गुरुवार, २ जुलै, २००९

वाद नामकरणाचा

वांद्रे-वरळी सागरी सेतुचे उदघाटन नुकतेच झाले आणि आता या सेतुच्या नामकरणावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सेतुला राजीव गांधी यांचे नाव द्यावे, असा सूचनावजा आदेश दिला आणि मम म्हणत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्याला तात्काळ मान्यता दिली. पुलाच्या घाईगर्दीत झालेल्या या नामकरणास शिवसेना-भाजपने विरोध केला असून या सेतुला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. तर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात राजीव गांधी यांच्यापेक्षा वेगळे नाव सुचले नाही का, महाराष्ट्रातील अन्य नावे का नाही दिली, असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. काही वर्षांपूर्वी राजीव गांधी यांनी पवार यांना कॉंग्रेस पक्षात प्रवेश दिला होता, त्याची तर ही परतफेड नाही ना, अशी टिकाही ठाकरे यांनी केली आहे. खऱें तर या नामकऱणावरुन वाद होणार हे माहिती असतानाही पवार यांनी राजीव गांधी याचे नाव देण्याची सूचना का केली आणि मुख्यमंत्री चव्हाण यांनीही ती तातडीने अंमलाता का आणली की त्यांनाही आपण किती स्वामीनिष्ठ आहोत, ते दाखवून द्याचचे होते.


देशाच्या स्वातंत्र्यासाठी केवळ गांघी व नेहरु कुटुंबियांनीच योगदान दिले, त्यात हौतात्म्य पत्करलेले असंख्य क्रांतिकारक आणि अन्य देशभक्तांचे काहीच योगदान नाही का, प्रत्येक रस्ता, चौक, कॉलेज, विमानतळ किंवा अशा मोठ्या प्रकल्पाला महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचीच नावे दिली पाहिजेत, असा काही लेखी नियम आहे की संसदेत तसा कायदा मंजूर करुन घेण्यात आला आहे. या सेतूला राजीव गांधी यांचे नाव देण्याची खरोखरच काही गरज होती का, आता त्याच्या समर्थनासाठी राजीव गांधी यांचा जन्म मुंबईत गिरगाव येथे झाला, असे लंगडे समर्थन करण्यात येत आहे. पण त्यात काही अर्थ नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पानिपत झाले. दोन अंकी संख्येइतकेही खासदार पवार यांना निवडून आणता आले नाहीत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. विलासराव देशमुख व अन्य काही मंडळी या निवडणुका कॉंग्रेसने स्वबळावर लढवाव्या, अस सांगत आहेत. लोकसभा निवडणुकीत पवार यांना व त्यांच्या पक्षाला मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिल्यामुळे पवार यांना राज्यात पक्षाचे अस्तीत्व टिकविण्यासाठी आणि सत्तेत राहण्याकरता कॉंग्रेसबरोबर आघाडी करणे फायद्याचे ठरणार आहे. त्यासाठी या कार्यक्रमातच त्यांनी राजीव गांधी यांचे नाव देण्याची राजकीय गुगली टाकली व त्यात ते यशस्वी झाले.


मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या प्रकरणी राज्यातील सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करुन त्यात हा विषय चर्चेसाठी ठेवायला हवा होता. पवार यांनी राजीव गांधी यांचे नाव सुचवले तरी, मुख्यमंत्र्यांनी त्यावर विचार करुन नंतर निर्णय घ्यायला हवा होता. राजीव गांधी यांच्याऐवजी दुसरे कोणते नाव (स्वातंत्र्यवीर सावरकर) असते तर अशी तत्परता त्यांनी दाखवली असती का, हा प्रश्न आहेच. उत्तर आहे अर्थातच नाही. सर्वांच्या सहमतीने पुलाचे नामकरण झाले असते तर वाद निर्माण झाला नसता. आणि जर नावावरुन एकमत झाले नसते तर कोणत्याही मोठ्या पुढाऱयाचे, नेत्याचे नाव देण्याऐवजी वांद्रे-वरळी सागरी सेतु असे नाव दिले असते तरी काहीही बिघडले नसते. खरे तर या सागरी सेतूला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारातील सरदार सरखेल कान्होजी आंग्रे किंवा अन्य कोणा प्रमुखाचे नाव देणे अधिक योग्य ठरले असते. शिवसेना-भाजपने या सेतुला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली होती, तीही योग्य होती. किंवा भगवान परशुराम, अगस्ती ऋषी यांचेही नाव दिले असते तरी ते समर्पक ठरले असते. कारण ही सर्व नावे सागराशी संबंधित होती.


आता आणखी काही दिवस सेतूच्या नामकरणावरुन वाद सुरु राहील. पुन्हा काही दिवस जातील. आणखी एखादा नवा प्रकल्प तयार होईल. त्यावेळी कदाचित सत्तेवर शिवसेना-भाजप यांचे सरकार आले तर त्यांनी दिलेल्या नावाला तेव्हाचे विरोधक म्हणजे कॉंग्रेसवाले विरोध करतील. वर्षानुवर्षे हे असेच सुरु आहे. आपण यातून कधी शिकणार, सारासार विचार व सदसदविवेक बुद्धीचा वापर कधी करणार की राजकारणी आणि याचे काही वावडे आहे...

२ टिप्पण्या:

  1. shevati satya ekach ahe he khare
    Setuche Nav
    Swatantryaveer Savarakar hech aani hech have

    उत्तर द्याहटवा
  2. Kuthlyahi prashnawarun wad wiwad karne he rajkarni lokanche mukhya kam aste...baki tikde je actual kam ahe te kay ahe, kase kele ahe, kiti faydyache ahe hyakade ajibat te laksha denar nahit.,kahitari shullak karnawarun fakt charcha ani wad karat rahaycha ani satat prakash zotat rahaycha yevdhach jamta hya lokana...

    ata kharetar setula kuthlehi nav dile aste tari tyacha honara upyog jo ahe samanya mansala to sarkhacha rahanar ahe..asa tar honar nahi na ki rajiv gandhi nav dilyane tya pulacha wegla wapar hoil ani dusra konta nav dila tar wegla upyog hoil..
    pan pratek goshtit virodh karaycha ha virodhakanche kam ani tyala amanya karne he sateeewar aslelyanche kam..baki tyacha samanya mansala kasa fayda honar ahe..wagere hyache tyana kahi dene ghene nahi...

    aslya faltu prashnawrun wad wiwad karnyapeksha kititari mothe prashan aaj aaplya maharashtrat ahet tyakade tyani laksha deun tikde aapla wel ghalwawa...

    उत्तर द्याहटवा