सोमवार, ९ मार्च, २००९

विश्वव्यापी तुकाराम

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आणि शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका, तुका म्हणे पाहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, असे सांगणाऱया संत तुकाराम महाराज यांची अभंगगाथा आता माहितीच्या महाजालात अर्थात नेटवर उपलब्ध झाली आहे. www.tukram.com या संकेतस्थळावर देहू येथील श्री विठोबा-रखुमाई देवस्थान संस्थानच्या सौजन्याने या संकेतस्थळावर तुकाराम गाथेची देहू प्रत उपलब्ध करून देण्यात आली असून ती डाऊनलोड केली तर गाथेतील सुमारे चार हजारांहून अधिक ओव्या वाचता येऊ शकतात. तुकाराम यांची गाथा आणि चरित्र माहितीच्या महाजालात आल्यामुळे संत तुकाराम हे विश्वव्यापी झाले आहेत.
तुकाराम डॉट कॉम या संकेतस्थळाची निर्मिती १७ फेब्रुवारी २००२ मध्ये करण्यात आली. पेशाने सिव्हिल इंजिनिअर असणारे दिलीप धोंडे हे या संकेतस्थळाचे प्रकल्प समन्वयक असून डॉ. सदानंद मोरे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, देवेन राक्षे आणि त्यांच्या सहकाऱयांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. दिवंगत बॅरिस्टर बाबाजी गणेश परांजपे यांना हे संकेतस्थळ समर्पित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सात गट तयार करण्यात आले असून त्यात बाळगोपाळांसाठी, लेख,कलादालन, देहू दर्शन गाथा, रंगभूमी, ताजाकलम यांचा समावेश आहे. अॅनिमेशन तंत्राच्या सहाय्याने मुलांसाठी चित्रमय गोष्टी आणि तुकारामांच्या काव्यपंक्ती येथे आहेत.संत तुकाराम यांच्याविषयी बा.ग. परांजपे, राम बापट, दिलीप चित्रे, सदानंद मोरे, दिलीप धोंडगे, पुरुषोत्तम यशवंत देशपांडे,ज्ञानेश गवळे, श्रीधर पोटे आदींचे माहितीपूर्ण लेख आहेत. दिलीप चित्रे यांनी तुकोबांच्या अनुवादित केलेल्या नऊ अभंगांचा समावेश विश्व साहित्य कोशात करण्यात आला असून ते नऊ अभंग येथे वाचायला मिळतात.
तुकारामांचे विविध अभंग आता मराठीसह हिंदी, कोकणी, सिंधी, संस्कृत, गुजराथी, बंगाली, उडिया, कन्नड, तामिळ, तेलगू आदी प्रादेशिक भाषांमंध्ये आहेत. तर इंग्रजी, फ्रेंच, रशियन, जर्मन, स्पॅनिश, नेदरलॅण्ड आदी भाषेतही अभंग आणि तुकाराम यांच्याविषयीचे लेख या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. संकेतस्थळावर संत तुकाराम यांचे चरित्र विविध भाषांमध्ये देण्यात आले आहे.
या संकेतस्थळाला आत्तापर्यंत लाखो लोकांनी भेट दिली असून जगातील सुमारे १३५ देशांमध्ये हे संकेतस्थळ पाहिले आणि वाचले जात आहे. संकेस्थळावर गेस्टरुम या नावाने एक गट तयार करण्यात आला असून तेथे संकेतस्थळाला भेट देणारी मंडळी आपले मनोगत व्यक्त करतात. रवीद्रनाथ टागोर (बंगाली), डॉ. आनंदप्रकाश दिक्षित व श्रीराम शिकारखाने (हंदी), दिलीप चित्रे (जर्मन) एल्सा क्रॉस (स्पॅनिश)तसेच महात्मा गांधी यांनी तुकोबांच्या काही अभंगांचा केलेला अनुवाद पाहायला मिळतो. बाबाजी गणेश परांजपे यांनी काही वर्षांपूर्वी तुकारामांचे अभंग संकलित करून त्याचे पुस्तक प्रकाशित केले होते.येत्या वर्षभरात हे पुस्तकही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा