शनिवार, ४ जुलै, २००९

समुद्राच्या लाटांपासून वीजनिर्मिती

वीजेची निर्मिती आणि वितरण हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत जाणार असून या प्रश्नावर वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात आणि त्या तुलनेत वीजेची निर्मिती होत नसल्याने (मुंबई वगळता) संपूर्ण महाराष्ट्रात सक्तीने वीज भारनियमन करावे लागत आहे. हिवाळा किंवा पावसाळा सुरु झाला की त्यात काही प्रमाणात सवलत देण्यात येते, मात्र तो काही कायमचा उपाय नाही. वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन वीज निर्मितीचे नवे प्रकल्प उभारणे आवश्यक आहे, सुदैवाने आपल्याला भरपूर सूर्यप्रकाश व सागरी किनारा लाभलेला आहे. या दोन्हींपासून मोठ्या प्रमाणात वीजेची निर्मिती करता येणे शक्य आहे. समुद्राच्या पाण्यात छोटेसे यंत्र टाकून वीज निर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यातील व दापोली तालुक्यातील कोळथरे येथे केला गेला आहे.


महाराष्ट्र राज्य शासनाचे महान्यूज नावाचे एक स्वतंत्र संकेतस्थळ असून या संकेतस्थळावर तारांकित या सदरात या प्रयोगाची सचित्र माहिती देण्यात आली आहे. जिज्ञासूना http://mahanews.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन याविषयी सविस्तर माहिती घेता येऊ शकेल.


आपल्याकडील पारंपरिक ऊर्जास्त्रोतांचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्र राज्याला ७२० कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला असून या किनारपट्टी क्षेत्रातून अंदाजे ५०० मे.वॅ. इतकी वीजनिर्मिती करण्यास वाव असल्याने तज्ज्ञांचे मत आहे. त्यादृष्टिने विविध स्तरावर प्रयत्नदेखील करण्यात येत आहेत. अशाच प्रयत्नातून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कोळथरे येथे समुद्री लाटांवरील वीज निर्मिती प्रकल्प उभा राहिला आहे.

नवी मुंबईतील खारघर येथील सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेज व सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग-तंत्रनिकेतन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभा राहिला आहे. वाहत्या वार्‍याचा समुद्राच्या पाण्यावर दाब पडल्यामुळे समुद्रात लाटा निर्माण होतात. या लाटांची लांबी व उंची ही तेथील वातावरणावर अवलंबून असते. त्यात गतीज व स्थितीज अशी दोन प्रकारची ऊर्जा साठलेली असते. ही दोन्ही प्रकारची ऊर्जा संयुक्तरित्या साधारणपणे पाच किलोवॅट इतकी असते.


'अनिश' असे नाव असलेला हा प्रकल्प दीड किलो वॅट वीजनिर्मिती क्षमतेचा आहे. कोळथरे येथे समुद्रकिनारी एका अल्टरनेटला चक्र जोडून त्याला दोरखंडाच्या आधारे पाण्यात फ्लोट सोडण्यात आला आहे. समुद्रीलाटांमुळे हा फ्लोट काही अंतर पुढे गेल्यामुळे चक्र फिरते. यातून अल्टरनेटर व जनरेटर कार्यान्वित होतात. लाट ओसरताच फ्लोट मागे खेचला जातो व चक्र पुन्हा फिरते. अशा प्रकारे फ्लोट पुढे मागे होत राहतो व चक्र फिरत राहते. यातूनच वीजनिर्मिती केली जाते. अशा प्रकारची ऊर्जानिर्मिती प्रदुषणमुक्त असून ही सर्व यंत्रणा उभारण्यासाठी साधारणत: ६०-६५ हजार रुपये खर्च येतो. शिवाय अशा एका प्रकल्पातून तीन घरांना वीजपुरवठा होईल इतकी वीज निर्मिती करणे शक्य होत आहे.

कोळथरे येथील या प्रकल्पापासून प्रेरणा घेऊन किनारपट्टी लाभलेल्या ठिकाणी असे तसेच राज्यात ठिकठिकाणी अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग करून वीज निर्मिती प्रकल्पही मोठ्या संख्येने उभे राहिले पाहिजेत. किनारपट्टी असलेल्या ठिकाणी समुद्राच्या लाटांपासून तर राज्यात अन्यत्र सौरऊर्जा व वाऱयापासून (पवनचक्की) वीज निर्माण केली पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला पाहिजेच परंतु त्याचबरोबर मोठमोठे उद्योजक, व्यावसायिक, कॉर्पोरेट कंपन्या, दानशूर व्यक्ती, विविध स्वयंसेवी संस्था यांनी पुढे आले पाहिजे. अर्थात सौरऊर्जा किंवा अशा प्रकल्पांसाठी येणारा खर्च हा खूप मोठा आहे. राज्य शासनानेही त्यासाठी सवलत दिली पाहिजे, प्रकल्पासाठी लागणारे साहित्य अत्यल्प किंमतीत उपलब्ध करून दिले पाहिजे.


केंद्र शासनाच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे http://mnes.nic.in/ या नावाचे तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचेही http://www.mahaurja.com/ असे संकेतस्थळ असून या दोन्ही संकेतस्थळांवर याची माहिती मिळू शकेल. विनय कोरे हे
महाराष्ट्र राज्याचे अपारंपरिक ऊर्जामंत्री आहेत. त्यांचा ई-मेल min_horticulture@maharashtra.gov.in असा आहे.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८८६०९३/२२८८६१८८

३ टिप्पण्या: