मंगळवार, २६ मे, २००९

पुन्हा लिहाया आमुचे भारत, व्यास-वाल्मिकी येतील धावत...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात व परदेशातही शिवाजी महाराज यांचे चरित्र व कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे खूप मोठे काम केले आहे. त्यासाठी त्यांनी आजवर हजारो व्याख्याने दिली आहेत. आज या वयातही त्यांचा उत्साह शिवशाहीरांनी लिहिलेले शिवाजी महाराज यांच्यावरील महाराज हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या चरित्रग्रंथासाठी चित्रकार दीनानाथ दलाल यांच्याकडून त्यांनी अनेक रेखाचित्रे तयार करवून घेतली होती. या सर्व चित्रांचा संग्रह महाराज या नावाने प्रकाशित करण्यात आला आहे.


हे पुस्तक मासिकाच्या आकारात असून अर्ध्या भागात शिवचरित्रातील प्रसंगाचे चित्र आणि त्याखाली तो प्रसंग अशी मांडणी केलेली आहे. हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राचा, शिवाजी महाराज यांचा संपूर्ण इतिहास आहे. शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, याचे फार सुंदर वर्णन बाबासाहेब पुरंदरे यांनी या पुस्तकात केले आहे. या प्रत्येक पानावर शिवचरित्रातील प्रसंग आणि त्याला अनुरुप असे दलाल यांचे चित्र तर आहेच, परंतु प्रत्येक प्रसंगाला समर्पक असे एका वाक्यात शिर्षक दिले आहे. या शीर्षकात जणू त्या प्रसंगाचे सर्व सार एकवटलेले आहे.


महाराष्ट्राची भूमी म्हणजे देवदेवतांची भूमी. आपल्या दोन्ही किंवा अनंत हातात विविध शस्त्रास्त्रे पाजळीत असुरी शक्तींचा विध्वंस करणाऱया या देवदेवता मराठ्यांच्या घरीदारी अन देवळांराऊळात शतकानुशतके नांदत होत्या. या दैवतांचे भक्त जागे होते. आक्रमकांचे निर्दालन या असंख्य हातानी घडत होते. म्हणजेच ही दैवते आपल्या भक्तांच्या तनमनात जागृत होती. हातात शस्त्र नाही, अशी एकही देवता महाराष्ट्रात नांदत नव्हती. स्वातंत्र्यासाठी, स्वधर्मासाठी, संतसज्जनांच्या परित्राणासाठी अन दुर्जनांच्या निर्दालनासाठी हौसेने जगा आणि हसतहसत थाटाने मरा, असेच ही दैवते मराठ्यांना सांगत होती., शिकवत होती...
अशी सुरुवात पुस्तकाच्या पहिल्या पानावर असून देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असे शीर्षक या प्रसंगाला दिले आहे.


पुढच्या एका प्रकरणात बाबासाहेब म्हणतात, वाऱयालाही चाहुल लागू न देता देवगिरीवर दुश्मन चालून आला. राजधानी बेसावध होती. राजा रामदेवराव यादव गाफील होता. स्वराज्याची उत्तर सीमा दुभंगली. पठाणी फौज घेऊन अल्लाउद्दीन खीलजी आक्रंदत आक्रोशत देवगिरीवर येऊन धडकला... याच प्रकरणात बाबासाहेब यांनी सांगितलेली वाक्ये आजच्या राजकर्त्यानाही अगदी चपखल लागू पडतात. सद्यस्थितीतही ही वाक्ये आपल्याला विसरून चालणार नाहीत.


बाबासाहेब सांगतात, राजकरणात आणि रणांगणात अत्यंत दक्ष असावे लागते. पतिव्रतेइतके. जरा जरी बेसावध पाऊल पडले तरी परिणाम भोगावे लागतात पुढे पिढ्यानपिढ्यांना. मनुष्यबळ, शस्त्रबळ, द्रव्यबळ, बुद्धीबळ आणि बलाढ्य सह्याद्री पाठीशी असनुही महाराष्ट्र हरला. गुलागगिरीत पडला. कमी पडला स्वाभिमान आणि कर्तव्यतत्परता. पठाणांचा आणि अशाच परक्यांचा प्रचंड हैदोस सतत पाचशे वर्ष उत्तर भारतात सुरु होता. तरीही महाराष्ट्राचे यादवराजे गाफील होते. त्याचा परिणाम हा असा, इतका भयंकर...


हे पुस्तक पुरंदरे प्रकाशन यांनी प्रकाशित केले असून फेब्रुवारी २००४ मध्ये या पुस्तकाची नववी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यात आता आणखी काही आवृत्यांची भर पडली असेल. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच मोठ्यानाही हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे. पुस्तकातील दलाल यांची चित्रे खूप सुंदर आणि समर्पक अशी आहेत.
पुस्तकाच्या अखेरीस समर्थ रामदास स्वामी यांनी शिवाजी महाराज यांचे केलेले वर्णन देण्यात आले आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
तसेच आणखी काही ओळी खूप छान आहेत. त्या अशा...


तव शौर्याचा एक अंश दे

तव धैर्याचा जरा स्पर्श दे

तव तेजातील एक किरण दे

जीवनातला एकच क्षण दे

त्या दिप्तीतुनी दाही दीशा द्रुत

उजळूनी टाकू, पुसू पानिपत

पुन्हा लिहाया आमुचे भारत

व्यास-वाल्मिकी येतील धावत...

४ टिप्पण्या:

  1. Babasaheb Purandare must surely have delivered thousands of talks on Shivaji; but lakhs? Even at the rate of one per day, it takes 3 years to deliver one thousand lectures, and this rate yields 17,000 over 50 years. Please avoid needless hyperbole. You are a journalist and should hold yourself to stricter standards than several others who write without thinking.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद,
    चुकून लिहिले गेले. पण आपण आवर्जून लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.
    शेखर जोशी

    उत्तर द्याहटवा
  3. 'वाऱयालाही चाहुल लागू न देता देवगिरीवर दुश्मन चालून आला. राजधानी बेसावध होती. राजा रामदेवराव यादव गाफील होता.'

    १५ व्या शतकात लिहिली गेलेली 'महिकावतीची बखर' सांगते की अल्लाउद्दीन खिलजीचा पहिला हल्ला रामदेवराव यादव यांनी परतून लावला होता. ते पूर्ण गाफिल नव्हते. दूसरा हल्ला इतका प्रचंड होता की तो देवगिरीला झेपला नाही. :(

    दिनानाथ दलाल यांची सगळी चित्रे आणि बाबासाहेब यांचे लिखाण तर अप्रतिम आहेच ... !

    उत्तर द्याहटवा
  4. रोहन चौधरी,
    नमस्कार
    आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार
    शेखर जोशी

    उत्तर द्याहटवा