रविवार, २८ जून, २००९

हे वय असे असले तरी...

पावसाळा सुरु झाला असून आता भटक्यांचे अर्थात ट्रेकर्स मंडळींचे पावसाळी ट्रेक सुरु झाले असतील. अस्सल ट्रेकर्सना पावसाळा म्हणजे फिरण्यासाठी पर्वणीच असते. मात्र या मंडळींबरोबरच हौशी मंडळीही खास पावसाळी पिकनिकसाठी आतुर असतात. काही सन्मान्य अपवाद वगळता पावसाळी पिकनिक म्हणजे कुठेतरी गड-किल्ल्यावर जाणे, जाता-येताना आणि जिथे मुक्काम करणार असून तेथेही यथेच्छ दारू पिणे, सिगरेट्स ओढणे, ओंगळ नृत्य करणे व गाणी म्हणणे असे समीकरण झाले आहे. शनिवारी रात्री शेवटच्या कर्जत किंवा कसारा ट्रेनला अशा काही ग्रुप्सची झलक हमखास पाहायला मिळते. अर्थात याला अपवादही आहेत व असतात. या पावसाळी किंवा पावसाळ्यानंतर थंडी सुरु होते, त्या काळात केलेल्या भटकंतीमध्ये निसर्गाचे एक नवे रुप आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण निसर्ग मुक्त हस्ताने आपल्यावर विविध रंगांची उधळण करत असतो. अपवाद वगळता काही जण मात्र तिकडे दुर्लक्षच करतात.


भावी आयुष्यातील करिअरला महत्वाची दिशा देणारी दहावीची परीक्षा संपून ही मुले कॉलेजात जाऊ लागलेली असतात. नवे मित्र व मैत्रिणी, काहीतरी नवीन करुन दाखवण्याचे थ्रील, आपण आता मोठ्ठे झालो आहोत ही मनातील सुप्त भावना, कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचे वय आणि त्यात मन धुंद करणारा पावसाळा, निसर्गाचे मनमोहक रुप यामुळे हातून काही चुकाही घडतात, घडण्याची शक्यता असते. ग्रुपचे मानसशास्त्र अगदी वेगळे असते. त्यामुळे काही जण यात वाहावतही जातात.


पावसाळी भटकंतीचा किंवा सहलीचा आनंद जरुर घ्या पण इतरांनाही तो घेऊ द्या. आपल्या वर्तनामुळे इतरांना त्याचा त्रास होत नाही ना, आपल्या हातून काही वावगे घडत नाही ना, ग्रुपमध्ये चेष्टा-मस्करी करताना राईचा पर्वत होणार नाही, याची सर्वानी खबरदारी घ्या. ज्या ठिकाणी आपण जातो आहोत, तो ग्रामीण भाग असतो. तेथे जाऊन आरडाओरड व धिंगाणा घालणे, जाताना मुलींशी छेडछाड करणे, समाजमान्य नसलेले आणि असभ्य या गटात मोडणारे वर्तन करणे टाळा. नाहीतर आखलेल्या ट्रेकची किंवा पावसाळी पिकनिकची सारी मजा जाणार नाही, त्याची काळजी घ्या. आपण कोणत्या ग्रुप बरोबर पिकनिक किंवा ट्रेकला जातो आहोत, आपल्याबरोबर कोण मित्र-मैत्रिणी आहेत, त्यांची नावे, पत्ते आणि फोन नंबर आपल्या घरीही धेऊन ठेवा. समजा काही अडचण आली तर त्याचा उपयोग होऊ शकतो. पोहता येत असले आणि नसले तरी उत्साहाच्या भरात, मित्रांनी आग्रह केला म्हणून किंवा कोणी चेष्टा केली तरी अनोळखी ठिकाणचे तलाव, नदी यात पोहायला उतरु नका. त्यात जीवाला धोका होऊ शकतो. समुद्रातही उत्साहाच्या भरात किंवा कोणावर इंप्रेशन पाडण्यासाठी खूप पुढे जाऊ नका, धबधब्याच्या ठिकाणाही उगाच धोका पत्करुन पुढे जाऊ नका.


दरवर्षी अशा पिकनिकच्या वेळी घडलेले अपघात आणि दुर्दैवी घटना आपण वृत्तपत्रातून वाचत असतो. पिकनिक किंवा ट्रेकसाठी अनोळखी मित्र किंवा ग्रुप बरोबर शक्यतो जाऊ नका. बाहेर गेल्यावर नेहमी एकत्र राहा. क्षुल्लक गोष्टींवरून भांडणे करू नका, उघड्यावरील अन्नपदार्थ, पाणी प्यायचे टाळा, आपल्या तब्येतीची काळजी घ्या. म्हणजे मग तुमची पावसाळी पिकनिक किंवा एखादा ट्रेक छान होईल. त्याला कसलेही गालबोट लागणार नाही. हे वय धड ना मोठे ना लहान असे असते. त्यामुळे स्वताची आणि आपल्या मित्र-मैत्रिणींचीही काळजी घ्या. कोणी वावगे वागत असेल तर त्याला त्यापासून पारावृत्त करा.


मला माहितेय, तुम्ही म्हणाल अहो, हे वयच मजा व धमाल करण्याचे असते. या वयात मजा केली नाही तर कधी करणार, पण मित्रांनो क्षणभराच्या मजेसाठी सर्व आयुष्य पणाला लागेल किंवा नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असे वागू नका. हे वय असे असले तरीही...

शुक्रवार, २६ जून, २००९

दहावीची परीक्षा- हवी की नको

दहावीची परीक्षा, त्याचा जाहीर होणारा निकाल आणि त्यातून येणाऱया तणावातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी दहावीची परीक्षाच नको, असा नवा प्रस्ताव मांडला आहे. बोर्डाच्या परीक्षेऐवजी नियमित अंतराने परीक्षा, विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी वेगळ्या पद्धतीचा अवलंब, नववी आणि दहावीच्या परीक्षांमध्ये गुणांऐवजी ग्रेड पद्धत आणि देशभरात दहावीसाठी एकच बोर्ड असावे, त्यासाठी सहमती करण्याचा प्रयत्न अशा अन्य काही सूचनाही सिब्बल यांनी केल्या आहेत. यातील परीक्षाच नको या प्रस्तावावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांवरील दहावीच्या परीक्षेचा ताण-तणाव कमी करण्यासाठी परीक्षाच नको, ही भूमिका योग्य नाही, असे वाटते.


दहावीच्या परीक्षेचे पालक आणि विद्यार्थी नको तेवढे दडपण घेतात. आपला पाल्य दहावीत गेला की घरात या सगळ्याला सुरुवात होते. पुढील आयुष्याची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा ही अत्यंत महत्वाची असली तरी त्याचे इतके दडपण घेण्याची खरोखरच गरज आहे का, त्याचा विचार आपण करत नाही. मार्कांच्या रेसमध्ये सगळेच धावत सुटतो. गुणवत्ता यादीमुळे विद्यार्थ्यांवर येणारे दडपण लक्षात घेऊन राज्य एसएससी बोर्डाने गेल्या दोन वर्षांपासून गुणवत्ता यादी जाहीर करणे बंद केले. ते योग्य पाऊल बोर्डाने उचलले. मात्र त्यामुळे दहावीची परीक्षा व दडपण यात काही फरक पडलेला नाही. खरे म्हणजे पहिली ते नववी पर्यतच्या जशा परीक्षा असतात,तशीच दहावीची परीक्षा आहे, त्यात वेगळे काही नाही, असे विद्यार्थी व पालक यांनी समजून घेतले पाहिजे.


विद्यार्थ्यांवरील दहावीच्या परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी ही परीक्षाच रद्द करणे हा उपाय होऊ शकतन नाही. जर ही परीक्षा रद्द झाली तर विद्यार्थी आत्ता जो काही अभ्यास करताहेत, तोही अजिबात करणार नाहीत. शिक्षक त्यांना हव्या त्या पद्धतीने शिकवतील. त्यामुळे परीक्षा आत्ता आहेत तशाच सुरु राहाव्यात. फक्त गुणांऐवजी ग्रेड देण्याची पद्धत सुरु करावी. तसेच दहावीचा निकाल लागल्यानंतर जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात, त्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाते. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते. त्यामुळे ही परीक्षा लगेच एक महिन्याच्या आत घेता आली तर त्यासाठी प्रयत्न केले जावेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.


दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित व इंग्रजी हे विषय खूप कठीण जातात. या विषयांत अनेक विद्यार्थी नापास होतात. त्यामुळे हे विषय ऐच्छिक ठेवता येतील का, त्यावरही चर्चा आणि विचार होण्याची आवश्यकता आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण देशभरात एकच बोर्ड असावे, ही सूचना चांगली आहे. त्यामुळे सीबीएसई आणि अन्य बोर्ड व त्या त्या राज्यांचे दहावीची परीक्षा घेणारी मंडळे यांच्यातील तफावत दूर होऊ शकले. मात्र त्यासाठी कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, त्याची काळजी घेऊन अभ्यासक्रम तयार करावा लागेल. त्या त्या राज्याची प्रथम भाषा ही प्रत्येकाला सक्तीची करायची की नाही, तो विषय परीक्षेसाठी ठेवायचा की नाही, त्यावरून पुन्हा वाद होऊ शकतील. त्यामुळे आत्ता जे विषय आहेत,त्याऐवजी व्यवसायाभिमुख विषय ठेवता येतील का, त्यावरही विचार झाला पाहिजे. जी मुले खऱोखरच हुशार आहेत, ज्यांना वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेकडे जायचे आहे, त्यांच्यासाठी आणि सर्वसाधारण बुद्धीमत्ता असणाऱयांसाठी वेगवेगळे विषय ठेवले तर ते सोयीचे होईल. अर्थात त्यासाठी दहावीचा नवा आणि वेगळा अभ्यासक्रम तयार करावा लागेल. इंग्रजी हा विषय पुस्तकी अभ्यासापेक्षा बोलणे व लेखन अशा प्रकारे ठेवता येईल का, त्यावरही विचार व्हावा. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा असे ज्ञान देणे उपयोगी ठरेल, असे वाटते.


अर्थात जे काही करायचे ते साधक-बाधक विचार करुनच निर्णय़ घेतला पाहिजे. नाहीतर घाईघाईत निर्णय़ घेऊन विद्यार्थी व पालकांचा त्रास आणखी वाढेल. तसेच केवळ काहीतरी बदल हवा म्हणूनही असा निर्णय घेऊन चालणार नाही.

गुरुवार, २५ जून, २००९

श्री महागणपती रुग्णालय

मराठीमध्ये सर सलामत तो पगडी पचास अशी एक म्हण आहे.याचा साधा अर्थ असा की आपले आरोग्य चांगले असेल तर आपण बरेच काही करू शकतो. मनात खूप काही करायची ऊर्मी असेल पण त्याला शरीराने साथ दिली नाही, तर काही उपयोग नाही. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांसाठीच उत्तम आरोग्य ही महत्वाची गोष्ट आहे. आरोग्य जपणे आणि ते टिकवणे हे आपल्याच हातात आहे. योग्य आहार-विहार आणि काळजी घेतली तर आजार आपल्याला होणारच नाहीत. इतके करुनही व काळजी घेऊनही समजा आपल्याला एखादा रोग/आजार झाला तर वेळीच व योग्य औषधोपचार मिळणेही तितकेच गरजेचे असते.


शहरात किंवा मोठ्या गावात विविध पॅथींचे तज्ज्ञ डॉक्टर, अद्ययावत आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीची रुग्णालये तसेच अन्य तातडीच्या रुग्णसेवा उपलब्ध होऊ शकतात. मात्र हे उपचार रुग्णाला वेळीच मिळणे आवश्यक असते. मोठी शहरे किंवा गावे सोडली तर आजही लहान खेड्यातून डॉक्टर्स व अद्ययावत रुग्णालयांची वानवाच आहे. लहान खेड्यातून कोणी माणूस अत्यवस्थ झाला तर त्याला मोठ्या शहरात उपचारांसाठी हलवावे लागते. त्यात वेळ गेला किंवा वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. राज्य शासन किंवा स्थानिक महापालिका-नगरपालिका यांची नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याची मुख्य जबाबदारी असली तरी सर्व ठिकाणी शासन पुरे पडू शकत नाही. किंवा अनेक वेळा अशा प्रकारचे उपक्रम किंवा प्रकल्प लाल फितीत अडकले किंवा अडकवले जातात. मात्र समाजात अशा काही संस्था आहेत की त्या समाजासाठी काम करत असतात. अशापैकीच एक टिटवाळा येथील क्रिएटीव्ह ग्रूप ही संस्था


टिटवाळा आणि परिसरातील सुमारे ६८ खेडेगावांसाठी, या भागातील नागरिकांसाठी असे एकही सुसज्ज रुग्णालय नाही. हीच बाब लक्षात घेऊन मांडा-टिटवाळा परिसरातील काही तरुणांनी एकत्र येऊन क्रिएटीव्ह ग्रूप ही संस्था स्थापन केली आणि संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून काम सुरु केले. संस्थेतर्फे तज्ज्ञ डॉक्टर्स, एक्सरे, ईसीजी, पॅथॉलॉजी लॅब, औषधांचे दुकान आदी विविघ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या तरुणांचा मुख्य उद्देश मांडा-टिटवाळा परिसरातील ६८ खेड्यांमधील नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणे हा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. संस्थेचे काम पाहून डोंबिवलीतील प्रमिला दलाल यांनी टिटवाळ्यातील आपली साडेतीन गुंठे जागा संस्थेला दान दिली. संस्थेनेही याच जागेजवळची साडेतीन गुंठ्याची जागा विकत घेतली आणि भव्य रुग्णालय उभे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले. संस्थेतर्फे उभारण्यात येणाऱया या रुग्णालयाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी हिंदुजा रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद लेले, तेथील डॉक्टर्स श्री. डावर, भालेराव तसेच अन्य मंडळींचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.


हा संपूर्ण प्रकल्प सुमारे दोन ते सव्वादोन कोटी रुपयांचा आहे. टिटवाळा येथील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिराचे विश्वस्त सुभाष जोशी यांनी मंदिरातर्फे एक कोटीची मदत जाहीर केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून रुग्णालयाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. शासकीय पातळीवरुनही या प्रकल्पाला मदत मिळावी, त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या संदर्भातील बातम्या काही दिवसांपूर्वी बहुतेक मराठी वृत्तपत्रातून येऊन गेल्या आहेत. त्याचा तसेच कल्याण येथून प्रसिद्ध होणाऱया कल्याण नागरिक या साप्ताहिकाच्या (१७ जून २००९, अंक तिसरा) अंकातील माहितीचा आधार घेतला आहे. महागणपती रुग्णालय प्रकल्पाची माहिती सर्वाना व्हावी, या उद्देशाने ती दिली आहे. क्रिएटीव्ह ग्रूपच्या तरुणांचे हे काम खरोखरच सर्वाना प्रेरणादायक आणि आपल्याही गावासाठी अशा प्रकारचे विधायक व कायमस्वरुपी काम उभे करण्यासाठी स्फूर्ती देणारे आहे. त्यामुळेच माझ्या ब्लॉगवर मी त्याबद्दल लिहिले आहे.


या संदर्भात कोणाला माहिती हवी असेल किंवा काही मदत करायची असेल तर त्यासाठी संपर्क
विक्रांत बापट (संस्थापक क्रिएटीव्ह ग्रूप) ९८२०८७२०८४/ ई-मेल vikrant_creative@yahoo.com

बुधवार, २४ जून, २००९

एकटा जीव आत्मचरित्र हाऊसफुल्ल


मराठी रंगभूमीवर विच्छा माझी पुरी करा या नाटताद्वारे नवा इतिहास घडविणारे आणि त्यानंतर मराठी चित्रपटांच्या इतिहासात स्वतची खास शैली निर्माण करून प्रत्येक चित्रपट रौप्यमहोत्सवी करून दाखविणारे अभिनेते-दिग्दर्शक दिवगंत दादा कोंडके यांच्या एकटा जीव या आत्मचरित्रालाही वाचकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतो आहे. मुंबईत उद्या २५ जून रोजी होणाऱया एका विशेष कार्यक्रमात या पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होत आहे. चित्रपटविषयक लेखन आणि पत्रकारिता करणाऱया अनिता पाध्ये यांनी या आत्मचरित्राचे शब्दांकन केले आहे.


या पुस्तकाच्या पहिल्या दोन आवृत्या मॅजेस्टिक प्रकाशननाने प्रकाशित केल्या होत्या. त्यानंतरच्या चार आणि गुरुवारी प्रकाशित होणाऱया सातव्या आवृत्तीसह सर्व आवृत्या अनुबंध प्रकाशनने प्रकाशित केल्या आहेत. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १२ मार्च १९९९ मध्ये तर दुसरी आवृत्ती अवघ्या एका महिन्यात म्हणजे ४ एप्रिल १९९९ मध्ये प्रकाशित झाली होती. त्यानंतर हे पुस्तक न्यायालयीन आणि कायदेशीर लढाईच्या कचाट्यात सापडले होते. न्यायालयाकडून या पुस्तकावर बंदीही घालण्यात आली होती. मात्र अनिता पाध्ये यांनी त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागून हे पुस्तक २००० या वर्षी न्यायालयाच्या कचाट्यातून सोडवले. त्यामुळे पुस्तकावरील बंदीही उठली आणि त्याच वर्षी पुस्तकाची तिसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. त्यापुढे दर वर्षी एक या प्रमाणे एकेक आवृत्ती येत राहिली.


दादांचे आयुष्य हे विविध नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले होते. या पुस्तकात त्यांच्या सर्व आयुष्याचा पट उलगडला गेला आहे. हे आत्मचरित्र असूनही दादांनी आपल्या आयुष्यात जे काही घडले त्यापैकी काहीही न लपवता सर्व काही प्रांजळपणे सांगितले आहे. आपल्यातील गुण-दोषांसकट त्यांनी स्वताला वाचकांपुढे सादर केले आहे. त्यांचे हे प्रांजळपण दादांच्या चाहत्यांसकट सर्व वाचक आणि रसिकांना भावल्यामुळेच दहा वर्षात या पुस्तकाची सातवी आवृ्त्ती प्रकाशित होत असल्याचे पाध्ये यांनी सांगितले.


चित्रपटविषयक लेखन आणि पत्रकारिता करत असल्यामुळे दादांशी परिचय होताच. या पुस्तक लेखनाच्या निमित्ताने तो जास्त जवळून झाला. प्रत्यक्ष पुस्तकाचे लेखन करण्यापूर्वी मी जवळपास अकरा महिने दररोज दादांशी बोलून, सर्व माहिती घेत होते. दुपारी ४ ते ९ अशा वेळेत आमची मुलाखत चालायची. आमचे हे सर्व बोलणे ध्वनीमुद्रीत केलेले असून त्याच्या ८० कॅसेट्स माझ्याकडे आहेत. सर्व माहिती घेऊन झाल्यानंतर मी पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली आणि तीन महिन्यांत लेखनाचे काम पूर्ण झाले. पुस्तकातील सर्व लेखन हे दादांच्या शैलीतच केले असल्याचेही पाध्ये म्हणाल्या.


हिंदी आणि गुजराथी भाषेतही या पुस्तकाच्या भाषांतर/ अनुवादासाठी विचारणा करण्यात आली आहे. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी सांगितले.


अनिता पाध्ये यांच्या संपर्कासाठी त्यांचा ई-मेल

anitaapadhye@gmail.com

मंगळवार, २३ जून, २००९

पंढरीची वारी पोहोचली जगभरी!

महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून अव्यातपणे सुरु असलेली पंढरीची वारी म्हणजे भक्तीचा अनोखा अविष्कार आहे. गेल्या काही वर्षांपासून या वारीमध्ये विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित मंडळी आणि इंटरनेटसॅव्ही व ‘आयटी’ क्षेत्रातील युवकही सहभागी होत आहेत. दरवर्षी पंढरीच्या वारीत सहभागी होणारी ही लाखो माणसे उत्सुकतेचा विषय ठरला आहे. अशाच उत्सुकतेतून आणि आपण घेतलेल्या वारीचा अनुभव लोकांपर्यत पोहोचविण्याच्या उद्देशाने छायाचित्रकार शिरीष शेटे यांनी ‘वारी-पाथ टू दि डिवाइन’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक इंग्रजी भाषेत असल्यामुळे पंढरीची वारी आता जगभर पोहोचणार आहे.


ही बातमी २३ जून २००९ च्या लोकसत्ता (मुंबई)च्या अंकात पान तीन वर प्रसिद्ध झाली आहे.



या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तर पुण्यात ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या हस्ते झाले. शेटे हे ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेत मुख्य फोटोग्राफर आहेत. गेली पाच ते सहा वर्षे ते वारी करत आहेत. या पुस्तकात त्यांनी वारीचे अनुभव छायाचित्रे आणि लेखन या स्वरुपात सादर केले आहेत. वारीची परंपरा व इतिहास, वारीची होणारी सुरुवात, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी संतांच्या वारीतील पालख्यांचा सहभाग, दिवेघाटातील वारीचा प्रवास यासह वारीच्या प्रवासातील महत्वाचे मुक्काम, अकलूज व वाखरी येथे होणारे वारीतील रिंगण तसेच अन्य महत्वाच्या नोंदींची सुमारे २०० रंगीत छायाचित्रे या पुस्तकात आहेत. हे पुस्तक ‘स्पेन्टा प्रकाशन’ने प्रकाशित केले आहे.



‘वारी’ या विषयावर मराठीमध्ये बरेच लेखन प्रकाशित झाले असून इंग्रजी भाषेत मात्र या विषयावर फारसे लेखन नाही. त्यामुळे मराठी संस्कृतीमधील गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेचा हा ठेवा मराठी भाषिकांखेरीज अन्य भाषिकांपर्यत तसेच जगभरात पोहोचावा, या उद्देशाने आपण हे लेखन इंग्रजीतून केले असल्याचे शेटे यांनी सांगितले.


शिरीष शेटे यांचा संपर्क

भ्रमणध्वनी-९३२१७१३१४७/ ईमेल shirishgs@gmail.com

शिरीष शेटे यांचे संकेतस्थळ असून त्याचा पत्ता www.shirishshete.com

रविवार, २१ जून, २००९

आला आला वारा संगे पावसाच्या धारा.

अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या माणसांना शनिवारी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने जरा दिलासा मिळाला. मुंबईत मात्र त्याने फक्त वातावरण निर्मिती केली. पण ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि राज्याच्या अन्य भागात मात्र त्याने काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपात आपली हजेरी लावली. दोन दिवसात मान्सून मुंबईसह राज्यात सक्रिय होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यांचा हा अंदाज खरा ठरो आणि काल आलेला हा पाऊस राज्यात चांगला मुक्कामाला राहो, अशी आशा आहे.


पाऊस सुरु झाल्यानंतर सृष्टीचे सर्व रंगरूपच बदलून जाते. उन्हाळ्यात तप्त झालेली धरणी पावसाच्या पहिल्या धारांनी म्हाऊन निघते आणि मन धुंद करणारा मातीचा गंध सर्वत्र दरवळू लागतो. जसजसा पाऊस चढू लागतो, तसतसे आजूबाजूचे सर्व वातावरण हिरवेगार होऊन जाते. हा हिरवा निसर्ग मन मोहून टाकतो, मनाला उत्साह-आनंद देतो. मराठी साहित्य. भावगीते. चित्रपटगीते यातूनही या पावसाचे वर्णन करणारी खूप गाणी आहेत. यापैकी अनेक गाणी लोकप्रिय असून पाऊस सुरु झाली की ही गाणी आपल्या मनात रुंजी घालायला सुरुवात करतात. आपल्याला ती गाणी आठवून आपण ती अगदी सहज गुणगुणायला लागतो.


मराठी साहित्य, भावगीते आणि चित्रपटगीतांमधून आलेला हा पाऊस वेगवेगळी रुपे घेऊन आलेला आहे. कधी तो हळूवारपणे तर कधी धिंगाणा घालत येतो. कधी तो पावसाच्या आठवणींनी आपले मन धुंद करतो तर कधी हाच पाऊस आपले मन व्याकुळ करतो. हाच पाऊस प्रियकर-प्रेयसीला हवाहवासा वाटतो तर कधी हाच पाऊस त्यांना विरहाचे चटके देतो. कधी हाच पाऊस बडबड गाणी होऊन लहान मुलांची गाणी बनून येतो.


पाऊस म्हटला की पटकन ओठावर येते ते देवबाप्पा चित्रपटातील
नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच
हे गाणे. आज इतकी वर्षे झाली तरी हे गाणे आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय आहे. मराठी वाद्यवृदामध्ये आजही हे गाणे हमखास वन्समोअर घेते. साधे-सोपे शब्द आणि सहज गुणगुणता येईल अशी चाल व आशा भोसले यांच्या आवाजाने हे गाणे फक्त लहान मुलांचे न राहता मोठ्यांचेही झाले.


सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय

हे असेच एक पावसाचे लोकप्रिय बालगीत. या बरोबरच पटकन आठवणारी पावसाची आणखी बालगीते म्हणजे

ए आई मला पावसात जाऊ दे, एकदा तरी चिंब चिंब होऊ दे

किंवा

टप टप टप काय बाहेर वाजताय ते पाहू

चल ग आई, चल ग आई पावसात जाऊ

ही दोन बालगीते आठवतात.


चित्रपटातील पाऊस गाण्यांविषयी बोलताना पटकन आठवणारे एक लोकप्रिय गाणे म्हणजे वरदक्षिणा चित्रपटातील

घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा


मन्ना डे यांनी गायलेले हे गाणे अद्याप लोकप्रिय असून मराठी वाद्यवृंदात आजही हे गाणे नेहमी गायले जाते.

हा खेळ सावल्यांचा य़ा चित्रपटातील

आला आला वारा संगे पावसाच्या धारा

पाठवणी करा सया निघाल्या सासुरा

हे सुद्धा गाणे पाऊस गाणे म्हणून माहितीचे आहे.

अहो राया मला पावसात नेऊ नका,

ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना

घन ओथंबून येती, मनात राघू फुलती,

वादळ वारं सुटलय गो ,

चिंब पावसांन रान झालं आबादानी

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांनी अजरामर केलेले

रिमिझम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात

ही सुद्धा अशीच पावसाची काही लोकप्रिय गाणी.

कवयित्री इंदिरा संत यांची

नको नको रे पावसा

असा धिंगाणा अवेळी

घर माझे चंद्रमौळी

अन दारात सायली


ही कविता

किंवा त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांची
श्रावण मासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर

क्षणात हिरवे उन पडे

या कविताही सहज आठवणाऱया.


अशी आणखीही अनेक पाऊस गाणी आहेत व असतील. मला सहज आठवली तेवढी मी येथे दिली. अनेक गाणी राहिलीही असतील. ती तूम्ही मनात आठवून आलेल्या या पावसाचे मनापासून स्वागत करा...

शनिवार, २० जून, २००९

अखेर पाऊस आला...

गेल्या काही महिन्यांपासून अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्याने सर्वजण हैराण झाले होते. कधी एकदा पाऊस सुरु होतोय, त्याकडे सगळे डोळे लावून बसल होते. जून महिन्याची १८/१९ तारीख उलटून गेली तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे आता कधी एकदाचा पाऊस येतोय, असे झाले होते. ऐला चक्रीवादळामुळे यंदाच्या वर्षी लवकर दाखल झालेला पाऊस पुढे सक्रीय झालाच नाही. महाराष्ट्रातही पाऊस रत्नागिरीपर्यंत येऊन पोहोचला होता. मात्र तो पुढे सरकत नव्हता. मात्र अखेर आज त्याने आपला रुसवा सोडला आणि मुंबईसह ठाणे परिसरात त्यांने आपली हजेरी लावली. आजच्याच वृत्तपत्रातून येत्या ४८ तासात मान्सून मुंबई व कोकणात दाखल होईल, असे वेधशाळेचे म्हणणे असल्याच्या बातम्या आल्या आहेत.


आजची त्याची हजेरी आणि दिवसभरातील ढगाळ वातावरण, अधूनमधून होणारी पावसाची रिमझिम पाहता, आता पाऊस अगदी नक्की आला असे म्हणायला हरकत नाही. फक्त आता त्याने कुठेही न रेंगाळता वाजत, गाजत आणि गर्जत आपली हजेरी लावावी, अशी अपेक्षा त्रस्त झालेल्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. खरेच जवळपास पाच महिन्यांपासून उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आणि विशेषत शेतकऱयांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊसच न आल्यामुळे केलेली पेरणी वाया जाण्याची वेळ येऊन ठेपली होती. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.


माणसाचे मन मोठे विचित्र असते नाही, उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या आपणाला कधी एकदा पाऊस सुरु होतोय, याची ओढ लागलेली असते. मात्र तो सुरु झाल्यानंतर त्यांने आपले रौद्र रूप दाखवून दाणादाणा उडवून दिली, सगळीकडे पाणी, चिखल करून टाकला आणि पावसाचे कॅलेंडरवरील महिने संपत आल्यानंतरही त्याचा मुक्काम राहिला तर आपण वैतागतो. पावसाला शिव्या घालतो. आता पुरे कर असे म्हणतो. पावासाळ्यानंतर आपल्याला ओढ लागते ती थंडीची. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापासून थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. पण गेल्या वर्षी थंडीच पंडली नाही. ग्लोबल वॉर्मिंग, ढासळते पर्यावरण, वाढते प्रदूषण आणि अन्य काही कारणांमुळे ऋतुचक्रात हे बदल होत आहेत. होणारे हे बदल पाहता असे वाटते की यापुढे कदाचित दहा महिने उन्हाळा आणि दोन महिने पावसाळा असे दोनच ऋतू कदाचित असतील.


खरोखर आपण भारतीय किती सुखी आहोत नाही, आपल्याला पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तीनही ऋतूंचा आनंद घेता येतोय, नव्हे आजवर आपण घेत आलो आहोत. उन्हाळ्याने तप्त झालेल्या धरित्रीसह सर्व पशू-पक्षी आणि माणसालाही पावसाचे वेध लागतात. पहिला पाऊस, मातीचा तो मन धुंद व प्रसन्न करणारा गंध, बहरलेली झाडे, सर्वत्र पसरलेली हिरवाई सारे काही आपल्याला हवेहवेसे वाटते. त्यानंतर हिवाळा येतो. पावसाळा नुकताच संपत आलेला असतो. वातावरणातील बदल आपल्याला कळत असतात. थंडीची चाहूल लागताना तयार झालेली पिके आणि त्याचा येणारा विशिष्ट गंध आता हिवाळा सुरु होणार, त्याची जाणीव करून देतो. त्यानंतर उन्हाळा येतो. मला स्वताला सगळ्यात जास्त हिवाळा, त्यानंतर पावसाळा व शेवटी उन्हाळा आवडतो.


आत्ता कुठे पावसाची चाहूल लागली आहे. एकदा का तो धबाधबा कोसळायला लागला की पावसाळी पिकनीक, ट्रेक्स आणि अन्य पावसाळी कार्यक्रमांना सुरुवात होईल. बाहेर मस्त पाऊस पडत असताना गरम गरम कांदा भजी व गवती चहाची पाती किंवा आले घालून केलेल्या वाफाळत्या चहाचे घुटके घेण्यातील मजा काही और असते. प्रेमीजनांच्या मनातही हा पाऊस रुंजी घालतो. त्यांना वेगळ्या वातावरणात घेऊन जातो. आता पुन्हा एकदा ही सर्व धमाल सुरु होईल.


चला , पाऊस आल्याचा आनंद साजरा करु या, हो पण तो साजरा करताना भान ठेवा, आपला तोल जाऊ देऊ नका, क्षणिक मजेसाठी आयुष्य पणाला लावू नका...

शुक्रवार, १९ जून, २००९

तुकोबांचा अभंग आणि तीन माकडांची गोष्ट

महात्मा गांधी यांच्या तीन माकडांची गोष्ट सर्वाना माहिती आहे. या तीन माकडांपैकी एकाने आपल्या कानावर, एकाने डोळ्यांवर तर एकाने तोंडावर हात ठेवलेला आहे. वाईट ऐकू नका, पाहू नका आणि बोलू नका, असा संदेश ती आपल्याला देतात. महात्मा गांधी यांच्या तीन माकडांच्या या गोष्टीचे मूळ कदाचित संत तुकाराम यांच्या एका अभंगात दडलेले असावे, असे अभ्यासकांना वाटते. तुकोबांच्या अभंगावरून महत्माजींना स्फुरली तीन माकडांची गोष्ट अशी शेखर जोशी यांची बातमी लोकसत्ताच्या (१७ जून २००९) च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाली आहे.



महात्मा गांधी १५ ते २८ ऑक्टोबर १९३० या कालावधीत पुण्यातील येरवडा कारागृहात होते. कारागृहातील या कालावधीत त्यांनी तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांपैकी निवडक १६ अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला होता. या अनुवादित अभंगांमध्ये,

पापाची वासना नको दावू डोळा

त्याहूनी आंधळा बराच मी

निंदेचे श्रवण नको माझे कानी

बधीर करोनी ठेवी देवा

अपवित्र वाणी नको माझ्या मुखा

त्याहूनी मुका बराच मी

नको मज कधी परस्त्रीसंगती

जनातून माती उठता भली

तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा

तू ऐक गोपाळा आवडीसी

हा अभंगही असून तो महात्मा गांधी यांचा आवडता होता. त्यामुळे तीन माकडांच्या गोष्टीची प्रेरणा गांधीजींना या अभंगापासून मिळाली असावी, असे जाणकार व अभ्यासकांना वाटते. एका प्रार्थनासभेच्या प्रसंगी महात्मा गांधी यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना अभंग म्हणण्याची विनंती केली होती. त्यावेळी खेर यांनी गांधीजींना आवडणारा हाच अभंग म्हटला होता, अशी आठवण ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे समन्वयक दिलीप धोंडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितली, असल्याचे या बातमीत म्हटले आहे.


संत तुकाराम महाराज यांची ‘अभंगगाथा’www.tukaram.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठीबरोबरच अन्य भारतीय प्रादेशिक भाषेत तसेच इंग्रजीसह अन्य परदेशी भाषांमध्ये जगभरात गेली आहे. महाराष्ट्रातील आठवीच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ‘बालभारती’च्या इंग्रजी पुस्तकात तुकोबांचे निवडक अभंग अभ्यासाकरिता देण्यात आले असून ते महात्मा गांधी यांनी अनुवादित केलेले आहेत. यंदाच्या वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीचे हे नवे पाठय़पुस्तक तयार करण्यात आले आहे.


येरवडा कारागृहात असताना महात्मा गांधी यांनी ज्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला, त्यात जे का रंजले गांजले, पापाची वासना नको दावू डोळा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, न कळता काय करावा उपाय, मुक्तीपांग नाही विष्णुचिया दासा, काय वाणू आता न पुरे हे वाणी, नाही संतपण मिळते हे हाटी, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, वेद अनंत बोलिला, आणिक दुसरे मज नाही आता, न मिळो कावया न वाढो संतान, महारासी सिवे, कोपे ब्राह्मण तो नव्हे, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा, शेवटची विनवणी, संतजन परिसावी, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा आदी अभंगांचा समावेश आहे.


या १६ अभंगांपैकी पाच अभंग इंग्रजीच्या या पाठय़पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासायला देण्यात आले आहेत. यात जे का रंजले गाजले, जेथे जातो तेथे, पुण्य पर उपकार, नाही संतपण मिळत हे हाटी आणि हेची दान देगा देवा आदी अभंगांचा समावेश करण्यात आला आहे. ‘पापाची वासना नको दावू डोळा’ हा अभंग मात्र या पुस्तकात नसल्याचे या बातमीत म्हटले आहे.

गुरुवार, १८ जून, २००९

शब्दकोश रामदास स्वामी यांच्या साहित्यातील शब्दांचा

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत समर्थ रामदास स्वामी यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. बहुतेक संतांनी विठ्ठलाची तर रामदास स्वामी यांनी श्रीराम आणि मारुतीची उपासना जनमानसात रुजवली. केवळ उपासनेवर भर न देता त्यांनी त्याच्याबरोबरच बलोपासनेवर मोठा भर दिला होता. रामदास स्वामी यांनी विपूल ग्रंथलेखन केले. यात मनाचेश्लोक, दासबोध, करुणाष्टके आणि अन्य लेखनाचा समावेश आहे. त्यांनी केलेले लेखन हे आजच्या काळातही मार्गदर्शक व प्रेरणा देणारे आहे. समर्थांच्या या समग्र साहित्यातील शब्दांचा कोश नुकताच प्रकाशित झाला आहे. या कोशात रामदास स्वामी यांच्या साहित्यातील तब्बल अठरा हजार शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. रामभाऊ नगरकर व डॉ. मुकुंद कानडे या दोघा ज्येष्ठ तरुणांनी हे काम केले आहे. त्यांची वये अनुक्रमे ७६ व ७८ अशी असून या वयातही उत्साहाने आणि जिद्दीने कोशाचे काम त्यांनी पूर्णत्वाला नेले. हा शब्दकोश नुकताच प्रकाशित झाला आहे.


हा शब्दकोश दासबोध वगळून समर्थ रामदास स्वामी यांच्या समग्र साहित्यातील शब्दांचा असून वाचन, संशोधन, मेहनत आणि अन्य संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून नगरकर व डॉ. कानडे यांनी हा कोश संपादित व संकलित केला आहे. या अगोदर नगरकर व कानडे यांनी संत एकनाथ, नामदेव यांच्यावरील कोश तयार केले आहेत.


समर्थ रामदास स्वामी यांच्या समग्र साहित्यातील या कोशात रामदास स्वामी यांच्या साहित्यातील एकही शब्द वगळला गेला नसल्याचा दावा नगरकर यांनी केला. साहित्यातील प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ आणि व्याकरण, शब्दाचा संदर्भ, एकाच शब्दाचे असणारे वेगवेगळे अर्थ, रामदास स्वामी यांच्या साहित्यातील कठीण व समजण्यास अवघड असलेले शब्द व त्यांचा उलगडलेला अर्थही यात देण्यात आला आहे. शब्दकोश तयार करण्यासाठी शंकर देव, ल. रा. पांगारकर, अ. चिं. भट, शं. ना. जोशी आदींच्या ग्रंथांची संदर्भ म्हणून मदत घेण्यात आली आहे.


समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या साहित्यातून अनेक नवीन शब्द दिले असून त्यातील अनेक शब्द आजही प्रचलित आहेत. पण ते रामदास स्वामी यांनी दिलेले आहेत, हे आपल्याला माहिती नसते. असे अनेक शब्द आम्ही या कोशात दिले आहेत. लोकमान्य हा शब्द आज आपण सर्रास वापरतो, तो रामदास स्वामी यांचा आहे. हा शब्दकोश ५१२ पानांचा असून तो आम्ही दोघांनी प्रकाशित केला असल्याचे नगरकर यांनी सांगितले.


रामदास स्वामी यांच्या साहित्याचे अभ्यासक, मराठी विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी व साहित्यप्रेमी, धार्मिक साहित्यात रुची असणारे वाचक यांच्यासाठी हा शब्दकोश म्हणजे अमूल्य असा संदर्भ ठेवा आहे. नगरकर आणि कानडे यांनी वयाच्या या टप्प्यात केलेले हे काम सर्वानाच प्रेरणादायी आहे.


रामभाऊ नगरकर यांचा संपर्क दूरध्वनी ०२०-२४४९००७७

बुधवार, १७ जून, २००९

कमलाक्षरं

अक्षरंच माणसांचे सगेसोयरे

अक्षरंच होती श्वासाचे धुमारे

अक्षरंच घालतात हळूच साद

अक्षरंच होतात जगण्याचा नाद

अक्षरंच चेतवतात जीवनाच्या वाती

अक्षरंच आहेत अतूट नाती

अक्षरंच सजवतात जीवनसोहळा

अक्षरंच प्राण... अक्षरंच डोळा


अक्षरसम्राट कमल शेडगे यांचे कमलाक्षर हे पुस्तक येत्या १८ जून रोजी प्रकाशित होत असून त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर या ओळी देण्यात आल्या आहेत. शेडगे यांच्या आजवरच्या जीवनप्रवासाचे यथार्थ वर्णन या ओळीतून आपल्याला होते. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी, मराठी नाट्यसृष्टी, अनेक पुस्तके, दिवाळी अंकांची मुखपृष्ठे, जाहिरात विश्वासाठी आवश्यक असलेली सजावट, मांडणी, अक्षरांचे लेखांकन व मांडणी यात गेल्या अनेक वर्षांपासून कमल शेडगे हे नाव अग्रभागी आहे. शेडगे यांनी केलेले अक्षरांचे सुलेखन त्या नाटकाचे/चित्रपटाचे तसेच कोणत्याही साहित्यकृतीचा आशय अगदी सहजपणे प्रकट करते. त्यांनी केलेल्या जाहिराती या सर्वसामान्य रसिकांबरोबरच भल्या भल्या व्यक्तिमत्वांनाही भुरळ घालतात. असे हे अक्षरसम्राट कमल शेडगे हे येत्या २२ जून रोजी पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने राजेंद्र प्रकाशनातर्फे शेडगे यांचे कमलाक्षरं हे पुस्तक प्रकाशित होत आहे.


नाटककार प्रशांत दळवी यांनी या पुस्तकात कमलाक्षरं या शीर्षकाखाली लिहिलेल्या मनोगतात म्हटले आहे की, एक क्षेत्र आणि त्यात अनेक व्यक्ती हे् समीकरण आपल्या ओळखीचे आहे. पण एक क्षेत्र आणि त्यात आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहेर उठवणारी एकमेव व्यक्ती हे सूत्र मात्र क्वचितच अनुभवायला मिळते. मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात तब्बल ४५ वर्षे ज्यांच्या अक्षरसाम्राज्यावरचा सूर्य अस्ताला गेला नाही, अशी एकमेवाद्वितीय व्यक्ती म्हणजे अक्षरसम्राट कमल शेडगे. नाट्यक्षेत्रातल्या या त्यांच्या अफाट अक्षरकर्तृत्वाबरोबरच अनेक पुस्तके आणि नियतकालिकांच्या त्यांच्या शीर्षकानाही आपल्यावर खोल ठसा उमटवला आहे. अक्षर, माहेर या दिवाळी अंकांचे लोगे सुमारे २५ वर्षे तर कालनिर्णचा लोगो गेल्या ३३ वर्षांपासून आपण पाहतो आहोत. या खेरीज अनेक गाजलेल्या हिंदी व मराठी चित्रपटांची शीर्षके जीवंत करताना त्यांनी अक्षरांना कसा सिनेमॅटिक टच दिला आहे हे या पुस्तकात जागोजागी पाहायला मिळेल. या कमलाक्षरांचं काळाबरोबर एकवेळ वळण बदलेल, रुप,आकार, पोत बदलेल पण महत्व कालातीतच राहणार...


याच पुस्तकात ज्येष्ठ नाट्यनिर्माते मोहन वाघ, ज्येष्ठ लेखक व नाटककार रत्नाकर मतकरी, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सह्याद्री वाहिनीचे माजी संचालक मुकेश शर्मा, ज्येष्ठ नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी, नाटककार प्र. ल. मयेकर, कवी प्रसाद कुलकर्णी, ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव, दत्ता पाडेकर तसेच मं. गो. राजाध्यक्ष यांनी शेडगे यांच्या अक्षरलेखनाबद्दल व्यक्त केलेले अभिप्राय देण्यात आले आहेत. शेडगे यांना २००२ मध्ये कै. कृ. रा. परांजपे गुणिजन कला पुरस्कार मिळाला होता. तेंव्हा त्यांना देण्य़ात आलेले मानपत्रही या पुस्तकात पाहायला मिळते. रवी परांजपे फाऊंडेशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांनी हे मानपत्र लिहिले आहे.


९२ पानांचे हे पुस्तक १३० ग्रॅम आर्ट पेपरवर आणि रॉयल साईझ आकारात आहे. पुस्तकात ९२ कृष्णधवल व ८ रंगीत चित्रे आहेत. शेडगे यांनी मराठी व हिंदी चित्रपट तसेच मराठी नाटकांच्या केलेल्या विविध जाहिरातींचे नमुने यात देण्यात आले आहेत. प्रत्येक नाटकांच्या केलेल्या शीर्षकाबाबतची शेडगे यांची टीपणी त्याखाली देण्यात आली आहे. हे सर्व पुस्तक वाचणे/पाहणे हा एक सुंदर अक्षरानुभव आहे. पुस्तकाच्या पहिले पान उलगडल्यापासून आपण त्यात इतके रंगून जातो. दिवंगत ज्येष्ठ सुलेखनकार र. कृ. जोशी यांनी शेडगे यांच्या अक्षरप्रदर्शनाच्या निमित्ताने लिहिलेला खास लेख, प्रा. मं. गो. राजाध्यक्ष यांचा शेडगे यांच्यावरील अक्षरांचा शहेनशहा हा लेख, जयंत पवार यांचा कमलाक्षरं हा लेखही पुस्तकात देण्यात आला आहे.


सुंदर सुलेखन व अक्षरलेखनाची आवड असणाऱयांसाठी तसेच सर्वसामान्य वाचक, रसिक आणि कला शाखेचे विद्यार्थी व अभ्यासकांसाठी हे पुस्तक म्हणजे अमूल्य ठेवा आहे. राजेंद्र कुलकर्णी यांनी एक खूप चांगले पुस्तक उत्तम छपाईस मांडणीसह सादर केले आहे.


संपर्कासाठी पत्ता- राजेंद्र प्रकाशन (राजेंद्र कुलकर्णी)
महाराजा बिल्डिंग, पोर्तुगिज चर्चसमोर, गिरगाव,
मुंबई-४००००४
दूरध्वनी ०२२-२३८२३५४८/२८३३२४०६
ईमेल rajendraprakashan@gmail.com

कमल शेडगे
१००२ ईस्टर्न हाऊस, टाटा कॉलनी,
मुलुंड (पूर्व), मुंबई-४०००८१
दूरध्वनी ०२२-२१६३२९८३

मंगळवार, १६ जून, २००९

ही तर सणसणीत चपराक...

नाशिकचे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांच्या जाहीर केलेल्या बदलीला अखेर राज्य शासनाने स्धगिती दिली आहे. सर्वसामान्य आणि विविध क्षेत्रातील नाशिककरांनी मिश्रा यांच्या बदलीच्या विरोधात रस्त्यावर उतरून आपला तीव्र संताप प्रकट केला होता. अखेर राज्य शासनाला त्याची दखल घेऊन या बदलीला स्थगिती देणे भाग पडले. स्वच्छ आणि प्रामाणिक अधिकाऱयांच्या पाठीशी उभे राहून नाशिककरांनी एक चांगला पायंडा पाडला आहे. अशा प्रकारे अन्यत्र एखाद्या चांगल्या, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱयांची बदली झाली तर तेथेही नाशिकचाच कित्ता गिरवला गेला पाहिजे. लोकांच्या रेट्यामुळे आणि संघटीत जनशक्तीमुळे केलेली बदली स्थगित करायला लागणे म्हणजे राज्य शासनाला लगावण्यात आलेली सणसणीत चपराक आहे. किमान आता तरी राजकारणी मंडळी यातून काही शिकतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.


नाशिक पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मिश्रा यांनी कोणाच्याही दबावाला आणि दडपणाला भीक न घालता आपले काम कर्तव्यदक्षपणे केले. पोलिसांचे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, असे जे ब्रीदवाक्य आहे, त्याच्याशी ते प्राणाणिक राहिले. सर्वपक्षीय गुंडांना त्यांनी तडीपारीच्या नोटीसा बजावल्या. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पुढारी म्हणून वावरणाऱया व्हाईट कॉलर गुंडांसहित अवैध धंदे व व्यवसाय करणाऱया गुन्हेगारानाही, त्यांनी त्यांची जागा दाखवून दिली. एखादा सनदी किंवा पोलीस अधिकारी आपले काम प्रामाणिकपणे करतो, लोकांच्या भल्यासाठी प्रशासन व पोलीस यंत्रणा राबवतो, तेव्हा तो लोकांच्या गळ्यातील ताईत बनतो. मात्र असे अधिकारी मंत्री, राजकीय नेते यांना नकोसे असतात. मग मंत्री, नेते आणि त्यांच्या ताटाखालची मांजरे असलेली मंडळी अशा प्रामाणिक, स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱयांची बदली करतात किंवा त्यांना बढती देऊन अन्यत्र पाठवतात. त्यामुळे आपल्या मर्जीतील आणि हाजी हाजी कऱणारा अन्य एखादा अधिकारी त्या जागी त्यांना आणून बसवता येतो.


मिश्रा यांच्या बदलीबाबतही तसेच घडले. मिश्रा यांनी सुरु केलेल्या धडक कारवाईमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे, मंत्र्यांचे धाबे दणाणले. मग मिश्रा यांनीच बदली करण्याबाबत विनंती केली होती, असे नाशिकचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बेधडक सांगितले. मात्र त्यावर मिश्रा यांनी तातडीने आपण अशी कोणतीही विनंती केली नसल्याचे सांगून भुजबळ यांचे दात त्यांच्याच घशात घातले. उलट केंद्र शासनाच्या प्रतिनियुक्तीवर किमान पाच वर्षे आपल्याला पाठवताच येणार नाही, असेही त्यांनी सांगून टाकले. इकडे सर्वसामान्य नाशिककरांबरोबरच व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, काही राजकीय पक्ष हे या बदलीच्या विरोधात रस्त्यावर उतरले. गेल्या काही दिवसांपासून विविध गुंड टोळ्यांनी नाशिकमध्ये हैदोस घातला होता. या टोळ्यांचे म्होरके कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित असल्याने पोलीस यंत्रणा त्यांना हात लावायला घाबरत होती. त्यामुळे लुटालूट, खंडणी, छेडछाड यांना उत आला होता. दोन महिन्यांपूर्वी नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून आलेल्या मिश्रा यांनी याच्या विरोधात कठोर पावले उचलली आणि सर्वसामान्य नाशिककरांना दिलासा दिला.


मुळात ही बदली का करण्यात आली, असा प्रश्न निर्माण होतो. कदाचित मिश्रा यांची बदली केल्यामुळे जो जनक्षोभ उसळला आणि त्यांच्या समर्थनार्थ सर्वसामान्य नाशिकरांसह विविध क्षेत्रातील लोक एकत्र आले आणि रस्त्यावर उतरले, त्याची कल्पना राजकारणी व गृहमंत्री जयंत पाटील यांना तेव्हा आली नसेल. बदली तर केली, काय होणार आहे, अशा थाटात उपमुख्यमंत्री भुजबळ वावरत होते. मात्र संघटित जनशक्तीचा रेटा असा काही लागला की मिश्रा यांनीच बदली करण्याबाबत विनंती केली होती, असे सांगणाऱया भुजबळ यांनाच ही बदली स्थगित करावी, अशी विनंती गृहमंत्री जयंत पाटील यांना करावी लागली. मात्र मिश्रा यांच्या सारख्या प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अधिकाऱयांची कोणाच्या तरी सांगण्यावरून बदली करण्यापूर्वी जयंत पाटील यांनी काही सारारार विचार का केला नाही, बदली प्रकरण त्यांनी इतक्या सहज का घेतले.


अगोदरच गुंडांचा पक्ष म्हणून आपल्या पक्षाची जनमानसात प्रतिमा तयार होत आहे, त्यात मिश्रा यांची बदली केली तर त्याला खतपाणीच मिळेल, असा साधा विचारही जयंत पाटील यांच्या मनात आला नाही का, की मिश्रा यांची बदली केली जावी, म्हणून त्यांच्यावर कोणी दबाव आणला होता, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते व अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी जयंत पाटील व भुजभल यांची जाहीर कानउघाडणी का केली नाही, की त्यांचाही या बदलीस मुक पाठिंबा होता, अशा प्रकारे जर कोणी सनदी किंवा पोलीस अधिकारी काम करत असेल, तर ती त्याची चूक आहे का, की त्याने असे काम करुच नये, केवळ मंत्री, राजकारणी यांची हाजीहाजी करत आपल्या ताटाखालचे मांजर व्हावे, अशी अपेक्षा शरद पवार, भुजबळ व जयंत पाटील यांची आहे का, असे अनेक प्रश्न यातून निर्माण होत आहेत.



जोशीपुराणवर दोनच दिवसांपूर्वी मी विनाशकाले विपरितबुद्धी या लेखाद्वारे हा विषय मांडला होता. त्यात मी म्हटलेही होते की जनक्षोभाच्या रेट्यामुळे राज्य शासनाला ही बदली रद्द करावी लागली, तशी नामुष्की त्यांच्यावर आली तरी ही निर्लज्ज मंडळी पुन्हा तोंड वर करून त्याचेही समर्थन करतील आणि लोकांच्या विनंतीचा व मताचा आदर करत आम्ही ही बदली रद्द करत आहोत,असे निर्लज्जपणे सांगतील. या प्रकरणी तसेच झाले. गृहमंत्री जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत मिश्रा यांच्या बदलीला तात्पुरती स्घगिती देत असल्याची घोषणा केली. मात्र ती करताना नाशिकच्या जनतेचे मी अभिनंदन करतो, भुजबळ व आमदार शोभा बच्छाव यांनी ही बदली स्थगित करण्याची विनंती केली होती. त्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे.
म्हणजे पडलो तरी यांचे नाक वर, माकड म्हणते माझीच....तसा प्रकार आहे.


असो. पण झाले हे चांगले झाले. जनशक्तीच्या रेट्यापुढे शासनाला झुकावे लागले आणि अगोदर केलेली बदली स्थगित करण्याची नामुष्की गृहमंत्र्यांवर आली. हे उदाहरण म्हणजे सत्तेचा माज चढलेले राज्य शासन, मंत्री, राजकारणी आणि सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी डोळ्यातील झणझणीत अंजन ठरावे आणि यापुढे कोणत्याच राजकीय पक्षाच्या शासनाला असे करण्याची दुर्बुद्धी होऊ नये आण तशी ती झाली तर जनशक्तीचा सोटा त्यांच्या टाळक्यात बसल्याखेरीज राहणार नाही, हेच या घटनेने दाखवून दिले आहे. त्यासाठी नाशिककरांचे अभिनंदन...

सोमवार, १५ जून, २००९

महाराष्ट्रातील शक्तिस्थाने

आपल्या देशात आणि महाराष्ट्रातही वेगवेगळ्या प्रकारची धर्मस्थाने खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या प्रत्येक धर्मस्थळाचे वैशिष्ट्य वेगवेगळे असून आनेक भक्त मंडळी वर्षातून एकदा किंवा जमेल तसे या धार्मिक स्थळांना भेट देत असतात. सध्याच्या धकाधकीच्या आणि जीवघेण्या स्पर्धेच्या आयुष्यात लोकांना सतत काळजी, विवंचना, समस्या भेडसावत असतात. त्यातून प्रत्येकजण आपापल्या परिने मार्ग काढत असतो. काहीजण देव-धर्म, धार्मिक स्थळे, देवस्थाने आदी ठिकाणी भेट देऊन व देवदर्शन करून आपल्या मनाला शांतता व समाधान मिळवून घेत असतात तर काही जण जपजाप्य, पूजाअर्चा, ध्यानधारणा आदींच्या सहाय्याने मनावरचा ताण-तणाव आणि काळजी दूर करतात. महाराष्ट्रातही अशी अनेक धार्मिक स्थळे असून आपल्याला ती सर्व माहिती असताततच असे नाही. रामकृष्ण विनायक अभ्यंकर यांनी आपल्या महाराष्ट्रातील शक्तिस्थाने (मराठी कुटुंबियांची कुलदैवते) या पुस्तकातून अशा धार्मिक स्थळांची व देवस्थानांची माहिती करून दिली आहे.


हे पुस्तक आमोद प्रकाशन यांनी प्रकाशित केले आहे. अभ्यंकर यांना पर्यटनाची मनस्वी आवड असून गेली चाळीस वर्षे त्यांची भ्रमंती सुरु आहे. एस. टी.च्या पर्यटक पासाचा वापर करून त्यांना बराचसा महाराष्ट्र पाहिला आहे. गेली २५ वर्षे विविध वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके यातून त्यांचे विविध विषयांवर लेखनही सुरु असते. अभ्यंकर यांनी या पुस्तकात महाराष्ट्रातील शंकर, देवी, गणेश, परशुराम, श्रीराम, शनिदेव, दत्त, बालाजी, विठ्ठल, मारुती आदी दैवतांच्या विविध देवळांचा, धार्मिक स्थळांची माहिती करून दिली आहे. तसेच प्राचीन विद्यानगरी कान्हेरी, समर्थ रामदास स्वामी यांची शिवथरघळ, चिंचवडचे मोरया गोस्वामी आणि चिपळूणचा कालभैरव यांची माहिती करून दिली आहे.

शंकराच्या स्थानांमध्ये व्याडेश्वर-रत्नागिकी, महाबळेश्वर मंदिर-महाबळेश्वर, गोंदिया जिल्ह्यातील कामठ्याचे शिवमंदिर, वेंगुर्ला येथील श्रीदेव रामेश्वर, अंबरनाथचे प्राचिन शिवमंदिर, ठाण्यातील श्री कोपिनेश्नवर मंदिर, कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा, जेजुरीचा खंडोबा, रत्नागिरी जिल्ह्यातील श्री नाटेश्वर, सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र शिखऱ शिंगणापूर, मुंबईजवळील मढ येथील किल्लेश्वर महादेव, हरिहरेश्वर, रायगड जिल्ह्यातील कनकेश्वर, पुणे जिल्ह्यातील भुलेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यातील कर्णेश्वर व येथीलच काळबादेवीचा रामेश्वर, किरडुव्याचा सोमेश्वर, पुणे जिल्ह्यातील प्राचीन शिवमंदिर बनेश्वर, नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर, बारा ज्योतिर्लिंगातील घृष्णेश्वर, परळी वैजनाथ, श्री क्षेत्र भीमाशंकर, श्री औढ्या नागनाथ तसेच वसई जवळील तुंगारेश्वर व रागड जिल्ह्यातील श्री वैजनाथ यांचा परिचय करून दिला आहे.


देवीस्थानांमध्ये सातारा जिल्ह्यातील श्री कृष्णा मंदिर, कोल्हापूरची महालक्ष्मी, अंबेजोगाईची अंबाभवानी, रत्नागिरी जिल्ह्यातील कळकवणे येथील श्रीरामवरदायिनी, तुळजाभवानी, श्रीवर्धन येथील सोमजाई देवी, श्री भराडीदेवी, मांढरा देवी, आडिवऱयाची श्री महाकाली,चिपळूण येथील श्री विंध्यवासिनी, वणीची सप्तशृंगी, ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी, माहुरची रेणुकादेवी, डहाणू व केळशीची महालक्ष्मी, कार्ल्याची एकविरा देवी, मुंबईतील महालक्ष्मी, नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील मोहटा देवी यांची माहिती आहे.


महाराष्ट्रात गणेशाची स्वयंभू स्थाने म्हणून अष्टविनायक सर्वानाच माहिती आहेत. या अष्टविनायक स्थानांसह राज्यातील अन्य प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा श्री गणेश स्थानांची माहितीही या पुस्तकात वाचायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यातील अडे (पाडले) व याच जिल्ह्यातील परशुराम येथे असलेल्या अनुक्रमे भार्गवराम व परशुराम मंदिरांची माहितीही अभ्यंकर यांनी करून दिली आहे. तसेच श्रीराम, शनि, दत्त, बालाजी, विठ्ठल, समर्थस्थापित मारुती स्थाने व अन्य मारुतीची देवळे याबद्दलही वाचायला मिळते.


अभ्यंकर यांनी ही माहिती देतांना ती स्थाने कुठे आहेत, त्या ठिकाणी कसे जायचे याबरोबरच त्या त्या देवस्थानाच्या स्थापनेचा इतिहास, पौराणिक/ऐतिहासिक आख्यायिका, जुने संदर्भही सांगितले आहेत. त्यामुळे वाचकांसाठी हे पुस्तक संग्राह्य झाले आहे. यातील अनेक देवस्थाने व धार्मिक स्थळे ही मराठी माणसांची कुलदैवते आहेत. आपल्या कुलदैवताबरोबरच मराठी माणसांची अन्य विविध कुलदैवतांची माहिती या पुस्तकात एकत्र मिळते.


संपर्कासाठी लेखकाचा पत्ता
रामकृष्ण अभ्यंकर, २/४६, भक्तियोग सोसायटी, परांजपे नगर, वझिरा नाका, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४००००९१
दूरध्वनी क्रमांक ०२२-२८३३८८०८


संपर्कासाठी प्रकाशकांचा पत्ता
आमोद प्रकाशन (नीमा ठाकूर), ५८, गोयल ट्रेड सेंटर, सोना सिनेमा कंपाऊंड, शांतिवन, बोरिवली (पूर्व), मुंबई-४०००६६
दूरध्वनी ०२२-५५२९४८४४

रविवार, १४ जून, २००९

विनाशकाले विपरीत बुद्धी

राजकारणी म्हटले की वकीलांसारखे खऱयाचे खोटे आणि खोट्याचे खरे नेहमीच करावे लागते. आपले चुकले असले तरी चूक कबुल करायची नाही, घोळवत घोळवत काहीतरी कारणे सांगत राहायचे, त्या विषयावरुन लोकांचे लक्ष भलत्याच विषयाकडे वळवायचे, यात ही मंडळी तरबेज असतात. राजकारणी मंडळींना- मंत्र्यांना किंवा खरेतर कोणत्याही क्षेत्रातील उच्चपदस्थांना आपले काम प्रामाणिकपणे करणारी, कर्तव्यतत्पर आणि स्पष्टवक्त्या स्वभावाची माणसे नको असतात. भारतीय प्रशासकीय किंवा पोलीस सेवेत एखादा अधिकारी जर हुषार, प्रामाणिक, पैसे न खाणारा, वरिष्ठांची हाजी-हाजी न करणारा, स्वत भ्रष्टाचार न करणारा व दुसऱयांनाही करु न देणारा, अवैध धंदे व व्यवसाय यांना पाठीशी न घालणारा असा कोणी अधिकारी असेल तर तो फार दिवस त्या पदावर टिकत नाही, असे आपल्याला नेहमीच दिसून येते.


अशी प्रामाणिक व स्वच्छ कारभार करणारे अधिकारी राजकारण्यांनाही नकोसे होतात. त्यांना असे अधिकारी म्हणजे आपल्या मार्गातील कटकट व अडथळा वाटत असतो. त्यामुळे मग काही ना काही कारणाने किंवा निमित्ताने त्यांची बदली केली जाते. असाच अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. त्या संदर्भातील बातम्या आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. नाशिकमधून गुंडाना तडीपार करणारे नाशिकचे पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रा यांचीच राज्य शासनाने नाशिकमधून हकालपट्टी केली आहे. काही दिवसांपूर्वीच आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता गुंडांच्याविरोधात थेट कारवाई सुरु केली होती. नाशिक शहरात निर्माण झालेले गुंडाराज संपविण्यासाठी त्यांनी अनेक ठोस उपाय केले होते. गुंडांच्या विरोधात तडीपारी, मोक्का या सारखे कडक उपाय हाती घेतले होते. त्यामुळे नाराज झालेल्या राजकारण्यांकडून विशेषत सत्ताधारी मंडळींकडून त्यांच्या बदलीसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. राजकीय पक्षांच्या आड लपणाऱया गुंडांना तडीपार करणऱया मिश्रा यांच्यावर बदलीची कारवाई करण्यात आल्यामुळे गुंड व सत्ताधाऱयांनी आपल्या पद्धतीने मिश्रा यांचा अडथळा दूर केल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नाशिककरांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.


या संदर्भात काल एका मराठी वृत्तवाहिनीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया दाखवण्यात आली. मिश्रा यांनीच विनंती केल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. प्रत्यक्षात आपण अशी कोणतीही विनंती केली नसल्याचे मिश्रा यांचे म्हणणे आहे. नाशिकमधील सर्वसामान्य जनमत मिश्रा यांच्या बाजूने आहे. मिश्रा यांच्या बदलीच्या विरोधात काही संघटना, राजकीय पक्ष आणि लोकांनी तीव्र आंदोलन करायचे ठरवले आहे. त्यामुळे कदाचित सत्ताधाऱयांना त्यांची बदली रद्दही करावी लागेल. जनमताची भावना लक्षात घेऊन आम्ही ही बदली रद्द करत असल्याचेही निर्लज्जपणे राज्य शासनाकडून सांगण्यात येईल. खरे तर सध्याचा काळ हा राष्ट्रवादी पक्षासाठी प्रतिकूल आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी सीबीआयने राष्ट्रवादीचे बडे नेते, माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांना अटक केली आहे. पाटील यांना ज्या दिवशी अटक केली तेव्हाच त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येऊन खासदारकीचा राजीनामा द्यायला भाग पाडायला हवे होते. राष्ट्रवादी म्हणजे गुंडांचा पक्ष ही प्रतिमा जनमानसात तयार होत आहे आणि राज्यात याच पक्षाकडे गृहमंत्रीपद आहे.


आत्ताचे जे गृहमंत्री आहेत, त्यांच्यापूर्वीही गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच होते. पद्मसिंह पाटील प्रकरणी त्यांनी नरमाईची भूमिका घेतली असल्याचा आरोप करण्यात येत आहेच. त्यामुळे खरे तर या प्रकरणात गृहमंत्री जयंत पाटील यांनी मिश्रा यांच्या बदलीबाबत
कोणाचाही दबाव आला असला तरी त्यापुढे झुकायला नको होते. ज्या कोणी मिश्रा यांची बदली करण्यासाठी सांगितले असले, त्यांना ठामपणे त्यांची बदली केली जाणार नाही, असे सुनवायला हवे होते. अर्थात ज्या पक्षाच्या उच्च नेत्यानेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण व गुन्हेगारीचे राजकारण सुरु केले, गुन्हेगारांना निवडणुकीत उमेदवारी देऊन त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली, ज्याच्याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात पाताळयंत्री, धूर्त, कावेबाज आणि काडीचीही विश्वासार्हता नसलेला अशी प्रतिमा ज्या पक्षाच्या प्रमुखाबद्दल आहे, त्या राष्ट्रवादी साहेबांच्या चेल्यांकडून वेगळी अपेक्षा तरी काय करणार.


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्यांना दोन अंकी संख्येइतकेही खासदार निवडून आणता आले नाहीत, ते पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. निवडणुकीतील या पराभवापासून तसेच पद्मसिंह पाटील प्रकरणातून तरी राष्ट्रवादीचे हे साहेब काही धडा घेतील, असे वाटत होते. पण मिश्रा यांच्या बदली प्रकरणावरून त्यांनी असा कोणताही धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे. खरे तर मिश्रा यांच्या अशा झालेल्या बदलीप्रकरणी राष्ट्रवादीच्या या साहेबांनी संबंधितांचे व गृहमंत्री जयंत पाटील यांचे कान उपटायला हवे् होते. पण या प्रकरणी त्यांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. राष्ट्रवादीचे हे साहेब, त्यांचे गृहमंत्री व पक्षासाठी मिश्रा यांची केलेली बदली म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी आहे, असेच म्हणावे लागेल आणि त्याची फळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला नक्कीच भोगावी लागतील.

शनिवार, १३ जून, २००९

अकरावी प्रवेशाचा यंदाही मनस्ताप

बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला असून आता सगळ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे. दहावीचा निकाल तोंडावर आला असला तरी अकरावीच्या प्रवेशाबाबत कोणते धोरणे राबवायचे, कोणत्या सूत्रानुसार प्रवेश द्यायचे या बाबतचा घोळ अद्यापही सुरु आहे. अकरावीच्या प्रवेशाबाबतचा हा घोळ विद्यार्थी आणि पालकांसाठी काही नवा नाही. दरवर्षी काही ना काही कारणाने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत घोळ निर्माण होऊन राज्य शासन विद्यार्थी व पालकांच्या मनावरील ताण वाढवत असते. मूळात प्रश्न पडतो की हे सर्व दहावीचा निकाल जाहीर होण्याअगोदरच काही दिवसांपूर्वी का सुरु होते, यात किमान एख वर्ष ते सहा महिने अगोदर का तयारी करता येऊ शकत नाही, पालक व विद्यार्थ्यांच्या सहननशीलतेचा अंत का पाहिला जातो.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा महामंडळातर्फे मार्चमध्ये दहावीच्या परीक्षा घेतल्या जातात. त्याचा निकाल जूनच्या महिन्यात जाहीर होतो. मात्र आपल्या राज्य परीक्षा महामंडळाच्या १० वीच्या परीक्षेच्या निकालाअगोदर सीबीएसई,आयसीएसई बोर्डाच्या १० वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होतात. आपल्या राज्यातील दहावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत सीबीएसई व आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना अमाप गुण मिळालेले असतात. आपल्या येथील महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जीवघेणी स्पर्धा असते. गुणवत्ता यादीत एकेका क्रमाकांवर अनेक विद्यार्थी असतात. नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी केवळ मिळालेले गुण हाच निकष असल्याने त्यात आपल्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांपेक्षा सीबीएसई व आयसीएसईचे विद्यार्थी जास्त टक्के गुण असल्याने बाजी मारून जातात.


त्यामुळे आपल्या बोर्डाच्या मुलांना प्रवेश मिळण्यास अनेक अडचणी येतात किंवा प्रवेशापासून वंचित राहावे लागते. त्यासाठी यंदाच्या वर्षी राज्यातील शालांत शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांसाठी ९० टक्के आणि सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी १० टक्के अशा सूत्रावर अकरावीला प्रवेश देण्याचा विचार सुरू असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केले होते. त्यामुळे राज्यातील दहावीच्या शिक्षण मंडळाचे लाखो विद्यार्थी व पालक यांच्याकडून त्याविषयी समाधान व्यक्त करण्यात आले होते. त्यामुळे दरवर्षी आपल्या राज्यातील बोर्डाच्या मुलांना प्रवेश मिळविण्यासाठी ज्या अडचणी येतात, त्यातून नक्की सुटका झाली असती. मात्र या बाबत आता घोळ निर्माण झाला आहे. सीबीएसई व आयसीएसई बोर्ड विद्यार्थ्यांच्या पालकांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे हा निर्णय अद्याप अधांतरी असल्याचा तसेच ९०-१० टक्के कोट्याप्रमाणे प्रवेश झाले नाहीत तर सोमवारपासून उपोषण करण्याचा इशारा राज्य माध्यमिक शालांत बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या पालक संघटनेने दिला आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत यंदाही घोळ होण्याची शक्यता आहे.


या प्रकरणी सीबीएसई-आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे पालक न्यायालयात गेले तर ९०-१० च्या कोट्याबाबत काही कायदेशीर अडचणी येऊ शकतील, असे राज्य शासनाला वाटत आहे. अशा अडचणी आल्या तरी राज्य शासनाने आपल्या ९०-१० कोट्याच्या सूत्राशी ठाम व खंबीर राहिले पाहिजे. राज्यात नोकऱयांसाठीही लघु व मध्यम उद्योगांमध्ये ९४ टक्के व विशाल प्रकल्पांमध्ये ९१ टक्के नोकऱया स्थानिक भूमिपुत्रानाच मिळाल्या पाहिजेत व ८० टक्के भूमिपुत्रांना नोकऱया राखीव ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य़ शासनाने यापूर्वीच घेतलेला आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या संदर्भात नुकतीच राज्याच्या विधीमंडळात माहिती दिली. घटनेनुसार कोणत्याही प्रांतातील व्यक्तीला कोणत्याही राज्यात नोकरी, व्यवसाय करण्याची मुभा आहे. त्यामुळे परप्रातीयांना डावलण्याची सक्ती शक्य नसल्याने केवळ स्थानिकानाच रोजगारात प्राधान्य देण्याचे आवाहन करणारा शासकीय आदेश काढण्यात आला. महाराष्ट्राप्रमाणेच अन्य राज्यातही भूमिपुत्र व स्थानिकानाच नोकरय़ांमध्ये प्राधान्य देण्यात येते.


असे जर आहे, तर अकरावीच्या प्रवेशासाठीही तेच सूत्र अवलंबले तर त्यात काहीच चूक नाही. राज्य शासनाने सीबीएसई-आयसीएसई बोर्ड व त्यांच्या पालकांच्या दबावाला अजिबात बळी पडू नये. या प्रकरणी न्यायालयात कोणी गेले तर निष्णात वकील देऊन आपली बाजू न्यायालयात मांडावी. ९०-१० कोट्याच्या सूत्राशी ठाम राहावे. या निर्णयाला राज्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी उगाचच फाटे न फोडता किंवा मराठीचा मुद्दा म्हणून न पाहता राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठीचा एक चांगला निर्णय म्हणून पाहावे. उगाच विरोधासाठी विरोध करु नये. सर्वपक्षीय आमदार व खासदार यांनी आपली एकजूट जाखवली तर या निर्णयाला होणारा विरोध नक्की मोडून पडेल. गरज आहे ती प्रखर इच्छाशक्तीची व तळमळीची...

शुक्रवार, १२ जून, २००९

गुटख्याचा विळखा...

मोठी माणसे, महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा तरुणच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांमध्येही गुटख्याचे व्यसन वाढत चालले आहे. देशाच्या भावी पिढीलाही गुटख्याचा विळखा पडला असून ही बाब अत्यंत गंभीर व काळजी करण्यासारखी आहे. गुटखा खाणे ही आता एक फॅशन झाली असून शालेय विद्यार्थीही त्याच्या आहारी गेले आहेत. एखादा गुटखा न खाणारा विद्यार्थी हा गुटखा खाणाऱया विद्यार्थ्यांच्या चेष्टेचा विषय ठरत आहे. विविध प्रसारमध्यमे आणि डॉक्टर मंडळींकडून गुटखा व तंबाखूचे दुष्परिणाम लोकांसमोर आणूनही गुटखा खाणे कसे कमी होत नाही, याचेच आश्चर्य आहे. आत्ता तर खाऊन घेऊ व मजा करु, पुढचे पुढे पाहू काय होईल ते होईल, अशी बेदरकार प्रवृत्ती शालेय विद्यार्थी आणि तरुणांमध्ये वाढील लागल्यामुळे केवळ गुटखाच नव्हे तर सिगरेट, दारू आणि अन्य व्यसने करण्याचे प्रमाणही वाढत आहे.


गेल्या वर्षी देशात या संदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील निष्कर्ष हे धक्कादायक असून देशभरात पंधरा वर्षांखालील पन्नास लाख मुले गुटख्याच्या आहारी गेल्याचे दिसून आले होते. अन्य एका सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशमध्ये ज्या मुलांना गुटख्याचे व्यसन लागले होते, त्यापैकी १६ टक्के मुलांमध्ये तोंडाच्या कर्करोगाची सुरुवात झाल्याचे दिसून आले होते. शालेय विद्यार्थ्यांच्या या गुटख्याच्या व्यसनाबाबतची एक बातमी नुकतीच काही मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यात मुंबई महापालिकेतील शांळांमधील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना गुटख्याचे व्यसन लागले असल्याचे या बातमीत म्हटले आहे. महापालिका शाळांच्या जवळपास गुटखा विकणाऱया अनेक टपऱया असून त्या दुकानांमधून गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात मुळात अशा दुकानांना अधिकृत परवानगी कशी काय दिली गेली, जर या दुकानांना अधिकृत परवानगी नसेल, तर कोणाच्या आशीर्वादामुळे ती दुकाने सुरु आहेत, यात कोणाकोणाचे हात गुंतले आहेत, पोलीस, महापालिका अधिकारी आणि व्यापारी यांच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे गुटख्याचा विळखा आणखी फोफावत आहे.


गुटख्याच्या सेवनाचे अवेक वाईट परिणाम ते सेवन करणाऱयांवर होत असतात. अशा माणसांना तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. अशा माणसांना भूक लागत नाही, ती कमी होत जाते. शांत झोप लागत नाही, ही माणसे कोणत्याही विषयावर आपले लक्ष एकाग्र करू शकत नाहीत असे अनेक गंभीर परिणाम गुटखा खाण्याने होत असतात. हे वेळोवेळी जाहीर होते, तरीही माणसे गुटखा का खातात, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक यांच्यासमोर त्याचे वडील, मोठा भाऊ किंवा चित्रपट व दूरचित्रवाहिन्यांवरील अभिनेते यांचे आदर्श असतात. आपले काही राजकारणीही याचे सेवन उघडपणे करतात. त्याचा कळत नकळत परिणाम या मुलांवर होत असतो. त्या वयात स्वताचे चांगले वाईट कळत नसते किंवा ते कळून घ्यायची इच्छा नसते. मित्रांच्या संगतीने किंवा एकदा अनुभव घेऊन पाहू या म्हणून गुटखा, सिगरेट आणि दारू घेणे सुरु होते. कुठे थांबायचे किंवा या व्यसनांच्या किती आहारी जायचे याचे भान या मुलांना राहात नाही. त्यामुळे या व्यसनांचा विळखा त्यांच्या शरिराला पडतो. हा विळखा नंतर सुटता सुटत नाही. काही अपवाद असतात, की ते यातून बाहेर पडतात. पण अनेक लोकांच्या मानेभोवती पडलेला हा विळखा सुटता सुटत नाही आणि त्याचा फास त्यांच्याभोवतीच आवळला जातो.


या सर्व व्यसनाधीनतेला आपले राज्यकर्तेही तेवढेच जबाबदार आहेत. गुटखा, सिगरेट आणि दारू यांच्या उत्पादनापासून भले केंद्र व राज्य शासनाला कररुपाने महसूल मिळत असेल. पण त्यामुळे जर भावी पिढीची जर वाताहात होणार असेल तर असा महसूल न मिळालेला चांगला. कायदा करून किंवा अशा वस्तूंवर बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही. लोक त्यातून पळवाटा शोधून काढणारच. त्यामुळे याचे उत्पादन पूर्णपणे थाबवणे हाच त्यावरचा खरा उपाय आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि खरी तळमळ असेल तर गुटखा, सिगरेट आणि दारू यांच्या उत्पादनावर पूर्णपणे बंदी घालता येऊ शकेल. मात्र समजा भविष्यात असे झाले तर ही व्यसने कमी होतीलच याचीही खात्री देता येत नाही. कारण मग चोरून किंवा या वस्तूंची तस्करी करून त्या आपल्या येथे उपलब्ध होऊ शकतील, त्यातून आणखी नव्या समस्या निर्माण होतील. हे एक न संपणारे दुष्टचक्र आहे.


या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी किंवा गुटखा व अन्य व्यसनांच्या जाळ्यात न अडकण्यासाठी स्वताची विवेकबुद्धी जागृत ठेवणे आणि आपल्या मनाचा तोल जाऊ न देणे हेच आपल्या हातात आहे. ते प्रत्येकाने प्रामाणिकपणे करावे आणि गुटखा व अन्य व्यसनांचा फास आपल्या मानेभोवती आवळला जाणार नाही, त्याची काळजी घ्यावी.

बुधवार, १० जून, २००९

निर्लज्जम सदासुखी...

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, खासदार पद्मसिंह पाटील यांची पाठराखण करण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठरवले आहे. पद्मसिंह हे पक्षाचे ज्येष्ठ, सन्माननीय आणि प्रामाणिक सदस्य असल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी नवी दिल्ली येथे सांगितले असल्याच्या बातम्या आज वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्या आहेत. पद्मसिंह यांच्याबाबतीत पक्षाने घेतलेली ही भूमिका म्हणजे निर्लज्जम सदासुखी अशा प्रकाची आहे.


न्यायालययात जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला गुन्हेगार किंवा दोषी मानू नये, हे कायद्याच्या दृष्टीने योग्य असले तरी तात्वीक व नैतिक दृष्ट्या ते अयोग्य आहे. विशेषत सार्वजनिक जीवनात वावरणाऱया, राजकारणात असणाऱया आणि मंत्रीपद, आमदार, खासदार, नगरसेवक अशा लोकप्रतिनिधींसाठी तर ते क्षम्य नाहीच. खरे तर पक्षाने पाठराखण करण्यापूर्वीच पद्मसिंह यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायला हवा होता. त्यांनी तो दिला नाही तर पक्षप्रमुख म्हणून शरद पवार यांनी पद्मसिंह यांना तो देण्यास भाग पाडायला हवे होते. पण पवार यांनीही कठोर भूमिका घेतली नाही.


मूळात पवार या व्ययक्तीविषयी सर्वसामान्य जनमानसात चांगले मत नाही. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण पवारानीच सुरु केले, असे सर्वसामान्य लोकांचे म्हणणे आहे. उल्हासनगर येथील पप्पू कलानी, वसईतील हितेंद्र ठाकूर ही पवार यांच्याच आशीर्वादाने पुढे आलेली आणि राजकारणात प्रतिष्ठा मिळवलेली मंडळी. याच पवारांच्या विमानातून कुख्यात दाऊद इब्राहिमच्या दोन साथीदारांनी केलेला प्रवास लोक विसरलेले नाहीत. पवार म्हणजे धूर्त, कावेबाज, पातळयंत्री आणि अशा प्रकारच्या अनेक रसायनांचे मिश्रण असल्याचे लोक मानतात. त्यांच्याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात विश्वासार्हता अजिबात राहिलेली नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पवार यांच्या पक्षाला खासदारांची दोन अंकी संख्याही गाठता आली नाही आणि हे महाशय पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. पवार आपल्याच पक्षातील अन्य नेत्यांना जो न्याय लावतात, तो पद्मसिंह यांना का लावत नाहीत, ते पवार यांचे निकटचे नातेवाईक आहेत, म्हणून त्यांना सर्व गुन्हे माफ आहेत का, अशी शंका मनात येण्यास जागा आहे.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी तर पद्मसिंह यांच्यासाररखी माणसे खऱे तर कायमच तुरुंगात असायला हवीत, ही माणसे पाकिस्तानी दहशतवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक असल्याची सडेतोड टिका केली आहे.


आता या प्रश्नावरती सर्वपक्षीय राजकारणी पद्मसिंह, पवार आणि त्यांच्या पक्षावरती तुटून पडले आहेत. परंतु त्यांच्या त्यांच्या पक्षात काय आहे, असे जर त्यांच्या एखाद्या नेत्याच्या बाबतीत घडले असते, तर त्यांनी काय केले असते, असे प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात येत आहेत. पद्मसिंह यांच्या रुपाने सर्व विरोधकांना एक आयते कोलीत मिळाले आहे. अन्य पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीत अशा प्रकारची उदाहरणे घडली तेव्हा काय झाले, हे सहज आठवले तरी लक्षात येईल. अर्थात हे सांगणे म्हणजे पद्मसिंह किंवा पवार यांचे समर्थन करणे नाही, तर सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, त्यांचे हात किती बरबटलेले आहेत, एखादे प्रकरण आपल्या पक्षावर किंवा नेत्यावर शेकले की कशी सारवासारव केली जाते, मी किती स्वच्छ आणि प्रामाणिक आहे, हे कसे दाखवून दिले जाते, त्याची केवळ आठवण करून देण्यासाठीच हे लिहिले आहे. या मंडळींचे एक बरे असते. अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे किंवा नेते जो पर्यंत आपल्या पक्षात नसतात तो पर्यंत ते गुन्हेगार असतात. ते आपल्या पक्षात आले की पवित्र होतात, अशा थाटात सर्वपक्षीय नेते वागत असतात.


तर प्रश्न असा आहे की पवार हे पद्मसिंह यांची पाठराखण का करत आहेत. आपली आणि आपल्या पक्षाची जनमानसातील प्रतिमा चांगली नाही, हे माहिती असूनही पवार पद्मसिंह यांन पाठीशी का घालत आहेत, पद्मसिंह यांच्या जागी पक्षाचा दुसरा कोणी नेता असता, तर त्याचीही अशीच पाठराखण आणि संरक्षण पवारांनी केले असते का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपिस्थत होत आहेत. झी टीव्हीच्या कार्यालयावर हल्ला झाल्याचा नैतिक ठपका ठेवून पवार यांनी तेव्हाचे राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा राजीनामा घेतला होताच ना तसेच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणीही उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनाही राजीनामा द्यायला लावला होताच ना, मग आत्ताच हत्येसारखा गंभीर आरोप पद्मसिंह यांच्यावर असताना त्यांची पाठराखण का करण्यात येत आहे. खरे तर पद्मसिंह यांना सीबीआयने अटक केल्यानंतर तातडीने त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यायला लावणे आवश्यक होते, तसे झाले असते तर चांगला संदेश लोकांमध्ये गेला असता. न्यायालयात ते निर्दोष ठरले असते तर पुन्हा त्यांना संधी देता आली असती. पण पवारांनी ती संधी घालवली.


मुळात पद्मसिंह यांना अटक झाली असली तरी न्यायालयात त्यांना शिक्षा होईल, यावर सर्वसामान्य लोकांचा विश्वास नाही. आजवर कोणत्या बड्या राजकारण्याला अशा प्रकारे शिक्षा झालेली आहे, ही सर्व मंडळी सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर काहीही करू शकतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. खऱे तर अशा लोकांना मतदारांनी योग्य धडा शिकवण्याची गरज आहे. अशी मंडळी मग ती कोणत्याही पक्षातील असो, निवडणुकीला मग ती नगरसेवक, आमदार किंवा खासदार आदी पदांसाठी उभी राहिली तरी त्यांना पाडायचेच, असे प्रत्येकाने ठरवले पाहिजे. पण म्हणतात ना, राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर गेंड्याची कातडी आणि निर्लज्ज असायला पाहिजे. जो असा असतो, तोच राजकारणात यशस्वी होऊ शकतो. राजकीय नेते सर्वसामान्य मतदारांना गृहीत धरतात, मतदार आणि सर्वसामान्य नागरिक चार-सहा महिन्यांत सर्व काही विसरुन जातील, असा त्यांचा ठाम विश्वास असतो आणि त्याच बळावर हवे ते करायला आणि करून सवरुन निर्लज्जासारखे मिरवायलाही ते पुढे असतात.


गेल्या काही वर्षांत अशा घटना वारंवार घडत आहेत. सत्ता आणि संपत्तीचा माज चढलेल्या या सर्वपक्षीय राजकाऱण्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. शेवटी लोकांच्या सहनशीलतेलाही काही मर्यादा असतात. राजकारणी मंडळी वेळीच शहाणी झाली नाहीत आणि लोकांची सहनशक्ती संपली तर एक दिवस या राजकारण्यांना उघडे-नागडे करून भर रस्त्यात व चौकात लोक बडवायला कमी करणार नाहीत आणि सध्याचे दिवस पाहता ती गोष्ट दूर नाही...

मंगळवार, ९ जून, २००९

स्मारकांच्या घोषणेचे स्मारक

लोकोत्तर आणि ऐतिहासिक पुरुषांची स्मारके उभी करण्यासाठी राज्य़ शासनाकडून घोषणा केल्या जातात मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही, या संदर्भातील एक चांगली बातमी लोकसत्ताच्या ३ जून २००९ च्या अंकात पान एकवर प्रसिद्ध झाली आहे.


राज्याच्या अर्थसंकल्पात दरवर्षी लोकोत्तर पुरुषांच्या स्मारकांची घोषणा केली जाते. त्याकरिता रकमेची तरतूद केली जाते. परंतु प्रत्यक्षात एकही पैसा दिला जात नाही. मागील अर्थसंकल्पात साने गुरुजी व सी. डी. देशमुख यांचे स्मारक रायगड जिल्ह्यात त्यांच्या गावात उभारण्याकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. परंतु एक पैसाही दिला गेला नाही. त्यामुळे आता ‘स्मारकांच्या घोषणे’चे स्मारक उभारण्याकरिता एकदाची तरतूद करा, असे संतप्त उद्गार स्मारकांच्या उभारणीकरिता पाठपुरावा करणारे कार्यकर्ते काढू लागले असल्याचे या बातमीत म्हटले आहे.



रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वडघर येथे साने गुरुजींचे स्मारक उभारण्याचे तर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील तळा येथे माजी केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांचे स्मारक उभारण्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पात केली होती. याकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. साने गुरुजींचे स्मारक निसर्गरम्य ४० एकर जागेवर उभारले जाणार असून त्याकरिता सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.


एकूण खर्चाच्या एकतृतीयांश रक्कम शासनाकडून मिळावी अशी असून दोनतृतीयांश रक्कम लोकसहभागातून उभारण्यात येणार आहे. आतापर्यंत दीड कोटी रुपये खर्च झाले आहेत. स्मारकाच्या पहिल्या टप्पा २००२ मध्ये पूर्ण झाला. त्याच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुनील तटकरे, गणपतराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. स्मारकात दरवर्षी सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. एका युवक शिबिराला खुद्द तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील उपस्थित होते. त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात दोन कोटी रुपयांची तरतूद केली. मात्र एक रुपयाही स्मारकाला प्राप्त झाला नसल्याचे स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला तर ज्यांनी तुमचे पैसे जाहीर केले त्यांच्याकडून तुमचे पैसे मिळवा, अशी उत्तरे अधिकाऱ्यांनी दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे या वृत्तात म्हटले आहे.



रायगड जिल्ह्यातील सी. डी. देशमुख यांच्या स्मारकाचीही फारशी प्रगती झालेली नाही. तेथेही सरकारी अनास्थेचेच दर्शन घडले आहे. आतापर्यंत ग. दि. माडगुळकर, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, क्रांतीसिंह नाना पाटील आदींची स्मारके उभारण्याच्या घोषणा झाल्या आहेत. नेमकी कोणती स्मारके उभी राहिली हा संशोधनाचा विषय असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


सवंग लोकप्रियतेसाठी अशा प्रकारच्या घोषणा करायच्या आणि नंतर निधीअभावी किंवा अन्य काही कारणांमुळे ही कामे पूर्ण करायची नाही, असा खाक्या शासनाचा असतो. आजवर अशा प्रकारे कोणाकोणाच्या स्मारकांची घोषणा करण्यात आली आणि त्याची कामे पूर्ण झाली नाहीत, त्याची माहिती या बातमीत देण्यात आली आहे.

सोमवार, ८ जून, २००९

सत्ता आणि संपत्तीचा माज

सत्ता आणि संपत्तीचा माज चढला की काय घडू शकते आणि माणूस कोणत्या थरला जाऊ शकतो, याची उदाहरणे आपल्या भारतीय समाजाला काही नवीन नाहीत. राजकारणात आल्यानंतर कधी पायरी-पायरीने वर चढताना आपल्याला हवे ते पद व प्रतिष्ठा मिळविण्यासाठीही काय काय करावे लागते, ते आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी कल्पनेच्या पलिकडले असते. सत्तेची आणि संपत्तीची धुंदी माणसाला छडली की तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले खासदार व माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे त्याचेच ठळक उदाहरण आहे.


पवनराजे हे पद्मसिंह यांचे चुलत भाऊ होते. गेली अनेक वर्षे त्यांनी पद्मसिंह यांना साथ दिली. परंतू काही कारणाने पद्मसिंह यांचे पवनराजे यांच्याबरोबरचे संबंध बिघडले आणि त्यांनी स्वताच्या चुलत भावाच्या हत्येची सुपारी दिली, असे सीबीआयच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. अगोदर चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या पाटील यांना सीबीआयने अटक केली आता त्यांना १४ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्यात येणार आहे. पवनराजे आणि त्यांचा चालक असा दुहेरी खुनाचा आरोप पद्मसिंह यांच्यावर आहे. अटक करण्यात आल्यानंतर नेहमीप्रमाणे पद्मसिंह पाटील यांनी छातीत दुखत असल्याची व रक्तदाब वाढल्याची तक्रार केली. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकती ठिक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर सीबीआयने पुढील कारवाई केली.


या प्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी नगरसेवक मोहन शुक्ल यालाही पूर्वीच अटक करण्यात आली आहे. हे महाशय ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात दाखल झाले होते. त्यांच्या उमेदवारीला काही स्थानिक भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील अनेकांचा विरोध होता. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून संघपरिवारातीलच उमेदवार उभा करण्यात आला होता. मात्र तरीही भाजपने त्यांना उमेदवारी दिली. विशेष बाब म्हणजे शुक्ल यांची मुलगी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची नगरसेविका आहे. आता या प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर भाजपवर मतदारांची माफी मागण्याची आणि शुक्ल याची पक्षातून हकालपट्टी करण्याची वेळ आली.


स्वतला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱया एका बड्या नेत्याच्या कारकिर्दीतच राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीच्या राजकारणाला सुरुवात झाली. कुख्यात दाऊद इब्राहिमच्या गुंडांना याच नेत्याने आपल्याबरोबर विमानातून नेले होते. उल्हासनगर, वसई आदी ठिकाणच्या तथाकथित राजकारण्यांना (भाई मंडळींना) या नेत्यानेच राजाश्रय आणि लोकाश्रय मिळवून दिला होता. पंतप्रधान पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या या नेत्याच्या पक्षाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन आकडी खासदारांची संख्याही गाठता आलेली नाही. मतदारांनी त्यांना व त्यांच्या पक्षाला झिडकारलेच आता तर पद्मसिंह यांच्या या प्रकरणाने या नेत्याची व पक्षाची पुरती नाचक्की झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या प्रकरणाचा मोठा फटका पक्षाला बसू शकतो. खरे तर सीबीआय चौकशीत पद्मसिंह यांचे नाव आल्यानंतर आणि सीबीआयने त्यांना अटक केल्यानंतर पक्षप्रमुख म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी करयाला हवी होती. तसेच खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते. तसे झाले असते तर जनाची नाही पण मनाची तरी चाड या राष्ट्रवादी नेत्याला आहे, असे लोकांना दिसून आले असते.


सध्याचे राजकारण हे अत्यंत वाईट आणि खालच्या पातळीवर उतरलेले आहे. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल, आत्ता आहे, त्यापेक्षा मोठे पद मिळवायचे असेल, तर बरे-वाईट सर्व काही करावे लागते. गेंड्याची कातडी आणि निर्लज्जपणा अंगी आणावा लागतो, धडधडीत खोटे बोलता यावे लागते, या हाताची थुंकी, त्या हातावर झेलता येणे आवश्यक असते, हुजरेगिरी, लाळघोटेपणा, सत्ता व संपत्तीचा माज असावा लागतो, हे सर्व गुण की दुर्गुण जर तुमच्याकडे असतील, तरच तुम्ही यशस्वी राजकारणी होऊ शकता, असे चित्र सध्याच्या राजकाऱणाचे आहे. हे आपल्या सारख्या सर्वसामान्यांच्या आकलनापलिकडचे आहे. म्हणूनच सुशिक्षित, अभ्यासू अशी मंडळी राजकारणात येत नाहीत. आणि आली तर त्यांनाही यशस्वी व्हायचे असेल तर भल्या-बुऱया मार्गाचा अवलंब करावाच लागतो. आणि तसे केले नाही तर ही मंडळी मागे पडतात.


पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने अटक करण्यापूर्वी पवनराजे हत्या प्रकरणाचा तपास राज्य पोलिसांकडे होता. त्यावेळी राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गृहमंत्री होता. पद्मसिंह पाटील हेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे. त्यामुळे जाणूनबुजून या प्रकरणाचा तपास करण्यात हलगर्जीपणा झाला, अशी शंका घेण्यास नक्कीच वाव आहे. स्वतला स्वच्छ प्रतिमेचा म्हणवणाऱया राष्ट्रवादीच्या त्या गृहमंत्र्याने याचा तपास खऱोखर केला की केवळ धुळफेक केली. की राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा त्यांच्यावर काही दबाव होता, त्या नेत्याच्या दबावामुळे तपास झाला नाही, असेही अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत.


या प्रकरणी आता पद्मसिंह पाटील यांना अटक झाली आहे, पण त्यांना खरोखरच शिक्षा होईल का, की सीबीआयवरही दबाव येऊन त्यांची सुटका होईल, सबळ पुरा्व्याअभावी पद्मसिंह निर्दोष सुटतील का, मुळात त्यांना शिक्षा झाली तर ती कठोर असेल का, असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येत आहेत. काही असो, इथल्या न्याय व्यवस्थेतून ते सुटले तरी परमेश्वराच्या न्याय व्यवस्थेतून ते नक्कीच सुटणार नाहीत. कधी ना कधी त्याची शिक्षा त्यांना मिळेलच या ना त्या स्वरुपात, असे सामान्य लोकांना वाटत आहे...

रविवार, ७ जून, २००९

मुंबईतही विजा कोसळण्याची शक्यता

पावसाळ्यात दरवर्षी किंवा मान्सूनपूर्व पावसात महाराष्ट्राच्या अनेक भागात दरवर्षी विजा कोसळतात आणि त्यात अनेकांचा मृत्यूही होतो. मुंबई मात्र विजा कोसळण्याच्या घटना दुर्मिळ! पण आता मुंबईकरांनाही बेसावध राहून चालणार नाही, कारण वातावरणातील बदलांमुळे मुंबईतही विजा कोसळण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे.


लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तच्या ५ जून २००९ च्या अंकामध्ये अभिजीत घोरपडे यांनी ही बातमी दिली आहे. त्यात त्यांनी वेधशाळा आणि काही शास्त्रज्ञांचा हवाला देऊन मुंबईतही विजा कोसळण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मुंबईतही मान्सूनच्या काळात धो-धो पाऊस पडतो. तरीसुद्धा येथील वेगळेपण म्हणजे विजा कोसळण्याच्या घटना क्वचितच घडतात. त्यामुळेच तीन वर्षांपूर्वी गिरगाव चौपाटीवर वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तेंव्हा या प्रकाराची बरीच चर्चा झाली होती. अलीकडच्या काळात वातावरणातील बदलांमुळे पावसाची वैशिष्टय़ेसुद्धा कमालीची बदलत असून त्यापैकी एक बाब म्हणजे विजा कोसळण्याच्या संख्येत वाढ होण्याचा धोका! त्यामागे तसे हवामानशास्त्रीय कारणही असल्याचेही घोरपडे यांनी या बातमीत म्हटले आहे.



मुंबईच्या तापमानात गेल्या शंभर वर्षांमध्ये दीड अंश सेल्सिअसहून अधिक वाढ झाल्याचे कुलाबा वेधशाळेने अभ्यासाद्वारे जाहीर केले आहे. ही वाढ पृष्ठभागाप्रमाणेच वातावरणाच्या विविध थरांमध्येही दिसते. त्यामुळे आता पूर्वीच्या तुलनेत जास्त उंचीपर्यंत वातावरण उबदार बनले आहे. परिणामी ढग जास्त जाडीचे असणे आणि ते अधिक उंचीवर जाण्याची शक्यता वाढली आहे. ढग जास्त उंचीपर्यंत पोहोचू शकले, तर ढगातील पाण्याचे थेंब व बर्फाचे सूक्ष्म कण यांच्या घर्षणाचे प्रमाणही वाढते. परिणामी, ढगांचा गडगडाट व विजा चमकण्याचे प्रमाण वाढते. मग कोसळणाऱ्या विजांची संख्यासुद्धा वाढते. मुंबईत गेल्या काही दशकांमध्ये किती उंचीवर ढग निर्माण झाले किंवा किती विजा चमकल्या याच्या नोंदी उपलब्ध नाहीत. पण गेल्या २०-२५ वर्षांमध्ये तापमानवाढीचा वेग वाढला आहे. त्यावरून मुंबईत भविष्यात विजा कोसळण्याच्या घटना वाढण्याची भीती हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याचे या बातमीत म्हटले आहे.



ढगांची जाडी जास्त विजांबरोबरच एकाच वेळी मोठा पाऊस पडण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे मुंबईत पाण्याचा निचरा न होण्याची समस्या तीव्र बनण्याचाही धोका आहे. या सर्व बदलांच्या मुळाशी असलेली तापमानवाढ होण्यास मुंबईतील पर्यावरणाची ढासळलेली स्थिती कारणीभूत असल्याचेही या बातमीत म्हटले आहे.


असे जर असेल तर सर्व मुंबईकरांनी जागरुक राहिले पाहिजे. २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाऊस म्हटला की सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनात धडकीच भरते. त्यात आता वेधशाळेने आणि हवामान तज्ज्ञांनी मुंबईत विजा कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत मोठमोठे गगनचुंबी टॉवर्स असून त्या ठिकाणी वीज प्रतिबंधक व वीजरोधक उपाययोजना केलेली असते. मात्र जुन्या चाळी, इमारती आदी ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था केलेली नसते. अशा मंडळींना आपल्या नशिबावर आणि दैवावरच हवाला ठेवावा लागणार आहे. अर्थात या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. विकासाच्या नावाखाली आपण पर्यावरणाची जी काही वाट लावली आहे, त्याचीच फळे आज आपण भोगत आहोत आणि आपल्या पुढील पिढ्यांनाही ती भोगावी लागणार आहेत.

शनिवार, ६ जून, २००९

सावध ऐका पुढल्या हाका...

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा लावून धरलेला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात जे हिंदी भाषिकांचे जे आक्रमण होत आहे, त्याच्या विरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.काही वर्षांपूर्वी शिवसेनेने मराठीचाच मुद्दा घेत मुंबई व महाराष्ट्रात आपले बस्तान बसवले होते. मात्र गेल्या काही वर्षात शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडून दिला आणि तोच मुद्दा राज ठाकरे यांनी उचलला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी ठिकाणी उमेदवार उभे केले होते. मनसेचा कोणीही उमेदवार निवडून आला नाही, परंतू त्यांनी लाखोंनी मते मात्र घेतली. मनसेची सुप्त लाट मतदानातून प्रकर्षाने दिसून आली. महाराष्ट्र राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच राज्य विधिमंडळात सादर करण्यात आला. त्यातून मुंबई व महाराष्ट्रातील मराठी टक्का घसरला असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. म्हणजे राज ठाकरे यांनी ज्या मराठीच्या व परप्रांतीयांच्या आक्रमणावरून आवाज उठवला, त्याला या अहवालाने दुजोराच दिला आहे.


गेल्या तीस वर्षांत राज्यातील मराठी माणसांची टक्केवारी ७.७ टक्क्यांनी घटली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत १२ लाख ३९ हजार लोकांनी इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतर केल्याची माहितीही यात देण्यात आली आहे. महाराष्ट्रात १९७१ मध्ये मराठी मातृभाषा असणाऱया्ची संख्या ७६.५ टक्के इतकी होती. २००१ मध्ये ती ६८.८ टक्क्यांपर्यंत घटली आहे. हिंदी मातृभाषा असणाऱयांचे प्रमाण तीस वर्षांपूर्वी पाच टक्के होते, ते आता ११ टक्के झाले आहे. उर्दू भाषिकांचे प्रमाण ७.३ टक्क्यांवरून ७.१ टक्के तर गुजराथी भाषिकांचे प्रमाण २.८ टक्क्यांवरून २.४ टक्के इतके झाले आहे. अन्य भाषिकांचे प्रमाण ८.४ टक्क्यांवरून १०.७ टक्के इतके झाले आहे.


गेल्या पाच वर्षांत जे १२ लाख ३९ हजार परप्रांतीय महाराष्ट्रात स्थायिक झाले आहेत, त्यात सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेशातील लोकांची आहे. उत्तर प्रदेशातून गेल्या पाच वर्षांत ४ लाख २३ हजार लोक महाराष्ट्रात आले आहेत. अन्य राज्यातून आलेल्या नागरिकांची संख्या अशी आहे.
कर्नाटक-१ लाख ३५ हजार, गुजराथ-१ लाख १९ हजार, राजस्थान-८२ हजार, बिहार-५१ हजार, पश्चिम बंगाल-४९ हजार, केरळ-४१ हजार, आंध्र प्रदेश-३२ हजार.


हा पाहणी अहवाल धक्कादाय़क असून आता तरी महाराष्ट्र शासनाने या बाबतीत कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र ही काही धर्मशाळा नाही. मुळात मुंबई किंवा महाराष्ट्रात आले की मराठी भाषा येत नसली तरी चालते. कुठेही आणि कसेही पोट भरण्यापुरते पैसे मिळवता येतात, हे परप्रांतीयांना समजून चुकले आहे. अन्य राज्यात जशी स्थानिक भाषा ही सर्व ठिकाणी सक्तीची केलेली असते, तसे आपल्याकडेन नाही. मराठी भाषा ही शाळा किंवा महाविद्यालयातून सक्तीची करण्यात आलेली नाही. इंग्रजी किंवा अन्य भाषिकांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत, त्यांचा मराठी भाषा सक्तीची करण्यास ठाम विरोध आहे. जर अन्य राज्यात स्थानिक भाषेची सक्ती केली जाऊ शकते तर महाराष्ट्रात ते का होऊ शकत नाही. कारण आपल्या येथील राज्यकर्त्यांना मुळातच तशी राजकीय इच्छाशक्ती व मराठीची आच नाही. मराठीला कोणी विरोध केला ती आपले राज्यकर्ते त्यांच्यापुढे नांगी टाकून मोकळे होतात. त्यामुळे मराठी भाषा येत नसली तरी आपले काहीही अडत नाही हे या परप्रांतीयांना समजून चुकले आहे. त्याचाच ते गैरफायदा घेत आहेत.


मराठी भाषा ही आलीच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही, मराठी भाषा लिहितास वाचता आणि बोलता आली नाही तर आपले अडते आहे, काहीच करता येत नाही, असे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत परप्रांतीय येथे असेच येत राहतील. अनेक खासगी आस्थापने, कार्यालये येथे मराठीची गळचेपी केली जाते. मोबाईल कंपन्यांचे कस्टमर केअर सेंटर येथे मराठीतून बोलले तर उत्तरे मिळत नाहीत, दोन मराठी माणसेही एकमेकांशी हिंदीत किंवा इंग्रजीत बोलतात. मुळात मराठी भाषा, संस्कृती या विषयीचा अभिमान, वारसा आपण विसरत चाललो आहोत. आपले स्वत्व पुन्हा एकदा जागृत करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे नुकताच जो आर्थिक पाहणी आहवाल सादर झाला आहे, तो सर्व मराठी माणसे, सत्ताधारी आणि विरोधकांसाठी डोळ्यांत अंजन घालणारा आहे. त्यातून आपण काही शिकलो तरच पुढे मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राला भवितव्य आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून आणि १०५ हुतात्म्यांच्या बलीदानाने व संघर्ष करून मुंबईसह हे महाराष्ट्र राज्य आपण मिळवले आहे.


केंद्रातील सत्ताधाऱयांना मुंबई ही महाराष्ट्रपासून वेगळी करून केंद्रशासित करायची आहेच. भविष्यात मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी टक्का आणखी घसरला तर मुंबई केंद्रशासित करण्यासाठीचे जे समर्थक आहेत, त्यांच्या हातात आयतेच कोलीत मिळेल. आपण सगळ्यानीच जागरुक राहिले पाहिजे. त्यामुळे सावध ऐका पुढल्या हाका...

शुक्रवार, ५ जून, २००९

मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण

मखासगी दूरदर्शन वाहिन्या आणि संगणक-इंटरनेटच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती कमी होत चालल्याची ओरड करण्यात येत असते. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी निवडक मराठी साहित्य याच दूरचित्रवाहिन्यांवरून मालिकांच्या स्वरुपात सादर झाल्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचण्यास मदत झाली आहे. असेच काम आकाशवाणीनेही गेल्या काही वर्षांत केले आहे. मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण मिळाल्यामुळे अनेक चांगली मराठी पुस्तके आकाशवाणीच्या खेडोपाडी पसरलेल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचली आहेत.
आकाशवाणीच्या मुंबई आणि पुणे केंद्रावरून सध्या डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांच्या ‘ही तो ‘श्री’ची इच्छा’ या पुस्तकाचे अभिवाचन सुरू झाले आहे. अमेरिकास्थित उद्योजक-व्यावसायिक असलेले डॉ. ठाणेदार यांच्या या पुस्तकाच्या गेल्या तीन-चार वर्षांत वीसहून अधिक आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. दर बुधवारी सकाळी ७-४० वाजता त्याचे प्रसारण होत असून २७ भागात या पुस्तकाचे अभिवाचन केले जाणार आहे.
आकाशवाणीच्या मुंबई (ब) केंद्रावरून म्हणजे आत्ताच्या ‘अस्मिता’ वाहिनीवरुन गेल्या काही वर्षांपासून मराठीतील निवडक पुस्तकांच्या अभिवाचनाचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाला व्यावसायिक स्वरुप देण्याचे आणि पुस्तकांचे वाचनमहामालिका स्वरुपात सादर करण्याचे श्रेय आकाशवाणीवरील कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश केळुस्कर यांना जाते. गेल्या दहा वर्षांत त्यांनी सुमारे २५ पुस्तकांवर अभिवाचनाच्या मालिका सादर केल्या आहेत. यात धनुर्धारी (वाईकर भटजी), डॉ. नरेंद्र जाधव (आमचा बाप आणि आम्ही) गोडसे भटजी (माझा प्रवास), मधु मंगेश कर्णिक (लागेबांधे), प्रल्हाद चेंदवणकर (टाच) आणि अन्य काही पुस्तकांचा समावेश आहे.
विश्वास पाटील लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील ‘महानायक’ या कादंबरीच्या अभिवाचनाची महामालिका खूप गाजली. मराठी नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधील अनेक नामवंत या अभिवाचनात सहभागी झाले होते. या मालिकेचे २५५ भाग सादर झाले व या मालिकेने आकाशवाणीलाही सुमारे २५ लाख रुपयांचा महसूल मिळवून दिला होता.
आकाशवाणीवर एखाद्या पुस्तकावरील अभिवाचन सादर झाले की वाचकांमध्ये तसेच साहित्यप्रेमींमध्ये त्या पुस्तकाची चर्चा होऊन सार्वजनिक किंवा खासगी ग्रंथालयातून त्या पुस्तकाला मागणी येते, पुस्तकाची विक्री वाढते, असा अनुभव आहे. मराठी पुस्तक प्रकाशक आणि विक्रेत्यांसाठीही त्याचा चांगला उपयोग झाला असल्याचे डॉ. महेश केळुस्कर यांनी सांगितले.

गुरुवार, ४ जून, २००९

महाराष्ट्र साहित्य परिषद इंटरनेटच्या महाजालात

सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे असून संगणक, इंटरनेट आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे सर्व जग एका क्लिकवर आले आहे. आपण घरबसल्या कोणतीही माहिती क्षणार्धात मिळवू शकतो. अशा या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात व्हायला लागला आहे. बॅका, वृत्तपत्रे, शिक्षण, उद्योग-व्यापार यासह अन्य अनेक क्षेत्रात आज याचा उपयोग करून घेण्यात येत आहे. त्याला मराठी साहि्त्य क्षेत्रही अपवाद नाही. मराठीतील काही प्रकाशक, पुस्तक विक्रेते, लेखक यांची संकेतस्थळे आहेत. या संकेतस्थळांमुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील आणि परदेशातील मराठीप्रेमी, साहित्य रसिक आणि वाचकांना घरबसल्या व एका क्लिकवर मराठी साहित्य उपलब्ध झाले आहे. पुण्यात गेल्या शंभर वर्षांहून अधिक वर्षे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी काम करणाऱया महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेनेही इंटरनेटचे महत्व ओळखून नुकतेच आपले संकेतस्थळ सुरु केले आहे.


महाराष्ट्र साहित्य परिषद इंटरनेटच्या महाजालात, अशी एक बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्त (४ जून २००९) प्रसिद्ध झाली आहे.


मराठी भाषा आणि साहित्य प्रसारासाठी गेली १०० हून अधिक वर्षे काम करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषद या संस्थेनेही आता इंटरनेटच्या महाजालात प्रवेश केला आहे. ‘मसाप’ने नुकतेच आपले स्वत:चे \www.masapaonline.org हे संकेतस्थळ सुरू केले आहे.


त्यामुळे मसापचे विविध उपक्रम, कार्यक्रम आणि त्यांचे काम एका क्लिकवर उपलब्ध झाले आहेत. मसापची स्थापना २७ मे १९०६ रोजी पुण्यात चौथ्या ग्रंथकार संमेलनात करण्यात आली. मराठी भाषा व साहित्य यांची जपणूक, विकास आणि प्रसारासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. हेच ग्रंथकार संमेलन पुढे काही वर्षांनी मराठी साहित्य संमेलन म्हणून आयोजित करण्यात येऊ लागले.


‘मसाप’च्या या संकेतस्थळावर इतिहास, कार्यकारी मंडळ, कार्यक्रम, सदस्यत्व, पुरस्कार, स्पर्धा, उपक्रम, शाखा, कार्यालयीन व्यवस्था आणि निवेदने असे विभाग करण्यात आले आहेत. इतिहास या विभागात ‘मसाप’च्या स्थापनेचा सविस्तर इतिहास देण्यात आला आहे. ‘मसाप’तर्फे देण्यात येणारे विविध ग्रंथ पुरस्कार, ग्रंथकार पुरस्कार, ‘मसाप’चे नाटय़कार्यशाळा, एकांकिका लेखन, कथालेखन, काव्यवाचन स्पर्धा, बाल वाचनालय, कॉफीक्लब साहित्यिक गप्पा, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र, वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय, ‘मसाप’च्या विविध शाखांचे पत्ते आणि अन्य उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे.


संकेतस्थळावर सुरुवातीलाच तुकाराम महाराज यांच्या ‘आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे, शब्दांची शस्त्रे यत्न करू’ अशा ओळी देण्यात आल्या आहेत. तर त्याखाली मराठी साहित्यातील अक्षरलेणी म्हणता येतील, अशा काही मान्यवरांची वचने, ओळी उधृत करण्यात आल्या आहेत. यात संत ज्ञानेश्वर यांच्या पसायदानातील ‘दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’, समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मना सज्जना भक्ती पंथेची जावे’, सुरेश भट यांच्या ‘लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी’ आदींचा समावेश आहे.


हे संकेतस्थळ सुरू केल्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषद व संस्थेचे काम आता केवळ महाराष्ट्र किंवा भारतापुरतेच मर्यादित न राहता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यास मदत होणार आहे. परदेशात राहणाऱ्या मराठी साहित्यप्रेमी आणि वाचकांनाही ‘मसाप’चे काम कळण्यास मदत होणार आहे.

बुधवार, ३ जून, २००९

कसाबगिरीची सरकारी बक्षिसी

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यातील जीवंत पकडण्यात आलेला एकमात्र आरोपी अजमल कसाबच्या वकीलाला त्यांच्या कामगिरीचा मोबदला म्हणून राज्य शासनाकडून दररोज अडीच हजार रुपये इतके भरघोस मानधन देण्यात येणार आहे. महिनाभराचे हे मानधन सुमारे पन्नास हजार रुपये इतके होणार आहे. हा खर्च राज्य शासनाचा विधी विभाग करणार असला तरी अप्रत्यक्षपणे ही रक्कम करदात्या नागरिकांच्या खिशातूनच खर्च होणार आहे. हा सर्व प्रकार म्हणजे काझमी सध्या कसाबला सोडविण्यासाठी जे काही डावपेच खेळत आहेत, त्याचीच ही सरकारी बक्षिसी आहे.


सध्या न्यायालयात हा खटला सुरु असून तो किती महिने किंवा वर्ष सुरु राहील, हे नेमके कोणालाच सांगता येणार नाही. या न्यायालयात कसाबच्या विरोधात निकाल गेला तर काझमी हे त्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार. म्हणजे पुन्हा काही वर्षे हा खटला चालणार. तो पर्यंत निरपराध नागिरक, पोलीस अधिकारी यांचे बळी घेणारा क्रूर कसाब मात्र राज्य़ शासनाच्या पर्यायाने करदात्या नागरिकांच्या पैशांवर पोसला जाणार आहे.


संसदेवर हल्ला करणाऱय़ा अफजल गुरुला अद्याप फाशी देण्यात आलेले नाही. त्यामुळे भविष्यात कसाबच्या बाबतीतही तसेच होऊ शकते. म्हणजे त्याला न्यायालयाने फाशीची सजा सुनावली तरी अफजल गुरु साऱखाच फाशी देण्यासाठी वेळ काढला जाईल. मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंह, केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्यापासून ते कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नेते, भाजप, शिवसेनेचे नेते आदींनी कसाब आणि त्याच्या साथीदारांचे हे कृत्य म्हणजे भारताविरुद्धचे युद्ध असल्याचे सांगितले होते.


असे जर आहे तर मग कसाबच्या विरुद्ध कोर्टमार्शल का करत नाही, एखाद्या गुन्हेगाराला जो न्याय लावला जातो, तोच न्याय कसाबला का लावण्यात येतो, कसाबचे हे कृत्य जर देशाविरुद्धचे युद्ध आहे, तर येथे भारतीय दंड विधान, न्यायप्रक्रिया यांचा आधार घेऊन त्याला का पोसले जात आहे, अपवाद म्हणून या संपूर्ण प्रक्रियेत बदल करता येणार नाही का, कसाबला वकील न देता, त्याच्या कबुलीजबाबावर त्याला शिक्षा सुनावली तर काय आकाश कोसळणार आहे का, कसाबचे वकील काझमी हे तर जणू काही आपण कसाबसाठी पाकिस्तानने नेमलेले वकील आहोत, अशा थाटात कसाबला वाचविण्याचा आणि त्यासाठी न्यायालयाचा वेळ वाया घालविण्याचा प्रयत्न करत आहेत. खरे तर काझमी यांनाही कानपिचक्या देण्याची गरज आहे. तुमची नेमणूक ही खटल्यासाठीच्या अपरिहार्यतेततून झाली आहे. कसाबला वकील दिला नसता तर खटलाच सुरु होऊ शकला नसता. त्यामुळे त्याचे वकील म्हणून आवश्यक तेवढेच बोला, उगाच खऱयाचे खोटे व खोट्याचे खरे करण्यात न्यायालयाचा वेळ वाया घालवू नका, असे त्यांना खडसावून सांगितले पाहिजे.


जे आरोपी स्वताहून वकील करण्यास पात्र सक्षम नसतात, त्यांच्यासाठी न्यायालयाच्या विधी सहाय्य केंद्रतून वकील देण्यात येतो. न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेल्या वकीलाला लंपूर्ण खटल्यासाठी नऊशे रुपये देण्याची तरतूद आहे. त्यामुळे अनेक वकील अशा कामासाठी उत्साह दाखवत नाहीत. मात्र २६/११ च्या खटल्याचे महत्व पाहता विशेष न्यायालयाचे काझमी यांची नियुक्ती केली व त्यांना योग्य ते मानधन मंजूर करावे, अशी विनंती राज्य़ शासनाला केली. या खटल्याचे महत्व लक्षात घेऊन नेमण्यात आलेल्या वकीलाला रोज अडीच हजार रुपये मानधन देणे हे जास्त आहे, असे वाटते. नऊशे रुपये देण्याची तरतूद असताना त्या तुलनेत अडीच हजार रुपये देणे कितपत योग्य आहे. हे मानधन दीड हजार रुपये योग्य ठरले असते. काझमी यांनीही जे मानधन ठरले आहे, त्याबाबत कोणतीही हरकत घेतलेली नाही. खरे तर काझमी मला इतके मानधन नको, नियमानुसार जे काही आहे, तेवढेच द्या, किंवा त्यापेक्षा थोडे जास्त द्या, असे सांगितले असते, तर त्यात काझमी यांचेही मोठेपण दिसून आले असते.


हा सर्व प्रकार फक्त आपल्या देशातच होऊ शकतो. ज्या कसाब व त्याच्या साथीदारांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला करून निरपराध नागरिक व पोलीसांचे बळी घेतले, चार दिवस संपूर्ण मुंबईला वेठीला धरले, त्या कसाबला सोडविण्यासाठी आपणच वकील देतोय, नुसता वकील देऊन थांबलो नाही, तर त्याला भरघोस मानधनही देणार आहोत. हे सगळे आपल्या पैशातूनच. म्हणजे कसाबचे जे क्रूर कृत्य जगजाहीर आहे, ते खोटे ठरविण्यासाठी आपणच आपल्या पैशातून त्याला वकील देणार आहोत आणि हा वकीलही असा आहे की आपली नेमणूक पाकिस्तानने किंवा कसाबने केलेली आहे, त्याचे मानधन कसाब किंवा पाकिस्तान आपल्याला देणार आहे, अशा थाटात कसाबला वाचविण्यासाठी डावपेच खेळत आहेत. खरे तर शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये, असे आपले तत्व आहे. यात बदल करून शंभर निरपराध्यांना शिक्षा झाली तरी चालेल, पण एकही गुन्हेगार सुटता कामा नये, असे तत्व आपण अंमलात आणले पाहिजे. तसे झाले तरच उरलेले कैक कोटी निरपराधी नागरिक शांतपणे जगू शकतील. पण आपल्याकडे तसे कधीच होणार नाही.



त्यामुळे कसाबच्या बाबतीत सध्या जे काही चालले आहे, काझमी त्याच्या बचावासाठी जे डावपेच खेळत आहेत, जणू काही त्याचीच ही सरकारी बक्षिसी आहे. तेच आपले दुर्दैव आहे, आपल्या न्यायव्यवस्थेची शोकांतिका आहे...

मंगळवार, २ जून, २००९

ध्यासपंथ सामाजिक कार्याचा...

केवळ आपल्या स्वतासाठी किंवा कुटुंबासाठीच न जगता समाजासाठी जगणारी काही मंडळी आणि संस्था आपल्या समाजात काम करत आहेत. ही मंडळी आपल्या कार्याचा कोणताही गवगवा न करता आपले काम प्रामाणिकपणे करत असतात. अशा कामातून अन्य काही जणांना प्रेरणा मिळते आणि ते ही अशा सामाजिक कार्याला आपले जीवन वाहून घेतात. सध्याच्या वातावरणात आणि केवळ मी आणि माझे कुटुंब अशा मनस्थितीत असणाऱयांसाठी ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो, अशी भावना वाढीस लावण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या गोष्टीत आपला कोणताही स्वार्थ नाही, ज्यातून आपला काहीही फायदा होणार नाही किंबहुना स्वताच्या पदराला खार लावून काम करावे लागते आहे (ज्या कामाला लष्कराच्या भाकऱया भाजणे) असेही काही जण उपहासाने म्हणतात, असे काम आज समाजाच्या विविध क्षेत्रात सुरु आहे. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या आणि निस्वार्थीपणे सामाजिक कार्य करणाऱया अशाच काही मंडळींचा व संस्थाचा परिचय ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे यांनी आपल्या ध्यासपंथ या पुस्तकातून करून दिला आहे.


मुंबईत प्रभादेवी येथे पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सभागृहात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते ध्यासपंथसह अन्य तीन पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. माधव जोशी यांच्या परममित्र पब्लिकेशन्सने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. मुंबई, ठाणे किंवा कोणत्याही शहरातील प्रमुख बुक डेपो/पुस्तकांच्या दुकानात हे पुस्तक मिळू शकेल. गुणे यांनी अनेक वर्षे लोकसत्ता दैनिकात पत्रकारिता केली असून सध्या ते सकाळ (मुंबई)मध्ये ज्येष्ठ वार्ताहर म्हणून काम करत आहेत. पत्रकारिता करत असताना वेगळे काहीतरी करावे, या उद्देशातून ध्यासपंथ साकार झाले आहे. विशिष्ट ध्येयाने किंवा ध्यासाने कोणताही स्वार्थ नसताना केवळ समाजासाठी आपले आयुष्य वाहून घेणाऱया माणसांचा परिचय संपूर्ण समाजाला व्हावा, त्याचे हे सामाजिक काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, हे काम पाहून, पुस्तक वाचून त्यातून कोणी प्रेरणा घ्यावी आणि अशा प्रकारचे काम आपणही करावे, असे वाटावे, हा उद्देश या पुस्तक लेखनामागे असल्याचे गुणे यांनी सांगितले.


समाजासाठी झटणाऱया आणि समाजासाठी आपले सर्वस्व वाहून काम करणाऱया व्यक्ती व त्यांच्या सामाजिक कामांची गाथा म्हणजे ध्यासपंथ पुस्तक आहे. आयुष्यात एखाद्या चांगल्या गोष्टीचा ध्यास घेऊन काम करणाऱया माणसांचे हे पुस्तक असून पुस्तकांची भाषा साधी व सोपी आहे. या पुस्तकातून सामाजिक जीवन आणि त्यावरील लेखकाचे भाष्य/चिंतन प्रकट होते. प्रत्येक संवेदेनक्षम माणसाने हे पुस्तक जरुर वाचावे. प्रत्येक माणूस हा आपल्यापुरता किंवा कुटुंबापुरा जगत असतो. मात्र काही माणसे ही समाजासाठी जगतात व समाजासाठीच आपले आयुष्य खर्ची घालतात. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी जगणाऱया अशा ध्येयवादी व्यक्तींचे चित्रण या ध्यासपंथ पुस्तकात केले असल्याचे गौरवोद्गार मनोहर जोशी यांनी पुस्तक प्रकाशनानंतर बोलताना काढले. हे पुस्तक म्हणजे नवरत्नांचा हार असून पुस्तक वाचून आपल्यापैकी प्रत्येकाने प्रेरणा घेऊन स्वताला किमान एका तरी कोणत्याही सामाजिक कामात गुंतवून घ्यावे, असे आवाहनही जोशी यांनी या वेळी केले.


फासेपारध्यांसाठी आपले आयुष्य वाहून घेणारे गिरीश प्रभूणे, कोकणातील खेड्यांमध्ये राहून आपला वैद्यकीय व्यवसाय करणारे आणि त्याच बरोबर या मंडळींच्या जगण्याला नवा अर्थ देणारे, त्यांना आम्ही शेती हा व्यवसाय करतो, हे अभिमानाने सांगायला लावणारे डॉ. प्रसाद देवधर, सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात पर्यावरण, निसर्ग याबद्दल समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी झटणारे पर्यावरण दक्षता मंचचे विद्याधर वालावलकर, कुष्ठरुग्णांसाठी काम करणारे संजय कांबळे, घऱून पळून येऊन किंवा कधी अन्य काही कारणांमुळे रस्त्यावर किंवा रेल्वेस्थानकांवर आयुष्य काढणाऱया मुलांना पुन्हा त्यांच्या घरच्यांच्या हवाली करून त्यांना घरी पाठविण्याचे मोलाचे काम करणारे विजय जाधव तसेच अन्य मंडळींचा आणि त्यांच्या कामाचा परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे.


गिरीश प्रभूणे यांचे काम आता बऱयापैकी समाजाला माहिती झाले आहे. मात्र पुस्तकातील जी अन्य मंडळी आहेत, ती आणि त्यांचे काम समाजाला अपरिचित आहे. ही मंडळी व त्यांचे काम माहिती असेल तर ते त्यांच्या जिल्ह्यापुरते किंवा गावापुरतेच मर्यादित होते. मात्र गुणे यांनी लिहिलेल्या ध्यासपंथमुळे या सर्वांचे काम समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यास मोलाची मदत होणार आहे. सध्याच्या सवंग आणि पेजथ्री कल्चर पत्रकारितेच्या काळात समाजासाठी आपले सर्वस्व वाहून घेतलेल्या अशा ध्येयवादी व्यक्तींचा परिचय करून देण्याचे महत्वाचे काम गुणे यांनी केले आहे. तसेच अशा वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्याचे धाडसही परममित्र पब्लिकेशन्सचे माधव जोशी यांनी केले आहे. त्याबद्दल या दोघांचेही मनापासून अभिनंदन. या व्यक्ती किंवा संस्थांप्रमाणेच समाजात आज इतरही अनेक मंडळी व संस्था अशा आहेत, की ते आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांच्या कामालाही प्रसिद्धी मिळणे आवश्यक आहे. गुणे यांनी अशा व्यक्ती व संस्थांचा शोध घेऊन ध्यासपंथ-भाग दोन, तीन, चार लिहावेत आणि माधव जोशी यांनी ते प्रकाशित करावेत.


सध्याच्या स्वार्थी समाजात आणि मी अमूक काम केले तर त्यातून माझा फायदा काय, अशी वृत्ती असणाऱया समाजासाठी ध्यासपंथसारखी पुस्तके दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरणार आहेत. सध्याच्या वातावरणात त्याचीच खरी आवश्यकता आहे...


दिनेश गुणे यांचा संपर्क- ९८७०३३९१०१

परममित्र पब्लिकेशन्स (माधव जोशी) यांचा संपर्क-३०९७५४९६
ई-मेल param_mitra@yahoo.com