शनिवार, ७ मार्च, २००९

...मद्यसम्राट कामासी आला

स्लमडॉग मिलिऑनर या चित्रपटातील जय हो या गाण्याचे हक्क नुकतेच केंद्र शासनाने विकत घेतले. आता या गाण्याचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्र शासनातील कॉग्रेस आघाडी सरकारकडून वापर केला जाणार आहे. राष्टपिता महात्मा गांधी यांच्या लिलावातील वस्तू भारताकडेच राहिल्याने पुन्हा एकदा आपलीच टिमकी वाजवत जय हो चा नारा द्यायला आता हरकत नाही. ज्या कॉंग्रेसने वर्षानुवर्षे महात्मा गांधी यांचे नाव घेत राजकारण केले, त्यांच्या नावावर मतांचा जोगवा मागितला आणि आपले व आपल्या काही पिढ्यांचे भले करून घेतले त्या कॉंग्रेसच्या एकाही नेत्याला, पुढाऱयाला किंवा केंद्र शासनातील मंत्र्यांना गांधीजींच्या लिलावात काढण्यात आलेल्या वस्तू विकत घेण्यासाठी स्वतच्या तर नव्हेच परंतू केंद्र शासनाच्या तिजोरीतूनही पैसा खर्च करावासा वाटला नाही, ही शरमेची बाब आहे. ज्या गांधीजींनी आयुष्यभर मद्य आणि मद्यपानाला तसेच व्यापारीकरणाला विरोध केला त्याच महात्मा गांधी यांच्या या वस्तूरुपी आठवणींचा ठेवा जपण्यासाठी अखेर एक मद्यसम्राटच कामी आला ही दर्देवाची गोष्ट आहे.
महात्मा गांधी यांच्या वस्तूंचा लिलाव न होता त्या वस्तू भारताकडेच परत याव्यात म्हणून केंद्र सरकारने प्रयत्न केले परंतु अखेर शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये त्याचा लिलाव झाला. भारताचा ठेवा असलेल्या या वस्तू परदेशी व्यक्तींकडे जाऊ नयेत म्हणून उद्योगपती आणि मद्यसम्राट विजय मल्ल्या हे भारताच्या कामी आले. त्यांनी सुमारे दहा कोटी रुपये मोजून या वस्तू लिलावात विकत घेतल्या. त्यामुळे आता या वस्तू पुन्हा भारतात परत येतील. आता या प्रकरणी केंद्र सरकार आणि मल्ल्या यांच्याकडून परस्पर विरोधी दावे करण्यात येत आहेत. केंद्र शासनाला थेट लिलावात सहभागी होता येत नसल्याने मल्ल्या यांच्यामार्फत केंद्र शासनाने त्या परत मिळविण्याचा प्रयत्न केला असे केंद्रीय सांस्कृतिकमंत्री अंबिका सोनी यांचे म्हणणे तर या प्रकरणी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही, असा मल्ल्या यांचा दावा. लिलावात विकत घेतलेल्या वस्तूंमध्ये गांधीजींचा चष्मा, घड्याळ, चपला, ताट आणि वाटी यांचा समावेश आहे. लॉस अंजलिस येथील माहितीपण निर्माते जेम्स ओटीस यांनी हा लिलाव मांडला होता. मुळात गांधीजींच्या या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच कशा, असा साधा प्रश्न सर्वसामान्य भारतीयांच्या मनात निर्माण झाला आहे. बरे गांधीजींचे वारस किंवा त्यांच्या कुटूंबियांना त्या वस्तू योग्य प्रकारे जतन करता आल्या नसतील असे गृहीत धरले तरी त्या भारतातून परदेशात कशा गेल्या, त्या अधिकृत की अनधिकृतपणे नेण्यात आल्या, त्या वेळी केंद्र शासनाचे सांस्कृतिक खाते, पुरातत्व विभाग, विमानतळावरील अधिकारी आणि अन्य संबंधित यंत्रणा काय करत होत्या,याची उत्तरे कोण देणार आहे. जेव्हा या वस्तूंचा लिलाव थांबवणे केंद्र शासनाला शक्य झाले नाही तेव्हा शासनाकडून त्या विकत घेण्यासाठी काय प्रयत्न केले गेले ते भारतातील नागरिकांच्या समोर आले पाहिजे.
या वस्तू विकत घेण्यासाठी जर मल्ल्या पुढे येऊ शकतात तर केंद्र शासनातील कॉंग्रेसचा मंत्री किंवा कॉंग्रेसचे वजनदार राजकीय नेते का पुढे आले नाहीत. मिळालेल्या सत्तेतून आपल्या भावी पिढ्यांचे कल्याण होईल इतकी माया जमविणाऱया एकाही कॉंग्रेसच्या पुढाऱयाला किंवा मंत्र्याला वैयक्तिक पातळीवर या वस्तू आपण विकत घ्याव्यात, असे का वाटले नाही. महणजे केवळ निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी आणि सत्तेवर येण्याकरिता गांधीजींच्या नावाचा जप करायचा आणि वेळ आली की त्याच गांधीजींना वाऱयावर सोडायचे, ही कॉंग्रेसी निती या निमित्ताने संपूर्ण देशाला पाहायला मिळाली. खरे तर केंद्र शासनानेच या वस्तू लिलावात विकत घ्यायला हव्या होत्या. मात्र त्यांना तसे करणे शक्य नव्हते तर कॉंग्रेस पक्षाने पक्षाच्या खर्चातून किंवा कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्या विकत घेण्यास पुढे येणे आवश्यक होते. हीच बाब जर एखाद्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याच्या बाबतीत झाली असती अशी कल्पना केली तर प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांनी भारतातील तमाम हिंदुत्ववादी पक्ष,संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना फाडून खाल्ले असते आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असती हे नक्की.
महात्मा गांधी यांच्या या वस्तूंमुळे त्यांच्या आठवणींचा ठेवा पु्न्हा भारताकडेच आला आहे. मात्र त्यात आनंद मानायचा की एका मद्यसम्राटाच्याकरवी या वस्तू परत मिळाल्या त्याची खंत करायची हे ज्याचे त्यानेच ठरवावे.

२ टिप्पण्या:

  1. आपणही नको त्या गोष्टी ला फार महत्व देतो. आपल्या कडे जे काही पडुन आहे गांधी आश्रमात त्याची पण आपण काळजी करित नाही. आणि नसतं आणलं हे परत तरिही काही फरक पडला नसता.

    उत्तर द्याहटवा
  2. वा:! आता मल्ल्याचे पुढच्या वर्षीचे कॆलेंडर बापू आणि मल्ल्या असे असणार.
    बापूंच्या वस्तू भारतात परत आणल्यामुळे मल्ल्याना जेवढी प्रसिद्धि मिळाली, तेव्हढी मिळवण्यासाठी त्यांना (नाहीतर)देशातल्या सगळ्या पत्रकारांना किंगफिशरमधून घुमवावं लागलं असतं. हे एकदम अहिंसक आणि दारूचा एक थेंबही न साडता केलेले राष्ट्रीय कार्य...

    उत्तर द्याहटवा