मंगळवार, ३१ मार्च, २००९

हे कसले राष्ट्रवादी हे तर राष्ट्रघातकी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि नाही, नाही म्हणत असले तरी पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे शरद पवार यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे सध्या जोरदार गदारोळ उडाला आहे. पवार हे हिदू असले तरी ते ज्या कॉंग्रेसी परंपरेतील आहेत, त्या परंपरेनुसार हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात बोलणे आणि मुसलमानांचे लांगूनचालन करण्यासाठी कोणत्याही थराला जाणे, ही कॉंग्रेसी संस्कृती आहे. त्यामुळे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना अटक केल्यानंतर देशभरातील बॉम्बस्फोट थांबले असल्याचे वक्तव्य करून समस्त हिंदूंचा रोष ओढवून घेतला आहे.त्यांच्या या वक्तव्याने देशभरातील सर्व हिंदूना त्यांनी आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे. जणूकाही मालेगाव बॉम्बस्फोट होण्यापूर्वी भारतात, महाराष्ट्रात सर्व काही आलबेल होते, येथील धर्मांध अल्पसंख्यांक (जे भारतात राहून भारताशी प्रामाणिक आहेत, पाकिस्तान जिंकला तर येथे फटाके फोडून आनंद साजरा करत नाहीत किंवा धर्मांध अल्पसंख्यांकांच्या विरोधात बोलण्याची धमक दाखवतात ते सर्व वगळून) अगदी गुण्यागोविंदाने राहात होते, असे तर पवार यांना सुचवायचे नाही ना. अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी किती लाचार व्हायचे आणि कोणत्या थरापर्यंत जायचे, याचे साधे भानही पवार यांच्यासारख्या जाणत्या नेत्याने ठेवले नाही, ही शरमेची बाब आहे. याच भाषणात पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अन्य हिंदुत्वादी संघटनांवर जोरदार टीका केली.
पवार ही व्यक्ती स्वार्थ आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारी आहे. आपले राजकीय गुरु यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते वसंतदादा पाटील आणि कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी केले आहे.काही वर्षांपूर्वी कॉंग्रेसमधून बाहेर पडून एकवेळ मी हिमालयात जाईन परंतु कॉंग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार नाही, असे वक्तव्य करणाऱया पवार यांनी दिवंगत राजीव गांधी यांच्या काळात पुन्हा त्यांचे पाय धरत कॉंग्रेसमध्येच प्रवेश केला. सोनिया गांधी राजकारणात आल्यामुळे आता आपल्याला पंतप्रधानपद कॉग्रेस पक्षात राहून मिळणार नाही, याची पुरेपुर खात्री झाल्यानंतर त्यांना सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. याच शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी कुख्यात दाऊद इब्राहिमच्या साथीदारांना बरोबर घेऊन विमानातून प्रवास केला होता. तेलगी प्रकरणात त्यांच्याच नावावर संशयाची सुई आहेच.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण करण्यात तर पवार यांनीच सुरुवात केली. पप्पू कलानी, भाई व हितेंद्र ठाकूर अशा मंडळींना पवार यांनी निवडणुकीची उमेदवारी देऊन निवडून आणले. पवार यांचा पक्ष केंद्र शासनात सहभागी आहे. केंद्रात ते स्वत मंत्री आहेत. तरीही शक्य असेल तेथे ते केंद्रशासनाच्या विरोधात कृती करत असतात. एकीकडे हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांवर टीका करायची आणि त्याच वेळी मला एकदा तरी पंतप्रधान होऊ दे हो, असा राग आळवत एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे भाजपशी गुपचूप हातमिळवणी करायची. काही महिन्यांपूर्वी शिवसेनाही पवारांच्या जाळ्यात सापडली होती. त्यासाठी राज्यात ज्यांच्याबरोबर हिंदुत्वाच्या पायावर युती आहे, त्या भाजपलाही सोडचिठ्ठी देण्यास निघाली होती. पवारांचा सर्व इतिहास माहिती असूनही शिवसेनेतील काही रडतराउतांमुळे हे सर्व चालले होते. या लोकसभा निवडणुकीत समजा शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी देऊन पवारांबरोबर घरोबा केला असता, तर त्याचा फटका शिवसेनेलाही नक्कीच बसला असता. येथे भाजप किंवा शिवसेनेचे समर्थन करण्याचा उद्देश नाही. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कॉंग्रेसने देशातील अल्पसंख्यांकांचे केवळ लांगूनचालन केल्यामुळे आणि बहुसंख्य हिंदूना नेहमीच दुर्लक्षित केल्यामुळेच भाजप आणि शिवसेना तसेच अन्य हिंदुत्ववादी संघटनांना जनाधार मिळाला, असल्याचे विसरून चालणार नाही. शिवसेना आणि भाजप यांचे हिंदुत्वही कधी बेगडी असल्याचे दिसून आले असले तरी देशात हेच दोन राजकीय पक्ष हिंदुत्वाच्या बाजूने किमान बोलणारे तरी आहेत, हे काही कमी नाही.
देशात बहुसंख्यांक असलेल्या हिंदूना दुबळे समजून, त्यांना कोणतीही किंमत न देता कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, डावे तसेच अन्य राजकीय पक्षांनी नेहमीच अल्पसंख्यांकांचे त्यातही केवळ मुसलमानांचे लांगूनचालन करण्यातच धन्यता मानली आहे. त्यामुळे पवारांकडून आणि त्यातही ज्यांची ओळख केवळ विश्वासघातकी अशीच आहे, अशा माणसाकडून काहीच अपेक्षा करण्यात गैर नाही. ज्या पवारांनी मालेगाव बॉंम्बस्फोटाचे आरोपी पकडल्यानंतर देशात एकही बॉम्बस्फोट झाले नाहीत, असे वक्तव्य केले, त्या पवार यांना लोकसभा निवडणुकीनंतरही भाजप, शिवसेनेने जवळ करू नये. केंद्रात सत्ता स्थापन करायला जागा कमी पडत असतील तर एकवेळ सत्तास्थापन करणार नाही. परंतु सत्तेसाठी पवार यांच्यासारख्या माणसाची मदत घेणार नाही किंवा पवारांना जवळ करून त्यांना पंतप्रधान किंवा उपपंतप्रधान पदही मिळू देणार नाही, असे मनाशी पक्के ठरवायला हवे. (अर्थात हे माझे मत झाले) राजकाऱणी हे पक्के निगरगट्ट आणि गेंड्यांच्या कातडीचे असतात. मग ते कोणत्याही राजकीय पक्षांचे असोत. त्याला भाजप व शिवसेनाही अपवाद नाहीत. इतके होऊनही सत्ता मिळत असेल तर पवार भाजप-शिवसेनेच्या गळ्यात गळा घालायला आणि भाजप-शिवसेनावालेही त्यांना आपल्याकडे वळवायला कमी करणार नाहीत.
त्यामुळे आता सर्व काही मतदारांच्या हातात आहे. हिंदू असूनही अशा प्रकारची वक्तव्ये करून समस्त हिंदू समाजाला आरोपीच्या पिंजऱयात उभे करणारे शरद पवार हे राष्ट्रवादी की राष्ट्रघातकी आहेत, हे आता सुज्ञ मतदारांनीच ठरवावे. त्यांच्या पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जे जे उमेदवार उभे आहेत, त्यांना आणि शरद पवार व त्यांच्या पक्षाला सुजाण मतदारांनी जरुर जागा दाखवून द्यावी, एवढीच अपेक्षा.

सोमवार, ३० मार्च, २००९

हिंदूनो तुम्ही मार खात राहा...

गर्व से कहो हम हिंदू है, कोणी आपल्या गालावर मारले तर दुसरा गाल पुढे न करता गालावर मारणारा तो हातच तोडून टाका, अशी वक्तव्ये केली म्हणून सध्या वरुण गांधी वादात सापडले आहेत. यापूर्वीही हिंदुत्व आणि हिंदूंच्या बाजूने ज्यांनी ज्यांनी आपली भूमिका मांडली त्या सर्व हिंदुत्ववादी मंडळीनाही तथाकथित पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षवाद्यांच्या टीकेचे प्रहार झेलावे लागले आहेत. (येथे वरुण आणि हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱयांची तुलना करत नाही) ज्या देशात हिंदू बहुसंख्येने (सध्या तरी पुढचे काय माहीत)आहेत, तेथे बहुसंख्यांकांच्या विरोधात बोलणे ही सध्या फॅशन झाली आहे. कालच एका राष्टवादी नेत्याने मालेगावच्या बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना अटक केल्यामुळे देशभरातील बॉम्बस्फोट थांबले असल्याचे सांगून समस्त हिंदूंना आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे.जणू मालेगावच्या बॉम्बस्फोटांपूर्वी भारतात अगदी शांतता होती. येथील अहिंदू भारतात गुण्यागोविंदाने नांदत होते. कुठेही बॉम्बस्फोट, धर्म आणि जातीयतेच्या नावाखाली दंगली होत नव्हत्या. उगाचच हिंदुत्ववादी मंडळी गरीब, बिचाऱया मुसलमानांच्या विरोधात बोलत असतात.
१२ मार्च १९९३ चे मुंबईतील बॉम्बस्फोट, त्यानंतर पश्चिम रेल्वेवर घडविण्यात आलेले बॉम्बस्फोट, मशिदीवरून गणपती विसर्जनाची मिरवणूक गेली, ढोल-ताशे वाजवले म्हणून भावना दुखावल्या गेल्या आणि मग येथील काही धर्मांध मंडळींना राहवले नाही आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने याला उत्तर दिले.या आणि अशा अनेक गोष्टी गेल्या काही वर्षातील. परंतु गेल्या हजारो वर्षांपासून हिंदुस्थानावर जी परकीय आक्रमणे झाली, येथील संपत्ती लुटून नेली गेली, येथील अनेक वास्तू, देवळे ज्यांनी जमीनदोस्त केल्या, ती मंडळी कोण होती, त्यांचा धर्म काय होता, काहींनी तलवारीच्या जोरावर तर काहींनी पाव किंवा अंडे खायला देऊन मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर केले गेले ते कोणी केले, फाळणीच्या वेळी पाकिस्तानातील हिंदूंवर जे अत्याचार झाले, त्यांना नेसत्या वस्त्रानिशी भारतात परतावे लागले त्याला कोण जबाबदार होते, हे सर्वही येथील हिंदूनीच घडवून आणले असे म्हणायचे आहे का,
आजपर्यंत हिंदूनी फक्त मारच खाल्ला. सहिष्णू म्हणूनच त्यांची आजवर ओळख राहिली आहे. खरे तर आपल्या धर्मातील सर्व देवांच्या हातातही शस्त्रे आहेत, ती काही केवळ शोभेसाठी नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या सहनशक्तीची मर्यादा संपली की तो ही आक्रमक होतो आणि आपल्यावर अन्याय, अत्याचार करणाऱयाचा बदला घेतो. विशिष्ट जात आणि धर्माचे सर्व लोक वाईट आणि त्यांच्या विरुद्धच हिंदूनी वागले पाहिजे, असा याचा अर्थ नाही. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून जे साचत गेले आहे, ते सहनशक्तीची मर्यादा संपल्यानंतर कुठेतरी उफाळून येणारच ना आणि यालाही गेल्या अनेक वर्षांपासून मुसलमानांचे लांगुनचालन करणारे राजकीय पक्ष आणि राजकारणी मंडळी तसेच सोयीनुसार हिंदुत्वाची भूमिका घेणाऱया आणि सोयीचे नसेल तेव्हा ती सोडून देणाऱया व आपल्याला तथाकथित हिंदुत्ववादी राजकीय पक्ष म्हणवून घेणारी मंडळींही तितकीच जबाबदार आहेत. संसदेवर हल्ला झाल्यानंतर तेव्हा केंद्रात सत्ताधारी असणाऱया रालोआने धमक दाखवून भारतातील काश्मीर आणि अन्य ठिकाणचे दहशतवाद्यांचे तळ का उध्वस्त केले नाहीत, पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर का हल्ला केला नाही, हाज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान का बंद केले नाही, आताही कंधहार घडले तर मी दहशतवाद्यांना पुन्हा सुखरुप परत घेऊन जाईन असे म्हणणारे किंवा पाकिस्तानच्या जीनाचे कौतुक करणारे भोंदू हिंदुत्ववादी या सगळ्याला जबाबदार आहेत.
या ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वचनाची आठवण होते. हिंदुत्वाची खूण सांगताना ते म्हणतात, देवाचे गुण भक्तात उतरतात. गाईला देव मानता, गाईची पूजा करता करता हिंदूंचे राष्टच्या राष्ट गाय होऊन गेले. त्याने दाती तृण धरले. आता जर कोणाच्या पायावर आपले हे हिंदुत्व उभारायचे असेल तर ते सिंहाच्या पायावरच उभारले पाहिजे. मदोन्मत्त दिग्गजांची गंडस्थाने एका झेपेसारखी फोडून पाडून टाकणारी क्रकच तीक्ष्ण नखे ज्याची आहेत, तो नृसिंह आता पुजला पाहिजे. हिंदुत्वाचे ध्येय ते, खूण ती, गाईचा खूर नव्हे.
तेव्हा आपणच विचार करा, असाच मार खात राहायचे की नृसिंहाची पूजा करायची...

रविवार, २९ मार्च, २००९

ठाल्यांची ठोकशाही

अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या मनमानी आणि ठोकशाही कारभारामुळे महामंडळाच्या एकूणच कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सॅनहोजे येथे ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्यासाठी ठाले-पाटील यांनी जो आटापिटा केला आणि त्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रात किंवा भारतात होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन न भरविण्यापर्यंतही त्यांची मजल गेली होती. महामंडळाच्या घटनेनुसार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्रात किंवा भारतातच झाले पाहिजे. भारताबाहेर साहित्य संमेलन भरवायचे असेल तर त्यासाठी महामंडळाच्या घटनेत बदल करणे गरजेचे होते. मात्र ठाले-पाटील यांनी सॅनहोजे येथे ८२ वे संमेलन भरविण्याचा निर्णय घेतला. विदर्भ साहित्य संघ आणि महामंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता याला कोणी विरोधही केला नाही. अखेर वृत्तपत्रे व साहित्य वर्तुळातून प्रखर टीका झाल्यानंतर ठाले यांनी नमते घेतले आणि सॅनहोजे येथे पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन होईल, अशी पळवाट काढली आणि ८२ वे साहित्य संमेलन महाराष्ट्रातच घेण्यास ते राजी झाले. ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे संमेलनाध्यक्षांशिवाय पार पडले. आजवर झालेल्या साहित्य संमेलनांच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले. आणि त्यालाही ठाले-पाटील यांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्यांनी अगोदर खबरदारी घेऊन काही उपाययोजना केली असती तर अध्यक्ष निवडीचा पेच आणि संमेलनाध्यक्षांशिवाय संमेलन पार पडणे या गोष्टी टाळता आल्या असत्या. डॉ. यादव यांची ‘संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी, त्यातील तुकाराम यांच्याविषयी असलेला वादग्रस्त मजकूर, त्यावर वारकरी संप्रदायाकडून उमटलेली प्रतिक्रिया, डॉ. यादव यांचा राजीनामा, डॉ. यादव अध्यक्ष असतील तर हे संमेलन होऊ न देण्याचा इशारा आदी सर्व बाबी काही एका दिवसात घडल्या नाहीत. संमेलनाच्या अगोदर किमान पंधरा ते वीस दिवस हा गदारोळ सुरू होता. त्यामुळे भविष्यात असाधारण परिस्थिती उद्भवली तर काय करायचे, त्यातून कसा तोडगा काढायचा याविषयी ठाले-पाटील यांना अगोदरच पूर्वतयारी करता आली असती. आपल्या घरातही एखादे लग्नकार्य किंवा तत्सम मोठा समारंभ असेल तर सर्वसामान्य माणूसही काही अडचण निर्माण झाली तर काय करायचे, त्याचा विचार करून पूर्वनियोजन करतो. साहित्य संमेलनासारख्या इतक्या मोठय़ा कार्यक्रमासाठी ठाले-पाटील यांनी ही खबरदारी का घेतली नाही, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तसेच महामंडळाच्या घटनेनुसार संमेलन मार्गदर्शन समितीची बैठकही का बोलावली नाही, असे सवाल विचारण्यात येत आहेत. महामंडळाच्या घटनेनुसार (परिशिष्ट-अ, नियम-१२) साहित्य संमेलनाच्या कार्याचे नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन समिती असते. संमेलनाची निमंत्रक संस्था, आयोजक यांना साहित्य संमेलनाच्या बाबतीत ही समिती वेळोवेळी मार्गदर्शन करत असते. ठाले-पाटील यांनी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक तर बोलावलीच नाही पण मार्गदर्शन समितीची बैठकही घेतली नाही. या प्रकाराला महाराष्ट्र साहित्य परिषदही तितकीच जबाबदार आहे. हा सर्व वाद सुरू असताना संमेलन निमंत्रक म्हणून महामंडळाची किंवा मार्गदर्शन समितीची बैठक बोलावण्याचा आग्रह का धरला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसाच प्रकार डॉ. यादव यांच्या भाषणाच्या प्रती वितरित न करण्याबाबत ठाले-पाटील यांच्याकडून घडला. महामंडळाच्या घटनेत संमेलन प्रतिनिधींचे अधिकार असे एक प्रकरण आहे. त्यानुसार संमेलनाच्या खुल्या अधिवेशनातील ठरावांवर मत देणे, संमेलनाची कार्यक्रम पत्रिका, अध्यक्षीय भाषण आणि अन्य साहित्य मिळणे हा संमेलनासाठी शुल्क भरून नोंदणी केलेल्या प्रत्येक प्रतिनिधींचा अधिकार आहे. ठाले-पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अध्यक्षीय भाषणाची प्रत संमेलनासाठी आलेल्या प्रतिनिधींना न देऊन महामंडळाच्या घटनेचीही पायमल्ली केली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी होणारे खुले अधिवेशन आणि ठरावांचे वाचन हे संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखालीच झाले पाहिजे, असे महामंडळाची घटना सांगते. मात्र येथे संमेलनाध्यक्ष नसूनही ठरावांचे वाचन केले गेले. त्यामुळे ते ठरावही वैध ठरत नाहीत.
सांगली येथील ८१ व्या साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण यांच्यावर टीका करून ठाले-पाटील यांनी नवा वाद ओढवून घेतला होता. महाबळेश्वर येथे झालेल्या संमेलनातही उद्घाटन सोहळ्यात त्यांनी अशीच काही मुक्ताफळे उधळली होती. संमेलनास उपस्थित असलेले प्रतिनिधी आणि वृत्तपत्रातून त्यावर टीका झाल्यानंतर शेवटच्या दिवशी ठाले-पाटील यांनी त्या भाषणातील मते आणि विचार हे आपले स्वत:चे असून ते महामंडळाचे नाहीत, अशी सारवासारव केली. महामंडळाच्या सर्व घटक संस्था, संलग्न संस्था आणि अपवाद वगळता महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे ठाले-पाटील यांच्या या मनमानी आणि घटनाविरोधी वागण्याला समर्थन देण्याचे आणि त्यांच्या ताटाखालचे मांजर होण्यामागचे रहस्य काय? असा प्रश्न साहित्य वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

शनिवार, २८ मार्च, २००९

स्वीस बॅंकेतील काळा पैसा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी स्वीस बॅंकेतील भारतीयांचा काळा पैसा भारतात परत आणावा, अशी मागणी करून एका कळीच्या मुद्दयाला हात घातला आहे. राजकीय पक्षाचे नेते असूनही यादव यांनी ही मागणी केली आहे. आपल्या मागणीचा भारतातील राजकारणी, आगामी निवडणुक आणि मतदारांवर त्याचा नेमका काय परिणाम होईल, त्याचा विचार यादव यांनी नक्कीच केला असेल. विचार न करता त्यांनी अशी मागणी केली असेल असे वाटत नाही. गेल्या काही वर्षांपासून स्वदेशी आंदोलनाचे नेते राजीव दीक्षित हीच मागणी करत आहेत. देशभरात ठिकठिकाणी व्याख्याने देऊन त्यांनी हा गंभीर विषय भारतीय नागरिकांसमोर आणला होता. मात्र त्यावेळी एकाही राजकीय पक्षाने अथवा नेत्याने याविषयी आपले मत व्यक्त केले नव्हते.
यादव यांच्या म्हणण्यानुसार स्वीस बॅंकांमध्ये सगळ्यात जास्त पैसे ठेवणाऱयांमध्ये भारतीयांचा मोठा सहभाग आहे. या बॅंकेतील भारतीयांची गुंतवणूक ही १ हजार ४५६ अब्ज डॉलर्स इतकी आहे. ही रक्कम भारतावर असलेल्या परकीय कर्जाच्या तेरा पट व देशाच्या अर्थसंकल्पाच्या आठ पट आहे. स्वीस बॅंकेतील ही सर्व रक्कम भारतात आणली तर देशावरचे सर्व परकीय कर्ज फिटेल व मोठी रक्कम शिल्लक राहील.
भारतीय राजकारणी मंडळींपैकी एकाही नेत्याने या विषयावर आपली ठोस भूमिका अद्याप मांडलेली नाही. राजाकारणात आणि मतदार व लोकांना दाखवायला ही मंडळी वेगळी असली तरी अशा विषयांवर त्यांचे तुझ्या गळा माझ्या गळा असे असते. त्यामुळे तेरी भी चूप आणि मेरी मी चीप, असा मामला असतो. राजीव दीक्षित आपल्या भाषणातून तसेच काही पुस्तकातून सांगतात की, स्वीस बॅंकेच्या नियमानुसार आपल्या बॅंकेच्या खात्यात कोणी आणि किती रक्कम ठेवली आहे, हे त्यांना सांगणे बंधनकारक नाही. ही बाब गुप्त ठेवण्यात येते. त्यामुळेच आपल्या येथील राजकारणी त्यांचे पैसे स्वीस बॅंकेत ठेवतात. आमच्या भारतातील ज्या काही मंडळींचा पैसा स्वीस बॅंकेत आहे, ती सर्व रक्कम ही भारताची संपत्ती आहे आणि ती आमच्या देशाला परत मिळाली पाहिजे, असा कायदा/विधेयक जर भारतीय संसदेत मंजूर झाले तर स्वीस बॅंकेला ही सर्व रक्कम भारताला देणे आवश्यक ठरेल. आणि यात काही नवीन नाही. आफ्रिकेतील काही देशांनी असा कायदा करून स्वीस बॅंकेतील रक्कम परत मिळवली आहे.
खरे म्हणजे हा विषय अत्यंत गंभीर असून त्यावर देशातील सर्व प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था व संघटना, ग्राहक संघटना, समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर आदी मंडळींनी रान उठवून हा विषय धसास लावला पाहिजे. स्वीस बॅंकेतील भारतीयांचा काळा पैसा भारतात परत आणण्यासाठी संपूर्ण देशभरात जनआंदोलनाची लाट उसळली पाहिजे. स्वीस बॅंकेतील हा पैसा सर्वसामान्य भारतीयांचा नक्कीच नाही. भारतातील सर्वपक्षीय राजकीय नेते, उद्योगपती आणि व्यावसायिक, गुंड, अभिनेते व अभिनेत्री, बिल्डर आदी मंडळींचाच हा पैसा असणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी अन्न, वस्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजाही आपण सर्वाना पुरवू शकलेलो नाही, ही लाजीरवाणी बाब आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी, शिक्षण आदींचीही तीच गत आहे. मग येथे केंद्रात आणि राज्यांमध्ये वर्षानुवर्षे राज्य असणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी नेमके काय केले, देशाच्या विकासाच्या नावाखाली फक्त आपलाच विकास करून घेतला. सध्याच्या परिस्थितीत जे राजकीय पक्ष आहेत ते सर्व भ्रष्टाचारी आहेत. दगडापेक्षा वीट मऊ, असा प्रकार त्यांच्यात असेल. सगळ्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची वये झाली तरी खूर्चीची आणि सत्तेची त्यांची हाव काही सुटत नाही. राजकारण सोडून बाकी सगळ्या क्षेत्रात वयाची ५८ किंवा ६० वर्षे झाली की माणसाला निवृत्त व्हावेच लागते. मग राजकाऱण्यांनाही निवृत्ती का नको. तुम्हाला जो काही पराक्रम गाजवायचा असेल तो कोणत्याही पदावर न राहता नुसता सल्ला देऊन गाजवा ना. पण आपल्या येथे ते होणार नाही. सध्याच्या एकाही राजकीय पक्षाकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून आता ती अपेक्षाच नाही.
भुलथापा देऊन किंवा लोकांचे लक्ष भलत्याच गोष्टींकडे वळवून त्यांना काही काळ मूर्ख बनवता येऊ शकते. त्यामुळे येत्या काही वर्षात अशी वेळ येणार आहे की, लोकांच्या सहनशक्तीचा अंत झालेला असेल. राजकीय पक्ष आणि नेत्यांविषयी लोकांच्या मनात तीव्र घृणा निर्माण होऊन भर चौकात व रस्त्यात राजकारण्यांना लोक फटकावतील. सध्याचे एकूण वातावरण पाहता तो दिवस फार काही दूर नाही, असे वाटते. गरज आहे ती सर्वसामान्य नागरिक आणि मतदारांच्या एकजुटीची तसेच या व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी प्रखर इच्छाशक्तीची...

गुरुवार, २६ मार्च, २००९

गुढीपाडवा आणि कडूनिंब

उद्या २७ मार्च रोजी हिंदू नववर्षाचा (ज्यांना हिंदू या शब्दाचे वावडे आहे त्यांच्यासाठी भारतीय संस्कृतीचा)पहिला दिवस अर्थातच गुढीपाडवा हा सण आहे. या दिवशी आपण घरोघरी गुढ्या-तोरणे उभारून हा नववर्ष दिन साजरा करतो. या दिवशी उभारलेल्या गुढीमध्ये आणि दरवाजावर लावण्यात येणाऱया तोरणातही कडुनिंबाची पाने असतात. गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानण्यात येतो. गुढीपाडवा म्हणजेच वर्षप्रतिपदा, अक्षय्यतृतीया आणि विजयादशमी हे तीन आणि बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीपाडवा असे हे साडेतीन मुहूर्त आपल्या हिंदू धर्मात मानण्यात येतात.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येतात. त्याची मुहूर्तमेढ डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानने रोवली. सुमारे पन्नास ते पंचाहत्तर हजार आबालवृद्ध पारंपरिक वेषात या यात्रेत सहभागी होत असतात. खरोखर डोंबिवलीतील ही नववर्ष स्वागतयात्रा पाहण्यासारखी असते. डोंबिवलीने सुरू केलेल्या या नववर्ष स्वागतयात्रेपासून स्फूर्ती घेऊन आता राज्यात विविध ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी ही स्वागत यात्रा काढण्यात येत असते. ३१ डिसेंबर या दिवशी नववर्ष स्वागताच्या नावाखाली जे काही केले जाते, ती आपली संस्कृती नव्हे. त्यामुळे आपल्या नववर्ष दिनी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी आनंदात आणि उत्साहात तसेच आगळ्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्याच्या उद्दे्शाने ही स्वागत यात्रा सुरू करण्यात आली.
गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. वि.के. फडके संपादित संपूर्ण चातुर्मास या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार ब्रह्मदेवाने हे जग उत्पन्न केले तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा हा होता. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला. त्यावेळी लोकांनी गुढ्या व तोरणे उभारून आपला आनंद व्यक्त केला. नारदमूनींना साठ पुत्र झाले. हीच साठ संवत्सरे असून या प्रत्येक संवत्सराचा पहिला दिवस देवांनी गुढ्या व तोरणे उभारून साजरा केला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा असल्याचे काही पौराणिक कथा सांगतात.
शालीवाहन शकाच्या वर्षाचाहा पहिला दिवस मानण्यात येतो. गुढीपाडव्याच्या दिवशी घरासमोर गुढी उभारण्यात येते. एका मोठ्या काठीच्या वरच्या टोकाला तांबडे वस्त्र आणि फुलांची माळ बांधून त्यावर लोटी किंवा गडू ठेवण्यात येतो. ही सजवलेली काठी गुढी मानून तिची पूजा करण्यात येते. धर्माशास्त्रात यालाच ब्रह्मध्वज असे म्हटले जाते. या दिवशी कडूनिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. कोवळ्या पानांमध्ये मिरी, हरभऱयाची डाळ, ओवा व मीठ घालून त्याची चटणी करून खाल्ली जाते, अशी माहितीही या पुस्तकात देण्यात आली आहे.
धार्मिक प्रथेनुसार या दिवशी कडूनिंब खाल्ला जात असला तरीही आयुर्वेदाच्या दृष्टीनेही त्याला खूप महत्व आहे. कडुनिंबाची पाने, फुले, फळे, मुळे आणि खोड अशा पाच अंगांचा उपयोग होते. वैद्य आप्पाशास्त्री साठे यांच्या घरगुती औषधे या पुस्तकात कडूनिंब आणि त्याच्या औषधी उपयोगाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हे पुस्तक सर्वांसाठी संग्राह्य आणि वाचनीय आहे. त्यातील काही माहिती सगळ्यांच्या माहितीसाठी येथे देत आहे.
गुढीपाडकडूनिंबाच्या सालीने कोणत्याही प्रकारचा ताप असला तरी थांबतो. ताप थांबवणाऱया कुटकी, काडेजिराईत, गुळवेल आदी औषधांबरोबर कडूनिंबाची साल ज्वरावर दिली जाते. या सालीचा काढा सकाळ-संध्याकाळ घेतल्यास ताप उतरतो.
कडूनिंबाच्या सालीच्या आतील गाभ्यास खोड असे म्हणतात. हे रोज उगाळून घेण्याचा प्रघात आहे. कडूनिंबाची फुले परसाकडे साफ होण्यासाठी घेतात. याच्या वाळलेल्या फुलांचे वस्त्रगाळ केलेले चूर्ण सुमारे तीन ग्रॅम गरम पाण्याबरोबर रोज रात्री घेतले तर शौचास साफ होते.
कडूनिंबाच्या बियांपासून तेल काढतात ते बाजारातही उपलब्ध आहे. त्वचारोगांवर (कोरडी खरुज, नायटा, गजकर्ण) हे चोळून लावले तर त्वचारोग बरे होतात.
(अधिक माहितीसाठी जिज्ञासूनी वैद्य आप्पाशास्त्री साठे यांचे घरगुती औषधे हे पुस्तक वाचावे)

बुधवार, २५ मार्च, २००९

संमेलनातील ठरावांना घटनात्मक वैधता नाही

महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी खुल्या अधिवेशनात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीसह विविध ठराव मंजूर करण्यात आले. मात्र महामंडळाच्या घटनेनुसार खुले अधिवेशन हे साहित्य संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होत असते. या संमेलनाला अध्यक्षच नसल्याने मंजूर झालेल्या ठरावांना घटनात्मक वैधता नसल्याचे अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी एक उपचार म्हणून हे विविध ठराव दरवर्षी मंजूर केले जातात. त्यासाठी महामंडळाच्या विषय नियामक समितीची बैठक होऊन त्यात खुल्या अधिवेशनात जे ठराव घेण्यात येणार आहेत, त्यावर चर्चा होते. मात्र महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनात विषय नियामक समितीची रचनाच पूर्ण झाली नाही. त्यामुळे मंजूर झालेल्या ठरावांना काहीच अर्थ उरत नाही. महामंडळाच्या घटनेनुसार साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष, साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष, घटक, संलग्न आणि समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी, संमेलनाच्या महाकोशाचे विश्वस्त, संमेलनाध्यक्षांनी नियुक्त केलेले पाच सदस्य, महामंडळाचे सर्व पदाधिकारी आदी सर्व मंडळी विषय नियामक समितीच्या बैठकीला उपस्थित असणे आवश्यक आहे. महामंडळाच्या घटक व संलग्न संस्थांकडून जे ठराव संमेलनापूर्वी महामंडळाकडे आलेले असतात, त्यावर विषय नियामक समितीच्या बैठकीत चर्चा होऊन ठरावांना अंतिम रूप दिले जाते.
महामंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत डॉ. आनंद यादव यांचा राजीनामा स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचे भाषण संमेलनात वाचून न दाखविण्याचा आणि त्याच्या प्रती न वाटण्याचे ठरविण्यात आले. राजीनामा स्थगित ठेवण्यात आल्याने त्या अनुषंगाने येणाऱ्या अन्य गोष्टीही केल्या जाणार नसल्याचे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितले होते. भाषण वाचून न दाखवणे आणि प्रती न वाटणे हे जर केले गेले नाही तर जे खुले अधिवेशन संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होते आणि त्यात संमेलनाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ठरावांचे वाचन आणि त्याला मंजुरी ही प्रक्रिया तरी का पार पाडण्यात आली, भाषण वितरित न करणे किंवा त्याचे वाचन न करणे या प्रमाणे ठराव मंजूर करण्याची प्रक्रियाही स्थगित का नाही ठेवली, असा सवाल या सूत्रांनी उपस्थित केला. त्यामुळेच महामंडळाच्या घटनेनुसार मंजूर झालेले ठराव अवैध ठरतात, असे या सूत्रांचे म्हणणे आहे.

मंगळवार, २४ मार्च, २००९

साहित्य संमेलन की कुस्तीचा आखाडा

महाबळेश्वर येथे नुकतेच ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्याचा आणि संस्कृतीचा एक सोहळा आहे. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्यिक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते, वाचक आणि साहित्यप्रेमी मंडळी एकत्र येण्याचे मोठे काम होत असते. संमेलनाच्या ठिकाणी असणाऱया पुस्तक प्रदर्शनाला हजारो वाचक व साहित्यप्रेमी मंडळी भेट देऊन पुस्तके चाळतात, हाताळतात आणि विकत घेतात. अशा या साहित्य सोहळ्यातून विचारांचे आदानप्रदान होणे अपेक्षित असते. मात्र गेल्या काही वर्षातील मराठी साहित्य संमेलने पाहता हा उद्देश साध्य होत नाही, असे दिसून येत आहे. संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासूनच वादविवाद, भांडणे व्हायला सुरुवात होत असून संमेलन पार पडेपर्यंत ती सुरुच असतात. तसेच गेल्या काही वर्षात ही साहित्य संमेलने राजकारणी मंडळींनी हायजॅक केल्यामुळे व आयोजनातील भपकेबाजपणा, खर्चाची कोटीच्या कोटी उड्डाणे, व्यासपीठावर राजकारणी मंडळींची असलेली उपस्थिती आदी विविध कारणांमुळेही सातत्याने वादाच्या भोवऱयात सापडली आहेत. संमेलनाध्यक्ष निवडणुकीचे राजकारण, वाद आणि भांडणांमुळे अनेक ज्येष्ठ साहित्यिक निवडणुकीच्या या राजकारणापासून चार हात लांब राहणेच पसंत करतात. गेल्या काही वर्षातील वाद, भांडणे याची परंपरा महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनातही कायम राखली गेली. महाबळेश्वरच्या थंड हवेतही यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या कार्यपद्धतीमुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून साहित्य संमेलनांमध्ये हे वाद वाढीस लागले आहेत. गेल्या वर्षी सांगली येथे झालेल्या संमेलनात ठाले-पाटील यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी काढलेल्या उद्गारामुळे मोठे वादळ उठले होते. तर यंदाच्या वर्षीही ठाले-पाटील यांनी मुक्ताफळे उधळली. त्यामुळे ठाले-पाटील आणि वाद असे जणू समीकरणच झाले आहे. खऱे तर ८२वे साहित्य संमेलन राज्यात किंवा भारतात न होता सॅनहोजे येथे घेण्याचे ठाले-पाटील यांनी नक्की केले होते. मात्र महामंडळाच्या घटनेनुसार साहित्य संमेलन हे महाराष्टात किंवा भारतात होणे आवश्यक आहे. ते भारताबाहेर घ्यायचे असेल तर त्यासाठी पहिल्यांदा महामंडळाच्या घटनेत बदल करणे आवश्यक होते. मात्र ठाले-पाटील यांचा हे संमेलन सॅनहोजे येथे घेण्याचा आटापीटा सुरू होता. या निर्णयाच्या विरोधात प्रखर टीका झाल्यानंतर अखेर पळवाट काढण्यात येऊन ठाले-पाटील यांनी सॅनहोजेचे संमेलन पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन म्हणून घेण्याचे ठरवले आणि ८२ वे संमेलन महाराष्टात झाले.
संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. आनंद यादव यांच्या संतसूर्य तुकाराम या कादंबरीतील काही वादग्रस्त वाक्यांवरून झालेला गदारोळ, त्यानंतर वारकरी संप्रदायाने संमेलन न होऊ देण्याचा दिलेला इशारा, डॉ. यादव यांचा राजीनामा, प्रकाशक सुनील मेहता यांनी महाबळेश्वर येथे येऊन घातलेला गोंधळ, ठाले-पाटील यांची अरेरावी आणि डॉ. यादव यांच्या भाषणाच्या प्रती न वाटण्याचा घेतलेला निर्णय अशा काही गोष्टींमुळे हे संमेलनही वादाच्या भोवऱयात सापडले. राज्य़ शासन दरवर्षी या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेसनाला २५ लाख रुपयांची देणगी देत असते. दरवर्षी संमेलनाच्या निमित्ताने अशी भांडणे आणि वादहोत असतील आणि साहित्याच्या नावावर कुस्तीचा आखाडा केला जात असेल तर देणगी द्यावी की नाही यावरही विचार होणे आवश्यक आहे. संमेलनाच्या अध्यक्षाला कोणतेही अधिकार नसतात. त्यामुळे एकदा संमेलन पार पडले की वर्षभर तोकेवळ शोभेचा गणपीच असतो. संमेलनांवर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च, राजकारणी मंडळींचे वाढते वर्चस्व, भांडणे पाहता दरवर्षी संमेलन भरवणे आवश्य आहे का, दोन वर्षातून एकदा संमेलन भरवले तर फारसे काही नुकसान होणार नाही. साहित्य महामडंळ आणि साहित्य संस्था, मराठी पुस्तक प्रकाशक आणि विक्रेते, साहित्यिक, वाचक यांनी एकत्र येऊन खरोखऱच गंभीरपणे विचार केला पाहिजे.
साहित्य महामंडळाने आपल्या सर्व घटक आणि संलग्न संस्थांना बरोबर घेऊन मराठी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठीतील उत्तमोत्तम पुस्तके इंग्रजी आणि भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी कायम स्वरुपी योजना हाती घेतली पाहिज. संमेलाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी, राजकीय मंडळींचे लांगूनचालन, भांडणे आणि वाद न करता ही संमेलने कुस्तीचा आखाडा न ठरता खऱया अर्थाने साहित्याचा आनंद सोहळा व्हावीत, अशीच सर्वसामान्य साहित्यप्रेमी आणि रसिकांची अपेक्षा आहे.

सोमवार, १६ मार्च, २००९

शतायुषी भव

आपल्या प्रत्येकालाच आपण शतायुषी व्हावे असे वाटत असते. मात्र सध्याच्या फास्टफूडच्या आणि धावपळीच्या जमान्यात ते शक्य होणार नाही, असे वाटते. मात्र आपण आपल्या आरोग्याकडे योग्य प्रकारे लक्ष दिले तर आपल्याला दीर्घायुष्यी होणे शक्य आहे. दीर्घायुष्यी होणे म्हणजे आपण किती वर्षे जगलो एवढाच विचार न करता शेवटच्या श्वासापर्यंत आपण कसे जगलो याला महत्व आहे. लोळागोळा होऊन आणि अंथरुणावर पडून की आपले आरोग्य चांगले ठेवून व शेवटपर्यंत हिंडते-फिरते राहून दीर्घायुष्यी व्हायचे, हे आपण प्रत्येकानेच ठरवायला पाहिजे. आरोग्याची आणि आहार-विहाराची काही पथ्ये पाळली, आयुर्वेदात सांगितल्यानुसार दिनचर्या, व्यायाम आणि आहार घेतला तर दीर्घायुष्यी व निरोगी जीवन जगणे आपल्याला सहज शक्य आहे. हे सर्व सांगायचे कारण काय,असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. नुकतेच माझ्या वाचनात वैद्य प. य. खडीवाले यांनी लिहिलेली शंभर वर्षे जगण्यासाठी काय करावे ही छोटी पुस्तिका वाचनात आली. पुस्तिकेची किंमत अवघी एक रुपया अशी आहे. म्हणजे आपल्याला दीर्घायुष्यी व्हावे असे वाटत असेल तर प्रत्येकाने आवर्जून ही पुस्तिका जरूर वाचावी. सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त अशा या पुस्तिकेची माहिती सगळ्यांना व्हावी, म्हणून आज मी हा विषय घेतला आहे.
माणसाच्या आयुष्यात वार्धक्य आणि मृत्यू हा येणारच. मात्र हा येणारा मृत्यू योग्य आहार विहार आणि औषधी योजनांची युक्तिपूर्वक आणि आपल्या प्रकृतीला सांभाळून योजना केली तर तो नक्कीच दूर ठेवता येऊ शकेल. वैद्य खडीवाले यांनीया विषयाची मांडणी करताना तीन भाग केले आहेत. वय वर्षे पस्तीस ते पच्चावन्न-साठ, साठ ते सत्तर आणि सत्तरीनंतरचे जीवन
अशा तीन भागात त्यांनी विषयाची मांडणी केली आहे. मराठी माणसांच्या प्रकृतीला आणि येथील हवामानाला धरून कोकणात तांदुळ व नाचणी आणि देशावर जोंधळा व ज्वारीच हितकर आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात मधुमेह, स्थौल्य, आमांश, आमवात, संधिवात, मूळव्याध, प्रमेह, हृदयरोग, रक्तदाब, दमा, अर्धांगवात, सायटिका, सूज, मूत्रपिंडाचे आजार, ग्रहणी, अग्निमांद्य, पोटात गॅस धरणे, त्वचाविकार, बुद्धिमांद्य असे विकार होऊ शकतात. या सगळ्या विकारांना शरिात थारा द्यायचा नसेल तर ज्वारी सकाळी आणि जोंधळा सायंकाळी, असे प्रमुख अन्न असायचा हवे. ज्वारीत फाजील कोलेस्टरॉल नाही. उलट पोट भरण्याकरता आणि कितीही श्रम शरीराला सहन होतील, अशी उर्जा आहे. त्याला तूप लागत नाही. भाकरी शिळी झाली तरी खराब होत नाही. नुसत्या पाण्याबरोबर ती खाता येते. कधी ज्वारी थंड पडते. त्यांनी त्यात बाजरी मिसळून भाकरी करावी. बाजरीत ज्वारीचे गूण आहेत पण ती उष्ण असल्याचे वैद्य खडीवाले या पुस्तकात सांगतात.
नाचणी किंवा नागली हे धान्य अशक्त व्यक्ती हलका कोठा असणारे, दीर्घ काळचा ताप आणि अन्य आजारातून उठण्याकरता आहे. भरपूर श्रम करणाऱयांसाठी त्याची गरज नाही. कडधान्-तूर, मूग, मसूर, उडीद, रभरा, वाटाणा हे सगळे पचवायची तारण्यात पचनशक्ती हवी. पोटात वायू धरू नये, म्हणून आले, लसूण, जिरे खावे. भाज्यांमध्ये लसणीचा वापर न करता स्वतंत्रपणे लसूण नियिमतपणे खावी. दैनंदिन आहारात फाजील तेल, तूप, मीठ, मिरची, तिखट मसाला नसावा. डालडा किंवा तत्सम वनस्पतीजन्य तेल टाळावे. कारण त्यामुळे केस, दृष्टी, हृदय मेदासंबंधी विकार बळावतात.बटाटा, मांसाहार, डालडा, चहा, फरसाण, मिठाई, बेकरीचे पदार्थ खाऊ नयेत तर स्वयंपाकात काय वापरावे, रोग होणार नाही, त्यासाठी तोंडीलावणे, न्याहरी, पूरक अन्न काय असा प्रश्न पडू शकतो. कडधान्यामध्ये मूग हे श्रेष्ठ असून तोंडी लावण्यासाठी पुदीना, आले, लसूण, जिरे, कोथिंबीर, आमसूल, दोडक्याच्या किंवा दुधी भोपळ्याच्या शिरा, ताजे आवळे, दुधीभोपळा, पडवळ, कारले, घोसाळे, काटेरी वांगी, पांढरा कांदा, गोवार, मुळा, चाकवत, पालक, लाल माठ, शेवगा, शेपू, मेथी, खजूर खाता येऊ शकेल, अशी शूचनाही ते करतात.
पुढे या पुस्तकात साठ ते सत्तर या वयातील आहाराची काळजी, सत्तरीनंतचा आहार, पंचावन्न ते साठ या काळातील आहार-विहार, निरामय दीर्घायु जीवनासाठी वनस्पतींचे योगदान अशी प्रकरणे आहेत. या विषयाची आवड असणाऱयांनी ही पुस्तिका जरुर वाचावी. वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था यांनी ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. वैद्यक ग्रंथ भांडार, ३७१, शनिवार पेठ, थत्ते वाडा, गोकुळ हॉलसमोर, पुणे-३० (दूरध्वनी-०२०-२४४५०३५४)किंवा मॉडर्न बुक डेपो, ५३६, शनिवार पेठ, प्रभात टॉकीजसमोर, बाजीराव रस्ता, पुणे (दूरध्वनी-०२०-२४४५५४५६) येथे ही पुस्तिका मिळू शकते. वैद्य खडीवाले यांची अन्य आयुर्वेदीक विषयावरील पुस्तके अल्प किंमतीची असून ती सर्वसामान्याना विकत घेणे अगदी सहज परवडू शकेल. मात्र आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची आणि आरोग्य टिकवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेले सोपे उपाय, आहार-विहार आणि दिनचर्या पाळण्याची खरी गरज आहे. त्यासाठी आयुष्याच्या अखेरपर्यंत आपले आरोग्य उत्तम राहायला हवे असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. आत्ता मजा करून घेऊ, पुढचे पुढे बघू, अशी वृत्ती असू नये.
वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन संस्था
२५० ड, शनिवार पेठ, पुणे-३०
दूरध्वनी- ०२०-२४४५९६१८/२४४५०४७४

रविवार, १५ मार्च, २००९

साहित्य संमेलनात वांग्याच्या भरीताची मेजवानी

महाबळेश्वर येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलन प्रतिनिधी म्हणून नोंदणी करून सहभागी होणाऱ्या साहित्यप्रेमींना तीन दिवसांच्या भोजनात अन्य रुचकर पदार्थाबरोबरच खास वांग्याच्या भरीताची मेजवानी मिळणार आहे. संमेलनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी वांग्याच्या भरीताचा हा खास बेत ठेवण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून संमेलनातील भोजनाच्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. संमेलन ज्या जिल्ह्यात किंवा ज्या गावात होत असेल, त्या ठिकाणाचे खास खाद्यपदार्थ भोजनात ठेवण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. संमेलनात सहभागी होणारे प्रतिनिधी, निमंत्रित आणि मान्यवरांसाठी तीन दिवसांच्या भोजन व्यवस्थेत रोज वेगवेगळा मेनू ठेवण्यात येतो. त्यामुळे साहजिकच येत्या २० ते २२ मार्च दरम्यान महाबळेश्वर येथे होणाऱ्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडूनही त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाबळेश्वरच्या संमेलनात खास वांग्याच्या भरिताचा बेत ठरविण्यात आला आहे.
वांग्याचे झणझणीत भरीत आणि भाकरी किंवा पोळी म्हटली की चोखंदळ खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. थंडीच्या दिवसात तर वांग्याचे भरीत म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध. येथे मार्च महिन्यातही बऱ्यापैकी थंड असते. त्यामुळे आयोजकांनी येणाऱ्या पाहुण्यांना खास वांग्यांचे भरित खाऊ घालायचे ठरवले आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेची महाबळेश्वर शाखा, चौफेर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
आमच्या महाबळेश्वरची वांगी प्रसिद्ध आहेत. ही वांगी खास भरिताची म्हणूनही ओळखली जातात. त्यामुळे संमेलनाच्या तीन दिवसांच्या भोजनाच्या मेनूत आलेल्या पाहुण्यांना या खास वांग्यांच्या भरिताची मेजवानी आम्ही देण्याचे ठरवले असल्याचे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष बबनराव ढेबे यांनी ‘मुंबई वृत्तान्त’ला सांगितले.
संमेलनासाठी सुमारे दीड हजार साहित्यप्रेमी, रसिक आणि वाचकांची संमेलन प्रतिनिधी म्हणून नोंदणी होईल. तर उद््घाटन सोहळा आणि अन्य परिसंवाद व कार्यक्रमांना सुमारे तीन ते चार हजार रसिक उपस्थित राहतील, असा विश्वासही ढेबे यांनी व्यक्त केला.

शुक्रवार, १३ मार्च, २००९

माहितीचा अधिकार

शासकीय किंवा निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांच्या कामकाजात जास्तीत जास्त पारदर्शकता यावी आणि सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयातील कामकाजाची माहिती व्हावी, अधिकृत कागदपत्रे मिळावीत या उद्देशाने माहितीच्या अधिकाराचा कायदा करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य स्तरावर माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी या संदर्भात वेळोवेळी दिलेला लढाही माहितीच्या अधिकारासाठी महत्वाचा ठरला आहे. आज विविध प्रसार माध्यमातून माहिती अधिकार कायद्याचा प्रचार झाला असला तरी ही माहिती नेमकी कोणाकडून आणि कशी मिळवावी, त्याबाबत सर्वसामान्य लोकांना अद्यापही नेमकी माहिती नाही.
महाराष्ट राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महान्यूज या नावाचे अधिकृत वेबपोर्टल आहे. या वेबपोर्टलवर माहितीचा अधिकार या विषयीची माहिती नुकतीच माझ्या वाचनात आली. या माहितीचा सर्वाना उपयोग व्हावा आणि ती जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचावी या उद्देशाने मी ही माहिती माझ्या ब्लॉगवर देत आहे.
माहितीच्या अधिकाराअंतर्गत कोणाकडून,कोणती आणि कशी माहिती मिळवायची, त्यासाठी अर्ज कुठे व कसा करायचा तसेच राज्यातील मुख्य माहिती आयुक्तांसह सर्व विभागीय माहिती आयुक्तांच्या कार्यालयाचे पत्ते व दूरध्वनीही येथे आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी थेट राज्य शासनाच्या htpp://www.mahanews.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
-------------------------------------------------------------------------------------
माहितीचा अधिकार अधिनियम-२००५
न्यायालये, संसद, विधिमंडळ, महामंडळे, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद,पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, आर्थिक लाभ घेणार्‍या सहकारी किंवा खाजगी सेवाभावी संस्था, मंत्रालयातील विविध विभाग अशा कार्यालयांच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होण्याच्या दृष्टीने माहितीचा अधिकार अधिनियम-२००५ लागू करण्यात आला आहे. विविध कार्यालयातील कामकाजाची माहिती, कागदपत्रे नागरिकांना मिळवता यावी म्हणून, अशा अधिकाराची व्यवहार्य पद्धत आखून देण्याकरिता केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग स्थापन करण्यात आला आहे. माहिती मिळविण्याची इच्छा असणार्‍या नागरिकांना ती पुरविण्याकरिता तरतूद म्हणून या कायद्याची अंमलबजावणी केली आहे.
माहितीचा अधिकार
माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही कार्यालयाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती ! माहिती जाणून घेणे, आवश्यक कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे. असा हा अधिकार २००५ या वर्षामध्ये सर्वांनाच मिळाला आहे. या अधिकाराचा वापर करुन परिसरात सुरु असलेल्या कामांची माहिती घेता येते. उदा. - न्यायालयातर्फे आवश्यक त्या निकालाची प्रत घेता येते. विधिमंडळाकडून मंत्रिपरिषदेच्या निर्णयाची प्रत घेता येते. शासकीय कार्यालयाकडून अहवाल, नमुने, प्रसिद्धी पत्रके आदी कागदपत्रांची झेरॉक्स घेता येते. सहकारी संस्थांकडून इतिवृत्त, निर्णयाच्या प्रती, आर्थिक व्यवहाराची माहिती घेता येते.

कोणाकडून घेऊ शकतो माहिती
माहिती देणारी कार्यालये, संस्था यांनी आपल्या कामकाजाची माहिती स्वत:हून प्रसिद्ध करुन सूचना फलकावर लिहायची आहे. अथवा अशा माहितीची संचिका प्रत कार्यालयाच्या बाहेर जनतेसाठी ठेवायची आहे. त्यात कार्यालयाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, कार्यालयाची वेळ, जनमाहिती अधिकार्‍यांची नावे, कार्यालयाची कामकाजाची पद्धत, उद्दिष्टे, कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती, विविध अर्जांचे नमुने, कर्मचार्‍यांची नावे व इतर माहिती, उपलब्ध निधी, लाभार्थ्यांची यादी, योजनांची माहिती, योजनांवर अथवा लाभार्थ्यांवर झालेला खर्च, परिपत्रके, उपलब्ध प्रकाशने व त्याची किंमत, कर्मचार्‍यांचे वेतन, अंदाजपत्रक अशा प्रकारची माहिती वेळोवेळी अद्ययावत करावी. ही माहिती पुढील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्थामधून घेता येते.

1) न्यायालये (सर्व)2) संसद (लोकसभा व राज्यसभा)3) विधिमंडळ (विधानसभा/विधान परिषद), विविध महामंडळे
4) आयुक्त कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये,5) तहसील कार्यालये, जिल्हा परिषदा (अंतर्गत सर्व कार्यालये),
6) पंचायत समिती (अंतर्गत सर्व विभाग), ग्रामपंचायती 7) महानगरपालिका, नगरपालिका
8) गृह विभाग (पोलीस यंत्रणा)9) मंत्रालयीन विविध विभाग तथा सर्व शासकीय कार्यालये
10) शासकीय अनुदानित सहकारी, खाजगी, सेवाभावी संस्था उदा :- साखर कारखाने, खरेदी विक्री संघ, विविध कार्यकारी सोसायट्या, दूध संघ, सहकारी बँका.

अशी मिळवा माहिती
माहिती मिळविण्यासाठी अर्जदार हा कोर्‍या कागदावरसुद्धा जनमाहिती अधिकार्‍याकडे अर्ज करु शकतो. त्या अर्जावर १० रु. चा कोर्ट फी स्टॅम्प लावावा अथवा रोख रक्कम/डिमांड ड्राफ्ट/बँकर्स चेक द्यावा. अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर कोणतेच शुल्क द्यावे लागणार नाही.

असा अर्ज सादर करताना पुढील १२ बाबींची पूर्तता करावी
1) कार्यालयाचे नाव 2) कार्यालयाचा पत्ता 3) अर्जदाराचे संपूर्ण नाव 4) अर्जदाराचा संपूर्ण पत्ता 5) माहितीचा विषय
6) कोणत्या कालावधीची माहिती हवी? 7) कोणत्या प्रकारची माहिती हवी? 8) माहिती, पोस्टाने की स्पीड पोस्टने हवी?
9) अर्जदार दारिद्र्यरेषेखालील आहे काय? (असल्यास रेशन कार्डाची झेरॉक्स जोडावी)10) अर्ज केल्याची तारीख 11) अर्ज केल्याचे ठिकाण 12) अर्जदाराची सही वा अंगठा
संपूर्ण अर्ज भरुन झाल्यावर तो जनमाहिती अधिकार्‍याकडे सादर करावा. पोच घ्यावी. ३० दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.

माहिती मिळण्याचा व अपिलाचा कालावधी
जनमहिती अधिकार्‍याकडे अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती मिळते. जनमाहिती अधिकार्‍याने माहिती नाकारल्यास किंवा समाधान न झाल्यास अपील करण्याचा कालावधी ३० दिवसांचा आहे.

अपिलीय अधिकार्‍याने माहिती नाकारल्यास किंवा समाधान न झाल्यास ९० दिवसांत राज्य माहिती आयुक्ताकडे द्वितीय अपील करता येते.

माहितीसाठीच्या कागदपत्रांचा खर्च

दस्तऐवजाचे वर्णन खर्च
विविध कागदपत्रांची झेरॉक्स एका पानास रु. २
आवश्यक माहितीची सीडी किंवा फ्लॉपी प्रत्येकी ५० रु.
कार्यालयातील कागदपत्रे पहायची असल्यासपहिल्या तासासाठी खर्च नाही.
तासाभरापेक्षा अधिक वेळ पहायची असल्यास-प्रत्येक तासासाठी ५ रु.
आवश्यक माहिती पोस्टाने हवी असल्यास -पोस्टाचा खर्च द्यावा लागतो
अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असेल तर- खर्च लागत नाही.

अपील का, कसे करावे?
१)अर्जदाराने मागितलेली माहिती अपूर्ण, चुकीची, दिशाभूल करणारी असेल किंवा माहिती नाकारल्यास संबंधित अर्जदारास जनमाहिती अधिकार्‍याविरुद्ध अपिलीय अधिकार्‍यांकडे अपील करता येते. हे अपील ३० दिवसांच्या आत करता येते. हा अपिलीय अधिकारी जनमाहिती अधिकार्‍यापेक्षा अधिक अनुभवी असणारा, कामाच्या सर्व बाबी माहिती असलेला असतो. त्याने अनुभवाचा व अधिकाराचा वापर नि:पक्षपातीपणे करावयाचा असतो.

२) अपिलासाठी अर्ज सादर करताना कागदावर २० रुपयांचा न्यायालय मुद्रांक चिकटवावा. अर्जावर नांव, पत्ता, जनमाहिती अधिकार्‍याचा तपशील द्यावा. त्यात कोणती अपेक्षित माहिती मिळाली नाही याचा उल्लेख करावा. एकूणच तक्रारीचे स्वरुप/अपिलाचे कारण स्पष्टपणे लिहावे. शेवटी सही करुन अर्ज दाखल करावा. अर्जाची पोच घ्यावी.

३) अपिलीय अधिकार्‍याकडे अपील दाखल केल्यावर अर्ज केल्याच्या दिनांकापासून ४५ दिवसांच्या आत माहिती मिळू शकते.

दुसरे अपील का, कसे करावे?
१) अर्जदाराने मागितलेली माहिती अपिलीय अधिकार्‍याकडूनही न मिळाल्यास किंवा चुकीची, अर्धवट मिळाल्यास, समाधान न झाल्यास अर्जदार हा दुसरे अपील राज्य माहिती आयुक्तांकडे ९० दिवसाच्या आत करु शकतो.

२) दुसरे अपील करताना पुन्हा पहिल्या अपिलाच्या अर्जाप्रमाणे कृती करावी. अर्जावर २० रुपयांचा मुद्रांक चिकटवून नांव, पत्ता अपिलीय अधिकार्‍याचा तपशील, प्रारंभीच्या जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकार्‍याकडून मिळालेली माहिती व अर्जदाराला अपेक्षित असलेल्या माहितीचा तपशील स्पष्टपणे लिहावा.

३) राज्य माहिती आयुक्त अशा अर्जाची तपासणी करतात. गरज वाटल्यास संबंधित कार्यालयाच्या अधिकार्‍यांना समक्ष बोलावतात किंवा गरज वाटल्यास अर्जदारालाही बोलावतात. त्यानंतर राज्य माहिती आयुक्त निर्णय देतात. त्यांनी दिलेला निर्णय मात्र संबंधितांवर बंधनकारक असतो.

माहिती नाकारल्यास दंड
१) जनमाहिती अधिकार्‍याने वेळेत माहिती दिली नाही. जाणीवपूर्वक नाकारली, किंवा चुकीची, अपूर्ण, दिशाभूल करणारी माहिती दिली किंवा माहितीच नष्ट केली तर, व असे आयोगाचे मत झाल्यास, गुन्हा करणार्‍या माहिती अधिकार्‍यास २५० रु. दंड प्रत्येक दिवसाला केला जातो. मात्र एकूण दंडाची रक्कम २५ हजारांपेक्षा अधिक लादता येत नाही.

२) राज्य माहिती आयोगामार्फत जेव्हा गुन्हा केलेल्या जन माहिती अधिकार्‍याला दंड केला जातो तत्पूर्वी त्याला आपले म्हणणे पुराव्यासह मांडण्याची संधी दिली जाते. अशावेळी आयोग दंडाबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकतो.


माहिती आयुक्तांचे पत्ते

महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त -
डॉ. श्री. सुरेश जोशी
नवीन प्रशासकीय इमारत, १३ वा मजला, मंत्रालयासमोर,
मुंबई-४०० ०३२ दूरध्वनी क्रमांक-०२२-२२०४९१८४/२२८५६०७८

राज्य माहिती आयुक्त (मुंबई व मुंबई उपनगर विभाग)
श्री. रामानंद तिवारी
नवीन प्रशासकीय इमारत, १३ वा मजला, मंत्रालयासमोर,
मुंबई-४०० ०३२ दूरध्वनी क्रमांक-०२२-२२०४९१८४/२२८५६०७८

राज्य माहिती आयुक्त (कोकण विभाग)
श्री. नवीनकुमार
१ ला मजला, कोकणभवन, नवी मुंबई-४००६१४
दुरध्वनी क्रमांक-०२२-२७५७१३२४

राज्य माहिती आयुक्त (पुणे विभाग)
श्री. विजय कुवळेकर
४ था मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल समोर, पुणे-१
दुरध्वनी क्रमांक- ०२०-२६०५०६३३/२६०५०५८०

राज्य माहिती आयुक्त (औरंगाबाद/नाशिक विभाग)
श्री. विजय बाबूराव बोरगे
सुभेदारी गेस्ट हाऊस, विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ,
औरंगाबाद-४३१ ००१
दूरध्वनी क्रमांक- ०२४०-२३५२५४४ फॉक्स क्र. २३५२१३३

राज्य माहिती आयुक्त (नागपूर/अमरावती विभाग)
श्री. विलास भागवत पाटील
रवीभवन, दालन क्र.१७, नागपूर.
दूरध्वनी क्रमांक-०७१२-२५६६८१६
-------------------------------------------------------------------------------------
शब्दांकन : डॉ. संभाजी खराट
(महाराष्ट राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालनालयाच्या 'महान्यूज या अधिकृत वेबपोर्टलच्या सौजन्याने ही माहिती माझ्या ब्लॉगवर देत आहे.)

गुरुवार, १२ मार्च, २००९

गांधी साहित्यावरील कॉपीराईटचा अधिकार संपुष्टात

महात्मा गांधी यांच्या साहित्यावर गेल्या काही वर्षांपासून असलेला नवीजीवन टस्टचा स्वामित्वधनाचा (कॉपीराईट) अधिकार नुकताच संपुष्टात आला आहे. यापूर्वी स्वामित्वधानाचे अधिकार नवजीवन टस्टकडे असल्याने या टस्टशिवाय अन्य कोणत्याही प्रकाशन संस्थेला गांधीजींचे साहित्य प्रकाशित करता येत नव्हते. मात्र हा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता गांधीजींचे साहित्य कोणत्याही प्रकाशन संस्थेला, व्यक्तीला किंवा गांधीप्रेमी मंडळींना प्रकाशित करता येणार आहे.
महात्मा गांधी यांच्या समग्र साहित्यावर असलेला नवजीवन टस्टचा हा अधिकार नुकताच संपुष्टात आला. अहमदाबाद येथील नवजीवन टस्ट या संस्थेला महात्मा गांधी यानीच आपल्या समग्र साहित्याचे अधिकार दिले होते. साहित्याच्या कॉपीराईट कायद्यानुसार ज्या व्यक्ती किंवा संस्थेला हे अधिकार देण्यात आलेले असतात, त्यानाच या कायद्यानुसार संबंधितांचे साहित्य प्रकाशित करया येते. अन्य कोणी जर हे साहित्य प्रकाशित केले तर तो कॉपीराईट कायद्याचा भंग ठरतो. या कायद्याचा भंग करणाऱयाला भारतीय दंड विधानानुसार शिक्षा होऊ शकते. नवजीवन टस्टकडे असलेल्या या अधिकारानुसार महात्मा गांधी यांचे आजवर जे काही साहित्य प्रकाशित झाले ते सर्व याच टस्टने केले होते. मात्र असे असले तरी कॉपीराईटच्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर साठ वर्षानी त्याव्यक्तीच्या साहित्यावरी स्वामित्वधनाचा अधिकार संपुष्टात येऊन ती सार्वजनिक संपत्ती होते.३० जानेवारी १९४८ मध्ये गांधी यांची हत्या करण्यात आली. कॉपीराईट कायद्यानुसार साठ वर्षांनंतर म्हणजे यंदाच्या वर्षी जानेवारीच्या अखेरीस नवजीवन टस्टचा गांधी साहित्यावर असलेला हा अधिकार संपुष्टात आला.हा अधिकार पुन्हा टस्टला मिळावा म्हणून केंद्र शासनाला विनंती करण्यात आली होती. मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला नाही. कॉपीराईटच्या कायद्यानुसार गांधी साहित्यावरील स्वामित्वधनाचा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता भारतातील किंवा जगातील कोणीही प्रकाशक व व्यक्ती आता कोणत्याही भाषेत गांधीजींचे साहित्य प्रकाशित करू शकते.
मुंबई सर्वोदय मंडळ-गांधी बुक सेंटरचे व्यवस्थापक प्रेमशंकर तिवारी यांनी सांगितले की, गांधी साहित्यावरील कॉपीराईटचा अधिकार संपुष्टात आल्यामुळे आता गांधीविचार आणि साहित्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होण्यास मदत होईल. एकाच संस्थेकडे हे अधिकार असल्याने हे साहित्य प्रकाशित करण्यास त्यांच्यावर काही मर्यादा येऊ शकतात. मात्र आता भारतातील किंवा जगातील कोणीही प्रकाशक किंवा व्यक्तीला हे साहित्य प्रकाशित करता येऊ शकेल. ही स्वागतार्ह बाब आहे.

बुधवार, ११ मार्च, २००९

ग्रंथप्रसारक शरद जोशी


संगणक आणि खासगी उपग्रह वाहिन्यांच्या आक्रमणामुळे वाचन संस्कृती धोक्यात आल्याची तसेच मराठी पुस्तकांची पहिलीच आवृत्ती संपायला अनेक वर्षे लागत असल्याची ओरड नेहमीच केली जाते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मराठी प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनी वाचकांपर्यंत थेट पुस्तके पोहोचविण्यासाठी नवनवीन कल्पना आणि उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पुस्तकांची चांगली विक्री होत असून त्यांच्या अनेक आवृत्याही निघत आहेत. वाचकांकडूनही या पुस्तकांना चांगली मागणी आहे. अक्षरधारा, साहित्ययात्रा आणि अन्य काही संस्था पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातूनही थेट लोकांपर्यंत पोहोचत आहेत. मात्र स्वत ग्रंथविक्रेते किंवा प्रकाशक नसतानाही केवळ मराठी साहित्य आणि पुस्तकांच्या प्रेमापोटी उत्तमोत्तम आणि दर्जेदार मराठी पुस्तके जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत या उद्देशाने माझे वडील शरद जोशी हे गेल्या पन्नास वर्षांपासून मराठी पुस्तकांचा प्रचार-प्रसार संपूर्ण महाराष्टभर करत आहेत. आज वयाच्या ७३ व्या वर्षीही त्यांचे हे काम उत्साहाने सुरू असून ग्रंथप्रसारक शरद जोशी अशी त्यांची ओळख आहे.
पत्रव्यवहारातून ग्रंथप्रसार आणि प्रचार हे त्यांचे वैशिष्ट्य. आपल्या पदराला खार लावून आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांचे हे ग्रंथप्रचार आणि प्रसाराचे काम सुरू आहे. या निमित्ताने त्यांनी आजवर सुमारे पन्नास हजार पत्रे लिहिली आहेत. आपले मित्र, परिचित यांना किंवा कोणाला कुठला पुरस्कार मिळाला की त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठवायचे आणि त्यात चांगल्या पुस्तकांची नावे, नुकतेच वाचलेले पुस्तक, त्याचे लेखक-प्रकाशक, पुस्तकाची थोडक्यात ओळख, वृत्तपत्रातून आलेली पुस्तकांची परीक्षणे आदी माहिती पत्रातून कळवायची. विविध साहित्यप्रेमी व्यक्ती, वाचक, पत्रकार, प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांनाही पत्र पाठवून हा ग्रंथप्रसार केला आहे.केवळ ठाणे, मुंबई, पुणे नव्हे तर महाराष्टातील काही भागांसह कोलकाता, इंदूर, दिल्ली, अहमदाबाद येथे पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्रातून हा ग्रंथप्रसार सातत्याने सुरू असतो.
पत्रलेखनाबरोबरच विविध वृत्तपत्रातून मराठी साहित्य, लेखक, प्रकाशक तसेच एकूणच ग्रंथव्यवहाविषयी आलेले माहितीपूर्ण लेख, बातम्यांच्या झेरॉक्स कॉपी काढून त्याही मित्रपरिवार आणि साहित्यप्रेमींमध्ये वाटणे, चांगली पुस्तके लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रसंगी ओळखीच्या मंडळींकडे जाणे, त्यांना पुस्तकांविषयी माहिती देणे, ही पुस्तके त्यांनी विकत घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे आदी कामेही एकीकडे सुरुच असतात. महाराष्टातून प्रसिद्ध होणारी लहान मासिके, साप्ताहिके यांना ते सातत्याने नवीन मराठी पुस्तके, मराठी पुस्तकांच्या प्रकाशनाचे वृत्त, निवडक पुस्तकांची ओळख करून देणारे स्फूट लेखन पाठवत असतात. अनेकवेळा ग्रंथप्रसाराबाबत पत्रके प्रसिद्ध करून ती विविध संस्था, वाचक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांना पाठवतात तर मोठ्या समारंभातूनही ही पत्रके वाटतात. एक होता काव्हर्र, डॉ. आल्बर्ट श्वाईट्झर, शापित यक्ष, प्रकाशाची सावली आणि अन्य अनेक पुस्तकांचा त्यांनी धडाडीने प्रचार-प्रसार केला आहे.
मराठी पुस्तकांच्या वाढत्या किंमती आणि त्यामुळे पुस्तके खरेदी केली जात नाहीत अशी लोकांकडून केली जाणारी तक्रार त्यांना मान्य नाही. सर्वच क्षेत्रात महागाई वाढली हे जर मान्य केले तर त्याचा परिणाम मराठी पुस्तकांच्या किंमतीवरही होणारच.बरे महागाई वाढली म्हणून नाटक, चित्रपट पाहणे, सहलीला जाणे, मॉलमध्ये खरेदी करणे किंवा कपडे, हॉटेलिंग तसेच अन्य गोष्टींवर केला जाणारा आणि वाढता खर्च आपण कमी केला आहे का, त्या बाबत आपण कधी तक्रार करतो का, या गोष्टींवर एकावेळी पाचशे ते हजारो रुपये खर्च होतातच ना, मग मराठी पुस्तकांच्या खरेदीसाठी थोडे पैसे खिशातून गेले तर काय फरक पडतो, असे ते समोरच्याला सांगतात. घरगुती कार्यक्रम, लग्न, मूंज, वाढदिवस आदी प्रसंगी उत्तम पुस्तके भेट द्यावीत, असा त्यांचा आग्रह असतो आणि हे केवळ नुसते सांगणे नसते तर ते स्वतही वेळोवेळी पुस्तके भेट देत असतात. त्यांच्या या ग्रंथप्रसाराची दखल लोकसत्ता (ठाणे वृत्तान्त-२५ सप्टेंबर २००५), महाराष्ट टाईम्स (१२ नोव्हेंबर २००५), टाईम्स ऑफ इंडिया (४ जून २००६), दै संध्यानंद (२७ एप्रिल २००४) नवशक्ती (१८ सप्टेंबर १९८२), दैनिक सन्मित्र (जून १९९६) आदींनीही घेतली आहे.
आयडियल बुक डेपोतर्फे देण्यात येणारा वामन देशपांडे पुरस्कृत संत नामदेव पुरस्कार, सन्मित्रकार स. पां. जोशी स्मृती पुरस्कार, दोंडाईचा येथील साहित्य मंडळ, स्नेहवर्धन प्रकाशन, नवचैतन्य प्रकाशन, दिलीपराज प्रकाशन, व्यास क्रिएशन्स आदी विविध संस्था व प्रकाशनांकडूनही त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ललित लेखक अशोक बेंडखळे यांच्या जगावेगळी माणसं तसेच पत्रकार व लेखक श्रीनिवास गडकरी यांच्या जगावेगळं काहीतरी या पुस्तकात ग्रंथप्रसाराविषयी लेख आहेत.
शरद जोशी यांचा संपर्क-९५२५१-२४८६९६७ किंवा सी-पाच, अमर कल्पतरु सोसायटी, देवीचौक, शास्त्रीनगर, डोंबिवली (पश्चिम)-४२१२०२, महाराष्ट, भारत

मंगळवार, १० मार्च, २००९

आनंदयात्री

या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
असे आपल्या सर्वाना सांगत
जीवनात नेहमीच सुख किंवा दुख नसते तर
कधी बहर कधी शिशिर हा असतोच
त्यामुळे निराश न होता
सर्व सर्व विसरू देत
असा दिलासा देत
तर कधी
सावर रे, सावर रे
अशी फुंकर घालत
शब्द शब्द जपून ठेव
अशी आठवण करून देत
तुला ते आठवेल का सारे
असे विचारत
दिवस तुझे हे फुलायचे,झोपाळ्यावाचून झुलायचे
सांगत
लाजून हासणे अन लाजून ते पाहणे
म्हणत
भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसांची
याची आठवण सांगत
दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे
हे सांगून
शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले
असे अगदी सहज सांगत
माझे जीवन गाणे,व्यथा असो वा आनंद असू दे
म्हणत हा
शुक्रतारा
आपल्या रसिकांच्या मनात
श्रावणात घननीळा बरसला
सारखा अविट गोडीच्या गाण्यांनी सतत बरसत असून
तुझे गीत गाण्यासाठी
माझे जीवनगाणे
म्हणत
प्रेम म्हणजे प्रेंम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं
असेच आपल्याला सांगणाऱया या
कवीला
सर्व रसिकांतर्फे
सलाम

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांच्या अविट गोडीच्या अनेक गाण्यांनी गेली वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर गारुड केले आहे. लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, अरुण दाते, सुधीर फडके, जितेंद्र अभिषेकी, हृदयनाथ मंगेशकर, गजाननराव वाटवे आदींनी आपल्या आवाजात ही गाणी अजरामर केली आहेत. गायकांप्रमाणेच पाडगावकर यांच्या शब्दांना संगीत देणारे यशवंत देव, श्रीनिवास खळे, विश्वनाथ मराठे, पु. ल. देशपांडे आणि अन्य संगीतकारांचेही मोठे योगदान आहे. मंगेश पाडगावकर यांनी आज वयाची ८० वर्षे पूर्ण करून ८१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. रसिकांना आनंद देणाऱया या आनंदयात्रीला उदंड आयुष्य लाभो.

सोमवार, ९ मार्च, २००९

विश्वव्यापी तुकाराम

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे आणि शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका, तुका म्हणे पाहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू, असे सांगणाऱया संत तुकाराम महाराज यांची अभंगगाथा आता माहितीच्या महाजालात अर्थात नेटवर उपलब्ध झाली आहे. www.tukram.com या संकेतस्थळावर देहू येथील श्री विठोबा-रखुमाई देवस्थान संस्थानच्या सौजन्याने या संकेतस्थळावर तुकाराम गाथेची देहू प्रत उपलब्ध करून देण्यात आली असून ती डाऊनलोड केली तर गाथेतील सुमारे चार हजारांहून अधिक ओव्या वाचता येऊ शकतात. तुकाराम यांची गाथा आणि चरित्र माहितीच्या महाजालात आल्यामुळे संत तुकाराम हे विश्वव्यापी झाले आहेत.
तुकाराम डॉट कॉम या संकेतस्थळाची निर्मिती १७ फेब्रुवारी २००२ मध्ये करण्यात आली. पेशाने सिव्हिल इंजिनिअर असणारे दिलीप धोंडे हे या संकेतस्थळाचे प्रकल्प समन्वयक असून डॉ. सदानंद मोरे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, देवेन राक्षे आणि त्यांच्या सहकाऱयांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. दिवंगत बॅरिस्टर बाबाजी गणेश परांजपे यांना हे संकेतस्थळ समर्पित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर सात गट तयार करण्यात आले असून त्यात बाळगोपाळांसाठी, लेख,कलादालन, देहू दर्शन गाथा, रंगभूमी, ताजाकलम यांचा समावेश आहे. अॅनिमेशन तंत्राच्या सहाय्याने मुलांसाठी चित्रमय गोष्टी आणि तुकारामांच्या काव्यपंक्ती येथे आहेत.संत तुकाराम यांच्याविषयी बा.ग. परांजपे, राम बापट, दिलीप चित्रे, सदानंद मोरे, दिलीप धोंडगे, पुरुषोत्तम यशवंत देशपांडे,ज्ञानेश गवळे, श्रीधर पोटे आदींचे माहितीपूर्ण लेख आहेत. दिलीप चित्रे यांनी तुकोबांच्या अनुवादित केलेल्या नऊ अभंगांचा समावेश विश्व साहित्य कोशात करण्यात आला असून ते नऊ अभंग येथे वाचायला मिळतात.
तुकारामांचे विविध अभंग आता मराठीसह हिंदी, कोकणी, सिंधी, संस्कृत, गुजराथी, बंगाली, उडिया, कन्नड, तामिळ, तेलगू आदी प्रादेशिक भाषांमंध्ये आहेत. तर इंग्रजी, फ्रेंच, रशियन, जर्मन, स्पॅनिश, नेदरलॅण्ड आदी भाषेतही अभंग आणि तुकाराम यांच्याविषयीचे लेख या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. संकेतस्थळावर संत तुकाराम यांचे चरित्र विविध भाषांमध्ये देण्यात आले आहे.
या संकेतस्थळाला आत्तापर्यंत लाखो लोकांनी भेट दिली असून जगातील सुमारे १३५ देशांमध्ये हे संकेतस्थळ पाहिले आणि वाचले जात आहे. संकेस्थळावर गेस्टरुम या नावाने एक गट तयार करण्यात आला असून तेथे संकेतस्थळाला भेट देणारी मंडळी आपले मनोगत व्यक्त करतात. रवीद्रनाथ टागोर (बंगाली), डॉ. आनंदप्रकाश दिक्षित व श्रीराम शिकारखाने (हंदी), दिलीप चित्रे (जर्मन) एल्सा क्रॉस (स्पॅनिश)तसेच महात्मा गांधी यांनी तुकोबांच्या काही अभंगांचा केलेला अनुवाद पाहायला मिळतो. बाबाजी गणेश परांजपे यांनी काही वर्षांपूर्वी तुकारामांचे अभंग संकलित करून त्याचे पुस्तक प्रकाशित केले होते.येत्या वर्षभरात हे पुस्तकही संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रविवार, ८ मार्च, २००९

जीपीओमध्ये आता पुस्तकेही

टपाल खाते म्हटले की डोळ्यासमोर पत्रांचे ढीग, त्याचे सॉर्टिंग करणारे पोस्टमन, मनीऑर्डर, कार्यालयातील खिडकीच्या मागे त्रासलेल्या चेहऱयाने बसलेले कर्मचारी असे सर्वसाधारण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भारतीय टपाल खात्याने आपल्या पारंपरिक मानसिकतेमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून टपाल खात्याच्या मुंबईतील छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकाजवळील मुख्य टपाल कार्यालयात (जीपीओ) टपाल साहित्याबरोबरच आता चक्क साहित्य अकादमी या केंद्र शासनाच्या प्रकाशन संस्थेची पुस्तकेही येणाऱया ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भारतात सध्या ही सेवा बिहार राज्यातील पाटणा आणि महाराष्टातील मुंबई येथील जीपीओ येथे सुरू करण्यात आली आहे. लवकरच ही सेवा मुंबईतील अन्य टपाल कार्यालयातही सुरू केली जाणार आहे.
बदलत्या काळाचा वेध घेत आणि नव्या आव्हानांना सामोरे जाताना टपाल खात्याने हा आगळा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून जीपीओमध्ये सुरू करण्यात आलेल्या या विक्री कक्षाला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. साहित्य अकादमीतर्फे पुस्तक प्रकाशन आणि साहित्यविषयक विविध उपक्रम व कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात येत असतात. सर्व भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये साहित्य अकादमी विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित करत असते. साहित्य अकादमीची ही पुस्तके अकादमीच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध असतात.मात्र कोणत्याही पुस्तकांच्या दुकानात सहजपणे अन्य प्रकाशकांची पुस्तके उपलब्ध होतात, त्याप्रमाणे साहित्य अकादमीची पुस्तके मिळू शकत नाहीत. त्यामुळे अकादमीची अनेक चांगली पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे आपली प्रकाशने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावीत या मुख्य उद्देशानेच साहित्य अकादमीने टपालखात्याच्या सहकार्याने हा आगळा उपक्रम सुरू केला आहे. टपाल कार्यालयात आजही विविध कामांसाठी दररोज येणाऱया ग्राहकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. त्याचा फायदा टपाल खाते आणि साहित्य अकादमी या दोघानाही होत आहे.
साहित्य अकादमीतर्फे ही पुस्तके ठेवण्यासाठी जीपीओत स्टॅण्ड ठेवण्यात आले असून त्यावर अकादमीची पुस्तके विक्रीसाठी मांडण्यात आली आहेत. साहित्य अकादमीच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे सचिव के. एस. राव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या जीपीओमध्ये हा विक्रीकक्ष सुरू करण्यात आला आहे. लवकरच मुंबईतील अन्य टपाल कार्यालयातूनही साहित्य अकादमीची पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
साहित्य अकादमीच्या मुंबई कार्यालयाचा पत्ता-मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, शारदा चित्रपटगृह इमारत, नायगाव, दादर-पूर्व
दूरध्वनी क्रमांक-०२२-२४१३५७४४
इमेल- sahitya@vsnl.ney
संकेतस्थळाचा पत्ता-http://www.sahitya-akademi.gov.in

शनिवार, ७ मार्च, २००९

...मद्यसम्राट कामासी आला

स्लमडॉग मिलिऑनर या चित्रपटातील जय हो या गाण्याचे हक्क नुकतेच केंद्र शासनाने विकत घेतले. आता या गाण्याचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्र शासनातील कॉग्रेस आघाडी सरकारकडून वापर केला जाणार आहे. राष्टपिता महात्मा गांधी यांच्या लिलावातील वस्तू भारताकडेच राहिल्याने पुन्हा एकदा आपलीच टिमकी वाजवत जय हो चा नारा द्यायला आता हरकत नाही. ज्या कॉंग्रेसने वर्षानुवर्षे महात्मा गांधी यांचे नाव घेत राजकारण केले, त्यांच्या नावावर मतांचा जोगवा मागितला आणि आपले व आपल्या काही पिढ्यांचे भले करून घेतले त्या कॉंग्रेसच्या एकाही नेत्याला, पुढाऱयाला किंवा केंद्र शासनातील मंत्र्यांना गांधीजींच्या लिलावात काढण्यात आलेल्या वस्तू विकत घेण्यासाठी स्वतच्या तर नव्हेच परंतू केंद्र शासनाच्या तिजोरीतूनही पैसा खर्च करावासा वाटला नाही, ही शरमेची बाब आहे. ज्या गांधीजींनी आयुष्यभर मद्य आणि मद्यपानाला तसेच व्यापारीकरणाला विरोध केला त्याच महात्मा गांधी यांच्या या वस्तूरुपी आठवणींचा ठेवा जपण्यासाठी अखेर एक मद्यसम्राटच कामी आला ही दर्देवाची गोष्ट आहे.
महात्मा गांधी यांच्या वस्तूंचा लिलाव न होता त्या वस्तू भारताकडेच परत याव्यात म्हणून केंद्र सरकारने प्रयत्न केले परंतु अखेर शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये त्याचा लिलाव झाला. भारताचा ठेवा असलेल्या या वस्तू परदेशी व्यक्तींकडे जाऊ नयेत म्हणून उद्योगपती आणि मद्यसम्राट विजय मल्ल्या हे भारताच्या कामी आले. त्यांनी सुमारे दहा कोटी रुपये मोजून या वस्तू लिलावात विकत घेतल्या. त्यामुळे आता या वस्तू पुन्हा भारतात परत येतील. आता या प्रकरणी केंद्र सरकार आणि मल्ल्या यांच्याकडून परस्पर विरोधी दावे करण्यात येत आहेत. केंद्र शासनाला थेट लिलावात सहभागी होता येत नसल्याने मल्ल्या यांच्यामार्फत केंद्र शासनाने त्या परत मिळविण्याचा प्रयत्न केला असे केंद्रीय सांस्कृतिकमंत्री अंबिका सोनी यांचे म्हणणे तर या प्रकरणी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही, असा मल्ल्या यांचा दावा. लिलावात विकत घेतलेल्या वस्तूंमध्ये गांधीजींचा चष्मा, घड्याळ, चपला, ताट आणि वाटी यांचा समावेश आहे. लॉस अंजलिस येथील माहितीपण निर्माते जेम्स ओटीस यांनी हा लिलाव मांडला होता. मुळात गांधीजींच्या या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच कशा, असा साधा प्रश्न सर्वसामान्य भारतीयांच्या मनात निर्माण झाला आहे. बरे गांधीजींचे वारस किंवा त्यांच्या कुटूंबियांना त्या वस्तू योग्य प्रकारे जतन करता आल्या नसतील असे गृहीत धरले तरी त्या भारतातून परदेशात कशा गेल्या, त्या अधिकृत की अनधिकृतपणे नेण्यात आल्या, त्या वेळी केंद्र शासनाचे सांस्कृतिक खाते, पुरातत्व विभाग, विमानतळावरील अधिकारी आणि अन्य संबंधित यंत्रणा काय करत होत्या,याची उत्तरे कोण देणार आहे. जेव्हा या वस्तूंचा लिलाव थांबवणे केंद्र शासनाला शक्य झाले नाही तेव्हा शासनाकडून त्या विकत घेण्यासाठी काय प्रयत्न केले गेले ते भारतातील नागरिकांच्या समोर आले पाहिजे.
या वस्तू विकत घेण्यासाठी जर मल्ल्या पुढे येऊ शकतात तर केंद्र शासनातील कॉंग्रेसचा मंत्री किंवा कॉंग्रेसचे वजनदार राजकीय नेते का पुढे आले नाहीत. मिळालेल्या सत्तेतून आपल्या भावी पिढ्यांचे कल्याण होईल इतकी माया जमविणाऱया एकाही कॉंग्रेसच्या पुढाऱयाला किंवा मंत्र्याला वैयक्तिक पातळीवर या वस्तू आपण विकत घ्याव्यात, असे का वाटले नाही. महणजे केवळ निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी आणि सत्तेवर येण्याकरिता गांधीजींच्या नावाचा जप करायचा आणि वेळ आली की त्याच गांधीजींना वाऱयावर सोडायचे, ही कॉंग्रेसी निती या निमित्ताने संपूर्ण देशाला पाहायला मिळाली. खरे तर केंद्र शासनानेच या वस्तू लिलावात विकत घ्यायला हव्या होत्या. मात्र त्यांना तसे करणे शक्य नव्हते तर कॉंग्रेस पक्षाने पक्षाच्या खर्चातून किंवा कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्या विकत घेण्यास पुढे येणे आवश्यक होते. हीच बाब जर एखाद्या हिंदुत्वनिष्ठ नेत्याच्या बाबतीत झाली असती अशी कल्पना केली तर प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांनी भारतातील तमाम हिंदुत्ववादी पक्ष,संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना फाडून खाल्ले असते आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असती हे नक्की.
महात्मा गांधी यांच्या या वस्तूंमुळे त्यांच्या आठवणींचा ठेवा पु्न्हा भारताकडेच आला आहे. मात्र त्यात आनंद मानायचा की एका मद्यसम्राटाच्याकरवी या वस्तू परत मिळाल्या त्याची खंत करायची हे ज्याचे त्यानेच ठरवावे.

शुक्रवार, ६ मार्च, २००९

आरोग्य आपल्या हाती


सध्याच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे पूर्वीच्या पिढीच्या तुलनेच आत्ताच्या तरुण पिढीला आरोग्याच्या विविध समस्या भेडसावताना दिसतात. सॉफ्टवेअर किंवा आयटी क्षेत्रातील नोकऱयामुळे वेळी-अवेळी खाणे, जेवणाची ठराविक वेळ नसणे, भूक लागलेली असताना फास्ट फूड किंवा जंक फूड खाणे, चहा, कॉफी, दारू किंवा थंडपेय पिण्याच्या सवयीमुळेही आपण विविध रोगांना आमंत्रण देत असतो. बदते वातावरणही त्याला कारणीभूत आहे. अशा वेळी आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी नेमके काय करणे आवश्यक आहे, त्यासाठी काय केले पाहिजे, आहार कसा असावा, छोट्या आणि किरकोळ आजारांसाठी अॅलोपॅथीच्या औषधांचा मारा न करता किंवा सतत डॉक्टरांची औषधे न घेता आपल्याला काही करता येईल का, असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात.सध्या आरोग्याबाबत लोकांमध्येही जागृती निर्माण झाली आहे. अॅलोपॅथीच्या दुष्परिणामांमुळे लोक आयुर्वेद किंवा अन्य पर्यायी उपचार पद्धतींकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. या विषयावर मराठीमध्येही अनेक उपयुक्त आणि सर्वांनी कायम संग्रही ठेवावी अशी पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत.परंतू ही पुस्तके कोणती, त्याची माहिती असतेच असे नाही. किंवा पुस्तके घरी असतातही पण त्यात सांगितलेली दिनचर्या, आहार आणि घरगुती औषधे वापरणे काही जणांना कमीपणाचे वाटते. त्यामुळे ही लोक त्याचा वापरही करत नाहीत. मात्र अशा पुस्तकातून सांगितलेले उपाय आणि साध्या साध्या गोष्टी जर आपण आचरणात आणल्या तर त्याचा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला फायदाच होणार आहे.आज मी अशाच काही पुस्तकांची थोडक्यात ओळख करून देणार आहे. ही पुस्तके आपल्या घरी असावीतच परंतू लग्न,वाढदिवस किंवा अन्य काही कारणांनी ती आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनाही भेट द्यावीत, असे सुचवावेसे वाटते.
असेच एक संग्राह्य पुस्तक आहे वैद्य आप्पाशास्त्री साठे यांचे घरगुती औषधे. या पुस्तकात सुमारे ३२८ घरगुती औषधांची
माहिती आणि त्यांचे औषधी उपयोग सांगण्यात आले आहेत. पुस्तकाच्या शेवटी घरगुती औषधांची रोगवार सूची देण्यात आली आहे. यातील अनेक औषधे आपल्या ओळखीची आणि नेहमीच्या वापरातील आहेत. नवनीत प्रकाशनाने आरोग्यविषयक अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यात निसर्गोपचार,अॅक्युप्रेशर, रसाहार, योग, शिवांबू चिकित्सा, लोहचुंबक चिकित्सा आदी विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. या सर्व पुस्तकांचे मूल्यही सर्वसामान्यांनाहीसहज परवडण्यासारखे आहे. अॅक्युप्रेशरवरील देवेंद्र वोरा यांचे आपले आरोग्य आपल्या हातात, माणेकलाल पटेल यांचे शंभर वर्षे निरोगी राहा ही पुस्तके पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी आहेत. याच प्रकाशनाचे आहार हेच औषध हे पुस्तही संग्राह्य आहे. पुस्तकात अन्नधान्य आणि आहार, कडधान्ये, गरम मसाले, भाज्या, फळे यांची सविस्तर माहिती आणि त्याचे औषधी उपयोग सोप्या पद्धतीने सांगण्यात आले आहेत. आहारातील गुणदोष दाखवणारा तक्ता यात आहे.संत श्री आसारामबापू आश्रमाने प्रकाशित केलेली आरोग्यिनधी भाग एक व दोन ही पुस्तकेही वाचनीय आणि संग्राह्य आहेत.
पुण्यातील शुभदा-सारस्वत प्रकाशनाने प्रकाशित केलेले आणि भा. का. गर्दे यांनी संकलित केलेले धन्वंतरी तुमच्या घरी हे पुस्तक तर अत्यंत उपयुक्त आणि संग्राह्य व भेट देण्यासाठी उत्कृष्ट असे आहे. या पुस्तकात गर्दे यांनी सुमारे चारशेहून अधिक आजारांवर आयुर्वेद, होमिओपॅथी, बाराक्षार, चुंबकचिकित्सा, सूर्यकिरण चिकित्सा या पद्धतींतील औषधे सुचवली आहेत. या पुस्तकाची वैशिष्ट्ये म्हणजे सर्व उपचार पद्धतींची शास्त्रीय बैठक सोप्या भाषेत समजावून सांगितली असून ही सर्व औषदे सहज उपलब्ध होणारी आहेत. हल्ली आजीबाईचा बटवा किंवा फॅमिली डॉक्टर ही संकल्पना इतिहासजमा होत चालल्याने सर्वसामान्य माणसाला घरच्या घरी काही मर्यादेपर्यंत निर्धास्तपणे प्रयत्न करून निरोगी जीवन कसे जगता येईल, या विचाराने व उद्देशाने गर्दे यांनी अनुभव घेतलेल्या उपायांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.
मनोरमा प्रकाशनने प्रकाशित केलेले डॉ. सौ. अमिता नगर्सेकर यांचे ऋतुचर्या आणि आपले आरोग्य हे पुस्तकही संग्राह्य आहे. मराठी महिन्यांमध्ये आपण शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शऱद, आणि हेमंत असे सहा ऋतू मानण्यात आले आहेत.मराठी आणि इंग्रजी कालगणनेत हे ऋतू नेमके कधी येतात, या ऋतूंमध्ये आपली दिनचर्या आणि आहार कसा असावा त्याचे सोपे मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे. प्रत्येकाने त्या त्या ऋतूत आपल्या प्रकृतीची योग्य ती काळजी घेतली तर आपले आरोग्य नक्कीच चांगले राहील, असा ठाम विश्वास या पुस्तकातून सर्वानाच मिळेल.
ही सर्व पुस्तके म्हणजे अंतिम शब्द नक्कीच नाही.ही केवळ काही उदाहणादाखल म्हणून पुस्तके म्हणता येतील. आणखीही अशी काही अनेक संग्राह्य पुस्तके आहेतही मात्र त्याविषयी पुन्हा कधीतरी.

गुरुवार, ५ मार्च, २००९

विश्वात्मके मराठी ग्रंथव्यवहार


इंटरनेट आणि खासगी उपग्रहवाहिन्यांच्या वाढत्या आक्रमणामुळे मराठी ग्रंथव्यवहार आणि वाचनसंस्कृती धोक्यात आली असल्याची चर्चा नेहमी होत असते. काही प्रमाणात ते खरेही असले तरी त्याचा बाऊ न करता सध्याच्या युगाचा परवललीचा शब्द असलेल्या संगणक आणि इंटरनेटचाच वापर करून मराठी ग्रंथव्यवहार आणि वाचनसंस्कृती जगाच्या कानाकोपऱयात नेण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मराठी साहित्यप्रेमी आणि वाचकांमध्ये मेहता मराठी ग्रंथजगत आणि साहित्यसूची ही मासिके परिचित आहेत. मराठी वाचकांमध्ये या मासिकांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. या दोन मासिकांनी सुरू केलेल्या संकेतस्थळांमुळे अनिवासी मराठी भारतीय मंडळीही थेट इंटरनेटच्या माध्यमातून हवी ती मराठी पुस्तके खरेदी करू शकतील. यामध्ये मराठी पुस्तके, नवीन प्रकाशने, मराठी साहित्य विश्वातील घडामोडी, पुस्तके आणि लेखक यांची माहिती देण्यात आली आहे.
मेहता मराठी ग्रंथजगतच्या www.mehtapublishinghouse.com संकेतस्थळावर मराठी लेखकांच्या नावानुसार विविध वाङ्मयप्रकार पुस्तकाच्या नावासह सर्च करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मराठीतील विविध पुस्तकांची यादी आकारविल्ह्यांनुसार पाहता येऊ शकते.विशेष म्हणजे प्रत्येक पुस्तकाचा थोडक्यात सारांश, पुस्तकातील निवडक भाग, पुस्तकाचे मुखपृष्ठ, वृत्तपत्रातील समीक्षण याचीही माहिती आहे. तसेच कोणाला नवीन पुस्तकांविषयी काही माहिती हवी असेल तर ती ईमेलमार्फत पाठविण्याचीही सोय आहे. मराठी मेहता ग्रंथगत हे मासिकही या संकेतस्थळावर वाचता येऊ शकते. मेहता पब्लिशिंग हाऊसची पुस्तके, टी बुक क्लब,लेखकांशी भेट, अनुवादित पुस्तके, एखादा विशिष्ट लेखक आणि त्याची आजवरची पुस्तके याचीही माहिती केवळ एका क्लिकवर मिळू शकते.
साहित्यसूची मासिकाने मराठी पुस्तके वाचा आता इंटरनेटवर असे म्हटले आहे. साहित्यसूचीच्या www.erasik.com या संकेतस्थळावर सुमारे पाच हजार मराठी पुस्तकांची सूची असून या पुस्तकांची थोडक्यात माहिती पुस्तकाच्या मुखपृष्ठासह उपलब्ध आहे. याच ठिकाणी साहित्यसुगंध या नावाने उपलब्ध असलेल्या पुस्तकांचे वेबदुकान असून साहित्यसूची हे मासिकही येथे वाचता येऊ शकते. या संकेतस्थळावर अन्य प्रकाशन संस्था आणि त्यांची प्रकाशने यांचीही माहिती मिळते.मराठी आणि इंग्रजी पुस्तक प्रकाशनाच्या व्यवहारात पॉप्युलर प्रकाशन ही संस्थाही जुनी आहे. त्यानीही www.popularprakashan.com या नावाने आपले संकेतस्थळ सुरू केले आहे. नॅशनल बुक ट्रस्ट ही केंद्र शासनाची संस्था असून त्यांच्यातर्फेही मराठी पुस्तके प्रकाशित केली जातात. पुस्तकांचा प्रसार आणि समाजामध्ये वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ही संस्था काम करत आहे. www.nbtindia.com असे त्यांचे संकेतस्थळ आहे. तसेच साहित्य अकादमी या केंद्र शासनाच्या संस्थेचेही www.sahitya-akademi.gov.in असे संकेतस्थळ आहे.
मराठी साहित्यविश्व आणि ग्रंथव्यवहाराची समग्र माहिती या संकेतस्थळांवरून मिळण्यास मोठी मदत होत आहे. मराठी साहित्यप्रेमी, वाचक, अभ्यासक, विद्यार्थी या सर्वांसाठी ही माहिती उपयुक्त आहे. जगभरातील मराठी साहित्यप्रेमी आता ऑनलाईन पुस्तकखरेदीही करू शकतात. त्यामुळे मराठी साहित्यविश्व आणि ग्रंथव्यवहार विश्वात्मके झाला आहे.

बुधवार, ४ मार्च, २००९

भारतीय लेखिकांचे साहित्य होणार ग्लोबल

भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये महिला साहित्यिकांनी लिहिलेल्या निवडक साहित्याला आता ग्लोबल स्वरूप मिळणार असून हे साहित्य इंग्रजी भाषेत अनुवादित होणार आहे. पाच खंडांमधून या निवडक साहित्याचा अनमोल ठेवा चोखंदळ वाचक आणि साहित्यप्रेमींपर्यंत पोहोचणार आहे. या पाच खंडांपैकी पहिला ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. भारतीय प्रदाशिक भाषांमधील दर्जेदार आणि निवडक साहित्य अन्य प्रादेशिक भाषांमध्ये काही प्रमाणात यापूर्वीच अनुवादित झालेले आहे. कन्नडमधील भैरप्पा, शिवराम कारंथ तसेच गुजराथीमधील निवडक साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचले आहे. मात्र आता भारतीय प्रादेशिक भाषांमधील लेखिकांचे साहित्य इंग्रजीत अनुवादित झाल्यामुळे ते जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. या अनुवादाच्या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत क्रॉसवर्डच्या केम्सकॉर्नर येथील पुस्तकांच्या दुकानातझाले.
ज्येष्ठ कथालेखिका शांता गोखले यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या हॉट इज द मून या ग्रंथात कन्नड, तामिळ, तुळू आणि कोकणी या भारतीय प्रादेशिक भाषांमधील लेखिकांनी लिहिलेल्या निवडक साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्येलघुकथा, कविता आदी साहित्यप्रकाराचा समावेश आहे. या पुस्तकाचे संपादन अरुंधती सुब्रमण्यम यांनी केले असून या पहिल्या ग्रंथानंतर अन्य प्रादेशिक भाषांमधील निवडक साहित्याचे चार ग्रंथही लवकरच प्रकाशित होणार आहेत.
या ग्रंथात २३ भारतीय प्रादेशिक भाषांमधील ८७ लेखिकांचा समावेश आहे. लघुकथा, कविता, कथा आदी साहित्य त्यात असणार आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या हॉट इज द मून या ग्रंथात कनन्ड साहित्यातील बानू मुश्ताक, मित्रा वेंकटराज, कनका, तुलसी वेणुगोपाल, वैदेही तर तामिळ साहित्यातील बमा, कुट्टी रेवती, सलमा, मलाथ्या मैत्री यांचा तसेच तुळू साहित्यातील एम. जानकी ब्रह्मवरा, सुनीता शेट्टी आणि कोकणी साहित्यातील हेमा नाईक व जयंती नाईक यांचा समावेश आहे. लवकरच प्रकाशित होणाऱया चार ग्रंथांच्या संपादनाचेकामसुरू आहे.
भारतीय लेखिकांचे साहित्य इंग्रजी भाषेत नेण्याचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य असून भारतीय प्रादेशिक भाषांमधील दर्जादार आणि निवडक साहित्यही अनुवादित होऊन त्या त्या भाषेतील वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे अन्य भारतीय प्रादेशिक भाषांमधील उत्तमोत्तम साहित्य मराठीत येईल आणि मराठीतील साहित्य अन्य प्रादेशिक भाषांमध्ये पोहोचेल.
शेखर जोशी

मंगळवार, ३ मार्च, २००९

मार्केटिंगच्या फंड्यामुळे मराठी पुस्तकांची भरभराट

मराठी पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनी मराठी पुस्तके विक्रीसाठी मार्केटिंगचा नवा फंडा स्वीकारल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत मराठी पुस्तकांची पहिली आवृत्ती लवकरात लवकर संपायला सुरुवात झाली आहे. साहित्यप्रेमी आणि चोखंदळ वाचक ही पुस्तके विकत घेत मराठी पुस्तकांना भरघोस प्रतिसाद देत असल्यामुळे मराठी प्रकाशक, ग्रंथविक्रेते आणि मराठी पुस्तकांसाठी भरभराटीचे दिवस आले आहेत. मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या संजय आवटे यांच्या ‘ओबामा’ या पुस्तकाच्या पंधरा दिवसात पाच आवृत्त्या प्रकाशित झाल्या, हे त्याचेच द्योतक असल्याचे मानण्यात येते.
गेल्या दोन-चार वर्षांमध्ये डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांच्या ‘हे तो ‘श्री’ची इच्छा’, विठ्ठल कामत यांचे ‘इडली ऑर्किड आणि मी’, डॉ. नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप आणि आम्ही’ तसेच अन्य काही पुस्तकांच्या वीस पर्यंत आवृत्त्या निघाल्या आहेत.
काही वर्षांपूर्वी मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती संपायलाच दोन ते चार किंवा त्याहूनही अधिक वर्षे लागत असल्याची तक्रार मराठी प्रकाशक, विक्रेते आणि मराठी साहित्य व्यवहारातील जाणकार मंडळींकडून व्यक्त करण्यात येत होती. मुळातच मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती एक हजार ते बाराशे इतक्याच प्रतींची निघायची. ती संपायलाही काही वर्षे जात होती. मात्र प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनी पुस्तक प्रकाशन आणि विक्रीच्या पारंपरिकतेतून बाहेर पडून मार्केटिंगचा नवा फंडा अवलंबायला सुरुवात केल्यामुळे पुस्तकांची पहिली आवृत्ती महिन्याभरात संपून दोन-चार वर्षांतच पाच ते दहा किंवा त्यापेक्षाही जास्त आवृत्त्या निघायला सुरुवात झाली आहे. पंकज कुरुलकर यांनी अलिकडेच ‘ग्रंथायन’च्या माध्यमातून फिरत्या वाहनांमधून ठिकठिकाणी जाऊन पुस्तके थेट वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा नवा मार्ग चोखाळला आहे. त्यालाही वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
विविध वृत्तपत्रातून केलेल्या जाहिराती, वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्यांमधून पुस्तकांची आलेली परीक्षणे, वाचकांकडून झालेली प्रसिद्धी आदींमुळे आदी काही कारणांमुळे मराठी पुस्तके जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचत असून वाचकांकडून ती विकत घेतली जात असल्याचे निरीक्षण ‘जवाहर बुक डेपो’चे दीपक भोगले यांनी नोंदवले. तर मनोविकास प्रकाशन आणि मराठी प्रकाशक परिषदेचे एक पदाधिकारी अरविंद पाटकर यांनी सांगितले की, जाहिरात आणि प्रसिद्धीच्या पारंपरिक मानसिकतेमधून प्रकाशक आणि पुस्तक विक्रेते बाहेर पडले आहेत. साहित्य गप्पा, पुस्तक प्रदर्शने, वृत्तपत्रातून पुस्तकांच्या जाहिराती, एखाद्या लेखकाशी गप्पा असे आणि अशा प्रकारचे साहित्यविषयक विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. त्यामुळे वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचण्यास मोठी मदत होत आहे.
मॅजेस्टिक प्रकाशनचे ‘ललित’, मनोविकास प्रकाशनाचे ‘इत्यादी’, रसिक साहित्यचे ‘साहित्य सूची’, मेहता पब्लिशिंग हाऊसचे ‘मेहता मराठी ग्रंथजगत’, मॅजेस्टिक एजन्सीज्चे ‘औेदुंबरच्या सहवासात’, पॉप्युलर प्रकाशनचे ‘पॉप्युलर रसिक’, तसेच दिलीपराज प्रकाशन आणि अन्य प्रकाशकांतर्फेही साहित्य आणि पुस्तकांच्या प्रसारासाठी मासिके प्रकाशित केली जातात. तसेच पूर्वीच्या तुलनेच वृत्तपत्रातील जाहिराती आणि वाचकांपर्यंत थेट पोहोचण्याच्या विविध उपक्रमांवरही काही प्रकाशक तसेच पुस्तक विक्रेत्यांकडून अधिक प्रमाणात खर्च केला जात असल्याचे दिसून येत आहे. प्रकाशकांच्या एकूण वार्षिक नियोजनातील ही रक्कमही वाढली आहे. गेल्या काही वर्षांत नेमकी त्यात किती टक्के वाढ करण्यात आली या बाबत नेमकी माहिती मिळाली नसली तरी हा खर्च सध्या सुमारे १० ते १५ टक्के असल्याचे सांगण्यात येते. वाचकांपर्यंत थेट पोहोचण्याचा फायदा प्रकाशक आणि विक्रेते दोघांच्याही लक्षात आला असून त्यांना प्रसारमाध्यमे आणि प्रसिद्धीचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे आता भविष्यकाळातही प्रसिद्धी आणि मार्केटिंगवर प्रकाशक आणि विक्रेत्यांचा भर राहाणार असल्याचे प्रकाशक व्यावसायिकांकडून सांगण्यात आले
शेखर जोशी

सोमवार, २ मार्च, २००९

लंडन जोशी


परदेश प्रवास ही काही आता नवलाईची गोष्ट राहिलेली नाही. परंतू ८० वर्षांपूर्वी तशी स्थिती नव्हती. परदेशात जाण्याची संधी त्याकाळी प्राप्त होत असे ती तथाकथित उच्चभ्रू वर्गातील मंडळींना किंवा तत्कालिन मायबाप सरकारच्या आशीर्वादाने उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱयांना. एखाद्या डोंबिवलीकराला परदेशवारीची संधी मिळावी, असा तो काळही नव्हता. तशी डोंबिवलीची सामाजिक परिस्थितही नव्हती. आज मोठ्या संख्येने अनेक डोंबिवलीकर व्यवसाय,नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने परदेशीवारी करत आहेत किंवा तेथेच राहात आहेत. परंतू १९२९ मध्ये ही संधी माझे आजोबा वामन दिनकर जोशी यांना मिळाली. आजोबा त्यावेळच्या जीआयपी रेल्वेत म्हणजे आत्ताच्या मध्य रेल्वेत गार्ड म्हणून नोकरी करत होते. आजोबांना ब्रिज, बुद्धिबळ, टेनिस आणि क्रिकटे आदी खेळांची आवड होती. रेल्वेच्याच फर्स्ट एड (अॅब्युलन्स)मध्येही आजोबा रस घेत आणि आठवड्यातून दोन वेळा होणाऱया परेड्सनाही ते उपस्थित राहात.ब्रिटिशांच्या त्या काळात आजोबांनी कठोर चाचणी परीक्षाही दिल्या. आणि त्या अनुभवातून आजोबांची १९२९ मध्ये लंडन येथील अॅरोपार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड स्काऊट जांबोरीसाठी निवड करण्यात आली. संपूर्ण भारतातून ज्या २० ते २५ जणांची निवड करण्यात आली त्यात माझे आजोबा होते.
या जागतिक जांबोरीला जाण्यासाठी २२ मे १९२९ या दिवशी त्यांनी मुंबई-लाहोर बोटीने गेट लंडनसाठी प्रयाण केले. ३१ जुलै ते १३ ऑगस्ट असा पंधरा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम होता. या जागतिक स्काऊट जांबोरीसाठी ३५ देशांमधील ३० हजार स्काऊट्स आणि दहा हजार ब्रिटीश स्काऊट्स उपस्थित होते. लॉर्ड रॉबर्ट बेडन पॉवेल ड्यूक ऑफ कॅनॉर, प्रिन्स ऑफ वेल्स यांचीही उपस्थिती होती. आजोबा आणि त्यांच्या सहकाऱांनी तेथे लेझीम, दांपंट्टा आणि कसरतीची विविध प्रात्यक्षिके सादर केली आणि उपस्थितांची मने जिंकली.
बोटीच्या प्रवासात सी सिकनेस घालविण्यासाठी स्कॉच/दारू प्यावी लागे. अत्यंत कडाक्याच्या थंडीत त्याची गरजही भासे. परंतू आजोबांनी स्कॉच किंवा दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही. दारूच्या थेंबालाही न शिवलेला असा हा चित्पावन ब्राह्मण आहे, असे ते अभिमानाने सांगत असत. लंडनच्या जागतिक स्काऊट जांबोरीहून परत आल्यानंतर डोंबिवलीतील सन्मित्र मंडळाने त्यांचा सत्कार करण्यात येऊन लंडन जोशी म्हणून त्यांना गौरिवण्यात आले. त्या काळात परदेशी जाऊन आलेले पहिले डोंबिवलीकर म्हणजे माझे आजोबा. आज इतक्या वर्षानंतरही जुने डोंबिवलीकर त्यांचा उल्लेख लंडन जोशी असाच करतात.आम्हा सर्व नातवंडानाही लंडन जोश्यांचे नातू म्हणून ओळखले जाते. आजोबांनी डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान, ब्राह्मण सभा, डोंबिवली घरमालक संघ आदी संस्थांमधून काम केले.त्याच्या सामाजिक कामाचा हा वारसा माझ्या वडिलांसह माझे चार काका पुढे चालवत आहेत.
आजोबांचे वास्तव्य बरीच वर्षे डोंबिवली पश्चिमेला नवरे कंपाऊंड येथे होते. पुढे १९६६ मध्ये डोंबिवली पूर्वेला रामनगर परिसरात शिवमंदिर पथावर त्यांनी आपली स्वतची वास्तू बांधली. नवरे कंपाऊंडमध्ये काका गणपुले यांच्या बरोबर समाजोपयोगी कामातहीते सहभागी असायचे. डोंबिवलीत त्याकाळी दरोडेखोरांची खूप भीती होती. एकदा आजोबा दरोडेखोरांच्या तावडीत सापडले. परंतू सुदैवाने त्यांची सुटका झाली. भगवान श्री शंकराच्या कृपा आणि उपासनेममुळेच आपण यातून वाचलो, असे ते मानत असत. त्यामुळे पुढे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी नेमाने दररोज ओम नम शिवाय हा जप लिहिला. त्यांच्या जपाच्या अनेक वहया तयार झाल्या होत्या. त्यांचे काय करायचे असा प्रश्न समोर उभा राहिला. डोंबिवलीच्या टिळकनगर परिसरातील दिवंगत काणेबुवांनी सुचविल्यानुसार टिटवाळा येथील विठ्ठल मंदिराच्या पायात आजोबांच्या जपाच्या सर्व वहया ठेवण्यात आल्या आहेत.
आजोबांचा जन्म २ ऑक्टोबर १८९९ मधला. दोन-चार दिवस ताप आल्याचे निमित्त होऊन २४ जुलै १९८८ मध्ये ते गेले. मात्र शेवटपर्यंत ते हिंडते-फिरते होते. त्यांना कसलाही आजार किंवा त्रास नव्हता. आजोबा दररोज सकाळी घराजवळील आफळे राम मंदिरात जात असत. धोतर, सदरा, डोक्यावर टोपी आणि कपाळाला लावलेले उभे लाल गंध अशी त्यांची मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असे. परदेशप्रवास केलेले पहिले डोंबिवलीकर म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही आजोबांची दखल घेतली. माजी नगरसेवक प्रकाश भूर्के यांच्या प्रयत्नातून शिवमंदिर पथावर आमची शिवकृपा वास्तू ज्या चौकात आहे, त्या चौकाला आजोबांचे (वामन दिनकर जोशी चौक) नाव देण्यात आले असून आम्हा सर्व जोशी कुटुंबीयांसाठी ती अभिमानाची बाब आहे...

रविवार, १ मार्च, २००९

लिटिल चॅम्प्स लागले परीक्षेच्या तयारीला

मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा नवा उच्चांक गाठून सहभागी ‘लिटील
चॅम्प्स’ना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले. कार्यक्रम संपला असल्यामुळे आता हे सर्व लिटिल चॅम्प्स वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. मात्र या अभ्यासाबरोबरच ‘पंचरत्न’-भाग दोन या नव्या आल्बमची तयारी आणि राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही ते सर्व जण व्यस्त आहेत. ‘सारेगमप’च्या महाअंतिम फेरीच्या वेळेस युनिव्हर्सल कंपनी आणि झी-मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व लिटिल चॅम्प्सचा आल्बम ‘पंचरत्न’ या नावाने प्रकाशित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ‘पंचरत्न’चा पहिला भाग नुकताच प्रकाशित झाला आहे. ही ध्वनिफीत असून त्यात सर्व लिटिल चॅम्पसनी ‘सारेगमप’ मध्ये म्हटलेल्या गाण्यातील काही निवडक गाणी देण्यात आली आहेत. आता ‘पंचरत्न’च्या दुसऱ्या भागाची तयारी करण्यात येत असून लवकरच हा भाग प्रकाशित होणार आहे. या भागात सर्व लिटिल चॅम्प्सनी गायलेली पूर्णपणे नवीन गाणी असणार आहेत. सध्या हे सर्व लिटील चॅम्प्स मुंबईत आहेत. आज वांद्रे येथील युनिव्हर्सल कंपनीच्या कार्यालयात या सर्वाची प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसमवेत भेट घडविण्यात आली. सेटवर जशी त्यांची धमाल सुरू असायची तशीच ती येथेही सुरू होती. ‘सारेगमप’चे पर्व संपले असले तरी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही सर्वजण भेटतच असतो. त्यामुळे कार्यक्रम संपला आहे असे वाटतच नाही. सध्या आम्ही सर्वजण वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागलो असल्याचे रोहित राऊत, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांनी सांगितले. ‘सारेगमप’च्या पर्वासाठी आम्ही गेले सहा महिने मुंबईतच होतो. त्यामुळे शाळेत बुडालेला अभ्यास आम्ही भरून काढत असून आता वार्षिक परीक्षा जवळ आल्यामुळे अभ्यासाच्या तयारीला लागलो असल्याची एकमुखी प्रतिक्रिया या सर्वानी व्यक्त केली.मुग्धा म्हणाली की, माझी चौथीची वार्षिक परीक्षा पुढील महिन्यात २३ मार्चपासून सुरू होत असून बुडालेला अभ्यास आणि वार्षिक परीक्षेचीही तयारी मी सुरू केली आहे. तर आर्याने सांगितले की, आम्ही सर्वजण भेटत असलो तरी पल्लवीताई, अवधुतदादा व वैशाली ताई आणि कार्यक्रमातील सर्व दादांना मात्र आम्ही ‘मीस’ करत आहोत. मी आता नववीची परीक्षा देणार आहे. ‘सारेगमप’च्या पर्वातील माझ्या खास मैत्रिणी अवंती आणि शमिका व मी आम्ही कायम फोनवरून एकमेकींच्या संपर्कात असतो. तर कार्तिकी म्हणाली की, मी यंदा सहावीची परीक्षा देणार असून अभ्यासाबरोबरच माझ्या बाबांकडेच गाणे शिकणेही सुरू आहे.मी सध्या आठवीच्या अभ्यासावर जोर देत असून माझे वैयक्तिकरित्या गाणे शिकणे सुरू असल्याचे रोहित म्हणाला तर प्रथमेशने सांगितले की, मी यंदा नववीची परीक्षा देणार असून सध्या अभ्यास जोरात सुरू आहे. त्याचबरोबर आम्ही सगळेच आमच्या नव्या आल्बमच्याही तालमी करत आहोत.
शेखर जोशी