंधरा सेकंद बाकी असताना शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या, असे वाचायचे असते. माझा पहिलाच दिवस असल्याने गडबडीत लक्षात राहिले नाही तर पंचाईत नको, म्हणून नेनेबाई स्वत स्टुडिओत आल्या होत्या. माझा हा पहिला दिवसही उत्तमप्रकारे पार पडला. त्यानंतर शरद चव्हाण आणि ललिता नेने जर ड्युडीला असतील तर त्या दोघांपैकी एक जण दुपारच्या आणि मी नेहमी संध्याकाळच्या बातम्या वाचायचो. रानडे बाई असल्या की मात्र एकेक दिवस आलटून-पालटून आम्ही दुपारच्या व संध्याकाळच्या बातम्या वाचायचो.

स्टुडिओतील मईक खूप शक्तीशाली असतो. त्यामुळे माईकपासून नेकमे किती अतंकावर बसायचे, बातम्यांचे जे कागद असतात, त्यांना टाचणी लावायची नाही, एका कागदावर एकच बातमी लिहायची, बातमी वाचून झाली की हळूच कागद बाजूला सरकावायचा, बातम्यांचे वाचन सुरू असताना समोरच्या घड्याळाकडे लक्ष कसे ठेवायचे, दहा मिनिटांच्या बातम्या संपवताना दहा-पंधरा सेकंद बाकी असताना पुन्हा ठळक बातम्या वाचायच्या, एखादी महत्वाची बातमी ऐनवेळी स्टुडिओत आणून दिली तर तिला कसे स्थान द्यायचे, मग इतर बातम्या कशा पुढे-मागे करायच्या, सगळ्यात महत्वाचे म्हणजे आकाशवाणीच्या माध्यमात केवळ तुमच्या आवाजाने तुम्ही श्रोत्यांपर्यंत पोहोचत असता. त्यामुळे शब्दोच्चार शुद्ध, स्पष्ट व स्वच्छ असणे अत्यंत गरजेजे असते. माझ्या बाबतीत तो प्रश्न नव्हताच. पण बातमी वाचताना नेमक्या कोणत्या शब्दांवर/ वाक्यावर जोर द्यायचा, कुठे पॉज घ्यायचा, शब्दोच्चार कसे करायचे आणि केवळ आपल्या आवाजाद्वारे समोरच्या सर्व वयोगटातील श्रोत्यांपर्यंत बातमी कशी पोहोचवायची, हे सर्व मला माझ्या या आकाशवाणीच्या दिवसात हळूहळू शिकायला मिळाले. तीनही ज्येष्ठ वृत्तनिवेदकांचे व वृत्तसंपादक हरीश कांबळे, दादा देशपांडे, सहकारी वृत्तनिवेदक या सर्वांचे उत्तम सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.

आकाशवाणीवरील दिवसांच्या इतरही अनेक आठवणी आहेत. त्याविषयी उद्या दुसऱया भागात...

बुधवार, २० मे, २००९

कधी रे येशील तू...

अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्यानं संपूर्ण महाराष्ट्र त्रस्त झाला आहे, माणसंच काय, पण झाड, झुडप, प्राणी, पक्षी आणि अगदी धरित्रीही तुझी आतुरतेने वाट पाहात आहे. प्रत्येकजण विचारत आहे, आळवत आहे, कधी रे येशील तू, वरुणराजा कधी रे येशील तू...

यंदाच्या वर्षी तर संपूर्ण राज्यभर सूर्यदेवाच्या कोपामुळे तापमापकाचा पारा चाळीस अंशाच्या मार्चमध्येच गेला होता. एप्रिल गेला, मे महिनाही सरत आला. तसा तू दरवर्षी सात जूनला येतोस, पण एखाद्या व्रात्य मुलाने दोन-चार दिवस शहाण्यासारख वागावं आणि मग पुन्हा त्याच्या अंगात यावं, असाच तू वागतोस. सात जूनला तू आपली हजेरी लावतोस आणि नंतर जो कुठे गायब होतोस, तो अख्खा जून संपून जुलै उजाडला तरी तोंड दाखवत नाहीस. मला आठवताय, पूर्वी तू कसा अगदी शहाण्यासारखा यायचास, आलास की चार महिने मुक्काम करायचास, पण आता मात्र तुला आमचा सहवास आवडत नाही का, की तू आमच्यावर रागावला आहेस, मला माहीतेय, की तुला यायला उशीर होतो त्याला आम्हीच जबाबदार आहोत.

आमच्या परिसरातील, गावातील, जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील नैसर्गिक संपत्तीची आम्हीच पूर्णपणे वाट लावून टाकली. विकासाच्या नावाखाली आम्ही जंगले नष्ट केली, हिरवेगार डोंगर उघडे-बोडके केले, छोट्या-मोठ्या टेकड्या आम्हीच उध्वस्त करून टाकल्या, सोसायटी, घरे यांना मातीचे अंगण ठेवले नाही, सगळीकडे सिमेंट-क्रॉंक्रिटचे जंगल उभं केलं, तुझ्या येण्यासाठी सहाय्यभूत असलेले वारा आणि ढग यांना अडवणारे मोठे डोंगर आता राहिले आहेत कुठे, आकाशातून सहस्त्रधारांनी जमिनीकडे धाव घेणारा तुझा खळाळता प्रवाह पूर्वी नदी, नाले आणि समुद्रातून मुक्तपणे हिंडत होता. पण आम्हीच नतद्रष्टानी तेथे समुद्रात भराव टाकून बॅक बे रेक्लमेशन तयार केले, नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमणे करून, बेकायदा इमारती आणि झोपड्या बांधून आम्ही तुझा खळाळता प्रवाहही बंदिस्त करून टाकला, नदीतून स्वच्छ वाहणरे पाणी आम्हीच कारखान्यातील रासायनिक द्रव्ये सोडून दुषित करून टाकले, आमचे अपराध तरी किती सांगू...

मात्र याचा वचपा तू कधीतरी काढतोस, कधी असा काही दणका देतोस, की पावसाळा म्हटला की मुंबईकरांना दरवर्षी २६ जुलै २००५ ची आठवण होते, त्यावेळी तू असा की बरसलास की संपूर्ण मुंबईची पार वाट लावून टाकलीस, अर्थात त्याला आम्ही आणि येथील नालायक राज्यकर्तेच जबाबदार होतो. मात्र इतके होऊनही आम्ही त्यापासून काहीच धडा घेतलेला नाही. मिठी नदी आणि अन्य नदी पात्रातील बेकायदा बांधकामे हटविण्याचे नाटक आम्ही पार पाडले, मिठी नदीच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आणि बरचे काही, पण गेली इतकी वर्षे आम्ही जाणूनबूजून निसर्गावर, पर्यावरणावर जे काही अत्याचार केले त्याची भरपाई इतक्या जुजबी आणि तात्पुरत्या उपायांनी होऊ शकते, नाही, पण आम्ही ते करत राहतो.

आजच विविध वृत्तपत्रातून बातमी वाचली की तू अंदमानला येत्या ४८ तासांत आपली हजेरी देणार आहेस, अरे संपूर्ण महाराष्ट्र तुझ्याकडे डोळे लावून बसला आहे. आता एक काम कर, वृत्तपत्रांची ही बातमी आणि वेधशाळेचा अंदाज यावेळी तरी खोटा पाटू नकोस, अंदमानात ठरलेल्या वेळेपूर्वीच ये. कारण अंदमानात तू आलास की त्यानंतर सात दिवसात मुंबईत आणि नंतर काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात तू मुक्कामाला येतोस, असा अनुभव आहे. त्यामुळे ये अगदी लवकर ये,

आम्ही तुझे अनंत अपराधी असलो तरी महाराष्ट्रातील भावी पिढीसाठी तू वेळेवर ये, आमचे अपराध पोटात घाल, पण येणाऱया भावी पिढीला आमच्या अपराधांची शिक्षा देऊ नकोस, या वर्षी थंडी गायब झाली होती. मला तर अशी भीती वाटते की या थंडीसारखा तू सुद्धा गायब होशील की काय, मग तसे झाले तर काय होईल त्याची कल्पनाच करवत नाही. भावी पिढीला तुला व्हिडिओ किंवा सीडीमध्येच पाहावा लागेल की काय, की पूर्वी नैसर्गिकरित्या पाऊस पडत असे, यावरच कोणाचा विश्वास बसणार नाही, ढगांमध्ये रासायनिक द्रव्यांची फवारणीकरून कृत्रीमपणेच तूला बोलवावे लागेल का, बदलते व ढासळते पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरणाचा होणारा ऱहास आणि अन्य काही कारणांमुळे ऋतूचक्र असेच बदलत किंवा संपत जाणार असल्याचा धोका शास्त्रज्ञानी वर्तवला आहेच आणि त्यात तू वेळेवर आला नाहीस तर त्याकडेच वाटचाल सुरू झाली की काय, असे आम्हाला वाटत राहील.

अरे माणसांप्रमाणेच धरित्रीच्या कणाकणालाही आता तुझी आस लागली आहे. भेटी लागे जीवा, लागलीसे आस, अशी आम्ही प्रत्येकाची अवस्था झाली आहे. तेव्हा आता उशीर करू नकोस, केवळ घनघनमाला नभी दाटल्या असे न करता त्यातून जोरदार धारा कोसळू दे, आता अधिक अंत पाहू नकोस, ये, धावून ये, पुन्हा एकदा तुला विचारतोय, कधी रे येशील तू...

मंगळवार, १९ मे, २००९

काझमींची कसाबगिरी

वकीली व्यवसाय हा खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे करण्याचाच असतो, असे नेहमी बोलले जाते. मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी कसाब याचे वकीलपत्र घेतलेल्या काझमी यांनी सध्या जी काही कसाबगिरी सुरू केली आहे, त्यावरून सर्वसामान्यांच्या मनात वकील आणि या व्यवसायाबाबत असलेला समज ते प्रत्यक्षात खरे करून दाखवत आहेत. न्यायालयीन प्रक्रियेचा एक अपरिहार्य भाग म्हणून आणि कसाब याला वकील दिला नाही तर हा खटला पुढे चालवताच येणार नाही, या गरजेतून काझमी यांना कसाबचे वकीलपत्र दिले गेले आहे. मात्र कसाब हा कसा सज्जनाचा पुतळा आहे, गरीब बिचाऱया कसाबला नाहक या खटल्यात गोवले आहे आणि कसेही करून त्याला यातून आपण बाहेर काढायचेच, या विचाराने काझमी कसाबचा खटला लढवत आहे की काय अशा शंका यावी, असे वर्तन सध्या ते करत आहेत.

खरे तर कसाबचा हा गुन्हा म्हणजे देशाविरुद्धचे युद्ध आहे, कट आहे, असे पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यापासून सर्वानीच मान्य केले आहे. इतके जर आहे तर अपवाद म्हणून कसाबच्या या खटल्यात त्याला वकील न देता शिक्षा सुनावली गेली असती तर काय झाले असते. नाहीतरी येथे जी शिक्षा सुनावली जाईल, त्याच्या विरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, तिथे पुन्हा काही महिने खटला चालेल. या सर्व घोळात कसाब मात्र सरकारी पर्यायाने करदात्या नागरिकांच्या पैशांवर मजा करत राहील.

वकील देण्याच्या बाबतीतही अगोदर घोळ घातला गेला. वाघमारे बाईंची कसाबच्या वकील म्हणून नेमणूक केली गेली होती. परंतु त्यांनी याच खटल्यातील एका आरोपीचे वकीलपत्र घेतल्याची बाब न्यायालयापासून लपवून ठेवली. त्यावर दाद मागितल्यावर न्यायालयाने त्यांना या कामातून मुक्त केले. आणि त्यानंतर या काझमींची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीपासूनच कसाबला निर्दोष ठरविण्यासाठी खऱयाचे खोटे करायला सुरुवात केली.

अगदी सुरुवातीलाच त्यांनी कसाबच्या वयाचा मुद्दा उपिस्थत करून न्यायालयाचा वेळ वाया घालवला. कसाब हा अल्पवयीन असल्याचे सांगून हा खटला बालन्यायालयात चालविण्याचे त्यांचे प्रयत्न होते. कदाचित त्यात ते यशस्वी झाले असते तर बालगुन्हेगार म्हणून त्याला मृत्यूदंडाऐवजी तुलनेत कमी शिक्षा सुनावली गेली असती. कसाबचा अपराध इतका भयंकर आणि सुस्पष्ट आहे, की त्याला या गुन्ह्यासाठी फाशीच दिली गेली पाहिजे. हे होत नाही तर आता काझमी यांनी कसाबला जेव्हा पकडून डॉक्टरांकडे आणले तेव्हाच डॉक्टरांनी त्याला का वाचवले, त्याला न वाचवता मारून का नाही टाकले, म्हणजे जर डॉक्टरांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले तर मी ही माझ्या अशिलाची बाजू मांडण्याचे काम करत आहे.

मुळात काझमी यांनी केलेली ही तुलनाच चुकीची आहे. कोणताही डॉक्टरचे रुग्णाचे प्राण वाचवणे हे आद्य कर्तव्यच असते. मग तो सर्वसामान्य असो, कोणी व्हीआयपी असो वा एखादा गुन्हेगार असो. आता काझमी म्हणतात,त्याप्रमाणे अशिलाला वाचवणे हे त्याच्या वकीलाचे कर्तव्य असते. अन्य कोणत्याही गुन्हयात कदाचित ते (माझ्या दृष्टीने एखाद्या गुन्हेगाराला निर्दोष म्हणून सोडवणे हे चुकीचेच आहे) व्यावसायिक कर्तव्य म्हणून योग्यही असेल. पण या खटल्यात तसे म्हणता येणार नाही.

मुंबईवर आणि निरपराध नागरिकांवर थेट हल्ला चढवणाऱया आणि पोलीस अधिकाऱयांसह निरपऱाध लोकांना गोळ्या घालून ठार मारणाऱया दहा दहशतवाद्यांपैकी कसाब हा जीवंत हाती सापडला आहे. म्हणजे तो गुन्हेगार आहे, भारताविरुद्ध त्याने गुन्हा केला आहे, हे सर्व स्पष्ट असतानाही काझमी कसाबसाठी खऱयाचे खोटे करण्यात आणि त्यातून न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यात व कसाबला वाचविण्यासाठी इतके आतूर होऊन का प्रयत्न करत आहेत. काझमी हे भारतीय न्यायप्रक्रियेने दिलेले वकील आहेत. तुम्ही भारतीय नागरिक आहात. केवळ अपरिहार्यता म्हणून तुम्हाला कसाबचे वकीलपत्र मिळाले आहे, तुम्ही कसाबसाठी पाकिस्तानचे वकील नाहीत. मग तरीही खऱयाचे खोटे का करायला निघाला आहात. त्यातून तुम्हाला काय मिळणार आहे. की कसाबला सोडविण्याची सुपारी तुम्हाला पाकिस्तानने दिली आहे. एकदा याचीही जाहीर उत्तरे द्या.

कसाबचे जे अन्य साथीदार कारवाईत मारले गेले त्यांचे दफन भारतातील कोणत्याही दफनभूमीत करू देणार नाही, असा निर्णय देशातील सर्वच मुस्लिम संघटना व त्यांच्या प्रमुखांनी घेतला. तो योग्यच होता. मात्र आता त्यामुळे पुन्हा करदात्या नागरिकांच्या पैशातून हे मृतदेह जतन करून ठेवण्यासाठी कोही कोटी रुपये खर्च करून शवागृह बांधले गेले आहे. खरे तर अन्य कोणत्याही प्रकरणात काही दिवसांनंतर बेवारस मृतदेहाचे पोलीसांकडून जसे अंत्यसंस्कार केले जातात, तोच न्याय या दहशतवाद्यांच्या बाबतीत लावला गेला पाहिजे. तुम्हाला या दहशतवाद्यांचे हाताचे ठसे, डीएनए आणि अन्य आवश्यक अशा काही गोष्टी पुरावे म्हणून काढून घ्यायच्या असतील, त्या काढून घ्या. पाकिस्तानला एकदा निर्वाणीचा इशारा देऊन ते हे मृतदेह ताब्यात गेत आहेत का ते विचारा, त्यांच्याकडून नकार आला तर इतरांच्या बाबतीत पोलीस जे करतात ,तसेच दहशतवाद्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून टाका, पण आमचे राज्य व केंद्र शासनातील वरिष्ठ, तथाकथीत सर्वपक्षीय पुरोगामी नेते याप्रकरणी मूग गिळून आहेत. आणखी किती दिवस हे मृतदेह जतन करून ठेवणार आहात.

हे सर्व कमी की काय म्हणून आता काझमी यांनी आपल्या अकलेचे नवे तारे तोडले आहेत. कसाबच्या गोळ्या अंगावर झेलत ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ज्यांच्यामुळे कसाब जीवंत हाती सापडला, ते तुकाराम ओंबाळे हे पोलीस अधिकारी त्या वेळी तीथे नव्हतेच, असे अजब तर्कट काझमी यांनी मांडले आहे. तसेच इस्लामिक जिमखान्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केले म्हणून त्यांच्यावरही ते आगपाखड करत आहेत. आता तर कसाबला फाशीची शिक्षा न होता, त्याला सुधारण्याची संधी द्यावी, असा मुद्दा काझमी यांनी मांडला आहे. एकंदरीतच काझमी यांचे हे जे काही बेजबाबदार वर्तन सुरू आहे, त्यामुळे एकदा न्यायाधीशही संतापले होते व त्यांनी तुम्हाला काम करायचे नसेल तर बाजूला व्हा, असे काझमी यांना सुनावले होते. मात्र नंतर त्यात मार्ग काढला गेला. ही सुद्धा खटला लांबविण्याची काझमी यांची वेगळी चाल असू शकते. तसे झाले तर पुन्हा नवीन वकील नेमणे, अन्य प्रक्रिया आणि पुन्हा सुरुवातीपासून सगळे सुरू, हे करण्यात वेळ वाया जाऊ शकतो.

भारतीय न्यायालयीन प्रक्रियेचा अपरीहार्य भाग म्हणून तुमची नियुक्ती करण्यात आली आहे, तुम्ही पाकिस्तानने नेमलेले किंवा कसाबने नेमलेले वकील नाही. त्यामुळे उगाचच खऱयाचे खोटे करून किंवा न्यायालयाचा वेळ वाया घालवून खटला लांबवण्याचा प्रयत्न करू नका. तसे केले तर शेवटी वकील न देता आम्हाला हा खटला पुढे चालवावा लागेल, असा सडेतोड व निर्वाणीचा इशारा काझमी यांना न्यायाधीशांनी द्यावा.

तरीही काझमी सुधारले नाहीत, तर राष्ट्रप्रेमी नागरिकच त्यांना माफ करणार नाहीत आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त रोषाला त्यांना सामारे जावे लागेल. तो रोष कसा असेल व कशा प्रकारे प्रगट होईल हे येणारा काळच ठरवेल...

सोमवार, १८ मे, २००९

उद्धवा, अजब तुझा कारभार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नुसतीच हवा आहे, त्यांच्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला कोणताही धोका नाही, मनसे म्हणजे इधरसे उधरसे या आणि अन्य शेलक्या शब्दात मनसे व राज ठाकरे यांची खिल्ली उडवणाऱया उद्धव ठाकरे यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मुंबई, ठाणे व नाशिक येथील निकालांनी जमिनीवर आणले आहे. नुसते जमिनीवरच आणले नाही, तर पार नाक कापले गेले आहे. पक्षाचा वरिष्ठ नेता हा बदलत्या परिस्थितीचा सर्व बाजूनी विचार करून निर्णय़ घेणारा असावा लागतो. प्रसंगी एक पाऊल मागे जाऊन पडते घेण्याचीही तयारी असावी लागते. परंतु उद्धव यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्या ताकदीचा गंभीरपणे विचार केलाच नाही किंवा त्यांच्या समवेत असणाऱया सल्लागारांनी त्यांना चुकीचा सल्ला देऊन अंधारात ठेवले. पण केवळ सल्लागारांवर विसंबून न राहता नेत्यांने आपली स्वताची बुद्धी, कौशल्य वापरायचे असते, ते उद्धव यांनी केले नाही. मनसे आपले काहीच वाकडे करू शकणार नाही, या भ्रमात ते राहिले आणि काय झाले ते आता कळून आले आहे. नशीब समजा ४८ ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केले नाही, असे राज ठाकरे निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले होते. खऱोखरच सर्वच्या सर्व म्हणजे ४८ जागांवर मनसेने उमेदवार उभे केले असते तर शिवसेनेचे आत्ता जेवढे खासदार निवडून आले, तेवढे तरी निवडून आले असते की नाही, याची शंका वाटते.
वडिलांच्या पुण्याईवर उद्धव यांना शिवसेनेचे कार्याध्यक्षपद मिळाले. राज ठाकरे शिवसेनेत असतानाही त्यांना वेळोवेळी उद्धव आणि त्यांच्या समर्थकांकडून डावलले जात होतेच. उद्धव यांना सर्व सुत्रे स्वताच्या हातातच ठे्वायची होती. खऱे तर त्यावेळी राज ठाकरे यांनी मुंबई ठाणे, पुणे, नाशिक आदी भागाची जबाबदारी आपल्याकडे आणि उर्वरित संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी उद्धवकडे असा प्रस्ताव मांडला असल्याचे सांगितले होते, परंतु त्याला उद्धव यांनी नकार दिला असे म्हणतात. नारायण राणे यांच्या सारखा ताकदवान नेताही उद्धव यांच्यामुळे शिवसेना सोडून बाहेर पडला. बृहन्मुंबई महापालिकेत शिवसेना गेली अनेक वर्षे सत्तेवर आहे. या काळात त्यांनी मुंबईसाठी काय केले, मोठे काही सोडाच परंतु मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठीत करणेही त्यांना जमले नाही. राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्दयावर महापालिका प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर शिवसेना जागी झाली. आणि मराठीचा मुद्दा आमचाच असून तो राज ठाकरे यांनी पळवला असल्याचे सांगितले जाऊ लागले. अरे मग तुम्ही इतकी वर्षे काय केले, साधी ही गोष्टही तुम्हाला करता आली नाही.
निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी फेकलेल्या जाळ्यात उद्धव ठाकरे फसले. ज्या पक्षाशी आपले विचार आणि राजकीय भूमिकाही जुळत नाही, त्यांच्याबरोबर युती करायला हे महाराज निघाले होते. त्यासाठी इतकी वर्षे मित्र असलेल्या आणि हिंदुत्वाच्या मुद्दयावर एकत्र आलेल्या भाजपला सोडचिठ्ठी द्यायचीही त्यांनी तयारी केली होती. उद्धव यांच्यावर पवार यांनी काय भुरळ घातली होती, काय माहित, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरलेल्या आणि जणू काही आपणच पंतप्रधान होणार आहोत, असे ढोल वाजवणाऱया पवार यांना आणि त्यांच्या पक्षाला मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. त्यांच्या पक्षाला खासदारांची दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. म्हणजे शिवसेना पवारांबरोबर गेली असती तर काय झाले असते, कॉंग्रेस महाराष्ट्रातून हद्दपार करू, भाजपला स्वताच्या ताकदीवर काही करता येणार नाही, राज्यात राष्ट्रवादीचेच खासदार अिधक संख्येने निवडून येतील, मग लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीलाही युती करून राज्यातील सत्ता हस्तगत करू. अजित पवार मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अशी ऑफर पवारांनी उद्धव यांना दिली होती का, पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पवार आणि त्यांच्या पक्षाला राज्यातील जनतेने पार चौथ्या क्रमांकावर फेकून दिले आहे. यातून आता तरी उद्धव यांनी धडा घ्यावा. ज्या पवारांबद्दल सर्वसामान्य मतदारांमध्ये कधीच विश्वास नव्हता, पवार म्हणजे विश्वासघात, बेईमानी, बोलतील एक आणि करतील दुसरेच असे ज्यांच्याबद्दल नेहमी बोलले जाते, त्यांच्याबरोबर युती केली असती,तर शिवसेनेची अवस्थाही आज पवार यांच्या पक्षासारखी झाली असती.
काही ठिकाणी उमेदवार देण्यातही शिवसेनेची चूक झाली. त्याचे सगळ्यात मोठे उदाहऱण म्हणजे ठाण्यातून दिलेले विजय चौगुले हे उमेदवार, हे एकेकाळचे गणेश नाईक यांचे विश्वासू सहकारी. राष्ट्रवादी पक्षातील. ते तुमच्याकडे म्हणजे शिवसेनेत आले म्हणजे त्यांची सर्व पापे धुवून निघाली का, उलट मनसेने त्याठिकाणी राजन राजे यांच्यासारखा हुषार व सुशिक्षित उमेदवार दिला. खरे तर ठाण्यातून आनंद परांजपे यांनाच शिवसेनेने उमेदवारी द्यायला पाहिजे होती. कल्याणची जागा भाजपलाच देऊन भिवंडीची जागा त्यांनी स्वताकडे ठेवायला हवी होती. कारण भिवंडीत त्यांचे विद्यमान आमदार योगेश पाटील होते. बरे तेही लोकसभेसाठी इच्छुक होते. कदाचित तिथे योगेश पाटील निवडुन आले्ही असते. कल्याणची जागा भाजपला दिली असती आणि भाजपनेही तेथे ब्राह्मण व सुशिक्षित उमेदवार दिला असता तर तीही जागा कल्याण-डोंबिवलीच्या मतदारांनी शिवसेना-भाजप युतीच्याच पारड्यात टाकली असती. म्हणजे ठाणे व कल्याण हमखास आणि मिळाली असती तर भिवंडी अशा तीनही जागा युतीला मिळू शकल्या असत्या. पण तेथेही उद्धव यांचा निर्णय चुकला.
ठाणे, मुंबई, कल्याण, नाशिक आदी सर्वच ठिकाणी मनसेच्या उमेदवारांनी लाखाच्या वर मते घेतली आहेत. मनसेला गृहीत न धरणाऱया आणि बालेकिल्ल्याला मनसेमुळे काहीच धोका नाही, अशा भ्रमात राहिलेल्या उद्धव यांनी किमान आता तरी डोळे उघडून जमिनीवर यावे. भारतीय जनता पक्षाने याची गंभीरपणे दखल घेऊन दोन्ही भावांमध्ये पॅचअप करण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. स्वताचा इगो सोडून उद्धव यांनी वास्तवाचे भान राखून योग्य तो निर्णय़ घ्यावा. कोणी काही म्हटले तरी राज ठाकरे यांनी स्वताच्या ताकदीवर आपला जोर दाखवून दिला आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आणि इतके होऊनही उद्धव तसे करणार असतील तर तो स्वताच्या आणि शिवसेनेच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखेच ठरेल. तेव्हा अजून वेळ गेलेली नाही. विधानसभेच्या निवडणुकांना अद्याप चार ते पाच महिने बाकी आहेत. उद्धव यांनी राज ठाकरे यांच्याशी जमवून घ्यावे, लोकसभेच्या निकालांनी तेच दाखवून दिले आहे. तसे केले नाही तर विधानसभा निवडणुकीच्या वेळीही मराठी मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादीलाच होऊ शकेल आणि लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना जी लाखो मते मिळाली त्यावरून विधानसभा निवडणुकीत मनसेचे किमान २० ते २५ आमदार नक्कीच निवडून येतील, याची सर्वसामान्य मतदारांनाही आता खात्री झाली आहे. त्यावेळीही कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही तर राज ठाकरे यांच्या आमदारांचा पाठिंबा सत्ता स्थापनेसाठी निर्णायक ठरू शकतो. तेव्हा कॉंग्रेसला राज्यातून पुन्हा एकदा हद्दपार करायचे असेल तर शिवसेना-भाजप आणि मनसे यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. तसे झाले तरच मतविभागणी न होता कॉंग्रे-राष्ट्रवादीचा पाडाव करता येईल. तेव्हा या सगळ्याचा उद्धव यांनी विचार करावा आणि आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी अन्यथा बाळासाहेब ठाकरे यांनी मेहनत घेऊन सत्तेची फळे चाखण्यापर्यंत उभी केलेली शिवसेना पार भुईसपाट होईल आणि ती वेळ फार दूर नाही...

शनिवार, १६ मे, २००९

अनपेक्षित आणि धक्कादायक

अखेर आज १६ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर झाला. देशभरात, महाराष्ट्रात आणि विशेषत मुंबईत अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल लागले. देशात कॉंग्रेस किंवा भाजप यांना स्पष्ट बहुमत न मिळता त्रिशंकू लोकसभा अस्तीत्वात येईल आणि सरकार स्थापन करण्यासाठी घोडेबाजार व सौदेबाजीला मोठ्या प्रमाणात ऊत येईल, पंतप्रधान कोण या प्रश्नावरून काही दिवस घोळ चालेल, असे वाटत होते. मात्र सर्व प्रसारमाध्यमे, एक्झीट पोल, राजकीय विश्लेषक, पत्रकार, ज्योतिषी आदींचे अंदाज चुकवत सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेस-आयला सर्वाधिक जागा मिळाल्या. देशात जवळपास १८ वर्षांनंतर पहिल्यांदा २०० पेक्षा जास्त जागा एखाद्या पक्षाला मिळाल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे. २७३ चा आकडा गाठण्यासाठी कॉंग्रेसला फार कसरत करावी लागणार नाही. या निमित्ताने एक बरे झाले. ते म्हणजे पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या लालू,मायावती आणि शरद पवार या सारख्यांचे नाक कापले गेले. आता हे सरकार पाच वर्षे टिकले तर या नेत्यांना मनातच मांडे खावे लागतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही भ्रमाचा भोपळा फुटला असून महाराष्ट्रात त्यांना चांगलाच फटका बसला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी मात्र मुंबई, ठाणे, नाशिक येथे जोरदार मुसंडी मारत लाख ते सव्वालाख मते घेतली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजपला याचा गंभीरपणे विचार करावाच लागेल.
लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचे राज ठाकरे हेच सर्वेसर्वा होते. त्यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आदी ठिकाणी जोरदार प्रचार केला. महाराष्ट्रात त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर जे काही केले त्याची परिणीती मतदानात दिसून आली. म्हणजे मनसे आणि शिवसेना-भाजप यांच्या उमेदवारांची एकत्र बेरीज केली तर ती कॉंग्रेस उमेदवारापेक्षा कितीतरी जास्त होते. याचाच सरळ अर्थ असा की मनसेने शिवसेना व भाजपची परंपरागत मते घेतली. ही मते लाख ते सव्वालाख असल्यामुळे त्याचा फायदा कॉंग्रेसच्या उमेदवारांना झाला. निकालपूर्वी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि सेनेचे नेते मनसेची भिती आम्हाला वाटत नाही, मराठी मते मनसेकडे जाणार नाहीत, मनसेची नुसती हवा आहे, प्रत्यक्ष मतदानात त्याचा काहीही परिणाम दिसणार नाही, अशा वल्गना करत होते. मात्र आज निकालानंतर खऱे काय ते दिसून आले. मात्र इतके असूनही उध्दव ठाकरे हे पत्रकार परिषदेत मराठी मतांची विभागणी मनसेमुळे झालीच नाही, असे सांगत होते. भाजपचे नेते विनोद तावडे यांनीही त्यांचीच री ओढली. अरे जे आहे, ते किमान खुलेपणानी आणि खिलाडूवृत्तीने स्वीकाराना, पण नाही. खरे तर मनसेमुळे जी काही मतांची विभागणी झाली, त्याचा गंभीरपणे विचार कऱण्याची आवश्यकता आहे आणि आगामी निवडणुकीच्या वेळी आम्ही त्यावर गंभीरपणे विचार करू, असे वक्तव्य त्यांनी करायला हवे होते. उध्दव ठाकरे यांना वारसा हक्काने कायर्कारी अध्यक्षपद मिळाले असून एक तयार व परिपक्व पक्ष त्यांना मिळाला आहे. राज ठाकरे यांनी अबकडपासून सुरुवात केली असून पहिल्याच प्रयत्नात त्यांना व त्यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी समोरचा उमेदवार पाडण्याइतकी मते त्यांनी मिळवली आहेत, ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीतही त्यांनी आपली चुणूक दाखवून दिली होती.
शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा तिला वसंतसेना म्हणूनही हिणवले जात असे. तेव्हाचे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे आशिर्वाद शिवसेनेला होते, असे म्हटले जायचे. त्यात काही अंशी तथ्यही आहे. आता मनसेच्या बाबतीतही तोच आक्षेप घेण्यात येत आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे की शिवसेना, भाजप आणि मनसेच्या भांडणात खासदारकीची बक्षीसी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीतही असेच झाले तर महाराष्ट्रात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचेच सरकार येऊ शकते. आणि त्यासाठी मनसेचा अप्रत्यक्ष हातभार लागू शकतो. मनसेची वैचारिक भूमिका ही काही कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी जुळणारी नाही. ते शिवसेना-भाजपलाच जवळचे आहेत. लोकसभा निवडणुकीला जे झाले ते झाले. राज ठाकरे आणि मनसेची दखल शिवसेना-भाजपला घ्यावीच लागेल. कल्याणमध्ये आनंद परांजपे यांचा अपवाद वगळता मुंबई, ठाणे, नाशिक आदी सर्व ठिकाणी मनसेच्या उमेदवरांनी घेतलले्या मतांमुळे शिवसेना-भाजपचे उमेदवार पडलेले आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार करून आणि दोन्ही कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-भाजप युती व मनसे यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही गोष्ट एकाएकी घडून येणार नाही. मत्र आपला खरा शत्रू कोण याचा शिवसेना, भाजप व मनसेने प्रामाणिकपणे विचार करायला पाहिजे. विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागा आहेत. समजा शिवसेना-भाजप आणि मनसे एकत्र आले आणि त्यांनी सगळ्या नाही परंतू काही जागा एकत्र लढवल्या तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठी मतांची जशी विभागणी झाली तशी त्यावेळी होणार नाही. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांनी त्यासाठी आत्तापासूनच पावले टाकायला पाहिजेत. मनसेची ताकद मान्य करून शिवसेना व भाजपने एक पाऊल मागे घ्यायला पाहिजे. नाहीतर विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात पुन्हा लोकसभा निवडणुकीसारखेच निकाल लागतील आणि कॉंग्रेसला जे हवे आहे, तेच होईल. तेव्हा सावधान...

शुक्रवार, १५ मे, २००९

ऐसा प्रयोग व्हावा, ही तर लोकशाहीची गरज

लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार असून सायंकाळपर्यंत देशभरातील सर्व निकाल हाती येतील. गेल्या काही लोकसभा निवडणुकींचा अनुभव पाहता पुन्हा एकदा त्रिशंकू लोकसभा अस्तीत्वात येईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे केंद्रात सत्तास्थापनेसाठी घोडेबाजाराला ऊत येईल. छोटे प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे नेते यांची कॉंग्रेस किंवा भाजप यांच्याबरोबर सौदेबाजी सुरु होईल. आणि हे टाळायचे असेल तर त्यावर देशात सत्तास्थापनेसाठी एक नवा प्रयोग होणे अत्यंत आवश्यक आहे. हा नवा प्रयोग म्हणजे कॉंग्रेस व भाजपने आपापले राजकीय आणि वैचारिक मतभेद विसरुन देशहितासाठी एकत्र येणे. भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा तसेच अन्य काही मंडळींनीही ही कल्पना मांडली आहे. भाजपच्या थींक टॅंकमधील एक असामी सुधींद्र कुलकर्णी यांनीही भाजपला कॉंग्रेस अस्पृश्य नाही, असे विधान केले होते. त्यामुळे एक प्रयोग म्हणून जर असे झाले तर देशात एक नवा इतिहास निर्माण होईल, हे नक्की. असा नवा प्रयोग ही लोकशाहीची गरज असू शकते.
खरे तर देशातील जनतेने कॉंग्रेस किंवा भाजप यापैकी कोणत्याही एका पक्षाला निर्विवाद बहुमत मिळवून दिले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रादेशिक पक्ष किंवा त्यांचे कुवत नसलेले अनेक नेते सत्ता स्थापनेसाठी जी काही सौदेबाजी करतात किंवा आपलाच पक्ष सत्तेवर यावा म्हणून सर्वात जास्त जागा मिळालेल्या पक्षाला जे काही करावे लागते, छोट्या पक्षांच्या नेत्यांच्या वेळोवेळी नाकदुऱया काढाव्या लागतात, ते प्रकार करावे लागणार नाहीत. निवडणुकीनंतर कॉंग्रेस व भाजप एकत्र आले तर २७३ पेक्षा त्यांचा आकडा नक्कीच जास्त होईल. ते आगामी पाच वर्षांसाठी भक्कम व स्थीर सरकार देऊ शकतील. अर्थात त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपली मानसिक तयारी करणे गरजेचे आहे. देशहितासाठी तरी त्यांनी एकत्र यायला काही हरकत नाही. यामध्ये कोणी आपल्या राजकीय आणि वैचारिक भूमिकेपासून दूर जात आहे, मतदार काय म्हणतील, त्यांना हे पटेल का, अशा शंका मनात आणू नयेत. कारण याआधीही आपल्या राजकीय विचारसरणीशी फारकत घेत राजकीय नेते व पक्ष यांनी काय दिवे लावले आहेत, ते सुज्ञ मतदारांना माहिती आहे. कोणताही वकुब नसलेले, फक्त स्वार्थासाठी कधी इकडे तर कधी तिकडे करणारे, लायकी नसताना खूप काही मिळणाऱया राजकारणी मंडळींचे त्यामुळे चांगलेच नाक कापले जाईल. पंतप्रधानपद मिळावे म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या आणि स्वताच्या पक्षाला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱयांचे दात त्यांच्याच घशात घातले जातील. एकवेळ अंगाला राख फासून हिमालयात जाईन, पण पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, अशा वल्गना करणारे आणि राजीव गांधी यांच्या पायांवर लोटांगण घालत पुन्हा कॉग्रेसमध्ये प्रवेश करणारे, सोनिया गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी अगोदर राजी असलेले आणि नंतर परदेशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी नको, म्हणून कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱया शरदाच्या चांदण्याचा बुरखा टराटरा फाडण्याची हीच योग्य वेळ आहे.
समजा कॉंग्रेस व भाजप एकत्र आले आणि केंद्रात सरकार स्थापन केले तर काही आकाश कोसळणार नाही. संपूर्ण आयुष्य समाजवादी म्हणून घालवलेले जॉर्ज फर्नांडिस रालोआचे समर्थक व निमंत्रक होऊ शकतात, आणिबाणीच्या काळानंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष एकत्र येऊन अल्पकाळ का होईना राज्य करु शकतात, रालोआ किंवा संयुक्त पुरोगामी आघाडीत जर वेगवगेळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात, तर मग भाजप व कॉंग्रेस हे दोनच प्रमुख राजकीय पक्ष का नाही एकत्र येऊ शकत. एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यापूर्वी जे वादग्रस्त विषय असतील, त्यांना टाळून देशहित व राष्ट्रीय प्रश्नांवर किंवा काही समान मुद्दयांवर एकत्र येऊन सरकार स्थापन करायला काहीच हरकत नाही. हवे तर जो पक्ष सरकार बनवेल, त्यात सहभागी न होता, पूर्ण पाच वर्षे बाहेरून पाठिंबा द्यायचा. किंवा अडीच-अडीच वर्षांसाठी सत्ता वाटून घ्यायची. ज्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असतील, त्या पक्षाने केंद्रात सरकार स्थापन करायचे. म्हणजे यातून कदाचित देशात एक नवा पायंडा रुढ होऊ शकेल. पाचपन्नास राजकीय व प्रादेशिक पक्ष असण्यापेक्षा यापुढे देशात दोनच प्रमुख राजकीय पक्ष असावेत, हे दोनच राजकीय पक्ष पुढील पाच वर्षे उत्तम प्रकारे सरकार चालवू शकतात, राजकीय सौदेबाजी आणि घोडेबाजाराला त्यामुळे आळा बसलेला आहे, असे नवे संकेत त्यातून मतदारांपुढे जातील. कदाचित पाच वर्षे कॉंग्रेस व भाजपचे सरकार चालले तर पुढील लोकसभा निवडणुकीत भारतातील सुजाण मतदार या दोन प्रमुख पक्षांपैकी एका पक्षालाच स्पष्ट बहुमत मिळवून देईल. त्यामुळे भरमसाठ राजकीय पक्ष, त्यांचे नेते यंच्या अवास्तव मागण्यांना आळा बसू शकेल.
अर्थात हे होणार नाही, कदाचित त्यासाठी आणखी काही वर्षे जावी लागतील. पण उद्या जाहीर होणाऱया लोकसभा निवडणुक निकालांनतर तर कॉंग्रेस-भाजप एकत्र आले तर देशाच्या लोकशाहीमध्ये एक नवा अध्याय सुरु होईल. या नव्या प्रयोगामुळे कदाचित देशाच्या राजकारणालाही एक नवी दिशा मिळण्यास मदत होईल...

गुरुवार, १४ मे, २००९

योग्य वेळ कधी येणार

कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी निवडणुक प्रचारादरम्यान संसदेवर हल्ला करणाऱया अफजल गुरुबाबत पहिल्यांदा जाहीर विधान केले. इतके दिवस या प्रश्नावर मूग गिळून बसलेल्या कॉंग्रेसने राहुल गांधीच्या मुखातून आपले विचार व्यक्त केले. अफजल गुरु याला योग्य वेळ येताच फाशी दिले जाईल, फाशीची शिक्षा सुनावलेले जे कैदी आहेत, त्यात अफजल गुरुचा २२ वा क्रमांक आहे. अरे वा रे वा, ज्या माणसाने देशाची सार्वभौम असलेल्या संसदेवर हल्ला चढवला, त्याच्यावरील सर्व आरोप निश्चित होऊन सर्वोच्च न्यायालयानेही त्याची फाशी कायम केली, त्या माणसाच्या बाबतीत तु्म्हाला इतका पुळका का, आत्ताच तुम्हाला त्याचा क्रमांक आणि योग्य वेळ याची का आठवण व्हावी, खरे तर आजवर कॉग्रेस मतांच्या राजकारणासाठी कायमच मुस्लिमांचे लांगूनचालन करत आली आहे. या देशात बहुसंख्य हिंदू राहतात, त्यांचाही काही मान-अपमान आहे, हेच ते विसरले आहेत किंवा मुद्दामहून विसरु पाहात आहेत. नियम, कायदा याचा कॉंग्रेसला कसा काय पुळका आला, याचेच आश्चर्य वाटते. नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या पार पडल्या. आजवर मुसमानांचे लांगूचालन करणाऱया कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीपूर्वी अफजलला फाशी दिले असते आणि या प्रश्नाचा इश्यू केला असता तर कदाचित त्यांच्या पक्षाला याचा फायदाच झाला असता. परंतू तसे झाले असते तर कॉंग्रेसची परंपरा मोडली गेली असती ना
राहुल गांधी मारे कायदा आणि नियमाच्या गोष्टी करतत आहेत. अफजलचा क्रमांक २२ वा आहे, त्याचा नंबर आल्यावर म्हणजे योग्य वेळ आल्यावर त्याला फाशी देऊ, असे सांगत आहेत, त्याला काहीतरी अर्थ आहे का, हे कोणी बोलावे, अरे तुमच्या वडीलांनी राजीव गांधी यांनी शहाबानो प्रकरणी मुस्लिमांची मते गमवावी लागू नयेत म्हणून, त्यांच्या लांगुनचालनासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल फिरवला, हे तरी लक्षात आहे ना, मग तेथे का नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर केला गेला, तेव्हा तुमचा कायदा, प्रथा आणि परंपरा कुठे गेली होती,
राहुल हा सुशिक्षित आहे. आपण राजीव गांधी यांचे पुत्र आहोत, कॉंग्रेस ही आपली वंशपरंपरा आहे, असे समजत असतील, तर डोळ्यांना लावलेली झापडे काढून जरा खरा इतिहास वाचा, तो जाणून घ्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेसने देशाचे राजकीयदृष्ट्या कसे नुकसान केले, त्यावर विचार करा. काश्मीर प्रश्न, चीन व पाकिस्तानचे आक्रमण, देशातील अल्पसंख्यांकांचे त्यातही मुसलमानांचे लांगुनचालन, वाढता दहशतवाद आणि असे अनेक प्रश्न गेल्या साठ वर्षात निर्माण झाले आहेत.
संसदेवर झालेला हल्ला हा देशाच्या मानबिंदूवर झालेला हल्ला समजून त्यावेळी केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि रालोआच्या शासनाने पाकिस्तानला कठोर धडा शिकवण्याची गरज होती. परंतु सत्तेवर आल्यानंतर राममंदिराला विसरणाऱया अतिरेक्यांना भारताच्या संरक्षणमंत्र्याची सोबत घेऊन विमानातून सुखरुप पाठवणाऱया भाजपकडून वेगळी अपेक्षा काय करणार, भाजप म्हणजे दुसरी कॉंग्रेस झाली आहे. खऱे तर त्याच वेळी भले या प्रश्नावरून केंद्र सरकार कोसळले, अन्य राजकीय पक्षांनी पाठिंबा काढून घेतला तरी हरकत नाही पण आम्ही पाकिस्तानला धडकी भरेल, अशी कठोर कारवाई करूनच दाखवू, अशी ठाम भूमिका घ्यायला हवी होती. भारतातील काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ला करून ते उध्वस्त करायला हवे होते. आणि तसे केले असते तरी आंतरराष्ट्रीय व भारतातील जनमतही भाजपला मिळाले असते. समजा या प्रश्नावरून भाजप सरकार कोसळले असते आणि नव्याने निवडणुका घ्याव्या लागल्या असत्या तर भाजपला त्याचा फायदाच झाला असता. पण भाजपनेही शेपुट घातली.
राहल गांधी यांनी मारे अफजल गुरुचा नंबर आला की त्याला फाशी देऊ असे सांगितले. केंद्रात शासन तुमचे आहे. ज्या माणसाने देशाच्या संसदेवर हल्ला केला त्याला फाशी देण्यासाठी नंबर यायची वाट कसली पाहता, अपवाद म्हणून त्याला अगोदर फाशी देता येणार नाही का,समजा या जागी तुमच्या आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी यांचे मारेकरी असते, त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली असती, शिक्षा सुनावुनही त्याची अंमलबजावणी झाली नसती त्यावेळीही तुम्ही, त्यांचे नंबर आले की त्यांना फाशी देऊ, असे विधान केले असते का की तेव्हा त्यांना वेगळा न्याय लावला असता...

बुधवार, १३ मे, २००९

हिंदूनो, वाचा आणि विचार करा

इंटरनेट म्हणजे खरोखऱच माहितीचे प्रचंड मोठे मायाजाल आहे. यात भ्रमंती करत असताना विविध प्रकारची नवीन माहिती, तर कधी आपल्या समान विचारांचे, आवडीचे मित्रही मिळू शकतात. त्या दिवशी सहजच ऑर्कूटवर (नेमके कुठे ते आठवत नाही) बहुधा चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण किंवा चित्पावन युवा संघ या कम्युनिटीवर अभिजीत बापट या युवकाचे प्रोफाईल वाचले. तो संभाजीराव भिडे यांनी स्थापन केलेल्या श्री शिवप्रतिष्ठानचा सदस्य आहे. ऑर्कूटवर या कम्युनिटीचा ओनर अशी त्याची ओळख आहे. महाराष्ट्रातील समग्र गड, किल्ले आणि दुर्गांची माहिती त्याने उत्तमरित्या संकलित केली आहे. श्री शिवप्रतिष्ठान या कम्युनिटीवर त्याने या प्रश्नांची उत्तरे कधी शोधली का या शीर्षकाखाली काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विविध पुस्तके आणि अन्य माहितीचा संदर्भ घेऊन त्याने संकलित केलेले हे प्रश्न मला पटले. समस्त हिंदूनी त्यावर गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून अभिजीतच्याच परवानगीने हे प्रश्न मी आज माझ्या ब्लॉगवर देत आहे. आपणही त्यावर विचार करा, नुसता विचार करून थांबू नका तर आपल्यातही धर्माभिमान व राष्ट्राभिमान जागवा...
हेच ते प्रश्न...
जगांत एकुण ५२ मुस्लिम देश आहेत. एक तरी मुस्लिम देश 'हज' यात्रेसाठी आपल्या नागरिकांना आर्थिक मदत देतो का ?
मुस्लिमांना भारतांत जे विशेष हक्क दिले गेले आहेत तशा प्रकारचे हक्क कोणत्या एका तरी मुस्लिम देशांत हिंदूंना दिले आहेत का ? भारतांत हिंदू, मुस्लिम वगैरे सर्वधर्मीयांसाठी समान नागरी कायदा (सिव्हील कोड ) कां नाही ?
एकातरी मुस्लिम देशात बिगर मुस्लिम राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान आहे काय ? जगातील एकातरी देशात ८२ टक्के बहुसंख्य धार्मिक समाज, १८ टक्के अल्पसंख्यांक धार्मिक समाजाचे लांगुलचालन व अतिरिक्त लाड करतो काय ? हिंदू बहुसंख्य असलेल्या महाराष्ट्र, बिहार, केरळ, पाँडेचेरी इत्यादीं राज्यात यापूर्वी मुस्लिम मुख्यमंत्री झाले आहेत. मुस्लिम बहुसंख्य जम्मू-काश्मीर वा ख्रिश्चन प्रभाव असलेल्या नागालैंड, मिझोराममधे हिंदू मुख्यमंत्री होण्याची कल्पना तुम्ही करू शकता काय ? हिंदू ८५ टक्के आहेत. हिंदू असहिष्णू असते तर मशिदी व मदरसे फोफावाले असते काय ? मुस्लिम रस्त्यावर नमाज पढू शकले असते काय ? दिवसातून ५ वेळा ध्वनीवर्धकातून 'अल्लाशिवाय दूसरा परमेश्वर नाही' अशी घोषणा देऊ शकले असते काय ?
मुळ भारतातील ३० टक्के प्रदेश मुस्लिमांना पाकिस्तान निर्माण करण्यासाठी दिल्यानंतर हिंदूंना पवित्र असलेल्या अयोध्या, मथुरा व काशीसाठी भीक का मागावी लागते ? भारताचा अविभाज्य भाग असण्याच्या बाबतीत देशातील अन्य राज्यांपेक्षा जम्मू-काश्मीर वेगळा कसा ? गांधीजींनी मंत्रीमंडळाच्या निर्णयाला हरकत घेऊन, सरकारी निधी न वापरता सोमनाथ मंदीर पुनरुद्धारासाठी जनतेचा पैसा वापरावा असा आग्रह का धरला ? व जानेवारी १९४८ मध्ये दिल्लीतील मशिदींच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारी खजिन्यातील पैसाच वापरावा असे दडपण नेहरू व पटेल यांच्यावर का आणले ? जसे मुस्लिम व ख्रिश्चन महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार वगैरे ठिकाणी अल्पसंख्य आहेत तसे जम्मू-काश्मीर, मिझोराम नागालैंड, मेघालय येथे हिंदू अल्पसंख्य का नाहीत ? तेथे हिंदूंना अल्पसंख्य अधिकार का नाकारण्यात आले? आपणाला असे वाटते का, की हिंदूंच्या काही समस्या आहेत ? किंवा स्वतःला हिंदू म्हणणे हीच एक समस्या आहे ? गोधरा प्रतिक्रिया अतिरंजीत करण्यात आली, तर काश्मीरमधून ४ लाख हिंदूंचा सफाया केला गेला याबाबत कोणी का बोलत नाही ? १९४७ मधे पाकिस्तान निर्माण केले तेव्हा पाकिस्तानमधे हिंदू २४ टक्के होते. आज एक टक्काही नाहीत. पूर्व पाकिस्तानात १९४७ साली हिंदू ३० टक्के होते, आज बांगलादेशात ७ टक्के हिंदू आहेत. नाहीशा झालेल्या हिंदूंचे काय झाले ? त्यांना व एकंदरीत हिंदूंना मानवाधिकार आहेत का ? अब्दूल रहमान अंतुले यांना प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदीराचे विश्वस्त केले होते, एखादा हिंदू अगदी मुलायमसिंग यादव वा लालूप्रसाद यादव मशिदीचे किंवा मदरशाचे विश्वस्त कधीतरी होऊ शकतील का ? केंद्र सरकार हाज यात्रेसाठी मुस्लिमांना आर्थिक मदत करते. पण हिंदू यात्रेकरूंना कैलास-मानस सरोवर, तिबेट व पशुपतिनाथ-नेपाळ या परदेशातील यात्रांसाठी कोणतीही मदत न करता उलट त्यांच्यावर कर लादणे, त्यांची गैरसोय करणे इ. प्रकार करते हाच भारताचा सर्वधर्म समभाव आहे काय ? केरळ विधानसभेमध्ये काही सदस्य,तसेच तेशील काही खासदार अल्लाह आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने शपथ घेतात. हे कसे चालते, भारतीय नागरीक जम्मू-काश्मीरमध्ये कायमचे राहू शकत नाहीत असा दुजाभाव का ? चित्र काढणे हे इस्लामला मंजूर नसेल तर एम्. एफ. हुसेन विरुद्ध फतवा का नाही ? तरीपण ते चित्र काढतात, हिंदू देवदेवतांची नग्न चित्र रंगवतात म्हणुन तर हे इस्लामविरोधी मानले जात नाही? जर गाणे बजावणे, नाचणे इस्लामला संमत नसेल (कारण इस्लाम गंभीर विचारांचा धर्म मानला जातो ना !!!!!!!) भारतात मुस्लिम बहुसंख्य झाले तर भारत सर्वधर्मसमानतावादी व लोकशाहीवादी राहील का ? जर दीपावली व कृष्णजन्माष्टमी 'व्हाईट हाऊस' , 'हाऊस ऑफ़ कॉमन्स' व ओस्ट्रेलिया च्या पार्लमेंटमधे' साजरी केली जाते तर भारतीय संसदेत का साजरी केली जात नाही ? आपण अमेरिका इंग्लंड,ओस्ट्रेलियापेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष आहोत का ? जातीय दंगे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व शिवसेनेमुळे होत असतील तर बांगलादेश, पाकिस्तान, सौदी अरेबिया, इराक़, तुर्कस्तान, अफगानिस्तान, इंडोनेशिया, चेचन्या, चीन, रशिया, फ्रांस, स्पेन, सायप्रस वगैरे मधे तर या संघटना काम करत नाही मग तेथे जातीय दंगे, बॉंम्ब स्फोट का होत आहेत ? अणि ते कोण करत आहेत ? इस्लाम हा जर शांतताप्रिय धर्म असेल तर सगळे अतिरेकी मुस्लिम कसे ? " ईश्वर - अल्ला तेरे नाम " हे वचन एक तरी मुस्लिम मानतो का ? आपणास असे वाटते का, की 'सेक्युलर मुस्लिम' हा शब्द प्रयोग चुकीचा आहे ? व्यक्ती एकतर सेक्युलर किंवा मुस्लिम असू शकते, दोन्ही नाही. मुस्लिम जे फ़क्त त्यांच्या अल्ला या एकाच देवाला मानतात, ते सेक्युलर असू शकतात का ? [ कारण सेक्युलर म्हणजे जे सर्व धर्मातल्या देवाला मानतात ते संयुक्त राष्ट्र संघाच्या मते १० टक्के लोकसंख्या असणाय्रांनाच "अल्पसंख्यांक" म्हणता येईल. तर मग भारतात असणाय्रा १४ ते १८ टक्के मुस्लिमांना अल्पसंख्यांक का म्हटले जाते? (सविस्तर प्रश्न श्री शिवप्रतिष्ठान या कम्युनिटीच्या फोरमवर वाचा)
सध्या देशात जे काही चालले आहे, ते जर डोळे उघडे ठेवून पाहिले तर असे प्रश्न नक्कीच पडतील. अर्थात त्यासाठी डोळ्यांना लावलेली तथाकथीत धर्मनिरपेक्षतेची, पुरोगामीत्वाची झापडे फेकून द्यावी लागतील. शाहबानो प्रकरणी केंद्र शासनाने (तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी) यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, हे लांगुनचालन कोणासाठी व कशासाठी, मुस्लिमांच्या भावना दुखावतात म्हणून शाळांमधून वंदेमातरम वर बंदी, महंमद पैगंबराचे मक्केहून पलायन किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, या वाक्यानी मुस्लिमांच्या भावना दुखावतात म्हणून ती वाक्ये गाळणे, धडे वगळणे, याला काय म्हणायचे
(अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ऑर्कूटवरील श्री शिवप्रतिष्ठान या कम्युनिटीला जरुर भेट द्यावी. संभाजीराव भिडे हे याचे संस्थापक आहेत.)
हे सर्व प्रश्न सुशिक्षित आणि स्वतला सुबुद्ध व बुद्धीवादी म्हणवून घेणाऱयांसाठी नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. तथाकथीत पुरोगामी, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱया लोकांकडे या प्रश्नांची उत्तरे आहेत का, की बहुसंख्य हिंदूंच्या विरोधात बोलणे आणि अल्पसंख्यांकांचे विशेषत मुसलमानांचे लांगुनचालन करणे म्हणजेच पुरोगामीत्व का, म्हणजेच सर्वधर्मसमभाव का, की यालाच धर्मनिरपेक्षता म्हणतात.
प्रत्येकाने आपल्या मनाला हे प्रश्न विचारावेत आणि त्याचे प्रामाणिकपणे मनाशीच उत्तर द्यावे.

मंगळवार, १२ मे, २००९

प्रवासातील औषधे

शाळा-महाविद्यालयांच्या उन्हाळी सुट्ट्या संपायला अद्याप एक महिना बाकी आहे. या सुट्ट्यांमुळे अनेक मंडळी बाहेरगावी फिरायला किंवा काही जण आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. सध्या उन्हाळाही खूप कडक असून प्रवासात प्रत्येकालाच आपल्या प्रकृतीबाबतच्या तक्रारी उद्भवू शकतात. अशा काही किरकोळ तक्रारींमुळे आपल्या प्रवासाच्या आनंदावर विरजण पडू शकते. मात्र थोडीशी काळजी घेतली आणि काही उपयुक्त औषधे जवळ बाळगली तर हा त्रास लवकर आटोक्यात येऊ शकतो.
प्रवासात असताना बदललेली हवा, पाणी, अन्न यामुळे होणाऱया त्रासावर ही औषधे उपयुक्त आहेत. या संदर्भात माझ्या वाचनात आलेल्या एका पुस्तकातील ही माहिती आज आपल्याला देत आहे. भा. का. गर्दे यांनी संकलित केलेल्या धन्वंतरी तुमच्या घरी या पुस्तकातील ही माहिती सर्वानाच उपयुक्त आहे. हे पुस्तक शुभदा-सारस्वत प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तकात आयुर्वेद, होमिओपॅथी, घरगुती व बाराक्षार या वैद्यकीय चिकित्सा पद्धतीतील विविध आजारांवरील औषधांची माहिती देण्यात आली आहे. अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावे असे वाटते.
या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार प्रवासात कधी ना कधी अपचनाचा त्रास होऊ शकतो. अन्नात झालेला बदल, अनियमित व अवेळी खाणे, मर्यादेपेक्षा अधिक जेवणे यामुळे अजीर्ण, अपचन, पोटदुखी याचा त्रास होतो. त्यावर भास्करलवचूर्ण अर्धा चमचा कोमट पाण्यातून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे किंवा शंखवटीच्या दोन-दोन गोळ्या पाण्याबरोबर घ्याव्यात. पाणी बदलल्याने होमिओ पोडोफायलम् २०० व मर्ककोर २०० यांच्या प्रत्येकी तीन गोळ्या दर तासाला घ्याव्यात. पोटदुखीवर मॅग्नेशिया फॉस २०० या गोळ्या दर दीड तासाने एका वेळी चार या प्रमाणात घ्याव्यात.
उन्हात फिरल्याने ताप आला तर त्रिशूनच्या दोन-दोन गोळ्या गरम पाण्यातून दोन ते तीन वेळा घ्याव्यात. बाराक्षार औषधांचे मिश्रण क्रमांक ११ च्या चार-चार गोळ्या कोमट पाण्यातून तीन ते चार वेळा घ्याव्यात.कफ, सर्दी, खोकला यामुळे डोके दुखत असेल तर त्रिभूवन कीर्तीच्या गोळ्या दोन-दोन गोळ्या कोमट पाण्यातून दिवसातून तीन वेळा घ्याव्यात. सर्दी व खोकला नसून डोके गरम झाले , अंगाची आग होत असेल तर सूतशेखरच्या दोन-दोन गोळ्या तीन तासांच्या अंतराने दुधातून घ्यव्यात. वातज डोकेदुखीमध्ये डोक्यातून कळा येत असतील तर लक्ष्मीविलास रस (नारदीय) वैद्यनाथ १-१ गोळी दूध किंवा पाण्यातून तीन ते चार वेळा घ्यावी.
भर दुपारी उन्हात फिरल्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता असते. कपाळ दुखून ताप भरतो. चेहरा लाल होतो. श्वास घेणे कठीण वाटू लागते. अशा वेळी बाराक्षारच्या नेट्रममूर ३० व काली फॉस ६x च्या शक्तीच्या प्रत्येकी २-२ गोळ्या एकेक तासाने लक्षणे कमी होईपर्यंत घ्याव्यात.
मुका मार लागला तर अर्निका या होमिओपॅथीच्या २०० शक्तीच्या २-२ गोळ्या सकाळी व संध्याकाळी घ्याव्यात. मार लागलेल्या किंवा मुरगळलेल्या ठिकाणी अर्निका मलम चोळून लावावे. जुलाबासाठी संजीवनी गुटी दोन-दोन गोळ्या दिवसातून तीन ेवळा गरम पाण्यातून घ्याव्यात. इलेक्ट्रॉलचे पाणी लगेच घ्यावे.
गुडघे दुखणे, सांधे दुखणे व कंबर ताठणे यासाठी आर कंपाऊंड (अलार्सिन) या कंपनीच्या दोन-दोन गोळ्या गरम पाणी किंवा दुधातून दिवसातून तीन वेळा घ्याव्यात. होमिओपॅथीच्या ह्रसटॉक्स या औषधाच्या २०० शक्तीच्या दोन-दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा घ्याव्यात. पावसात भिजल्याने सर्दी किंवा असह्य डोकेदुखी झाली तर हेपार सल्फ (होमिओपॅथी) १००० व बेलाडोना २०० प्रत्येकी चार-चार गोळ्या चार वेळा घ्याव्यात.
या सर्व औषधांचे प्रमाण मोठी माणसे गृहीत धरून दिलेले आहे. लहान मुलांना कमी मात्रेत द्यायला हरकत नाही. या पैकी कोणत्याही औषधांपासून अपाय होणार नाही. असेही या पुस्तकात सांगण्यात आले आहे. पुस्तकातील ही माहिती सर्वांसाठी नक्कीच उपयुक्त आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती पोहोचावी, याच उद्देशाने ती येथे दिली आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी हे पुस्तक विकत घेऊन आपल्या संग्रही ठेवावे. कोणत्याही मोठ्या पुस्तकांच्या दुकानात किंवा पुस्तक प्रदर्शनातून हे पुस्तक मिळू शकते.
ही सर्व घरगुती आणि अपाय न होणारी औषधे असली तरी कोणाला काही शंका असल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.

सोमवार, ११ मे, २००९

शतकातील सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण

सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाबद्दल सध्याच्या काळात समाजात बऱयापैकी जागरुकता निर्माण झाली आहे. विविध वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या आदी प्रसारमाध्यमातून त्याविषयी वेळोवेळी माहिती मिळत असल्याने आबालवृद्धांच्या मनात आता ग्रहण तसेच अन्य खगोलशास्त्रीय घटनांबद्दल उत्सुकता निर्माण झालेली असते. मराठी विज्ञान परिषद आणि अन्य संस्था, संघटना ग्रहण किंवा अशा विशेष खगोलशास्त्रीय घटनांसाठी सहली काढणे, काही मंडळींना एकत्र आणून त्याची शास्त्रीय माहिती देणे अशी कामे करत आहेत. त्यामुळे आता ग्रहण म्हणजे आपत्ती न मानता एक पर्वणी मानण्यात येते. खगोलअभ्यासक, खगोलशास्त्रज्ञ आणि हौशी मंडळी या निमित्ताने ग्रहणाचा आनंद घेत असतात. अर्थात असे असले तरी ज्योतिष्यांच्या मते होणारी ही ग्रहणे किंवा खगोलशास्त्रीय घटना या मानवी जीवन व विविध राशींवर परिणाम करणाऱया असतात. त्याचे बरे-वाईट परिणाम माणसांच्या आयुष्यावर होत असतात. अर्थात यावर कोणी व किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असो.
आज हे सांगायचे कारण म्हणजे सकाळ-मुंबईच्या टुडे पुरवणीत वाचनात आलेली बातमी. सकाळच्या टुडे पुरवणीत (११ मे २००९) शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण येत्या २२ जुलैला अशी एक बातमी आली आहे. खगोलशास्त्राचे अभ्यासक मोहन आपटे यांचा हवाला देऊन ही बातमी देण्यात आली आहे. या बातमीनुसार २१ व्या शतकातील सर्वात मोठ्या कालावधीचे आणि या वर्षातील जगातील दुसरे सूर्यग्रहण येत्या २२ जुलै २००९ रोजी आहे. हे खग्रास सूर्यग्रहण असून ते केवळ पॅसिफिक महासागक, चीन व भारतातून पाहता येणार आहे. पॅसिफिक महासागरातील बेटांवर तेथील स्थानिक वेळेनुसार हे खग्रास ग्रहण दुपारी बारा वाजता तर भारतात सकाळी सहा वाजून २२ मिनिटांनी दिसणार आहे. भारतात हे ग्रहण साडेतीन ते चार मिनिटांचे असेल. भारतातील सुरत, इंदूर, वारणसी, पाटणा, सीलीगुडी येथून हे पाहता येणार आहे. उर्वरित विरळ सावलीच्या पट्ट्यात न्हणजे दिल्ली, बंगलोर, उत्तर व दक्षिण भारतातील शहरातून ते खंडग्रास दिसणार आहे.अर्थात हा काळ आपल्याकडे पावसाळ्याचा असल्याने हे ग्रहण आपल्याला पाहता ेईल की नाही, त्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
याच बातमीत कंकणाकृती सूर्यग्रहणाबद्दलची माहिती देण्यात आली आहे. १५ जानेवारी २०१० रोजी हे ग्रहण होणार असून दुपारी १ वाजून १८ मिनिटांनी कंकणाकृती सूर्यग्रहणाचा पट्टा हिंदी महासागरातून जाणार आहे. त्यामुळे भारतातून कन्याकुमारी येथे हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहता येणार आहे. सकाळ-मुंबईच्या टुडे मधील सूर्यग्रहणाची ही बातमी सचिन उन्हाळेकर यांनी दिलेली आहे.
ही बातमी वाचल्यानंतर माझ्या मनात १९८२ मध्ये भारतात झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी आजच्या सारखे दूरचित्रवाहिन्यांचे पेव फुटलेले नव्हते. दूरदर्शन हेच एकमात्र चॅनेल होते. बाकी वृत्तपत्रे व साप्ताहिकातून याची भरपूर प्रसिद्धी झालेली होती. त्यामुळे या दिवशी काय होईल, नेमके हे ग्रहण कसे असेल, त्यामुळे काय होणार,त्याची उत्सुकता सर्वानाच होती. दूरदर्शनवरून हे ग्रहण दाखविण्यात येणार होते. या ग्रहणाच्या निमित्ताने दूरदर्शनवरून त्यावेळी चित्रपटाचे प्रसारण करण्यात आले होते्. हे खग्रास ग्रहण नुसत्या उघड्या डोळ्यांनी पाहू नका, असे आवाहन वारंवार केले जात होते. ग्रहण पाहण्यासाठी खास गॉगल तयार करण्यात आले होते. आणि अखेर तो दिवस उजाडला. सकाळपासूनच सर्वत्र उत्सुकता, काही प्रमाणात भिती होती. अनेक जणांनी ऑफीसलाही दांडी मारून घरी बसणेच पसंत केले होते.
मी त्यावेळी दहावीला होतो. आमच्या सोसायटीत राहणाऱया माचवे यांच्याकडेच टीव्ही होता. आमच्या बिल्डींगमधील आम्ही सर्वजण त्यांच्या घरी सिनेमा व ग्रहण पाहण्यासाठी जमलो होतो. मला आठवताय दुपारी साडेतीन की चारच्या सुमारास सूर्य संपूर्ण खग्रास अवस्थेत जाणार होता. टीव्हीवर एकीकडे सिनेमा सुरू होता व एका कोपऱयात सूर्यग्रहणाची दर मिनिटाला बदलणारी स्थिती दाखविण्यात येत होती. आणि तो क्षण आला टीव्हीवर संपूर्ण सूर्य झाकला गेल्याचे दिसले. मी आणि अन्य काही जण लगेच पटांगणात जमलो. भर दुपारी चारच्या सुमारास अंधारून आले होते. सूर्यास्त झाल्यानंतर जसे वातावरण असते, तसे बाहेर दिसत होते. थोडा वारा सुटलेला होता. पक्षी संध्याकाळ झाली असे समजून घरट्यांकडे परतत होते. तर कावळे, चिमण्या, साळुंक्या आदी पक्षी ओरडत होते. एक वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. काही मिनिटे ही खग्रास अवस्था होती. त्यानंतर ग्रहण सुटायला लागले. दे दान सुटे गिऱहाण म्हणत बायका सगळीकडे फिरायला लागल्या.
त्यानंतर आपापसात तू ग्रहण पाहिले का, मी पाहिले, काय मस्त अनुभव होता ना, संध्याकाळ झाल्यासाऱखा काळोख कसा पडला अशी चर्चा सुरू झाली. दुसऱया दिवशी शाळेतही याच विषयावर गप्पा झाल्या.
खरेच एक वेगळाच आणि अविस्मरणीय असा तो अनुभव होता. त्या अनुभवाचे साक्षीदार होण्याची संधी त्यावेळी मिळाली व ती घेतली हे खरेच भाग्य...

रविवार, १० मे, २००९

भाषांच्या परस्पर संबंधांचा शोध घेणारी- अक्षरयात्रा

माणूस हा बोलणारा प्राणी असल्याने त्याला भाषेबद्दल नेहमीच जिज्ञासा वाटत आली आहे. त्याची स्वतची मातृभाषा, ही भाषा कधी, केव्हा आणि कोणत्या भाषेतून तयार झाली, आपल्या मातृभाषेचा अन्य कोणकोणत्या भाषांशी संबंध आला, त्याचे परस्परांवर काय परिणाम झाले असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. याचाच शोध अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने प्रकाशित केलेल्या अक्षरयात्रा या वार्षिक अंकातून घेण्यात आला आहे.
यात डॉ. श्री. र, कुळकर्णी, डॉ. यु. म. पठाण, सय्यद याह्या नशीत, नरसिंहप्रसाद दुबे, वि. बा. प्रभूदेसाई, मृणालिनी शहा, शोभा देशमुख, लक्ष्मीनारायण बोल्ली, विजया तेलंग, अ. रा. यार्दी, भा, ल. गोळे आदींचे अभ्यासपूर्ण आणि वाचनीय असे लेख आहेत. साहित्य महामडंळाचा वार्षिक अंक हा संदर्भ मूल्यात्मक असावा, अशी भूमिका महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी वार्षिक अंकाचे संपादक अरुण प्रभुणे यांच्यासमोर मांडली. प्रभुणे यांनी विषयांची निवड करून हा अंक तयार केला आहे.
दिवंगत डॉ. श्री. र. कुळकर्णी यांनी दखनी भाषा आणि साहित्य या लेखात महाराष्ट्राच्या परिसरात व लगतच्या तेलगु आणि कन्नड भाषांच्या प्रांतात प्रचलित असलेली दखनी ही भाषिकदृष्ट्या अल्पसंख्यांकांची बोली असून कन्नड व तेलगु या भाषांच्या प्रांतात ती नांदते आहे. तरीही या बोलीचे मराठी वळण आश्यर्यकारक वाटते, असे म्हटले आहे. त्यांनी या लेखात या भाषेतील साहित्य, त्याचा अस्त याचा सविस्तर आढावा घेतला आहे. डॉ. यु. म. पठाण यांनी आपल्या लेखात फार्सी-मराठी अनुबंध याचा तर डॉ. याहिया निशिद यांनी उर्दू साहित्य व भाषा यावर मराठीचा प्रभाव असा विषय यात मांडला आहे. मराठी साहित्य प्रकारातील भारूड या शैलीचा उर्दूच्या शिकारनामा या पुस्तकावर प्रभाव पडलेला आहे. मराठीतील फुगडी गीतांप्रमाणेच उर्दूतील सुफी संप्रदायातील कवींनी फुगडीगीते, ओव्या लिहिलेल्या आहेत. शाह तुराब चिश्ती यांनी रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकांचे अनुकरण करून मन समझावन नावाची काव्यरचना केली असल्याची माहिती या लेखात मिळते.
डॉ. नरसिंहप्रसाद दुबे यांनी दखनी हिंदीवर मराठी भाषेचा प्रभाव हा लेख लिहिला आहे.डॉ. वि. बा. प्रभूदेसाई यांनी मराठी व पोर्तुगीज या भाषांचे अन्योन्यसंबंध उलदडून दाखवले आहेत. प्रा. कालिका मेहता यांनी गुजराती जैन दशा श्रीमाळी बोलीचा तर डॉ. मृणालिनी शहा यांनी पुण्यातील विशाश्रीमाळी १०८ या जेन समाजगटाच्या गुजराती बोलीवर मराठीचा परिणाम हा लेख लिहिला आहे. मराठीत खांदा तर गुजरातीमध्ये खांदो, पीठ-पाठण, नातू-नातीयो, थंडी-तहाड, शेत-शेतरु, मळा-मळो, आवळा-आवळो, वांगे-वागू, गजरा-गजरो अशा मराठी व गुजराथी यांच्यात साधर्म्य असलेल्या अनेक शब्दांची उदाहरणे दिली आहेत. डॉ. शोभा देशमुख यांनी तेलगु व मराठी भाषा यातील काही निरीक्षणे नोंदवली आहेत. डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी तेलगु-मराठीचा अनुबंध उलगडून दाखवला आहे.
डॉ. विजया तेलंग यांनी मराठी-कन्नड भाषिक अनुबंध, डॉ. अ. रा. यार्दी यांनी मराठी आणि कानडी यांचा अन्योन्य संबंध याचा सविस्तर आढावा घेतला आहे. मराठी विषयाचे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि साहित्यप्रेमींसाठी हा वार्षिक अंक म्हणजे एक संदर्भ ग्रंथ झाला आहे. महामंडळाने असा भाषांचे परस्परांशी असलेले संबंध उलगडून दाखवणारे विविध अभ्यासपूर्ण लेख एकत्र करून एक चांगले काम केले आहे. याचे मूल्य १२५ रुपये आहे.

इच्छुकांसाठी संपर्क दूरध्वनी
अक्षरयात्रा वार्षिक अंकाचे संपादक- डॉ. अरुण प्रभुणे ०२३८५-२५७४२२, डॉ. यु.म. पठाण-०२४०-२४०२०८२, डॉ. सय्यद निशीद-९४२१७७१४१७, डॉ. नरसिंहप्रसाद दुबे-०२३८५-२५७६२०, डॉ. वि. बा. प्रभुदेसाई-०८३२-२७००८८५, कालिका मेहता-०२०-२४२१४८४८, डॉ. मृणालिनी शहा-०२०-२५४३३८६९, डॉ. शोभा देशमुख-०४०-६५६९७५९७, लक्ष्मीनारायण बोल्ली-०२१७-२६०१६२६, डॉ. विजया तेलंग-०९४४९६१९२१५, डॉ. अ. रा. यार्दी-०८३६-२७९४६८४,

शनिवार, ९ मे, २००९

देहदान शंका-समाधान

आपल्या भारतीय संस्कृतीत कोणतेही दान हे सर्वश्रेष्ठ मानण्यात येते. अन्न, वस्त्र किंवा वस्तू स्वरुपातील दान हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून करत आलो आहोत. कालानुरुप यात बदल झाले. संक्रांत किंवा तत्सम सणाच्या वेळी देण्यात येणाऱया वाणाचीही संकल्पना बदलली. सध्याच्या काळात रक्तदान या दानाला खूप महत्व आहे. याचा बऱयापैकी प्रसारही झाला आहे. मात्र आता त्याच बरोबर नेत्रदान, त्वचादान आणि देहदानलाही अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले हे शरीर आणि शरीराचे अवयव दुसऱया व्यक्तीसाठी उपयोगी पडले तर त्यासारखे अन्य पुण्य नाही. दान केलेली त्वचा भाजलेल्या व्यक्तीच्या अंगावर शस्त्रक्रियेद्वारे लावता येऊ शकते. अंधाला डोळे मिळाल्यामुळे तो जग पाहू शकतो तर संपूर्ण देह वैद्यकीय शाखेच्या विद्याथ्याना अभ्यासासाठी उपयोगी पडू शकतो. रक्तदान जेवढ्या प्रमाणात स्वीकारले गेले, तेवढ्या प्रमाणात अद्यापही देहदानाचा प्रसार झालेला नाही. डोंबिवलीतील दधीची देहदान मंडळ देहदान, रक्तदान आणि त्वचादानासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करत आहे.
मंडळातर्फे देहदान शंका व समाधान या नावाचे एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले असून पाच वर्षांपूर्वी पुस्तकाची चौथी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. पुराणकाळातील दधीची ऋषींचे नाव सर्वाना माहिती आहे. वृत्रासूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी श्रीविष्णूच्या सांगण्यावरून या ऋषींनी आपली हाडे देवांना दिली होती. या ऋषींच्या अस्थींपासून तयार केलेल्या वज्राने त्या राक्षसाचा वध करता येईल, असे सांगण्यात आले होते. दधीची ऋषीनी आपल्या अस्थी देऊन देवांची इच्छा पूर्ण केली होती, अशी एक पौराणिक कथा आहे. जगातील पहिला देहदाता आणि इच्छामरणी असलेल्या या ऋषींचे नाव मंडळाला देण्यात आले आहे. पुण्याचे दिवंगत ग. म. सोहनी यांनी मरणोत्तर देहदानाचा प्रसार आपल्या हयातीत केला होता. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन डोंबिवलीतील गुरुदास तांबे यांनी याचा प्रचार-प्रसार करण्याचे व्रत घेतले. स्वेच्छा निवृत्तीनंतर त्यांनी स्वतचा देहदानाचा अर्ज भरून दिला. १९८८ मध्ये या कामाचा प्रसार करण्यासाठी दधीची देहदान मंडळाची स्थापना केली. गेल्या काही वर्षांत मंडळातर्फे डोंबिवली, कल्याण, ठाणे, कळवा, अंबरनाथ, बदलापूर, मुंबई आदी ठिकाणांहून देहदान व नेत्रदानासाठी हजारो लोकांकडून अर्ज भरून घेण्यात आले आहेत. तर १५५ देहदान झाले आहे. (ही आकडेवारी जुनी असून त्यात आणखी भर पडली आहे)
दधीची देहदान मंडळाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात या विषयाचा समग्र आढावा घेण्यात आला असून मनातील शंका, समज-गैरसमज यांना समर्पक उत्तरेही देण्यात आली आहेत. मंडळाचे कार्य, मरणोत्तर देहदान-गरज कायद्याची, नेत्रदान, शासनाचे डोळे कधी उघडणार, महाराष्ट्रातील नेत्रपेढ्या, देहदात्यांच्या वारसांकडून मंडळाची अपेक्षा, ठाण्यातील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, देहदानाबाबत सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या शंका, प्रश्न व त्याची उत्तरे, या संदर्भातील लोकांचे अनुभव, डॉक्टरांचा सहभाग, अवयव दानाबाबत असलेले समज-गैरसमज, अवयवदान कायदा, त्वचादान का आणि कसे करावे, इच्छामरण, स्वेच्छामरण, देहदानाची चळवळ आणि मान्यवरांचे गैरसमज, या संदर्भातील आवश्यक ते अर्ज, वैद्यकीय महाविद्यालये, त्यांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक आदी भरपूर माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क दूरध्वनी
गुरुदास तांबे-९५२५१-२४९०७४० (डोंबिवली), बाळकृष्ण भागवत-२८६९८११४ (बोरिवली), सुरेश तांबे-९५२५१-२४५३२६६ (डोंबिवली), श्रीराम आगाशे-२५३०५९१६ (ठाणे), उमाकांत रेवाळे-९५२५१-२६७०६१२ (बदलापूर), सुधीर भिडे-९५२५१-२६९५२१४ (बदलापूर)

शुक्रवार, ८ मे, २००९

संस्कृत स्तोत्रांना मायबोलीचा साज

गणपती अथर्वशीर्ष, पुरुषसुक्त, श्रीसुक्त ही संस्कृत भाषेतील स्तोत्रे गेल्या अनेक पिढ्यांपासून घराघरात म्हटली जात आहेत. संस्कृत भाषा आणि त्या भाषेतील ही स्तोत्रे एेकायला खूप छान वाटत असली तरी त्याचा अर्थ समजून आणि ती पाठ करून म्हणणे तस कठीणच. सर्वसामान्य लोकांसाठी असलेली हीच अडचण ओळखून बडोद्याला राहणारे प्रभाकर गोखले यांनी अशा काही निवडक संस्कृत स्तोत्रांना मायबोलीचा साज चढवला आहे. हे केवळ भाषांतर नसून गोखले यांनी ही सर्व स्तोत्रे तालालसुरात म्हणता यावीत, त्यासाठी त्यांना शास्त्रीय रागात बांधले आहे.
गोखले हे मुळचे वाराणशीचे. त्यांचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले. पुढे काशी हिंदू विद्यापीठात त्यांनी स्टेनोग्राफर म्हणून नोकरी केली. तर पुढे अनेक वर्षे विद्यापीठाच्या कुलगुरुंचे सचिव म्हणून काम पाहिले व त्याच पदावरून निवृत्त झाले. अनेक जणांना संस्कृतमधील ही स्तोत्रे म्हणायची असतात, पाठ करायची असतात, पण योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे किंवा म्हणायला कठीण गेल्यामुळे ते हे म्हणणे अर्धवट सोटून देतात. हीच अडचण लक्षात घेऊन गोखले यांनी हे काम केले आहे.
गोखले यांनी सगळ्यात पहिल्यांदा गणपती अथर्वशीर्षाचे मराठी रुपांतर केले. ते त्यांनी भीमपलासी रागात बांधले आहे.
नमस्कार ओम गणपती तुजला,
तूच तत्व प्रत्यक्ष प्रमाण
केवळ तूच कर्ता, धर्ता आणि हर्ता
हेची गजत विधान
अशा सोप्या व सहज पाठ होईल अशा मराठी भाषेत गोखले यांनी अथर्वशीर्षाचे मराठी रुपांतर केले आहे.
पुढे गोखले यांनी पुरुषसुक्त, विष्णूसुक्त, विष्णूध्यान, श्रीसुक्त, सप्तशती दुर्गादेवी ध्यान, रुद्र, महिम्न, गंगालहरी, मंत्रपुष्पांजली आदी स्तोत्रे मराठीत आणली आहेत. हे सर्व लोकांना समजायला सोपे व्हावे म्हणून त्यांनी स्वखर्चाने मूळ संस्कृत स्तोत्र व त्याचे मराठी रुपांतर असे एक छोटेखानी पुस्तकही प्रसिद्ध केले आहे. तसचे ही सर्व स्तोत्रे रागात बांधून व स्वत गाऊन त्याची सीडीही तयार केली आहे.
शांताकारम् भुजगशयनम हे श्रीविष्णू ध्यान स्तोत्र त्यांनी यमन रागात तर श्रीदेवी ध्यान व श्री सप्तशती दुर्गा स्तोत्र अनुक्रमे बागेश्री व भैरवी रागात बांधले आहे. मंत्रपुष्पांजली ही त्यांनी रागात बांधली आहे.
आपण केलेला हा एक प्रयोग असून त्यात काही त्रुटी असण्याचीही शक्यता आहे. त्याबाबत संगीतप्रेमी व तज्ज्ञ मंडळींनी जरुर मार्गदर्शन करावे, असेही त्यांचे विनम्र सांगणे आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी गोखले यांचा संपर्क दूरध्वनी
०२६५-२५६५३४०/९८२४३३८९४३