शुक्रवार, ६ मार्च, २००९

आरोग्य आपल्या हाती


सध्याच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे पूर्वीच्या पिढीच्या तुलनेच आत्ताच्या तरुण पिढीला आरोग्याच्या विविध समस्या भेडसावताना दिसतात. सॉफ्टवेअर किंवा आयटी क्षेत्रातील नोकऱयामुळे वेळी-अवेळी खाणे, जेवणाची ठराविक वेळ नसणे, भूक लागलेली असताना फास्ट फूड किंवा जंक फूड खाणे, चहा, कॉफी, दारू किंवा थंडपेय पिण्याच्या सवयीमुळेही आपण विविध रोगांना आमंत्रण देत असतो. बदते वातावरणही त्याला कारणीभूत आहे. अशा वेळी आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी नेमके काय करणे आवश्यक आहे, त्यासाठी काय केले पाहिजे, आहार कसा असावा, छोट्या आणि किरकोळ आजारांसाठी अॅलोपॅथीच्या औषधांचा मारा न करता किंवा सतत डॉक्टरांची औषधे न घेता आपल्याला काही करता येईल का, असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात.सध्या आरोग्याबाबत लोकांमध्येही जागृती निर्माण झाली आहे. अॅलोपॅथीच्या दुष्परिणामांमुळे लोक आयुर्वेद किंवा अन्य पर्यायी उपचार पद्धतींकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. या विषयावर मराठीमध्येही अनेक उपयुक्त आणि सर्वांनी कायम संग्रही ठेवावी अशी पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत.परंतू ही पुस्तके कोणती, त्याची माहिती असतेच असे नाही. किंवा पुस्तके घरी असतातही पण त्यात सांगितलेली दिनचर्या, आहार आणि घरगुती औषधे वापरणे काही जणांना कमीपणाचे वाटते. त्यामुळे ही लोक त्याचा वापरही करत नाहीत. मात्र अशा पुस्तकातून सांगितलेले उपाय आणि साध्या साध्या गोष्टी जर आपण आचरणात आणल्या तर त्याचा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला फायदाच होणार आहे.आज मी अशाच काही पुस्तकांची थोडक्यात ओळख करून देणार आहे. ही पुस्तके आपल्या घरी असावीतच परंतू लग्न,वाढदिवस किंवा अन्य काही कारणांनी ती आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनाही भेट द्यावीत, असे सुचवावेसे वाटते.
असेच एक संग्राह्य पुस्तक आहे वैद्य आप्पाशास्त्री साठे यांचे घरगुती औषधे. या पुस्तकात सुमारे ३२८ घरगुती औषधांची
माहिती आणि त्यांचे औषधी उपयोग सांगण्यात आले आहेत. पुस्तकाच्या शेवटी घरगुती औषधांची रोगवार सूची देण्यात आली आहे. यातील अनेक औषधे आपल्या ओळखीची आणि नेहमीच्या वापरातील आहेत. नवनीत प्रकाशनाने आरोग्यविषयक अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यात निसर्गोपचार,अॅक्युप्रेशर, रसाहार, योग, शिवांबू चिकित्सा, लोहचुंबक चिकित्सा आदी विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. या सर्व पुस्तकांचे मूल्यही सर्वसामान्यांनाहीसहज परवडण्यासारखे आहे. अॅक्युप्रेशरवरील देवेंद्र वोरा यांचे आपले आरोग्य आपल्या हातात, माणेकलाल पटेल यांचे शंभर वर्षे निरोगी राहा ही पुस्तके पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी आहेत. याच प्रकाशनाचे आहार हेच औषध हे पुस्तही संग्राह्य आहे. पुस्तकात अन्नधान्य आणि आहार, कडधान्ये, गरम मसाले, भाज्या, फळे यांची सविस्तर माहिती आणि त्याचे औषधी उपयोग सोप्या पद्धतीने सांगण्यात आले आहेत. आहारातील गुणदोष दाखवणारा तक्ता यात आहे.संत श्री आसारामबापू आश्रमाने प्रकाशित केलेली आरोग्यिनधी भाग एक व दोन ही पुस्तकेही वाचनीय आणि संग्राह्य आहेत.
पुण्यातील शुभदा-सारस्वत प्रकाशनाने प्रकाशित केलेले आणि भा. का. गर्दे यांनी संकलित केलेले धन्वंतरी तुमच्या घरी हे पुस्तक तर अत्यंत उपयुक्त आणि संग्राह्य व भेट देण्यासाठी उत्कृष्ट असे आहे. या पुस्तकात गर्दे यांनी सुमारे चारशेहून अधिक आजारांवर आयुर्वेद, होमिओपॅथी, बाराक्षार, चुंबकचिकित्सा, सूर्यकिरण चिकित्सा या पद्धतींतील औषधे सुचवली आहेत. या पुस्तकाची वैशिष्ट्ये म्हणजे सर्व उपचार पद्धतींची शास्त्रीय बैठक सोप्या भाषेत समजावून सांगितली असून ही सर्व औषदे सहज उपलब्ध होणारी आहेत. हल्ली आजीबाईचा बटवा किंवा फॅमिली डॉक्टर ही संकल्पना इतिहासजमा होत चालल्याने सर्वसामान्य माणसाला घरच्या घरी काही मर्यादेपर्यंत निर्धास्तपणे प्रयत्न करून निरोगी जीवन कसे जगता येईल, या विचाराने व उद्देशाने गर्दे यांनी अनुभव घेतलेल्या उपायांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.
मनोरमा प्रकाशनने प्रकाशित केलेले डॉ. सौ. अमिता नगर्सेकर यांचे ऋतुचर्या आणि आपले आरोग्य हे पुस्तकही संग्राह्य आहे. मराठी महिन्यांमध्ये आपण शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शऱद, आणि हेमंत असे सहा ऋतू मानण्यात आले आहेत.मराठी आणि इंग्रजी कालगणनेत हे ऋतू नेमके कधी येतात, या ऋतूंमध्ये आपली दिनचर्या आणि आहार कसा असावा त्याचे सोपे मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे. प्रत्येकाने त्या त्या ऋतूत आपल्या प्रकृतीची योग्य ती काळजी घेतली तर आपले आरोग्य नक्कीच चांगले राहील, असा ठाम विश्वास या पुस्तकातून सर्वानाच मिळेल.
ही सर्व पुस्तके म्हणजे अंतिम शब्द नक्कीच नाही.ही केवळ काही उदाहणादाखल म्हणून पुस्तके म्हणता येतील. आणखीही अशी काही अनेक संग्राह्य पुस्तके आहेतही मात्र त्याविषयी पुन्हा कधीतरी.

२ टिप्पण्या: