बुधवार, ८ एप्रिल, २००९

आठवणी उन्हाळी सुट्टीच्या

मार्च-एप्रिलचा महिना लागला की आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागायला सुरुवात व्हायची. यंदाच्या उन्हाळी सुट्टीत काय काय करायचं त्याचे बेत आखले जायचे. कधी एकदा वार्षिक परीक्षा संपतेय असं आणि मग शाळा सुरू होईपर्यंत काय धमाल करायची असे होऊन जायचं. बरं काही वर्षांपूर्वी सध्याच्या प्रमाणे विविध शिबिरं आणि क्लासेसचंही पेव फुटलेलं नव्हतं. त्यामुळे दिवसभर आमच्या घरी किंवा सोसायटीतल्या अन्य कोणाच्या तरी घरी सगळ्यांचा लवाजमा असायचा. आमच्या सोसायटीमध्ये समवयस्क मुले भरपूर होती. त्यावेळी सायबर कॅफे, कॉम्प्युटर असं प्रस्थ नसल्यानं संपूर्ण सुट्टीभर दुपारी घरांत बैठे खेळ आणि संध्याकाळी मैदानी खेळ असं स्वरूप असायचं. एकदा का शेवटचा पेपर झाला की, घरी आल्यावर हुश्श व्हायचं. आता उन्हाळी सुट्टी म्हणजे घरातील मोठ्या माणसांच्या दृष्टीने मात्र डोकेदुखी असायची. अभ्यास न करता ही मुलं आता नुसती हुंदणार आणि धुडगुस घालणार, असा तक्रारवजा सूर या मोठ्या मंडळींचा असायचा.
या उन्हाळी सुट्टीतला दैनंदिन कार्यक्रम तसा ठरलेला असायचा. सकाळी सहा-साडेसहा वाजता उठून सोसायटीच्या आवारात बॅडबिंटन खेळायचा आमचा कार्यक्रम असायचा. आम्ही सर्व मुलं चुन्यानं कोर्ट आखून व नेट लावून खेळत असू. त्यानंतर घरी जाऊन आंघोळ झाली की काहीतरी खाणे, नाश्ता झाला की पुन्हा खाली क्रिकेट खेळणे व्हायचे. सूर्य माथ्यावर आला की आता उन वाढलाय, घरी या अशा प्रत्याकाच्या घरून हाकाट्या सुरू व्हायच्या. दुपारचे जेवण झाले की कोणाच्या तरी घरी सगळ्यांचा अड्डा जमायचा. मग सुरू व्हायचं ते पत्ते पुराण. त्यात मेंढीकोट, झब्बू मग तो साधा आणि गड्डेरी, लॅडीज, बदामसात, असे प्रकार व्हायचे. मेंढीकोट खेळताना पानांच्या खाणाखूणा करणे, त्यावरून होणारी चिडाचिड असे प्रकारही असायचे. केव्हा केव्हा व्यापार डाव किंवा गाण्याच्या भेंड्याही रंगायच्या तर कधी वही-पेन घेऊन नाव, गाव, फळ व फूल तर कधी फुल्ली-गोळा खेळणे व्हायचे.
दुपारनंतर चहा आणि दुपारचे खाणे झाले की पुन्हा सगळे खाली ग्राऊंडवर उतरायचे. दुपारचे खाणे म्हणजे प्रामुख्याने गोड शिरा, उपमा, कांदेपोहे, दडपे पोहे, थालीपीठ, कधी साग्रसंगीत भेळ असा मेन्यू असायचा. मग खाली खेळायला उतरल्यानंतर लगोरी, डबाएेसपैस, भोकंजा, चोर-शिपाई, सोनसाखळी, विषामृत, लंगडी, खोखो तसेच गोट्या, ढब, विटीदांडू असे अनेक खेळ दररोज आलटून-पालटून व्हायचे. त्यावेळी संध्याकाळ ही घरात बसण्यासाठी किंवा सायबर कॅफेत जाण्याची तसेच घरी कॉम्य्पुटरवर गेम खेळत बसायची नसायचीच. दिवेलागणीच्या सुमारास घरून हाका आल्या की घऱी जायचे. हातपाय धुवून शुभंकरोती, परवचा, रामरक्षा व भीमरुपी स्तोत्र हे म्हणणे व्हायचे. दिवसभर हुंदडल्यामुळे आणि मोकळ्या हवेत, ग्राऊंडवर खेळल्यामुळे भूकही चांगली लागायची. टीव्हीवरील मालिकांचे प्रस्थ नसल्यानं स्वयंपाकघरात एकत्र बसून जेवण व्हायचे.
उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की ही अशी धमाल असायची. आत्ताच्या मुलांना कदाचित यात कसली धमाल असेही वाटण्याची शक्यता आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या मोठ्या घरी आजी-आजोबा व काकांकडे आंब्याच्या आईस्क्रीमचा मोठ्ठा कार्यक्रम असायचा. आम्ही सर्व चुलत भांवडे, आजी-आजोबा आणि आई-बाबा व सर्व काका-काकू कंपनी एकत्र असायचो. बरं ते आईस्क्रीमही रेडीमेड नाही तर पॉटवर केलेलं असायचं. अगदी लहान असताना म्हणजे सहावी-सातवीत ते तयार करण्यात आमचा सहभाग नसायचा. मात्र आठवी-नववीपासून बर्फ विकत आणणं, त्याचे तुकडे करणं, बर्फ आणि खडे मीठ घेऊन ते पॉटमध्ये टाकून हातात गोळे येईपर्यंत फिरवायला मजा यायची. पॉट फिरवणं खूप जड व्हायला लागला की ती आईस्क्रीम तयार झालं असल्याची नांदी असायची. मग पुन्हा एकदा थोडा वेळ फिरवून एकदाचे आईस्क्रीम तयार व व्हायचं. मग काचेच्या बाऊलमध्ये, आईस्क्रीमचा मोठ्ठा गोळा घेऊन ते अगदी मनसोक्त खाल्ल जायचं. घरच्या आईस्क्रामची लज्जत वेगळीच असायची.
उन्हाळ्याच्या सुट्टीत रात्री गच्चीवर झोपण्यातही मजा यायची. झोपण्यापूर्वी थोडा वेळ अगोदर आम्ही गाद्या घालून ठेवायचो. त्यामुळे झोपायला जातांना गाद्या थोड्याश्या गार झालेल्या असायच्या. रात्री गप्पा मारत आणि काळ्याभोर आकाशातील चांदण्या पाहताना गाढ झोप कधी लागायची ते कळायचच नाही. सकाळी अगदी उशीरापर्यंत झोपू म्हटलं तरी पक्षांच्या किलबिटानं सहाच्या सुमारास जाग येईचीच. उन्हाळ्याच्या या सुट्टीत भरपूर आंबे आणि आमरस खाणं तर ठरलेलं असायचं. उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बटाटा किंवा उडदाचे पापड, साबुदाण्याच्या उपासाच्या चकल्या चिकोड्या करणं व्हायचे. ते करताना आई बरोबर आमचीही त्यात लुडबूड असायची. बटाटा किंवा उडदाचे डांगर व त्याच्या लाट्या खायला खूप आवडायचं. बटाटाट्याचा कीस करणं हा एक ठरलेला कार्यक्रम असायचा. उन्हाळ्यासाठी तब्येतीला चांगलं म्हणून दररोज कैरीचं पन्ह, कोकम किंवा लिंबू सरबत असायचं.
एकंदरीत उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे धमाल आणि मजा असायची. सुट्टी संपत आली की शाळा सुरू व्हायचे वेध लागायचे. ही सुट्टी संपूच नये, असंही वाटायचं. परंतु आता वेध लागलेले असायचे कधी एकदा शाळा सुरू होते त्याचे, नवी पुस्तके, नव्या वह्या, त्यांचा तो एक वेगळा वास, खूप दिवसांच्या कालावधीनंतर शाळेतल्या मित्रांना भेटायची लागलेली ओढ हे हवंस वाटायचं. पहिल्या पावसांची व हा पाऊस पडल्यानंतर येणारा मातीचा सुगंध मनात भरून ठेवण्याची ओढ लागायची...

३ टिप्पण्या:

  1. शेखर
    मस्त पोस्ट आहे बरं कां.. अगदी लहान पण आठवलं . ते पॉट मधलं आइस्क्रिम खाउन खुप वर्ष झालित.दोन वर्षापुर्वी शिमल्याला एकदा मिळालं होतं.. जुने दिवस आठवले.. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  2. महेंद्रजी
    नमस्कार
    आपली प्रतिक्रिया वेळोवेळी मिळत असते. धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  3. जोशीबुवा,
    खूप छान लेख आहे. आमची स्वतःची सुट्टी डोळ्यासमोर उभी राहिली.
    आपला
    (स्मरणशील) प्रवासी

    उत्तर द्याहटवा