रविवार, २८ जून, २००९

हे वय असे असले तरी...

पावसाळा सुरु झाला असून आता भटक्यांचे अर्थात ट्रेकर्स मंडळींचे पावसाळी ट्रेक सुरु झाले असतील. अस्सल ट्रेकर्सना पावसाळा म्हणजे फिरण्यासाठी पर्वणीच असते. मात्र या मंडळींबरोबरच हौशी मंडळीही खास पावसाळी पिकनिकसाठी आतुर असतात. काही सन्मान्य अपवाद वगळता पावसाळी पिकनिक म्हणजे कुठेतरी गड-किल्ल्यावर जाणे, जाता-येताना आणि जिथे मुक्काम करणार असून तेथेही यथेच्छ दारू पिणे, सिगरेट्स ओढणे, ओंगळ नृत्य करणे व गाणी म्हणणे असे समीकरण झाले आहे. शनिवारी रात्री शेवटच्या कर्जत किंवा कसारा ट्रेनला अशा काही ग्रुप्सची झलक हमखास पाहायला मिळते. अर्थात याला अपवादही आहेत व असतात. या पावसाळी किंवा पावसाळ्यानंतर थंडी सुरु होते, त्या काळात केलेल्या भटकंतीमध्ये निसर्गाचे एक नवे रुप आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण निसर्ग मुक्त हस्ताने आपल्यावर विविध रंगांची उधळण करत असतो. अपवाद वगळता काही जण मात्र तिकडे दुर्लक्षच करतात.


भावी आयुष्यातील करिअरला महत्वाची दिशा देणारी दहावीची परीक्षा संपून ही मुले कॉलेजात जाऊ लागलेली असतात. नवे मित्र व मैत्रिणी, काहीतरी नवीन करुन दाखवण्याचे थ्रील, आपण आता मोठ्ठे झालो आहोत ही मनातील सुप्त भावना, कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचे वय आणि त्यात मन धुंद करणारा पावसाळा, निसर्गाचे मनमोहक रुप यामुळे हातून काही चुकाही घडतात, घडण्याची शक्यता असते. ग्रुपचे मानसशास्त्र अगदी वेगळे असते. त्यामुळे काही जण यात वाहावतही जातात.


पावसाळी भटकंतीचा किंवा सहलीचा आनंद जरुर घ्या पण इतरांनाही तो घेऊ द्या. आपल्या वर्तनामुळे इतरांना त्याचा त्रास होत नाही ना, आपल्या हातून काही वावगे घडत नाही ना, ग्रुपमध्ये चेष्टा-मस्करी करताना राईचा पर्वत होणार नाही, याची सर्वानी खबरदारी घ्या. ज्या ठिकाणी आपण जातो आहोत, तो ग्रामीण भाग असतो. तेथे जाऊन आरडाओरड व धिंगाणा घालणे, जाताना मुलींशी छेडछाड करणे, समाजमान्य नसलेले आणि असभ्य या गटात मोडणारे वर्तन करणे टाळा. नाहीतर आखलेल्या ट्रेकची किंवा पावसाळी पिकनिकची सारी मजा जाणार नाही, त्याची काळजी घ्या. आपण कोणत्या ग्रुप बरोबर पिकनिक किंवा ट्रेकला जातो आहोत, आपल्याबरोबर कोण मित्र-मैत्रिणी आहेत, त्यांची नावे, पत्ते आणि फोन नंबर आपल्या घरीही धेऊन ठेवा. समजा काही अडचण आली तर त्याचा उपयोग होऊ शकतो. पोहता येत असले आणि नसले तरी उत्साहाच्या भरात, मित्रांनी आग्रह केला म्हणून किंवा कोणी चेष्टा केली तरी अनोळखी ठिकाणचे तलाव, नदी यात पोहायला उतरु नका. त्यात जीवाला धोका होऊ शकतो. समुद्रातही उत्साहाच्या भरात किंवा कोणावर इंप्रेशन पाडण्यासाठी खूप पुढे जाऊ नका, धबधब्याच्या ठिकाणाही उगाच धोका पत्करुन पुढे जाऊ नका.


दरवर्षी अशा पिकनिकच्या वेळी घडलेले अपघात आणि दुर्दैवी घटना आपण वृत्तपत्रातून वाचत असतो. पिकनिक किंवा ट्रेकसाठी अनोळखी मित्र किंवा ग्रुप बरोबर शक्यतो जाऊ नका. बाहेर गेल्यावर नेहमी एकत्र राहा. क्षुल्लक गोष्टींवरून भांडणे करू नका, उघड्यावरील अन्नपदार्थ, पाणी प्यायचे टाळा, आपल्या तब्येतीची काळजी घ्या. म्हणजे मग तुमची पावसाळी पिकनिक किंवा एखादा ट्रेक छान होईल. त्याला कसलेही गालबोट लागणार नाही. हे वय धड ना मोठे ना लहान असे असते. त्यामुळे स्वताची आणि आपल्या मित्र-मैत्रिणींचीही काळजी घ्या. कोणी वावगे वागत असेल तर त्याला त्यापासून पारावृत्त करा.


मला माहितेय, तुम्ही म्हणाल अहो, हे वयच मजा व धमाल करण्याचे असते. या वयात मजा केली नाही तर कधी करणार, पण मित्रांनो क्षणभराच्या मजेसाठी सर्व आयुष्य पणाला लागेल किंवा नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येईल, असे वागू नका. हे वय असे असले तरीही...

४ टिप्पण्या:

  1. मस्त! शेखर, कळत नकळत त्या वयात डोकावणं झालच. त्या वयाचंही मानसशास्त्र असतं. तेच तू या लेखनातून मांडलयस. कुणी काही म्हणेल, हे माहीत असतानादेखील तू हे लिहून, योग्य वेळी योग्य काम केलयस.- दिनेश

    उत्तर द्याहटवा
  2. दिनेश गुणे,
    नमस्कार
    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

    उत्तर द्याहटवा
  3. शेखर संपूर्णपणे सहमत आहे.ते म्हणतात ना.... Wrong time wrong place with wrong people कधीही जाऊ नये. पिकनीकला जायलाच हवे, भरपूर मजाही हवीच.... फक्त भान ठेवून. मजेचे पर्यवसन दु:खात होऊ नये.

    उत्तर द्याहटवा