मंगळवार, ३१ मार्च, २००९

हे कसले राष्ट्रवादी हे तर राष्ट्रघातकी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि नाही, नाही म्हणत असले तरी पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे सध्या जोरदार गदारोळ उडाला आहे. पवार हे हिदू असले तरी ते ज्या कॉंग्रेसी परंपरेतील आहेत, त्या परंपरेनुसार हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात बोलणे आणि मुसलमानांचे लांगूनचालन करण्यासाठी कोणत्याही थराला जाणे, ही कॉंग्रेसी संस्कृती आहे. त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना अटक केल्यानंतर देशभरातील बॉम्बस्फोट थांबले असल्याचे वक्तव्य करून समस्त हिंदूंचा रोष ओढवून घेतला आहे.त्यांच्या या वक्तव्याने देशभरातील सर्व हिंदूना त्यांनी आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे. जणूकाही मालेगाव बॉम्बस्फोट होण्यापूर्वी भारतात, महाराष्ट्रात सर्व काही आलबेल होते, येथील धर्मांध अल्पसंख्यांक (जे भारतात राहून भारताशी प्रामाणिक आहेत, पाकिस्तान जिंकला तर येथे फटाके फोडून आनंद साजरा करत नाहीत किंवा धर्मांध अल्पसंख्यांकांच्या विरोधात बोलण्याची धमक दाखवतात ते सर्व वगळून) अगदी गुण्यागोविंदाने राहात होते, असे तर पवार यांना सुचवायचे नाही ना. अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी किती लाचार व्हायचे आणि कोणत्या थरापर्यंत जायचे, याचे साधे भानही पवार यांच्यासारख्या जाणत्या नेत्याने ठेवले नाही, ही शरमेची बाब आहे. याच भाषणात पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अन्य हिंदुत्वादी संघटनांवर जोरदार टीका केली.
पवार ही व्यक्ती स्वार्थ आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारी आहे. आपले राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते वसंतदादा पाटील आणि कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी केले आहे.काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमधून बाहेर पडून एकवेळ मी हिमालयात जाईन परंतु कॉंग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार नाही, असे वक्तव्य करणाऱया पवार यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या काळात पुन्हा त्यांचे पाय धरत कॉंग्रेसमध्येच प्रवेश केला. सोनिया गांधी राजकारणात आल्यामुळे आता आपल्याला पंतप्रधानपद कॉग्रेस पक्षात राहून मिळणार नाही, याची पुरेपुर खात्री झाल्यानंतर त्यांना सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. याच शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी कुख्यात दाऊद इब्राहिमच्या साथीदारांना बरोबर घेऊन विमानातून प्रवास केला होता. तेलगी प्रकरणात त्यांच्याच नावावर संशयाची सुई आहेच.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण करण्यात तर पवार यांनीच सुरुवात केली. पप्पू कलानी, भाई व हितेंद्र ठाकूर अशा मंडळींना पवार यांनी निवडणुकीची उमेदवारी देऊन निवडून आणले. पवार यांचा पक्ष केंद्र शासनात सहभागी आहे. केंद्रात ते स्वत मंत्री आहेत. तरीही शक्य असेल तेथे ते केंद्रशासनाच्या विरोधात कृती करत असतात. एकीकडे हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांवर टीका करायची आणि त्याच वेळी मला एकदा तरी पंतप्रधान होऊ दे हो, असा राग आळवत एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे भाजपशी गुपचूप हातमिळवणी करायची. काही महिन्यांपूर्वी शिवसेनाही पवारांच्या जाळ्यात सापडली होती. त्यासाठी राज्यात ज्यांच्याबरोबर हिंदुत्वाच्या पायावर युती आहे, त्या भाजपलाही सोडचिठ्ठी देण्यास निघाली होती. पवारांचा सर्व इतिहास माहिती असूनही शिवसेनेतील काही रडतराउतांमुळे हे सर्व चालले होते. या लोकसभा निवडणुकीत समजा शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी देऊन पवारांबरोबर घरोबा केला असता, तर त्याचा फटका शिवसेनेलाही नक्कीच बसला असता. येथे भाजप किंवा शिवसेनेचे समर्थन करण्याचा उद्देश नाही. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कॉंग्रेसने देशातील अल्पसंख्यांकांचे केवळ लांगूनचालन केल्यामुळे आणि बहुसंख्य हिंदूना नेहमीच दुर्लक्षित केल्यामुळेच भाजप आणि शिवसेना तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांना जनाधार मिळाला, असल्याचे विसरून चालणार नाही. शिवसेना आणि भाजप यांचे हिंदुत्वही कधी बेगडी असल्याचे दिसून आले असले तरी देशात हेच दोन राजकीय पक्ष हिंदुत्वाच्या बाजूने किमान बोलणारे तरी आहेत, हे काही कमी नाही.
देशात बहुसंख्यांक असलेल्या हिंदूना दुबळे समजून, त्यांना कोणतीही किंमत न देता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, डावे तसेच अन्य राजकीय पक्षांनी नेहमीच अल्पसंख्यांकांचे त्यातही केवळ मुसलमानांचे लांगूनचालन करण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे पवारांकडून आणि त्यातही ज्यांची ओळख केवळ विश्वासघातकी अशीच आहे, अशा माणसाकडून काहीच अपेक्षा करण्यात गैर नाही. ज्या पवारांनी मालेगाव बॉंम्बस्फोटाचे आरोपी पकडल्यानंतर देशात एकही बॉम्बस्फोट झाले नाहीत, असे वक्तव्य केले, त्या पवार यांना लोकसभा निवडणुकीनंतरही भाजप, शिवसेनेने जवळ करू नये. केंद्रात सत्ता स्थापन करायला जागा कमी पडत असतील तर एकवेळ सत्तास्थापन करणार नाही. परंतु सत्तेसाठी पवार यांच्यासारख्या माणसाची मदत घेणार नाही किंवा पवारांना जवळ करून त्यांना पंतप्रधान किंवा उपपंतप्रधान पदही मिळू देणार नाही, असे मनाशी पक्के ठरवायला हवे. (अर्थात हे माझे मत झाले) राजकाऱणी हे पक्के निगरगट्ट आणि गेंड्यांच्या कातडीचे असतात. मग ते कोणत्याही राजकीय पक्षांचे असोत. त्याला भाजप व शिवसेनाही अपवाद नाहीत. इतके होऊनही सत्ता मिळत असेल तर पवार भाजप-शिवसेनेच्या गळ्यात गळा घालायला आणि भाजप-शिवसेनावालेही त्यांना आपल्याकडे वळवायला कमी करणार नाहीत.
त्यामुळे आता सर्व काही मतदारांच्या हातात आहे. हिंदू असूनही अशा प्रकारची वक्तव्ये करून समस्त हिंदू समाजाला आरोपीच्या पिंजऱयात उभे करणारे शरद पवार हे राष्ट्रवादी की राष्ट्रघातकी आहेत, हे आता सुज्ञ मतदारांनीच ठरवावे. त्यांच्या पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जे जे उमेदवार उभे आहेत, त्यांना आणि शरद पवार व त्यांच्या पक्षाला सुजाण मतदारांनी जरुर जागा दाखवून द्यावी, एवढीच अपेक्षा.

1 टिप्पणी:

  1. आपण अगदी योग्य लिहिले आहे.विश्वासघात करण्यात शरद पवारांचा हात कोणीच धरू शकणार नाही.आणि जेव्हा जेव्हा शरद पवार काँग्रेस पक्षाबरोबर असतात तेव्हा तेव्हा त्या पक्षाचे नुकसानच होते हा इतिहास आहे.१९८५ साली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला २८८ पैकी १६८ आणि पवारांच्या समाजवादी काँग्रेसला ५४ जागा मिळाल्या होत्या.पवार १९९० च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षात होते.तेव्हा काँग्रेस पक्षाला २८८ पैकी १४१ जागा मिळाल्या आणि विधानसभेतील बहुमत पक्षाने पहिल्यांदाच गमावले.पुढे १९९५ साली पवार काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्री होते तेव्हा तर तो पक्ष २८८ पैकी ८० वर खाली आला.१९९९ मध्ये पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढला तरी काँग्रेसने परत ८० जागा मिळवल्या.तर २००४ च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होती तर राष्ट्रवादीला ७१ आणि काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या.याचाच अर्थ काँग्रेस पक्ष पवारांबरोबर नसतो तेव्हा त्याचे फारसे नुकसान होत नाही पण पवार बरोबर असले की मात्र नुकसान होते.याचा अर्थ काय घ्यावा?२००९ च्या लोकसभा आणि बहुदा विधानसभा निवडणुकीसाठी सुध्दा काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादीबरोबर युती असणार आहे.तेव्हा यावेळीही काँग्रेस पक्षाची हानी होण्याचीच चिन्हे आहेत.

    उत्तर द्याहटवा