मंगळवार, ५ मे, २००९

कोकणातील सर्व ग्रंथालये एका क्लिकवर

सध्याचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे, संगणकाचे आणि माहितीच्या स्फोटाचे आहे, असे मानले जाते. विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती पाहता ते खरेही आहे. आझ जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आपण याचा उपयोग करत आहोत. बॅकांची एटीएम/डेबीट कार्ड तर आता सर्वजण अगदी सहज वापरतात. कोणतेही तंत्रज्ञान जेव्हा नवीन असते, तेव्हा सुरुवातीला आपल्याला त्याचा वापर करणे कठीण वाटू शकते, मात्र ते सरावाचे झाल्यानंतर त्याच्याशिवाय आपले पान हलत नाही. भारतात जेव्हा संगणकाचा वापर बॅका, शासकीय/निमशासकीय कार्यालयातून सुरू झाला तेव्हा केवढा गदारोळ झाला होता. मात्र संगणकामुळे कोणतेही काम किती झटपट आणि प्रभावीपणे होते, हे आपण पाहतो आहोत. कोणताही नवा शोध, तंत्रज्ञान हे वाईट नसते. आपण त्याचा वापर कसा करतो, त्यावर बरेचदा ते अवलंबून असते. संणगकक्रांती आता मराठी पुस्तक प्रकाशन व्यवसाय, विक्री यामध्येही बऱयापैकी झाली आहे. ऑनलाईन मराठी पुस्तक खरेदी व विक्री, ऑनलाईन मराठी पुस्तकांचे वाचन आता हळूहळू आपल्या सवयीचे होत आहे.
आपल्या राज्यात किंवा आपण राहतो, त्या महसूल विभागात, जिल्ह्यात अनेक ग्रंथालये असतात. त्यापैकी सर्वच ग्रंथालयात कोणकोणती पुस्तके आहेत, दुर्मिळ पुस्तके किती आहेत, त्यांची यादी याची आपल्याला माहिती नसते. एखाद्याला अभ्यासासाठी किंवा संदर्भासाठी नेमके पुस्तक हवे असेल तर ते नेमके कोणत्या ग्रंथालयात मिळू शकते, त्याची माहिती त्याला घरबसल्या अगदी सहज मिळाली तर, त्याचा अभ्यासकांना किती उपयोग होईल. नेमका हाच विचार करून ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाने कोकण विभागातील सर्व ग्रंथालयांची माहिती व ग्रंथालयातील पुस्तकांची यादी एका संकेतस्थळाद्वारे साहित्यप्रेमी व अभ्यासकांना उपलब्ध करून दिली आहे.
ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाने सुरू केलेल्या एका संकेतस्थळामुळे कोकणातील सर्व ग्रंथालये आणि या ग्रंथालयात उपलब्ध असलेली पुस्तके केवळ एका क्लिकद्वारे जगभरातील साहित्यप्रेमी आणि वाचकांना पाहायला मिळणार आहेत. सध्या ठाणे
जिल्ह्यातील पाच ग्रंथालयांची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. www.granthalaya.org असे या संकेतस्थळाचे नाव आहे. कोकणात विविध ठिकाणी असलेल्या ग्रंथालयांमध्ये अनेक दुर्मिळ आणि मौलिक ग्रंथसंपदा असून जगभरातील वाचक आणि अभ्यासकांना या संकेतस्थळामुळे त्यांची माहिती मिळणार आहे.
विद्या प्रसारक मंडळाचे डॉ. विजय बेडेकर यांच्या संकल्पनेतून हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून जोशी-बेडेकर महाविद्यालयातील ग्रंथपाल नारायण बारसे, संतोष भावसार व कौस्तुभ काळे यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील मराठी ग्रंथसंग्रहालय, नगर वाचन मंदिर, जव्हार वाचनालय, डोंबिवली ग्रंथसंग्रहालय व सार्वजनिक ग्रंथालय-कल्याण अशी पाच ग्रंथालये सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. कोकण विभागातील सर्व ग्रंथालये आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेली पुस्तके यांची माहिती लवकरच या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. पुढील वर्षी हे काम पूर्ण होणार असून त्यानंतर या संकेतस्थळावर सुमारे २५ लाख पुस्तकांची यादी उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे अभ्यासक, साहित्यप्रेमी आणि वाचकांसाठी ही मोठी सोय होणार आहे.
विद्या प्रसारक मंडळाचा हा उपक्रम निश्चितच अत्यंत स्तूत्य असून राज्यातील अन्य संस्थांनी किमान आपल्या महसूल विभागात किंवा जिल्ह्यात, असा प्रयोग करायला काहीच हरकत नाही. किंबहुना राज्य शासनाने पुढाकार घेऊन राज्यातील सर्व (सुरुवातातीला किमान काही प्रमुख शासकीय ग्रंथालये/ जिल्हा ग्रंथालये) ग्रंथालये अशा प्रकारे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यासाठी पावले टाकली पाहिजेत. आज काळाचीही ती गरज आहे. असे झाले तर चंद्रपूरमधील एखादा साहित्यप्रेमी/वाचक घरबसल्या पुण्या-मुंबईच्या ग्रंथालयातील पुस्तकांची, दुर्मिळ ग्रंथांची माहिती केवळ एका क्लिकवर मिळवू शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा