बुधवार, १ जुलै, २००९

खजिना रानफुलांचा


वर्षा ऋतूमध्ये अर्थात आपल्या पावसाळ्यात निसर्गाचे रुप अत्यंत मनोहारी आणि मंत्रमुग्ध करणारे असते. निसर्गाने मुक्त हस्ताने विविध रंगांची उधळण करून विविध झाडे, झुडपे, फुले यांचा खजिनाच आपल्यासमोर उधळलेला असतो. पावसाळ्यातील निसर्गाची ही उधळण पाहून मन वेडे होऊन जाते. पावसाळ्यात भटकंती करणाऱे ट्रेकर्स आणि पिकनिक करणाऱया मंडळींसाठी निसर्गाचे हे मनमोहक रुप पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते. या भ्रमंतीमध्ये विविध रंगांची, आकारांची अनेक फुले, झाडे पाहायला मिळतात. ही लहान-लहान फुलझाडे अत्यंत सुंदर असतात. यातील काही फक्त पावसाळ्यातच उगवणारी असतात. भ्रमंती करत असताना ही फुले आपण पाहतो, त्यांचे फोटो काढतो आणि नंतर त्यांना विसरुनही जातो. काही वेळेस त्यांची नावेही आपल्याला माहिती नसतात.



अशा या फुलांची सचित्र माहिती देणारी आदित्य धारप यांची नाममहात्म्य (अशी फुलं, अशी नावं) ही लेखमालिका लोकसत्ताच्या रविवार वृत्तान्तमध्ये (२८ जुलै २००९) सुरु झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसात सह्य़कडय़ाच्या कपारीत असंख्य रानफुलं फुलतात. आणि याच सह्य़पर्वताच्या छत्रछायेत भटकंती करीत वाढलेले फुलवेडे वारकरी कुठल्यातरी अनामिक आनंदाच्या अपेक्षेने या ओल्या अनवट वाटा तुडवत फुलं शोधत हिंडतात. आणि तो सह्य़ाद्री नावाचा प्रेमळ आजोबा अजिबात निराश करत नाही. या रानफुलांची विविधता तरी किती! असंख्य आकार, असंख्य रंग, असंख्य रंगछटा आणि बरोबरीने सरळ सोप्यापासून अति क्लिष्टपर्यंत असंख्य रचना. या रानफुलांबाबत एक मात्र खरं की या रानफुलांचं बारसं करणारी ‘नावं’ मात्र अज्ञातच राहतात, असे आदित्य यांनी लेखाच्या सुरुवातीला म्हटले आहे.


मराठीमध्ये एकाच फुलाची असंख्य नावं होतात. ज्याला जे फूल जसं भासतं त्याप्रमाणे ती व्यक्ती ते नाव देते. म्हणजे कोणी एखाद्या झाडाला त्याची फुलं बघून नाव देईल. तर आणखी कोणी त्याच झाडाची पानं बघून वेगळं नाव देईल. तर कधी असंही होतं की एकाच फुलात कोणाला एक आकार दिसतो आणि कोणाला आणखी वेगळाच! एका गोष्टीबद्दल खेद वाटतो. आपली ही मराठी मातीतली अस्सल नावं देणाऱ्या असंख्य गावकऱ्यांची, धनगरांची, आदिवासींची, रानफुलांच्या वेडाने झपाटलेल्या फुलवेडय़ांची नावं मात्र गुलदस्त्यातच राहतात. मग या स्थानिक नावांचं महत्त्व काय? एक तर ही नावं आपल्या मायमराठीतली. आपण नीट पाहिल्यास असं लक्षात येईल की या रानफुलांच्या रंग, आकार, रूपाप्रमाणेच ही नावंही तितकीच सुंदर आहेत. वैशिष्टय़पूर्ण पावसाळी रानफुलांचं आणि नावांचं कोडकौतुक करावं म्हणून हे ।। नाममाहात्म्य ।।
अशीच काही सुंदर फुलं आणि त्यांच सुंदर नावं आपण ‘अशी फुलं अशी नावं..’ या सदरातून पाहणार, असल्याची माहिती आदित्य धारप यांनी दिली आहे.

निसर्ग आणि भ्रमंतीची आवड असणाऱयांना रानफुलांच्या या खजिन्याची ही सचित्र माहिती नक्की आवडेल, असे वाटते.


संपर्कासाठी आदित्य धारप यांचा ई-मेल

adittyadharap@yahoo.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा