सोमवार, २५ मे, २००९

जोशीपुराण- पाच हजार वाचकांचा टप्पा पार

आपल्या आयुष्यात विशिष्ट संख्येला-आकड्यांना खूप महत्व असते. एक वर्षाच्या वाढदिवसापासून ते पन्नाशी,साठी, पंचाहत्तरी असे जे काही टप्पे आपल्या आयुष्यात येतात, ते आपण साजरे करत असतो. शालेय जीवनातही आपण असे वेगवेगळे टप्पे पार करत महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करतो. हे महत्व फक्त वाढदिवस किंवा त्या अनुषंगिक गोष्टीनाच असते असे नाही, तर अन्यही काही गोष्टी यात येत असतात. आज हे सांगायचे कारण म्हणजे माझ्या जोशीपुराण या ब्लॉगने २२ फेब्रुवारी २००९ रोजी पाच हजार वाचकांचा टप्पा पार केला. मी हा ब्लॉग २७ फेब्रुवारी २००९ रोजी सुरू केला. तेव्हापासून ते आजच्या तारखेपर्यंत जोशीपुराणला भेट देणाऱया वाचकांची संख्या आता (हे लिहित असताना) ५ हजार १८९ इतकी झाली आहे. तीन महिने पूर्ण होण्याच्या आतच पाच हजारांचा हा टप्पा पार झाला आहे.

अर्थात यात खरा वाटा आहे, सर्व श्रेय आहे ते जोशीपुराणला भेट देणाऱया जगभरातील वाचकांचे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देश आणि परदेशातूनही अनेक वाचक दररोज माझ्या ब्लॉगला आवर्जून भेट देऊन ब्लॉगवरील लेख वाचत आहेत, त्यापैकी काही जण सूचना, प्रतिक्रियाही आवर्जून व्यक्त करत आहेत, त्या सर्वांचे मनापासून आभार. आपण वेळोवेळी केलेल्या सूचना, व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांमुळे माझाही लिहिण्याचा हुरुप आणि उत्साह वाढत आहे. या पाच हजारांच्या वाचक संख्येतील अनेक मंडळी ही आता प्रतिक्रयांच्या माध्यमातून परिचित झाली आहेत. अजून प्रत्यक्ष भेट व्हायचा योग आला नाही. येथे मी मुद्दामहूनच कोणाची नावे घेत नाही, कारण जर चुकून कोणाचे नाव लिहायचे राहून गेले तर कोणाला राग यायला नको किंवा कोणी नाराज व्हायला नको. पण जोशीपुराणला भेट देणाऱया सर्व वाचकांचे, वेळोवेळी आपुलकीने सूचना व प्रतिक्रिया व्यक्त करून माझा उत्साह वाढविणाऱया या सर्वांचे मनापासून आभार. आपले प्रेम व लोभ आहेच, तो असाच ठेवावा आणि वाढवावा, ही विनंती.

जोशीपुराण या ब्लॉगची नोंदणी मी मराठी ब्लॉग विश्व आणि ब्लॉगवाणीवरही केलेली आहे. नवा ब्लॉग लिहून तो पब्लिश केला की लगेच तो या दोन ठिकाणीही दिसू लागतो. या दोन ठिकाणी भेट देणारे वाचकही खूप आहेत. मराठी ब्लॉग विश्व आणि ब्लॉगवाणीचे सर्व संचालक व समन्वयक यांचेही आभार. मराठी वृत्तपत्रसृष्टीतील घडामोडींचा आढावा घेणारी बातमीदार नावाचा एक ब्लॉग आहे. त्या ब्लॉगवरही माझ्या जोशीपुराणची लिंक देण्यात आली आहे. बातमीदारलाहा भेट देणारी अनेक मंडळी आहेत. त्यामुळे बातमीदारचे संचालक व समन्वयक तसेच कार्यालयातील माझे सहकारीही ब्लॉग वाचून वेळोवेळी सूचना व प्रतिक्रिया व्यक्त करत असतात त्यांचे तसेच ब्लॉगला वेळोवेळी भेट देऊन तो वाचणाऱया ज्ञात-अज्ञात अशा हजारो वाचकांचे मनापासून आभार.

हा ब्लॉग सुरू करण्यासाठी कार्यालयातील माझा सहकारी तुषार खरात याचेही मला खूप सहकार्य मिळाले. त्याने अगोदरच ब्लॉग सुरू केला होता. तो मलाही तुम्ही ब्लॉग सुरु करा, म्हणून सांगायचा. ब्लॉग सुरू करण्यापूर्वी तो कसा सुरू करायचा, त्यासाठी काय करावे लागते, तो पोस्ट कसा करायचा, याची मला काहीच माहिती नव्हती. म्हणजे माझे गुगलवर खाते होते. पण मी अद्याप या वाटेला गेलो नव्हतो. अखेरीस सायबर कॅफेमध्ये जाऊन मी जोशीपुराण हा ब्लॉग तयार केला. पण मध्ये काही दिवस तसेच गेले. कारण सायबरमध्ये जाऊन मराठी टाईप करता येत नव्हते. घरी संगणक होता, पण नेट कनेक्शन नव्हते. नेट कनेक्शनसाठी अर्ज केला होता. सहा महिन्यात नेट कनेक्शन मिळेल, असे सांगण्यात येत होते. अखेर २२ फेब्रुवारी २००९ या दिवशी घरी नेट सुरु झाले. मग मात्र मी आता ब्लॉगवर नियमित लेखन करायचे, असे मनाशी ठरवून अखेर २७ फेब्रुवारी २००९ या दिवशी पहिला लेख जोशीपुराणवर पब्लिश केला. भेट देणाऱया ब्लॉग वाचकांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी काय करायचे, मराठी ब्लॉगविश्ववर जाऊन नोंदणी कशी करायची, मराठी ब्लॉग विश्वचा लोगो आपल्या ब्लॉगवर कसा घ्यायचा अशा काही प्रश्नांसंदर्भात मी वेळोवेळी तुषारची मदत घेतली. नंतर हळूहळू प्रयत्न करत, कधी चुकत तर कधी बरोबर करत हे जोशीपुराण सजवले. जोशीपुराणचे आज जे स्वरुप दिसत आहे, ते अशा प्रयत्नातून साकार झाले आहे.

लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीसाठी मी अभिनेते-दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल यांची मुलाखत घेतली होती. लोकप्रिय इंग्रजी कथाकार अॅगाथा ख्रीस्ती यांच्या चाळीस कादंबऱयांचा अनुवाद तोरडमल करत आहेत. त्याविषयासंदर्भात मी त्यांची घेतलेली मुलाखत लोकरंगमध्ये प्रसिद्ध झाली होती. तीच मुलाखत जोशीपुराणवर टाकली. तो जोशीपूराणवरचा पहिला लेख. ब्लॉग सुरु करतानाच मी ठरवले होते, की दररोज शक्यतो नवीन काहीतरी लिहिण्याचा व नवे देण्याचा प्रयत्न करायचा. मला प्रामाणिकपणे असे वाटते की मी आत्तापर्यंत तो संकेत पाळला आहे. लोकसत्तामध्ये मी ज्या बातम्या दिल्या होत्या, त्यात काही रुटीन तर काही स्पेशल (माझ्या नावाने प्रसिद्ध झालेल्या) त्या बातम्याही कधी मी या ब्लॉगवर दिल्या. उद्देश एवढाच की एखादा विषय किंवा मी केलेली ती बातमी लोकसत्ताच्या वाचकांबरोबरच जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावी, त्यांनी ती वाचावी. काही वेळेस लिहिणे शक्य झाले नाही, तेवढा खंड पडला आहे. मात्र शक्यतो खंड पडू न देता मी दररोजच जोशीपुराणवर काहीतरी नवे लिहित असतो. २७ व २८ फेब्रुवारीचे दोन लेख, त्यानंतर मार्चमध्ये २२, एप्रिलमध्ये २९ आणि मे महिन्यातील २३ असे आजवरचे लेखन झाले आहे.

आजवरच्या लेखनात मी अनेक विषय हाताळले असून त्यावर वाचकांनी आपल्या प्रतिक्रियाही आवर्जून व्यक्त केल्या आहेत. अशा प्रतिक्रिया लेखनाचा उत्साह वाढवायला मदत करत असतात. ब्लॉगला भेट देणाऱया वाचकांच्या आकड्याबद्दल माझी मुलगी मानसी हिलाही खूप उत्सकुता असते, नवीन पोस्ट लिहायला सुरुवात केली, किंवा कधी सहज जोशीपुराण ओपन केले की, बाबा, आकडा किती झाला, हा तिचा ठरलेला प्रश्न असतो. पाच हजार वाचक पूर्ण झालेत हे तिंला सांगितल्यावर तीने वॉव, असे म्हणून आनंद व्यक्त केला. माझी पत्नी मृणाल हीनेही वेळोवेळी ब्लॉगवाचून काही सूचना केल्या, कधी काही विषय सुचवले.

पण खरे सांगतो, एखाद्या विषयावरील आपले विचार, मते आपल्या मातृभाषेतून व्यक्त केल्यानंतर आणि आपण जे काही लिहिले आहे, ते जगात वाचले जातेय, हजारो लोक आपल्या ब्लॉगला भेच देतात, जे लिहिले आहे, त्यावर प्रतिक्रीया व्यक्त करतात, याचा आनंद काही वेगळाच आहे. आजवर अशा हजारो वाचकांनी मला हा आनंद दिला. अगोदर सांगितल्याप्रमाणे जोशीपुराणवर नेहमीच मी नवे देण्याचा प्रयत्न करणार आहे, आपला लोभ आहेच, तो वृद्धींगत व्हावा हीच इच्छा...

८ टिप्पण्या:

  1. Shri Joshi: I am just curious whether the management of 'Loksatta' is agreeable to the content in the newspaper appearing on the web in your blog?

    उत्तर द्याहटवा
  2. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. रा. रा. शेखरजी,
    आपणांस इतक्या थोड्या कालावधीत एवढे वाचक मिळाले आणि ती संख्या वाढतच आहे. याबद्दल आपले अभिनंदन.
    हे अर्थातच आपल्या लेखनाचे यश आहे.
    आपण ब्लॉगला आवश्यक असे सातत्य ठेवलेत, हेही छानच.
    आजची वृत्तपत्रे पाहता आपणांस व आपल्या वाचकांनाही एक गोष्ट नक्कीच पटेल, की वर्तमानपत्रांची स्पेस आता कमी पडतेय. ज्यांच्याकडे सांगण्यासारखे काही आहे, त्या मराठी पत्रकारांनी न्यू मीडियाकडे वळलेच पाहिजे.
    आपले पुन्हा एकदा अभिनंदन!
    (वरची प्रतिक्रिया खोडली, कारण ती अर्धीच प्रसिद्ध झाली होती. - बापू)

    उत्तर द्याहटवा
  4. बापू आत्रंगे,
    नमस्कार
    आपल्या शुभेच्छांबद्दल आभार.
    शेखर जोशी

    उत्तर द्याहटवा
  5. .अभिनंदन...
    पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा..तुमचं लिखाण नेहेमीच वाचतो पेपरमधे आणी इथे ब्लॉग वर. सुंदर लिहिता. लिहित रहा आणि आम्हाला आनंद देत रहा..

    उत्तर द्याहटवा
  6. महेंद्र,
    नमस्कार
    आपुलकीने व्यक्त केलेल्या शुभेच्छांबद्दल आभार.
    शेखर जोशी

    उत्तर द्याहटवा