सोमवार, २ मार्च, २००९

लंडन जोशी


परदेश प्रवास ही काही आता नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. परंतू ८० वर्षांपूर्वी तशी स्थिती नव्हती. परदेशात जाण्याची संधी त्याकाळी प्राप्त होत असे ती तथाकथित उच्चभ्रू वर्गातील मंडळींना किंवा तत्कालिन मायबाप सरकारच्या आशीर्वादाने उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱयांना. एखाद्या डोंबिवलीकराला परदेशवारीची संधी मिळावी, असा तो काळही नव्हता. तशी डोंबिवलीची सामाजिक परिस्थितही नव्हती. आज मोठ्या संख्येने अनेक डोंबिवलीकर व्यवसाय,नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने परदेशीवारी करत आहेत किंवा तेथेच राहात आहेत. परंतू १९२९ मध्ये ही संधी माझे आजोबा वामन दिनकर जोशी यांना मिळाली. आजोबा त्यावेळच्या जीआयपी रेल्वेत म्हणजे आत्ताच्या मध्य रेल्वेत गार्ड म्हणून नोकरी करत होते. आजोबांना ब्रिज, बुद्धिबळ, टेनिस आणि क्रिकटे आदी खेळांची आवड होती. रेल्वेच्याच फर्स्ट एड (अॅब्युलन्स)मध्येही आजोबा रस घेत आणि आठवड्यातून दोन वेळा होणाऱया परेड्सनाही ते उपस्थित राहात.ब्रिटिशांच्या त्या काळात आजोबांनी कठोर चाचणी परीक्षाही दिल्या. आणि त्या अनुभवातून आजोबांची १९२९ मध्ये लंडन येथील अॅरोपार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड स्काऊट जांबोरीसाठी निवड करण्यात आली. संपूर्ण भारतातून ज्या २० ते २५ जणांची निवड करण्यात आली त्यात माझे आजोबा होते.
या जागतिक जांबोरीला जाण्यासाठी २२ मे १९२९ या दिवशी त्यांनी मुंबई-लाहोर बोटीने गेट लंडनसाठी प्रयाण केले. ३१ जुलै ते १३ ऑगस्ट असा पंधरा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता. या जागतिक स्काऊट जांबोरीसाठी ३५ देशांमधील ३० हजार स्काऊट्स आणि दहा हजार ब्रिटीश स्काऊट्स उपस्थित होते. लॉर्ड रॉबर्ट बेडन पॉवेल ड्यूक ऑफ कॅनॉर, प्रिन्स ऑफ वेल्स यांचीही उपस्थिती होती. आजोबा आणि त्यांच्या सहकाऱांनी तेथे लेझीम, दांपंट्टा आणि कसरतीची विविध प्रात्यक्षिके सादर केली आणि उपस्थितांची मने जिंकली.
बोटीच्या प्रवासात सी सिकनेस घालविण्यासाठी स्कॉच/दारू प्यावी लागे. अत्यंत कडाक्याच्या थंडीत त्याची गरजही भासे. परंतू आजोबांनी स्कॉच किंवा दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. दारूच्या थेंबालाही न शिवलेला असा हा चित्पावन ब्राह्मण आहे, असे ते अभिमानाने सांगत असत. लंडनच्या जागतिक स्काऊट जांबोरीहून परत आल्यानंतर डोंबिवलीतील सन्मित्र मंडळाने त्यांचा सत्कार करण्यात येऊन लंडन जोशी म्हणून त्यांना गौरिवण्यात आले. त्या काळात परदेशी जाऊन आलेले पहिले डोंबिवलीकर म्हणजे माझे आजोबा. आज इतक्या वर्षानंतरही जुने डोंबिवलीकर त्यांचा उल्लेख लंडन जोशी असाच करतात.आम्हा सर्व नातवंडानाही लंडन जोश्यांचे नातू म्हणून ओळखले जाते. आजोबांनी डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान, ब्राह्मण सभा, डोंबिवली घरमालक संघ आदी संस्थांमधून काम केले.त्याच्या सामाजिक कामाचा हा वारसा माझ्या वडिलांसह माझे चार काका पुढे चालवत आहेत.
आजोबांचे वास्तव्य बरीच वर्षे डोंबिवली पश्चिमेला नवरे कंपाऊंड येथे होते. पुढे १९६६ मध्ये डोंबिवली पूर्वेला रामनगर परिसरात शिवमंदिर पथावर त्यांनी आपली स्वतची वास्तू बांधली. नवरे कंपाऊंडमध्ये काका गणपुले यांच्या बरोबर समाजोपयोगी कामातहीते सहभागी असायचे. डोंबिवलीत त्याकाळी दरोडेखोरांची खूप भीती होती. एकदा आजोबा दरोडेखोरांच्या तावडीत सापडले. परंतू सुदैवाने त्यांची सुटका झाली. भगवान श्री शंकराच्या कृपा आणि उपासनेममुळेच आपण यातून वाचलो, असे ते मानत असत. त्यामुळे पुढे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी नेमाने दररोज ओम नम शिवाय हा जप लिहिला. त्यांच्या जपाच्या अनेक वहया तयार झाल्या होत्या. त्यांचे काय करायचे असा प्रश्न समोर उभा राहिला. डोंबिवलीच्या टिळकनगर परिसरातील दिवंगत काणेबुवांनी सुचविल्यानुसार टिटवाळा येथील विठ्ठल मंदिराच्या पायात आजोबांच्या जपाच्या सर्व वहया ठेवण्यात आल्या आहेत.
आजोबांचा जन्म २ ऑक्टोबर १८९९ मधला. दोन-चार दिवस ताप आल्याचे निमित्त होऊन २४ जुलै १९८८ मध्ये ते गेले. मात्र शेवटपर्यंत ते हिंडते-फिरते होते. त्यांना कसलाही आजार किंवा त्रास नव्हता. आजोबा दररोज सकाळी घराजवळील आफळे राम मंदिरात जात असत. धोतर, सदरा, डोक्यावर टोपी आणि कपाळाला लावलेले उभे लाल गंध अशी त्यांची मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असे. परदेशप्रवास केलेले पहिले डोंबिवलीकर म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही आजोबांची दखल घेतली. माजी नगरसेवक प्रकाश भूर्के यांच्या प्रयत्नातून शिवमंदिर पथावर आमची शिवकृपा वास्तू ज्या चौकात आहे, त्या चौकाला आजोबांचे (वामन दिनकर जोशी चौक) नाव देण्यात आले असून आम्हा सर्व जोशी कुटुंबीयांसाठी ती अभिमानाची बाब आहे...

२ टिप्पण्या: