शुक्रवार, १५ मे, २००९

ऐसा प्रयोग व्हावा, ही तर लोकशाहीची गरज

लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या जाहीर होणार असून सायंकाळपर्यंत देशभरातील सर्व निकाल हाती येतील. गेल्या काही लोकसभा निवडणुकींचा अनुभव पाहता पुन्हा एकदा त्रिशंकू लोकसभा अस्तीत्वात येईल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे केंद्रात सत्तास्थापनेसाठी घोडेबाजाराला ऊत येईल. छोटे प्रादेशिक पक्ष आणि त्यांचे नेते यांची कॉंग्रेस किंवा भाजप यांच्याबरोबर सौदेबाजी सुरु होईल. आणि हे टाळायचे असेल तर त्यावर देशात सत्तास्थापनेसाठी एक नवा प्रयोग होणे अत्यंत आवश्यक आहे. हा नवा प्रयोग म्हणजे कॉंग्रेस व भाजपने आपापले राजकीय आणि वैचारिक मतभेद विसरुन देशहितासाठी एकत्र येणे. भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा तसेच अन्य काही मंडळींनीही ही कल्पना मांडली आहे. भाजपच्या थींक टॅंकमधील एक असामी सुधींद्र कुलकर्णी यांनीही भाजपला कॉंग्रेस अस्पृश्य नाही, असे विधान केले होते. त्यामुळे एक प्रयोग म्हणून जर असे झाले तर देशात एक नवा इतिहास निर्माण होईल, हे नक्की. असा नवा प्रयोग ही लोकशाहीची गरज असू शकते.
खरे तर देशातील जनतेने कॉंग्रेस किंवा भाजप यापैकी कोणत्याही एका पक्षाला निर्विवाद बहुमत मिळवून दिले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रादेशिक पक्ष किंवा त्यांचे कुवत नसलेले अनेक नेते सत्ता स्थापनेसाठी जी काही सौदेबाजी करतात किंवा आपलाच पक्ष सत्तेवर यावा म्हणून सर्वात जास्त जागा मिळालेल्या पक्षाला जे काही करावे लागते, छोट्या पक्षांच्या नेत्यांच्या वेळोवेळी नाकदुऱया काढाव्या लागतात, ते प्रकार करावे लागणार नाहीत. निवडणुकीनंतर कॉंग्रेस व भाजप एकत्र आले तर २७३ पेक्षा त्यांचा आकडा नक्कीच जास्त होईल. ते आगामी पाच वर्षांसाठी भक्कम व स्थीर सरकार देऊ शकतील. अर्थात त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपली मानसिक तयारी करणे गरजेचे आहे. देशहितासाठी तरी त्यांनी एकत्र यायला काही हरकत नाही. यामध्ये कोणी आपल्या राजकीय आणि वैचारिक भूमिकेपासून दूर जात आहे, मतदार काय म्हणतील, त्यांना हे पटेल का, अशा शंका मनात आणू नयेत. कारण याआधीही आपल्या राजकीय विचारसरणीशी फारकत घेत राजकीय नेते व पक्ष यांनी काय दिवे लावले आहेत, ते सुज्ञ मतदारांना माहिती आहे. कोणताही वकुब नसलेले, फक्त स्वार्थासाठी कधी इकडे तर कधी तिकडे करणारे, लायकी नसताना खूप काही मिळणाऱया राजकारणी मंडळींचे त्यामुळे चांगलेच नाक कापले जाईल. पंतप्रधानपद मिळावे म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या आणि स्वताच्या पक्षाला राष्ट्रवादी म्हणवून घेणाऱयांचे दात त्यांच्याच घशात घातले जातील. एकवेळ अंगाला राख फासून हिमालयात जाईन, पण पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही, अशा वल्गना करणारे आणि राजीव गांधी यांच्या पायांवर लोटांगण घालत पुन्हा कॉग्रेसमध्ये प्रवेश करणारे, सोनिया गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी अगोदर राजी असलेले आणि नंतर परदेशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी नको, म्हणून कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱया शरदाच्या चांदण्याचा बुरखा टराटरा फाडण्याची हीच योग्य वेळ आहे.
समजा कॉंग्रेस व भाजप एकत्र आले आणि केंद्रात सरकार स्थापन केले तर काही आकाश कोसळणार नाही. संपूर्ण आयुष्य समाजवादी म्हणून घालवलेले जॉर्ज फर्नांडिस रालोआचे समर्थक व निमंत्रक होऊ शकतात, आणिबाणीच्या काळानंतर जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष एकत्र येऊन अल्पकाळ का होईना राज्य करु शकतात, रालोआ किंवा संयुक्त पुरोगामी आघाडीत जर वेगवगेळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येतात, तर मग भाजप व कॉंग्रेस हे दोनच प्रमुख राजकीय पक्ष का नाही एकत्र येऊ शकत. एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यापूर्वी जे वादग्रस्त विषय असतील, त्यांना टाळून देशहित व राष्ट्रीय प्रश्नांवर किंवा काही समान मुद्दयांवर एकत्र येऊन सरकार स्थापन करायला काहीच हरकत नाही. हवे तर जो पक्ष सरकार बनवेल, त्यात सहभागी न होता, पूर्ण पाच वर्षे बाहेरून पाठिंबा द्यायचा. किंवा अडीच-अडीच वर्षांसाठी सत्ता वाटून घ्यायची. ज्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या असतील, त्या पक्षाने केंद्रात सरकार स्थापन करायचे. म्हणजे यातून कदाचित देशात एक नवा पायंडा रुढ होऊ शकेल. पाचपन्नास राजकीय व प्रादेशिक पक्ष असण्यापेक्षा यापुढे देशात दोनच प्रमुख राजकीय पक्ष असावेत, हे दोनच राजकीय पक्ष पुढील पाच वर्षे उत्तम प्रकारे सरकार चालवू शकतात, राजकीय सौदेबाजी आणि घोडेबाजाराला त्यामुळे आळा बसलेला आहे, असे नवे संकेत त्यातून मतदारांपुढे जातील. कदाचित पाच वर्षे कॉंग्रेस व भाजपचे सरकार चालले तर पुढील लोकसभा निवडणुकीत भारतातील सुजाण मतदार या दोन प्रमुख पक्षांपैकी एका पक्षालाच स्पष्ट बहुमत मिळवून देईल. त्यामुळे भरमसाठ राजकीय पक्ष, त्यांचे नेते यंच्या अवास्तव मागण्यांना आळा बसू शकेल.
अर्थात हे होणार नाही, कदाचित त्यासाठी आणखी काही वर्षे जावी लागतील. पण उद्या जाहीर होणाऱया लोकसभा निवडणुक निकालांनतर तर कॉंग्रेस-भाजप एकत्र आले तर देशाच्या लोकशाहीमध्ये एक नवा अध्याय सुरु होईल. या नव्या प्रयोगामुळे कदाचित देशाच्या राजकारणालाही एक नवी दिशा मिळण्यास मदत होईल...

३ टिप्पण्या:

  1. खरंच असं झालं तर भारतीयांच सुदैव म्हणता येईल. तुम्ही बरोबर मुद्दे मांडले आहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. असं काही झालं तर किमान on paper सगळं छान होईल, पण नंतर तेवढाच सावळा गोंधळ होणार नाही, याची खात्री मला तरी वाटत नाही. असो.
    असा प्रयोग करून पहायला काहीच हरकत नाही. तेव्हा कल्पना खरच चांगली आहे.
    लेख अतिशय मुद्देसुर आहे. किमान डोक्यातले विचार आणि तुमचे मुद्दे हातात हात घालून पुढे जातात. :)

    उत्तर द्याहटवा
  3. आशा जोगळेकर व श्रद्धा,
    नमस्कार
    माझ्या लेखावर आपण आवर्जून व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. मला जे वाटते, तसेच इतरही काही जणांना वाटते आहे, हे वाचून बरे वाटले. खरेच असा प्रयोग झाला पाहिजे.
    शेखर जोशी

    उत्तर द्याहटवा