शुक्रवार, ३ जुलै, २००९

विकृतीला मान्यता

प्रौढ व्यक्ती परस्परांच्या संमतीने समलिंगी संबंध ठेवू शकतात आणि असे संबंध ठेवणे कायदेशीर आहे, असा दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निकाल देशभरात नवा वाद, चर्चा निर्माण करणारा ठरला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर समलिंगी संबंध ठेवणाऱया व्यक्ती आणि समलिंगी संबंधांचे समर्थन करणाऱया संस्थांनी त्याचे स्वागत केले आहे, तर सर्वसामान्य माणसांकडून त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भातील कायदा संसदेत जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत या प्रकरणी दिलेला निकाल हा राखून ठेवण्यात येत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. माझ्या मते न्यायालयाने दिलेला हा निकाल म्हणजे विकृतीला दिलेले कायद्याचे अधिष्ठान आहे. आता कायद्यामुळे समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता दिली गेली आहे, पण ते देशाच्या भावी पिढीसाठी अत्यंत अयोग्य व घातक आहे.


भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ अन्वये असे संबंध ठेवणे हा फौजदारी गुन्हा ठरविण्यात आला आहे. आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा संबंधाना मान्यता मिळणार आहे. परस्पर संमतीने सज्ञान व्यक्तींनी समलिंगी संबंध ठेवले तर तो आता गुन्हा ठरणार नाही. मात्र परस्पर संमतीखेरीज असे संबंध राखणाऱयांवर तसेच अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवणाऱयांच्या विरोधात यापुढेही या कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मुळात जी बाब अनैसर्गिक आहे, तिला कायद्याच्या चौकटीत बसविण्याची काय गरज आहे. भारतीय संस्कृतीत तर अशा गोष्टी अनैतिक, निषीद्ध मानल्या गेल्या आहेत. परदेशातून असे संबंध ठेवले जातात, तिकडे त्याला मान्यता आहे, मग आपल्याकडे का नको, असाच जर या मागे उद्देश असेल तर ते केवळ चुकीचे नाही तर भावी पिढीसाठी घातक ठरु शकेल. आज समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली तर अशा अन्य काही अनैतिक, अनैसर्गिक गोष्टींना मान्यता मिळावी, म्हणून कोणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतील. मग यापुढे अशा सर्व गोष्टींना आपण कायदेशीर मान्यता देणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


मुळात निसर्गाने किंवा परमेश्वराने मानवाला जन्माला घालताना स्त्री आणि पुरुष असा भेद करुनच पाठवले आहे. निसर्गाचे काही नियम असतात. त्यात माणसाने ढवळाढवळ केली की काय होते ते आपण सध्या ढासळते पर्यावरण, लहरी झालेला पाऊस, ग्लोबल वॉर्मिंगचा धोका, वाढते प्रदूषण आणि अन्य काही गोष्टींच्या स्वरुपात पाहतो आहोतच. स्त्री आणि पुरुषाच्या शरीर संबंधातून नवा जीव जन्माला येणे हा निसर्गाचा नियम आहे. गेली हजारो वर्षे हे चक्र सुरु आहे. त्यात कोणी कधी ढवळाढवळ केली नव्हती आणि यापुढेही ती कोणी करु नये, असे वाटते. लहान वयातून पौगंडावस्थेत आल्यानंतर भिन्नलिंगीय व्यक्तीविषयी आकर्षण वाटणे ही सहज व सुलभ भावना आहे. त्यात गैर व चुकीचे नाही. मात्र त्या वयात योग्य संस्कार आणि मार्गदर्शन मिळाले नाही तर मुले/मुली भरकटण्याची शक्यता असते. त्यासाठी त्या वयात मुलांवर योग्य संस्कार आणि मार्गदर्शन मिळण्याची गरज असते. मुलगा व मुलगी योग्य वयाचे झाल्यानंतर त्यांचा विवाह करून देऊन त्यांना शरीरसंबध ठेवण्यास एक प्रकारे समाजाने लग्न या संस्थेद्वारे मान्यता दिलेली आहे.गेली हजारो वर्षानुवर्षे हे सुरु आहे.


अर्थात आता आपल्याकडेही लग्नापूर्वी संबंध ठेवणे, शालेय वयातच सेक्सचा अनुभव घेणे यात काही चुकीचे नाही, असा एक गैरसमज वाढत चालला आहे. आपली संस्कृती विसरुन आपण परदेशातील भोगवादी, चंगळवादी संस्कृतीच्या कह्यात जात चाललो आहोत. आपले ते सर्व मागासलेले आणि टाकाऊ व इंग्लंड, अमेरिका व परदेशातील ते सर्व चांगले अशी भावना वाढीस लागली आहे आणि ते अत्यंत घातक आहे. समलिंगी संबंध हा विषय काही मुठभर मंडळी सोडली तर बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने निषीद्ध व अनैतिक आहे. या संदर्भातील मराठी वृत्तपत्रात आज ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, त्यात वापरलेल्या छायाचित्रावरुन ही बाब समाजहिताची नाही, अनैतिक आहे, हे स्पष्ट होते. कारण बहुतेक वृत्तपत्रांनी या बातमीत हातात हात घेतलेल्या दोघांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. म्हणजे हे चुकीचे असून समाजमान्य नाही, अनैतिक आहे, त्यामुळे या विषयाची छायाचित्रे छापणे, त्याला प्रसिद्धी देणे चुकीचे आहे, हे तारतम्य वृत्तपत्रांनी बाळगले आहे. म्हणजेच जी गोष्ट चुकीची आहे, अनैतिक व अनैसर्गिक आहे, ज्याला समाजाची मान्यता नाही, त्याला कायद्याच्या चौकटीत बसविण्याचा हा खटाटोप कशासाठी चालला आहे.


समलिंगी संबंध ठेवणारी आज काही मुठभर मंडळी आहेत. त्यांची एकूण टक्केवारी कमी आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या विस्फोटामुळे तसेच इंटरनेटच्या वाढत्या आक्रमणामुळे सध्या नको त्या वयातच लहान मुलांना सर्व काही कळू लागले आहे. नको त्या वयात लैगिगतेचा अनुभव घेता येतो आहे किंवा पोर्नोग्राफी साईट्स, ब्लु फिल्मच्याद्वारे सेक्सचे वेगवेगळे प्रकार पाहता येत आहेत. या सगळ्याचे अत्यंत वाईट व घातक परिणाम भावी पिढीवर, कोवळ्या वयातील मुलांवर होत आहेत. त्यात आता समलिंगी संबंधाना मिळालेल्या कायदेशीर मान्यतेने आणखी भर पडणार आहे. आत्तापर्यंत जे संबंध अनैतिक होते, तो फौजदारी गुन्हा होता, असे संबंध एक विकृती असून त्याला समाजमान्यता नाही हे माहित होते, आता ते करायला कायदेशीर मान्यता मिळाली आहे, ते चुकीचे नाही असे भावी पिढीच्या मनावर बिंबवले जाईल. त्यामुळे भविष्यात समलिंगी संबंध ठेवणाऱयांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली, तर त्यातून विचित्र सामाजिक परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे संबंध ठेवणारी जोडपी वाढली तर नवी पिढी कशी निर्माण होईल, केवळ क्षणभर आनंदासाठी आपण आपली संस्कृती, नितिमत्ता व मूल्ये विसरणार का, सगळीच जोडपी समलिंगी संबंध ठेवणारीच तयार झाली तर आणखी काही वर्षांनी देशात काय भयानक परिस्थिती निर्माण होईल, त्याचा आपण सर्वानीच गंभीरपणे विचार केला पाहिजे.

७ टिप्पण्या:

  1. नमस्कार शेखरजी,

    कसय काही लोकांना कॉफी चालते काही चहा घेणं पसंत करतात, मग कॉफी पिणारा वर्ग म्हणू शकतो का की चहा पिणं ही विकृती आहे? नाही मी मस्करी करत नाहीए, पण एखाद्याच्या शरीराची जडणघडण अशी असेल की त्याला समलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटत असेल, तर त्यात त्याचा गुन्हा काय? आणि जर अशा दोन व्यक्ती परस्परांच्या संमतीने समलैंगिक संबंध ठेवत असतील, तर त्यांचा गुन्हा काय? निसर्गानेच त्यांना तसं घडवलय त्यामुळे त्यांच्या संबंधात अनैसर्गिक असं काही नाही. कायद्याचं अभय केव्हाही स्तुत्यच आहे. तसंही विकृती ही विकृती असते ती सगळी बंधनं झुगारते कायद्याचीही. अर्थात मी समलैंगिक संबंधांना विकृती मानत नाही. त्यामागची शास्त्रीय कारणं आपण जाणून घेतली पाहिजेत. आपण सुज्ञ आहात, काही चुकलं असल्यास दुरुस्त करा.

    उत्तर द्याहटवा
  2. चहा आणि कॉफीची तुलना समलिंगी संबंधांशी होऊ शकत नाही,ही तुलनाच चुकीची आहे, असे मला वाटते. या विषयावर वाद, चर्चा आणि वेगवेगळी मत व्यक्त होणारच. मला जे वाटले ते मी लिहिले आहे. असो.
    मात्र आपण माझ्या लेखावर आवर्जून प्रतिक्रिया व्यक्त केलीत त्याबद्दल आभार.
    शेखर

    उत्तर द्याहटवा
  3. मला वाटते की तुम्ही लेख लिहिण्याआधी थोड़ी माहिती जमा करायला हवी होती. फार एकांगी लेख आहे. तुम्ही नेहेमी बरेच तर्कशुद्ध लेख लिहिता. हा लेख मात्र पूर्ण अपवाद म्हणायला लागेल.

    मी तुमच्या मताशी अजिबात सहमत नाही आहे.
    तुम्ही म्हणता तसा वादाचा मुद्दा असला तरी किमान 'संस्कृती'च्या नावाखाली सगळ्याच(चूक अथवा बरोबर) गोष्टी 'बरोबर' करता येत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे, नाही का?
    अर्थात, हे माझे मत आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. saheb, apala 100 crore loksankhyecha desh ahe.

    Gay lokanchi sankhya kiti asu shakate, hyacha andaj kara. Ani tyana criminal mhanane yogya ka te pan sanga.

    उत्तर द्याहटवा
  5. अत्यंत अपुर्‍या माहितीवर लिहिलेला लेख.
    मुळात निसर्गाने किंवा परमेश्वराने मानवाला जन्माला घालताना स्त्री आणि पुरुष असा भेद करुनच पाठवले आहे.
    हो का? केव्हा बरे सांगितले त्या निसर्गाने तुम्हाला?
    शिवाय निसर्गाने किंवा परमेश्वराने मानवाला जन्माला घालताना कपडे घातले नव्हतेच.
    म्हणून कपडे घालणे अनैसर्गिक आहे?
    पुर्वी आपल्या देशात गर्भपात, आंतरजातीय विवाह हे पण बेकायदेशीर होते.

    भारतीय संस्कृतीत तर अशा गोष्टी अनैतिक, निषीद्ध मानल्या गेल्या आहेत.
    कोठे बरे वाचलेत हे? आम्हा पामरांना संदर्भ द्याल ?
    तर सर्वसामान्य माणसांकडून त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे
    हे कशाच्या आधारावर लिहिलेत?
    वृत्तपत्रे सेक्स करणार्‍या जोडप्यांची चित्रे पण प्रसिद्ध करत नाहीत.
    म्हणून त्यावर्ही बंदी आणावी?

    उत्तर द्याहटवा
  6. one sided story , my point is even if it's unnatural government don't have right to interfere so long it's private and consensual.Moral things are best left to society to decide

    उत्तर द्याहटवा
  7. Saglyat adhi tumche khup khup abhinandan, itka changla lekh lihilyabaddal.
    mala kharach khuup durdaiva vatatay hya comments vachun.. Loka kiti bothat zhali ahet. Apan jya goshti baddal vichar hi karu shakat nahi, ashya kilasvanya goshtila manyata dili jaat ahe.. Pan me ek sangu ka.. tumhi ya article madhe lihilya pramane deshat 99 takke lok ya faltu goshtinna bhik hi ghalat nahit.. tya mule ek ashecha kiran distoy. Apli saunskruti ramachi ani krushnachi ahe. asech pavitrya kayam raho hi devakade prarthana.

    उत्तर द्याहटवा