शुक्रवार, ३ एप्रिल, २००९

पुस्तकविक्रीच्या कोटीच्या कोटी उड्डाणाला बसली खीळ

महाबळेश्वर येथे नुकतेच ८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. महाबळेश्वर सारख्या छोट्या शहरात साहित्य संमेलनाचा झालेला हा नॅनो प्रयोग मराठीतील पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांना फारसा रुचलेला नाही. या छोटय़ा गावातील साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी संमेलनाच्या निमित्ताने इतक्या मोठय़ा प्रमाणात पहिल्यांदाच एका ठिकाणी विविध विषयांवरील हजारो पुस्तके हाताळायला व पाहायला मिळाली, ही बाब वाचक म्हणून स्वागतार्ह असल्याचे मत प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांच्या वर्तूळातून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याच वेळी गेल्या काही वर्षांतील साहित्य संमेलनांमध्ये पुस्तक खरेदीची जी ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे झाली होती, त्याला महाबळेश्वर साहित्य संमेलनात खीळ बसली या गोष्टीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मतही प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महाबळेश्वर येथे नुकतेच पार पडलेले ८२ वे साहित्य संमेलन विविध वाद, प्रतिवाद आणि अन्य कारणांमुळे गाजले. महाबळेश्वरची लोकसंख्या सुमारे १२ ते १४ हजार इतकी असून हे शहर प्रामुख्याने पर्यटन व्यावसायिक आणि पर्यटकांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षांतील साहित्य संमेलनांच्या तुलनेत येथे साहित्य रसिकांचा प्रतिसाद कमी असेल, हे गृहीतच होते. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनीही संमेलनापूर्वी मुंबईत झालेल्या एका पत्रकार परिषदेत ‘महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनाकडे आम्ही एक प्रयोग म्हणून पाहतो आहोत’ असे सांगितले होते. त्यानंतर जे जे काही झाले त्यामुळे एकप्रकारे हे साहित्य संमेलन हा प्रयोगच ठरला आहे.
गेल्या वर्षी सांगली येथे झालेल्या ८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीने एक नवा उच्चांक गाठला होता. येथे साडेतीन ते चार कोटींची पुस्तक विक्री झाली होती. अर्थात येथे पुस्तक प्रदर्शन पाहण्यासाठीही दररोज हजारो लोकांच्या झुंडी येत होत्या. गेल्या काही वर्षांत सोलापूर, नागपूर, नाशिक आदी ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनात काही कोटी रुपयांची पुस्तक विक्री झाली होती. साहित्य संमेलन आणि पुस्तकप्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या मोठय़ा गर्दीचा फायदा पुस्तक प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांना मिळाला होता. सांगली येथील साहित्य संमेलनात तर प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांचे साडेतीनशे स्टॉल होते. महाबळेश्वर येथील संमेलनात ही संख्या सुमारे ८५ ते ९० इतकी कमी होती. महाबळेश्वर येथील साहित्य संमेलनात २० ते २५ टक्के पुस्तक विक्री झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या काही वर्षांत पुस्तक विक्रीची जी कोटीच्या कोटी उड्डाणे होत होती, त्याला महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनात खीळ बसल्याचे दिसून येत आहे.
महाबळेश्वर येथे साहित्य संमेलन घेण्याच्या प्रयोगामुळे गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलनात पुस्तक विक्रीचा जो चढता आलेख होता, तो एका फटक्यात खाली उतरला असल्याचे प्रातिनिधिक मत महाराष्ट्रात विविध ठिकाणी सातत्याने पुस्तक प्रदर्शन आयोजित करणाऱ्या ‘अक्षरधारा’ संस्थेचे रमेश राठीवडेकर यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केले. महाबळेश्वरला आलेले प्रकाशक आणि ग्रंथविक्रेत्यांनीही याला दुजोरा दिला. छोटय़ा गावात संमेलन घेतल्यामुळे तेथील वाचकांपर्यत हजारो पुस्तके एकाच वेळी पोहोचत असली तरी पुस्तक विक्रीसाठी त्याचा उपयोग झाला नसल्याचे मतही ग्रंथविक्रेते आणि प्रकाशकांनी व्यक्त केले.

1 टिप्पणी: