मंगळवार, ३ मार्च, २००९

मार्केटिंगच्या फंड्यामुळे मराठी पुस्तकांची भरभराट

मराठी पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनी मराठी पुस्तके विक्रीसाठी मार्केटिंगचा नवा फंडा स्वीकारल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत मराठी पुस्तकांची पहिली आवृत्ती लवकरात लवकर संपायला सुरुवात झाली आहे. साहित्यप्रेमी आणि चोखंदळ वाचक ही पुस्तके विकत घेत मराठी पुस्तकांना भरघोस प्रतिसाद देत असल्यामुळे मराठी प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि मराठी पुस्तकांसाठी भरभराटीचे दिवस आले आहेत. मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या संजय आवटे यांच्या ‘ओबामा’ या पुस्तकाच्या पंधरा दिवसात पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या, हे त्याचेच द्योतक असल्याचे मानण्यात येते.
गेल्या दोन-चार वर्षांमध्ये डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांच्या ‘हे तो ‘श्री’ची इच्छा’, विठ्ठल कामत यांचे ‘इडली ऑर्किड आणि मी’, डॉ. नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप आणि आम्ही’ तसेच अन्य काही पुस्तकांच्या वीस पर्यंत आवृत्त्या निघाल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती संपायलाच दोन ते चार किंवा त्याहूनही अधिक वर्षे लागत असल्याची तक्रार मराठी प्रकाशक, विक्रेते आणि मराठी साहित्य व्यवहारातील जाणकार मंडळींकडून व्यक्त करण्यात येत होती. मुळातच मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती एक हजार ते बाराशे इतक्याच प्रतींची निघायची. ती संपायलाही काही वर्षे जात होती. मात्र प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनी पुस्तक प्रकाशन आणि विक्रीच्या पारंपरिकतेतून बाहेर पडून मार्केटिंगचा नवा फंडा अवलंबायला सुरुवात केल्यामुळे पुस्तकांची पहिली आवृत्ती महिन्याभरात संपून दोन-चार वर्षांतच पाच ते दहा किंवा त्यापेक्षाही जास्त आवृत्त्या निघायला सुरुवात झाली आहे. पंकज कुरुलकर यांनी अलिकडेच ‘ग्रंथायन’च्या माध्यमातून फिरत्या वाहनांमधून ठिकठिकाणी जाऊन पुस्तके थेट वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा नवा मार्ग चोखाळला आहे. त्यालाही वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
विविध वृत्तपत्रातून केलेल्या जाहिराती, वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्यांमधून पुस्तकांची आलेली परीक्षणे, वाचकांकडून झालेली प्रसिद्धी आदींमुळे आदी काही कारणांमुळे मराठी पुस्तके जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचत असून वाचकांकडून ती विकत घेतली जात असल्याचे निरीक्षण ‘जवाहर बुक डेपो’चे दीपक भोगले यांनी नोंदवले. तर मनोविकास प्रकाशन आणि मराठी प्रकाशक परिषदेचे एक पदाधिकारी अरविंद पाटकर यांनी सांगितले की, जाहिरात आणि प्रसिद्धीच्या पारंपरिक मानसिकतेमधून प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते बाहेर पडले आहेत. साहित्य गप्पा, पुस्तक प्रदर्शने, वृत्तपत्रातून पुस्तकांच्या जाहिराती, एखाद्या लेखकाशी गप्पा असे आणि अशा प्रकारचे साहित्यविषयक विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्यामुळे वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचण्यास मोठी मदत होत आहे.
मॅजेस्टिक प्रकाशनचे ‘ललित’, मनोविकास प्रकाशनाचे ‘इत्यादी’, रसिक साहित्यचे ‘साहित्य सूची’, मेहता पब्लिशिंग हाऊसचे ‘मेहता मराठी ग्रंथजगत’, मॅजेस्टिक एजन्सीज्चे ‘औेदुंबरच्या सहवासात’, पॉप्युलर प्रकाशनचे ‘पॉप्युलर रसिक’, तसेच दिलीपराज प्रकाशन आणि अन्य प्रकाशकांतर्फेही साहित्य आणि पुस्तकांच्या प्रसारासाठी मासिके प्रकाशित केली जातात. तसेच पूर्वीच्या तुलनेच वृत्तपत्रातील जाहिराती आणि वाचकांपर्यंत थेट पोहोचण्याच्या विविध उपक्रमांवरही काही प्रकाशक तसेच पुस्तक विक्रेत्यांकडून अधिक प्रमाणात खर्च केला जात असल्याचे दिसून येत आहे. प्रकाशकांच्या एकूण वार्षिक नियोजनातील ही रक्कमही वाढली आहे. गेल्या काही वर्षांत नेमकी त्यात किती टक्के वाढ करण्यात आली या बाबत नेमकी माहिती मिळाली नसली तरी हा खर्च सध्या सुमारे १० ते १५ टक्के असल्याचे सांगण्यात येते. वाचकांपर्यंत थेट पोहोचण्याचा फायदा प्रकाशक आणि विक्रेते दोघांच्याही लक्षात आला असून त्यांना प्रसारमाध्यमे आणि प्रसिद्धीचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे आता भविष्यकाळातही प्रसिद्धी आणि मार्केटिंगवर प्रकाशक आणि विक्रेत्यांचा भर राहाणार असल्याचे प्रकाशक व्यावसायिकांकडून सांगण्यात आले
शेखर जोशी

1 टिप्पणी: