गुरुवार, १८ जून, २००९

शब्दकोश रामदास स्वामी यांच्या साहित्यातील शब्दांचा

महाराष्ट्राच्या संतपरंपरेत समर्थ रामदास स्वामी यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. बहुतेक संतांनी विठ्ठलाची तर रामदास स्वामी यांनी श्रीराम आणि मारुतीची उपासना जनमानसात रुजवली. केवळ उपासनेवर भर न देता त्यांनी त्याच्याबरोबरच बलोपासनेवर मोठा भर दिला होता. रामदास स्वामी यांनी विपूल ग्रंथलेखन केले. यात मनाचेश्लोक, दासबोध, करुणाष्टके आणि अन्य लेखनाचा समावेश आहे. त्यांनी केलेले लेखन हे आजच्या काळातही मार्गदर्शक व प्रेरणा देणारे आहे. समर्थांच्या या समग्र साहित्यातील शब्दांचा कोश नुकताच प्रकाशित झाला आहे. या कोशात रामदास स्वामी यांच्या साहित्यातील तब्बल अठरा हजार शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. रामभाऊ नगरकर व डॉ. मुकुंद कानडे या दोघा ज्येष्ठ तरुणांनी हे काम केले आहे. त्यांची वये अनुक्रमे ७६ व ७८ अशी असून या वयातही उत्साहाने आणि जिद्दीने कोशाचे काम त्यांनी पूर्णत्वाला नेले. हा शब्दकोश नुकताच प्रकाशित झाला आहे.


हा शब्दकोश दासबोध वगळून समर्थ रामदास स्वामी यांच्या समग्र साहित्यातील शब्दांचा असून वाचन, संशोधन, मेहनत आणि अन्य संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून नगरकर व डॉ. कानडे यांनी हा कोश संपादित व संकलित केला आहे. या अगोदर नगरकर व कानडे यांनी संत एकनाथ, नामदेव यांच्यावरील कोश तयार केले आहेत.


समर्थ रामदास स्वामी यांच्या समग्र साहित्यातील या कोशात रामदास स्वामी यांच्या साहित्यातील एकही शब्द वगळला गेला नसल्याचा दावा नगरकर यांनी केला. साहित्यातील प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ आणि व्याकरण, शब्दाचा संदर्भ, एकाच शब्दाचे असणारे वेगवेगळे अर्थ, रामदास स्वामी यांच्या साहित्यातील कठीण व समजण्यास अवघड असलेले शब्द व त्यांचा उलगडलेला अर्थही यात देण्यात आला आहे. शब्दकोश तयार करण्यासाठी शंकर देव, ल. रा. पांगारकर, अ. चिं. भट, शं. ना. जोशी आदींच्या ग्रंथांची संदर्भ म्हणून मदत घेण्यात आली आहे.


समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या साहित्यातून अनेक नवीन शब्द दिले असून त्यातील अनेक शब्द आजही प्रचलित आहेत. पण ते रामदास स्वामी यांनी दिलेले आहेत, हे आपल्याला माहिती नसते. असे अनेक शब्द आम्ही या कोशात दिले आहेत. लोकमान्य हा शब्द आज आपण सर्रास वापरतो, तो रामदास स्वामी यांचा आहे. हा शब्दकोश ५१२ पानांचा असून तो आम्ही दोघांनी प्रकाशित केला असल्याचे नगरकर यांनी सांगितले.


रामदास स्वामी यांच्या साहित्याचे अभ्यासक, मराठी विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी व साहित्यप्रेमी, धार्मिक साहित्यात रुची असणारे वाचक यांच्यासाठी हा शब्दकोश म्हणजे अमूल्य असा संदर्भ ठेवा आहे. नगरकर आणि कानडे यांनी वयाच्या या टप्प्यात केलेले हे काम सर्वानाच प्रेरणादायी आहे.


रामभाऊ नगरकर यांचा संपर्क दूरध्वनी ०२०-२४४९००७७

1 टिप्पणी: