शनिवार, १८ एप्रिल, २००९

सुदाम्याच्या पोह्यांची शताब्दी

मराठीतील पहिले विनोदी लेखक असे मानण्यात येणाऱ्या श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या ‘सुदाम्याचे पोहे’ या पुस्तकाचे यंदा शताब्दी वर्ष असून त्या निमित्ताने उत्कर्ष प्रकाशन आणि एमएमएस डिजिटल बुक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हे पुस्तक सीडी स्वरुपात प्रकाशित करण्यात आले असून ते डिजिटल स्वरुपात इंटरनेटवरही उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोल्हटकर यांचे हे पुस्तक मराठी साहित्यातील एक अभिजात पुस्तक म्हणून ओळखले जाते. केंद्र शासनाच्या नॅशनल बुक ट्रस्टने भारतातील विविध १४ प्रादेशिक भाषांमधून ‘सुदाम्याचे पोहे’ या पुस्तकाचा अनुवाद करून प्रकाशित केला आहे.
हे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा त्यात कोल्हटकर यांचे १८ लेख होते. तेव्हा त्याचे नावही ‘सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे’ असे ठेवण्यात आले होते. नंतर यात कोल्हटकर यांनी १४ लेखांची भर टाकली आणि पुढे ते ‘सुदाम्याचे पोहे अर्थात साहित्य बत्तीशी’ या नावाने ते मॉडर्न बुक डेपोने प्रकाशित केले होते. हे पुस्तक त्या काळात खूप लोकप्रिय ठरले होते. त्याच्या अनेक आवृत्याही निघाल्या.
कोल्हटकर यांचे हे पुस्तक १९०९ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाले होते. पुढे काळाच्या ओघात ते पुस्तक बाजारात उपलब्ध नव्हते. काही वर्षांपूर्वी आम्ही ते पुन्हा प्रकाशित केले होते. आता त्याची दुसरी आवृत्ती निघाली आहे. मात्र काळाच्या ओघात पुस्तक नष्ट होऊ नये आणि नव्या पिढीला ते इंटरनेट, संगणक व सीडीच्या माध्यमातून उपलब्ध व्हावे, या उद्देशाने उत्कर्ष प्रकाशन आणि उल्हास वैद्य यांच्या एमएमएस डिजिटल बुक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा उपक्रम आम्ही राबवला असल्याची माहिती उत्कर्ष प्रकाशनाचे सुधाकर जोशी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. संकेतस्थळावर या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील काही मजकूर वाचायची परवानगी आम्ही वाचकांना दिली असून वाचक तेथे काही भाग वाचू शकतील, असेही जोशी यांनी सांगितले.
उत्कर्ष प्रकाशनाने हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करताना त्यातील काही लेख कमी तर काही लेखांचे संपादन केले आणि निवडक २६ लेखांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला. पुरुषोत्तम धाक्रस यांनी त्याचे संपादन केले असल्याची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तर हे पुस्तक म्हणजे कोल्हटकर यांनी लिहिलेले विनोदी लेख, कथा असून १९०२ मध्ये ‘विविध ज्ञानविस्तार’ या नियतकालिकातून ते लेख पहिल्यांदा प्रकाशित झाले होते, अशी माहिती दादर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल अश्विनी फाटक यांनी दिली.
www.mmsdigital.com या संकेतस्थळावर हे पुस्तक वाचकांना ऑनलाइन खरेदी करता येईल. हे पुस्तक मुद्रित स्वरुपात उपलब्ध असून आता ते इंटरनेटवर डिजिटल स्वरुपात व सीडीच्या माध्यमातूनही उत्कर्ष प्रकाशन व एमएमएस डिजिटल बुक कंपनी यांनी उपलब्ध करून दिले आहे. अधिक माहितीसाठी प्रकाशनाच्या ०२०-२५५३७९५८ या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.

1 टिप्पणी:

  1. वाचलंय हे पुस्तक फार पुर्वी. पुन्हा एकदा वाचलं पाहिजे !

    उत्तर द्याहटवा