रविवार, ५ जुलै, २००९

आयुष्यावर बोलू काही

दूरचित्रवाहिन्यांचे आक्रमण आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे मराठी वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याची ओरड नेहमीच करण्यात येते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी सध्याची पिढी आणि आयटी/कॉलसेंटर प्रोफेशनमध्ये असणाऱया तरुणांमध्ये काही अपवाद वगळता मराठी वाचन मग ते मराठी वृ्त्तपत्रांचे किंवा पुस्तकांचे एकूणच कमी झालेले आहे. मराठी वाचनच जेथे कमी झाले आहे, अशा परिस्थितीत कविता वाचन/ कविता सादरीकरणाच्या कार्यक्रमाला रसिकांचा आणि त्यातही विशेषत महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि युवकांचा प्रतिसाद मिळणे तशी दूरचीच गोष्ट. पण डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी त्यांच्या आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम अमाप लोकप्रिय करून आजच्या पिढीला,युवकांना आणि विद्यार्थ्यांनाही मराठी कविता आवडतात हे सिद्ध करून दाखवले आहे.

हे दोघे सादर करत असलेल्या आयुष्यावर बोलू काही या मराठी कवितांच्या कार्यक्रमाचा पाचशेंवा भाग नुकताच पुण्यात साजरा झाला. संदीप खरेच्या कविता आणि सलील कुलकर्णी यांचे संगीत आणि साथीला तबल्यावरचा एक सहकारी असा कोणतेही अवडंबर नसलेला हा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम. संदीप खरे यांचे साधे व सोपे आणि मनाचा ठाव घेणारे शब्द व मनात घर करुन राहणारी, सहज गुणगुणायला लावणारी सलील कुलकर्णी यांची चाल, संदीप व सलील यांचा रंगमंचावरील सहज वापर, घरातल्याच नातेवाईकांशी किंवा मित्रांशी गप्पा मारावी, अशी समोरच्याला आपलेसे करण्याची सहज शैली यामुळे हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. हा कार्यक्रम पाच, दहा वेळा पाहणारेही रसिक आहेत, हे दिसून आले. कविता सादर करणे या साध्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला आणि अवघ्या सहा वर्षांत त्याने लोकप्रियतेचा कळस गाठला.


या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील सर्व गाणी समोर बसलेल्या प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ झालेली आहेत. व्यासपीठावर संदीप किंवा सलील गाणे म्हणतांना त्यांच्याबरोबर रसिक प्रेक्षकही मनातल्या मनात किंवा ओठांनी पुटपुटत ही गाणी त्यांच्याबरोबर म्हणत असतो. यात महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि युवक जसे असतात, तसे पन्नाशी पार केलेली रसिक मंडळीही असतात. कार्यक्रमातील प्रत्येक गाणे ह प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. अरे हे तर आपल्याही मनात आहे, असे कुठेतरी समोरच्याला वाटते, आणि तो त्या कार्यक्रमात समरस होऊन जातो. व्यासपीठावरही कोणतीही भपकेबाज सजावट नसते किंवा वादक व त्यांच्या वाद्यांचा सुळसुळाट नसतो. हार्मोनियमवर स्वत सलील कुलकर्णी ल तबल्यावर त्यांचा एक सहकारी आणि निवेदकाच्या भूमिकेत संदीप खऱे असतात. अर्थात निवेदन खऱे यांचे असले तरी अधूनमधून सलील कुलकर्णीही त्यात आपल्या हजरजबावी वक्तव्याने भर घालत असतात.

या कार्यक्रमाचा विक्रम म्हणजे पहिल्यांदा पुण्यात आणि नंतर डोंबिवलीत आयुष्यावर बोलू काहीचे सलग सहा तासांचे दोन महाप्रयोग सादर झाले आहेत. असे भाग्य क्वचितच अन्य कोणत्या कार्यक्रमाला मिळाले असेल. आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमातील कविता, गाणी यांच्या कॅसेट्स व सीडीही निघाल्या असून त्यांचीही चांगल्या प्रमाणात विक्री झाली आहे. अनेकांनी वाढदिवस व अन्य निमित्ताने आयुष्यावर बोलू काही तसेच या दोघांच्या मन तळ्यात, अग्गोबाई ढग्गोबाई या सीडी व कॅसेट् भेट म्हणून दिल्या आहेत.

मराठी कविता लोकप्रिय करण्याचे आणि कवितांच्या कार्यक्रमाकडे विद्यार्थी आणि युवकांना मोठ्या प्रमाणात वळवण्याचे काम सलील कुलकर्णी व संदीप खरे यांनी केले आहे.

३ टिप्पण्या:

  1. .आयटी मधली मंडळी मराठी आवर्जुन वाचतात असे मला वाटते. बहुतेक ९० टक्के मराठी ब्लॉगर्स हे आय्टी फिल्ड मधले आहेत. माझ्या सारखे काही नवसे गवसे इतर ही लोकं आहेत. पण मुख्य चंक आय टी वाल्यांचाच आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. शेखर
    आहात तरी कुठे? बरेच दिवसांपासुन एकही पोस्ट नाही? काय झालं?

    उत्तर द्याहटवा
  3. केवळ लोकप्रिय नाही तर भाषेचा दर्जा त्याची ऊँची दोन्ही वाढायला मदत मिळाली आहे ...यात तरुण वर्गाचा अधिक समावेश आहे हे अधिक चांगले ...

    उत्तर द्याहटवा