रविवार, २९ मार्च, २००९

ठाल्यांची ठोकशाही

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या मनमानी आणि ठोकशाही कारभारामुळे महामंडळाच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सॅनहोजे येथे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यासाठी ठाले-पाटील यांनी जो आटापिटा केला आणि त्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रात किंवा भारतात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन न भरविण्यापर्यंतही त्यांची मजल गेली होती. महामंडळाच्या घटनेनुसार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्रात किंवा भारतातच झाले पाहिजे. भारताबाहेर साहित्य संमेलन भरवायचे असेल तर त्यासाठी महामंडळाच्या घटनेत बदल करणे गरजेचे होते. मात्र ठाले-पाटील यांनी सॅनहोजे येथे ८२ वे संमेलन भरविण्याचा निर्णय घेतला. विदर्भ साहित्य संघ आणि महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता याला कोणी विरोधही केला नाही. अखेर वृत्तपत्रे व साहित्य वर्तुळातून प्रखर टीका झाल्यानंतर ठाले यांनी नमते घेतले आणि सॅनहोजे येथे पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन होईल, अशी पळवाट काढली आणि ८२ वे साहित्य संमेलन महाराष्ट्रातच घेण्यास ते राजी झाले. ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे संमेलनाध्यक्षांशिवाय पार पडले. आजवर झालेल्या साहित्य संमेलनांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. आणि त्यालाही ठाले-पाटील यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यांनी अगोदर खबरदारी घेऊन काही उपाययोजना केली असती तर अध्यक्ष निवडीचा पेच आणि संमेलनाध्यक्षांशिवाय संमेलन पार पडणे या गोष्टी टाळता आल्या असत्या. डॉ. यादव यांची ‘संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी, त्यातील तुकाराम यांच्याविषयी असलेला वादग्रस्त मजकूर, त्यावर वारकरी संप्रदायाकडून उमटलेली प्रतिक्रिया, डॉ. यादव यांचा राजीनामा, डॉ. यादव अध्यक्ष असतील तर हे संमेलन होऊ न देण्याचा इशारा आदी सर्व बाबी काही एका दिवसात घडल्या नाहीत. संमेलनाच्या अगोदर किमान पंधरा ते वीस दिवस हा गदारोळ सुरू होता. त्यामुळे भविष्यात असाधारण परिस्थिती उद्भवली तर काय करायचे, त्यातून कसा तोडगा काढायचा याविषयी ठाले-पाटील यांना अगोदरच पूर्वतयारी करता आली असती. आपल्या घरातही एखादे लग्नकार्य किंवा तत्सम मोठा समारंभ असेल तर सर्वसामान्य माणूसही काही अडचण निर्माण झाली तर काय करायचे, त्याचा विचार करून पूर्वनियोजन करतो. साहित्य संमेलनासारख्या इतक्या मोठय़ा कार्यक्रमासाठी ठाले-पाटील यांनी ही खबरदारी का घेतली नाही, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तसेच महामंडळाच्या घटनेनुसार संमेलन मार्गदर्शन समितीची बैठकही का बोलावली नाही, असे सवाल विचारण्यात येत आहेत. महामंडळाच्या घटनेनुसार (परिशिष्ट-अ, नियम-१२) साहित्य संमेलनाच्या कार्याचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन समिती असते. संमेलनाची निमंत्रक संस्था, आयोजक यांना साहित्य संमेलनाच्या बाबतीत ही समिती वेळोवेळी मार्गदर्शन करत असते. ठाले-पाटील यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक तर बोलावलीच नाही पण मार्गदर्शन समितीची बैठकही घेतली नाही. या प्रकाराला महाराष्ट्र साहित्य परिषदही तितकीच जबाबदार आहे. हा सर्व वाद सुरू असताना संमेलन निमंत्रक म्हणून महामंडळाची किंवा मार्गदर्शन समितीची बैठक बोलावण्याचा आग्रह का धरला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसाच प्रकार डॉ. यादव यांच्या भाषणाच्या प्रती वितरित न करण्याबाबत ठाले-पाटील यांच्याकडून घडला. महामंडळाच्या घटनेत संमेलन प्रतिनिधींचे अधिकार असे एक प्रकरण आहे. त्यानुसार संमेलनाच्या खुल्या अधिवेशनातील ठरावांवर मत देणे, संमेलनाची कार्यक्रम पत्रिका, अध्यक्षीय भाषण आणि अन्य साहित्य मिळणे हा संमेलनासाठी शुल्क भरून नोंदणी केलेल्या प्रत्येक प्रतिनिधींचा अधिकार आहे. ठाले-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अध्यक्षीय भाषणाची प्रत संमेलनासाठी आलेल्या प्रतिनिधींना न देऊन महामंडळाच्या घटनेचीही पायमल्ली केली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी होणारे खुले अधिवेशन आणि ठरावांचे वाचन हे संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखालीच झाले पाहिजे, असे महामंडळाची घटना सांगते. मात्र येथे संमेलनाध्यक्ष नसूनही ठरावांचे वाचन केले गेले. त्यामुळे ते ठरावही वैध ठरत नाहीत.
सांगली येथील ८१ व्या साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण यांच्यावर टीका करून ठाले-पाटील यांनी नवा वाद ओढवून घेतला होता. महाबळेश्वर येथे झालेल्या संमेलनातही उद्घाटन सोहळ्यात त्यांनी अशीच काही मुक्ताफळे उधळली होती. संमेलनास उपस्थित असलेले प्रतिनिधी आणि वृत्तपत्रातून त्यावर टीका झाल्यानंतर शेवटच्या दिवशी ठाले-पाटील यांनी त्या भाषणातील मते आणि विचार हे आपले स्वत:चे असून ते महामंडळाचे नाहीत, अशी सारवासारव केली. महामंडळाच्या सर्व घटक संस्था, संलग्न संस्था आणि अपवाद वगळता महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे ठाले-पाटील यांच्या या मनमानी आणि घटनाविरोधी वागण्याला समर्थन देण्याचे आणि त्यांच्या ताटाखालचे मांजर होण्यामागचे रहस्य काय? असा प्रश्न साहित्य वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

२ टिप्पण्या:

  1. वाह, मस्त,, आजचा तंबी दुराई चा दोन फुल एक हाफ वाचला कां? मस्त आहे एकदम ! अगदी ह्याच विषयावर आहे.
    इतक्या गोष्टी बोलल्या जात आहेत पण एक लाख रुपयांमधे अमेरिकेचे तिकिट काढण्याचे कंत्राट एका प्रवासी कंपनीला देण्यात आले. अमेरिकेचे तिकिट १ लाख कधी पासुन झाले?? काही तरी काळे बेरे दिसतंय.. पण आपली मराठी शोध पत्रकारिता झोपलेली आहे..कोणि जर माहिती काढली तर चांगला लेख होऊ शकतो.. त्या एक लाखामधे टॅक्स पेअर्स च्या पैशानी साइट सिइंग पण अरेंज करण्यात आले होते असे ऐकिवात आहे...
    असो..

    उत्तर द्याहटवा
  2. महामंडळाच्या सर्व घटक संस्था, संलग्न संस्था आणि अपवाद वगळता महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे ठाले-पाटील यांच्या या मनमानी आणि घटनाविरोधी वागण्याला समर्थन देण्याचे आणि त्यांच्या ताटाखालचे मांजर होण्यामागचे रहस्य काय? असा प्रश्न साहित्य वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
    सोपे आहे हे.
    साहित्य मंडळाचे सारे सदस्य वशिल्याचे तट्टू आहेत.
    साहित्याशी त्यांचा काहीही संबंध नाही.
    त्याना एखाद्या शाळॅत बक्शिस समारंभाला सुद्धा कुणे पाहुणे म्हणून बोलवत नाही.
    अशा सुमार कुवतेच्या मंडळीना ठाली साहेबानि फुकट अमेरिका वारी करून आणली.
    म्हणून ते मिंधे आहेत.
    एका सामान्य कवियत्रीचे पती एवढाच ठाले साहेबांचाअ साहित्य संबंध.
    पण सरकार कडून अनुदान उकळाणे, त्यासाठी मंत्री महोदयांची हाजी हाजी करणे यात ते वाकबगार आहेत.

    उत्तर द्याहटवा