बुधवार, ४ मार्च, २००९

भारतीय लेखिकांचे साहित्य होणार ग्लोबल

भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये महिला साहित्यिकांनी लिहिलेल्या निवडक साहित्याला आता ग्लोबल स्वरूप मिळणार असून हे साहित्य इंग्रजी भाषेत अनुवादित होणार आहे. पाच खंडांमधून या निवडक साहित्याचा अनमोल ठेवा चोखंदळ वाचक आणि साहित्यप्रेमींपर्यंत पोहोचणार आहे. या पाच खंडांपैकी पहिला ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. भारतीय प्रदाशिक भाषांमधील दर्जेदार आणि निवडक साहित्य अन्य प्रादेशिक भाषांमध्ये काही प्रमाणात यापूर्वीच अनुवादित झालेले आहे. कन्नडमधील भैरप्पा, शिवराम कारंथ तसेच गुजराथीमधील निवडक साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचले आहे. मात्र आता भारतीय प्रादेशिक भाषांमधील लेखिकांचे साहित्य इंग्रजीत अनुवादित झाल्यामुळे ते जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. या अनुवादाच्या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत क्रॉसवर्डच्या केम्सकॉर्नर येथील पुस्तकांच्या दुकानातझाले.
ज्येष्ठ कथालेखिका शांता गोखले यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या हॉट इज द मून या ग्रंथात कन्नड, तामिळ, तुळू आणि कोकणी या भारतीय प्रादेशिक भाषांमधील लेखिकांनी लिहिलेल्या निवडक साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्येलघुकथा, कविता आदी साहित्यप्रकाराचा समावेश आहे. या पुस्तकाचे संपादन अरुंधती सुब्रमण्यम यांनी केले असून या पहिल्या ग्रंथानंतर अन्य प्रादेशिक भाषांमधील निवडक साहित्याचे चार ग्रंथही लवकरच प्रकाशित होणार आहेत.
या ग्रंथात २३ भारतीय प्रादेशिक भाषांमधील ८७ लेखिकांचा समावेश आहे. लघुकथा, कविता, कथा आदी साहित्य त्यात असणार आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या हॉट इज द मून या ग्रंथात कनन्ड साहित्यातील बानू मुश्ताक, मित्रा वेंकटराज, कनका, तुलसी वेणुगोपाल, वैदेही तर तामिळ साहित्यातील बमा, कुट्टी रेवती, सलमा, मलाथ्या मैत्री यांचा तसेच तुळू साहित्यातील एम. जानकी ब्रह्मवरा, सुनीता शेट्टी आणि कोकणी साहित्यातील हेमा नाईक व जयंती नाईक यांचा समावेश आहे. लवकरच प्रकाशित होणाऱया चार ग्रंथांच्या संपादनाचेकामसुरू आहे.
भारतीय लेखिकांचे साहित्य इंग्रजी भाषेत नेण्याचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असून भारतीय प्रादेशिक भाषांमधील दर्जादार आणि निवडक साहित्यही अनुवादित होऊन त्या त्या भाषेतील वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे अन्य भारतीय प्रादेशिक भाषांमधील उत्तमोत्तम साहित्य मराठीत येईल आणि मराठीतील साहित्य अन्य प्रादेशिक भाषांमध्ये पोहोचेल.
शेखर जोशी

२ टिप्पण्या:

  1. रा. रा. शेखर जोशी,
    आपुला ब्लॉग पाहून बहुत आनंद जाहला.
    सदरहु या ब्लॉगचे आम्ही कळते-समजतेवर स्वागत केलेच आहे.
    कृपया लिहिते राहा...
    - बापू आत्रंगे

    उत्तर द्याहटवा
  2. रोचक माहिती दिल्याबद्दल अनेक आभार.

    उत्तर द्याहटवा