मंगळवार, २ जून, २००९

ध्यासपंथ सामाजिक कार्याचा...

केवळ आपल्या स्वतासाठी किंवा कुटुंबासाठीच न जगता समाजासाठी जगणारी काही मंडळी आणि संस्था आपल्या समाजात काम करत आहेत. ही मंडळी आपल्या कार्याचा कोणताही गवगवा न करता आपले काम प्रामाणिकपणे करत असतात. अशा कामातून अन्य काही जणांना प्रेरणा मिळते आणि ते ही अशा सामाजिक कार्याला आपले जीवन वाहून घेतात. सध्याच्या वातावरणात आणि केवळ मी आणि माझे कुटुंब अशा मनस्थितीत असणाऱयांसाठी ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपणही काही देणे लागतो, अशी भावना वाढीस लावण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या गोष्टीत आपला कोणताही स्वार्थ नाही, ज्यातून आपला काहीही फायदा होणार नाही किंबहुना स्वताच्या पदराला खार लावून काम करावे लागते आहे (ज्या कामाला लष्कराच्या भाकऱया भाजणे) असेही काही जण उपहासाने म्हणतात, असे काम आज समाजाच्या विविध क्षेत्रात सुरु आहे. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या आणि निस्वार्थीपणे सामाजिक कार्य करणाऱया अशाच काही मंडळींचा व संस्थाचा परिचय ज्येष्ठ पत्रकार दिनेश गुणे यांनी आपल्या ध्यासपंथ या पुस्तकातून करून दिला आहे.


मुंबईत प्रभादेवी येथे पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या सभागृहात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते ध्यासपंथसह अन्य तीन पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले. माधव जोशी यांच्या परममित्र पब्लिकेशन्सने ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. मुंबई, ठाणे किंवा कोणत्याही शहरातील प्रमुख बुक डेपो/पुस्तकांच्या दुकानात हे पुस्तक मिळू शकेल. गुणे यांनी अनेक वर्षे लोकसत्ता दैनिकात पत्रकारिता केली असून सध्या ते सकाळ (मुंबई)मध्ये ज्येष्ठ वार्ताहर म्हणून काम करत आहेत. पत्रकारिता करत असताना वेगळे काहीतरी करावे, या उद्देशातून ध्यासपंथ साकार झाले आहे. विशिष्ट ध्येयाने किंवा ध्यासाने कोणताही स्वार्थ नसताना केवळ समाजासाठी आपले आयुष्य वाहून घेणाऱया माणसांचा परिचय संपूर्ण समाजाला व्हावा, त्याचे हे सामाजिक काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे, हे काम पाहून, पुस्तक वाचून त्यातून कोणी प्रेरणा घ्यावी आणि अशा प्रकारचे काम आपणही करावे, असे वाटावे, हा उद्देश या पुस्तक लेखनामागे असल्याचे गुणे यांनी सांगितले.


समाजासाठी झटणाऱया आणि समाजासाठी आपले सर्वस्व वाहून काम करणाऱया व्यक्ती व त्यांच्या सामाजिक कामांची गाथा म्हणजे ध्यासपंथ पुस्तक आहे. आयुष्यात एखाद्या चांगल्या गोष्टीचा ध्यास घेऊन काम करणाऱया माणसांचे हे पुस्तक असून पुस्तकांची भाषा साधी व सोपी आहे. या पुस्तकातून सामाजिक जीवन आणि त्यावरील लेखकाचे भाष्य/चिंतन प्रकट होते. प्रत्येक संवेदेनक्षम माणसाने हे पुस्तक जरुर वाचावे. प्रत्येक माणूस हा आपल्यापुरता किंवा कुटुंबापुरा जगत असतो. मात्र काही माणसे ही समाजासाठी जगतात व समाजासाठीच आपले आयुष्य खर्ची घालतात. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी जगणाऱया अशा ध्येयवादी व्यक्तींचे चित्रण या ध्यासपंथ पुस्तकात केले असल्याचे गौरवोद्गार मनोहर जोशी यांनी पुस्तक प्रकाशनानंतर बोलताना काढले. हे पुस्तक म्हणजे नवरत्नांचा हार असून पुस्तक वाचून आपल्यापैकी प्रत्येकाने प्रेरणा घेऊन स्वताला किमान एका तरी कोणत्याही सामाजिक कामात गुंतवून घ्यावे, असे आवाहनही जोशी यांनी या वेळी केले.


फासेपारध्यांसाठी आपले आयुष्य वाहून घेणारे गिरीश प्रभूणे, कोकणातील खेड्यांमध्ये राहून आपला वैद्यकीय व्यवसाय करणारे आणि त्याच बरोबर या मंडळींच्या जगण्याला नवा अर्थ देणारे, त्यांना आम्ही शेती हा व्यवसाय करतो, हे अभिमानाने सांगायला लावणारे डॉ. प्रसाद देवधर, सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात पर्यावरण, निसर्ग याबद्दल समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी झटणारे पर्यावरण दक्षता मंचचे विद्याधर वालावलकर, कुष्ठरुग्णांसाठी काम करणारे संजय कांबळे, घऱून पळून येऊन किंवा कधी अन्य काही कारणांमुळे रस्त्यावर किंवा रेल्वेस्थानकांवर आयुष्य काढणाऱया मुलांना पुन्हा त्यांच्या घरच्यांच्या हवाली करून त्यांना घरी पाठविण्याचे मोलाचे काम करणारे विजय जाधव तसेच अन्य मंडळींचा आणि त्यांच्या कामाचा परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे.


गिरीश प्रभूणे यांचे काम आता बऱयापैकी समाजाला माहिती झाले आहे. मात्र पुस्तकातील जी अन्य मंडळी आहेत, ती आणि त्यांचे काम समाजाला अपरिचित आहे. ही मंडळी व त्यांचे काम माहिती असेल तर ते त्यांच्या जिल्ह्यापुरते किंवा गावापुरतेच मर्यादित होते. मात्र गुणे यांनी लिहिलेल्या ध्यासपंथमुळे या सर्वांचे काम समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यास मोलाची मदत होणार आहे. सध्याच्या सवंग आणि पेजथ्री कल्चर पत्रकारितेच्या काळात समाजासाठी आपले सर्वस्व वाहून घेतलेल्या अशा ध्येयवादी व्यक्तींचा परिचय करून देण्याचे महत्वाचे काम गुणे यांनी केले आहे. तसेच अशा वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्याचे धाडसही परममित्र पब्लिकेशन्सचे माधव जोशी यांनी केले आहे. त्याबद्दल या दोघांचेही मनापासून अभिनंदन. या व्यक्ती किंवा संस्थांप्रमाणेच समाजात आज इतरही अनेक मंडळी व संस्था अशा आहेत, की ते आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांच्या कामालाही प्रसिद्धी मिळणे आवश्यक आहे. गुणे यांनी अशा व्यक्ती व संस्थांचा शोध घेऊन ध्यासपंथ-भाग दोन, तीन, चार लिहावेत आणि माधव जोशी यांनी ते प्रकाशित करावेत.


सध्याच्या स्वार्थी समाजात आणि मी अमूक काम केले तर त्यातून माझा फायदा काय, अशी वृत्ती असणाऱया समाजासाठी ध्यासपंथसारखी पुस्तके दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरणार आहेत. सध्याच्या वातावरणात त्याचीच खरी आवश्यकता आहे...


दिनेश गुणे यांचा संपर्क- ९८७०३३९१०१

परममित्र पब्लिकेशन्स (माधव जोशी) यांचा संपर्क-३०९७५४९६
ई-मेल param_mitra@yahoo.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा