रविवार, १५ मार्च, २००९

साहित्य संमेलनात वांग्याच्या भरीताची मेजवानी

महाबळेश्वर येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलन प्रतिनिधी म्हणून नोंदणी करून सहभागी होणाऱ्या साहित्यप्रेमींना तीन दिवसांच्या भोजनात अन्य रुचकर पदार्थाबरोबरच खास वांग्याच्या भरीताची मेजवानी मिळणार आहे. संमेलनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी वांग्याच्या भरीताचा हा खास बेत ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून संमेलनातील भोजनाच्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. संमेलन ज्या जिल्ह्यात किंवा ज्या गावात होत असेल, त्या ठिकाणाचे खास खाद्यपदार्थ भोजनात ठेवण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. संमेलनात सहभागी होणारे प्रतिनिधी, निमंत्रित आणि मान्यवरांसाठी तीन दिवसांच्या भोजन व्यवस्थेत रोज वेगवेगळा मेनू ठेवण्यात येतो. त्यामुळे साहजिकच येत्या २० ते २२ मार्च दरम्यान महाबळेश्वर येथे होणाऱ्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडूनही त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाबळेश्वरच्या संमेलनात खास वांग्याच्या भरिताचा बेत ठरविण्यात आला आहे.
वांग्याचे झणझणीत भरीत आणि भाकरी किंवा पोळी म्हटली की चोखंदळ खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. थंडीच्या दिवसात तर वांग्याचे भरीत म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. येथे मार्च महिन्यातही बऱ्यापैकी थंड असते. त्यामुळे आयोजकांनी येणाऱ्या पाहुण्यांना खास वांग्यांचे भरित खाऊ घालायचे ठरवले आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेची महाबळेश्वर शाखा, चौफेर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
आमच्या महाबळेश्वरची वांगी प्रसिद्ध आहेत. ही वांगी खास भरिताची म्हणूनही ओळखली जातात. त्यामुळे संमेलनाच्या तीन दिवसांच्या भोजनाच्या मेनूत आलेल्या पाहुण्यांना या खास वांग्यांच्या भरिताची मेजवानी आम्ही देण्याचे ठरवले असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष बबनराव ढेबे यांनी ‘मुंबई वृत्तान्त’ला सांगितले.
संमेलनासाठी सुमारे दीड हजार साहित्यप्रेमी, रसिक आणि वाचकांची संमेलन प्रतिनिधी म्हणून नोंदणी होईल. तर उद््घाटन सोहळा आणि अन्य परिसंवाद व कार्यक्रमांना सुमारे तीन ते चार हजार रसिक उपस्थित राहतील, असा विश्वासही ढेबे यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा