बुधवार, १ एप्रिल, २००९

अजरामर गीतरामायण

रामायण आणि महाभार ही दोन महाकाव्ये आपल्या भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा असून गेल्या हजारो वर्षांपासून रामायण व महाभारतातील गोष्टी व त्यातील उपदेश आपण वाचत आलो आहोत. मानवी जीवनातील सर्व भावभावना तसेच मानवी स्वभावाचे सर्व प्रकारचे नमूने या महाकाव्यातून पाहायला मिळतात. महाकवी वाल्मीकी यांचे रामायण तर महर्षी व्यास यांचे महाभारत यांची मोहिनी समस्त भारतीयांच्या मनावर अद्यापही आहे. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवरून झालेल्या रामायण व महाभारत या मालिकांनी तर इतिहास घडवला होता. या दोन्ही महाकाव्यांचे गारूड अद्यापही जनमानसावर कसे आहे, त्याची प्रचिती काही वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने घेतली आणि आजही घेत आहोत व यापुढेही घेत राहू. महाराष्ट्र ज्यांना आधुनिक वाल्मीकी म्हणून ओळखतो त्या गजानन दिगंबर माडगूळकर अर्थात गदिमा यांच्या गीतरामायणामुळे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र राममय होऊन गेला होता. एकेकाळी याच गीतरामायणाने महाराष्ट्राला वेड लावले होते. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून हे गीतरामायण प्रसारित व्हायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर आरुढ झाला. आत्ताच्या टीआरपी किंवा तत्सम भाषेत सांगायचे झाले तर सर्वाधिक श्रोतृवर्ग या कार्यक्रमाला होता. आज हे सगळे सांगायचे कारण म्हणजे आजची तारीख १ एप्रिल.
आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून १ एप्रिल १९५५ या दिवशी गीतरामायणातील पहिले गाणे प्रसारित झाले. गायक- संगीतकार सुधीर फडके आणि गदिमा हा योग जुळून आला आणि त्यातून गीतरामायणासारखा अमृतकलश रसिकांना मिळाला. आणि पुढे वर्षभर या अमृतकलशामधील सुमधुर गीतांचे श्रवण संपूर्ण महाराष्ट्राने केले. त्याकाळी दूरदर्शन किंवा खासगी दूरचित्रवाहिन्यांचे प्रस्थ नव्हतेच. घरी असलेला रेडिओ/ ग्रामोफोन हेच त्या काळातील मनोरजंनाचे साधन होते. दर आठवड्याला एक या प्रमाणे रेडिओवरून गीतरामायणातील एकेक गीत सादर होत होते. कार्यक्रमाची लोकप्रियता एवढी होती की आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रसारित होताना घरोघरी लोक भक्तीभावाने कार्यक्रम श्रवण करायला बसायचे. काही जण रेडिओला हार अर्पण करून समोर पेढे, साखरही ठेवायचे. सहज, सोपे आणि मनाचा ठाव घेणारे गदिमांचे शब्द आणि सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांनी प्रत्येक गाण्याला संगीत देताना आणि ते आपल्या स्वरात सादर करताना त्यात ओतलेले प्राण, त्या मुळे गीतरामायण हे अजरामर झाले.
वर्षभरानंतर आकाशवाणीवरून हा कार्यक्रम प्रसारित होणे थांबले. मात्र कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमुळे सुधीर फडके यांनी त्यानंतर महाराष्ट्र, भारत तसेच विदेशातही अनेक वर्षे गीतरामायणाचे लाईव्ह कार्यक्रम सादर केले. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपट निर्मितीच्या निधी संकलनासाठीही सुधीर फडके यांनी गीतरामायणाचे कार्यक्रम सादर केले.गदिमांचे हे गीतरामायण पुस्तक स्वरूपातही प्रसिद्ध झाले असून त्याचा हिंदी, बंगाली, कानडी व तेलगू भाषेत अनुवादही झाला आहे.
स्वये श्री रामप्रभू एेकती, कुश-लव रामायण गाती या गाण्याने सुरुवात होऊन सुरू होणारी सुमधुर स्वरयात्रा गा बाळानो श्री रामायण या गाण्याने संपते. गीतराणायणातील सर्वच गाणी श्रवणीय आणि मनाचा ठाव घेणारी आहेत. अगदी सहज आठवण केली तरी गीतरामायणातील राम जन्मला ग सखी, दशरथा घे हे पायसदान, स्वयंवर झाले सीतेचे, माता न तू वैरिणी, सेतू बांधा रे सागरी आणि अशी अनेक गाणी ओठावर येतात. आज इतक्या वर्षानंतरही ही सर्व गाणी तितकीच श्रवणीय, सुमधुर आणि पुन्हा पुन्हा गावी व श्रवण करावीशी वाटतात, यातच सर्व काही आहे. मराठीतील एक ज्येष्ठ कवी दिवंगत बा. भ. बोरकर यांनी या गीतरामायणाविषयी आपली चपखल प्रतिक्रिया नोंदवली आहे. बोरकर म्हणतात, आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौदर्य दृष्टीने विधात्याच्या सुक्ष्म आणि स्थूल सृष्टतून नेमके सौदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली. त्याचप्रमाणे कवीक्षी माडगुळकर यांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौदर्य आपल्या स्वयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे. गीतरामायणातील काही गीते रामायणासाऱखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याच बरोबर माडगूळकर यांचे नाव देखील चिरंतन होईल.
गदिमा आणि सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेतून सादर झालेले हे गीतरामायण हा आपल्या मराठी संस्कृतीचा अनमोल असा ठेवा आहे. येणाऱया कित्येक पिढ्याही हे गीतरामायण श्रवण करून त्याचा आनंद घेतील, हे नक्की...

२ टिप्पण्या: