शुक्रवार, १९ जून, २००९

तुकोबांचा अभंग आणि तीन माकडांची गोष्ट

महात्मा गांधी यांच्या तीन माकडांची गोष्ट सर्वाना माहिती आहे. या तीन माकडांपैकी एकाने आपल्या कानावर, एकाने डोळ्यांवर तर एकाने तोंडावर हात ठेवलेला आहे. वाईट ऐकू नका, पाहू नका आणि बोलू नका, असा संदेश ती आपल्याला देतात. महात्मा गांधी यांच्या तीन माकडांच्या या गोष्टीचे मूळ कदाचित संत तुकाराम यांच्या एका अभंगात दडलेले असावे, असे अभ्यासकांना वाटते. तुकोबांच्या अभंगावरून महत्माजींना स्फुरली तीन माकडांची गोष्ट अशी शेखर जोशी यांची बातमी लोकसत्ताच्या (१७ जून २००९) च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाली आहे.



महात्मा गांधी १५ ते २८ ऑक्टोबर १९३० या कालावधीत पुण्यातील येरवडा कारागृहात होते. कारागृहातील या कालावधीत त्यांनी तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांपैकी निवडक १६ अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला होता. या अनुवादित अभंगांमध्ये,

पापाची वासना नको दावू डोळा

त्याहूनी आंधळा बराच मी

निंदेचे श्रवण नको माझे कानी

बधीर करोनी ठेवी देवा

अपवित्र वाणी नको माझ्या मुखा

त्याहूनी मुका बराच मी

नको मज कधी परस्त्रीसंगती

जनातून माती उठता भली

तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा

तू ऐक गोपाळा आवडीसी

हा अभंगही असून तो महात्मा गांधी यांचा आवडता होता. त्यामुळे तीन माकडांच्या गोष्टीची प्रेरणा गांधीजींना या अभंगापासून मिळाली असावी, असे जाणकार व अभ्यासकांना वाटते. एका प्रार्थनासभेच्या प्रसंगी महात्मा गांधी यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना अभंग म्हणण्याची विनंती केली होती. त्यावेळी खेर यांनी गांधीजींना आवडणारा हाच अभंग म्हटला होता, अशी आठवण ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे समन्वयक दिलीप धोंडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितली, असल्याचे या बातमीत म्हटले आहे.


संत तुकाराम महाराज यांची ‘अभंगगाथा’www.tukaram.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठीबरोबरच अन्य भारतीय प्रादेशिक भाषेत तसेच इंग्रजीसह अन्य परदेशी भाषांमध्ये जगभरात गेली आहे. महाराष्ट्रातील आठवीच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ‘बालभारती’च्या इंग्रजी पुस्तकात तुकोबांचे निवडक अभंग अभ्यासाकरिता देण्यात आले असून ते महात्मा गांधी यांनी अनुवादित केलेले आहेत. यंदाच्या वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीचे हे नवे पाठय़पुस्तक तयार करण्यात आले आहे.


येरवडा कारागृहात असताना महात्मा गांधी यांनी ज्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला, त्यात जे का रंजले गांजले, पापाची वासना नको दावू डोळा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, न कळता काय करावा उपाय, मुक्तीपांग नाही विष्णुचिया दासा, काय वाणू आता न पुरे हे वाणी, नाही संतपण मिळते हे हाटी, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, वेद अनंत बोलिला, आणिक दुसरे मज नाही आता, न मिळो कावया न वाढो संतान, महारासी सिवे, कोपे ब्राह्मण तो नव्हे, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा, शेवटची विनवणी, संतजन परिसावी, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा आदी अभंगांचा समावेश आहे.


या १६ अभंगांपैकी पाच अभंग इंग्रजीच्या या पाठय़पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासायला देण्यात आले आहेत. यात जे का रंजले गाजले, जेथे जातो तेथे, पुण्य पर उपकार, नाही संतपण मिळत हे हाटी आणि हेची दान देगा देवा आदी अभंगांचा समावेश करण्यात आला आहे. ‘पापाची वासना नको दावू डोळा’ हा अभंग मात्र या पुस्तकात नसल्याचे या बातमीत म्हटले आहे.

1 टिप्पणी: