रविवार, ८ मार्च, २००९

जीपीओमध्ये आता पुस्तकेही

टपाल खाते म्हटले की डोळ्यासमोर पत्रांचे ढीग, त्याचे सॉर्टिंग करणारे पोस्टमन, मनीऑर्डर, कार्यालयातील खिडकीच्या मागे त्रासलेल्या चेहऱयाने बसलेले कर्मचारी असे सर्वसाधारण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भारतीय टपाल खात्याने आपल्या पारंपरिक मानसिकतेमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून टपाल खात्याच्या मुंबईतील छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकाजवळील मुख्य टपाल कार्यालयात (जीपीओ) टपाल साहित्याबरोबरच आता चक्क साहित्य अकादमी या केंद्र शासनाच्या प्रकाशन संस्थेची पुस्तकेही येणाऱया ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भारतात सध्या ही सेवा बिहार राज्यातील पाटणा आणि महाराष्टातील मुंबई येथील जीपीओ येथे सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही सेवा मुंबईतील अन्य टपाल कार्यालयातही सुरू केली जाणार आहे.
बदलत्या काळाचा वेध घेत आणि नव्या आव्हानांना सामोरे जाताना टपाल खात्याने हा आगळा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून जीपीओमध्ये सुरू करण्यात आलेल्या या विक्री कक्षाला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. साहित्य अकादमीतर्फे पुस्तक प्रकाशन आणि साहित्यविषयक विविध उपक्रम व कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात येत असतात. सर्व भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये साहित्य अकादमी विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित करत असते. साहित्य अकादमीची ही पुस्तके अकादमीच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध असतात.मात्र कोणत्याही पुस्तकांच्या दुकानात सहजपणे अन्य प्रकाशकांची पुस्तके उपलब्ध होतात, त्याप्रमाणे साहित्य अकादमीची पुस्तके मिळू शकत नाहीत. त्यामुळे अकादमीची अनेक चांगली पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे आपली प्रकाशने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत या मुख्य उद्देशानेच साहित्य अकादमीने टपालखात्याच्या सहकार्याने हा आगळा उपक्रम सुरू केला आहे. टपाल कार्यालयात आजही विविध कामांसाठी दररोज येणाऱया ग्राहकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. त्याचा फायदा टपाल खाते आणि साहित्य अकादमी या दोघानाही होत आहे.
साहित्य अकादमीतर्फे ही पुस्तके ठेवण्यासाठी जीपीओत स्टॅण्ड ठेवण्यात आले असून त्यावर अकादमीची पुस्तके विक्रीसाठी मांडण्यात आली आहेत. साहित्य अकादमीच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे सचिव के. एस. राव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या जीपीओमध्ये हा विक्रीकक्ष सुरू करण्यात आला आहे. लवकरच मुंबईतील अन्य टपाल कार्यालयातूनही साहित्य अकादमीची पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
साहित्य अकादमीच्या मुंबई कार्यालयाचा पत्ता-मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, शारदा चित्रपटगृह इमारत, नायगाव, दादर-पूर्व
दूरध्वनी क्रमांक-०२२-२४१३५७४४
इमेल- sahitya@vsnl.ney
संकेतस्थळाचा पत्ता-http://www.sahitya-akademi.gov.in

1 टिप्पणी: