शनिवार, १६ मे, २००९

अनपेक्षित आणि धक्कादायक

अखेर आज १६ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर झाला. देशभरात, महाराष्ट्रात आणि विशेषत मुंबईत अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल लागले. देशात कॉंग्रेस किंवा भाजप यांना स्पष्ट बहुमत न मिळता त्रिशंकू लोकसभा अस्तीत्वात येईल आणि सरकार स्थापन करण्यासाठी घोडेबाजार व सौदेबाजीला मोठ्या प्रमाणात ऊत येईल, पंतप्रधान कोण या प्रश्नावरून काही दिवस घोळ चालेल, असे वाटत होते. मात्र सर्व प्रसारमाध्यमे, एक्झीट पोल, राजकीय विश्लेषक, पत्रकार, ज्योतिषी आदींचे अंदाज चुकवत सर्वात मोठा पक्ष म्हणून कॉंग्रेस-आयला सर्वाधिक जागा मिळाल्या. देशात जवळपास १८ वर्षांनंतर पहिल्यांदा २०० पेक्षा जास्त जागा एखाद्या पक्षाला मिळाल्या आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर झाला आहे. २७३ चा आकडा गाठण्यासाठी कॉंग्रेसला फार कसरत करावी लागणार नाही. या निमित्ताने एक बरे झाले. ते म्हणजे पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या लालू,मायावती आणि शरद पवार या सारख्यांचे नाक कापले गेले. आता हे सरकार पाच वर्षे टिकले तर या नेत्यांना मनातच मांडे खावे लागतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही भ्रमाचा भोपळा फुटला असून महाराष्ट्रात त्यांना चांगलाच फटका बसला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांनी मात्र मुंबई, ठाणे, नाशिक येथे जोरदार मुसंडी मारत लाख ते सव्वालाख मते घेतली आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-भाजपला याचा गंभीरपणे विचार करावाच लागेल.
लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचे राज ठाकरे हेच सर्वेसर्वा होते. त्यांनी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आदी ठिकाणी जोरदार प्रचार केला. महाराष्ट्रात त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर जे काही केले त्याची परिणीती मतदानात दिसून आली. म्हणजे मनसे आणि शिवसेना-भाजप यांच्या उमेदवारांची एकत्र बेरीज केली तर ती कॉंग्रेस उमेदवारापेक्षा कितीतरी जास्त होते. याचाच सरळ अर्थ असा की मनसेने शिवसेना व भाजपची परंपरागत मते घेतली. ही मते लाख ते सव्वालाख असल्यामुळे त्याचा फायदा कॉंग्रेसच्या उमेदवारांना झाला. निकालपूर्वी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि सेनेचे नेते मनसेची भिती आम्हाला वाटत नाही, मराठी मते मनसेकडे जाणार नाहीत, मनसेची नुसती हवा आहे, प्रत्यक्ष मतदानात त्याचा काहीही परिणाम दिसणार नाही, अशा वल्गना करत होते. मात्र आज निकालानंतर खऱे काय ते दिसून आले. मात्र इतके असूनही उध्दव ठाकरे हे पत्रकार परिषदेत मराठी मतांची विभागणी मनसेमुळे झालीच नाही, असे सांगत होते. भाजपचे नेते विनोद तावडे यांनीही त्यांचीच री ओढली. अरे जे आहे, ते किमान खुलेपणानी आणि खिलाडूवृत्तीने स्वीकाराना, पण नाही. खरे तर मनसेमुळे जी काही मतांची विभागणी झाली, त्याचा गंभीरपणे विचार कऱण्याची आवश्यकता आहे आणि आगामी निवडणुकीच्या वेळी आम्ही त्यावर गंभीरपणे विचार करू, असे वक्तव्य त्यांनी करायला हवे होते. उध्दव ठाकरे यांना वारसा हक्काने कायर्कारी अध्यक्षपद मिळाले असून एक तयार व परिपक्व पक्ष त्यांना मिळाला आहे. राज ठाकरे यांनी अबकडपासून सुरुवात केली असून पहिल्याच प्रयत्नात त्यांना व त्यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरी समोरचा उमेदवार पाडण्याइतकी मते त्यांनी मिळवली आहेत, ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीतही त्यांनी आपली चुणूक दाखवून दिली होती.
शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा तिला वसंतसेना म्हणूनही हिणवले जात असे. तेव्हाचे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे आशिर्वाद शिवसेनेला होते, असे म्हटले जायचे. त्यात काही अंशी तथ्यही आहे. आता मनसेच्या बाबतीतही तोच आक्षेप घेण्यात येत आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे की शिवसेना, भाजप आणि मनसेच्या भांडणात खासदारकीची बक्षीसी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीतही असेच झाले तर महाराष्ट्रात पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचेच सरकार येऊ शकते. आणि त्यासाठी मनसेचा अप्रत्यक्ष हातभार लागू शकतो. मनसेची वैचारिक भूमिका ही काही कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी जुळणारी नाही. ते शिवसेना-भाजपलाच जवळचे आहेत. लोकसभा निवडणुकीला जे झाले ते झाले. राज ठाकरे आणि मनसेची दखल शिवसेना-भाजपला घ्यावीच लागेल. कल्याणमध्ये आनंद परांजपे यांचा अपवाद वगळता मुंबई, ठाणे, नाशिक आदी सर्व ठिकाणी मनसेच्या उमेदवरांनी घेतलले्या मतांमुळे शिवसेना-भाजपचे उमेदवार पडलेले आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार करून आणि दोन्ही कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-भाजप युती व मनसे यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही गोष्ट एकाएकी घडून येणार नाही. मत्र आपला खरा शत्रू कोण याचा शिवसेना, भाजप व मनसेने प्रामाणिकपणे विचार करायला पाहिजे. विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागा आहेत. समजा शिवसेना-भाजप आणि मनसे एकत्र आले आणि त्यांनी सगळ्या नाही परंतू काही जागा एकत्र लढवल्या तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठी मतांची जशी विभागणी झाली तशी त्यावेळी होणार नाही. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांनी त्यासाठी आत्तापासूनच पावले टाकायला पाहिजेत. मनसेची ताकद मान्य करून शिवसेना व भाजपने एक पाऊल मागे घ्यायला पाहिजे. नाहीतर विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात पुन्हा लोकसभा निवडणुकीसारखेच निकाल लागतील आणि कॉंग्रेसला जे हवे आहे, तेच होईल. तेव्हा सावधान...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा