मंगळवार, १० मार्च, २००९

आनंदयात्री

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
असे आपल्या सर्वाना सांगत
जीवनात नेहमीच सुख किंवा दुख नसते तर
कधी बहर कधी शिशिर हा असतोच
त्यामुळे निराश न होता
सर्व सर्व विसरू देत
असा दिलासा देत
तर कधी
सावर रे, सावर रे
अशी फुंकर घालत
शब्द शब्द जपून ठेव
अशी आठवण करून देत
तुला ते आठवेल का सारे
असे विचारत
दिवस तुझे हे फुलायचे,झोपाळ्यावाचून झुलायचे
सांगत
लाजून हासणे अन लाजून ते पाहणे
म्हणत
भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसांची
याची आठवण सांगत
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
हे सांगून
शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
असे अगदी सहज सांगत
माझे जीवन गाणे,व्यथा असो वा आनंद असू दे
म्हणत हा
शुक्रतारा
आपल्या रसिकांच्या मनात
श्रावणात घननीळा बरसला
सारखा अविट गोडीच्या गाण्यांनी सतत बरसत असून
तुझे गीत गाण्यासाठी
माझे जीवनगाणे
म्हणत
प्रेम म्हणजे प्रेंम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं
असेच आपल्याला सांगणाऱया या
कवीला
सर्व रसिकांतर्फे
सलाम

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या अविट गोडीच्या अनेक गाण्यांनी गेली वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर गारुड केले आहे. लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, अरुण दाते, सुधीर फडके, जितेंद्र अभिषेकी, हृदयनाथ मंगेशकर, गजाननराव वाटवे आदींनी आपल्या आवाजात ही गाणी अजरामर केली आहेत. गायकांप्रमाणेच पाडगावकर यांच्या शब्दांना संगीत देणारे यशवंत देव, श्रीनिवास खळे, विश्वनाथ मराठे, पु. ल. देशपांडे आणि अन्य संगीतकारांचेही मोठे योगदान आहे. मंगेश पाडगावकर यांनी आज वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. रसिकांना आनंद देणाऱया या आनंदयात्रीला उदंड आयुष्य लाभो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा