मंगळवार, २४ मार्च, २००९

साहित्य संमेलन की कुस्तीचा आखाडा

महाबळेश्वर येथे नुकतेच ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा एक सोहळा आहे. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्यिक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, वाचक आणि साहित्यप्रेमी मंडळी एकत्र येण्याचे मोठे काम होत असते. संमेलनाच्या ठिकाणी असणाऱया पुस्तक प्रदर्शनाला हजारो वाचक व साहित्यप्रेमी मंडळी भेट देऊन पुस्तके चाळतात, हाताळतात आणि विकत घेतात. अशा या साहित्य सोहळ्यातून विचारांचे आदानप्रदान होणे अपेक्षित असते. मात्र गेल्या काही वर्षातील मराठी साहित्य संमेलने पाहता हा उद्देश साध्य होत नाही, असे दिसून येत आहे. संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासूनच वादविवाद, भांडणे व्हायला सुरुवात होत असून संमेलन पार पडेपर्यंत ती सुरुच असतात. तसेच गेल्या काही वर्षात ही साहित्य संमेलने राजकारणी मंडळींनी हायजॅक केल्यामुळे व आयोजनातील भपकेबाजपणा, खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे, व्यासपीठावर राजकारणी मंडळींची असलेली उपस्थिती आदी विविध कारणांमुळेही सातत्याने वादाच्या भोवऱयात सापडली आहेत. संमेलनाध्यक्ष निवडणुकीचे राजकारण, वाद आणि भांडणांमुळे अनेक ज्येष्ठ साहित्यिक निवडणुकीच्या या राजकारणापासून चार हात लांब राहणेच पसंत करतात. गेल्या काही वर्षातील वाद, भांडणे याची परंपरा महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनातही कायम राखली गेली. महाबळेश्वरच्या थंड हवेतही यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून साहित्य संमेलनांमध्ये हे वाद वाढीस लागले आहेत. गेल्या वर्षी सांगली येथे झालेल्या संमेलनात ठाले-पाटील यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी काढलेल्या उद्गारामुळे मोठे वादळ उठले होते. तर यंदाच्या वर्षीही ठाले-पाटील यांनी मुक्ताफळे उधळली. त्यामुळे ठाले-पाटील आणि वाद असे जणू समीकरणच झाले आहे. खऱे तर ८२वे साहित्य संमेलन राज्यात किंवा भारतात न होता सॅनहोजे येथे घेण्याचे ठाले-पाटील यांनी नक्की केले होते. मात्र महामंडळाच्या घटनेनुसार साहित्य संमेलन हे महाराष्टात किंवा भारतात होणे आवश्यक आहे. ते भारताबाहेर घ्यायचे असेल तर त्यासाठी पहिल्यांदा महामंडळाच्या घटनेत बदल करणे आवश्यक होते. मात्र ठाले-पाटील यांचा हे संमेलन सॅनहोजे येथे घेण्याचा आटापीटा सुरू होता. या निर्णयाच्या विरोधात प्रखर टीका झाल्यानंतर अखेर पळवाट काढण्यात येऊन ठाले-पाटील यांनी सॅनहोजेचे संमेलन पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन म्हणून घेण्याचे ठरवले आणि ८२ वे संमेलन महाराष्टात झाले.
संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्या संतसूर्य तुकाराम या कादंबरीतील काही वादग्रस्त वाक्यांवरून झालेला गदारोळ, त्यानंतर वारकरी संप्रदायाने संमेलन न होऊ देण्याचा दिलेला इशारा, डॉ. यादव यांचा राजीनामा, प्रकाशक सुनील मेहता यांनी महाबळेश्वर येथे येऊन घातलेला गोंधळ, ठाले-पाटील यांची अरेरावी आणि डॉ. यादव यांच्या भाषणाच्या प्रती न वाटण्याचा घेतलेला निर्णय अशा काही गोष्टींमुळे हे संमेलनही वादाच्या भोवऱयात सापडले. राज्य़ शासन दरवर्षी या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेसनाला २५ लाख रुपयांची देणगी देत असते. दरवर्षी संमेलनाच्या निमित्ताने अशी भांडणे आणि वादहोत असतील आणि साहित्याच्या नावावर कुस्तीचा आखाडा केला जात असेल तर देणगी द्यावी की नाही यावरही विचार होणे आवश्यक आहे. संमेलनाच्या अध्यक्षाला कोणतेही अधिकार नसतात. त्यामुळे एकदा संमेलन पार पडले की वर्षभर तोकेवळ शोभेचा गणपीच असतो. संमेलनांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च, राजकारणी मंडळींचे वाढते वर्चस्व, भांडणे पाहता दरवर्षी संमेलन भरवणे आवश्य आहे का, दोन वर्षातून एकदा संमेलन भरवले तर फारसे काही नुकसान होणार नाही. साहित्य महामडंळ आणि साहित्य संस्था, मराठी पुस्तक प्रकाशक आणि विक्रेते, साहित्यिक, वाचक यांनी एकत्र येऊन खरोखऱच गंभीरपणे विचार केला पाहिजे.
साहित्य महामंडळाने आपल्या सर्व घटक आणि संलग्न संस्थांना बरोबर घेऊन मराठी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठीतील उत्तमोत्तम पुस्तके इंग्रजी आणि भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी कायम स्वरुपी योजना हाती घेतली पाहिज. संमेलाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी, राजकीय मंडळींचे लांगूनचालन, भांडणे आणि वाद न करता ही संमेलने कुस्तीचा आखाडा न ठरता खऱया अर्थाने साहित्याचा आनंद सोहळा व्हावीत, अशीच सर्वसामान्य साहित्यप्रेमी आणि रसिकांची अपेक्षा आहे.

1 टिप्पणी:

  1. कुसुमाग्रजांनी पण म्हंटलं होतं की साहित्य सम्मेलनं ही संकल्पना २१ व्या शतकात कालबाह्य ठरेल... ते खरं ठरलंय...
    ठाले पाटील या व्यक्तिला मिडीयानेच डोक्यावर घेउन नाचलंय.. आणि त्याला मोठं करुन ठेवलंय.. असो.. आता तरी शुध्दिवर येउन त्याच्या विरुद्ध मोहिम मिडियानेच सुरु करावी.
    बे एरियामधे राजा ट्रव्हल कंपनिला टेंडर न बोलावता दिलेले कॉंट्रेक्ट.. अरे शोध पत्र्कारिता काय करतेय हल्ली?

    उत्तर द्याहटवा