रविवार, १ मार्च, २००९

लिटिल चॅम्प्स लागले परीक्षेच्या तयारीला

मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा नवा उच्चांक गाठून सहभागी ‘लिटील
चॅम्प्स’ना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले. कार्यक्रम संपला असल्यामुळे आता हे सर्व लिटिल चॅम्प्स वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. मात्र या अभ्यासाबरोबरच ‘पंचरत्न’-भाग दोन या नव्या आल्बमची तयारी आणि राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही ते सर्व जण व्यस्त आहेत. ‘सारेगमप’च्या महाअंतिम फेरीच्या वेळेस युनिव्हर्सल कंपनी आणि झी-मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व लिटिल चॅम्प्सचा आल्बम ‘पंचरत्न’ या नावाने प्रकाशित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ‘पंचरत्न’चा पहिला भाग नुकताच प्रकाशित झाला आहे. ही ध्वनिफीत असून त्यात सर्व लिटिल चॅम्पसनी ‘सारेगमप’ मध्ये म्हटलेल्या गाण्यातील काही निवडक गाणी देण्यात आली आहेत. आता ‘पंचरत्न’च्या दुसऱ्या भागाची तयारी करण्यात येत असून लवकरच हा भाग प्रकाशित होणार आहे. या भागात सर्व लिटिल चॅम्प्सनी गायलेली पूर्णपणे नवीन गाणी असणार आहेत. सध्या हे सर्व लिटील चॅम्प्स मुंबईत आहेत. आज वांद्रे येथील युनिव्हर्सल कंपनीच्या कार्यालयात या सर्वाची प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमवेत भेट घडविण्यात आली. सेटवर जशी त्यांची धमाल सुरू असायची तशीच ती येथेही सुरू होती. ‘सारेगमप’चे पर्व संपले असले तरी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही सर्वजण भेटतच असतो. त्यामुळे कार्यक्रम संपला आहे असे वाटतच नाही. सध्या आम्ही सर्वजण वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागलो असल्याचे रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांनी सांगितले. ‘सारेगमप’च्या पर्वासाठी आम्ही गेले सहा महिने मुंबईतच होतो. त्यामुळे शाळेत बुडालेला अभ्यास आम्ही भरून काढत असून आता वार्षिक परीक्षा जवळ आल्यामुळे अभ्यासाच्या तयारीला लागलो असल्याची एकमुखी प्रतिक्रिया या सर्वानी व्यक्त केली.मुग्धा म्हणाली की, माझी चौथीची वार्षिक परीक्षा पुढील महिन्यात २३ मार्चपासून सुरू होत असून बुडालेला अभ्यास आणि वार्षिक परीक्षेचीही तयारी मी सुरू केली आहे. तर आर्याने सांगितले की, आम्ही सर्वजण भेटत असलो तरी पल्लवीताई, अवधुतदादा व वैशाली ताई आणि कार्यक्रमातील सर्व दादांना मात्र आम्ही ‘मीस’ करत आहोत. मी आता नववीची परीक्षा देणार आहे. ‘सारेगमप’च्या पर्वातील माझ्या खास मैत्रिणी अवंती आणि शमिका व मी आम्ही कायम फोनवरून एकमेकींच्या संपर्कात असतो. तर कार्तिकी म्हणाली की, मी यंदा सहावीची परीक्षा देणार असून अभ्यासाबरोबरच माझ्या बाबांकडेच गाणे शिकणेही सुरू आहे.मी सध्या आठवीच्या अभ्यासावर जोर देत असून माझे वैयक्तिकरित्या गाणे शिकणे सुरू असल्याचे रोहित म्हणाला तर प्रथमेशने सांगितले की, मी यंदा नववीची परीक्षा देणार असून सध्या अभ्यास जोरात सुरू आहे. त्याचबरोबर आम्ही सगळेच आमच्या नव्या आल्बमच्याही तालमी करत आहोत.
शेखर जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा