शनिवार, २३ मे, २००९

दिवस आकाशवाणीचे... (३)

आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्तविभागात काम करत असताना खूप अनुभव मिळाला. अनेक महत्वाच्या बातम्या सांगण्याचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळाले. दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल आणि अन्य काही महत्वाच्या बातम्या. परंतू या सगळ्यांमध्ये माझ्या कायम आठवणीत राहील आणि मी त्या बातम्या कधीच विसरु शकणार नाही, ती दुर्दैवी घटना म्हणजे १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या बातम्यांची...

मी त्यावेळी आकाशवाणीवर ड्युटीला होतो. माझ्या बरोबर जयंत माईणकर होता. नेहमीप्रमाणे दुपारी एकच्या सुमारास मी आकाशवाणीवरल गेलो. जयंतही आला. त्याचवेळी मुंबईत एक-दोन ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या वृत्तविभागात आल्या होत्या. वसंत ऊर्फ दादा देशपांडे यांनी त्यांच्या सूत्रांकडून खातरजमा करून घेतली होती. त्यावेळी वृत्तविभागात नाव बरोबर आठवत असेल तर रसुल खान नावाचे एक ज्येष्ठ अधिकारी होते. त्यांनीही दोन-चार ठिकाणी चौकशी करून बातमी खऱी असल्याचे सांगितले होते. दुपारच्या पावणेतीनच्या बातम्या जयंत माईणकर वाचणार होता. युएनआय-पीटीआय, दादा देशपांडे व रसूल खान यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दुपारच्या बातम्यांसाठी बातम्या तयार केल्या. दरम्यान मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट होत असल्याच्या बातम्या येतच होत्या. दुपारच्या बातम्यांसाठी बुलेटीन तयार झाले होते. वृत्तसंपादक हरीश कांबळे यांनी त्यावरून नजर फिरवली. साधारण दोन-चाळीसच्या सुमारास जयंत खाली स्टुडिओत गेला. आम्ही वरती न्यूजरुम मध्येच होतो. पावणेतीन वाजले, बातम्या सुरु झाल्या. वृत्तविभागात आम्हीही बातम्या ऐकत होतो. तशी ती पद्धतच आहे.

आणि तेवढ्यात आकाशवाणीच्या जवळपासच कुठेतरी जोरदार धडामधून असा आवाज झाला. क्षणभर आकाशवाणीची संपूर्ण इमारतही हादरली. नेमके काय झाले कोणाला कळलेच नाही. पहिल्यांदा वाटले आपल्या आकाशवाणीच्या इमारतीमध्येच हा आवाज झाला का, मग हा आवाज आपल्या येथे नाही हे कळल्यावर सगळेच भानावर आले. मग खिडक्यातून बाहेर पाहिले तर नरिमन पॉइंट भागातून धुराचे व आगीचे प्रचंड लोट आकाशात दिसले. त्याचक्षणी हा आणखी एक बॉम्बस्फोट असल्याचे सर्वांच्याच लक्षात आले. हातात वेळ खूप थोडा होता. त्यावेळीही जास्तीत जास्त ताजी बातमी श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची आम्हा सर्वांचीच धडपड असायची. हरीश कांबळे यांनी मला लगोलग कागद हातात घेऊन दोन ओळींची बातमी लिहायला सांगितली. मी कागद घेऊन, आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार मुंबईत नरिमन पॉइंट परिसरात एक भीषण बॉम्बस्फोट झाला असून तो नेमका कुठे व कसा झाला, त्यात कितीजण जखमी झाले त्याचा सविस्तर तपशील अद्याप हाती आलेला नाही. मात्र या स्फोटामुळे मुंबईतील बॉम्बस्फोटांची संख्या इतकी झाली आहे...

कांबळे यांनी सांगितल्याप्रमाणे तो कागद घेऊन मी खाली स्टुडिओत गेलो. आत जाऊन जयंतकडे तो कागद दिला. त्याने ती बातमी लगेच वाचली. त्याचे बुलेटीन झाल्यावंर तो वर आला. त्यानंतर मुंबईतील ठिकठिकाणांहून बॉम्बस्फोट झाल्याच्या बातम्या येत होत्या. दादा देशपांडे मंत्रालयात गेले होते. तेथून ते जी नवी माहिती मिळेल ती कळवत होते. ठिकठिकाणांहून येणाऱया बातम्यांवरून जे काही झाले ते अत्यंत भीषण, भयानक आणि दुर्देवी असल्याचे लक्षात येत होते. मी आमच्या ऑफिसलाही फोन करून काही माहिती घेत होतो. आमचे सर्व रिपोर्टर वेगवेगळ्या स्पॉटवर रवाना झाले होते. बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेण्यासाठी आम्ही दुपारच्या बुलेटीननंतर खाली उतरलो. तो खाली लोकांची प्रचंड गर्दी होती. रस्त्यावरून लोकांचे लोंढेच्या लोंढे घरी जायला निघाले होते. काही मंडळी नरिमन पॉइंट भागाकडे जात होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये दुपारीच सोडून दिली होती. वातावरणात एक प्रकारचा तणाव, सन्नाटा पसरला होता. थोड्या वेळाने आम्ही पुन्हा वरती आलो.

आता संध्याकाळच्या बातम्यांची तयारी सुरू केली होती. युएनआय-पीटीआयवर आलेल्या बॉम्बस्फोटांच्या बातम्या, दादा देशपांडे यांनी मंत्रालय, पोलीस आणि अन्य ठिकाणी जाऊन आणलेल्या बातम्या आणि अन्य ठिकाणांहून अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या सहाय्याने बुलेटीन तयार होत होते. संध्याकाळच्या बातम्या मी वाचणार होतो. संध्याकाळच्या या बातम्या राज्यातील सर्व आकाशवाणी केंद्रे सहक्षेपीत करतात. बरे त्या वेळी आजच्या सारखे न्यूज चॅनेल्सचेही प्रस्थ वाढलेले नव्हते. फक्त दूरदर्शनचे आणि एखाद-दुसरे खासगी चॅनेल असले तर. त्यावेळी दूरदर्शनच्या बातम्या साडेसात वाजता असायच्या. ही बातमी तर संपूर्ण मुंबईत, राज्यात, देशातच नव्हे तर जगात वाऱयाच्या वेगाने पसरलेली. कधी नव्हे ते रेडिओ न ऐकणारी मंडळीही आज आकाशवाणीच्या बातम्या ऐकणार, कारण त्या दूरदर्शनच्या अर्धातास अगोदर होत्या. त्यामुळे नाही म्हटले तरी मनावर थोडे दडपण आले... त्यात बॉम्बस्फोटासारखी भीषण घटना घडलेली. अनेक जण जखमी अनेक जण या दुद्रैवी घटनेत मरण पावलेले... या सगळ्याचे नाही म्हटले तर दडपण आले. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. ६-५० ला मी खाली स्टुडिओत गेलो.

आत जाऊन बसलो, अगोदरचा कार्यक्रम सुरु होता. निवेदक कोण होता ते आठवत नाही. तो ही गंभीर होता. सातला दोन-तीन मिनिटे कमी होती. त्याने, आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या अशी घोषणा केली आणि जागा सोडली. त्याच्या जागेवर मी जाऊन बसलो. कामगार सभा हा कार्यक्रम बातम्याच्या अगोदर सुरू असायचा. कामगार सभा हा कार्यक्रम संपण्याची सिग्नेचर ट्यून सुरू झाली. घड्याळाकडे मी बघतच होता. स्टुडिओतील लाल दिवा लागला आणि
आकाशवाणी मुंबई, शेखर जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे...
ठळक बातम्या...


बातम्या सुरु झाल्यानंतरही काही क्षण मी दडपणाखाली होता. केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून लाखो श्रोते आज या बातम्या ऐकत आहेत, ही सर्वात भीषण व महत्वाची बातमी आपण सांगत आहोत आणि ते सर्व ऐकत आहेत, पण हे दडपण काही क्षणापुरतेच होते. बातम्या झाल्या. मी वर आलो. आता मला ऑफिसला जायचे होते. चर्चगेटहून प्रभादेवी येथे यायला निघालो. रस्त्यावर, लोकल ट्रेनमध्ये काहीच गर्दी नव्हती. जणू काही अघोषित संचारबंदी, जी काही मंडळी होती त्यांच्यातही याच विषयाची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. ऑफिसला पोहोचलो. फोटोग्राफरने काढून आणलेले फोटो पाहिले आणि काय भयानक घडले आहे, त्याची कल्पना आली. आमच्या ऑफिसपासून हाकेच्या अंतरावर सेंच्युरी बाजार येथे एका बेस्टबस मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. मी त्या ठिकाणी गेलो होते. आजूबाजूच्या इमारती, हॉटेल, एका मॅटर्निटी हॉस्पीटलचा काही भाग
उध्वस्त झाला होता. सुदैवाने रुग्णालयातील तान्ह्या बाळांना काहीह गंभीर इजा किंवा दुखापत झाली नव्हती. त्या परिसरातील वातावरणच सारे अंगावर शहारा आणणारे होते. काही वेळे तिथे थांबलो आणि सुन्न होऊन ऑफिसात आलो...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा