गुरुवार, ३० एप्रिल, २००९

मराठी साहित्याच्या इंग्रजी अनुवादाला अमेरिकेत वाव

मराठीतील दर्जेदार आणि चांगली पुस्तके इंग्रजीत अनुवादित झाली तर या साहित्याला अमेरिकेमध्ये चांगला वाव मिळेल. त्यासाठी मराठीतील प्रकाशकांनी एकत्र येऊन असा प्रयत्न अधिक जोमाने करायला पाहिजे, असे मत मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता यांनी व्यक्त केले.
पुस्तक महोत्सवात तेथील काही प्रकाशक, पुस्तक विक्रेते यांच्याशी चर्चा करताना त्यांनीही मराठी साहित्य, प्रकाशित होणारी पुस्तके याबद्दल उत्सुकतेने विचारणा केली. त्यातूनच असे लक्षात आले की, मराठीतील काही निवडक आणि दर्जेदार साहित्य इंग्रजी भाषेत अनुवादित झाले तर त्याला तिकडे चांगला प्रतिसाद मिळू शकेल. मात्र त्यासाठी जोमाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठीतील प्रकाशकांनी एकत्र येऊन या कामासाठी एखादी कंपनी स्थापन करावी आणि मराठी पुस्तकांच्या इंग्रजी अनुवादाचे काम हाती घ्यावे. मराठीतील काही निवडक पुस्तकांचा सारांश इंग्रजीमध्ये अनुवादित करून आपल्याकडे पाठवावा, अशी अपेक्षाही लंडन महोत्सवात काही जणांनी व्यक्त केल्याचे मेहता यांनी सांगितले.
इंग्रजीमधील प्रसिद्ध लेखक जेम्स पॅटर्सन यांचे एक पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने मराठीत अनुवादित केले असून त्याची एक प्रत आपण लंडन महोत्सवात त्यांना भेट दिली. पुस्तक पाहून ते अतिशय खुष झाले. भारतीय प्रादेशिक भाषेत आपले पुस्तक अनुवादित झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केल्याचे सांगून मेहता पुढे म्हणाले की, जेम्स यांना भारतीय व महाराष्ट्रीय संस्कृतीबद्दल पूर्ण माहिती असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले.
लंडनमधील नागरिकांना वाचनाची प्रचंड आवड असल्याचे मला दिसून आले. तेथे रेल्वे किंवा बसच्या प्रवासात जवळपास प्रत्येक प्रवाशाच्या हातात पुस्तक किंवा वर्तमानपत्र असतेच. तसेच तेथील पुस्तकांची दुकाने अतिशय मोठी असतात. ऑक्सफर्ड स्ट्रीटवर फॉईल्स व बॉर्डर या दोन दुकानांना मी भेट दिली. सुमारे एक लाख चौरस फूट जागेत आणि पाच मजल्यांच्या भव्य इमारतीत ही दुकाने होती. लंडन येथील पुस्तकांची दुकाने आणि गोदामात सर्वत्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. लंडनमधीलच गार्डनर्स बुक हाऊस येथे तर दररोज लाखो पुस्तकांची आवक-जावक होते. येथे पुस्तके देण्यासाठी यंत्रमानव असून तुम्ही संगणकावरून पुस्तकांची मागणी केली की यंत्रमानव काही मिनिटात ते पुस्तक आपल्या समोरील ट्रेमध्ये आणून ठेवतो, अशी माहितीही मेहता यांनी दिली.
जर्मन किंवा अरेबिक भाषेतील काही पुस्तके मराठी भाषेत अनुवादित करायची असतील तर त्यासाठी त्यांच्याकडून काही प्रमाणात आर्थिक मदत मिळत असल्याचेही मेहता यांनी सांगितले.

बुधवार, २९ एप्रिल, २००९

मतदारानो, सावधान विचार करुनच मतदान करा

उद्या ३० एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा पार पडत आहे. राज्यात उद्या होणारे मतदान हे मुंबई, ठाणे व रायगड भागात होत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते व निवडणुकीला उभे असलेले उमेदवार यांनी आपल्याला भरमसाठ आश्वासने दिली असतील. लक्षात घ्या, आपण जे मतदान करणार आहोत, त्यामुळे पुढच्या पाच वर्षांसाठी आपण आपल्या खासदाराची निवड करणार आहोत. हा खासदार स्वच्छ चारित्र्याचा व प्रतिमेचा असला पाहिजे, यावर भर देऊनच मतदानाचा अधिकार बजावा. पक्ष न पाहता व्यक्ती म्हणून मतदान करा. माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे, असे म्हणून मी मतदानच करणार नाही, असे करू नका. आपले मत हे अमूल्य असून आपल्या मतावरच खासदार निवडून येणार आहे. आपल्या प्रत्येक खासदारावर होणारा खर्च पाहिला तर आपले मत किती मौल्यवान आणि जो खासदार निवडून देणार आहोत, तो काय लायकीचा असला पाहिजे, ते तुमच्या लक्षात येईल. तेव्हा सावधान, विचार करूनच मतदान करा.
एका खासदारावर एका वर्षासाठी ३२ लाख रुपये खर्च होत असून पाच वर्षांसाठी एका खासदारावर १ कोटी ६० लाख म्हणजेच ५३४ खासदारांवर पाच वर्षांसाठी आपण ८५५ कोटी रुपये खर्च करत आहोत. तेव्हा विचार करा.
हा खर्च एवढ्यावरच थांबत नाही. प्रत्येक खासदारावर कसा व किती खर्च होतो, हे विसरुन चालणार नाही. एका खासदाराला दरमहा १२ हजार रुपये इतके वेतन मिळते. त्याच्या कार्यालयीन खर्चावर दरमहा १४ हजार रुपये खर्च होतात. संसदेच्या अधिवेशनाच्या वेळी प्रत्येक खासदाराला दररोज ५०० रुपये इतका उपिस्थती भत्ता मिळतो. प्रत्येक खासदाराला रेल्वेच्या एसी डब्यातून भारतात कुठेही मोफत प्रवास करण्याची सवलत मिळते. प्रत्येक खासदाराला त्याचा स्वीय सहाय्यक किंवा पत्नीसह वर्षाला ४० वेळा मोफत विमान प्रवास करता येतो. प्रत्येक खासदाराला त्याच्या निवासस्थांनी विजेचे ५० हजार युनीट्स मोफत वापरता येतात. प्रत्येक खासदाराला त्याच्या मालकीच्या दूरध्वनी संचावरून १ लाख ७० हजार दूरध्वनी फुकट करता येतात.
हे सर्व वाचल्यानंतर तरी डोळे उघडून मतदान करा.
मतदारांना आपल्या उमेदवाराची संपूर्ण माहिती एका लघुसंदेशाद्वारे भ्रमणध्वनीवर प्राप्ती करण्याची सोय एका स्वयंसेवी संस्थेने उपलब्ध करून दिली आहे. तसेच संकेतस्थळाच्या माध्यमातूनही मतदारांनी आता या सुविधेचा लाभ घेऊन गुन्हेगारी पार्श्वकभूमी असणार्याा कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नाही, असे ठरवले पाहिजे. ५६७६७८ या क्रमांकावर खालीलप्रमाणे टंकलिखित करायचे NCPINCODE असे केले की नोंदणी झाली. कुणीही लघुसंदेश पाठवू शकेल. त्यांना भ्रमणध्वनीवर त्यांच्या मतदारसंघातील विद्यमान खासदाराची माहिती मिळू शकेल. निवडणुकीसाठी प्रथमच उभ्या रहाणार्या उमेदवारांची संपूर्ण माहिती व पूर्वपिठीका जाणून घेता येईल. याशिवाय www.NoCriminals.org या संकेतस्थळावर मतदाराला उमेदवारांची माहिती आणि गुन्हेगारी पार्श्वशभूमी यांविषयी जाणून घेता येईल. हे संकेतस्थळ सतत अद्ययावत होणार असल्यामुळे मतदारांना शेवटच्या क्षणापर्यंतच्या घडामोडींची माहिती मिळेल. `फोरम फॉर क्लीन पॉलिटिक्स'कडून ही मोहीम राबवली जात आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाला चारित्र्यवान पुढारी मिळावा हा त्याचा अधिकार आहे.`असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अँण्ड नॅशनल इलेक्शन वॉच' ही संस्था या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे.

मंगळवार, २८ एप्रिल, २००९

आनंदाची अमेरिका वारी

काही काही मडंळी एकूणच धडपडी असतात. आपली नोकरी-व्यवसाय सांभाळून त्यांचे काही ना काही उद्योग (चांगल्या अर्थाने) सुरू असतात. लोकांच्या दृष्टीने ते काम म्हणजे लष्कराच्या भाकऱया भाजणे असे असले तरीही एकूण समाजासाठी अशी माणसे आणि त्यांच्या अशा प्रकारच्या सामाजिक कामाची आवश्यकता असते. त्यापासून काही जणांना प्रेरणा मिळते, महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा युवकांमध्येही जबाबदारीची जाणीव निर्माण होऊन काहीतरी करण्याची उमेद किमान मनात तरी येते. असेच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. आनंद हर्डीकर. डोंबिवलीतील आपला दवाखाना आणि हॉस्पीटल सांभाळून ते समाजोपयोगी कामे सतत करत असतात. त्यांचा हा उत्साह सर्वानाचा प्रेरणदायी असतो. डॉक्टर गेल्या वर्षी अमेरिकावारी करून आले. आपल्या या अमेरिकावारीचे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. डॉक्टरांनी लिहिलेल्या आनंदाची अमेरिका वारी या पुस्तकाची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे.
हे पुस्तक वाचकांना घरबसल्या अमेरिकेची वारी घडवून आणणारे असून सोप्या आणि ओघवत्या भाषाशैलीमुळे वाचनीय झाले आहे. मला या पुस्तकातील डॉ. हर्डीकर यांनी त्यांच्या वडिलांविषयी(वामन शंकर हर्डीकर) लिहिलेले समर्पण हे प्रकरण अधिक भावले.वडीलांनी केलेले संस्कार व त्यांच्या एकूण व्यक्तीमत्वाचे विविध पैलू डॉक्टरांनी फार छान उभे केले आहेत. त्यातून डॉक्टरांवर लहानपणापासूनच कसे संस्कार झाले व समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, हे बाळकडू कसे मिळाले हे कळते. या समर्पण मधील काही वाक्ये जशीच्या तशी डॉक्टरांच्याच शब्दात (त्यांच्या वडीलांविषयीची)
मी डोंबिवलीत दवाखाना सुरू कऱणार असे कळल्यावर तू तिकडे समुद्रावर घागरी ओतशील, पण येथे चमचाभर पाण्यासाठी तडफडणाऱया लोकांना (औषध) पाणी कोण देणार, असा जाब विचारणारे तुम्ही,
मी नोकरीच्या दुसऱया वर्षीच घेतलेली माझ्या दारातील गाडी पाहून, एक खडू आणून तुझ्या बंगल्याच्या भिंतीवर, सामान्य माणसांचा पैसा उड्या मारतो, असे मोठ्या अक्षरात लिही, असे सांगणारे तुम्ही,
माणूस सुखासाठी पैसा मिळवतो आणि सुख सोडून पैशांच्याच मागे लागतो, असे वास्तव सांगणारे तुम्ही,
जेव्हा टोकाची मतभिनन्ता होते. तेव्हा जागा बदलून पाहा (समोरच्याच्या जागी तू असतास तर तू काय केले असतेस) असा मंत्र देणारे तुम्ही
गावी घरात ट्युबलाईट लावण्यासाठी धाकटा भाऊ प्रमोदने पुण्याहून पाठवलेले पैसे पंढरपूरला दुष्काळग्रस्त गाईच्या चाऱयासाठी पाठवून देणारे तुम्ही
गावामध्ये पोस्टाची सोय नाही म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर पोस्टाचा आंधळा कारभार असा फलक लावून समस्येला वाचा फोडणारे आणि गावासाठी पोस्ट मिळवून देणारे तुम्ही
अशा अनेक प्रसंगातून आणि उदाहरणातून डॉ. आनंद हर्डीकर यांनी आपल्या वडिलांचे व्यक्तीमत्व उभे केले आहे.
डॉक्टरांची ही अमेरिका वारी १४ मे ते १५ जून २००८ या कालावधीत झाली होती. पूर्वरंगमध्ये डॉक्टरांनी अमेरिकावारी कशी ठरली, त्यानंतरचे व्हीसा व अन्य सोपस्कार या विषयी लिहिले आहे. त्यानंतर १४ मे ते १५ जून या कालावधीतील रोजच्या दैनंदिनीतून डॉक्टरांची ही अमेरिकावारी उलगडत गेली आहे. सॅनफ्रान्सिस्को, व्हाया लास व्हेगास, लास व्हेगास ,स्वप्ननगरी, अफलातून युनिव्हर्सल स्टुडिओ अशा प्रकरणातून अमेरिकेतील प्रवासाचे अनुभव डॉक्टरांनी सांगितले आहेत.
हे पुस्तक अवघ्या ८४ पानांचे आहे. त्यामुळे एका बैठकीत ते सहज वाचून होते. अमेरिकावारीतील भरपूर छायाचित्रेही या पुस्तकात आहेत. हे केवळ प्रवासवर्णन नाही तर डॉक्टरांनी आपले परिचित, नातेवाईक, मुले आणि एकूणच अमेरिकेतील जीवन, तेथील राहणीमान, वाहतूक व्यवस्था, तेथे नोकरीच्या निमित्ताने गेलेली भारतीतील तरुण मुले, त्यांचे विश्व, प्रवासातले अनुभव या विषयी सविस्तर लिहिले आहे. हे सर्व वाचताना आपण अगदी गुंगून जातो आणि डॉक्टरांबरोबर आपलीही अमेरिकावारी घडते. कोणाला अमेरिकेत जायचे असेल तर काय काय काळजी घ्यायची, काय अवधान बाळगायचे त्याचेही मार्गदर्शन मिळते.
डॉ. आनंद हर्डीकर यांचा ईमेल
avhardikar@yahoo.com
मोबाईल क्रमांक-९२२४१५२७९२

सोमवार, २७ एप्रिल, २००९

खगोलशास्त्राचा समग्र व सचित्र अवकाशवेध..

आपल्या सर्वानाच आकाशातील ग्रह, तारे याविषयी एक सुप्त आकर्षण असते. रात्रीच्या वेळी काळेभोर आकाश पाहणे आणि त्या आकाशात विविध ग्रह, तारे, नक्षत्रे शोधणे आणि ते पाहणे यात वेळ कसा जातो, ते कळत नाही. अर्थात त्यासाठी आकाशाची माहिती असणारा एखादा तज्ज्ञ आपल्याबरोबर असला पाहिजे. म्हणजे नेमकी माहिती आपल्याला कळू शकते. खगोलशास्त्र, आकाश, ग्रह-तारे, नक्षत्र आदींविषयी समग्र माहिती आणि ती सुद्धा मराठीतून असणाऱया एका संकेतस्थळाची ओळख मी आज करून देणार आहे. खगोलशास्त्रावरील मराठीतील हे पहिले संकेतस्थळ असून सोप्या व भरपूर चित्रे, आकृत्या, अॅनिमेशन पद्धतीने या विषयाची माहिती करून देण्यात आली आहे. www.avakashvedh.com असा या संकेतस्थळाचा पत्ता आहे.
सध्याच्या काळात या विषयाबाबत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य नागिरकांमध्येही आवड निर्माण झालेली आहे. अनेक खगोलमंडळे, विज्ञानप्रेमी संस्था आकाश निरीक्षणाचे कार्यक्रम आयोजित करत असतात. कर्जत जवळील वागंणी हे गाव आकाशदर्शनासाठीच प्रसिद्ध आहे. कारण त्या ठिकाणी शहरात असतात, तसा दिव्यांचा भगभगाट नसल्याने काळ्याभोर आकाशात ग्रह, तारे आणि नक्षत्रे छान दिसू शकतात. शहरापासून दूर एखाद्या खेडेगावात आपण गेलो तरीही असे काळेभोर आकाश पाहायला मिळू शकते. अशा या खगोलशास्त्रावर इंग्रजी भाषेत खूप लेखन झालेले असून मराठीतही जयंत नारळीकर, दा. कृ. सोमण, प्रा. मोहन आपटे, हेमंत मोने (काही नावे राहिली असल्यास क्षमस्व)यांनी हा विषय सोप्या भाषेत लोकांपुढे आपल्या लेखनातून आणला असून आजही वेळोवेळी ही मंडळी या विषयावर वृत्तपत्रातून लेखन करत असतात.
या विषयावर आजवर मराठीत संकेतस्थळ नव्हते. खगोलप्रेमी आणि खगोलअभ्यासक असलेल्या सचिन पिळणकर या तरुणाने ही उणीव भरून काढली असून या विषयावर समग्र माहिती देणारे हे संकेतस्थळ सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्वोत्कृष्ट संकेतस्थळाचे पहिले पारितोषिकही या संकेतस्थळाला मिळाले असून इतरही अनेक बक्षिसे मिळाली आहेत.
या संकेतस्थळावर आपण गेलो की पहिल्यांदा आपल्याला त्या दिवसाचा म्हणजे आजच्या दिवसाचा सुर्योदय व सुर्यास्त आणि चंद्रोदय व चंद्रास्त यांच्या वेळा पाहायला मिळतात.याच ठिकाणी जो महिना सुरू आहे, त्या महिन्याचे आकाश, त्या महिन्यातील आकाशातील ग्रहिस्थती, त्या महिन्यात घडणाऱया विशेष घटना, होणारा उल्कावर्षाव याची माहिती मिळू शकते.
संकेतस्थळावर पहिले पान, हा महिना, सुरुवात, ओळख सूर्यमालेची, लेख आणि कथा, अंतराळ, खगोलीय गोष्टी, भारतीय खगोलशास्त्र, भारतीय खगोलशास्त्रज्ञ असे गट तयार करण्यात आले आहेत. त्या त्या गटावर क्लिक केले की आणखी सविस्तर माहिती आपल्या समोर येते.
ओळख सूर्यमालेची यात सूर्यमालेचे अवकाशातील स्थान, सूर्यमालेबद्दल अन्य माहिती, आपली आकाशगंगा, अवकाशातील ग्रह व तारे पाहायला मिळते. त्याबरोबरच खगोल शब्दसूची, आजवर झालेले आणि यापुढे होणारे महत्वाचे उल्कावर्षाव यांची माहिती सांगण्यात आली आहे. आर्यभट्ट, वराहमिहीर, भास्कराचार्य ते जयंत नारळीकर आदी भारतीय खगोलशास्त्रचांचा परिचयही येथे करून देण्यात आला आहे.
संकेतस्थळावर खास प्रश्नोत्तरे असा एक विभाग असून यात सर्वसामान्यांना पडणाऱया उत्तरायण व दक्षिणायन, आकाश आणि अवकाश, अधिक्रमण म्हणजे काय, ध्रुवतारा कसा शोधायचा, प्रकाशवर्ष म्हणजे काय, अवकाशाचा नकाशा कसा पाहायचा या आणि अशा अनेक प्रश्नांचे शंकासमाधान सोप्या भाषेत या संकेतस्थळावर करण्यात आले आहे.
लहानमुले आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राविषयी आवड निर्माण करण्यासाठी, त्यांना हा विषय सहज व सोप्या भाषेत समजून देण्यासाठी आणि आपल्यालाही याविषयी सचित्र व समग्र माहिती मिळण्यासाठी हे संकेतस्थळ अत्यंत उपयुक्त असे आहे. प्रत्येकाने किमान एकदा तरी येथे भेट द्यावीच.

रविवार, २६ एप्रिल, २००९

निवडक मराठी साहित्यिक इंटरनेटच्या महाजालात

मराठी साहित्यातील काही साहित्यिकांवर संकेतस्थळे तयार करण्यात आली असून त्या निमित्ताने मराठी साहित्यिक आता इंटरनेटच्या महाजालात आले आहेत. या महाजालात सध्या जी. ए. कुलकर्णी, कवी, गीतकार आणि महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे, ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्यासह कथालेखक व नाटककार रत्नाकर मतकरी आदींचा समावेश असून लवकरच गो. नि. दांडेकर यांच्यावरील संकेतस्थळही सुरू होणार आहे.
जी. ए. कुलकर्णी यांचे पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी असे असून त्यांच्या समग्र साहित्याची नोंद www.gakulkarni.info या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रा. म. द. हातकणंगलेकर यांचा जीए यांच्यावरील लेख यावर असून हे संकेतस्थळ इंग्रजीत आहे. जीए यांच्या तीन कथा येथे वाचता येतात. पु. ल. देशपांडे यांच्यावरील www.puladeshpande.net संकेतस्थळावर ‘अनंत हस्ते पुरुषोत्तमाने देता, किती घेशील दो कराने’ असे वाक्य दिले असून पुलंचे साहित्य आणि मराठी रसिकांना त्यांनी आजवर जे जे काही दिले आहे, ते पाहता, ते वाक्य सार्थ असल्याचे पटते. या संकेतस्थळावर साहित्यिक पुल, छोटय़ांसाठी पुल, विज्ञानप्रेमी पुल, संगीतमय पुल, पुलंची भाषणे, त्यांच्या पुस्तकांची यादी असे सर्व वाचायला मिळते. गदिमांवरील www.gadima.com संकेतस्थळ मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये असून ते दृकश्राव्य व लिखित स्वरुपात आहे. गदिमांवरील लघुपटापासून ते त्यांचे अजरामर गीतरामायण, जोगिया हा काव्यसंग्रह, चित्रपटातील गाणी, ललित लेखन याची माहिती मिळते. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्यावरील
www.kusumagraj.org या संकेतस्थळावर त्यांचा जीवनपट, साहित्याची सूची, पुरस्कार, छायाचित्रे पाहायला मिळतात. रत्नाकर मतकरी यांच्या www.ratnakarmatkari.com या संकेतस्थळावर मतकरी यांनी आजवर लिहिलेली नाटके, बालनाटय़े, मालिका, त्यांचा परिचय, कथालेखन याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे संकेतस्थळ इंग्रजीत आहे. गो. नि. दांडेकर यांच्यावरील www.goneeda.com हे संकेतस्थळ लवकरच सुरू होणार असल्याची नोंद संकेतस्थळाच्या पानावर देण्यात आली आहे. इंग्रजी भाषेतील साहित्य आणि साहित्यिकांच्या तुलनेत मराठीतील साहित्यिक कमी संख्येने इंटरनेटवर असले तरी ही चांगली सुरुवात असल्याची प्रतिक्रिया साहित्यप्रेमींनी व्यक्त करण्यात येत आहे.

शनिवार, २५ एप्रिल, २००९

दुर्गजतन आणि संवर्धन चळवळ

महाराष्ट्रातील गड आणि किल्ले आपले सांस्कृतिक वैभव असून तो इतिहासाचा मोठा ठेवा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यात विविध ठिकाणी भुईकोट, सागरी किल्ले बांधले. काही किल्ले त्यांनी जिंकून घेतले. महाराजांनी बांधलेल्या/खास बांधून घेतलेल्या किंवा कोणाकडून जिंकून घेतलेल्या या सर्व किल्ल्यांची व्यवस्था, त्यांनी उत्तम ठेवली होती. योग्य प्रकारे त्यांची निगा राखण्यात येत होती. आज काही अपवाद सोडले तर या सर्व गड व किल्ल्यांची अत्यंत दूरवस्था झालेली आहे. स्वयंसेवी आणि इतिहासाबद्दल प्रेम असणारी मंडळी आपल्या परीने त्यांची काळजी घेत आहेत. खरे तर राज्य शासनाकडून हे काम अधिक जोमाने होणे गरजेचे आहे. मात्र शासनाला भर समुद्रात तीनशे कोटी रुपये खर्च करून शिवाजी महाराज यांचा पुतळा बांधायला पैसे आहेत परंतु त्यांचे जीवंत स्मारक असलेल्या या गड-किल्ल्यांच्या डागडुजीसाठी, त्यांच्या संवर्धनासाठी पैसे नाहीत, हे आपले दुर्दैव आहे. शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगडावर महाराज यांच्या पुतळ्यावर साधी मेघडंबरी आपण बसवू शकलेलो नाही. त्याला परवानग्या आणि अन्य सोपस्कार पार पाडण्याची आवश्यकता लागते.
मात्र असले असले तरी काही स्वयंसेवी व सामाजिक संस्था, दुर्गप्रेमी मंडळे, इतिहासाबद्दल प्रेम असणारे तरुण आपापल्यापरिने या गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करत आहेत. युग-परिवर्तक प्रतिष्ठान व रायेश्वर प्रतिष्ठान आणि पुणे जिल्ह्यातील दुर्गप्रेमी व शिवप्रेमी मंडळ ही अशीच काम करणारी मंडळे. ऑर्कूटवरील कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण या कम्युनिटीवर या संदर्भात नुकतेच वाचनात आले. योगेश फाटक यांनी याची माहिती करून दिली होती. मला हा उपक्रम खूप चांगला आणि स्तूत्य वाटला. त्यामुळे त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी म्हणून आज माझ्या ब्लॉगवर मी त्याची माहिती देत आहे.
छत्रपती श्री शिवाजी महाराजाच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोटांचे संवर्धन व्हावे, गड कोटांना पुन्हा एकदा जुनेएतिहासीक महत्व प्राप्त व्हावे त्यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी संवर्धन व विकास आराखडा तयार करण्यात आला असुन तो महाराष्टातील सर्व किल्ल्यांसाठी राबविला जाणार आहे. सध्या या गडकोटांची अवस्था फार वाईट आहे. गडावरील काही वास्तू इंग्रजानी काळाच्या ओघात, तर काही आपल्याच बांधवानी पाडल्या आहेत. या गडकोटाचे जतन व्हावे, इतिहासाचे स्मरण व्हावे, आणि देशप्रेम जागृत व्हावे. याच उद्देशाने किल्ले संवर्धन व विकास समितीची स्थापना नुकतीच पुण्यामध्ये करण्यात आली आहे. या आराखड्यामध्ये किल्यांच्या पायथ्याशी असणारया नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. स्वयंसेवी व सामाजिक संस्था आणि राज्य शासनाच्या मदतीने हा आराखडा राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जनजागृती मोहिम, संवर्धन व विकास कामांस भोर तालुक्यातील रोहिडा उर्फ विचित्रगडापसुन सुरवात करण्यात आली. रोहिडा किल्ला हा संर्वधन व विकास कामासाठी एक प्रतिक्रूती (मौडेल) किल्ला म्हणुन निवडण्यात आला आहे.
या संर्वधन व विकास आराखड्यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. हे काम एकट्या दुकट्याचे नसुन, तसेच फक्त शासनाची जवाबदारी नसुन सर्वांचा सहभाग असणे महत्वाचे आहे. यामध्ये मुख्यत्वे गडाच्या पायथ्याशी रहाणारया लोकांचे गट करुन विविध कामे त्यांनावाटुन देणे, तसेच स्वयंसेवकांकडून त्या कामाचे अवलोकन करणे, कामाचा आढावा घेणे याचा समावेश आहे. महामार्गापासुन गडापर्यंत तसेच गडावर जाणारया मार्गामध्ये फलक लावले जाणार आहेत. गडाचा इतिहास तसेच तेथील ठळक घटना, एखाद्या गडापर्यंत जाणारया रस्त्यामध्ये सुचना फलक, अन्य माहितीचे फलक लावण्यात येणार आहेत. सध्याच्या युगात मौजमजेची व्याख्या बदलली आहे. अशा लोकांचे मत परिवर्तनकरुन गडावर दारू, सिगरेट आणि अन्य गैरप्रकार करण्यापासून परावृत्त करणे, असे प्रकार गडांवर घडू नयेत म्हणून एक स्वयंसेवक कायम गडावर ठेवणे, गडावर काय पहावे/ गडावरुन कोणत्या गोष्टी दिसतात याचेही माहितींफलक लावणे, गडाच्या पायथ्याशी राहाणारया लोकांमधुन एखादा गाईड तयार करणे, गडापर्यंत किंवा ठरावीक टप्यापर्यंत रस्ताचे काम करुन घेणे, किल्याच्या पायथ्याशी वाहन तळाची सोय उपलब्ध करुन देणे, गडावर जाण्यासाठी तसेच अवघड जागी रेलिंग उभे करणे, किल्यावर मुख्य प्रवेश द्वाराशी दरवाजा बसवणे, गडावर विज तसेच नविन प्रकारची साधने वापरुन विज निर्मिती करणे व त्याचा उपयोग गडावरील बागेसाठी मोटारने पाणी पोहचवणे, मंदिरातील दिव्यांसाठी करुन घेणे.एतिहासिक वास्तुंची दुरुस्ती करणे, स्वच्छता गृह उभारणे, गडावर वस्तुसंग्रहालय तयार करणे आदी विविध कामे केली जाणार आहेत.
आराखड्याची अंमलबजावणी व अन्य कामास सुरवात झाली असुन ह्या कामामध्ये सहभागी होण्याकरता किंवा अधिक माहितीसाठी इच्छुकांना या मंडळींशी संपर्क साधता येईल.
योगेश फाटक- ९८२३३००७२४, पंडित अर्जुनवाडकर-९८२२६७०५५८, निलेश वाळिबे-९८२२८७७७६७, मंदार केदारी-९७६४७४६४९१, राजे भोसले- ९८२३१६७०७८, सागर पालकर- ९४२२९८४३६३

शुक्रवार, २४ एप्रिल, २००९

समग्र हिंदी साहित्य लवकरच इंटरनेटवर

वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाने भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये एक स्तुत्य उपक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सहकार्याने राबविण्याचे ठरवले असून या महत्वाकांक्षी प्रयोगामुळे हिंदी भाषेतील समग्र साहित्य आता लवकरच इंटरनेटवर उपलब्ध होणार आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याचा दावा विद्यापीठाकडून करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटी रुपये इतका खर्च येणार असल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
इंग्रजी भाषेतील निवडक आणि दर्जेदार साहित्य क्लासिक रिडर डॉट कॉम या संकेतस्थळावर उपलब्ध असून येथे क्लिक केल्यानंतर इंग्रजी भाषेतील प्रसिद्ध लेखकांचे साहित्य वाचता येऊ शकते. इंग्रजीप्रमाणेच हिंदी भाषेतील समग्र साहित्य भारतासह जगभरातील हिंदी साहित्य प्रेमींना वाचता यावे, या उद्देशाने महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाअंतर्गत समग्र हिंदी साहित्यातील सुमारे एक लाखांहून अधिक पाने इंटरनेटवर टाकण्यात येणार आहेत. यामुळे भारतासह संपूर्ण जगभरातील हिंदी साहित्य प्रेमी आणि वाचक घरबसल्या एका क्लिकवर हिंदी साहित्यातील कथा, कवितांसह अन्य साहित्याचा आस्वाद घेऊ शकतील. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर हे हिंदी साहित्य वाचता येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी दोन कोटी रुपये विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देण्यात आले आहेत. हिंदी भाषेतील ज्या लेखकांच्या साहित्यावरील स्वामीत्वधनाचा (कॉपीराईट)चा अधिकार संपुष्टात आला आहे, त्या लेखकांचे साहित्य प्रारंभी या संकेतस्थळावर देण्यात येणार असून अन्य हिंदी साहित्यिक आणि प्रकाशकांची परवानगी घेऊन त्यांचे साहित्यही येथे देण्यात येणार असल्याचेही या सूत्रांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी विद्यापीठातर्फे स्वतंत्र संपादक मंडळ नियुक्त करण्यात येणार असून या मंडळाकडून इंटरनेटवर जे साहित्य देण्यात येणार आहे, त्याची निवड केली जाणार आहे. या प्रकल्पानंतर विविध परदेशी भाषांमध्येही निवडक हिंदी साहित्याचा अनुवाद करण्याचे काम हाती घेण्यात येणार असून यात इंग्रजीसह फ्रेंच, जर्मनी, इटालियन, रशियन, चीनी यांचा समावेश आहे.

गुरुवार, २३ एप्रिल, २००९

धारावी

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी, अशी बिरुदावली मिरवणाऱया धारावीत बुधवारी काही तास दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुरेश गंभीर यांच्या प्रचारफेरीचे वृत्तांकन करण्यासाठी फिरलो. बातमीच्या तसेच अन्य काही कामाच्या निमित्ताने यापूर्वीही धारावीत जाण्याचा प्रसंग आला होता. आजवर केवळ पुस्तकातून किंवा चित्रपटातून धारावीबद्दल वाचले/पाहिले होते होते. मात्र त्यामुळे वास्तव कळून येत नाही. ते प्रत्यक्ष फिरल्यानेच कळू शकते. आपल्या मध्यमवर्गीय आणि सुखवस्तू मानसिकेतून बाहेर पडून धारावीचे हे वास्तव जीवन, तेथील लोकांचे राहणीमान पाहिले तरी अंगावर काटा येतो. केवळ काही तास तेथे फिरल्याने आपली जर ही अवस्था होत असेल तर तेथे राहणाऱया लोकांचे काय, त्यांना आता तशाच राहणीमानाची व जीवनाची सवय झाली असेल, असे म्हणून या वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
मी बुधवारी धारावीचा खांबदेवनगर, नव्वद फूट रस्ता, मदिना वसाहत,ढोरवाडा, गांधी मैदान आणि अन्य परिसर फिरलो. हा परिसर म्हणजे संपूर्ण धारावी नाही. तरीही केवळ या भागात फिरल्यानंतर संपूर्ण धारावी आणि तेथील जीवनाचे चित्र डोळ्यापुढे उभे राहते. माझे लहानपण टिपीकल मध्यमवर्गीय, ब्राह्मणी कुटुंबात आणि टु रुम किचनच्या फ्लॅट संस्कृतीमधील. मध्यमवर्गीय व ब्राह्मणी संस्कारात वाढलेलो, मोठा झालेला. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणही चांगल्या शाळा-महाविद्यालयात झालेले. आजूबाजूचा परिसर, शेजारही सुशिक्षित व मध्यमवर्गीय संस्कृतीचा. त्यामुळे असेल परंतु, अशी वस्ती, वसाहत किंवा झोपडपट्टीतील जीवन पाहिले की मनात येते की आपण कितीतरी पटीने सुखी आणि सुदैवी म्हणायला पाहिजे.
धारावीत फिरणे म्हणजे चक्रव्युहात शिरण्यासाऱखे आहे. आपल्याला या चक्रव्युहात जाता येते मात्र त्यातून बाहेर पडणे कठीण असते. तेथील माहितगार बरोबर असल्याशिवाय नेमके बाहेर कुठून व कसे बाहेर पडायचे ते कळत नाही. जेमतेम एक माणूस जाऊ शकेल अशी चिंचोळी गल्ली, एकमेकांना खेटून असलेली घरे (खरे तर त्यांना घर का म्हणायचे), घरासमोरच वाहणारी उघडी गटारे, सार्वजनिक स्वच्छतागृहे, घरापाशी किंवा स्वच्छतागृहाजल असलेला पिण्याच्या पाण्याचा नळ, अंधारी जागा, घरावर पत्रे किंवा काही ठिकाणी प्लास्टीकचे आच्छादन, वाटेल तिथून आणि वाटेल तशा गेलेल्या विजेच्या वायरी, हवा किंवा सूर्याचा प्रकाश यांना जणू काही कायमची प्रवेशबंदी, असे धारावीचे सर्वसाधारण दृश्य.
धारावीत अनेक ठिकाणी विविध लहानमोठे उद्योग व्यवसायही चालतात. तेथे एका छोट्याश्या खोलीमध्ये किमान दहा जणांपासून ते कमाल वीस-पंचवीस जणांपर्यंत कामगार राहात असतात. हे प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार येथून आलेले. अशीच परिस्थिती घरांमधील. म्हातारे आई-वडिल, त्यांची लग्न झालेली मुले, नातवंडे लहान घरांमधून राहातात. बहुतांश वस्ती ही आर्थिकदृष्ट्या हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील. अर्थात याला काही अपवादही आहेत. शिकलेली, चांगल्या ठिकाणी नोकरी करणारी मात्र मुंबईत जागा घेणे परवडत नाही म्हणून किंवा पिढ्यानपिढ्या धारावीत राहतात आणि आता पुनर्विकासात नवीन घर मिळेल, या आशेवर जगणारी अनेक कुटुंबेही येथे राहातात.
घऱात दोन दिवस पिण्याचे पाणी आले नाही, लोडशेडींगमुळे लाईट गेले म्हणून, उन्हाळ्यात किती उकडताय म्हणून वैतागणारी आपण मंडळी. धारावी किंवा तत्सम झोपडपट्टीतील लोक कशी राहातात, याचा कधी विचारच करत नाही. आपल्याला काय त्याचे, असे म्हणतो आणि सोडून देतो. अशा ठिकाणी राहणाऱया लहान मुलांवर काय संस्कार होणार, लहान वयातच जे कळायला नको, ते कानावर पडल्यामुळे किंवा पाहायल्यामुळे त्यांचे बालपण हे बालपण राहात असेल का. तरुण मुलींचे तारुण्य येथे कसे फुलत असेल, येथे वाढणारी भावी पिढी कोणते संस्कार आणि विचार घेऊन मोठी होत असेल, असे अनेक विचार मनात येतात. अर्थात चांगल्या किंवा सुशिक्षित घरातील मुले किंवा माणसेही अनेकदा संस्कारहीन होतात, सख्खा भाऊ आपल्या मोठ्या भावाची हत्या करतो, मुलगा आई-वडिलांना किंवा नवरा-बायकोला मारहाण करतो, शिव्या घालतो, वाईट संगतीला लागतो आणि झोपडपट्टीत किंवा अशा तथाकथीत संस्कारहीन वातावरणात लहानाचा मोठा झालेला व राहणारारी एखादी व्यक्तीही सुसंस्कारीत व खऱया अर्थाने सुशिक्षित होऊ शकते, हा भाग वेगळा.
धारावी किंवा अशा झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱया लोकांचे जीवनमान कधी तरी बदलेल का, त्यांच्या आयुष्यात कधी आनंदाचे क्षण येतील काय, स्वच्छ व मोकळी हवा त्यांना कधी मिळेल का,
महापालिका, विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका आल्या की सर्वपक्षीय राजकीय नेते, निवडणुकीला उभे असलेले उमेदवार अशा वस्तांमध्ये प्रचार करताना भरघोस आश्वासने देतात. आम्हाला मत द्या म्हणजे आम्ही तुमच्या जीवनात बदल घडवून आणू म्हणून स्वप्न विकतात. तसे झाले असते तर आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे निवडणुका झाल्या. त्यामुळे हे चित्र खरेतर कधीच बदलायला हवे होते. मात्र प्रत्यक्षात असे दिसते की धारावी किंवा अशा झोपडपट्ट्यांमधील लोकांचे आयुष्य व राहणीमान सुधारणे तर सोडाच परंतु या झोपडपट्ट्या कमी न होता वाढतच चालल्या आहेत. या ठिकाणी राहणाऱया लोकांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला नाही. ते आहेत तिथेच असून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचे आयुष्य मात्र कमालीचे बदलून गेलेले पाहायला मिळते.
झोपडपट्टी किंवा अशा वसाहतींमध्ये कोणी खुषीने आणि आनंदात राहात नाही. केवळ नाईलाज म्हणून अनेकांना येथे राहावे लागते. झोपडपट्टी म्हटली की आपण सुशिक्षित मंडळी नाके मुरडतो. या झोपडपट्ट्या निर्माण व्हायला राजकीय पक्ष आणि त्यांची नेते मंडळीच कारणीभूत आहेत. एकगठ्ठा राजकीय मतांसाठी याच मंडळींनी हा भस्मासुर निर्माण केला.येथील लोकांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी नेहमीच वापर करून घेतला. मुळात एखाद्या भागात, परिसरात अनधिकृतपणे असे एखादे झोपडे बांधले गेले तेव्हाच ते हटवले असते, तर आज अनधिकृत झोपडपट्ट्यांचा हा राक्षस निर्माणच झाला नसता. राजकीय सोयीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पोलीस, महापालिका, अन्य शासकीय विभाग हे एकमेकांच्या हातात हात घालून, अनेकांचचे हात ओले करून आपल्याला जसे हवे तसे करून घेत असतात. एका झोपड्यानंतर हळूहळू अनेक झोपड्या तयार होतात. त्यांना वीज, पाणी मिळते. काही दिवसांनी शिधावाटपपत्रिका मिळून ते अधिकृत नागरिकही होतात. मात्र या सगळ्यात त्यांची दुरावस्था किंवा दैन्यावस्था काही दूर होत नाही. राजकीय संरक्षणामुळेच आज मुंबईत पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्यांनाही हजारो बेकायदा झोपडपट्ट्यांचा विळखा पडलेला आहे. याच झोपडपट्ट्यांमधून बांगलादेशी नागरिक बेकायदा राहात असून अनेक अनैतिक व्यवसाय येथे सुरू आहेत.
राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनी निर्माण केलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये आज लाखो नागरिक नरकासारखे जीवन जगत आहेत. माणसांसाठी आवश्यक असलेल्या अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजाही आपण स्वातंत्र्यानंरच्या इतक्या वर्षांत पूर्ण करू शकललो नाही. झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली या लोकांना मोठी स्वप्न दाखवली जातात आणि पुन्हा याच लोकांच्या मतांवर राजकारणी मंडळी निवडून येतात. मात्र इथे राहणाऱया लोकांच्या आयुष्यात व राहणीमानात काहीही फरक पडत नाही, हे असे किती दिवस आणि कुठवर चालणार.
असे असले तरी अशा ठिकाणी राहून चांगले शिक्षण घेणाऱया, आपल्या वागण्यात नैतिकता आणि संस्कार असणाऱया, आहे त्या परिस्थितीतही आनंदाने जगणाऱया या सर्व मंडळींना खरोखरच मनापासून सलाम...

बुधवार, २२ एप्रिल, २००९

करदात्यांच्या पैशांवर मंत्री उदार

काही महिन्यांपूर्वी राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बदलाचे नाटक पार पडले. २६/११ च्या हल्ल्यानंतरही खुर्चीला चिकटून राहणाऱया आणि बेलगाम वक्तव्ये करणाऱया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अखेर जावे लागले. जावे लागले म्हणण्यापेक्षा लोकक्षोभाची दखल घेऊन या दोघांच्याही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना घालवले. त्यानंतर काही दिवस मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री कोण याचा प्रयोग रंगला. अखेरीस तो संपला आणि मग नवे मंत्री, खातेवाटप यावर घोळ सुरू होऊन तोही संपला. मग सुरू झाला तो नवा खेळ, करदात्या नागरिकांच्या पैशांवर आपले नवे बंगले आणि कार्यालये सजविण्याचा, त्याच्या नूतनीकरणावर लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा...
कोणताही लोकप्रतिनिधी मग तो नगरसेवक, आमदार, खासदार किंवा मंत्री असो, तो जनतेचा विश्वस्त असतो, हेच आता सर्वजण विसरत चालले आहेत. अपवाद वगळता सर्वच जण एकदा निवडून आलो की पुढील पाच वर्षे जेवढे म्हणून कमावून घेता येईल, तितके कमावून घेण्याच्या मागेल लागलेले असतात. आपण जे काही करतोय ते चुकीचे आहे, त्याची जनाची सोडाच परंतु मनाची लाजही या मंडळींना नसते. याचे आणखी एक ज्वलंत उदाहरण म्हणजे नवे बंगले आणि कार्यालय मिळाल्यानंतर सर्वजण त्याचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणावर कोणताही सारासार विचार न करता पाण्यासारखा पैसा खर्च करत असतात. हा पैसा आपल्या खिशातून जाणार नसल्याने आणि हे काम शासकीय खर्चाने होणार असल्याने प्रत्येकजण त्यावर लाखो-कोट्यवधी पैसे खर्च करतो.
खरे तर हे सर्व सत्तांतर आणि नवे मंत्रिमंडळ अवघ्या काही महिन्यांसाठीचे आहे. कारण येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका झाल्यानंतर राज्यात नवे सरकार, नवे मुख्यमंत्री आणि नवे मंत्रिमंडळ अस्तीत्वात येईल. म्हणजे म्हटले तर सध्याचे सर्वजण हे औटघटकेचे राजे आहेत. त्यामुळे खरे तर सर्व मंत्र्यांनी आपणहून आपल्याला मिळालेले बंगले, कार्यालये यावर पैसे उधळायला नको होते. जे मिळाले त्यात आपेल काम सुरू करून राहायला जायला हवे होते.
मंत्री आणि लोकप्रतिनिधी अनेक वेळा शासकीय खर्चाने आणि गाड्यांनी राज्यात, देशात व परदेशातही दौरे करतच असतात. त्यामुळे किमान एखाद्या मंत्र्याने तरी मला मिळालेला बंगला किंवा कार्यालयाचे नूतनीकरण व सुशोभीकरणावर लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करणार नाही, असे म्हटले असते तर ते संयुक्त ठरले असते. या बंगल्यांची किंवा कार्यालयांची अवस्था इतकी वाईट होती का, की इतका खर्च करणे आवश्यकच होते. आज हजारो लोकांच्या डोक्यावर साधे छप्परही नाही आणि अत्यंत हलाखीच्या अवस्थेत ते राहात आहेत. राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे बंगले आणि त्यांच्या नूतनीकरणावर झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चात राज्यातील एखाद्या लहानशा गावात वीज, पाणी, शाळा अशी लोकोपयोगी काम करता आली असती. नव्हे ती होऊ शकली असती. पण ते करायला आच पाहिजे. मनातून कुठेतरी तसे वाटले पाहिजे.
खरे तर माहितीच्या अधिकाराखाली बंगले व नूतनीकरणावर किती खर्च झाला, त्याची माहिती काढून ती सर्व लोकांसमोर येण्याची आवश्यकता आहे. तसेच निवडणुकांसाठी अवघे काही महिने राहिलेले असताना मंत्र्यांनी केलेला हा अनाठायी आणि करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करणारा खर्च त्या प्रत्येकाकडून वसूल केला गेला पाहिजे. त्यासाठीही कोणीतरी न्यायालयात जनहित याचिका दाखल करून मंत्र्यांना धडा शिकवला पाहिजे. असे झाले तरच यापुढे अशा प्रकारांना कुठेतरी वचक बसेल...

मंगळवार, २१ एप्रिल, २००९

नॅनो खर्चात पार पडले महाबळेश्वरचे साहित्य संमेलन

महाबळेश्वर येथे गेल्या महिन्यात ८२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा ‘नॅनो’ प्रयोग पार पडला. संमेलन आयोजनातील या नॅनो प्रयोगात आता ‘नॅनो’ खर्चाचीही नव्याने भर पडली आहे. गेल्या काही वर्षांतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात खूपच कमी खर्चात पार पडलेले साहित्य संमेलन म्हणून महाबळेश्वरच्या संमेलनाची नोंद होणार आहे. या साहित्य संमेलनाचा खर्च अंदाजे चाळीस लाखांच्या घरात झाल्याचे संमेलन आयोजन समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
गेल्या काही वर्षांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चाने कोटीच्या कोटी उड्डाणे केली होती. दरवर्षी भरणाऱ्या या साहित्य संमेलनांचा खर्च एक ते दोन कोटी रुपयांवर गेला होता. संमेलनांवर होणाऱ्या या वाढत्या खर्चाबाबत साहित्य क्षेत्रातील जाणकारांकडून काही प्रमाणात नाराजीही व्यक्त केली जात होती. संमेलनांवरील हा भरमसाठ खर्च, भपकेबाजपणा कमी करण्यासाठी प्रयत्न केले जावेत, असे बोलले जात होते.
महाबळेश्वरचे साहित्य संमेलन अनेक प्रकारांनी गाजले. त्यात संमेलनाला संमेलनाध्यक्षच नाही, संमेलनापूर्वी संमेलनाध्यक्षाने राजीनामा देणे, संमेलनाध्यक्षाच्या भाषणाच्या प्रती साहित्य रसिकांना न मिळणे आदी गोष्टींचा समावेश होता. त्यात आता गेल्या काही वर्षांत झालेल्या साहित्य संमेलनामध्ये सगळ्यात कमी खर्चात झालेले साहित्य संमेलन म्हणून याची नोंद होणार आहे.
महाबळेश्वर हे प्रामुख्याने पर्यटन व्यवसायाचे शहर असल्याने तेथे आजवरच्या साहित्य संमेलनाला जशी गर्दी झाली, तशी होणार नाही, हे आम्ही गृहीत धरलेले होते. तरीही उद्घाटन सोहळ्याला किमान पाच हजार रसिक उपस्थित होते. तर प्रतिनिधी नोंदणी करून सुमारे बाराशे ते पंधराशे रसिक उपस्थित होते. संमेलनासाठी आलेले साहित्य रसिकांची तीन दिवसांचा निवास, चहा, नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण आदी सर्व सोय केवळ बाराशे रुपयांत व ती ही चांगल्या हॉटेलमध्ये करण्यात आली होती. हा सुद्धा महाबळेश्वर संमेलनाचा नवा पायंडा होता. कारण नावनोंदणी केलेल्या साहित्य रसिकांची सोय यापूर्वी शाळा-महाविद्यालयांच्या वर्गातून केली जात होती, असेही आयोजन समितीच्या अन्य एका सदस्याने सांगितले.
साहित्य संमेलनाच्या खर्चाचे सर्व हिशोब येत्या एक-दोन दिवसात अंतिम केले जाणार असल्याचेही या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोमवार, २० एप्रिल, २००९

ललित चोखंदळ वाचक निवडीसाठी वाचक निरुत्साही

‘ललित’ मासिकाकडून मराठी वाचकांच्या अभिरुचीचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या
‘ललित चोखंदळ वाचकांची निवड’ या उपक्रमासाठी वाचकांनीच यंदाच्या वर्षी अत्यल्प प्रतिसाद दिला. मासिकातर्फे विविध क्षेत्रातील पाचशे जणांची निवड करून वाचलेल्या पुस्तकांपैकी आपली आवड कळविण्याचे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले होते. मात्र त्यापैकी फक्त १७३ जणांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. या वाचक निवडीत मोनिका गजेंद्रगडकर यांच्या ‘आर्त’ या पुस्तकाला सर्वाधिक म्हणजे २४ वाचकांनी आपली पसंती कळवली आहे.
मराठीतील सुजाण आणि चोखंदळ वाचकांना एकमेकांच्या आवडीची कल्पना यावी आणि गेल्या वर्षभरात कोणती चांगली पुस्तके वाचली गेली, त्याची माहिती इतर वाचकांना व्हावी, या उद्देशाने १९६५ पासून म्हणजेच गेल्या ४३ वर्षांपासून चोखंदळ वाचकांची निवड हा उपक्रम ‘ललित’ मासिक राबवत आहे. २००८ या वर्षांत प्रकाशित झालेल्या पुस्तकातून जी पुस्तके वाचली गेली व वाचकांना आवडली, त्याचा शोध घेण्यासाठी बृहन्महाराष्ट्रातील पाचशे जणांना पत्र पाठवून पुस्तके कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते.
चोखंदळ वाचकांकडून निवड करण्यात आलेली अन्य पुस्तके आणि ती निवड केलेल्या वाचकांची संख्या अशी - मॅजेस्टिक कोठावळे (१७), गंगा आए कहॉसे-मूळ लेखक-गुलजार, अनुवाद-विजय पाडळकर (१७), पाणीयावरी मकरी-प्रा. राम शेवाळकर (१६), त्या वर्षी- शांता गोखले (१३) मनश्री-सुमेध वडावाला-रिसबूड (१३), वारी-एक आनंदयात्रा-संदेश भंडारे (११), शांताराम पारितोषिक कथा (९), पुन्हा मर्ढेकर, संपादन-डॉ. विजया राजाध्यक्ष (९), गाथा इराणी-मीना प्रभू (११), सर्वोत्तम सरवटे-संपादन-अवधूत परळकर (९), रुजवात-डॉ. अशोक रा. केळकर, (९), कॉल आफ द सीज्-चंद्रमोहन कुलकर्णी(७), अल्पसंख्य-विजय पाडळकर (७), भारतीय भाषांतील स्त्री साहित्याचा मागोवा, खंड १ व २- संपादिका-डॉ. मंदा खांडगे व डॉ. निलीमा गुंडी, डॉ. विद्या देवधर व डॉ. निशिकांत मिरजकर, (७), खुंदळघास-सदानंद देशमुख (८) आदी पुस्तकांचाही समावेश आहे.

रविवार, १९ एप्रिल, २००९

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय...

अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित मी शिवाजी राजे भोसले बोलतोय हा चित्रपट उत्सुकतेने पाहिला. चित्रपटातील काही प्रसंग वगळता हा चित्रपट मला संथ वाटला. मात्र असे असले तरीही सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत (मनसेने लावून धरलेल्या मराठीच्या मुद्यावर) हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या मुखातून मराठी माणसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यास मदत करतो, असे म्हणावे लागेल.
दिनकर भोसले यांच्या बंगल्यातील दोन भाडेकरूंपैकी एक मुसलमान व एक उत्तरप्रदेशातील भय्या असे मुद्दामहून दाखवले आहेत का, दिनकर भोसले यांचा पदोपदी अपमान करतानाचे काही प्रसंग दाखवले आहेत. पण ते तितकेसे प्रभावी वाटत नाहीत. हॉटेलातील एका प्रसंगात भोसले खूप दारू पितो आणि वाटेल ते बरळतो. हॉटेलात मारामारी होते व भोसले मार खातो. त्यानंतर रात्री घरी आल्यानंतर बायको-मुलांना आपल्याला मारल्याचे तो सांगतो, पण कोणीही लक्ष देत नाही. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून झोपून जातात, हे पटत नाही. तसेच हॉटेलातील त्या प्रसंगानंतर दिनकर भोसले याला शिवाजी महाराज गडावर घेऊन जातात, असे दाखवले आहे. मुळात मला हॉटेलातील त्या प्रसंगामुळे भोसले चिडून उठतो, ते पटत नाही. मराठी माणूस दारू प्यायला की मग त्याला हवे ते आणि वाट्टेल ते बरळतो असे, मांजरेकर यांना म्हणायचे आहे का, त्यापेक्षा अन्य प्रसंगातून तो आजवरच्या अपमानातून पेटून उठतो, असे दाखवायला हवे होते.
उस्मान पारकर या भूमिकेत सिद्धार्थ जाधव तसेच शाहीराच्या भूमिकते भरत जाधव हे शोभत नाहीत. त्यांच्याजागी दुसऱया कोणा कलावंतांची निवड करायला हवी होती. महेश मांजरेकर हे शिवाजी महाराज यांच्या गेटअपमध्ये ठिक असले तरी त्यांच्या डोळ्याखालची सूज (दारू की अन्य काही) सहज दिसून येते. तसेच घोड्यावरून येताना का कोण जाणे परंतु तो घोडा दमदारपणे टापा टाकतोय, असे वाटत नाही. ते दृश्य़ मला तरी विचित्र वाटले. रायबाच्या भूमिकेत मकंरद अनासपुरे एकदम चपखल. त्याच्या तोंडी दिलेले वाकप्रचार/म्हणी हशा आणि टाळ्या घेऊन जातात.
गोडाऊनमध्ये भोसले कुटुंबियांना हात बांधून ठेवलेले असते. तेव्हा भोसले यांना शिवाजी महाराज व छोटा संभाजी आग्र्याहून कसे निसटले ते आठवते. त्या दृश्यात शिवाजी महाराज व संभाजी एकाच पेटाऱयातून निसटले असल्याचे दाखवले आहे. मात्र इतिहासात ते दोघेही वेगवेगळ्या पेटाऱयातून निसटले, असे वाचल्याचे किंवा अन्य चित्रपटातून तसे पाहिल्याचे आठवते. भोसले यांची मुलगी शशिकला हिला काही मराठी चित्रपट मिळतात. त्याच्या चित्रिकरणाच्या वेळचे अंकुश चौधरी आणि प्रिया बापट यांच्यावरील एक कोळी नृत्य दाखवले आहे. त्या पेक्षा मराठी लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारे एखादे गाणे (ज्यात अभंग, लावणी, गोंधळ, गणपती, दहीहंडी, बाल्यानृत्य, धनगरी नृत्य असे एकत्र गुंफले असते तर चित्रपटासाठी ते अधिक परिणामकारक ठरले असते. जसे अष्टविनायक या चित्रपटात अष्टविनायका तुझा महिमा कसा या गाण्यात दाखवले आहे त्या प्रमाणे)
चित्रपटातील शेवटचा प्रसंग आणि त्यावेळी दिनकर भोसले याला दिलेले संवाद मात्र एकदम मस्त आहेत. ते संवाद टाळ्या घेणारे असून सर्वसामान्य माणसांच्या मनात आज सर्वपक्षीय राजकारणी नेते, मंत्री, नगरसेवक, आमदार आणि खासदार यांच्याविषयी मनात असलेली चीड व्यक्त करणार आहेत.
मराठी माणसाचा बाणा हा मोडेन पण वाकणार नाही असा होता, असे म्हणण्यासारखी सध्याची परिस्थिती आहे. ती कधी बदलेल का...

शनिवार, १८ एप्रिल, २००९

सुदाम्याच्या पोह्यांची शताब्दी

मराठीतील पहिले विनोदी लेखक असे मानण्यात येणाऱ्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या ‘सुदाम्याचे पोहे’ या पुस्तकाचे यंदा शताब्दी वर्ष असून त्या निमित्ताने उत्कर्ष प्रकाशन आणि एमएमएस डिजिटल बुक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुस्तक सीडी स्वरुपात प्रकाशित करण्यात आले असून ते डिजिटल स्वरुपात इंटरनेटवरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोल्हटकर यांचे हे पुस्तक मराठी साहित्यातील एक अभिजात पुस्तक म्हणून ओळखले जाते. केंद्र शासनाच्या नॅशनल बुक ट्रस्टने भारतातील विविध १४ प्रादेशिक भाषांमधून ‘सुदाम्याचे पोहे’ या पुस्तकाचा अनुवाद करून प्रकाशित केला आहे.
हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा त्यात कोल्हटकर यांचे १८ लेख होते. तेव्हा त्याचे नावही ‘सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे’ असे ठेवण्यात आले होते. नंतर यात कोल्हटकर यांनी १४ लेखांची भर टाकली आणि पुढे ते ‘सुदाम्याचे पोहे अर्थात साहित्य बत्तीशी’ या नावाने ते मॉडर्न बुक डेपोने प्रकाशित केले होते. हे पुस्तक त्या काळात खूप लोकप्रिय ठरले होते. त्याच्या अनेक आवृत्याही निघाल्या.
कोल्हटकर यांचे हे पुस्तक १९०९ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाले होते. पुढे काळाच्या ओघात ते पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हते. काही वर्षांपूर्वी आम्ही ते पुन्हा प्रकाशित केले होते. आता त्याची दुसरी आवृत्ती निघाली आहे. मात्र काळाच्या ओघात पुस्तक नष्ट होऊ नये आणि नव्या पिढीला ते इंटरनेट, संगणक व सीडीच्या माध्यमातून उपलब्ध व्हावे, या उद्देशाने उत्कर्ष प्रकाशन आणि उल्हास वैद्य यांच्या एमएमएस डिजिटल बुक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा उपक्रम आम्ही राबवला असल्याची माहिती उत्कर्ष प्रकाशनाचे सुधाकर जोशी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. संकेतस्थळावर या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील काही मजकूर वाचायची परवानगी आम्ही वाचकांना दिली असून वाचक तेथे काही भाग वाचू शकतील, असेही जोशी यांनी सांगितले.
उत्कर्ष प्रकाशनाने हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करताना त्यातील काही लेख कमी तर काही लेखांचे संपादन केले आणि निवडक २६ लेखांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला. पुरुषोत्तम धाक्रस यांनी त्याचे संपादन केले असल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तर हे पुस्तक म्हणजे कोल्हटकर यांनी लिहिलेले विनोदी लेख, कथा असून १९०२ मध्ये ‘विविध ज्ञानविस्तार’ या नियतकालिकातून ते लेख पहिल्यांदा प्रकाशित झाले होते, अशी माहिती दादर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल अश्विनी फाटक यांनी दिली.
www.mmsdigital.com या संकेतस्थळावर हे पुस्तक वाचकांना ऑनलाइन खरेदी करता येईल. हे पुस्तक मुद्रित स्वरुपात उपलब्ध असून आता ते इंटरनेटवर डिजिटल स्वरुपात व सीडीच्या माध्यमातूनही उत्कर्ष प्रकाशन व एमएमएस डिजिटल बुक कंपनी यांनी उपलब्ध करून दिले आहे. अधिक माहितीसाठी प्रकाशनाच्या ०२०-२५५३७९५८ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

शुक्रवार, १७ एप्रिल, २००९

नाठाळांचे माथी हाणू जोडा

भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, असे संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे. त्यात थोडासा बदल करून नाठांळांचे माथी हाणू जोडा, असे म्हणण्याची नवी प्रथा आता भारतात रुढ होत आहे की काय, असे वाटावे, अशा घटना सध्या आपल्याकडे घडत आहेत.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या एका पदाधिकाऱयांने गुरुवारी चप्पल फेकून मारली. त्याचा नेम थोडक्यात हुकला आणि अडवाणी बचावले. त्या अगोदर केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांच्यावर जोडा भिरकावला होता. तर चिदंबरम यांच्या घटनेनंतर खासदार नवीन जिंदाल यांच्यावर एका जाहीर सभेत एका गावकऱयांने चप्पल फेकली होती. इराकी पत्रकाराने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर काही दिवसांपूर्वी फेकलेल्या जोड्याच्या प्रकाराने आपल्या येथील मंडळींनी स्फूर्ती घेतली असावी. आपल्या येथीलही राजकाऱण्यांबाबत सर्वसामान्य माणसांच्या मनात किती असंतोष खदखदत आहे, त्याचे हे केवळ उदाहरण आहे. या घटना तशा किरकोळ असल्या आणि यापैकी काहींनी प्रसिद्धी मिळविण्यासाठी, हा प्रकार केला असला असे क्षणभर जरी गृहीत धरले तरी त्यामुळे राजकारणी मंडळींविषयची चीड, राग, मनातील खदखद प्रगट होत आहे, असे म्हणावे लागेल.
मुंबईत गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेट वे ऑफ इंडिया येथे हजारो सर्वसामान्य नागरिकांनी ज्या मूकपद्धतीने राजकारण्यांविषयाची आपला रोष प्रकट केला, ती या सगळ्याची कुठेतरी सुरुवात होती, असे वाटते. बॉम्बस्फोट किंवा अशा प्रकारची एखादी घटना घडली की केवळ त्याचे राजकीय भांडवल करायचे, तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घ्यायची, मात्र मूळ प्रश्न सोडवण्यासाठी काहीही करायचे नाही, अशा प्रश्नांचा भस्मासूर निर्माण करायचा आणि नंतर तो प्रश्न आता हाताबाहेर गेला, म्हणून गळे काढायचे. केंद्रातील किंवा राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी अशा घटना घडल्यानंतर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत राहायचे, हेच आजवर आपण पाहात आलो आहोत. कंदहार प्रकरणी तेव्हांचे केंद्रीय परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह हे दहशतवाद्यांची मुक्तता करण्यासाठी खास विमानातून घेऊन गेले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पुन्हा कंदहार प्रकरण घडले तर आपण परत दहशतवाद्यांना असेच सोडायला जाऊ, असे निर्लज्ज वक्तव्य केले होते. लालकृष्ण अडवाणी यांनीही काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे जनक जीना यांच्याविषयी गौरवोद्गार काढून आपणही मागे नाही, हे दाखवून दिले होते. कॉंग्रेसवाल्यांच्या बाबतीत तर काही बोलायलाच नको. भारतातील अल्पसंख्यांकांचे विशेषत फक्त मुस्लिमांचे लांगूनचालन करणे आणि येथील बहुसंख्य हिंदूची अवहेलना करणे,यातच ती मंडळी धन्यता मानतात. शाहबानो प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवण्याची मजल दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी दाखवली होती. तर अलीकडेच मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी पकडल्यानंतर देशभरातील बॉम्बस्फोट थांबले, असे समस्त हिंदूंचा अपमान करणारे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांनी केले होते.
अरे मग गेल्या हजारो वर्षांत किंवा अगदी फाळणीच्या वेळी धर्मांध मुस्लिमांकडून भारतीयांवर जे अत्याचार झाले, अनेकांची कत्तल करण्यात आली, हजारो देवळे उध्वस्त केली गेली, तलवार व दहशतीच्या जोरावर अगणित अत्याचार केले गेले, त्याविषयी तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष तसेच कॉंग्रेसवाली मंडळी का मूग गिळून गप्प बसतात. उपदेशाचे डोस फक्त हिंदूनाच पाजायचे का,
त्यामुळे सभोवताली हे जे काही घडत चालले आहे, सर्वपक्षीय राजकारणी (मग कोणीही त्यास अपवाद नाही) केवळ सत्ता, स्वार्थ यातच गुरफटल्यामुळे देव, देश आणि धर्माबद्दल ते किती निर्ढावलेले आहेत, ते आता दिसू लागले आहे. केवळ पोपटपंची करून, भूलथापा देऊन आणि पक्षीय आरोप-प्रत्यारोप करून देशासमोरचे प्रश्न सुटणार नाहीत, हे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनाही चांगले माहिती आहे. मात्र मतदार व जनता मूर्ख आहे, आपण काहीही केले तरी थोड्या दिवसांनी लोक विसरून जातात, या भ्रमात आता राजकारण्यांनी राहून नये. सध्या फक्त जोडे खाण्याचीच वेळ येत आहे, मात्र येत्या काही वर्षांत एक दिवस असा येईल की, संतापलेले लोक, या राजकारण्यांना भर चौकात फटकावून, जोडे मारून आणि तोंडाला काळे फासून आपल्या मनातील असंतोष व्यक्त केल्याशिवाय राहणार नाहीत. सध्याचे एकूण वातावरण पाहता तो दिवस दूर नाही...

गुरुवार, १६ एप्रिल, २००९

वाघमारे बाईंनी केली खर्रीखुर्री वकिली

काही व्यवसाय असे असतात की ज्याबाबत सर्वसामान्य लोकांच्या मनात समज-गैरसमज अगदी पक्के झालेले असतात. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी कसाब याचे वकिलपत्र घेऊन अंजली वाघमारे यांनी वकील म्हटला की खऱयाचे खोटे आणि खोट्याचे खरे करणारा असायचाच हे दाखवून दिले आहे. त्यामुळे वाघमारे बाई यांनी न्यायालयात नव्हे तर न्यायालयाबाहेरही खर्रीखुर्री वकिली केली आहे.
व्यावसायिक नितिमत्ता पाळणारी खूप कमी मंडळी असतात. मग ते कोणतेही क्षेत्र किंवा व्यवसाय असो. डॉक्टर्स, वकील, पोलीस, शिक्षक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आदी सर्व व्यवसायात आणि अगदी पत्रकारितेतही काही अपवाद वगळता सध्या बाजारू व सवंगपणा, स्वतचे ढोल वाजवून आपली प्रसिद्धी करणे, व्यावसायिक नीतिमत्ता धाब्यावर बसवणे सुरू झाले आहे. नव्हे ते अगदी उघडपणे पाहायला मिळत आहे. हे सर्व व्यवसाय म्हणजे आता धंदा झाला आहे. व्यावसायिक नीतिमत्ता ही फक्त बोलायची आणि भाषणातून टाळ्या मिळविण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. वाघमारे बाई यांनी तेच करून दाखवले आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक साक्षीदार आणि अटक करण्यात आलेला आरोपी कसाब असे दोघांचे वकीलपत्र घेऊन वाघमारे बाईंनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा, तसेच न्यायालयापासून हे सत्य दडपून व्यावसायिक गैरवर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने ही बाब स्वीकारून वाघमारे बाईंची कसाबची वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे.
वाघमारे बाई या स्वत वकील असून एकाच खटल्यात अशा प्रकारे दोघांचे वकिलपत्र घेता येत नाही, किंवा घेतले असेल तर ती बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक होते. या गोष्टी त्यांना काय माहीत नसतील. मात्र बाईंनी व्यावसायिक नीतिमत्तेचे पालन न करता दोघांचेही वकीलपत्र घेतले. ही बाब काही अजाणता झालेली नाही. असे करता येत नाही, हे पक्के माहिती असतानाही, त्यांनी हे कसे केले, या बद्दल आता बार कौन्सिल त्यांच्यावर काय कारवाई करणार, असे प्रश्न निर्माण होत आहेत.
कसाबचे वकिलपत्र घेऊन वाघमारे बाईंनी गेले काही दिवस जोरदार प्रसिद्धी मिळवली. इतके दिवस ज्यांचे नावही कोणाला माहिती नव्हते, ते नाव देशभरातूनच नव्हे तर अगदी जागतिक स्तरावर वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रिनिक माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचले. त्यात कसाबचे वकीलपत्र घेतले म्हणून वाघमारे बाईंच्या घरावर निदर्शने, हल्ला केला गेला म्हणून काही प्रमाणात त्यांना सहानुभूतीही मिळाली. आता न्यायालयाने कसाबच्या वकील म्हणून त्यांची नियुक्ती रद्द केली असली तरी त्यांना जी प्रसिद्धी मिळाली आहे, त्यामुळे आणखी काही खटले आपणहून त्यांच्याकडे चालत येतील. म्हणजे हे सर्व त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठीच केले असेच म्हणावे लागेल.
आणखी एक सर्वात महत्वाची बाब म्हणजे, कसाबच्या वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य शासनाकडून विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. गेल्या काही दिवसात त्यावरही लाखो रुपये खर्च झाले आहेत. हा पैसा काही वाघमारे बाईंचा नव्हता तर तो शासनाचा पर्यायाने करदात्या नागरिकांचा होता. त्यामुळे या सर्व प्रकाराची गंभीरपणे दखल घेऊन वाघमारे बाईंची सनद रद्द केली जावी, किमान काही वर्षांसाठी त्यांना वकिली करण्यास बंदी घालण्यात यावी आणि सुरक्षा व्यवस्थेवर झालेला हा खर्च वाघमारे बाईंकडून वसूल केला जावा. असे जर झाले तर आपल्याला हवे ते मिळविण्यासाठी खोटे बोलले तरी चालून जाते, आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही, आपल्या व्यवसायावर त्याचा काही परिणाम होत नाही, हा समज दूर केला गेला पाहिजे. असे झाले तरच अशा प्रकारांना कुठेतरी आळा बसेल.

बुधवार, १५ एप्रिल, २००९

भारतीय मान्सून दीड कोटी वर्षांचा

उन्हाळ्याच्या काहिलीने हैराण झालेल्या भारतीयांना आता मान्सूनचे अर्थात पावसाळ्याचे वेध लागले आहेत. कधी एकदा पाऊस सुरू होतो, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतात पहिल्यांदा अंदमान-निकोबार आणि केरळमध्ये मान्सून दाखल होतो आणि नंतर तो संपूर्ण भारतात पसरतो, असे आपल्याला माहिती आहे. भारतीय उपखंडातील हा मान्सून अर्थातच मोसमी वारे आणि त्याविषयीची एक बातमी नुकतीच वाचनात आली. आज त्याविषयी थोडक्यात.
भारतीय मान्सून गेल्या दीड कोटी वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे पुरावे संशोधनातून मिळाले असल्याचे या बातमीत म्हटले आहे. म्हणजे आपल्या भारतातील पावसाचे वय दीड कोटी वर्ष आहे, असे म्हणता येईल.
लोकसत्ताच्या १४ एप्रिलच्या अंकात अभिजित घोरपडे यांनी ही बातमी दिली आहे. गोव्यातील राष्ट्रीय सागरशास्त्र संस्थेतील (एन. आ. ओ.) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. एस. कृष्णा, ब्रिटनमधील साऊथम्पटन विद्यापीठाचे प्रा. जॉन बुल आणि इडनबर्ग विद्यापीठाचे प्रा. रॉजर स्क्रुटन यांनी संयुक्तपणे केलेल्या संशोधनातून हा अहवाल तयार केला गेला असल्याचे या बातमीत म्हटले आहे.
हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरात केलेल्या संशोधनातून भारतीय मान्सूनचा आढावा घेतला आहे. मान्सूनच्या जन्मापासून आजपर्यतच्या काळात त्याचे प्रमाण कमी जास्त झाले असले तरी त्याची नियमितता कायम आहे. भारतीय मान्सून अस्तित्वात कधी आला, त्याबद्दल विविध मतप्रवाह असून त्यापैकी एका मतप्रवाहानुसार,(जो सर्वमान्य होता) ८० लाख वर्षांपूर्वी याची निर्मिती झाली असावी. हिमालयाने विशिष्ट उंची गाठल्याने हे मोसमी वारे निर्माण झाले, असे मानले जात होते. मात्र संधोधकांनी हिंदी महासागरातील २९९ भ्रुंश (भूखंडामध्ये असणाऱया कमकुवत भेगा) व बंगालच्या उपसागरात सुंदरबन प्रदशाजवळ जमा झालेला गाळ यांचा अभ्यास केला गेला. त्यानुसार हिमालयाची उंची वाढण्याचा पाचवा टप्पा १.५४ ते १.३९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात सुरू झाला आणि त्यामुळेच मान्सून अस्तित्वात आल्याचे या बातमीत सांगण्यात आले आहे.
त्यापूर्वी मान्सूनचे वारे कदाचित सौम्य स्वरूपात वाहात असावेत, मात्र अखेरच्या टप्प्यात त्यांची तीव्रता वाढून त्याला आजचे स्वरुप प्राप्त झाले, असल्याचे संशोधकांचे मत आहे.
आत्तापर्यंत आपाण मे महिन्याच्या अखेरीस मान्सून अंदमान-निकोबार व केरळ मध्ये दाखल होतो, असे वाचत होतो. त्यानंतर हा मान्सून कसा कसा पुढे सरकतो, हे ही आपल्याला माहिती होते. मात्र गोव्यातील राष्ट्रीय सागरशास्त्र संशोधन संस्थेतील या संशोधनामुळे मान्सूनविषयक ही नवी माहिती आपल्याला कळली आहे.

मंगळवार, १४ एप्रिल, २००९

आगामी मराठी साहित्य संमेलन दिल्लीत

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची अध्यक्षपदाची कारकीर्द पुढच्या वर्षी संपत आहे. आगामी ८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाले-पाटील यांच्याच अधिपत्याखाली पार पडणार असून ठाले-पाटील यांची कार्यपद्धती आणि राजकीय वजन पाहता हे संमेलन नवी दिल्लीतच होण्याची दाट शक्यता साहित्य वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१० मध्ये जानेवारी महिन्यात होईल.
महाबळेश्वर येथे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. ८२ व्या साहित्य संमेलनासाठी रत्नागिरी, ठाणे, परभणी आदी ठिकाणांहून निमंत्रणे आली होती. मात्र ठाले-पाटील यांनी हे ८२ वे मराठी साहित्य संमेलन सॅनहोजे येथे भरविण्याचा घाट घातला होता. त्यांच्या या निर्णयावर मराठी साहित्य आणि प्रकाशन वर्तुळातून तीव्र नाराजीची प्रतिक्रिया उमटली होती. तरीही ठाले-पाटील सॅनहोजे येथे संमेलन घेण्यावर ठाम होते. हे संमेलन सॅनहोजे येथे झाले असते तर ते महामंडळाच्या घटनेच्या विरोधात ठरले असते. याच्या विरोधात कोणी न्यायालयात दाद मागितली असती तर तांत्रिक मुद्दय़ावर हे संमेलन अडचणीतही येऊ शकले असते. त्यातच रत्नागिरीकरांनी पर्यायी साहित्य संमेलन घेण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे अखेर ठाले-पाटील यांनी सॅनहोजे येथे पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन घेण्याची पळवाट काढली आणि ८२ वे साहित्य संमेलन दरवर्षीप्रमाणे राज्यात घेण्याचे ठाले-पाटील यांना जाहीर करावे लागले. मात्र या सगळ्या प्रकारात ठाले-पाटील यांचे वर्चस्व दिसून आले. महामंडळाच्या विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थेचा अपवाद वगळता अन्य घटक संस्था व संलग्न संस्थांनी ठाले-पाटील यांच्या हो ला हो म्हटले होते.
महाबळेश्वर साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी पुढील साहित्य संमेलन भरविण्यासाठी ठाणे, पुणे, परभणी आणि नवी दिल्ली येथून आमंत्रणे आली असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यावर दोन महिन्यांत निर्णय घेण्यात येणार आहे. ८२ वे साहित्य संमेलन भरविण्यासाठाही ठाणे, पुणे, रत्नागिरी, परभणी यांनी आमंत्रण दिले होते. त्यामुळे आगामी साहित्य संमेलन हे या पैकी एखाद्या ठिकाणी व्हावे, अशी अपेक्षा आहे.ज्या ठिकाणांहून संमेलनासाठी आमंत्रणे आली आहेत, त्या त्या ठिकाणी महामंडळाची समिती भेट देते आणि त्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येतो. मात्र ठाले-पाटील आपले राजकीय वजन आणि प्रतिष्ठा वापरून हे संमेलन दिल्लीतच घेण्याचा तसेच महामंडळ अध्यक्षपदाच्या आपल्या कारकीर्दीतील अखेरचे साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित करून आपले वर्चस्व दाखविण्याचा ठाले-पाटील प्रयत्न करतील, अशी चर्चा मराठी साहित्य क्षेत्रात रंगली आहे.

सोमवार, १३ एप्रिल, २००९

मराठी पुस्तके आता सीडीमध्ये

कॉम्प्युटर आणि दूरचित्रवाहिन्यांच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याची ओरड करण्यात येत असते. काही प्रमाणात ते खरेही आहे. मात्र या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी करून घेतला तर नवी पिढी वाचनाकडे वळेल, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण होईल, या उद्देशाने पुण्यातील उत्कर्ष प्रकाशनाने एक आगळा उपक्रम हाती घेतला आहे.
परदेशात असणाऱया मराठी वाचकांसाठी ही सोय करण्यात आली असली तरी येथील मराठी वाचकानाही इंटरनेटच्या माध्यमातून ही डीजीटल
पुस्तके सीडी स्वरुपातही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही डीजीटल पुस्तके टेक्स्ट व ऑडिओ स्वरुपात आहेत. या सीडी संगणक वापरासाठी असून सध्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे सुदाम्याचे पोहे, डॉ. कटककर यांचे अंकज्योतिष व हस्तसामुद्रिक तसेच गिरकी, देवाघरचा पाऊस आदी पुस्तके सीडी स्वरुपात वाचकांसाठी मिळू शकतात.
मराठी पुस्तके आणि मासिके डाऊनलोड करण्यासाठी www.mmsdigital.com या संकेतस्थळालाही भेट देता येऊ शकेल. याच संकेतस्थळावर मराठी पुस्तके व मासिकेही डाऊनलोड करता येऊ शकतील. तसेच हवी असलेली पुस्तके वाचकांना या संकेतस्थळाच्या माध्यमातून थेट इंटरनेटवर क्रेडीट किंवा डेबीट कार्डाद्वारे विकत घेता येतील. सीडी स्वरुपातील पुस्तकांसह मराठीतील मेनका, माहेर आदी मासिकेही थेट नेटवर वाचता येऊ शकतील. साहित्यप्रेमी वैद्य यांनी ही सोय उपलब्ध करून दिली आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुकांना info@mmsdigital.com या ईमेलवर किंवा ०२०-२५३६२२५९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही साधता येऊ शकेल.

रविवार, १२ एप्रिल, २००९

अणजूरचा श्री सिद्धिविनायक


महाराष्ट्रात ठिकठिकाणी गणपतीची देवळे अनेक असली तरी श्री सिद्धिविनायकाची अर्थात उजव्या सोंडेच्या गणपतीची स्थाने/देवळे तशी कमी आहेत. मुळात उजव्या सोंडेचा गणपती हा कडक असून, त्याची पूजा-अर्चा व सोवळे हे खूप पाळावे लागते, असे मानले जाते. त्यामुळे उजव्या सोंडेची मूर्ती खूप कमी ठिकाणी दिसून येते. सिद्धिविनायक म्हटला की सर्वांना पटकन आठवते ते मुंबईतील दादर(प्रभादेवी) येथील श्री सिद्धिविनायक मंदिर. मात्र आपल्या ठाणे जिल्ह्यात भिवंडी जवळील अणजूर या गावीही पेशवेकालीन इतिहास लाभलेला सिद्धिविनायक आहे.
आजच्या रविवारी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आम्ही डोंबिवलीतील काही मंडळी अणजूरला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाऊन आलो. ऑर्कूटवर मी डोंबिवली नावाची एक कम्युनिटी असून आनंद पर्वते या धडपड्या तरुणाने ही कम्युनिटी सुरु केली आहे. या कम्युनिटीचे सदस्य नियिमतपणे बैठकीच्या तसेच ऑर्कूटच्या माध्यमातून संपर्कात असतात.
अणजूर (सध्या याचा उच्चार अंजूर असाही करतात) हे खूप पुरातन गाव असून ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्याच्या खाडीसमोरच्या झाडीत हे गाव वसलेले आहे. या गावात नाईकांच्या पुरातन वाड्यात हा सिद्धिविनायक आहे. अणजूरच्या घराण्याचे मूळ आडनाव राणे असे होते. बिंब राजाने हा गाव इसवीसन ११६३ मध्ये अंकुशदेव राणे यांना दला. बिंब राजाच्या वंशजापैकी एक राजपूत्र व त्याच्या आईस राणे घराण्यातील एका पुरुषाने प्राणघातक संकटातून वाचवले. त्यानंतर या घराण्यास नाईक ही मानाची पदवी राजाकडून बहाल करण्यात आली. याच नाईक घराण्यात निंबाजी नाईक नावाचे पुरुष होऊन गेले. इसवीसन १५८० नंतर साष्टी प्रांतात फिरंगी येथील हिंदूंवर अत्याचार करून त्याना बाटवत होते. त्या विरोधात निंबाजींनी मोठा लढा दला. त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रल्हाद जोशी यांना मदतीसाठी पाठवले होते. पुढे निंबाजी यांच्या शामजी (पहिल्या पत्नीपासून) व गंगाजी, बुवाजी, मुरारजी, शिवजी, नारायणजी व एक कन्या (दुसऱया पत्नीपासून) या मुलांनी पोर्तुगिजांच्या विरोधात लढा दिला.
इसवीसन १७१८ मध्ये गंगाजी हे मोरगाव येथे रवाना झाले. मोरगावचा मयुरेश हे त्यांचे कुलदैवत होते. तेथून त्यांना चिंचवडला जाण्याचा आदेश मिळाला. तिथे मोरया गोसावी यांचे नातू नारायण महाराज यांनी आपला थोरला पुत्र चिंतामणी (दुसरे) यांच्याकरवी गंगाजींना अनुग्रह दिला व आपल्या पुजेतील उजव्या सोंडेच्या श्री सिद्धिविनायकाची मूर्ती आणि एक तलवार त्यांना भेट दिली. घऱी अणजूरला परतल्यानंतर इसवीसन १७१८ मध्ये आपल्या वाड्यात मूर्तीची प्रतिष्ठापना केली. हाच तो अणजूरचा श्री सिद्धिविनायक.
पुढे गंगाजी नाईक यांनी बाजीराव पेशवे व त्याचे भाऊ चिमाजी आप्पा यांची भेट घेऊन फिरंग्यानी सुरू केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. फिरंग्यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी आणि वसईचा किल्ला जिंकण्याकरता पेशव्यांनी इसवीसन १७३७ मध्ये सुरू केलेली मोहीम १२ मे १७३९ या दिवशी संपली. चिमाजी आप्पा यांच्याकडे या मोहिमेचे नेतृत्त्व होते. या मोहिमेत स्थानिकांचे संपूर्ण सहकार्य मिळाले. साष्टी प्रांत फिरंग्यांच्या तावडीतून मुक्त झाला. या कामगिरीचे बक्षीस म्हणून बाजीराव पेशवे यांनी नाईकांना अणजूर हे गाव इनाम म्हणून दिले.
या गावाच्या तीनही बाजूला पाणी असून ठाणे आणि भिवंडी येथे जाण्यासाठी रस्ता आहे. येथील नाईकांच्या वाड्यात एका खोलीत मोठ्या लाकडी मखरात पितळ्याच्या देव्हाऱयात ही सिद्धिविनायकाची प्रसन्न मूर्ती आहे. रोज सकाळ-संध्याकाळ पुजाऱयांकडून श्रींच्या मूर्तीची पूजा केली जाते. माघी चतुर्थीस येथे मोठा उत्सव असतो. दर संकष्टी व मंगळवारीही येथे दर्शनासाठी गर्दी असते. ठाणे, भिवंडी आणि कल्याण येथून काही ठरावीक अंतराने टीएमटी, केडीएमटी आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) यांची बससेवा उपलब्ध आहे. गावात सतीची समाधी, प्राचीन शंकर, हनुमान, विठोबा, राम आणि गावदेवी अशी मंदिरेही आहेत. हे देवस्थान २८४ वर्षांचे असून ज्या वास्तूत ही मूर्ती आहे तो वाडा साडेतीनशे वर्षांपूर्वीचा आहे. समस्त अणजूरकर नाईक कुटुंबियांचे हे (खासगी) देवस्थान असून श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट, अणजूर या नावाने सहाय्यक धर्मादाय आयुक्त, ठाणे विभाग यांच्याकडे त्याची नोंदणी केलेली आहे. सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत हे मंदिर दर्शनासाठी खुले असते. नाईक यांच्या घराण्यातील नववे वंशज शशिकांत नाईक हे येथे दर संकष्टीला दादरहून येतात. आम्ही गेलो
तेव्हा आम्हाला ते भेटले. आपुलकीने सर्व माहिती त्यांनी आम्हाला दिली. ज्या खोलीत सिद्धिविनायकाची मूर्ती आहे तेथे विविध वृत्तपत्रातून अणजूरच्या सिद्धिविनायकाची माहिती व लेख यांच्या झेरॉक्स कॉपीज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच येणाऱया मंडळींना अणजूरची माहिती देणारे एख पत्रकही दिले जाते.
डोंबिवली पश्चिमेला रेतीबंदर आहे. तेथून अणजूरला जाता येते. रेतीबंदरवरून प्रत्येकी पाच रुपये सीट (एकेरी प्रवासाचे तिकीट) प्रमाणे या किनाऱयावरून बोटीने दहा मिनिटात समोरच्या तिरावर (वेल्हे गाव) जाता येते. तेथून दहा ते पंधरा मिनिटे चालले की वेल्हे गावातील रिक्षातळ लागतो. तेथून रीक्षाने थेट अणजूर (अंदाजे सहा किलोमीटर)ला जाता येते. एका रिक्षातून साधाररणपणे पाच ते सहा प्रवासी घेतले जातात. या एका फेरीसाठी रिक्षावाले सुमारे नव्वद ते शंभर रुपये भाडे आकारतात. थेट जायचे नसेल तर वेल्हे गावातून रिक्षाने माणकोली फाट्यापर्यंत (सहा किंवा सात रुपये एका व्यक्तीचे) जाऊन तेथे उतरायेच आणि अणजूरला जाण्यासाठी (अंदाजे तीन किलोमीटर) दुसरी रीक्षा पकडायची. ( हे भाडेही सहा ते सात रुपये एका व्यक्तीसाठी असे असते)

शनिवार, ११ एप्रिल, २००९

राजकारण्यानो- जनाची नाही, मनाची तरी...

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाल्यानंतर सर्व प्रसारमाध्यमातून निवडणुकविषयक विविध बातम्या, वाद, आरोप-प्रत्यारोप व्हायला सुरुवात होते. यात एक महत्वाचा आणि नेहमी चर्चेत राहणारा विषय असतो तो निवडणुक लढवणाऱया उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेले आपल्या मालमत्तेबाबतचे प्रतिज्ञापत्र. आपण हे प्रतिज्ञापत्र शपथेवर सादर करत असल्याचे प्रत्येक उमेदवार ठासून सांगत असतो. काही अपवाद वगळता सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे पाहिली किंवा त्या संबंधीच्या बातम्या वाचल्या तर या मंडळींच्या मालमत्तेची कशी कोटीच्या कोटी उड्डाणे होत आहेत, हे पाहायला मिळते.
अर्थात या प्रतिज्ञापत्रातील सर्व काही खरे असते, यावर कोणी शेंबडे पोरही आता विश्वास ठेवणार नाही. कारण सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी जनतेची पर्यायाने मतदारांची विश्वासार्हता कधीच गमावली आहे. या मंडळींनी जाहीर केलेली एवढी कोट्यवधीची संपत्ती (प्रत्यक्षात मात्र जाहीर केल्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त असते) त्यांच्याकडे कशी आली, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात अगदी सहज येतो. जे राजकारणी पिढीजात श्रीमंत असतील, पूर्वीपासून उद्योग-व्यवसाय असेल अशांचा अपवाद सोडला तर अनेक राजकारणी, मंत्री, आमदार खासदार ते अगदी नगरसेवकापर्यंतच्या मंडळींनी ही एवढी संपत्ती कधी आणि कशी कमावली, असा प्रश्न आपल्याला पडतो. हा प्रश्न या राजकारण्यांना पडत नसेल, त्यांच्या मनात येत नसेल, असे नाही. परंतु राजकारणात टिकायचे असेल, एकामागून एक पदे मिळवून पुढे जायचे असेल तर लाज, नितिमत्ता, तत्वे हे सर्व कोळून प्यावे लागते. तसे तुमच्यात गुण असतील तरच तुम्ही यशस्वी राजकारणी होऊ शकता, हे एकदा मनाशी पक्के केले आणि गेंड्याचे कातडे पांघरले की सर्व काही जमू शकते, असे या मंडळींचे धोरण असते. नाहीतर वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे आपली नोकरी किंवा व्यवसाय करून निवृत्त झाल्यानंतरही सर्वसामान्य माणसाच्या बॅंक खात्यात इतकी रोख रक्कम, दागीने, फ्लॅट्स अशी स्थावर किंवा जंगम मालमत्ता असत नाही, मग कोणतीही नोकरी/व्यवसाय न करता या मंडळींकडे पाच वर्षांच्या कालावधीत (नगरसेवक, आमदार, खासदार अशी पदे भुषवत असताना) इतका अमाप पैसा आणि संपत्ती येते कशी, दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत भारत किंवा महाराष्ट्रातील उन्हाळा सहन होत नाही, म्हणून परदेशात थंड हवेच्या ठिकाणी सहकुटुंब जाण्यासाठी आणि एकेक महिना राहण्यासाठीचा पैसा यांच्याकडे कुठुन येतो, आलीशान मोटारी, फार्महाऊस, बंगले हे सर्व कसे येते, असे प्रश्न आपल्या मनात येतात. निव़णुकीच्या काळात सत्ताधारी, विरोधक विमाने व हेलीकॉप्टर यांचा सर्रास वापर करतात. त्याचे तासांचे भाडे काही लाख रुपयांत असते. निवडणकीच्या काळात या हवाई प्रवासावरही कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. हा पक्षाचा पैसा आहे किंवा राज्य शासनाने त्याचा खर्च केला असल्याचे उत्तर ही मंडळी देतात. परंतु राज्य शासनाचा पैसा म्हणजे येथील जनतेच्या करातून मिळालेला पैसाच असतो ना, कधीतरी या मंडळींनी आपल्या पदराला खार लावून असे दौरे केले असतील काय

मात्र वर्षानुवर्षे हे असेच चालले आहे. निवडणुका आल्या की त्याची पुन्हा उजळणी होते इतकेच. निवडणुका संपल्या की पुन्हा लोक सर्व विसरतात, हे या मंडळींना माहिती असते. अरे पण जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज आणि चाड बाळगा ना, की ती सुद्धा तुम्ही सोडली आहे. किती ओरबाडायेच आणि किती खायचे, याचा विचार राजकारणी कधी करणार आहेतl

शुक्रवार, १० एप्रिल, २००९

मतदारानो तीन माकडे होऊ नका

आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून महाराष्ट्रात १३, २३ आणि ३० एप्रिल अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. केंद्रातील सत्ताधारी आपली सत्ता टिकविण्यासाठी आणि विरोधी पक्ष सत्ता हस्तगत करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करत आहेत. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा मतांचा जोगवा मागत पुढच्या पाच वर्षांची बेगमी करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते मतदारांना वेगवेगळी आमीषे दाखवत आहेत. मात्र सावधान, मतदारानो आपली ती तीन माकडे होऊ देऊ नका.
आपल्या सर्वांना त्या तीन माकडांची गोष्ट माहिती आहे. ही तीनही माकडे डोळे असून आंधळी, कान असून बहिरी आणि तोंड असूनही मुकी आहेत की जाणीवपूर्वक झाली आहेत की त्यांना कोणी तसे करायला भाग पाडले आहे, ते माहिती नाही. मात्र सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी सर्व मतदारांची अवस्था काही प्रमाणात अशीच करून टाकली आहे. वरवर एकमेकांच्या विरोधात बोलायचे आणि पाठीमागे एकमेकांच्या गळ्यात गळे घालायचे, अशी त्यांची मनोवृत्ती आहे. या राजकारणी मंडळींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असून किमान आता तरी सुशिक्षित मतदारांनी आपला हक्क, कर्तव्य जाणीवपूर्वक बजावले पाहिजे. डोळे असून आंधळे, कान असून बहिरे आणि तोंड असून मुके, अशी आपली अवस्था होऊ देऊ नका.
देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी आजही आपण काही लाख किंवा कोट्यवधी लोकांनाही अन्न, वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा पुरवु शकत नाही. अनेक लहान खेडी व गावांमध्ये स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी, वीज, शाळा, महाविद्यालये, डॉक्टर्स, किमान प्राथमिक सोयी-सुविधा असेलेली रुग्णालये आणि अन्यही अनेक गोष्टी देऊ शकलेलो नाही. कोट्यवधी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. गरीबी, उपासमार आहेच. मग गेल्या अनेक वर्षांत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी काय केले, असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य मतदाराच्या मनात सहज येतो. एकदा का निवडून आले की आपल्या पुढच्या सात नव्हे तर त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट पिढ्यांची तरतूद करण्यात आपले राजकारणी धन्य मानतात. (अर्थात याला काही सन्माननीय अपवाद आहेत, ते वगळून) नगरपालिका किंवा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पाच वर्षांत नगरसेवक कसा बदलतो, त्याच्याकडे कशा आणि किती आलीशान गाड्या येतात, फ्लॅट्स, बंगला, फार्महाऊस आणि इतरही अनेक गोष्टी मतदारांच्या अगदी सहज डोळ्यात भरतात. मात्र या गेंड्याच्या कातडीच्या राजकाऱण्यांना त्याचे काहीही सोयर-सुतक नसते. पुन्हा पाच वर्षांनंतर उमेदवारी मिळाली नाही तर, त्यापेक्षा आत्ता मिळाली आहे, ना मग घ्या हवे तितके कमावून, असा त्यांचा सरळ हिशोब असतो. भारतात राजकारण सोडून अन्य कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱया व्यक्तीला वयाच्या ५८/ ६० व्या वर्षी निवृत्त व्हावे लागते. राजकारण्यांना मात्र निवृत्ती नाही. वयाची सत्तरी-पंचाहत्तरी ओलांडली आणि शरीर साथ देत नसले तरी यांची सत्तेची हाव काही सुटत नसते. तुम्हाला राजकारणात राहायचे आहे ना, मग पदापेक्षा नुसता सल्ला देण्यासाठी राहा ना, पण नाही. अपवाद वगळता सर्व राजकीय पक्षात तेच चेहरे पुन्हा पुन्हा दिसत असतात.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण असा एक टाळ्या घेणारा शब्दप्रयोग सर्व राजकीय पक्ष आणि नेते एकमेकांकडे बोट दाखवून करत असतात. मात्र निवडणुकीत आपल्या पक्षाकडून स्वच्छ चारित्र्याचा, गुन्हेगारी पाश्वर्भूमी नसलेला, पक्षाची अनेक वर्षे निष्ठेने सेवा केलेला, पक्षासाठी लाठ्या-काठ्या खाल्लेला, समाजात ज्याच्या बद्दल आदर असून ज्याची प्रतिमा स्वच्छ आहे, असाच उमेदवार द्यावा, असे कोणालाच वाटत नाही. आरोप-प्रत्यारोप झाले की, उमेदवार गुन्हेगार आहे, हे कुठे सिद्ध झाले आहे, असा तोंड वर करून सवाल मतदारांनाच विचारला जातो. सर्वसामान्य मतदारही मतदानाबाबत उत्साही नसतो. जोडून सुट्टी मिळाली तर सरळ तो रजा टाकून फिरायला निघून जातो. तसेच आपली मानसिकता अशी झाली आहे, की व्यक्ती न पाहता राजकीय पक्ष पाहून मतदान करणे. त्यामुळे उद्या एखाद्या पक्षाने दगड उभा केला तरी तो निवडून येऊ शकतो.
खरे म्हणजे आता मतदान यंत्रांवर जे उमेदवार असतील त्यांच्या यादीच्या तळाशी वरीलपैकी कोणीही नाही असा एक पर्याय असण्याची आवश्यकता आहे. याविषयी वेळोवेळी चर्चा झाली असली तरी प्रत्यक्ष मतदान यंत्रावर त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जर कोणला मतदान करायचे नसेल तर त्यासाठी मतदान केंद्रांवर वेगळा फॉर्म भरण्याचा खटाटोप करावा लागतो. सर्वसामान्य मतदार या भानगडीत पडत नाही आणि आपली जी राजकीय विचारसरणी आहे, त्या उमेदवाराला मतदान करतो. मग तो खरोखरच लायक आहे का, स्वच्छ प्रतिमेचा, चारित्र्यवान आहे का , त्याचा विचारही करत नाही. आणि त्यामुळेच अनेक राजकीय पक्षांचे फावते. कोणीही उमेदवार दिला तरी आपल्या पक्षाशी बांधील असलेले मतदार आपण दिलेल्या उमेदवारालाच आंधळेपणाने मतदान करतील, याची त्यांना खात्री असते. त्यामुळेच सर्व राजकीय पक्ष सोकावले आहेत. खऱे तर या सर्वांना एकदा धडा शिकवण्याची गरज आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ती संधी चालून आली आहे. यापूर्वीही मतदारांनी राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली आहे.
तेव्हा मतदारांनो आपली ती तीन माकडे होऊ न देता सारासार विचार करूनच आपले मत द्या किंवा मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांवर यापैकी कोणीही उमेदवार योग्य वाटत नसल्याचे सांगून मतदान न करण्याचा अर्ज हक्काने भरून द्या.

गुरुवार, ९ एप्रिल, २००९

पगडी पुराण

सध्याच्या काळात टोपी घालणे या वाक्यप्रयोगाला वेगळा अर्थ असला तरी काही वर्षांपूर्वी डोक्यावर टोपी मग ती गांधीटोपी किंवा साधी असो, डोक्यावर घातली जायचीच. टोपी किंवा तत्सम काहीतरी डोक्यावर घालणे ही एक परंपरा होती. टोपी नसलेली व्यक्ती (बोडक्या डोक्याची) हे अशुभ समजले जायचे. कोल्हापूरकडची मंडळी डोक्यावर फेटा बांधायची तर गावाकडचे लोक डोक्याला मुंडासे गुंडाळायचे. डोक्यावर टोपी, फेटा, मुंडासे घालणे याचा दुहेरी उपयोग असायचा. एकतर माणसाच्या व्यक्तीमत्वात त्यामुळे फरक पडायचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे उन्हापासून संरक्षण व्हायचे. गावाकडची मंडळी, काही जुनी म्हातारी माणसे किंवा पौरोहित्य करणारे भिक्षुक सोडले तर आजकाल डोक्यावर कोणी टोपी घालत नाही. फेटे किंवा पगडीही दिसून येत नाही. आजकाल फॅशन म्हणून किंवा एक परंपरा म्हणून लग्नामध्ये मुलगा किंवा मुलीकडील मंडळी फेटे किंवा पगड्या घालतात. लग्नाच्या हॉलमध्ये एकाच प्रकारचे फेटे किंवा पगड्या पाहून छान दिसते. आत्ता हे सर्व पुराण सांगायचे कारण म्हणजे वृत्तपत्रांमधून नुकतीच वाचनात आलेली एक बातमी.
ही बातमी पुणेरी पगडी संदर्भातील होती. पगडी ही आपली परंपरा असून त्याची जपणूक करण्यासाठी श्री पुणेरी पगडी संघाने बौद्धिक संपदा हक्क कायद्यानुसार(पेटंट) पगडीची नोंद करण्याची मागणी केली आहे.
पगड्यांमध्ये वेगवगळे प्रकार असून त्यातही पुणेही, शिंदेशाही, पेशवाई, कोल्हापुरी, बनारसी, पठाणी, मोगल, राजपुती आदींचा त्यात समावेश होतो. प्रत्येक राज्य आणि तेथील संस्कृतीनुसार या पगड्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. आजही कोणत्याही वस्तूसंग्रहालयात आपण गेलो तर वेगवेगळ्या प्रांतांनुसारच्या अनेक पगड्या तेथे ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याकाळी माणसाने कोणत्या प्रकारची पगडी घातली आहे, त्यावर त्याची हुशारी आणि कर्तृत्व ठरत असे. त्यामुळे पगडीला एकेकाळी खूप महत्व होते.
आजकाल दुचाकी वाहन चालविणारा चालक आणि वाहनचालकाच्या मागे बसणाऱया व्यक्तीलाही हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. कारण त्यामुळे अपघात किंवा अन्य प्रसंगात डोक्याचे संरक्षण होते म्हणून. पूर्वीच्या काळी तोच उद्देश या पगडीचा असावा. पुढे काळाच्या ओघात त्याला प्रथा-परंपरा किंवा प्रतिष्ठेचे स्वरूप आले असावे. पगडीबरोबर गळ्यात उपरणे असण्यालाही महत्व होते. ती पद्धतच होती. सध्याच्या काळातही पुणे किंवा अन्यत्र मान्यवरांचा सत्कार करताना त्यांच्या डोक्यात पुणेरी पगडी घातली जाते. म्हणजे अद्यापही आपण पगडी हे विद्वत्तेचे, प्रतिष्ठेचे चिन्ह मानतो. अर्थात यावरूनही मतभेद किंवा वाद होऊ शकतील. पगडीला ब्राह्मणी संस्कृती म्हणूनही हिणवले जाते. मध्यंतरी काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील श्रीविठ्ठलाचे पगडी घातलेले एक छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. ही पगडी पुणेरी (ब्राह्मणी) की अब्राह्मणी असा वादही त्यावेळी झाला होता, याची सहज आठवण होते. तर असे हे पगडी पुराण.
पगडी दिसायला एकसंध वाटत असली तरी त्याचे कोकी (पगडीचा सर्वात वरचा भाग) गोटा (कपाळावर येणारा उभट गोलसर भाग), चोच (कोकीचा पुढील भाग) गाभा (मधला भाग) आणि घेर (पगडीचा सर्वात खालचा भाग) असे त्याचे काही भाग आहेत. पगडी घालताना कोकीच्या जवळ असलेली झालर ही उजव्या कानाच्या, डोळ्याच्या वरील बाजूस आणि गोटा कपाळावर अशा प्रकारे यावी लागते. पगडी तयार करणे हे खूप कष्टाचे काम समजले जाते. पगडी बनवणे ही एक कला असून आता काळाच्या ओघात पगडी बनवणारे आणि ती नियमित घालणारेही लोप पावत चालले आहेत आणि म्हणूनच पगडीसाठी पेटंट घेण्याची मागणी करण्यात आली आहे. नाहीतर काळाच्या ओघात आपली पगडी संस्कृती नष्ट व्हायची आणि उद्या इंग्लंड-अमेरिकेतून याचे पेटंट कोणीतरी घ्यायचे आणि त्यावर आपला हक्क सांगायचे. आपला बासमती तांदूळ, हळद या बाबतीत तेच झाले ना, शेवटी न्यायालयीन आणि कायदेशीर लढाईनंतरच त्याचे पेटंट आपल्याला मिळाले. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी त्यासाठी अथक प्रयत्न करून हळदीची लढाई जिंकली. त्यामुळे आपला हा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी केला जाणारा हा प्रयत्न नक्कीच स्तूत्य आहे. कारण तसे केले नाही तर ही पगडी आणि पगडी तयार करणारी मंडळी काळाच्या ओघात नष्ट होतील आणि भावी पिढीला केवळ चित्रातच पगडी पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील अनेक कला/संस्कती लोप पावत चालल्या असून राज्य शासन किंवा अन्य संस्थांतर्फे त्यांचे जतन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. असेच प्रयत्न केवळ पुणेरी पगडीसाठी नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातील आणि देशाच्या अन्य प्रांतातील ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या आहेत, त्यांच्या संरक्षणासाठी झाले पाहिजेत.

बुधवार, ८ एप्रिल, २००९

आठवणी उन्हाळी सुट्टीच्या

मार्च-एप्रिलचा महिना लागला की आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागायला सुरुवात व्हायची. यंदाच्या उन्हाळी सुट्टीत काय काय करायचं त्याचे बेत आखले जायचे. कधी एकदा वार्षिक परीक्षा संपतेय असं आणि मग शाळा सुरू होईपर्यंत काय धमाल करायची असे होऊन जायचं. बरं काही वर्षांपूर्वी सध्याच्या प्रमाणे विविध शिबिरं आणि क्लासेसचंही पेव फुटलेलं नव्हतं. त्यामुळे दिवसभर आमच्या घरी किंवा सोसायटीतल्या अन्य कोणाच्या तरी घरी सगळ्यांचा लवाजमा असायचा. आमच्या सोसायटीमध्ये समवयस्क मुले भरपूर होती. त्यावेळी सायबर कॅफे, कॉम्प्युटर असं प्रस्थ नसल्यानं संपूर्ण सुट्टीभर दुपारी घरांत बैठे खेळ आणि संध्याकाळी मैदानी खेळ असं स्वरूप असायचं. एकदा का शेवटचा पेपर झाला की, घरी आल्यावर हुश्श व्हायचं. आता उन्हाळी सुट्टी म्हणजे घरातील मोठ्या माणसांच्या दृष्टीने मात्र डोकेदुखी असायची. अभ्यास न करता ही मुलं आता नुसती हुंदणार आणि धुडगुस घालणार, असा तक्रारवजा सूर या मोठ्या मंडळींचा असायचा.
या उन्हाळी सुट्टीतला दैनंदिन कार्यक्रम तसा ठरलेला असायचा. सकाळी सहा-साडेसहा वाजता उठून सोसायटीच्या आवारात बॅडबिंटन खेळायचा आमचा कार्यक्रम असायचा. आम्ही सर्व मुलं चुन्यानं कोर्ट आखून व नेट लावून खेळत असू. त्यानंतर घरी जाऊन आंघोळ झाली की काहीतरी खाणे, नाश्ता झाला की पुन्हा खाली क्रिकेट खेळणे व्हायचे. सूर्य माथ्यावर आला की आता उन वाढलाय, घरी या अशा प्रत्याकाच्या घरून हाकाट्या सुरू व्हायच्या. दुपारचे जेवण झाले की कोणाच्या तरी घरी सगळ्यांचा अड्डा जमायचा. मग सुरू व्हायचं ते पत्ते पुराण. त्यात मेंढीकोट, झब्बू मग तो साधा आणि गड्डेरी, लॅडीज, बदामसात, असे प्रकार व्हायचे. मेंढीकोट खेळताना पानांच्या खाणाखूणा करणे, त्यावरून होणारी चिडाचिड असे प्रकारही असायचे. केव्हा केव्हा व्यापार डाव किंवा गाण्याच्या भेंड्याही रंगायच्या तर कधी वही-पेन घेऊन नाव, गाव, फळ व फूल तर कधी फुल्ली-गोळा खेळणे व्हायचे.
दुपारनंतर चहा आणि दुपारचे खाणे झाले की पुन्हा सगळे खाली ग्राऊंडवर उतरायचे. दुपारचे खाणे म्हणजे प्रामुख्याने गोड शिरा, उपमा, कांदेपोहे, दडपे पोहे, थालीपीठ, कधी साग्रसंगीत भेळ असा मेन्यू असायचा. मग खाली खेळायला उतरल्यानंतर लगोरी, डबाएेसपैस, भोकंजा, चोर-शिपाई, सोनसाखळी, विषामृत, लंगडी, खोखो तसेच गोट्या, ढब, विटीदांडू असे अनेक खेळ दररोज आलटून-पालटून व्हायचे. त्यावेळी संध्याकाळ ही घरात बसण्यासाठी किंवा सायबर कॅफेत जाण्याची तसेच घरी कॉम्य्पुटरवर गेम खेळत बसायची नसायचीच. दिवेलागणीच्या सुमारास घरून हाका आल्या की घऱी जायचे. हातपाय धुवून शुभंकरोती, परवचा, रामरक्षा व भीमरुपी स्तोत्र हे म्हणणे व्हायचे. दिवसभर हुंदडल्यामुळे आणि मोकळ्या हवेत, ग्राऊंडवर खेळल्यामुळे भूकही चांगली लागायची. टीव्हीवरील मालिकांचे प्रस्थ नसल्यानं स्वयंपाकघरात एकत्र बसून जेवण व्हायचे.
उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की ही अशी धमाल असायची. आत्ताच्या मुलांना कदाचित यात कसली धमाल असेही वाटण्याची शक्यता आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या मोठ्या घरी आजी-आजोबा व काकांकडे आंब्याच्या आईस्क्रीमचा मोठ्ठा कार्यक्रम असायचा. आम्ही सर्व चुलत भांवडे, आजी-आजोबा आणि आई-बाबा व सर्व काका-काकू कंपनी एकत्र असायचो. बरं ते आईस्क्रीमही रेडीमेड नाही तर पॉटवर केलेलं असायचं. अगदी लहान असताना म्हणजे सहावी-सातवीत ते तयार करण्यात आमचा सहभाग नसायचा. मात्र आठवी-नववीपासून बर्फ विकत आणणं, त्याचे तुकडे करणं, बर्फ आणि खडे मीठ घेऊन ते पॉटमध्ये टाकून हातात गोळे येईपर्यंत फिरवायला मजा यायची. पॉट फिरवणं खूप जड व्हायला लागला की ती आईस्क्रीम तयार झालं असल्याची नांदी असायची. मग पुन्हा एकदा थोडा वेळ फिरवून एकदाचे आईस्क्रीम तयार व व्हायचं. मग काचेच्या बाऊलमध्ये, आईस्क्रीमचा मोठ्ठा गोळा घेऊन ते अगदी मनसोक्त खाल्ल जायचं. घरच्या आईस्क्रामची लज्जत वेगळीच असायची.
उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री गच्चीवर झोपण्यातही मजा यायची. झोपण्यापूर्वी थोडा वेळ अगोदर आम्ही गाद्या घालून ठेवायचो. त्यामुळे झोपायला जातांना गाद्या थोड्याश्या गार झालेल्या असायच्या. रात्री गप्पा मारत आणि काळ्याभोर आकाशातील चांदण्या पाहताना गाढ झोप कधी लागायची ते कळायचच नाही. सकाळी अगदी उशीरापर्यंत झोपू म्हटलं तरी पक्षांच्या किलबिटानं सहाच्या सुमारास जाग येईचीच. उन्हाळ्याच्या या सुट्टीत भरपूर आंबे आणि आमरस खाणं तर ठरलेलं असायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बटाटा किंवा उडदाचे पापड, साबुदाण्याच्या उपासाच्या चकल्या चिकोड्या करणं व्हायचे. ते करताना आई बरोबर आमचीही त्यात लुडबूड असायची. बटाटा किंवा उडदाचे डांगर व त्याच्या लाट्या खायला खूप आवडायचं. बटाटाट्याचा कीस करणं हा एक ठरलेला कार्यक्रम असायचा. उन्हाळ्यासाठी तब्येतीला चांगलं म्हणून दररोज कैरीचं पन्ह, कोकम किंवा लिंबू सरबत असायचं.
एकंदरीत उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे धमाल आणि मजा असायची. सुट्टी संपत आली की शाळा सुरू व्हायचे वेध लागायचे. ही सुट्टी संपूच नये, असंही वाटायचं. परंतु आता वेध लागलेले असायचे कधी एकदा शाळा सुरू होते त्याचे, नवी पुस्तके, नव्या वह्या, त्यांचा तो एक वेगळा वास, खूप दिवसांच्या कालावधीनंतर शाळेतल्या मित्रांना भेटायची लागलेली ओढ हे हवंस वाटायचं. पहिल्या पावसांची व हा पाऊस पडल्यानंतर येणारा मातीचा सुगंध मनात भरून ठेवण्याची ओढ लागायची...

मंगळवार, ७ एप्रिल, २००९

गोमूत्र उपचार पद्धती

सध्याच्या धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात आपली बदलती जीवनशैली आणि फास्टफूडच्या खाण्यामुळे प्रत्येकालाच काहीना काही तरी आजार होत असतात. डोकेदुखी, सर्दी, खोकला या साऱख्या किरकोळ आजारांबरोबरच मधुमेह, रक्तदाब आणि अन्य मोठे आजारही दिसून येतात. साधारणपणे किरकोळ आजार किंवा दुखणे उद्भवले की आपण डॉक्टरांकडे जातो. त्यांनी दिलेली अॅलोपॅथीची औषधे घेऊन किंवा औषधांच्या दुकानात जाऊन आपल्या माहिती असलेल्या गोळ्या आपण घेतो व आजार तात्पुरता दूर करतो. पुन्हा काही दिवसांनी तोच किंवा दुसरा आजार डोके वर काढतो. तसेच अॅलोपॅथीच्या औषधांचे काही साईड इफेक्टही आपल्या शरीरावर होत असतात. त्यामुळे सध्या आल्टरनेटीव्ह मेडिसिनकडेही लोकांचा कल वाढलेला आहे. आज मी आपल्याला गोमूत्र किंवा पंचगव्य चिकित्सा/ उपचार पद्धतीची ओळख करून देत आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या वाचनात संत आसाराम बापू यांच्या आश्रमातर्फे प्रकाशित होणाऱया लोककल्याण सेतू या मासिकाचा गोमूत्र (गोझरण) विशेषांक वाचनात आला. गोमूत्र आणि पंचगव्य उपचार पद्धतीबाबतची सविस्तर माहिती या अंकात देण्यात आली होती. सर्वांना त्याची माहिती व्हावी आणि लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा वापर करावा, या उद्देशाने मी अंकातील या लेखाच्या झेरॉक्स काढून परिचित, मित्र आणि नातेवाईंकांमध्ये वाटल्या. महाराष्ट्रात नागपूर आणि अकोला येथेही गोसेवा संशोधन प्रकल्प राबविण्यात येत असून तेथे गोमूत्रापासून विविध औषधे तयार केली जातात. मुंबईत भाईंदर जवळील उत्तन येथे केशवसृष्टी असून तेथेही गोमूत्र आणि त्यापासून शाम्पू व अन्य उत्पादने तयार केली जातात. सुरेश नगर्सेकर यांनीही गोमूत्राविषयी सविस्तर माहिती देणारे एक पुस्तक लिहिले आहे. त्यातही गोमूत्राचे औषधी उपयोग, त्यापासून तयार केली जाणारी औषधे याची माहिती देण्यात आली आहे.
लोककल्याण सेतू या मासिकात दिलेल्या माहितीनुसार गोमूत्रामध्ये ताम्र, लोह, कॅल्शियम, मॅगेनीज आणि अन्य सोळा प्रकारची खनिज तत्वे असून ती शरीराचे रक्षण, पोषण आणि विकासासाठी आवश्यक असतात. गोमूत्राच्या सेवनामुळे रोगप्रितकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
गोमूत्राचे वैज्ञानिक पृथ्थकरण केल्यानंतर त्यात नायट्रोजन, सोडियम, सल्फर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅगेनीज, तांबे, चांदी, आयोडीन, शिसे, सुवर्णक्षार, अमोनिया, युरिया, युरीक अॅसिड अशी अनेक प्रकारची खनिज तत्वे आढळून आली आहेत. गोमूत्राच्या सेवनाने मुत्रपिंडाचे रोग बरे होतात. गोमूत्रातील एरीथ्रोपोईटीन हा घटक हाडातील मज्जा तत्वाला सक्रिय करून नवीन रक्तकणांची निर्मिती करतो. गाईचे गोमूत्रच केवळ उपयुक्त आहे, असे नव्हे तर गाईचे दूध, तूप, दही,मूत्र आणि शेणही अत्यंत उपयुक्त आहे. गोमूत्राचा उत्तम किटनाशक म्हणूनही वापर करता येऊ शकतो. झाडे किंवा पिकांवर गोमूत्राची फवारणी केली तर असलेली कीड नष्ट होते किंवा कोणत्याही कीडीपासून पिकांचे संरंक्षण होते. पोटातील कृमीही गोमूत्र सेवनाने नाहीशा होतात. गोमूत्र हे उत्तम अॅन्टीसेप्टीक म्हणूनही काम करते. जखमेवर गोमूत्र लावले तर जखम पिकत नाही, लवकर बरी व्हायला मदत होते. गोमूत्र हे एक उत्तम रेचक असून तो नियिमत घेतले तर पोट साफ राहते.
मलावरोध, गुडघेदुखी, अपचन, कावीळ, कृमी, स्थुलता, मधुमेह, त्वचारोग, रक्तदाब आदी विविध रोगांमध्येही गोमूत्र आणि त्यापासून तयार केलेली औषधे अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. सुश्रुत संहिता, चरक संहिता, अमृतसागर, भावप्रकाश, अष्टांग संग्रह, आदी जुन्या ग्रंथांमधूनही गोमूत्र आणि पंचगव्याची माहिती व त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत. गोमूत्र हे कडू, उष्ण, खारट, तिखट, तुरट, लघू, अग्निदीपक वात व कफनाशक अस आहे.
इंटरनेटवरही गोमूत्राविषयी माहिती असलेली हजारो पाने असून गुगल किंवा याहूवर काऊ थेरपी/गोमूत्र असा शब्द टाईप करून सर्च म्हटले तरीही याविषयी अधिक माहिती जिज्ञासूना मिळू शकेल. गोमूत्र आणि पंचगव्यापासून गोमय शाम्पू, गोमूत्र अर्क, गोमूत्रासव, दंतमंजन, डोळ्यात घालण्यासाठी औषध, पायांच्या भंगांसाठीचे मलम, अंगाला लावायचा साबण आणि अन्य अनेक प्रकारची औषधे तयार केली जातात.
गोमूत्राचे महत्व आणि उपयुक्तता कळल्यानंतर मी माझ्या परिने गोमूत्र उपचार पद्धतीचा जमेल तसा प्रचार-प्रसार करत आहे. गेली काही वर्षे मी स्वत नियमितपणे गोमूत्र (दिवसातून एकदा सुमारे अर्धा किंवा एक चमचा गोमूत्र घेऊन त्यात थोडे पाणी टाकून) सेवन करत आहे. आपणही एकदा याचा उपयोग करून स्वत अनुभव घ्यावा आणि इतरांनाही गोमूत्र घेण्यास सांगावे.

सोमवार, ६ एप्रिल, २००९

ललित लक्षवेधी पुस्तके

मराठीमध्ये दरवर्षी अनेक उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित होत असतात. विविध वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्यांमधून यापैकी काही पुस्तकांची परीक्षणे प्रसिद्ध होतात. रसिक वाचक आणि सर्व साहित्यप्रेमींपर्यंत या सर्व पुस्तकांची माहिती पोहोचतेच असे नाही. वृतत्पत्रांप्रमाणेच काही साहित्यविषयक मासिकेही दर्जेदार व चांगली पुस्तके चोखंदळ वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत असतात. मराठीमध्ये ललित, साहित्यसूची, मेहता मराठी ग्रंथजगत आणि अन्य काही मासिके हे काम करत आहेत. मराठी साहित्यातील पुस्तक प्रकाशक-ग्रंथविक्रेते तसेच चोखंदळ साहित्यप्रेमी आणि वाचकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून ‘ललित’ या मासिकाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या मासिकातर्फे दरवर्षी मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या ‘लक्षवेधी’ पुस्तकांची निवड केली जाते. २००८ मधील अशा ललित लक्षवेधी पुस्तकांची नुकतीच निवड करण्यात आली असून त्यात ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या ‘बदलते विश्व’ या पुस्तकाचा अग्रक्रमांक आहे.
ललित लक्षवेधीमधून गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या एकूण पुस्तकांमधून ३६ पुस्तकांची निवड करण्यात आली असून त्यात कविता महाजन (भिन्न), श्री. बा. जोशी (गंगाजळी), प्रा. राम शेवाळकर (पाणीयावरी मकरी), मॅजेस्टिक कोठावळे (संपादन-वि. शं. चौघुले), आणि डॉ. सदानंद मोरे (लोकमान्य ते महात्मा) यांच्या पुस्तकांचा समावेश आहे.
‘ललित’ मासिकाकडे विविध प्रकाशकांकडून अभिप्रायासाठी जी पुस्तक येतात, त्यातून दरवर्षी ललित लक्षवेधी पुस्तकांची निवड करण्यात येते. ‘ललित’ मासिकाचे संपादक मंडळ आणि निवड समितीतर्फे ही निवड करण्यात येते. ललित लक्षवेधी पुस्तकांप्रमाणेच दरवर्षी वाचकांकडून मत मागवून काही पुस्तकांची निवड केली जाते. ही निवड ‘ललित चोखंदळ वाचकांची निवड’ म्हणून ओळखण्यात येते.
केतकर यांचे ‘बदलते विश्व’हे पुस्तक प्रेस्टिज पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. अन्य ललित लक्षवेधी पुस्तके पुढीलप्रमाणे - प्रा. डॉ. सुभाष भेंडे (होमकुंड)-मॅजेस्टिक प्रकाशन, शंकर सखाराम (एसईझेड)-सामंत पब्लिकेशन्स, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे (ऊर्जेच्या शोधात)-राजहंस प्रकाशन, रामदास भटकळ (मोहनमाया)-मौज प्रकाशन, आनंद अंतरकर (छायानट)-ब्लू बर्ड इंडिया, प्रा. मोहंमद युनुस, अनुवादित-(बॅंकर टु द पुअर)-सुविद्या प्रकाशन, माणिक कानडे (जागतिक रंगभूमी)-रोहन प्रकाशन, श्री. बा. जोशी (गंगाजळी)-मॅजेस्टिक प्रकाशन. कविता महाजन (भिन्न)-राजहंस प्रकाशन,
मनस्वीनी लता रवींद्र (सिगारेट्स/अलविदा)-पॉप्युलर प्रकाशन, शिरीन इबादी, अझादेह मैवेनी, अनुवाद-प्रतिमा जोशी (इराण जागा होतोय)-कॉन्सेप्ट बुक्स, संपादन-विद्या बाळ (कथा गौरीची)-मौज प्रकाशन. माधुरी काळे (मादाम क्यूरी)-मॅजेस्टिक प्रकाशन, मर्मभेद-प्रा. मे. पु. रेगे यांचे टिकालेख (संपादक-एस. डी. इनामदार)-प्रतिमा प्रकाशन, संजय संगवई (उद्गार)-पॉप्युलर प्रकाशन), चंद्रकुमार नलगे (रातवा)-अजब पब्लिकेशन, संपादक-अवधूत परळकर (सर्वोत्तम सरवटे)-लोकवाङ्मय गृह)
हेमंत देसाई (सारथी)-अक्षर प्रकाशन, शब्दानंत (त्रभाषिक तथा व्यवहार उपयोगी शब्दकोश. कोशरचनाकार-सत्वशिला सामंत)-डायमंड पब्लिकेशन्स), प्रा. राम शेवाळकर (पाणीयावरी मकरी)-साहित्य प्रसार केंद्र, राणी दुर्वे (शब्देवीण संवादु)-परममित्र पब्लिकेशन्स). अन्य पुस्तकांमध्ये शांता गोखले (त्या वर्षी), सतीश तांबे (लेखाजोखा), मोनिका गजेंद्रगडकर (आर्त), संपादन-स्वाती कर्वे (स्त्री विकासाचे नवे क्षितिज), यशवंत रांजणकर (वॉल्ट डिस्ने-द अल्टिमेट फॅण्टसी), मंगेश नारायण काळे (नाळ तुटल्या प्रथम पुरुषाचे दृष्टांत), चं. प्र. देशपांडे (बुद्धिबळ आणि झब्बू), शांताराम पारितोषिक कथा (प्रस्तावना-विलास खोले), डॉ. रमेश कुबल (आदिवासी नायक), किरण नगरकर (प्रतिस्पर्धी), भारतकुमार राऊत (अशी ही मुंबई), सचिन कुंडलकर (फ्रजमध्ये ठेवलेले प्रेम/पूर्णविराम).
चोखंदळ साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी नेमकी कोणती पुस्तके वाचावीत, यासाठी ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल असे वाटते.

रविवार, ५ एप्रिल, २००९

अंधांसाठीची रेल्वेस्थानकातील उपयुक्त सुविधा

मुंबईत मध्य, पश्चिम किंवा हार्बर रेल्वेच्या उपनगरी लोकलमधून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य असते. रेल्वेस्थानक आणि लोकल गाडीतील गर्दी आणि या गर्दीतून प्रवास करणे हे धडधाकट प्रवाशांसाठीही एक धाडस असते. धडधाकट माणसांची ही अवस्था होत असेल तर अपंग, अंध किंवा अन्य व्यंग असलेल्या माणसांचे काय होत असेल त्याची कल्पनाही करवत नाही. रेल्वेच्या उपनगरी लोकलमध्ये अपंगांसाठी स्वतंत्र डबा असतो. मात्र अनेक वेळा अपंगांसाठीच्या असलेल्या या हक्काच्या डब्यात धडधाकट माणसे शिरून अपंगांवर अन्याय करतात. रेल्वे स्थानकांवर हा अपंगांचा डबा कुठे येतो, त्याची पाटी लावण्यात आलेली असते. दृष्टी असणाऱयाला आणि अपंग असणाऱया व्यक्तिला हा डबा कुठे ते माहिती असते. मात्र ज्यांना दृष्टी नाही अशा अंध माणसांना नेमका हा डबा कुठे येतो हे कसे काय कळते, बारा किंवा नऊ डब्याची लोकल असेल तर केवळ अंदाजाने ते आपल्या डब्यापाशी येतात का, की पावलांच्या अंतराने ते बरोबर अपंगाच्या डब्यापाशी येतात. कारण दिसत नसताना केवळ अंदाज घेऊन रेल्वेस्थानकातील गर्दीतून वाट काढत आपल्या डब्यापाशी जाणे त्यांना कसे काय जमते, असे प्रश्न मला पडायचे. तुम्हालाही कदाचित असे प्रश्न पडले असतील. मला मात्र त्या दिवशी अगदी सहजपणे माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.
दुपारी कार्यालयात येण्यासाठी मी डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वर उभा होतो. तेवढ्यात एक अंध बाई मला फलाटावर दिसल्या. अपंगांच्या डब्यापर्यंत जाण्यासाठी त्यांना मदत हवी होती. मला आमच्या डब्यापर्यंत सोडाल का, असे विचारत त्या फलाटावरून हळूहळू चालत होत्या. मी त्या बाईंचा हात धरला आणि म्हटले ,चला मी तुम्हाला तुमच्या डब्यापर्यंत सोडतो.
मलाही नेमका डबा कुठे येतो, ते माहिती नव्हते. म्हणून मी त्यांना विचारले की, ही बारा डब्यांची गाडी असून मला अपंगांचा डबा कुठे येतो, ते माहिती नाही, मी तुम्हाला तुमच्या डब्यापर्यंत घेऊन जातो. पण तुमचा डबा कुठे येणार हे कळणार कसे.
त्यावर त्या अंध बाई म्हणाल्या रेल्वेने अंधांसाठी त्यांचा डबा रेल्वेस्थानकात कुठे येतो, हे कळण्याची खूप चांगली सोय केली आहे. तुम्ही मला घेऊन चला, पाच क्रमांकाच्या फलाटावर जेथे कॅन्टीन येते, तेथे आमचा डबा येतो. आता हे नेमके त्यांना कसे माहिती, असा विचार माझ्या मनात आला. त्यावर त्या बाईनी मला सांगितले की, आपण जसजसे आमच्या डब्याच्या जवळ जायला लागू तसा तुम्हाला कू, कू, कू असा मोठा आवाज येईल त्या ठिकाणी मला नेऊन सोडा. रेल्वेने ही आमच्यासारख्या अंधांसाठी ही खास सोय केली आहे. मी त्या बाईना हळूहळू पुढे घेऊन गेलो आणि त्यांनी सांगितल्यानुसार कॅन्टीनच्या जवळ तो आवाज मोठ्याने एेकू येत होता. तो आवाज एेकल्यानंत आम्ही तेथे थांबलो. त्या बाई मला म्हणाल्या, की आता तुम्ही गेलात तरी चालेल.
त्या प्रसंगानंतर रेल्वेने अंध व्यक्तींसाठी किती चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे हे मला कळले. कदाचित अनेक प्रवाशांनीही रेल्वे स्थानकावर गाडीची वाट पाहत उभे असताना हा आवाज नेहमी एेकला असेल. मात्र तो अंधांना त्यांचा डबा नेमका कुठे येतो, त्याची माहिती देण्यासाठीचा आहे, ही बाब कदाचित माहिती नसेल. मला त्या दिवशीच्या प्रसंगामुळे ही गोष्ट कळून आली.
रेल्वेने अंधांसाठी खरोखऱच एक स्तूत्य आणि त्यांना उपयुक्त अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. केवळ अंध व्यक्तीच नव्हे तर आपल्या साऱख्या डोळसांनाही याची माहिती व्हावी, म्हणूनच हा प्रपंच...

शुक्रवार, ३ एप्रिल, २००९

पुस्तकविक्रीच्या कोटीच्या कोटी उड्डाणाला बसली खीळ

महाबळेश्वर येथे नुकतेच ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. महाबळेश्वर सारख्या छोट्या शहरात साहित्य संमेलनाचा झालेला हा नॅनो प्रयोग मराठीतील पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांना फारसा रुचलेला नाही. या छोटय़ा गावातील साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी संमेलनाच्या निमित्ताने इतक्या मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदाच एका ठिकाणी विविध विषयांवरील हजारो पुस्तके हाताळायला व पाहायला मिळाली, ही बाब वाचक म्हणून स्वागतार्ह असल्याचे मत प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांच्या वर्तूळातून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याच वेळी गेल्या काही वर्षांतील साहित्य संमेलनांमध्ये पुस्तक खरेदीची जी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे झाली होती, त्याला महाबळेश्वर साहित्य संमेलनात खीळ बसली या गोष्टीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मतही प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महाबळेश्वर येथे नुकतेच पार पडलेले ८२ वे साहित्य संमेलन विविध वाद, प्रतिवाद आणि अन्य कारणांमुळे गाजले. महाबळेश्वरची लोकसंख्या सुमारे १२ ते १४ हजार इतकी असून हे शहर प्रामुख्याने पर्यटन व्यावसायिक आणि पर्यटकांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील साहित्य संमेलनांच्या तुलनेत येथे साहित्य रसिकांचा प्रतिसाद कमी असेल, हे गृहीतच होते. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनीही संमेलनापूर्वी मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत ‘महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनाकडे आम्ही एक प्रयोग म्हणून पाहतो आहोत’ असे सांगितले होते. त्यानंतर जे जे काही झाले त्यामुळे एकप्रकारे हे साहित्य संमेलन हा प्रयोगच ठरला आहे.
गेल्या वर्षी सांगली येथे झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीने एक नवा उच्चांक गाठला होता. येथे साडेतीन ते चार कोटींची पुस्तक विक्री झाली होती. अर्थात येथे पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठीही दररोज हजारो लोकांच्या झुंडी येत होत्या. गेल्या काही वर्षांत सोलापूर, नागपूर, नाशिक आदी ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनात काही कोटी रुपयांची पुस्तक विक्री झाली होती. साहित्य संमेलन आणि पुस्तकप्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या मोठय़ा गर्दीचा फायदा पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांना मिळाला होता. सांगली येथील साहित्य संमेलनात तर प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांचे साडेतीनशे स्टॉल होते. महाबळेश्वर येथील संमेलनात ही संख्या सुमारे ८५ ते ९० इतकी कमी होती. महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनात २० ते २५ टक्के पुस्तक विक्री झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांत पुस्तक विक्रीची जी कोटीच्या कोटी उड्डाणे होत होती, त्याला महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनात खीळ बसल्याचे दिसून येत आहे.
महाबळेश्वर येथे साहित्य संमेलन घेण्याच्या प्रयोगामुळे गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीचा जो चढता आलेख होता, तो एका फटक्यात खाली उतरला असल्याचे प्रातिनिधिक मत महाराष्ट्रात विविध ठिकाणी सातत्याने पुस्तक प्रदर्शन आयोजित करणाऱ्या ‘अक्षरधारा’ संस्थेचे रमेश राठीवडेकर यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले. महाबळेश्वरला आलेले प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनीही याला दुजोरा दिला. छोटय़ा गावात संमेलन घेतल्यामुळे तेथील वाचकांपर्यत हजारो पुस्तके एकाच वेळी पोहोचत असली तरी पुस्तक विक्रीसाठी त्याचा उपयोग झाला नसल्याचे मतही ग्रंथविक्रेते आणि प्रकाशकांनी व्यक्त केले.

गुरुवार, २ एप्रिल, २००९

हवाय कशाला कसाबला वकील

मुंबईवर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारा एकमात्र जीवंत आरोपी अजमल कसाब याचे वकीलपत्र घेण्यावरून सध्या वाद-प्रतिवाद सुरू आहे. अंजली वाघमारे यांनी त्याचे वकीलपत्र घेतल्यानंतर शिवसेना, मनसे तसेच अन्य मंडळींनी त्यास तीव्र आक्षेप घेत वाघमारे यांच्या घरासमोर निदर्शने केली. वाघमारे यांनी कसाबचे वकीलपत्र घेऊ नये म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला. मात्र हे वकीलपत्र घेण्यावर अंजली वाघणारे ठाम आहेत. भारतीय घटना असे सांगते की, कोणताही खटला न्यायालयात उभा राहण्यासाठी आरोपीला वकील असणे आवश्यक आहे. कसाबला वकील दिला नाही तर हा खटलाच उभा राहणार नाही व खटलाच उभा राहिला नाही तर कसाबला शिक्षा कशी होणार, असा युक्तिवाद करण्यात येत आहे. व त्याच मुद्द्यावर आपण वरिष्ठांच्या आदेशानुसार कसाबचे वकीलपत्र घेतले असल्याचे वाघमारे यांचे म्हणणे आहे.हे म्हणणे मान्य केले तरी एक सर्वसामान्य राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून मनात काही प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांवर व्यापक जनजागणर आणि कायदातज्ज्ञ व राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी नव्याने विचार करण्याची गरज आहे.
१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले त्याचा खटलाही अनेक वर्षे असाच रेंगाळला होता. भारत सोडून अन्य कोणत्याही देशात जर अशा प्रकारचे गंभीर आणि राष्ट्राच्या विरोधातील कोणतीही घटना घडली तर याबाबतच्या सर्व कायदेशीर बाबी लवकरात लवकर पूर्ण करून संबंधित आरोपींना कठोर शासन केले जाते. आपल्याकडे मात्र शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील मात्र एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये, असे तत्व उराशी जपून बसलो आहोत. बदलत्या परिस्थितीत एका निरपराध्याला शिक्षा झाली तरी चालेल परंतु एकही अपराधी सुटता कामा नये, अशी भूमिका घेण्याची गरज आहे. तसेच जे कोणी देशविघातक कृत्ये करतील त्यांना वर्षानुवर्षे खटले रेंगाळत न ठेवता जरब बसेल असे शासन होण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तरच अशा दहशतवादी आणि देशविघातक कृत्यांना आळा बसू शकतो.
प्रत्येक आरोपीला न्याय मिळाला पाहिजे, त्याला वकील मिळाल्याशिवाय खटला उभा राहता कामा नये, हे कायदा आणि घटना म्हणून एकदम मान्य. मात्र काही अपवादात्मक परिस्थितीत आपण या धोरणाची अंमलबजावणी केली नाही, तर काही नुकसान होईल, असे मलातरी वाटत नाही. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला हे पाकिस्तानने भारताच्या विरोधात पुकारलेले युद्ध असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यापासून ते जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱयांनी व्यक्त केली होती. केवळ या हल्ल्यात नव्हे तर यापूर्वी झालेल्या १२ मार्च १९९३ च्या बॉम्बस्फोटांपासून त्यानंतर देशभरात विविध ठिकाणी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा, त्यांच्या लष्करी संघटनेचा किंवा वेगवेगळ्या नावानी वावरणाऱया अन्य संघटनांचाच हात आहे, हे स्पष्ट झाले आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अन्य दहशतवादी मारले गेले एकमात्र कसाब जीवंत हाती लागला. त्याने सर्वांसमक्ष पोलीस आणि निरपराध नागरिकांवर गोळ्या झाडून त्यांना ठार मारले, हे तर ढळढळीत सत्य आहे, कसाब आणि त्याच्या सहकाऱयांचा हा हल्ला म्हणजे देशविघातक कारस्थान आहे, हे ही जर मान्य केले तर भारतानेही थोडी न्यायालय आणि कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन भूमिका घेतली तर काही आपण चुकीचे पाऊल उचलले, वकील न देता आपण कसाबवर अन्याय केला, असे कोणीही वाटून घेऊ नये. केंद्र व राज्य़ शासनाच्या गुप्तचर संस्था, पोलीस यंत्रणा आणि अन्य संबंधितांकडून कसाब याची चौकशी करून आवश्यक ती सर्व माहिती काढून घ्यावी आणि त्यानंतर त्याला वकील न देता खटला सुरू करावा.
संसदेवर काही वर्षापूर्वी दहशतवाद्यांकडून हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू याच्यावर आरोप सिद्ध झाले, न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षाही सुनावली मात्र तरीही आजपर्यंत आपण त्याला फाशी दिलेले नाही. उद्या कसाबच्याही बाबतीत असे कशावरून होणार नाही. सध्या त्याची सुरक्षा आणि अन्य बाबींवर नाहीतरी लाखो-कोट्यवधी रुपये खर्च होत आहेतच. ते तरी वाचतील. खटला संपला की भारतीय कायदा आणि घटना थोडी बाजूला ठेवून कसाबला फाशी द्यावी आणि त्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन व अन्य खासगी उपग्रहवाहिन्यांवरून करावे. ही सर्व प्रक्रिया वेळ न काढला लवकरात लवकर पूर्ण करून कसाबला फासावर लटकवावे.

बुधवार, १ एप्रिल, २००९

अजरामर गीतरामायण

रामायण आणि महाभार ही दोन महाकाव्ये आपल्या भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा असून गेल्या हजारो वर्षांपासून रामायण व महाभारतातील गोष्टी व त्यातील उपदेश आपण वाचत आलो आहोत. मानवी जीवनातील सर्व भावभावना तसेच मानवी स्वभावाचे सर्व प्रकारचे नमूने या महाकाव्यातून पाहायला मिळतात. महाकवी वाल्मीकी यांचे रामायण तर महर्षी व्यास यांचे महाभारत यांची मोहिनी समस्त भारतीयांच्या मनावर अद्यापही आहे. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरून झालेल्या रामायण व महाभारत या मालिकांनी तर इतिहास घडवला होता. या दोन्ही महाकाव्यांचे गारूड अद्यापही जनमानसावर कसे आहे, त्याची प्रचिती काही वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने घेतली आणि आजही घेत आहोत व यापुढेही घेत राहू. महाराष्ट्र ज्यांना आधुनिक वाल्मीकी म्हणून ओळखतो त्या गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमा यांच्या गीतरामायणामुळे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र राममय होऊन गेला होता. एकेकाळी याच गीतरामायणाने महाराष्ट्राला वेड लावले होते. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून हे गीतरामायण प्रसारित व्हायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ झाला. आत्ताच्या टीआरपी किंवा तत्सम भाषेत सांगायचे झाले तर सर्वाधिक श्रोतृवर्ग या कार्यक्रमाला होता. आज हे सगळे सांगायचे कारण म्हणजे आजची तारीख १ एप्रिल.
आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून १ एप्रिल १९५५ या दिवशी गीतरामायणातील पहिले गाणे प्रसारित झाले. गायक- संगीतकार सुधीर फडके आणि गदिमा हा योग जुळून आला आणि त्यातून गीतरामायणासारखा अमृतकलश रसिकांना मिळाला. आणि पुढे वर्षभर या अमृतकलशामधील सुमधुर गीतांचे श्रवण संपूर्ण महाराष्ट्राने केले. त्याकाळी दूरदर्शन किंवा खासगी दूरचित्रवाहिन्यांचे प्रस्थ नव्हतेच. घरी असलेला रेडिओ/ ग्रामोफोन हेच त्या काळातील मनोरजंनाचे साधन होते. दर आठवड्याला एक या प्रमाणे रेडिओवरून गीतरामायणातील एकेक गीत सादर होत होते. कार्यक्रमाची लोकप्रियता एवढी होती की आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रसारित होताना घरोघरी लोक भक्तीभावाने कार्यक्रम श्रवण करायला बसायचे. काही जण रेडिओला हार अर्पण करून समोर पेढे, साखरही ठेवायचे. सहज, सोपे आणि मनाचा ठाव घेणारे गदिमांचे शब्द आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी प्रत्येक गाण्याला संगीत देताना आणि ते आपल्या स्वरात सादर करताना त्यात ओतलेले प्राण, त्या मुळे गीतरामायण हे अजरामर झाले.
वर्षभरानंतर आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रसारित होणे थांबले. मात्र कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमुळे सुधीर फडके यांनी त्यानंतर महाराष्ट्र, भारत तसेच विदेशातही अनेक वर्षे गीतरामायणाचे लाईव्ह कार्यक्रम सादर केले. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपट निर्मितीच्या निधी संकलनासाठीही सुधीर फडके यांनी गीतरामायणाचे कार्यक्रम सादर केले.गदिमांचे हे गीतरामायण पुस्तक स्वरूपातही प्रसिद्ध झाले असून त्याचा हिंदी, बंगाली, कानडी व तेलगू भाषेत अनुवादही झाला आहे.
स्वये श्री रामप्रभू एेकती, कुश-लव रामायण गाती या गाण्याने सुरुवात होऊन सुरू होणारी सुमधुर स्वरयात्रा गा बाळानो श्री रामायण या गाण्याने संपते. गीतराणायणातील सर्वच गाणी श्रवणीय आणि मनाचा ठाव घेणारी आहेत. अगदी सहज आठवण केली तरी गीतरामायणातील राम जन्मला ग सखी, दशरथा घे हे पायसदान, स्वयंवर झाले सीतेचे, माता न तू वैरिणी, सेतू बांधा रे सागरी आणि अशी अनेक गाणी ओठावर येतात. आज इतक्या वर्षानंतरही ही सर्व गाणी तितकीच श्रवणीय, सुमधुर आणि पुन्हा पुन्हा गावी व श्रवण करावीशी वाटतात, यातच सर्व काही आहे. मराठीतील एक ज्येष्ठ कवी दिवंगत बा. भ. बोरकर यांनी या गीतरामायणाविषयी आपली चपखल प्रतिक्रिया नोंदवली आहे. बोरकर म्हणतात, आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौदर्य दृष्टीने विधात्याच्या सुक्ष्म आणि स्थूल सृष्टतून नेमके सौदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली. त्याचप्रमाणे कवीक्षी माडगुळकर यांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौदर्य आपल्या स्वयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे. गीतरामायणातील काही गीते रामायणासाऱखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याच बरोबर माडगूळकर यांचे नाव देखील चिरंतन होईल.
गदिमा आणि सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून सादर झालेले हे गीतरामायण हा आपल्या मराठी संस्कृतीचा अनमोल असा ठेवा आहे. येणाऱया कित्येक पिढ्याही हे गीतरामायण श्रवण करून त्याचा आनंद घेतील, हे नक्की...