गुरुवार, १२ मार्च, २००९

गांधी साहित्यावरील कॉपीराईटचा अधिकार संपुष्टात

महात्मा गांधी यांच्या साहित्यावर गेल्या काही वर्षांपासून असलेला नवीजीवन टस्टचा स्वामित्वधनाचा (कॉपीराईट) अधिकार नुकताच संपुष्टात आला आहे. यापूर्वी स्वामित्वधानाचे अधिकार नवजीवन टस्टकडे असल्याने या टस्टशिवाय अन्य कोणत्याही प्रकाशन संस्थेला गांधीजींचे साहित्य प्रकाशित करता येत नव्हते. मात्र हा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता गांधीजींचे साहित्य कोणत्याही प्रकाशन संस्थेला, व्यक्तीला किंवा गांधीप्रेमी मंडळींना प्रकाशित करता येणार आहे.
महात्मा गांधी यांच्या समग्र साहित्यावर असलेला नवजीवन टस्टचा हा अधिकार नुकताच संपुष्टात आला. अहमदाबाद येथील नवजीवन टस्ट या संस्थेला महात्मा गांधी यानीच आपल्या समग्र साहित्याचे अधिकार दिले होते. साहित्याच्या कॉपीराईट कायद्यानुसार ज्या व्यक्ती किंवा संस्थेला हे अधिकार देण्यात आलेले असतात, त्यानाच या कायद्यानुसार संबंधितांचे साहित्य प्रकाशित करया येते. अन्य कोणी जर हे साहित्य प्रकाशित केले तर तो कॉपीराईट कायद्याचा भंग ठरतो. या कायद्याचा भंग करणाऱयाला भारतीय दंड विधानानुसार शिक्षा होऊ शकते. नवजीवन टस्टकडे असलेल्या या अधिकारानुसार महात्मा गांधी यांचे आजवर जे काही साहित्य प्रकाशित झाले ते सर्व याच टस्टने केले होते. मात्र असे असले तरी कॉपीराईटच्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर साठ वर्षानी त्याव्यक्तीच्या साहित्यावरी स्वामित्वधनाचा अधिकार संपुष्टात येऊन ती सार्वजनिक संपत्ती होते.३० जानेवारी १९४८ मध्ये गांधी यांची हत्या करण्यात आली. कॉपीराईट कायद्यानुसार साठ वर्षांनंतर म्हणजे यंदाच्या वर्षी जानेवारीच्या अखेरीस नवजीवन टस्टचा गांधी साहित्यावर असलेला हा अधिकार संपुष्टात आला.हा अधिकार पुन्हा टस्टला मिळावा म्हणून केंद्र शासनाला विनंती करण्यात आली होती. मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला नाही. कॉपीराईटच्या कायद्यानुसार गांधी साहित्यावरील स्वामित्वधनाचा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता भारतातील किंवा जगातील कोणीही प्रकाशक व व्यक्ती आता कोणत्याही भाषेत गांधीजींचे साहित्य प्रकाशित करू शकते.
मुंबई सर्वोदय मंडळ-गांधी बुक सेंटरचे व्यवस्थापक प्रेमशंकर तिवारी यांनी सांगितले की, गांधी साहित्यावरील कॉपीराईटचा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता गांधीविचार आणि साहित्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यास मदत होईल. एकाच संस्थेकडे हे अधिकार असल्याने हे साहित्य प्रकाशित करण्यास त्यांच्यावर काही मर्यादा येऊ शकतात. मात्र आता भारतातील किंवा जगातील कोणीही प्रकाशक किंवा व्यक्तीला हे साहित्य प्रकाशित करता येऊ शकेल. ही स्वागतार्ह बाब आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा