शुक्रवार, ५ जून, २००९

मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण

मखासगी दूरदर्शन वाहिन्या आणि संगणक-इंटरनेटच्या आक्रमणामुळे मराठी वाचन संस्कृती कमी होत चालल्याची ओरड करण्यात येत असते. त्यात काही प्रमाणात तथ्य असले तरी निवडक मराठी साहित्य याच दूरचित्रवाहिन्यांवरून मालिकांच्या स्वरुपात सादर झाल्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचण्यास मदत झाली आहे. असेच काम आकाशवाणीनेही गेल्या काही वर्षांत केले आहे. मराठीतील निवडक साहित्याला आकाशवाणीचे कोंदण मिळाल्यामुळे अनेक चांगली मराठी पुस्तके आकाशवाणीच्या खेडोपाडी पसरलेल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचली आहेत.
आकाशवाणीच्या मुंबई आणि पुणे केंद्रावरून सध्या डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांच्या ‘ही तो ‘श्री’ची इच्छा’ या पुस्तकाचे अभिवाचन सुरू झाले आहे. अमेरिकास्थित उद्योजक-व्यावसायिक असलेले डॉ. ठाणेदार यांच्या या पुस्तकाच्या गेल्या तीन-चार वर्षांत वीसहून अधिक आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. दर बुधवारी सकाळी ७-४० वाजता त्याचे प्रसारण होत असून २७ भागात या पुस्तकाचे अभिवाचन केले जाणार आहे.
आकाशवाणीच्या मुंबई (ब) केंद्रावरून म्हणजे आत्ताच्या ‘अस्मिता’ वाहिनीवरुन गेल्या काही वर्षांपासून मराठीतील निवडक पुस्तकांच्या अभिवाचनाचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाला व्यावसायिक स्वरुप देण्याचे आणि पुस्तकांचे वाचनमहामालिका स्वरुपात सादर करण्याचे श्रेय आकाशवाणीवरील कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश केळुस्कर यांना जाते. गेल्या दहा वर्षांत त्यांनी सुमारे २५ पुस्तकांवर अभिवाचनाच्या मालिका सादर केल्या आहेत. यात धनुर्धारी (वाईकर भटजी), डॉ. नरेंद्र जाधव (आमचा बाप आणि आम्ही) गोडसे भटजी (माझा प्रवास), मधु मंगेश कर्णिक (लागेबांधे), प्रल्हाद चेंदवणकर (टाच) आणि अन्य काही पुस्तकांचा समावेश आहे.
विश्वास पाटील लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावरील ‘महानायक’ या कादंबरीच्या अभिवाचनाची महामालिका खूप गाजली. मराठी नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधील अनेक नामवंत या अभिवाचनात सहभागी झाले होते. या मालिकेचे २५५ भाग सादर झाले व या मालिकेने आकाशवाणीलाही सुमारे २५ लाख रुपयांचा महसूल मिळवून दिला होता.
आकाशवाणीवर एखाद्या पुस्तकावरील अभिवाचन सादर झाले की वाचकांमध्ये तसेच साहित्यप्रेमींमध्ये त्या पुस्तकाची चर्चा होऊन सार्वजनिक किंवा खासगी ग्रंथालयातून त्या पुस्तकाला मागणी येते, पुस्तकाची विक्री वाढते, असा अनुभव आहे. मराठी पुस्तक प्रकाशक आणि विक्रेत्यांसाठीही त्याचा चांगला उपयोग झाला असल्याचे डॉ. महेश केळुस्कर यांनी सांगितले.

1 टिप्पणी: