गुरुवार, २६ मार्च, २००९

गुढीपाडवा आणि कडूनिंब

उद्या २७ मार्च रोजी हिंदू नववर्षाचा (ज्यांना हिंदू या शब्दाचे वावडे आहे त्यांच्यासाठी भारतीय संस्कृतीचा)पहिला दिवस अर्थातच गुढीपाडवा हा सण आहे. या दिवशी आपण घरोघरी गुढ्या-तोरणे उभारून हा नववर्ष दिन साजरा करतो. या दिवशी उभारलेल्या गुढीमध्ये आणि दरवाजावर लावण्यात येणाऱया तोरणातही कडुनिंबाची पाने असतात. गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानण्यात येतो. गुढीपाडवा म्हणजेच वर्षप्रतिपदा, अक्षय्यतृतीया आणि विजयादशमी हे तीन आणि बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीपाडवा असे हे साडेतीन मुहूर्त आपल्या हिंदू धर्मात मानण्यात येतात.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येतात. त्याची मुहूर्तमेढ डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानने रोवली. सुमारे पन्नास ते पंचाहत्तर हजार आबालवृद्ध पारंपरिक वेषात या यात्रेत सहभागी होत असतात. खरोखर डोंबिवलीतील ही नववर्ष स्वागतयात्रा पाहण्यासारखी असते. डोंबिवलीने सुरू केलेल्या या नववर्ष स्वागतयात्रेपासून स्फूर्ती घेऊन आता राज्यात विविध ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी ही स्वागत यात्रा काढण्यात येत असते. ३१ डिसेंबर या दिवशी नववर्ष स्वागताच्या नावाखाली जे काही केले जाते, ती आपली संस्कृती नव्हे. त्यामुळे आपल्या नववर्ष दिनी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदात आणि उत्साहात तसेच आगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्याच्या उद्दे्शाने ही स्वागत यात्रा सुरू करण्यात आली.
गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. वि.के. फडके संपादित संपूर्ण चातुर्मास या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मदेवाने हे जग उत्पन्न केले तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हा होता. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या व तोरणे उभारून आपला आनंद व्यक्त केला. नारदमूनींना साठ पुत्र झाले. हीच साठ संवत्सरे असून या प्रत्येक संवत्सराचा पहिला दिवस देवांनी गुढ्या व तोरणे उभारून साजरा केला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा असल्याचे काही पौराणिक कथा सांगतात.
शालीवाहन शकाच्या वर्षाचाहा पहिला दिवस मानण्यात येतो. गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारण्यात येते. एका मोठ्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे वस्त्र आणि फुलांची माळ बांधून त्यावर लोटी किंवा गडू ठेवण्यात येतो. ही सजवलेली काठी गुढी मानून तिची पूजा करण्यात येते. धर्माशास्त्रात यालाच ब्रह्मध्वज असे म्हटले जाते. या दिवशी कडूनिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. कोवळ्या पानांमध्ये मिरी, हरभऱयाची डाळ, ओवा व मीठ घालून त्याची चटणी करून खाल्ली जाते, अशी माहितीही या पुस्तकात देण्यात आली आहे.
धार्मिक प्रथेनुसार या दिवशी कडूनिंब खाल्ला जात असला तरीही आयुर्वेदाच्या दृष्टीनेही त्याला खूप महत्व आहे. कडुनिंबाची पाने, फुले, फळे, मुळे आणि खोड अशा पाच अंगांचा उपयोग होते. वैद्य आप्पाशास्त्री साठे यांच्या घरगुती औषधे या पुस्तकात कडूनिंब आणि त्याच्या औषधी उपयोगाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे पुस्तक सर्वांसाठी संग्राह्य आणि वाचनीय आहे. त्यातील काही माहिती सगळ्यांच्या माहितीसाठी येथे देत आहे.
गुढीपाडकडूनिंबाच्या सालीने कोणत्याही प्रकारचा ताप असला तरी थांबतो. ताप थांबवणाऱया कुटकी, काडेजिराईत, गुळवेल आदी औषधांबरोबर कडूनिंबाची साल ज्वरावर दिली जाते. या सालीचा काढा सकाळ-संध्याकाळ घेतल्यास ताप उतरतो.
कडूनिंबाच्या सालीच्या आतील गाभ्यास खोड असे म्हणतात. हे रोज उगाळून घेण्याचा प्रघात आहे. कडूनिंबाची फुले परसाकडे साफ होण्यासाठी घेतात. याच्या वाळलेल्या फुलांचे वस्त्रगाळ केलेले चूर्ण सुमारे तीन ग्रॅम गरम पाण्याबरोबर रोज रात्री घेतले तर शौचास साफ होते.
कडूनिंबाच्या बियांपासून तेल काढतात ते बाजारातही उपलब्ध आहे. त्वचारोगांवर (कोरडी खरुज, नायटा, गजकर्ण) हे चोळून लावले तर त्वचारोग बरे होतात.
(अधिक माहितीसाठी जिज्ञासूनी वैद्य आप्पाशास्त्री साठे यांचे घरगुती औषधे हे पुस्तक वाचावे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा