गुरुवार, ५ मार्च, २००९

विश्वात्मके मराठी ग्रंथव्यवहार


इंटरनेट आणि खासगी उपग्रहवाहिन्यांच्या वाढत्या आक्रमणामुळे मराठी ग्रंथव्यवहार आणि वाचनसंस्कृती धोक्यात आली असल्याची चर्चा नेहमी होत असते. काही प्रमाणात ते खरेही असले तरी त्याचा बाऊ न करता सध्याच्या युगाचा परवललीचा शब्द असलेल्या संगणक आणि इंटरनेटचाच वापर करून मराठी ग्रंथव्यवहार आणि वाचनसंस्कृती जगाच्या कानाकोपऱयात नेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मराठी साहित्यप्रेमी आणि वाचकांमध्ये मेहता मराठी ग्रंथजगत आणि साहित्यसूची ही मासिके परिचित आहेत. मराठी वाचकांमध्ये या मासिकांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या दोन मासिकांनी सुरू केलेल्या संकेतस्थळांमुळे अनिवासी मराठी भारतीय मंडळीही थेट इंटरनेटच्या माध्यमातून हवी ती मराठी पुस्तके खरेदी करू शकतील. यामध्ये मराठी पुस्तके, नवीन प्रकाशने, मराठी साहित्य विश्वातील घडामोडी, पुस्तके आणि लेखक यांची माहिती देण्यात आली आहे.
मेहता मराठी ग्रंथजगतच्या www.mehtapublishinghouse.com संकेतस्थळावर मराठी लेखकांच्या नावानुसार विविध वाङ्मयप्रकार पुस्तकाच्या नावासह सर्च करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मराठीतील विविध पुस्तकांची यादी आकारविल्ह्यांनुसार पाहता येऊ शकते.विशेष म्हणजे प्रत्येक पुस्तकाचा थोडक्यात सारांश, पुस्तकातील निवडक भाग, पुस्तकाचे मुखपृष्ठ, वृत्तपत्रातील समीक्षण याचीही माहिती आहे. तसेच कोणाला नवीन पुस्तकांविषयी काही माहिती हवी असेल तर ती ईमेलमार्फत पाठविण्याचीही सोय आहे. मराठी मेहता ग्रंथगत हे मासिकही या संकेतस्थळावर वाचता येऊ शकते. मेहता पब्लिशिंग हाऊसची पुस्तके, टी बुक क्लब,लेखकांशी भेट, अनुवादित पुस्तके, एखादा विशिष्ट लेखक आणि त्याची आजवरची पुस्तके याचीही माहिती केवळ एका क्लिकवर मिळू शकते.
साहित्यसूची मासिकाने मराठी पुस्तके वाचा आता इंटरनेटवर असे म्हटले आहे. साहित्यसूचीच्या www.erasik.com या संकेतस्थळावर सुमारे पाच हजार मराठी पुस्तकांची सूची असून या पुस्तकांची थोडक्यात माहिती पुस्तकाच्या मुखपृष्ठासह उपलब्ध आहे. याच ठिकाणी साहित्यसुगंध या नावाने उपलब्ध असलेल्या पुस्तकांचे वेबदुकान असून साहित्यसूची हे मासिकही येथे वाचता येऊ शकते. या संकेतस्थळावर अन्य प्रकाशन संस्था आणि त्यांची प्रकाशने यांचीही माहिती मिळते.मराठी आणि इंग्रजी पुस्तक प्रकाशनाच्या व्यवहारात पॉप्युलर प्रकाशन ही संस्थाही जुनी आहे. त्यानीही www.popularprakashan.com या नावाने आपले संकेतस्थळ सुरू केले आहे. नॅशनल बुक ट्रस्ट ही केंद्र शासनाची संस्था असून त्यांच्यातर्फेही मराठी पुस्तके प्रकाशित केली जातात. पुस्तकांचा प्रसार आणि समाजामध्ये वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ही संस्था काम करत आहे. www.nbtindia.com असे त्यांचे संकेतस्थळ आहे. तसेच साहित्य अकादमी या केंद्र शासनाच्या संस्थेचेही www.sahitya-akademi.gov.in असे संकेतस्थळ आहे.
मराठी साहित्यविश्व आणि ग्रंथव्यवहाराची समग्र माहिती या संकेतस्थळांवरून मिळण्यास मोठी मदत होत आहे. मराठी साहित्यप्रेमी, वाचक, अभ्यासक, विद्यार्थी या सर्वांसाठी ही माहिती उपयुक्त आहे. जगभरातील मराठी साहित्यप्रेमी आता ऑनलाईन पुस्तकखरेदीही करू शकतात. त्यामुळे मराठी साहित्यविश्व आणि ग्रंथव्यवहार विश्वात्मके झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा