रविवार, ७ जून, २००९

मुंबईतही विजा कोसळण्याची शक्यता

पावसाळ्यात दरवर्षी किंवा मान्सूनपूर्व पावसात महाराष्ट्राच्या अनेक भागात दरवर्षी विजा कोसळतात आणि त्यात अनेकांचा मृत्यूही होतो. मुंबई मात्र विजा कोसळण्याच्या घटना दुर्मिळ! पण आता मुंबईकरांनाही बेसावध राहून चालणार नाही, कारण वातावरणातील बदलांमुळे मुंबईतही विजा कोसळण्याच्या घटना वाढण्याची शक्यता आहे.


लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तच्या ५ जून २००९ च्या अंकामध्ये अभिजीत घोरपडे यांनी ही बातमी दिली आहे. त्यात त्यांनी वेधशाळा आणि काही शास्त्रज्ञांचा हवाला देऊन मुंबईतही विजा कोसळण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. मुंबईतही मान्सूनच्या काळात धो-धो पाऊस पडतो. तरीसुद्धा येथील वेगळेपण म्हणजे विजा कोसळण्याच्या घटना क्वचितच घडतात. त्यामुळेच तीन वर्षांपूर्वी गिरगाव चौपाटीवर वीज कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तेंव्हा या प्रकाराची बरीच चर्चा झाली होती. अलीकडच्या काळात वातावरणातील बदलांमुळे पावसाची वैशिष्टय़ेसुद्धा कमालीची बदलत असून त्यापैकी एक बाब म्हणजे विजा कोसळण्याच्या संख्येत वाढ होण्याचा धोका! त्यामागे तसे हवामानशास्त्रीय कारणही असल्याचेही घोरपडे यांनी या बातमीत म्हटले आहे.



मुंबईच्या तापमानात गेल्या शंभर वर्षांमध्ये दीड अंश सेल्सिअसहून अधिक वाढ झाल्याचे कुलाबा वेधशाळेने अभ्यासाद्वारे जाहीर केले आहे. ही वाढ पृष्ठभागाप्रमाणेच वातावरणाच्या विविध थरांमध्येही दिसते. त्यामुळे आता पूर्वीच्या तुलनेत जास्त उंचीपर्यंत वातावरण उबदार बनले आहे. परिणामी ढग जास्त जाडीचे असणे आणि ते अधिक उंचीवर जाण्याची शक्यता वाढली आहे. ढग जास्त उंचीपर्यंत पोहोचू शकले, तर ढगातील पाण्याचे थेंब व बर्फाचे सूक्ष्म कण यांच्या घर्षणाचे प्रमाणही वाढते. परिणामी, ढगांचा गडगडाट व विजा चमकण्याचे प्रमाण वाढते. मग कोसळणाऱ्या विजांची संख्यासुद्धा वाढते. मुंबईत गेल्या काही दशकांमध्ये किती उंचीवर ढग निर्माण झाले किंवा किती विजा चमकल्या याच्या नोंदी उपलब्ध नाहीत. पण गेल्या २०-२५ वर्षांमध्ये तापमानवाढीचा वेग वाढला आहे. त्यावरून मुंबईत भविष्यात विजा कोसळण्याच्या घटना वाढण्याची भीती हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली असल्याचे या बातमीत म्हटले आहे.



ढगांची जाडी जास्त विजांबरोबरच एकाच वेळी मोठा पाऊस पडण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे मुंबईत पाण्याचा निचरा न होण्याची समस्या तीव्र बनण्याचाही धोका आहे. या सर्व बदलांच्या मुळाशी असलेली तापमानवाढ होण्यास मुंबईतील पर्यावरणाची ढासळलेली स्थिती कारणीभूत असल्याचेही या बातमीत म्हटले आहे.


असे जर असेल तर सर्व मुंबईकरांनी जागरुक राहिले पाहिजे. २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पाऊस म्हटला की सर्वसामान्य मुंबईकरांच्या मनात धडकीच भरते. त्यात आता वेधशाळेने आणि हवामान तज्ज्ञांनी मुंबईत विजा कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत मोठमोठे गगनचुंबी टॉवर्स असून त्या ठिकाणी वीज प्रतिबंधक व वीजरोधक उपाययोजना केलेली असते. मात्र जुन्या चाळी, इमारती आदी ठिकाणी अशा प्रकारची व्यवस्था केलेली नसते. अशा मंडळींना आपल्या नशिबावर आणि दैवावरच हवाला ठेवावा लागणार आहे. अर्थात या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. विकासाच्या नावाखाली आपण पर्यावरणाची जी काही वाट लावली आहे, त्याचीच फळे आज आपण भोगत आहोत आणि आपल्या पुढील पिढ्यांनाही ती भोगावी लागणार आहेत.

२ टिप्पण्या: