शुक्रवार, २९ मे, २००९

वाद शिवस्मारकाचा की ब्राह्मण द्वेषाचा

मुंबईत अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकावरून आणि या स्मारकाच्या अध्यक्षपदी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची नियुक्ती केल्याच्या प्रश्नावरून नवा वाद निर्माण झाला आहे. राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारने जेव्हा असे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही विविध स्तरातून त्याविषयी तीव्र नाराजी प्रकट झाली होती. आता तर मराठा अभिमानाने पछाडलेल्या काही तथाकथीत नेत्यांनी स्मारकाच्या समिती अध्यक्षपदावरुन बाबासाहेब पुरंदरे यांना हटवावे, त्यांनी शिवचरित्राचे ब्राह्मणीकरण केले, शिवाजी महाराज यांचे गुरु म्हणून समर्थ रामदास स्वामी यांनी उगाच मोठे केले, असे अकलेचे तारे तोडत बाबासाहेबांचा अपमान केला आहे. पुरंदरे यांच्या सारख्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्वावर घाणेरड्या शब्दांत चिखलफेक करणाऱया या नेत्यांना त्यांच्या समाजानेच जागा दाखवून दिली पाहिजे. हा वाद शिवस्मारकाचा की ब्राह्मण द्वेषाचा आहे, हे बेताल बडबड करणाऱया नेत्यांनी आणि राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनीही स्पष्ट करावे.


शिवाजी महाराज यांचे चरित्र पाहिले तर असे दिसते की शिवाजी महाराज यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यांच्या बरोबर प्राणांची बाजी लावून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यात मराठ्यांबरोबरच ब्राह्मण, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अशा उच्च जातींबरोबरच सर्व जातीतील लोक सहभागी झाले होते. शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातही ब्राह्मण मंडळी होती. शिवाजी महाराज यांनी आजच्या भ्रष्ट आणि नालायक राज्यकर्त्यांसारखे केवळ जात पाहून किंवा केवळ आपली हुजरेगिरी करणाऱया मंडळींना पदे दिलेली नव्हती. तर प्रत्येक व्यक्तीची योग्य ती पारख करून, त्याचे कर्तृत्व आणि बुद्धीमत्ता पाहूनच त्यांना पदे, व जबाबदाऱया दिल्या होत्या. या देशाशी व राजाशी निष्ठा असलेले मुसलमान मावळे व सरदारही महाराजांच्या पदरी होते. शिवाजी महाराज यांनी प्रसंगी आपल्या सग्यासोयऱयांचीही गय न करता, त्यांना दयामाया न दाखवता, त्यांच्या अपराधाला कठोर शासन केले असल्याचे दाखले इतिहासात आहेत.


असे असतानाही हा सर्व इतिहास विसरुन केवळ जातीपातीचे राजकारण करून मराठा समाजाची मते मिळविण्यासाठी करण्यात येणारे हे राजकारण पंतप्रधान होण्यासाठी गुडघ्याला बशिंग बांधून बसलेल्यांच्या अंगाशी येणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला दोन आकडी खासदारांची संख्याही गाठता आली नाही. खरे तर बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात अशी वक्तव्ये केल्याप्रकरणी या साहेबांनी बेताल वक्तव्य करणाऱया नेत्यांचे कान धरायला हवे होते, पण त्यांनी तोंडातून एक चकार शब्द काढलेला नाही. कॉंग्रेसचे नेते, मुख्यमंत्री, भाजप, शिवसेना यांचे नेतेही तोंडात मिठाची गुळणी धरून बसले आहेत. एकट्या राज ठाकरे यांनी त्याला सडेतोड उत्तर दिले आहे. सर्वसामान्य शिवप्रेमी आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या चाहत्यांच्या मनात जी भावना होती, त्यालाच राज ठाकरे यांनी मोकळी वाट करून दिली आहे.


गेली अनेक वर्षे बाबासाहेब पुरंदरे हे निष्ठेने आणि एखादे व्रत घेतल्याप्रमाणे शिवचरित्राचे कथन संपूर्ण महाराष्ट्रात करत आहेत. सर्वसामान्यांपर्यंत शिवचरित्र पोहोचविण्यात बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा वाटा आहे. आजवर शिवचरित्रावर त्यांनी हजारो व्याख्याने दिली आहेत. शिवाजी महाराज यांच्या जीवनावर जाणता राजा सारखे भव्य महानाट्य सादर केले आहे. पुरंदरे यांच्या शिवप्रेमाविषयी, त्यांच्या निष्ठेविषयी कोणालाही शंकाही घेता येणार नाही, असे त्यांचे कार्य आहे. मात्र असे असताना तथाकथीत काही नेते जातीच्या नावावर पुरंदरे यांच्या नावाला विरोध करतात, हे आपले दुर्दैव म्हणयाचे.


पुरंदरे यांनी कधीही पेशवाई व ब्राह्मण गौरवाचा उदोउदो केलेला नाही. ते पेशवाईवर व्याख्याने देत नाहीत. तसेच शिवचरित्राचा इतिहास जुन्या बखरी, कागदपत्रे यांचाच आधार घेऊन सांगतात. आपल्या मनाचे ते काही घुसडत नाहीत. शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांची भेट व अन्य प्रसंग हे ही एेतिहासिक कागदपत्रे, नोंदी व पुराव्यांच्या आधारे बोलत असतात. त्यांचे म्हणणे कोणाला पटत नसेल तर त्यांनी ते चर्चा करून खोडून काढावे, ते खोटे आहे, असे म्हणणाऱी काददपत्रे सादर करावीत. पण हे काहीही न करता केवळ पुरंदरे हे ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांचा द्वेष करणे आणि त्यांच्याविषयी वाटेल तसे बोलणे हे कोणत्या संस्कृतीत बसते. आता जर शिवाजी महाराज असते तर त्यांनी या अशा भंपक व जातीच्या नावावर राजकारण करणाऱया या तथाकथीत नेत्यांना भर चौकात चाबकाने फोडले असते किंवा त्यांच्या वळवळणाऱया जीभा छाटून टाकल्या असत्या.


सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुमारे तीनशे ते साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून समुद्रात हे स्मारक उभारण्याची खरोखरच गरज आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. महाराजांचे जीवंत स्मारक असलेले अनेक गड व किल्ले आज दुर्लक्षीत अवस्थेत आहेत. अनेक गडांची पडझड होत आहे, त्यामुळे खरे तर या पैशातून सर्व गडांची देखभाल व दुरुस्ती करता येऊ शकेल. प्रत्येक गड व किल्ल्यावर त्या गडाचा इतिहास, लाईट अॅण्ड साऊंड सारखे शो, छायाचित्रे किंवा गडावर घडलेल्या प्रसंगांची चित्रे यांचे भव्य प्रदर्शन, गडावर घडलेले प्रसंग दर्शवणारी म्युरल्स/ पुतळे करता येतील, गडावर जाण्यासाठी चांगला रस्ता, गडावर विविध ठिकाणी त्या त्या वास्तूची ओळख सांगणारे फलक लावणे आदी कामेही करता येऊ शकतील. किंवा या पैशातून महाराष्ट्रातील अनेक खेड्यांना पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, प्राथमिक शाळा, दवाखाने, आरोग्यकेंद्रे सुरु करता येतील. पण हे सगळे करण्याची मनापासून आच व इच्छा हवी. प्रखर राजकीय इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकते.


पुरंदरे यांना घेण्यावरून जर असा नाहक वाद उत्पन्न होत असेल तर राज्य शासनाने स्मारकाचा हा प्रकल्पच रद्द करून टाकावा. पुरंदरे यांच्या विरोधात बोलणाऱयांना सुतासारखे सरळ करावे. अन्यथा पुन्हा जातीपातीच्या राजकारणावरून महाराष्ट्रात नवा संघर्ष निर्माण होईल. शिवाजी महाराज यांना एका जातीपुरते मर्यादित करून नका, तो लोकोत्तर महापुरुष होते. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतवासीयांना त्यांचा अभिमान आहे. सर्व ज्ञातीच्या ब्राह्मणांनाही ते आदरणीय आहेत...

७ टिप्पण्या:

  1. एकदम बरोबर.

    या बातमीनुसार
    http://www.sanatan.org/marathi/dainik/news.php?dt=2009-05-29&action=fullnews&catid=1&id=20483

    “याबाबत मेटे म्हणाले की, मी पुरंदरेंच्या नावाला विरोध केला नव्हता. त्यांचे वय झाल्याने मुख्यमंत्रीच या अध्यक्षपदावर अधिक योग्य आहेत, असे आपले म्हणणे आहे.”


    पुरंदरेंचे वय झाले आहे? कमाल आहे. कुठले कार्य, त्यासाठी काय योग्यता हवी. त्यासाठी कोणी काय कार्य केले आहे.... यासगळ्याचा विचार करता, बाबासाहेब अत्यंत समर्थ आहेत अध्यक्षपदासाठी. कुणीही सुजाण नागरीक हेच मत व्यक्त करेल की मुख्यमंत्र्यांपेक्षा बाबासाहेब अधिक योग्य आहेत.

    उत्तर द्याहटवा
  2. बाबासाहेब पुरंदरे हे एक फार मोठे शिवभक्त आहेत. त्यांनी आपले पूर्ण आयुष्य शिवाजी महराजांच्या अभ्यासासाठी वेचले आहे. अशा व्यक्तिविषयी काहीही बोलताना या लोकांनी जरा विचार करुनच बोलावे. उगाचच अरेरावीची भाषा करण्यात कोणताही शहाणपणा नसतो, हे आतातरी त्यांना समजेल का??

    उत्तर द्याहटवा
  3. tumache mhanane 100% khare aahe. ha lekh tumhi mata kinva loksatta saarkhya wruttpatrala jaroor pathwawa. karan yaatali bhawana hi tumachya aamchya saarkhya hajaro naagrikanchi bhawana aahe. shewatun dusarya paragraph madhale wichar tar janateparyant, aani raajkarani lokanparyant pochayalach hawet ase aahet.

    उत्तर द्याहटवा
  4. ह्या लोकांना अक्कल असती तर असे बोलले नसते. तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. बाबासाहेबांच्या पायाशी बसायची पण लायकी नसणारे हे मानसिक नपुंसक लोकं वाट्टेल ते बरळतात. त्यांना त्यांची जागा दाखवुन द्यायची वेळ आलेली आहे. दादोजी कोंडदेव पुरस्काराच्या नांवातुन दादोजी नांव काढण्यासाठी सरकारला दबावात आणणारे पण हेच लोकं होते.
    मुर्ख पणाचा कळस आहे झालं.

    उत्तर द्याहटवा
  5. प्रशांत, नंदकिशोर, सोनल व महेंद्र यांना
    नमस्कार
    आपण व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
    शेखर जोशी

    उत्तर द्याहटवा
  6. http://sambhajibrigade.blogspot.com/2007/09/blog-post_26.html

    उत्तर द्याहटवा
  7. Itka sarwanni sagla sangun... haa lekh ajunahee ikdech padlela ahe mitranno. Chala utha... paul uchala!!!

    उत्तर द्याहटवा