शुक्रवार, १२ जून, २००९

गुटख्याचा विळखा...

मोठी माणसे, महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा तरुणच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांमध्येही गुटख्याचे व्यसन वाढत चालले आहे. देशाच्या भावी पिढीलाही गुटख्याचा विळखा पडला असून ही बाब अत्यंत गंभीर व काळजी करण्यासारखी आहे. गुटखा खाणे ही आता एक फॅशन झाली असून शालेय विद्यार्थीही त्याच्या आहारी गेले आहेत. एखादा गुटखा न खाणारा विद्यार्थी हा गुटखा खाणाऱया विद्यार्थ्यांच्या चेष्टेचा विषय ठरत आहे. विविध प्रसारमध्यमे आणि डॉक्टर मंडळींकडून गुटखा व तंबाखूचे दुष्परिणाम लोकांसमोर आणूनही गुटखा खाणे कसे कमी होत नाही, याचेच आश्चर्य आहे. आत्ता तर खाऊन घेऊ व मजा करु, पुढचे पुढे पाहू काय होईल ते होईल, अशी बेदरकार प्रवृत्ती शालेय विद्यार्थी आणि तरुणांमध्ये वाढील लागल्यामुळे केवळ गुटखाच नव्हे तर सिगरेट, दारू आणि अन्य व्यसने करण्याचे प्रमाणही वाढत आहे.


गेल्या वर्षी देशात या संदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील निष्कर्ष हे धक्कादायक असून देशभरात पंधरा वर्षांखालील पन्नास लाख मुले गुटख्याच्या आहारी गेल्याचे दिसून आले होते. अन्य एका सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशमध्ये ज्या मुलांना गुटख्याचे व्यसन लागले होते, त्यापैकी १६ टक्के मुलांमध्ये तोंडाच्या कर्करोगाची सुरुवात झाल्याचे दिसून आले होते. शालेय विद्यार्थ्यांच्या या गुटख्याच्या व्यसनाबाबतची एक बातमी नुकतीच काही मराठी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यात मुंबई महापालिकेतील शांळांमधील सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना गुटख्याचे व्यसन लागले असल्याचे या बातमीत म्हटले आहे. महापालिका शाळांच्या जवळपास गुटखा विकणाऱया अनेक टपऱया असून त्या दुकानांमधून गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात मुळात अशा दुकानांना अधिकृत परवानगी कशी काय दिली गेली, जर या दुकानांना अधिकृत परवानगी नसेल, तर कोणाच्या आशीर्वादामुळे ती दुकाने सुरु आहेत, यात कोणाकोणाचे हात गुंतले आहेत, पोलीस, महापालिका अधिकारी आणि व्यापारी यांच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे गुटख्याचा विळखा आणखी फोफावत आहे.


गुटख्याच्या सेवनाचे अवेक वाईट परिणाम ते सेवन करणाऱयांवर होत असतात. अशा माणसांना तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. अशा माणसांना भूक लागत नाही, ती कमी होत जाते. शांत झोप लागत नाही, ही माणसे कोणत्याही विषयावर आपले लक्ष एकाग्र करू शकत नाहीत असे अनेक गंभीर परिणाम गुटखा खाण्याने होत असतात. हे वेळोवेळी जाहीर होते, तरीही माणसे गुटखा का खातात, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक यांच्यासमोर त्याचे वडील, मोठा भाऊ किंवा चित्रपट व दूरचित्रवाहिन्यांवरील अभिनेते यांचे आदर्श असतात. आपले काही राजकारणीही याचे सेवन उघडपणे करतात. त्याचा कळत नकळत परिणाम या मुलांवर होत असतो. त्या वयात स्वताचे चांगले वाईट कळत नसते किंवा ते कळून घ्यायची इच्छा नसते. मित्रांच्या संगतीने किंवा एकदा अनुभव घेऊन पाहू या म्हणून गुटखा, सिगरेट आणि दारू घेणे सुरु होते. कुठे थांबायचे किंवा या व्यसनांच्या किती आहारी जायचे याचे भान या मुलांना राहात नाही. त्यामुळे या व्यसनांचा विळखा त्यांच्या शरिराला पडतो. हा विळखा नंतर सुटता सुटत नाही. काही अपवाद असतात, की ते यातून बाहेर पडतात. पण अनेक लोकांच्या मानेभोवती पडलेला हा विळखा सुटता सुटत नाही आणि त्याचा फास त्यांच्याभोवतीच आवळला जातो.


या सर्व व्यसनाधीनतेला आपले राज्यकर्तेही तेवढेच जबाबदार आहेत. गुटखा, सिगरेट आणि दारू यांच्या उत्पादनापासून भले केंद्र व राज्य शासनाला कररुपाने महसूल मिळत असेल. पण त्यामुळे जर भावी पिढीची जर वाताहात होणार असेल तर असा महसूल न मिळालेला चांगला. कायदा करून किंवा अशा वस्तूंवर बंदी घालून हा प्रश्न सुटणार नाही. लोक त्यातून पळवाटा शोधून काढणारच. त्यामुळे याचे उत्पादन पूर्णपणे थाबवणे हाच त्यावरचा खरा उपाय आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि खरी तळमळ असेल तर गुटखा, सिगरेट आणि दारू यांच्या उत्पादनावर पूर्णपणे बंदी घालता येऊ शकेल. मात्र समजा भविष्यात असे झाले तर ही व्यसने कमी होतीलच याचीही खात्री देता येत नाही. कारण मग चोरून किंवा या वस्तूंची तस्करी करून त्या आपल्या येथे उपलब्ध होऊ शकतील, त्यातून आणखी नव्या समस्या निर्माण होतील. हे एक न संपणारे दुष्टचक्र आहे.


या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी किंवा गुटखा व अन्य व्यसनांच्या जाळ्यात न अडकण्यासाठी स्वताची विवेकबुद्धी जागृत ठेवणे आणि आपल्या मनाचा तोल जाऊ न देणे हेच आपल्या हातात आहे. ते प्रत्येकाने प्रामाणिकपणे करावे आणि गुटखा व अन्य व्यसनांचा फास आपल्या मानेभोवती आवळला जाणार नाही, त्याची काळजी घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा