सोमवार, १६ मार्च, २००९

शतायुषी भव

आपल्या प्रत्येकालाच आपण शतायुषी व्हावे असे वाटत असते. मात्र सध्याच्या फास्टफूडच्या आणि धावपळीच्या जमान्यात ते शक्य होणार नाही, असे वाटते. मात्र आपण आपल्या आरोग्याकडे योग्य प्रकारे लक्ष दिले तर आपल्याला दीर्घायुष्यी होणे शक्य आहे. दीर्घायुष्यी होणे म्हणजे आपण किती वर्षे जगलो एवढाच विचार न करता शेवटच्या श्वासापर्यंत आपण कसे जगलो याला महत्व आहे. लोळागोळा होऊन आणि अंथरुणावर पडून की आपले आरोग्य चांगले ठेवून व शेवटपर्यंत हिंडते-फिरते राहून दीर्घायुष्यी व्हायचे, हे आपण प्रत्येकानेच ठरवायला पाहिजे. आरोग्याची आणि आहार-विहाराची काही पथ्ये पाळली, आयुर्वेदात सांगितल्यानुसार दिनचर्या, व्यायाम आणि आहार घेतला तर दीर्घायुष्यी व निरोगी जीवन जगणे आपल्याला सहज शक्य आहे. हे सर्व सांगायचे कारण काय,असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. नुकतेच माझ्या वाचनात वैद्य प. य. खडीवाले यांनी लिहिलेली शंभर वर्षे जगण्यासाठी काय करावे ही छोटी पुस्तिका वाचनात आली. पुस्तिकेची किंमत अवघी एक रुपया अशी आहे. म्हणजे आपल्याला दीर्घायुष्यी व्हावे असे वाटत असेल तर प्रत्येकाने आवर्जून ही पुस्तिका जरूर वाचावी. सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त अशा या पुस्तिकेची माहिती सगळ्यांना व्हावी, म्हणून आज मी हा विषय घेतला आहे.
माणसाच्या आयुष्यात वार्धक्य आणि मृत्यू हा येणारच. मात्र हा येणारा मृत्यू योग्य आहार विहार आणि औषधी योजनांची युक्तिपूर्वक आणि आपल्या प्रकृतीला सांभाळून योजना केली तर तो नक्कीच दूर ठेवता येऊ शकेल. वैद्य खडीवाले यांनीया विषयाची मांडणी करताना तीन भाग केले आहेत. वय वर्षे पस्तीस ते पच्चावन्न-साठ, साठ ते सत्तर आणि सत्तरीनंतरचे जीवन
अशा तीन भागात त्यांनी विषयाची मांडणी केली आहे. मराठी माणसांच्या प्रकृतीला आणि येथील हवामानाला धरून कोकणात तांदुळ व नाचणी आणि देशावर जोंधळा व ज्वारीच हितकर आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात मधुमेह, स्थौल्य, आमांश, आमवात, संधिवात, मूळव्याध, प्रमेह, हृदयरोग, रक्तदाब, दमा, अर्धांगवात, सायटिका, सूज, मूत्रपिंडाचे आजार, ग्रहणी, अग्निमांद्य, पोटात गॅस धरणे, त्वचाविकार, बुद्धिमांद्य असे विकार होऊ शकतात. या सगळ्या विकारांना शरिात थारा द्यायचा नसेल तर ज्वारी सकाळी आणि जोंधळा सायंकाळी, असे प्रमुख अन्न असायचा हवे. ज्वारीत फाजील कोलेस्टरॉल नाही. उलट पोट भरण्याकरता आणि कितीही श्रम शरीराला सहन होतील, अशी उर्जा आहे. त्याला तूप लागत नाही. भाकरी शिळी झाली तरी खराब होत नाही. नुसत्या पाण्याबरोबर ती खाता येते. कधी ज्वारी थंड पडते. त्यांनी त्यात बाजरी मिसळून भाकरी करावी. बाजरीत ज्वारीचे गूण आहेत पण ती उष्ण असल्याचे वैद्य खडीवाले या पुस्तकात सांगतात.
नाचणी किंवा नागली हे धान्य अशक्त व्यक्ती हलका कोठा असणारे, दीर्घ काळचा ताप आणि अन्य आजारातून उठण्याकरता आहे. भरपूर श्रम करणाऱयांसाठी त्याची गरज नाही. कडधान्-तूर, मूग, मसूर, उडीद, रभरा, वाटाणा हे सगळे पचवायची तारण्यात पचनशक्ती हवी. पोटात वायू धरू नये, म्हणून आले, लसूण, जिरे खावे. भाज्यांमध्ये लसणीचा वापर न करता स्वतंत्रपणे लसूण नियिमतपणे खावी. दैनंदिन आहारात फाजील तेल, तूप, मीठ, मिरची, तिखट मसाला नसावा. डालडा किंवा तत्सम वनस्पतीजन्य तेल टाळावे. कारण त्यामुळे केस, दृष्टी, हृदय मेदासंबंधी विकार बळावतात.बटाटा, मांसाहार, डालडा, चहा, फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ खाऊ नयेत तर स्वयंपाकात काय वापरावे, रोग होणार नाही, त्यासाठी तोंडीलावणे, न्याहरी, पूरक अन्न काय असा प्रश्न पडू शकतो. कडधान्यामध्ये मूग हे श्रेष्ठ असून तोंडी लावण्यासाठी पुदीना, आले, लसूण, जिरे, कोथिंबीर, आमसूल, दोडक्याच्या किंवा दुधी भोपळ्याच्या शिरा, ताजे आवळे, दुधीभोपळा, पडवळ, कारले, घोसाळे, काटेरी वांगी, पांढरा कांदा, गोवार, मुळा, चाकवत, पालक, लाल माठ, शेवगा, शेपू, मेथी, खजूर खाता येऊ शकेल, अशी शूचनाही ते करतात.
पुढे या पुस्तकात साठ ते सत्तर या वयातील आहाराची काळजी, सत्तरीनंतचा आहार, पंचावन्न ते साठ या काळातील आहार-विहार, निरामय दीर्घायु जीवनासाठी वनस्पतींचे योगदान अशी प्रकरणे आहेत. या विषयाची आवड असणाऱयांनी ही पुस्तिका जरुर वाचावी. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था यांनी ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. वैद्यक ग्रंथ भांडार, ३७१, शनिवार पेठ, थत्ते वाडा, गोकुळ हॉलसमोर, पुणे-३० (दूरध्वनी-०२०-२४४५०३५४)किंवा मॉडर्न बुक डेपो, ५३६, शनिवार पेठ, प्रभात टॉकीजसमोर, बाजीराव रस्ता, पुणे (दूरध्वनी-०२०-२४४५५४५६) येथे ही पुस्तिका मिळू शकते. वैद्य खडीवाले यांची अन्य आयुर्वेदीक विषयावरील पुस्तके अल्प किंमतीची असून ती सर्वसामान्याना विकत घेणे अगदी सहज परवडू शकेल. मात्र आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आणि आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेले सोपे उपाय, आहार-विहार आणि दिनचर्या पाळण्याची खरी गरज आहे. त्यासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत आपले आरोग्य उत्तम राहायला हवे असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. आत्ता मजा करून घेऊ, पुढचे पुढे बघू, अशी वृत्ती असू नये.
वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था
२५० ड, शनिवार पेठ, पुणे-३०
दूरध्वनी- ०२०-२४४५९६१८/२४४५०४७४

1 टिप्पणी: