सोमवार, ८ जून, २००९

सत्ता आणि संपत्तीचा माज

सत्ता आणि संपत्तीचा माज चढला की काय घडू शकते आणि माणूस कोणत्या थरला जाऊ शकतो, याची उदाहरणे आपल्या भारतीय समाजाला काही नवीन नाहीत. राजकारणात आल्यानंतर कधी पायरी-पायरीने वर चढताना आपल्याला हवे ते पद व प्रतिष्ठा मिळविण्यासाठीही काय काय करावे लागते, ते आपल्यासारख्या सर्वसामान्यांसाठी कल्पनेच्या पलिकडले असते. सत्तेची आणि संपत्तीची धुंदी माणसाला छडली की तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले खासदार व माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे त्याचेच ठळक उदाहरण आहे.


पवनराजे हे पद्मसिंह यांचे चुलत भाऊ होते. गेली अनेक वर्षे त्यांनी पद्मसिंह यांना साथ दिली. परंतू काही कारणाने पद्मसिंह यांचे पवनराजे यांच्याबरोबरचे संबंध बिघडले आणि त्यांनी स्वताच्या चुलत भावाच्या हत्येची सुपारी दिली, असे सीबीआयच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. अगोदर चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या पाटील यांना सीबीआयने अटक केली आता त्यांना १४ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्यात येणार आहे. पवनराजे आणि त्यांचा चालक असा दुहेरी खुनाचा आरोप पद्मसिंह यांच्यावर आहे. अटक करण्यात आल्यानंतर नेहमीप्रमाणे पद्मसिंह पाटील यांनी छातीत दुखत असल्याची व रक्तदाब वाढल्याची तक्रार केली. त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकती ठिक असल्याचे सांगण्यात आल्यानंतर सीबीआयने पुढील कारवाई केली.


या प्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी नगरसेवक मोहन शुक्ल यालाही पूर्वीच अटक करण्यात आली आहे. हे महाशय ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात दाखल झाले होते. त्यांच्या उमेदवारीला काही स्थानिक भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील अनेकांचा विरोध होता. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून संघपरिवारातीलच उमेदवार उभा करण्यात आला होता. मात्र तरीही भाजपने त्यांना उमेदवारी दिली. विशेष बाब म्हणजे शुक्ल यांची मुलगी ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची नगरसेविका आहे. आता या प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर भाजपवर मतदारांची माफी मागण्याची आणि शुक्ल याची पक्षातून हकालपट्टी करण्याची वेळ आली.


स्वतला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱया एका बड्या नेत्याच्या कारकिर्दीतच राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीच्या राजकारणाला सुरुवात झाली. कुख्यात दाऊद इब्राहिमच्या गुंडांना याच नेत्याने आपल्याबरोबर विमानातून नेले होते. उल्हासनगर, वसई आदी ठिकाणच्या तथाकथित राजकारण्यांना (भाई मंडळींना) या नेत्यानेच राजाश्रय आणि लोकाश्रय मिळवून दिला होता. पंतप्रधान पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या या नेत्याच्या पक्षाला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दोन आकडी खासदारांची संख्याही गाठता आलेली नाही. मतदारांनी त्यांना व त्यांच्या पक्षाला झिडकारलेच आता तर पद्मसिंह यांच्या या प्रकरणाने या नेत्याची व पक्षाची पुरती नाचक्की झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या प्रकरणाचा मोठा फटका पक्षाला बसू शकतो. खरे तर सीबीआय चौकशीत पद्मसिंह यांचे नाव आल्यानंतर आणि सीबीआयने त्यांना अटक केल्यानंतर पक्षप्रमुख म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी करयाला हवी होती. तसेच खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते. तसे झाले असते तर जनाची नाही पण मनाची तरी चाड या राष्ट्रवादी नेत्याला आहे, असे लोकांना दिसून आले असते.


सध्याचे राजकारण हे अत्यंत वाईट आणि खालच्या पातळीवर उतरलेले आहे. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल, आत्ता आहे, त्यापेक्षा मोठे पद मिळवायचे असेल, तर बरे-वाईट सर्व काही करावे लागते. गेंड्याची कातडी आणि निर्लज्जपणा अंगी आणावा लागतो, धडधडीत खोटे बोलता यावे लागते, या हाताची थुंकी, त्या हातावर झेलता येणे आवश्यक असते, हुजरेगिरी, लाळघोटेपणा, सत्ता व संपत्तीचा माज असावा लागतो, हे सर्व गुण की दुर्गुण जर तुमच्याकडे असतील, तरच तुम्ही यशस्वी राजकारणी होऊ शकता, असे चित्र सध्याच्या राजकाऱणाचे आहे. हे आपल्या सारख्या सर्वसामान्यांच्या आकलनापलिकडचे आहे. म्हणूनच सुशिक्षित, अभ्यासू अशी मंडळी राजकारणात येत नाहीत. आणि आली तर त्यांनाही यशस्वी व्हायचे असेल तर भल्या-बुऱया मार्गाचा अवलंब करावाच लागतो. आणि तसे केले नाही तर ही मंडळी मागे पडतात.


पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने अटक करण्यापूर्वी पवनराजे हत्या प्रकरणाचा तपास राज्य पोलिसांकडे होता. त्यावेळी राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गृहमंत्री होता. पद्मसिंह पाटील हेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे. त्यामुळे जाणूनबुजून या प्रकरणाचा तपास करण्यात हलगर्जीपणा झाला, अशी शंका घेण्यास नक्कीच वाव आहे. स्वतला स्वच्छ प्रतिमेचा म्हणवणाऱया राष्ट्रवादीच्या त्या गृहमंत्र्याने याचा तपास खऱोखर केला की केवळ धुळफेक केली. की राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा त्यांच्यावर काही दबाव होता, त्या नेत्याच्या दबावामुळे तपास झाला नाही, असेही अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहेत.


या प्रकरणी आता पद्मसिंह पाटील यांना अटक झाली आहे, पण त्यांना खरोखरच शिक्षा होईल का, की सीबीआयवरही दबाव येऊन त्यांची सुटका होईल, सबळ पुरा्व्याअभावी पद्मसिंह निर्दोष सुटतील का, मुळात त्यांना शिक्षा झाली तर ती कठोर असेल का, असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येत आहेत. काही असो, इथल्या न्याय व्यवस्थेतून ते सुटले तरी परमेश्वराच्या न्याय व्यवस्थेतून ते नक्कीच सुटणार नाहीत. कधी ना कधी त्याची शिक्षा त्यांना मिळेलच या ना त्या स्वरुपात, असे सामान्य लोकांना वाटत आहे...

३ टिप्पण्या:

  1. .त्यांना काहिही होणार नाही. आधी सेशन कोर्ट, मग हाय कोर्ट मग सुप्रिम कोर्ट.. त्यांचं आजचं वय पहाता, ही सगळी कोर्टबाजी त्यांच्या जिवनात पुर्ण होणार नाही याची मला खात्री आहे. तो एक सुखराम होता ना.. त्याच्या घरामधे करोडो रुपये सापडले होते, त्याचं काय झालं पुढे? त्याने सरळ पक्ष बदलला.. भाजप वासी झाला होता तो,भाजपाने पण त्याला पुर्ण सपोर्ट केला होता तेंव्हा. नंतर कॉंग्रेस सत्तेमधे आल्यावर पुन्हा कॉंग्रेसला गेला .

    उत्तर द्याहटवा
  2. बाय द वे तुमचा लेख खुपच सडेतोड आहे. आवडला, हे लिहायचं राहुनचं गेलं म्हणुन पुन्हा कॉमेंट टाकतोय. महेंद्र

    उत्तर द्याहटवा
  3. महेंद्र यांना,
    नमस्कार
    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
    शेखर

    उत्तर द्याहटवा