गुरुवार, ९ एप्रिल, २००९

पगडी पुराण

सध्याच्या काळात टोपी घालणे या वाक्यप्रयोगाला वेगळा अर्थ असला तरी काही वर्षांपूर्वी डोक्यावर टोपी मग ती गांधीटोपी किंवा साधी असो, डोक्यावर घातली जायचीच. टोपी किंवा तत्सम काहीतरी डोक्यावर घालणे ही एक परंपरा होती. टोपी नसलेली व्यक्ती (बोडक्या डोक्याची) हे अशुभ समजले जायचे. कोल्हापूरकडची मंडळी डोक्यावर फेटा बांधायची तर गावाकडचे लोक डोक्याला मुंडासे गुंडाळायचे. डोक्यावर टोपी, फेटा, मुंडासे घालणे याचा दुहेरी उपयोग असायचा. एकतर माणसाच्या व्यक्तीमत्वात त्यामुळे फरक पडायचा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे उन्हापासून संरक्षण व्हायचे. गावाकडची मंडळी, काही जुनी म्हातारी माणसे किंवा पौरोहित्य करणारे भिक्षुक सोडले तर आजकाल डोक्यावर कोणी टोपी घालत नाही. फेटे किंवा पगडीही दिसून येत नाही. आजकाल फॅशन म्हणून किंवा एक परंपरा म्हणून लग्नामध्ये मुलगा किंवा मुलीकडील मंडळी फेटे किंवा पगड्या घालतात. लग्नाच्या हॉलमध्ये एकाच प्रकारचे फेटे किंवा पगड्या पाहून छान दिसते. आत्ता हे सर्व पुराण सांगायचे कारण म्हणजे वृत्तपत्रांमधून नुकतीच वाचनात आलेली एक बातमी.
ही बातमी पुणेरी पगडी संदर्भातील होती. पगडी ही आपली परंपरा असून त्याची जपणूक करण्यासाठी श्री पुणेरी पगडी संघाने बौद्धिक संपदा हक्क कायद्यानुसार(पेटंट) पगडीची नोंद करण्याची मागणी केली आहे.
पगड्यांमध्ये वेगवगळे प्रकार असून त्यातही पुणेही, शिंदेशाही, पेशवाई, कोल्हापुरी, बनारसी, पठाणी, मोगल, राजपुती आदींचा त्यात समावेश होतो. प्रत्येक राज्य आणि तेथील संस्कृतीनुसार या पगड्यांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. आजही कोणत्याही वस्तूसंग्रहालयात आपण गेलो तर वेगवेगळ्या प्रांतांनुसारच्या अनेक पगड्या तेथे ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याकाळी माणसाने कोणत्या प्रकारची पगडी घातली आहे, त्यावर त्याची हुशारी आणि कर्तृत्व ठरत असे. त्यामुळे पगडीला एकेकाळी खूप महत्व होते.
आजकाल दुचाकी वाहन चालविणारा चालक आणि वाहनचालकाच्या मागे बसणाऱया व्यक्तीलाही हेल्मेट सक्तीचे करण्यात आले आहे. कारण त्यामुळे अपघात किंवा अन्य प्रसंगात डोक्याचे संरक्षण होते म्हणून. पूर्वीच्या काळी तोच उद्देश या पगडीचा असावा. पुढे काळाच्या ओघात त्याला प्रथा-परंपरा किंवा प्रतिष्ठेचे स्वरूप आले असावे. पगडीबरोबर गळ्यात उपरणे असण्यालाही महत्व होते. ती पद्धतच होती. सध्याच्या काळातही पुणे किंवा अन्यत्र मान्यवरांचा सत्कार करताना त्यांच्या डोक्यात पुणेरी पगडी घातली जाते. म्हणजे अद्यापही आपण पगडी हे विद्वत्तेचे, प्रतिष्ठेचे चिन्ह मानतो. अर्थात यावरूनही मतभेद किंवा वाद होऊ शकतील. पगडीला ब्राह्मणी संस्कृती म्हणूनही हिणवले जाते. मध्यंतरी काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील श्रीविठ्ठलाचे पगडी घातलेले एक छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. ही पगडी पुणेरी (ब्राह्मणी) की अब्राह्मणी असा वादही त्यावेळी झाला होता, याची सहज आठवण होते. तर असे हे पगडी पुराण.
पगडी दिसायला एकसंध वाटत असली तरी त्याचे कोकी (पगडीचा सर्वात वरचा भाग) गोटा (कपाळावर येणारा उभट गोलसर भाग), चोच (कोकीचा पुढील भाग) गाभा (मधला भाग) आणि घेर (पगडीचा सर्वात खालचा भाग) असे त्याचे काही भाग आहेत. पगडी घालताना कोकीच्या जवळ असलेली झालर ही उजव्या कानाच्या, डोळ्याच्या वरील बाजूस आणि गोटा कपाळावर अशा प्रकारे यावी लागते. पगडी तयार करणे हे खूप कष्टाचे काम समजले जाते. पगडी बनवणे ही एक कला असून आता काळाच्या ओघात पगडी बनवणारे आणि ती नियमित घालणारेही लोप पावत चालले आहेत आणि म्हणूनच पगडीसाठी पेटंट घेण्याची मागणी करण्यात आली आहे. नाहीतर काळाच्या ओघात आपली पगडी संस्कृती नष्ट व्हायची आणि उद्या इंग्लंड-अमेरिकेतून याचे पेटंट कोणीतरी घ्यायचे आणि त्यावर आपला हक्क सांगायचे. आपला बासमती तांदूळ, हळद या बाबतीत तेच झाले ना, शेवटी न्यायालयीन आणि कायदेशीर लढाईनंतरच त्याचे पेटंट आपल्याला मिळाले. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी त्यासाठी अथक प्रयत्न करून हळदीची लढाई जिंकली. त्यामुळे आपला हा वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी केला जाणारा हा प्रयत्न नक्कीच स्तूत्य आहे. कारण तसे केले नाही तर ही पगडी आणि पगडी तयार करणारी मंडळी काळाच्या ओघात नष्ट होतील आणि भावी पिढीला केवळ चित्रातच पगडी पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील अनेक कला/संस्कती लोप पावत चालल्या असून राज्य शासन किंवा अन्य संस्थांतर्फे त्यांचे जतन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. असेच प्रयत्न केवळ पुणेरी पगडीसाठी नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातील आणि देशाच्या अन्य प्रांतातील ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या आहेत, त्यांच्या संरक्षणासाठी झाले पाहिजेत.

३ टिप्पण्या:

  1. छान माहीती, मजा आली वाचुन

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार जोशीबुवा.

    पगडीवरचा निबंध खूप आवडला. आणखी मुद्देसूद, आटोपशीर झाला तर आणखी मजा येईल.

    आपला
    (पगडीबंद) प्रवासी

    उत्तर द्याहटवा