शनिवार, २ मे, २००९

रिक्षावाल्यानो, महागाई फक्त तुम्हालाच आहे का

रिक्षाचालक या नावाभोवती का कोण जाणे पण आपल्या मनात एक प्रकारची अढी असते. रिक्षाचालक म्हणजे तो बेशिस्त, उर्मट, उद्दाम, ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्य पैसै लुबाडणारा, जवळच्या ठिकाणी येणार नाही म्हणून सांगणारा, रिक्षाचा अधिकृत तळ सोडून रस्त्यावर कुठेही व कशीही बेशिस्तपणे रिक्षा उभी करणारा वगैरै वगैरे अशी त्याची अनेक रुपे आपल्या सर्वानाच परिचित असतात. मात्र सर्वच रिक्षाचालक असेच असतात, असे नाही. तेथेही अपवाद आहेत. मात्र त्यांची संख्या कमी आहे. प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केल्यानंतर भाड्यात एक रुपयाने कपात केली म्हणून अचानक एक दिवसाचा संप करून प्रवाशांना वेठीस धरणाऱया पुण्याच्या रिक्षाचालकांनी प्रवाशांच्या मनात जी अढी ती योग्य असल्याचे दाखवून दिले आहे. रिक्षाचालक मग तो पुण्याचा, नागपूरचा किंवा मुंबईच्या उपनगरातला तसेच डोंबिवली, कल्याण व ठाण्याचा असो. काही अपवाद वगळता सगळ्यांची मनोवृत्ती एकच, ती म्हणजे प्रवाशांना लुबाडणे.
पेट्रोल-डिझेलची भाववाढ झाल्यानंतर वाहतूक प्राधिकरणाची वाट न पाहता रात्रीपासूनच भाडेवाढ करणारे रिक्षावाले भाववाढ होण्याचा अधिकृत आदेश येईपर्यंत का नाही वाट पाहू शकत, तेव्हा त्यांना तेवढाही धीर निघत नाही आणि आता पेट्रोल-डिझेलचे भाव कमी झाल्याने एक रुपयाने दर कमी केले तर मात्र संप करून वेठीस धरतात, हे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. महागाई प्रचंड वाढल्याने एक रुपये कमी करणे आम्हाला परवडणारे नाही, असे रिक्षाचालकांचे म्हणणे असते. रिक्षावाल्यानो, तुमचे म्हणणे एकदम मान्य, अगदी शंभर टक्के मान्य. पण हातावर पोट असलेले समाजात काय फक्त तुम्हीच आहाता का, छोट्या कंपन्यातून काम करणारे कामगार, दररोज काम मिळेल की नाही या आशेने कामगार नाक्यावर उभे राहणारे नाका कामगार, रस्त्यावर भाजी किंवा अन्य वस्तू विकणारे भाजीवाले व फेरीवाले, धुणी-भांडी व केरवारे करणाऱया कामवाल्या आणि या सारखेच अन्य अनेक जण यांची पोट काय हातावर नाहीत का, की त्यांच्या घरी झाड हलवले की पैसे पडतात, त्यांच्याबरोबरच झोपडपट्टी, चाळी येथे राहणारे लोक, निन्म आर्थिक गटातील नागरिक, मध्यमवर्गीय यांनाही दरमहा घर चालविण्यासाठी कसरत करावी लागतेच ना, की महागाई फक्त तुम्हालाच आहे.
मग पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली की रिक्षाच्या भाड्यात वाढ करणे हे जसे न्यायाचे व पटणारे आहे, तसेच त्याचे दर कमी झाले की रिक्षाच्या भाड्यातही कपात केली पाहिजे, हे तुम्हाला कसे पटत नाही. रिक्षावाल्यांनी जर शांतपणे विचार केला तर त्यांनाही आपले हे वागणे योग्य नाही, हे पटेल. पण ते पटले तरी कळले पाहिजे ना. मुळात आपल्याबदद्ल समाजात फारसे चांगले बोलले जात नाही, तेव्हा आपल्याकडून वावगे काही होणार नाही, याची काळजी प्रत्येक रिक्षाचालकाने घेतली पाहिजे. आपल्यातील काही मुठभर बेशिस्त, अप्रामाणिक आणि प्रवाशांना लुबाडणाऱया व नाडणाऱया रिक्षाचालकांमुळे सर्व रिक्षाचालक बदनाम होत आहेत, हे तुम्हाला कळत नाही का, मग सुधारत का नाही.
वाहतूक पोलीस असला की शिस्तीने रांगेत रिक्षा उभी करायची आणि त्याची पाठ वळली की रिक्षा वाटेल तशी आणि वाटेल त्या ठिकाणी उभी करायची, हे योग्य आहे का, बरे सगळेच रिक्षाचालक असे करतात, असे नाही, ही फक्त असतात काही मुठभर मंडळी. बाकीचे रिक्षाचालक रांगेत रिक्षा उभी करतातच ना, मग तुम्हालाच इतकी मिजास व मग्रुरी का असते.खरे तर तुमच्या रिक्षातून प्रवास करणाऱया या प्रवाशांमुळेच तुम्ही आहात आणि त्यांच्यामुळेच तुम्हालाही पैसे मिळत आहेत, हे कसे विसरता, जो तुमचा मायबाप आहे, त्यालाच वेठीस का धरता, जरा याचाही कधी तरी विचार करणार आहात की नाही.
राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि स्थानिक महापालिका, नगरपालिकेत असणारे नगरसवेक आणि अन्य लोकप्रतिनिधी हे रिक्षाचालकांच्या संघटना चालवत असतात. कायम रिक्षाचालकांची बाजू घेणारी ही मंडळी सर्वसामान्य प्रवाशांची बाजू कधी घेणार आहेत की नाही, रिक्षाचालक संघटनेच्या नेत्यांचा रिक्षाचालकांवरच वचक नसेल आणि रिक्षाचालक प्रवाशांशी मग्रुरीने वागत असतील तर त्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीही तेवढेच दोषी आहेत. खरे म्हणजे आता रिक्षाचालकांच्या संघटनांप्रमाणेच ठिकठिकाणी प्रवासी संघटना सुरू करण्याची आवश्यकता आहे. प्रवाशानीच एकत्र येऊन याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. तसे झाले तरच हे बेशिस्त व मग्रुर रिक्षाचालक वठणीवर येतील...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा