गुरुवार, १६ एप्रिल, २००९

वाघमारे बाईंनी केली खर्रीखुर्री वकिली

काही व्यवसाय असे असतात की ज्याबाबत सर्वसामान्य लोकांच्या मनात समज-गैरसमज अगदी पक्के झालेले असतात. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी कसाब याचे वकिलपत्र घेऊन अंजली वाघमारे यांनी वकील म्हटला की खऱयाचे खोटे आणि खोट्याचे खरे करणारा असायचाच हे दाखवून दिले आहे. त्यामुळे वाघमारे बाई यांनी न्यायालयात नव्हे तर न्यायालयाबाहेरही खर्रीखुर्री वकिली केली आहे.
व्यावसायिक नितिमत्ता पाळणारी खूप कमी मंडळी असतात. मग ते कोणतेही क्षेत्र किंवा व्यवसाय असो. डॉक्टर्स, वकील, पोलीस, शिक्षक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आदी सर्व व्यवसायात आणि अगदी पत्रकारितेतही काही अपवाद वगळता सध्या बाजारू व सवंगपणा, स्वतचे ढोल वाजवून आपली प्रसिद्धी करणे, व्यावसायिक नीतिमत्ता धाब्यावर बसवणे सुरू झाले आहे. नव्हे ते अगदी उघडपणे पाहायला मिळत आहे. हे सर्व व्यवसाय म्हणजे आता धंदा झाला आहे. व्यावसायिक नीतिमत्ता ही फक्त बोलायची आणि भाषणातून टाळ्या मिळविण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे. वाघमारे बाई यांनी तेच करून दाखवले आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक साक्षीदार आणि अटक करण्यात आलेला आरोपी कसाब असे दोघांचे वकीलपत्र घेऊन वाघमारे बाईंनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा, तसेच न्यायालयापासून हे सत्य दडपून व्यावसायिक गैरवर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने ही बाब स्वीकारून वाघमारे बाईंची कसाबची वकील म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे.
वाघमारे बाई या स्वत वकील असून एकाच खटल्यात अशा प्रकारे दोघांचे वकिलपत्र घेता येत नाही, किंवा घेतले असेल तर ती बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक होते. या गोष्टी त्यांना काय माहीत नसतील. मात्र बाईंनी व्यावसायिक नीतिमत्तेचे पालन न करता दोघांचेही वकीलपत्र घेतले. ही बाब काही अजाणता झालेली नाही. असे करता येत नाही, हे पक्के माहिती असतानाही, त्यांनी हे कसे केले, या बद्दल आता बार कौन्सिल त्यांच्यावर काय कारवाई करणार, असे प्रश्न निर्माण होत आहेत.
कसाबचे वकिलपत्र घेऊन वाघमारे बाईंनी गेले काही दिवस जोरदार प्रसिद्धी मिळवली. इतके दिवस ज्यांचे नावही कोणाला माहिती नव्हते, ते नाव देशभरातूनच नव्हे तर अगदी जागतिक स्तरावर वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रिनिक माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचले. त्यात कसाबचे वकीलपत्र घेतले म्हणून वाघमारे बाईंच्या घरावर निदर्शने, हल्ला केला गेला म्हणून काही प्रमाणात त्यांना सहानुभूतीही मिळाली. आता न्यायालयाने कसाबच्या वकील म्हणून त्यांची नियुक्ती रद्द केली असली तरी त्यांना जी प्रसिद्धी मिळाली आहे, त्यामुळे आणखी काही खटले आपणहून त्यांच्याकडे चालत येतील. म्हणजे हे सर्व त्यांनी केवळ प्रसिद्धीसाठीच केले असेच म्हणावे लागेल.
आणखी एक सर्वात महत्वाची बाब म्हणजे, कसाबच्या वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य शासनाकडून विशेष सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. गेल्या काही दिवसात त्यावरही लाखो रुपये खर्च झाले आहेत. हा पैसा काही वाघमारे बाईंचा नव्हता तर तो शासनाचा पर्यायाने करदात्या नागरिकांचा होता. त्यामुळे या सर्व प्रकाराची गंभीरपणे दखल घेऊन वाघमारे बाईंची सनद रद्द केली जावी, किमान काही वर्षांसाठी त्यांना वकिली करण्यास बंदी घालण्यात यावी आणि सुरक्षा व्यवस्थेवर झालेला हा खर्च वाघमारे बाईंकडून वसूल केला जावा. असे जर झाले तर आपल्याला हवे ते मिळविण्यासाठी खोटे बोलले तरी चालून जाते, आपले कोणी काही वाकडे करू शकत नाही, आपल्या व्यवसायावर त्याचा काही परिणाम होत नाही, हा समज दूर केला गेला पाहिजे. असे झाले तरच अशा प्रकारांना कुठेतरी आळा बसेल.

४ टिप्पण्या:

  1. अच्छी ब्लॉग हे / और लेखनी बी बाड़िया हे / पड़कर बहुत खुश हुवा / मराठी मे टाइपिंग कर ने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे...? रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लणगौगे टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला.. " क्विलपॅड ". आप भी 'क्विलपॅड 'www.quillpad.in यूज़ करते हे क्या...?

    उत्तर द्याहटवा
  2. नमस्कार
    कॉम्प्युटरवरील कंट्रोल पॅनेलवर जाऊन रिजनल लॅग्वेजमध्ये मराठी/ हिंदी भाषा हा ऑप्शन आहे की नाही ते पाहा. नसेल तर तुमच्या इंजिनिअरकडून टाकून घ्या. किंवा कॅफे हिंदी हे डाऊनलोड केले तरी मराठी/हिंदी टाईप करता येऊ शकेल.
    मी आमच्या लोकसत्ताचाच मराठी फॉण्ट घरी कॉम्पुटरवर टाकून घेतला आहे. त्यामुळे मला कीबोर्डवर मराठी टाईप करता येते. असो. आपण माझा ब्लॉग वाचून आवर्जून प्रतिक्रिया कळवलीत, त्या बद्दल आभार.
    शेखर जोशी

    उत्तर द्याहटवा
  3. अनुपजी नमस्कार
    प्रतिक्रियेबद्दल आभार

    उत्तर द्याहटवा