शुक्रवार, १० एप्रिल, २००९

मतदारानो तीन माकडे होऊ नका

आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून महाराष्ट्रात १३, २३ आणि ३० एप्रिल अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. केंद्रातील सत्ताधारी आपली सत्ता टिकविण्यासाठी आणि विरोधी पक्ष सत्ता हस्तगत करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करत आहेत. आता पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा मतांचा जोगवा मागत पुढच्या पाच वर्षांची बेगमी करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते मतदारांना वेगवेगळी आमीषे दाखवत आहेत. मात्र सावधान, मतदारानो आपली ती तीन माकडे होऊ देऊ नका.
आपल्या सर्वांना त्या तीन माकडांची गोष्ट माहिती आहे. ही तीनही माकडे डोळे असून आंधळी, कान असून बहिरी आणि तोंड असूनही मुकी आहेत की जाणीवपूर्वक झाली आहेत की त्यांना कोणी तसे करायला भाग पाडले आहे, ते माहिती नाही. मात्र सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी सर्व मतदारांची अवस्था काही प्रमाणात अशीच करून टाकली आहे. वरवर एकमेकांच्या विरोधात बोलायचे आणि पाठीमागे एकमेकांच्या गळ्यात गळे घालायचे, अशी त्यांची मनोवृत्ती आहे. या राजकारणी मंडळींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असून किमान आता तरी सुशिक्षित मतदारांनी आपला हक्क, कर्तव्य जाणीवपूर्वक बजावले पाहिजे. डोळे असून आंधळे, कान असून बहिरे आणि तोंड असून मुके, अशी आपली अवस्था होऊ देऊ नका.
देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी आजही आपण काही लाख किंवा कोट्यवधी लोकांनाही अन्न, वस्त्र निवारा या प्राथमिक गरजा पुरवु शकत नाही. अनेक लहान खेडी व गावांमध्ये स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी, वीज, शाळा, महाविद्यालये, डॉक्टर्स, किमान प्राथमिक सोयी-सुविधा असेलेली रुग्णालये आणि अन्यही अनेक गोष्टी देऊ शकलेलो नाही. कोट्यवधी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. गरीबी, उपासमार आहेच. मग गेल्या अनेक वर्षांत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी काय केले, असा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य मतदाराच्या मनात सहज येतो. एकदा का निवडून आले की आपल्या पुढच्या सात नव्हे तर त्याच्या दुप्पट किंवा तिप्पट पिढ्यांची तरतूद करण्यात आपले राजकारणी धन्य मानतात. (अर्थात याला काही सन्माननीय अपवाद आहेत, ते वगळून) नगरपालिका किंवा महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर पाच वर्षांत नगरसेवक कसा बदलतो, त्याच्याकडे कशा आणि किती आलीशान गाड्या येतात, फ्लॅट्स, बंगला, फार्महाऊस आणि इतरही अनेक गोष्टी मतदारांच्या अगदी सहज डोळ्यात भरतात. मात्र या गेंड्याच्या कातडीच्या राजकाऱण्यांना त्याचे काहीही सोयर-सुतक नसते. पुन्हा पाच वर्षांनंतर उमेदवारी मिळाली नाही तर, त्यापेक्षा आत्ता मिळाली आहे, ना मग घ्या हवे तितके कमावून, असा त्यांचा सरळ हिशोब असतो. भारतात राजकारण सोडून अन्य कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱया व्यक्तीला वयाच्या ५८/ ६० व्या वर्षी निवृत्त व्हावे लागते. राजकारण्यांना मात्र निवृत्ती नाही. वयाची सत्तरी-पंचाहत्तरी ओलांडली आणि शरीर साथ देत नसले तरी यांची सत्तेची हाव काही सुटत नसते. तुम्हाला राजकारणात राहायचे आहे ना, मग पदापेक्षा नुसता सल्ला देण्यासाठी राहा ना, पण नाही. अपवाद वगळता सर्व राजकीय पक्षात तेच चेहरे पुन्हा पुन्हा दिसत असतात.
राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण असा एक टाळ्या घेणारा शब्दप्रयोग सर्व राजकीय पक्ष आणि नेते एकमेकांकडे बोट दाखवून करत असतात. मात्र निवडणुकीत आपल्या पक्षाकडून स्वच्छ चारित्र्याचा, गुन्हेगारी पाश्वर्भूमी नसलेला, पक्षाची अनेक वर्षे निष्ठेने सेवा केलेला, पक्षासाठी लाठ्या-काठ्या खाल्लेला, समाजात ज्याच्या बद्दल आदर असून ज्याची प्रतिमा स्वच्छ आहे, असाच उमेदवार द्यावा, असे कोणालाच वाटत नाही. आरोप-प्रत्यारोप झाले की, उमेदवार गुन्हेगार आहे, हे कुठे सिद्ध झाले आहे, असा तोंड वर करून सवाल मतदारांनाच विचारला जातो. सर्वसामान्य मतदारही मतदानाबाबत उत्साही नसतो. जोडून सुट्टी मिळाली तर सरळ तो रजा टाकून फिरायला निघून जातो. तसेच आपली मानसिकता अशी झाली आहे, की व्यक्ती न पाहता राजकीय पक्ष पाहून मतदान करणे. त्यामुळे उद्या एखाद्या पक्षाने दगड उभा केला तरी तो निवडून येऊ शकतो.
खरे म्हणजे आता मतदान यंत्रांवर जे उमेदवार असतील त्यांच्या यादीच्या तळाशी वरीलपैकी कोणीही नाही असा एक पर्याय असण्याची आवश्यकता आहे. याविषयी वेळोवेळी चर्चा झाली असली तरी प्रत्यक्ष मतदान यंत्रावर त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जर कोणला मतदान करायचे नसेल तर त्यासाठी मतदान केंद्रांवर वेगळा फॉर्म भरण्याचा खटाटोप करावा लागतो. सर्वसामान्य मतदार या भानगडीत पडत नाही आणि आपली जी राजकीय विचारसरणी आहे, त्या उमेदवाराला मतदान करतो. मग तो खरोखरच लायक आहे का, स्वच्छ प्रतिमेचा, चारित्र्यवान आहे का , त्याचा विचारही करत नाही. आणि त्यामुळेच अनेक राजकीय पक्षांचे फावते. कोणीही उमेदवार दिला तरी आपल्या पक्षाशी बांधील असलेले मतदार आपण दिलेल्या उमेदवारालाच आंधळेपणाने मतदान करतील, याची त्यांना खात्री असते. त्यामुळेच सर्व राजकीय पक्ष सोकावले आहेत. खऱे तर या सर्वांना एकदा धडा शिकवण्याची गरज आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ती संधी चालून आली आहे. यापूर्वीही मतदारांनी राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली आहे.
तेव्हा मतदारांनो आपली ती तीन माकडे होऊ न देता सारासार विचार करूनच आपले मत द्या किंवा मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रांवर यापैकी कोणीही उमेदवार योग्य वाटत नसल्याचे सांगून मतदान न करण्याचा अर्ज हक्काने भरून द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा