बुधवार, ६ मे, २००९

आठवणीतले मान्यवर (पत्रलेखनातील)


लहानपणी मी विविध क्षेत्रातील मान्यनर व्यक्तींची हस्ताक्षरे जमविण्याचा छंद जोपासला होता. पुढे त्यात मी सातत्य ठेवले नाही आणि नंतर तो हळूहळू कमी होत गेला. मात्र त्या पाच-सहा वर्षांच्या काळात मी अनेक मान्यवरांना पत्र पाठवून त्यांचे हस्ताक्षर मला पाठवावे, अशी विनंती करत असे. वाढदिवस किंवा दिवाळी शुभेच्छा, मासिकातील किंवा वर्तमानपत्रताली एखादा लेख किंवा मुलाखत वाचून,दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहून त्यांना मी पत्र पाठवत असे. साठ ते सत्तर अशा मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरातील पत्रांचा संग्रह माझ्याकडे आहे. ही सर्व पत्रे मी प्लास्टीकच्या पिशवीत शिवून घेऊन व्यवस्थीत ठेवलेली आहेत. आज कधी ही पत्रे काढून वाचतो, पाहतो तेव्हा मनाला एक वेगळाचा आनंद मिळतो. या मोठ्या मंडळींचे मन, त्यांचा स्वभाव समजतो. याची नेमकी सुरुवात कशी झाली ते सांगता येणार नाही. माझ्या बरोबर माझी धाकटी बहीण मनिषानेही असा छंद जोपासला होता. दिवाळीत पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्रावर शुभेच्छा लिहून पाठवल्या की नंतरचे अनेक दिवस आम्ही पोस्टमनची आतुरतेने वाट पाहात असायचो. या दिवाळीत मला किती जणांची पत्रे आली, तुला किती जणांची आली, अशी स्पर्धा आमच्यात चालायची.

या छंदाला मी नववी-दहावी मध्ये असल्यापासून सुरुवात झाली. टीवाय होईपर्यंत हा छंद जोपासला किंवा त्याच्या एफवाय-एसवायला असेपर्यंत पत्रे पाठवणे मी सुरू ठेवले होते. पुढे नंतर ते बंद झाले. या काळात अनेक मान्यवरांची त्यात बहुतांश साहित्यिक मंडळी आहेत, पत्रे माझ्याकडे जमा झाली. यात अगदी पहिले नाव आठवते ते गो. नि. दांडेकर यांचे. त्यांची तांबडफूटी ही कादंबरी मी वाचली. आणि त्यांना पत्र पठवले. आश्चर्य म्हणजे त्यांचे मला लगेच उत्तर आले. अरे तांबडफूटी पोहोचली का डोंबिवलीला, पहिले अभिमत तुझे कळाले असे लिहून माझे कौतुक केले. त्या कादंबरीत सोले असा एक शब्द होता, तो मला कळला नव्हता. त्याबद्दल त्यांना विचारले होते, तेव्हा त्यांनी अरे सोले म्हणजे उकडलेले हरबरे असे मला कळवले होते. त्यानंतर काही ना काही निमित्ताने माझा त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू होता. त्यांची एकूण सहा पत्रे माझ्याकडे आहेत. प्रत्येक पत्राची सुरुवात ते चिरंजिव शेखऱ, यास अनेक आशिर्वाद, अशी करून शेवट इतिसीमा, असा करत असत. काही पत्रांवर आप्पा दांडेकर तर काही पत्रांवर गोपाळ निळकंठ दांडेकर अशी त्यांची स्वाक्षरी आहे.


(व. पु. काळे यांनी पोस्टकार्डावर काढून पाठवलेले हे सुंदर स्केच)
बालसाहित्यिक भा. रा. भागवत आणि लीलावती भागवत यांची एक मुलाखत ललित की कोणत्यातरी मासिकात प्रसिद्ध झाली होती. ती वाचून त्यांना पत्र पाठवले. त्यांचेही सविस्तर उत्तर आले. त्या पत्रात त्यांनी म्हटले होते, अरे आमच्या सारख्या जुन्या पिढीतील मंडळींचे लेखन तुम्हा मुलांना/नवीन पिढीला आवडते, हे वाचून खूप चांगले वाटले. पुण्याला सिंहगडला कधी मित्रांबरोबर आलास तर जरुर घरी ये, आम्ही तेथून जवळच राहतो, असे आपुलकीचे आमंत्रणही त्यांनी या पहिल्याच पत्रातून दिले होते. मात्र माझे जाणे काही झाले नाही. लोकप्रिय कादंबरीकार व लेखिका यांची महाराष्ट्र टाईम्समध्ये एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. ती वाचून त्यांना पत्र पाठवले होते. त्यांचे मला उत्तर आले. त्यात त्यांनी लिहिले होते की, तू ही खूप अभ्यास करून मोठा हो, तुला ज्या विषयात/कलेत रुची आहे, त्यात नाव मिळव, मग तुझीही अशीच मुलाखत प्रसिद्ध होईल, असा आशिर्वाद त्यांनी दिला होता.

जुन्या मराठी चित्रपटातील नायक व अभिनेते विवेक यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा पाठवल्या होत्या. त्यांचेही पत्र संग्रही आहे. प्रकृती बरी नसल्याने आता नाटक-चित्रपटातून मी काम करत नाही. टीव्हीवर माझे जे चित्रपट लागतात, ते पाहून त्यात आनंद घेतो, असे त्यांनी लिहिले होते. ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक आत्माराम भेडे यांच्या नम्र आणि साध्या स्वाभावाचा अनुभव त्यांच्या पत्रातून येतो. त्यांचे मला उत्तर आले, त्यात त्यांना लिहिले की, मला पत्र पाठवायला उशीर होत आहे, त्या बद्दल क्षमस्व, तुम्हाला हस्ताक्षर जमविण्याचा छंद आहे, हे कळल्यानंतर खऱेतर मी लगेच तुम्हाला पत्र पाठवायला हवे होते. पण जमले नाही. खऱे तर ते इतके मोठे आणि त्या काळात नाटक, सिनेमा यात खूप व्यस्त असलेले. पण त्यानी पत्र पाठवले. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांचे हस्ताक्षर मिळविण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या निमित्याने चार-पाच वेळा पत्र पाठवले होते. मात्र उत्तर आले नव्हते. अखेर पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा त्यांना पाठवल्या आणि त्यांचे दोन ओळींचे का होईना पपत्र आले, त्या खाली त्यांची स्वाक्षरीही होती. ते पत्र आल्यानंतर मला अगदी सार्थक झाल्यासाऱखे वाटले.
ज्येष्ठ गायक जयवंत कुलकर्णी यांच्याही हस्ताक्षरातील पत्र माझ्याकडे आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई सकाळच्या बालकुमार चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रममुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी मी त्यांना ते पत्र दाखवले. इतक्या वर्षांनंतरही ते पत्र व्यवस्थित जपून ठेवल्याबद्दल आणि ते त्या वेळी आवर्जून दाखवल्याबद्दल त्यांना खूप आनंद झाला व त्यांनी माझे कौतुक केले. कथाकार व लोकप्रिय लेखक व. पु. काळे यांनी पोस्टकार्डावर डिअर शेखर, सेम टू यु,असे लिहून मला दिवाळी शुभेच्छा म्हणून छान चित्र काढून पाठवलेले, अद्यापही लक्षात आहे.
या खेरीज वि. वा. शिरवाडकर, इतिहास संशोधक व लेखक सेतुमाधवराव पगडी, प्रा. शंकर वैद्य, यदुनाथ थत्ते, अिभनेते धुमाळ, राजा मंगळवेढेकर, व्यंगचित्रकार गवाणकर, प्रभाकर ठोकळ, मराठीतून क्रिकेटचे समालोचन कऱणारे बाळ ज. पंडित आणि अनेक जणांची पत्रे आहेत. त्यांच्या हस्ताक्षरातील ही पत्रे एक अनमोल ठेवा आहे. जेव्हा कधी ही पत्रे पुन्हा पुन्हा वाचतो/पाहतो तेव्हा जुन्या आठवणीत रमून जातो...

५ टिप्पण्या:

  1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार

    उत्तर द्याहटवा
  2. वाह, शेखर..
    खुपच मस्त.. माझ्याकडे पण आप्पांचं ( गोनिदांची )दोन पत्रं होती. त्यांनी मी ८ वित असतांना लिहिलेली. काळाच्या ओघात कुठे गेलीत ते समजत नाही.. खुप सुंदर झालाय लेख,. अगदी जुने दिवस आठवलेत.

    उत्तर द्याहटवा
  3. महेंद्रजी नमस्कार
    आपण ब्लॉग वाचून आवर्जून दखल घेता, खूप चांगले वाटते.
    शेखर

    उत्तर द्याहटवा